महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष ८ नोव्हेंबरपासून सुरू झालं आहे. त्यानिमित्तानं मराठीतल्या या सर्वश्रेष्ठ लेखकाची, विनोदकाराची इंग्रजीतल्या सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या पी. जी. वुडहाऊस या लेखकाशी गंभीरपणे तुलना करणारा हा एक उत्तम म्हणावा असा लेख. हा लेख ‘अंतर्नाद’ या मासिकाच्या ऑक्टोबर १९९६च्या अंकात प्रकाशित झाला आहे. तो येथे लेखकाच्या पूर्वपरवानगीनं पुनर्मुद्रित करत आहोत. हा लेख २२ वर्षांपूर्वीचा आहे. हा लेख लिहिला\प्रकाशित झाला तेव्हा पुल हयात होते. त्यामुळे लेखातील काही संदर्भ त्यानुसार आहेत हे वाचकांनी ध्यानात घ्यावे, ही विनंती.
.............................................................................................................................................
आपल्या सर्वांचे लाडके पु.ल.देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका लेखात श्री. पु. भागवत यांनी लेखाच्या शेवटची सुनीताबाई देशपांडे यांचं वर्णन ‘दैवदत्त देणगी’ असं केलेलं आहे. ते वाचताना मला एकदम लेडी एथेल पेलहॅम वुडहाऊसची आठवण आली. सर प्लम उर्फ पी. जी. वुडहाऊसच्या जीवनात एथेलला जे अनन्यसाधारण स्थान आहे, तसंच, त्याच तोलामोलाचं स्थान, पुलंच्या जीवनात सुनीताबाईंचं आहे.
पुल आणि प्लम हे दोघेही माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. दोघंही आपापल्या भाषांत महान विनोदनिर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. आजवर अनेकदा या दोघांचा तौलनिक अभ्यास करावा असं मला वाटलं (कोणी यापूर्वी हा प्रयत्न केला असल्यास मला त्याची कल्पना नाही), पण ते राहून गेलं. पण भागवतांचा लेख व त्यातला सुनीताबाईंचा तो उल्लेख वाचून राहवलं नाही. सरळ लिहायला लागलो.
प्लम व पुल यांच्या जीवनात व लेखनात काही अत्यंत आश्चर्यकारक अशी साम्यस्थळं आहेत व काही तितक्याच मोठ्या विसंगती. पण विनोदी लेखन हा दोघांनाही जोडणारा एक मोठा दुवा असल्यानं निदान त्या दृष्टीनं तरी असा अभ्यास अप्रस्तुत ठरू नये. दोन ‘ग्रेट ह्युमरिस्टस’वरच्या या तितक्याच ‘ह्यूमरलेस’ लेखाचं याहून अधिक काही समर्थन करता यायचं नाही.
हा तौलनिक अभ्यास म्हणजे त्यांच्यात डावं-उजवं ठरविण्यासाठी केलेली धडपड नाही, हे तर उघडच आहे. अशी तुलना ‘ओडियस’ असते व ती येथे अभिप्रेत नाही. दोघंही समसमा, समबल आणि आपापल्या परीनं सर्वोत्तम आहेत. त्यांची स्पर्धा होऊच शकत नाही.
पुलंचा, माझा आणि जगभरातील करोडो वाचकांचा आवडता प्लम हा दीर्घायुष्य लाभलेला सततोद्योगी लेखक होता. पुलंनी व सुनीताबाईंनी शतायुषी व्हावं व निरोगी जीवन जगावं अशी शुभेच्छा प्रारंभीच व्यक्त करतो.
कारण पुलंना जर सतत कार्यरत ठेवायचं असेल तर त्यांना सुनीताबाईंची सावली हवीच. जशी प्लमच्या आयुष्यात एथेलनं त्याला शेवटपर्यंत दिली, तशीच ही जोडीदेखील सतत एकत्र असायला हवी. एथेलबद्दल (तिच्या निधनानंतर) तिचा नातू एडवर्ड कॅझॅलेट म्हणाला, “एनी वन हू लाईक्स पीजीज् रायटिंग्ज रिअली ओज हर ए ग्रेट डील.” (*१) पुलं आणि सुनीताबाई यांच्याबद्दल जर विचार केला तर सुनीताबाईंविषयीही हेच उदगार काढता येतील.
या मुद्द्यावर सविस्तरपणे पुढे लिहिणार आहे, पण तत्पूर्वी एक खुलासा करायला हवा. तो म्हणजे, या लेखातील सबंध माहिती ही ऐकीव आणि ‘वाचीव’ आहे. ना कधी मला प्लम वा एथेल यांना भेटण्याचा योग आला, ना मी कधी पुलं-सुनीताबाई यांना प्रत्यक्ष भेटलो आहे. (नाही म्हणायला सन १९७८ किंवा ७९मध्ये पुलं वरोड्याला आनंदवनात मित्रमेळाव्याला आले असताना त्यांना जवळून बघण्याची व त्यांचं संभाषण ऐकायची संधी मिळाली; पण त्याला तसा काही अर्थ नाही.) अशी माहिती, त्यावरून काढलेले निष्कर्ष आणि त्यामुळे मनात तयार होणाऱ्या प्रतिमा या कितपत अचूक असतात हा एक प्रश्न असतोच. ते जाऊ द्या, सांगण्याचा मुद्दा असा की पुलंविषयक माहिती मला त्यांच्यावर छापून आलेल्या असंख्य लेखांतून, त्यांच्या स्वत:च्या लिखाणातून व सुनीताबाईंच्या पुस्तकांतून मिळाली आहे. या लेखात प्लमबाबत आलेले संदर्भ बहुतांशी दोन लेखकांच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. पहिलं पुस्तक आहे फ्रान्सिस डॉनल्डसन् हिनं लिहिलेलं त्याचं अधिकृत चरित्र व दुसरं रिचर्ड अस्बर्न याचं ‘पेंग्विन वुडहाऊस कम्पॅनिअन’. त्यानंच संपादित केलेल्या ‘सनसेट अॅट ब्लँडिंग्ज’चाही उपयोग झाला. अन्य संदर्भांच्या ‘सोर्स’चा उल्लेख वेगळा केला आहे. (पुलंचा उल्लेख आदरार्थी व प्लमचा एकरी असं का, असं मात्र विचारू नका! हा एक आपला प्रघात आहे, एवढंच.)
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखनावरचे प्रेम
पुल आणि प्लम यांच्या साहित्यिक कामगिरीवर एकत्र नजर टाकली तर सर्वप्रथम मनात ठसते ती त्यांची बहुप्रसवा लेखणी. विनोद हा दोघांच्याही लेखनाचा स्थायीभाव. निखळ, निर्विष आणि उत्स्फूर्त विनोदनिर्मिती करून दोघांनीही आपापल्या भाषांमध्ये अढळ सम्राटपद मिळवलं आहे. या दोघांच्याही अजरामर विनोदाची जात एक आहे, पोत एक आहे, पण रंगछटा वेगळ्या आहेत.
मात्र पुल फक्त ह्युमरिस्टच नाहीत. त्यांची प्रतिभा व त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. विनोदी लेखनाखेरीज त्यांनी बरंच काही मौलिक लिहिलं आहे. (*२) त्यांच्या जीवनातही असंच वैविध्य आढळतं. ते चिंतनकार आणि विचारवंत आहेत.
प्लम त्यामानानं एकमार्गी, एकसुरी होता. त्याचा जन्म १८८१ सालचा. म्हणजेच तो पुलंपेक्षा वडील होता. इंग्रजीत लेखन करीत असल्यानं साहजिकच त्याला साऱ्या जगातले वाचक मिळाले. इंग्लंड व अमेरिका या दोन्ही देशांनी त्याला घरदार, धनदौलत, नावलौकिक (आणि मनस्तापही) मिळवून दिला. १९७५ मध्ये म्हणजे वयाच्या ९४व्या वर्षी तो मरण पावला, तेव्हा आर्थ्रायटिस सोडला तर बाकी काही मोठी दुखणी त्याला नव्हती. (तसे त्यापूर्वी त्याला दोनदा पक्षाघाताचे झटके येऊन गेले होते व त्याचं हार्ट जरा कुरकुरायला लागलं होतं) पण त्यांना व वृद्धापकाळामुळे येणाऱ्या शारीरिक दुर्बलतेला न जुमानता तो अगदी अंतिम क्षणापर्यंत लिहीतच होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याची (अपूर्ण) कादंबरी ‘सनसेट अॅट ब्लॅडिंग्ज’ या नावानं प्रसिद्ध झाली आहे. हे त्याचं ९७वं पुस्तक. एवढं सातत्य आणि आपल्या व्यवसायावरील एवढं प्रेम फार क्वचित् बघायला मिळतं.
प्लम व पुल यांच्यात अनेक समान गुण आहेत व अनेक भेद. पण माझ्या मते, या दोघांमधला सर्वांत ठळक फरक (लेखक म्हणून) हा आहे की, प्लम हा प्रोफेशनल, व्यावसायिक लेखक होता. त्याला लिखाणाचं प्रेम उपजतच होतं. तो वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी लिहू लागला. पण या प्रेमाचा त्यानं व्यवसाय केला आणि पुलंनी निव्वळ व्यवसाय म्हणून लिखाणाकडे कधीच बघितलं नाही. त्यांचा अप्रोच प्रोफेशनल होता. पण त्यांनी लेखणी हौशीखातर चालविली. निव्वळ उपजिविकेचं साधन म्हणूनच त्यांनी पुस्तकं लिहिली नसावीत, असं म्हणता येईल.
प्लमचं तसं नव्हतं. वडिलांच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे, वयाच्या १९व्या वर्षी म्हणजे सन १९०० साली तो हाँगकाँग अँड शांघाय बँकेत बाबू म्हणून काम करू लागला. त्याला आपल्या भावासारखं कॉलेजात जाता आलं नाही. पण या नोकरीत त्याला रस नव्हता. त्याचं तुरळक लिखाण चालूच होतं. आपल्यातील या गुणाचा आपण चांगला फायदा करून घेऊ शकतो, हे लक्षात येताच त्यानं काहीसा धोका पत्करून ९ सप्टेंबर १९०२ रोजी बँकेची नोकरी सोडली व ‘ग्लोब’ या वृत्तपत्रात ‘बाय द वे’ हा स्तंभ तो चालवू लागला. पुढची काही वर्षं तो फ्री-लान्स रायटर म्हणून वावरला. त्याच्या ‘स्कूल स्टोरीज’ याच काळातल्या. त्यांना मर्यादित यश मिळालं, पण तो समाधानी नव्हता. तो एक-दोनदा अमेरिकेतही जाऊन आला. याचाच परिणाम म्हणून आज जो आपल्याला बादशहा वुडहाऊस माहीत आहे, त्याचा जन्म झाला. १९१५ मध्ये त्याची ‘समथिंग फ्रेश’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. तिनं सारी जादू केली. अमेरिकेच्या श्रीमंत पण काहीशा मठ्ठ वाचकांना इंग्लंडमधील सरदार, अमीर, उमराव यांच्याविषयी वाचायला आवडतं ही गोष्ट त्याच्या लक्षात येताच त्यानं आपल्या या कादंबरीत योग्य तो मसाला भरला. आणि मग ‘त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही.’
प्लम हा व्यावसायिक लेखक होता, असं मी म्हणतो, ते या अर्थानं. ही काही त्याची बदनामी नाही. ही त्याची खासीयत होती. वाचकांना काय हवं ते ओळखून, त्यांची नस अचूक पकडून, त्यांना रुचेल ते देणारा, पण ‘क्वालिटी’ व ‘परफेक्शन’ यात कोठेही तडजोड न करणारा तो एक अत्यंत प्रतिभासंपन्न व हुशार शब्दकर्मी होता. लेखनाच्या भरोशावरच जिवंत राहण्याचं त्याचं ध्येय असल्यानं आपल्या या निसर्गदत्त लेखनगुणांचा असा वापर करून घेणं त्याला अपरिहार्य होतं. पण पुढे अफाट पैसा व मानसन्मान मिळाल्यावरही तो हातावर हात ठेवून नुसता शांत बसू शकला नाही, हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. एखादा निव्वळ गल्लाभरू वा पोटार्थी लेखक खूप कमावल्यावर ‘आता कशाला मेहनत करायची’ म्हणून (निदान म्हातारपणा तरी) चूप बसला असता. पण प्लम लिहीतच राहिला. व्यसन म्हणून किंवा पैसा मिळतो म्हणूनच नाही फक्त, तर लेखनावरील प्रेमापोटीही. ९० वर्षांच्या वर होऊनही आपलं ‘फिनिश्ड प्रॉडक्ट’ अगदी ‘परफेक्ट’ निघावं यासाठी तो जी मेहनत करायचा, याबद्दल वाचलं की, त्याच्या या लेखनप्रेमाची ग्वाही मिळते. अस्बर्न यानं संपादित केलेलं ‘सनसेट अॅट ब्लँडिंग्ज’ वाचा. त्याची मेहनत बघून आपण थक्क होतो.
पुलंच्या साहित्यात तुम्हाला हा ‘व्यावसायिक’ दृष्टिकोन फारसा आढळणार नाही. मागणी तसा पुरवठा या तत्त्वानं त्यांनी फार कमी लिहिलं असावं. केवळ पोट भरण्यासाठी पुलंनी लेखणी झिजविली नाही. त्यामुळे एक छंद म्हणून, हौस म्हणून, प्रेम म्हणून ते लिहीत असावेत. पुलंनी नोकऱ्या केल्या आहेत. नाटक-सिनेमांत कामं केली आहेत. समाजसेवा केली आहे. शिवाय लिहिलं आहे. प्लम् आणि पुल यांच्यातला एक फरक असा की, लेखनावर प्रेम असूनही प्लमनं लेखनाचा व्यवसाय केला. (कारणं काहीही असोत) आणि पुलंनी नाही. पुल हे व्यावसायिक लेखक बनले असतीलच तर ते ओघाओघानं, जाणीवपूर्वक नाही.
पुलंची आजवर ३६ पुस्तकं निघाली आहेत, तीन प्रकाशनाधीन आहेत आणि त्यांच्या निवडक लेखनाचा एक संग्रह प्रसिद्ध झाला आहे. (*३) या साहित्यावर नजर टाकली तर असं दिसेल की, पुलंनी विनोदी गद्यलेखनासोबतच नाटक, एकांकिका, बालवाङमय, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, ललित याही प्रकारात मोडणारं बरंच लेखन केलं आहे. म्हणजे विनोद हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव असूनही ते केवळ त्यातच रमले नाहीत. प्लमप्रमाणे त्यांनी फक्त विनोदी कथा-कादंबऱ्याच लिहिल्या नाहीत. किंबहुना प्लमच्या धाटणीची एकही कादंबरी वा कथा त्यांनी लिहिलेली नाही. तरीही काही लोक त्यांना ‘मराठीचे वुडहाऊस’ म्हणतात. (ते जर प्लमच्या आधी जन्मले असते तर मी त्याला ‘इंग्रजीचा पु.ल.देशपांडे’ म्हणालो असतो!) पण या दोघांमध्ये जी एक मोठी समानता आहे, ज्यामुळे त्यांना विनोदाची सम्राटपदं बहाल करण्यात आली आहेत, त्यावरून असं नामाभिमान करण्यात मला काही गैर वाटत नाही.
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
भाषाप्रभुत्त्व
शब्दांचा अनोखा वापर करून विनोद करण्याचं असाधारण कसब या दोघांनाही प्राप्त आहे. या दृष्टीनं इंग्रजी भाषा अधिक भाग्यवान म्हणावी लागेल. शब्दच्छल करणे, निरर्थक न वाटू देता, व्याकरणाच्या नियमांना टांग मारून स्वत:ला भावेत त्या पद्धतीनं लिहिणं, नवनवे शब्दप्रयोग करणं, स्लँग वापरणं, “फॉल्स कॉन्कॉर्ड, राँग जक्स्टॅपोझिशन, मिस्क्ड मेटॅफर” या आणि अशा कित्येक प्रकारांनी भाषेला गवसणी घालणं हे मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये जास्त चांगल्या तऱ्हेनं शक्य आहे. प्लमनं हे सर्व लीलया करीत उत्कृष्ट व सरस विनोदनिर्मिती जन्मभर केली. नेमकी आणि अचूक शब्दयोजना हा त्याचा हातखंडा. पुलंचं कौतुक हे आहे की, मराठी भाषेत असं स्वातंत्र्य घेण्याची अथवा एवढे प्रयोग करण्याची शक्यता त्यामानानं कमी असूनही त्यांनी मोठ्या समर्थपणानं व यशस्वीरीत्या ही शैली हाताळली. पुलंचा शब्दनिष्ठ विनोद कधीच पांचट वाटत नाही. त्यांच्या कोट्या या निव्वळ पाटी टाकण्यासाठी केलेल्या नसतात. त्या एवढ्या तजेलदार आहेत की वर्षानुवर्षं त्यांचं लावण्य कमी होणार नाही. दर पानावर किमान तीन नव्या व ओरिजिनल कोट्या करणारा वा उपमा देणारा प्लम एव्हलिन वॉ याला ‘मास्टर’ वाटला होता. या भाषाप्रभू प्लमचं व भाषास्वामी पुलंचं सख्खं नातं या ठिकाणी आपल्याला ठळकपणे जाणवतं.
प्लमनं लिहिलं खूप, पण त्यात एकच, विनोदाचाच साचा त्यानं वापरला आहे. कथा आणि कादंबऱ्यांशिवाय त्याचं विनोदी लेखांचं एक पुस्तक (‘लाऊडर अँड फनियर’), त्याच्या जुन्या स्तंभलेखनावरचं दुर्मिळ पुस्तक (‘बाय द वे बुक’), तसंच प्रारंभीच्या काळातील त्याच्या स्कूल स्टोरीज् व त्याची तीन आत्मचरित्रात्मक पुस्तकं, ही त्याची एकूण इतर साहित्यसंपदा. त्याच्या अनेक म्युझिकल कॉमेडीज, ‘नाट्यगीतं’, हीदेखील प्रसिद्ध आहेत. पण या सर्वांतही त्यानं विनोदाचाच सहारा घेतला. थोडक्यात अन्य कोणत्याही प्रकारे त्यानं साहित्यसेवा केली नाही. पुलंच्या साहित्यात विविधता आहे, विनोदासोबतच अन्यही पैलू त्यांच्या प्रतिभेला आहेत आणि फार उत्कटतेनं त्यांनी हे नानाविध लेखन केलं आहे. प्लमच्या प्रतिभासागराला विनोदाची मर्यादा होती (नैसर्गिक की कृत्रिम, ते वेगळं!) आणि पुलंचा प्रतिभाविलास अमर्याद आहे. निदान, एका विशिष्ट रसाचंच बंधन त्यांच्या लेखणीला अडकवून ठेवत नाही.
प्लमच्या शैलीवर (निदान त्याच्या सुरुवातीच्या लेखनावर) किपलिंग, गिल्बर्ट, कॉनन डॉयल व अन्य काही लेखकांचा प्रभाव जाणवतो. त्याची तुलना आयव्ही कॉम्प्टन-बर्नेट या लेखिकेशीही केली जाते. एफ. अॅन्स्टी याचं १८९७चं पुस्तक ‘बाबू जॅबर्जी’ (मुंबईच्या हरी बंगशो जॅबर्जी, बी.ए. याच्या जीवनावर आधारित विडंबन) यानं तर तो फार प्रभावित झाला होता. याशिवाय ‘बायबला’तले, ग्रीक पुराणातले वा शेक्सपिअर आणि अन्य लेखकांच्या साहित्यातले दाखले देण्याचा त्याला ‘कोटेशन मॅनिया’ होता. फार व्यापक प्रमाणात तो या प्रकाराचा वापर करीत असे. पुल असं काही करताना फारसे दिसत नाहीत. आणि त्यांच्या लेखनावर, असल्यास, प्रभाव तरी कोणाचा? विशेषत: प्लमचा परिणाम, कळत-नकळत, त्यांच्या शैलीवर झाला असावा का? किती प्रमाणात? मात्र, हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय असल्यानं मी याबाबत येथे काही निष्कर्ष काढू इच्छित नाही.
एक खुलासा मात्र करावाच लागेल. तो म्हणजे, पुल आणि प्लम यांच्या विनोदाची जात एक आहे असं मला वाटतं, ते त्याच्या शब्दनिष्ठ असण्यावरून. त्याचा पोतही एकच आहे, कारण दोघांचाही विनोद निर्भेळ व निर्विष असतो. त्यात क्रौर्य, उपहास, खवचटपणा नसतो. (‘भावबंधन’मधील इंदू-बिंदूचं वर्णन आठवा व त्याची या दोघांच्या विनोदाशी तुलना करा.) अत्यंत तलम, नाजूक आणि नर्मविनोद हे दोघं करतात. (प्लमच्या बाबतीतला एकमेव अपवाद म्हणजे बर्टी करतो ते ऑन्ट अॅगाथाचं वर्णन. हे मात्र तीव्र आणि विखारी असतं.) सेक्स, स्त्रियांच्या अवयवाचं वर्णन, बीभत्सपणा या साऱ्या विनोदनिर्मितीच्या आधुनिक क्लृप्त्या प्लम व पुल या दोघांना नामंजूर आहेत. तरीही ते यशस्वी ठरले, हे निर्विवाद सत्य आहे.
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लो-ब्रो की हाय-ब्रो
परंतु, पुल व प्लम यांच्या विनोदाच्या रंगछटा वेगवेगळ्या आहेत. हा त्यांच्यातला भेद आहे. पुलंच्या विनोदाला कारुण्याची झालर आहे. त्यांचं लेखन वास्तव, सत्य जीवनावर आधारित आणि ‘प्लाझिबल’ म्हणजे शक्यतेच्या प्रांगणात येणारं आहे. पुलंची लेखणी पांढरपेशा, मध्यमवर्गीय, चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यातील सुखदु:खांचं, स्वप्नांचं, विरंगुळ्यांचं, हौशीमौजींचं, रागरुसव्यांचं, मान-अपमानांचं, बढाया-आढ्यता आणि अवडंबरांचं चित्रण करते. विनोदाच्या माध्यमातून आपल्यातील व्यंग, उणं याकडे बोट दाखविते. दंभावर प्रहार करते. गर्वाच्या फुग्याला पिन लावते. पण याच वेळी पुल अवचितपणे मधूनच एखादी ओलाव्याची हळुवार फुंकरही मारतात. म्हणून त्यांची वक्रोक्ती, त्यांचा उपरोध झोंबत नाही, त्यानं आग होत नाही, त्याचे व्रण पडत नाहीत.
पुल जुनं विकतात असा त्यांच्यावर आरोप आहे. (*४) माझा एक मित्र त्यांना ‘Nostalgia Peddler’ म्हणतो. खरं तर, या एकाच कारणासाठी त्यांना अमरत्व प्राप्त व्हायला हवं असं मला वाटतं. जुन्याचा अभिमान बाळगणारे व ‘गेले ते दिन गेले’ असं म्हणत झुरणारे पुल जर ‘मिडल क्लास, बूर्ज्वा व एस्टॅब्लिशमेंट’वादी समाजाचं प्रतिनिधित्व करीत असतील तर याचमुळे मला त्यांचा अभिमान वाटतो.
या अशा पुलंना तुम्ही लो-ब्रो म्हणाल, की हाय-ब्रो? फ्रान्सिस डॉनल्डसनच्या मते प्लम हा एक लो-ब्रो इसम होता. तो लिहायचा अॅरिस्टोक्रॅसीविषयी. पण त्याची जीवनविषयक जी काय भूमिका होती, ती लो-ब्रो होती. पुलंचं याच्या उलट आहे. त्यांचा विनोद तथाकथित ‘लो-ब्रो’ असला तरी माणूस म्हणून ते उच्चभ्रू, निदान उच्च अभिरुचीचे आहेत. (त्यांच्या वागण्या-बोलण्यात) स्नॉबरी अथवा घमेंड नाही, पण त्यांची दर्जेदार रसिकता त्यांचं इतरांपेक्षा असलेलं वेगळेपण लपवू शकत नाही.)
हे यासाठी लिहिलं की पुलंच्या लेखनाचा (व जीवनाचाही) हा जर मूलाधार – पायव्हॉट – मानला तर त्यातून त्यांच्या व प्लमच्या मधला एकूणच मोठा फरक नजरेस पडतो. वेगळी रंगछटा म्हटली ती हीच. पुल जर नॉस्टॅल्जिया विकतात, तर प्लम फँटसी – अदभुतिका – विकतो. त्यानं आपलं एक वेगळंच भावविश्व तयार केलं होतं. या स्वप्नभूमीचं नाव होतं ‘वुडहाऊसिया’. प्लमच्याच शब्दांत ‘a sort of musical comedy without music’ असं तिचं वर्णन करता येईल. वुडहाऊसिया व तिचे प्रजानन यांना चिरयौवनाचा आणि जिरंजीवित्वाचा आशीर्वाद मिळाला आहे. जरी ही भूमी पाश्चात्य – मुख्यत्वे इंग्लिश – असली तरी तसं तिच्यावर स्थल-कालाचं बंधन नाहीये. काही अपवाद वगळले तर प्लमनं वास्तवाचं भान कधीच ठेवलं नाही. त्यामुळे त्याचं लेखन वाचताना आपल्याला ‘विलिंग सस्पेंशन ऑफ डिसबिलिफ’ या तत्त्वाचा आधार घ्यावा लागतो. म्हणूनच १८६०च्या दशकात ईटनमध्ये शिकणारा व १९१५मध्ये पहिल्यांदा आपल्याला दिसलेला साठीचा लॉर्ड एम्सवर्थ १९७७मध्येही त्याच वयाचा राहतो, याचं नवल वाटत नाही. एखाद्या प्रसंगात हूवर व्हॅक्युम क्लीनर किंवा टीव्हीचे कार्यक्रम यांचे उल्लेख दिसले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण साधारणपणे सन १९०० ते १९१४ या दरम्यान कधीतरी, कोठेतरी ही वुडहाऊसियाची भूमी ‘फ्रीझ’ किंवा ‘फासिलाईज्’ झाली आहे.
प्लमवर एडवर्डियन संस्कार होते हे फारसं प्रचलित मत नाहीय. पण त्याची पात्रं ज्या ‘नट’ (Knut) स्लँगमध्ये (बोलीमध्ये) बोलतात वा शैलीत वावरतात ती याच काळाच्या आसपास इंग्लंडमध्ये प्रचलित होती. अूफी, पीप-पीप, टिकर्टी-टॉक, ओल्ड बीन – हे सारे या ‘नट’ बोलीभाषेचे शब्द आहेत. या ‘नट’ व्यक्तीबाबत असं म्हणतात की, ‘He is not a P. G. Wodehouse invention. He was a fashion eddy of late Edwardianism, though his line goes back to the dandy and the fop of earlier centuries.’
प्लमनं रंगविलेले ते रिकामचोट तरुण (ड्रोन्स), ते रंगेल अर्ल्स, लॉर्डस्, बॅरोनेटस् आणि नाईटस् (त्यातच एखादा माथेफिरू ड्यूक ऑफ डन्स्टेबलसुद्धा), त्या लॉर्नेट उपसून रोखून बघणाऱ्या अॅरिस्टोक्रॅट बायकांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या तेवढ्याच घरंदाज व हॉटी मुली, त्या नाठाळ आत्या-मावश्या, ते पोर्ट पिणारे गलेलठ्ठ बटलर्स आणि हुशार व्हॅलेज, युक्रिज – डॉली – सोपी – चिंप सारखे हवेहवेसे वाटणारे ते लफंगे – हे सारे या वुडहाऊसियाचे नागरिक आहेत. पण त्यातली किती पात्रं प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकतात वा असू शकत होती? थोडाफार स्मिथ (Psmith) आणि जीव्हज् सोडून प्लमचं कोणतंच पात्र प्रत्यक्ष व्यक्तींवर आधारित नव्हतं. या सर्वांना जीवनदान मिळालं होतं ते प्लमच्या शब्दकळेनं (जीव्हज् हा बराचसा जे. एम्. बारीचा प्रत्यक्षातला व्हॅले थर्स्टन् यांच्यावर यांच्यावर आधारित होता. लॉर्ड एम्सवर्थ हाही प्रत्यक्षातल्या एका लॉर्डवर ‘मॉडेल’ केला गेला होता असं डॉनल्ससनचं म्हणणं आहे.)
पण याउलट पुलंचा कोणताही शब्दपुत्र घ्या. तो जिवंत, हाडामासाचा वाटतो, आपल्यातला वाटतो. प्लमची पात्रं प्रत्यक्ष इंग्रज-अमेरिकन लोकांनाही त्यांच्यातली, त्यांच्यासारखीच बहुधा कधी वाटली नसावीत. कारण त्या पात्रांमध्ये एक अशरीरी, ‘एथीरियिल’ अशी ‘क्वालिटी’ आहे. ती मानवी आहेत, पण तरीही खरी नाहीत. पुलंची पात्रं सजीव आहेत. आपण त्यांच्याशी ‘आयडेन्टिफाय’ करू शकतो. ही ‘एम्पथी’, हे तादात्म्य, हे एकरूपत्व प्लमच्या पात्रांसोबत होऊ शकत नाही. आपण तर परकेच आहोत, पण त्याच्या जातभाईंनाही ते जमलं नाही. तरीही प्लम सर्वश्रेष्ठ आहे. हीच सगळ्यात मोठी मौज आहे. मराठीत पुलंना व इंग्रजीत प्लमला पर्याय नाही. मला स्वत:ला, वास्तवावर आधारलेला ‘नॉस्टॉल्जिया’ रंगविणारे पुल आणि अवास्तव फँटसी विकणारा प्लम सारखेच प्रिय आहेत. एक रिअॅलिस्टिक वाटतो, तर दुसरा सररिअल.
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
नाट्य-चित्रपट विश्व
प्लम आणि पुल यांच्या लेखनातील साम्य व भेदांबद्दल अजून बरंच काही लिहिता येईल. पण या ठिकाणी ते सर्वच सांगणं शक्य नाही.
लेखनाचं क्षेत्र सोडून या दोघांच्या वैयक्तिक जीवनाकडे पाहिलं की, तेथेही काही आश्चर्यजनक साम्यस्थळं सापडतात, तर काही तेवढीच विरुद्ध टोकं. यातील पहिलं साम्यस्थळ म्हणजे लेखनानंतर पुल आणि प्लम या दोघांचंही नाटक-थिएटरवरचं प्रेम. कथा-कादंबरी लेखनाखेरीज प्लमनं अनेक संगीत प्रहसनं-म्युझिकलं कॉमेडीज – लिहिल्या. काही एकट्यानं तर काही गाय बोल्टन या त्याच्या जिवाभावाच्या मित्रासोबत भागीदारीत. या प्रहसनांमध्ये वापरण्यासाठी त्यानं अनेक गीतंही लिहिलीत. पण ती ‘नाट्यगीतं’ म्हणावीत की ‘भावगीतं’? ही अनेक प्रहसनं त्या काळात खूप गाजलीत. त्यांनी प्लमला पैसा, नाव आणि मुख्य म्हणजे त्याच्या कादंबऱ्यांसाठी कथानकं मिळवून दिलीत.
आपल्या या नाटकांचं कादंबरीत रूपांतर करण्याची हातोटी त्याला फार उत्तम तऱ्हेनं अवगत नाही, त्याची ‘इफ आय वेअर यू’ ही कादंबरी बघा. हा एखाद्या तीन अंकी नाटकाचा सांगाडा आहे, असा त्यात उल्लेख केलेला नसला तरी सहज लक्षात येण्यासारखं आहे. पण प्लमचं नाटककार व गीतकार म्हणून काही नाव अमर होणार नाही. या सर्व कॉमेडीज केव्हाच विस्मृतीत गेलेल्या आहेत. त्यांचा एक सुवर्णकाळ होता व तो प्लम आणि गाय या दोघांनी गाजवला. म्युझिकल कॉमेडीजच्या इतिहासात मात्र त्यांचं नाव अखेरपर्यंत घ्यावं लागेल, हेही तितकंच खरं. गाय आणि प्लम अखेरपर्यंत शेजारी राहत होते. नव्वदी गाठल्यावरही या दोघांची एखादं नवं नाटक लिहिण्याविषयी वा गीतं लिहिण्याविषयी वा कशाचे तरी डायलॉग्ज ‘रिराइट वा फिक्स’ करण्यासाठी चर्चा चालायची. प्लमच्या सर्वच नाटकांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली नाहीत व जी आहेत ती सहजासहजी मिळत नाहीत. इकडे पुलंच्या नाट्यप्रेमाविषयी मी येथे नव्यानं काय सांगावं? ते जगजाहीर आहे. प्लमच्या तुलनेत मात्र पुल अधिक सरस नाट्यलेखक वाटतात. त्यांची नाटकं विनोदी असली तरी काहीशी नैतिकतेचा ‘अंडरकरंट’ असलेली आहेत. पुलंनी परदेशी नाटकांनाही मराठी साज चढविला आहे. गद्यलेखक म्हणून पुलंचं जेवढं अमूल्य योगदान आहे तेवढंच नाटककार म्हणूनही आहे. पुलंनी नाटककार, दिग्दर्शक, नट, संगीतकार अशा विविध अंगांनी रंगभूमीची सेवा केली. प्लम मात्र नाट्य व गीतलेखनापलीकडे गेला नाही.
नाटकानंतर चित्रपटांचा उल्लेख होणं स्वाभाविकच आहे. प्लमच्या लिखाणावर खूश होऊन हॉलिवुडच्या एम.जी.एम्. या बड्या कंपनीनं १९३०मध्ये त्याला पटकथा लेखनासाठी खास कॉन्ट्रॅक्टवर तेथे आमंत्रित केलं. दर आठवड्याला दोन हजार डॉलर्स एवढा लठ्ठ पगार त्याला होता. पण वर्षभरात त्यानं काम काय केलं? काहीच नाही. फुक्कटचा पगार त्याला मिळाला आणि वर्षभरानंतर सुट्टी. याचा फायदा प्लमनं आपल्या लेखनासाठी करून घेतला. त्याच्या काही कादंबऱ्यांना हॉलिवुडची पार्श्वभूमी आहे. पण तो या आपल्या गुणांच्या अशा अवमूल्यनावर समाधानी नव्हता. म्हणावं तसं एकही मोठं पटकथालेखनाचं काम त्याला मिळालं नाही. ज्या लिहिल्या त्या वापरल्या गेल्याच असं नाही.
मग हॉलिवुड सोडताना त्यानं ७ जून १९३१ रोजी एक मुलाखत दिली व त्यात हॉलिवुडचा हा ओंगळ कारभार उघडकीला आणला. तक्रार म्हणून नाही तर गंमत म्हणून. पण याचा परिणाम फार भयंकर झाला. साऱ्या अमेरिकेत खळबळ उडाली. हॉलिवुडमधले वेस्टेज, ऐय्याशी, उधळपट्टी या साऱ्यांना कंटाळलेल्या बँकर्सनी लगेच कंबर कसली आणि यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी निर्मात्यांना धारेवर धरलं. तसंही १९२९च्या आर्थिक मंदीनंतर हे होणं अपरिहार्यच होतं. पण प्लमनं त्या कार्याला नकळत चालना दिली. याबाबत असं म्हटलेलं आहे की, ‘He single-handedly rang the death knell of all these ludicrous practices of the Hollywood.’
पण प्लम आणि एम.जी.एम. दोघांनाही यातून फारसं शहाणपण आलेलं दिसत नाही. कारण १९३३मध्ये या कंपनीनं पुन्हा वर्षभरासाठी त्याला आमंत्रित केलं. अडीच हजार डॉलर्स दर आठवड्याला या पगारावर. मात्र पुन्हा त्याच जुन्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली. फुकटचा पैसा आणि अत्यंत कमी काम किंवा जवळपास नाहीच! त्याच्या स्वत:च्याच कादंबऱ्यांवर आधारित छोटे स्क्रीनप्लेज लिहिण्यापलीकडे प्लमनं काही केलं नाही. १९३७मध्ये त्यानं हॉलिवुड सोडलं ते कायमचं. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायला हवी की पटकथा लेखनात त्याला कधीच यश मिळालं नाही. हा त्याचा प्रांत नव्हता. त्याच्या स्वत:च्याच ‘समर लाईटनिंग’ या कादंबरीवरील चित्रपटाची पटकथा त्यानंच लिहिली आहे. (राल्फ लीननं यात काम केलं) एका इंग्रजी समीक्षकानं या चित्रपटाच्या परीक्षणात लिहिलं होतं की, ‘The script clings to theatre technique, lacks fluidity of movement and idea.’ हे अत्यंत योग्य व परखड समालोचन होतं असं डॉनल्डसन् म्हणते.
आपल्या नाट्य व चित्रपट जीवनातील आठवणींवर प्लमनं ‘ब्रिंग ऑन द गर्ल्स’ आणि ‘ओव्हर सेव्हन्टी’ अशी दोन पुस्तकं लिहिली आहेत. पण त्यात खरं किती आणि थापेबाजी किती हे शोधण्यासारखं आहे. त्याला या अशा फोकनाड्या मारायला, मिर्चमसाला लावायला खूप आवडायचं. आपल्या आधीच्या जीवनाबद्दल बोलताना, लेजर खराब केलं म्हणून बँकेनं आपल्याला कसं लाथ मारून हाकलून दिलं याचं मोठं मस्त व अतिशयोक्तीपूर्ण वर्णन त्यानं केलं आहे. पण सत्य वेगळंच आहे, हे आपण आधी पाहिलंच. अशा अनेक रंजक, रसिल्या व सुरस चुटक्यांची मालिका असलेली ही पुस्तकं आहेत. (डेव्हिड निवेनच्या ‘ब्रिंग ऑन द इम्टी हॉर्सेस’ या पुस्तकाची आठवण होते का येथे?)
पुलंचा चित्रपटसृष्टीशी नाटकाएवडाच जवळचा व जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यांनी चित्रपटात कामंही केली आहेत. ‘गुळाचा गणपती’ हा तर सबकुछ पुल असलेला चित्रपट आहे. पटकथाकार म्हणून त्यांचा ताजा चित्रपट म्हणजे, ‘एक होता विदूषक’. पुलंना या क्षेत्रात प्लमसारखं अपयश आलं नाही व आपल्या बॉलिवुडनं त्यांचा योग्य तो फायदा करून घेतला हे आपलं भाग्यच! (बाकी हिंदी सिनेमांत त्यांचं काय झालं असतं हे सांगता यायचं नाही. ती मंडळी काही हॉलिवुडवाल्यांपेक्षा वेगळी नाहीत.)
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
बर्लिन ब्रॉडकास्टस्
रेडिओ, टेलिव्हिजनवर तर पुल प्रत्यक्ष नोकरीच करीत होते. या माध्यमांशी त्यांचे निकटचे संबंध आले आहेत. तसंच पुल स्वत: एक परफॉर्मिंग आर्टिस्ट असल्यानं त्यांचे अनेक जाहीर कार्यक्रम झाले आहेत. एकपात्री प्रयोग, कथाकथन, कवितावाचन, भाषण अशा कितीतरी कार्यक्रमांच्या ऑडिओ-व्हिडिओ कॅसेटसही निघाल्या आहेत. प्लमच्या बाबतीत असं काही घडलं नाही. त्याच्या लेखनावर आधारित रेडिओ, टीव्ही कार्यक्रमांचं प्रास्ताविक करण्यासाठी व एखाद्या मुलाखतीसाठीच तो माईकच्या वा कॅमेऱ्याच्या समोर आला. पुलंसारखे जाहीर कार्यक्रम त्यानं कधी केले असतील का? बहुधा नाहीच.
मात्र रेडिओचा प्लमच्या आयुष्यात एक फार विलक्षण संबंध आला आहे. त्याच्या त्या कुप्रसिद्ध बर्लिन ब्रॉडकास्टसमुळे प्लम प्रेमिकांना हा सारा किस्सा ठाऊक असल्यानं त्याची येथे द्विरुक्ती नको. अत्यंत साधेपणात जाऊन हा बिचारा भोळासांब जर्मनीच्या भूलथापांना बळी पडला आणि जवळपास मरेपर्यंत त्याला दूषण द्यावं लागलं. मरणापूर्वी काही दिवस आधी इंग्लंडच्या राणीनं त्याला ‘नाईटहूड’चा किताब बहाल केला. तेव्हा तो म्हणाला, “मला आता आयुष्यात अधिक काहीच नको.” त्याच्या मातृभूमीत त्याची अवहेलना झाल्याचं हे शल्य अखेरीस या सन्मानानं नष्ट झालं. पण त्यासाठी त्याला किती वाट बघावी लागली! नकळत झालेल्या चुकीसाठी त्याला फार मोठी किंमत द्यावी लागली.
गंमत म्हणजे, युद्धकाळात जर्मन रेडिओवरून भाषणं केल्याबद्दल इंग्रजांनी फक्त प्लमलाच (तेही त्याची बाजू ऐकून न घेता) का धारेवर धरलं हे कळत नाही. त्या काळात नाझी समर्थक असलेले अन्य बडेबडे इंग्रज कोणी नव्हतेच का? ब्रिटिश युनियन ऑफ फॅसिस्टचा नेता सर ऑस्वल्ड मॉस्ली, वृत्तपत्रसम्राट व्हिस्काऊंट रॉदमिअर, नाझीवादी बॅरन रेडसडेल, खुरेखुरे हॉ-हॉ असलेले नॉर्मन बेली व स्टुअर्ट विल्यम् जॉयस आणि कवी एझरा पाऊंड – यानं तर रोम रेडिओवर अलाईड सैन्याविरुद्ध शेकडो भाषणं केली – या साऱ्यांना त्यांच्या नाझी प्रेमाविषयी जनतेनं कमी शिक्षा दिली असं दिसतं. एकटा प्लमच अडकला (*५). पण सरतेशेवटी, १९८१मध्ये, तीस वर्षांच्या गुप्तत्तेच्या कायद्यातून बाहेर निघालेल्या १९५१च्या सरकारी रिपोर्टवरून प्लमचं निरपराधित्व कायमचं व सप्रमाण सिद्ध झालं आहे. भाषण करण्यात त्याची चूक झाली. तांत्रिकदृष्ट्या तो अपराधीही असेल, पण तो देशद्रोही नव्हता. मूर्ख होता, बावळट होता, पण ट्रेटर नव्हता. प्लमच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी (आणि सरकारच्या विरोधाला तोंड देऊन, त्यासाठी जंगजंग पछाडून) हा अहवाल प्रसिद्ध करविण्याचं श्रेय जातं अॅबर्डिनचा तत्कालिन टोरी खासदार इयान स्प्रोट या एकांड्या शिलेदाराला. प्लमनं अशी चूक का केली? असं म्हणतात की त्याला सल्ला द्यायला तेव्हा जीव्हज् हजर नव्हता, म्हणून! ऑगडेन नॅशच्या शब्दांत सांगायचं तर –
Bertram Wodehouse and P.g.Wooster
No matter which fumbled in 41
It was deduce how the faux pas came about;
It Was clearly Jeeves afternoon out
पुल या दृष्टीनं सुदैवी आहेत. त्यांना कधीच अशा निष्कारण (वा सकारणही) जनक्षोभाला सामोरं जावं लागलं नाही. याउलट, आणीबाणीतील त्यांच्या भूमिकेमुळे तर त्यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली. स्वातंत्र्यपूर्व काळातही त्यांनी देशसेवा केली आहे. प्लम ना पहिल्या महायुद्धात रणांगणावर गेला, ना दुसऱ्या. ना कधी त्यानं युद्धात कोणाची बाजू घेतली. कारण तो फक्त स्वान्तसुखाय जगायचा. पुल हे सामाजिक जाणीव असलेलं एक अत्यंत चळवळं व्यक्तिमत्त्व आहे. समाजाभिमुख राहणी आणि तत्त्वांसाठी किंवा कोणत्या तरी कारणासाठी झगडण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. बांधीलकी, संस्कार, माणुसकी या गोष्टी त्यांना भावतात. त्या कालबाह्य वाटत नाहीत. प्लम जे जीवन जगला त्यात आराम आणि स्वकेंद्रित भावना (सेल्फ-सेंटर्डनेस) याखेरीज अन्य कशालाच स्थान नव्हतं. पण मी यात त्याला दोषी धरत नाही. हा एकेकाच्या स्वभावाचा भाग आहे. त्यात चांगलं-वाईट ठरविणारे आपण कोण?
पुलंना आजवर अनेक सन्मान मिळाले. प्लमला मात्र तीनच. पण ते तिन्ही फार विरळा सन्मान होते. १९३९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठानं त्याला ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही मानद उपाधी दिली. मार्क ट्वेननंतर हा बहुमान मिळविणारा तो पहिला विनोदकार. त्याला राणीनं दिलेला ‘नाईटहुड’ हा दुसरा मान. आणि तिसरा म्हणजे मादाम तुसाँच्या प्रदर्शनात त्याचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आला.
पुलंना संगीताची खूप आवड आहे व जाण आहे. गाणं-बजावणं, मैफिली हा त्यांचा खास शौक. प्लमचाही म्युझिकल कॉमेडीजद्वारे संगीताशी संबंध आला होता. जरी अभिजात, शास्त्रीय संगीताचा दर्दी म्हणून वा समीक्षक म्हणून त्याची ख्याती नसली तरी त्याला संगीताची उत्कृष्ट जाण होती हे नक्की. औपचारिकरीत्या संगीत न शिकताही त्याचे कान तयार होते. एकदाच ऐकलेली कोणतीही चाल वा धून तो शिट्टीवर बिनचूक वाजवायचा. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आधीच बांधलेल्या चालीवर त्याला गीतं लिहायला आवडायचं.
पुल जसे गवय्ये तसेच खवय्येही आहेत. खाण्याच्या विविध प्रकारांवर व पद्धतींवर त्यांनी मोठ्या चवीचवीनं लिहिलं आहे. पट्टीचे पाकशास्त्रप्रेमी आहेत ते. प्लम स्वत: किती आवडीनं व किती खायचा हे तर ठाऊक नाही, पण खाण्यावर लिहायला त्याला आवडायचं. त्याची बहुतेक पात्रं खाण्याचा मनसोक्त आनंद लुटतात (हार्टी ट्रेंचरमन). ऑन्ट डेलियाचा अतुलनीय फ्रेंच कुक आनातोल, त्यानं बनविलेल्या त्या अप्रतिम डिशेस आणि खादाड बर्टी वुस्टरवरील त्याचा प्रभाव कोण विसरू शकेल? आनातोल इज गॉडस गिफ्ट टू गॅस्ट्रिक ज्युसेस.
मात्र प्लमला खेळांविषयी प्रचंड आस्था होती, ती पुलंच्या लेखनात आढळून येत नाही. प्लम स्वत: अॅथलिट होता. क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ व बॉक्सिंग हे त्याच्या प्रेमाचे विषय. त्याचे बहुतेक नायक यांपैकी एका वा अधिक खेळात प्रवीण असतात. इतरही अनेक खेळांचा उल्लेख त्याच्या लेखनात येतो. पुलंना खेळामध्ये गम्य नाही की त्यावर मुद्दाम काही लिहावं असं त्यांना कधी वाटलं नाही?
प्लम व पुल दोघांनाही फॅनमेल खूप यायची, येते. या सर्व चाहत्यांना व आपल्या मित्रांना पत्रं लिहिण्याची दोघांनाही सवय व आवड. प्लमचं आत्मचरित्रात्मक ‘परफॉर्मिंग फ्ली’ हे पुस्तक तर अशा पत्रांवरच आधारित आहे. पुलंच्या पत्रांचा असा संग्रहही अलीकडे प्रसिद्ध झाला आहे.
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
प्रेम लाभे प्रेमळाला
पुल समाजाभिमुख आहेत याचीच दुसरी बाजू म्हणजे ते माणूसप्रिय आहेत. असं ऐकिवात आहे की वेळी-अवेळी आलेल्या, अनाहुत पाहुण्यांचे त्यांच्या घरी वॉर्मली स्वागत होत नाही. पण या कर्टनेसमागे काही कारणं असणार हे नक्की. गोविंद तळवलकर यांच्या एका लेखात याचं उत्तम स्पष्टीकरण आलं आहे. अपॉइंटमेंट घेऊन गेलेल्यांना वेगळा अनुभव येत असेल. याशिवाय जी पुलंची आपल्या गोतावळ्याची माणसं आहेत, त्यांच्यासाठी तर ते जान न्योछावर करायला तयार असतात. हा गृहस्थ माणूसप्रिय आहे, पण सवंग नाही. भोवती चमच्यांची गर्दी जमवीत नाही. पण त्याला माणसांचा सहवास आवडतो. पुल गुणग्राहक आहेत, रसिक आहेत, दर्दी आहेत, उत्तमाचे भोक्ते आहेत आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी कौतुक करताना ते हातचं न राखता, स्तुतिसुमनांच्या वर्षावानं समोरच्याला चिंब भिजवून टाकतात. त्यांची व्यक्तिचित्रं वाचली की हे जाणवतं. ‘गुण गाईन आवडी’ या शीर्षकावरून जर ते व्यक्तिपूजक व भाबडे भक्त आहेत असा कोणी तर्क केल्यास तो चूक ठरेल का? उलट यामुळेच त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला कोणतीच बाधा न येता त्यांची शान वाढते. लेखन, नाट्य, संगीत, चित्रपट, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी माणसं जोडली, निर्हेतुक सहज मित्र तयार केले. गुणीजनांचा मेळा जमविला. आपापल्या क्षेत्रांत दिग्गज असणाऱ्या त्यांच्या या जिवलगांची नुसती यादी पाहून जीव दडपतो. किती विविधता आहे त्यात! पुलंचा मोकळा स्वभाव व स्वत:चंच स्तोम कधी माजवून न घेण्याची त्यांची प्रवृत्ती यामुळे हे शक्य झालं.
पुल भावुक स्वभावाचे असल्याने त्यांना त्यांच्या दैवताबद्दल खूप आदर वाटतो. याउलट प्लम अत्यंत ‘इररेव्हरंट’ होता. भावुक होणं त्याला कधी जमलंच नाही. जगातल्या यच्चयावत गोष्टींची टिंगल-टवाळी (अर्थात बिनाविखाराची) त्यानं केली आहे. प्लमचं बरंच आयुष्य अमेरिकेत गेलं खरं, पण तो पैदाईशी इंग्रज, अबोल, घुम्या, रिझर्व्हड्. आपल्याच घराला किल्ला मानणारा, स्वत:ची प्रायव्हसी जपणारा. त्यात पुन्हा तो लाजाळू, भिडस्त व एकांतप्रिय होता. ‘सोशली इनकम्युनिकेबल’ आणि ‘पॅथॉलॉजिकली इनहिबिटेड इन ऑर्डिनरी डेली कॉन्टॅक्टस’ असं त्याचं वर्णन केलं जातं. अॅलिस्टर कुकला, म्हातारपणी दिलेल्या एका मुलाखतीत प्लमनं म्हटलं होतं, “I have always been a recluse.” कधी कधी नाईलाज म्हणून तो माणसांत मिसळायचा पण होता माणूसघाणाच. माणसांचा सहवास तो शक्यतो टाळायचा.
आयुष्याच्या उत्तरार्धात तर त्यानं न्यूयॉर्कजवळील लाँग आयलंड बेटावरील एका छोट्या खेड्यात आपलं घर केलं होतं. गर्दीपासून दूर – जवळ फक्त एथेल आणि त्यांची कुत्री-मांजरी. आणि हाकेच्या अंतरावर राहणारा त्याचा खराखुरा जिवलग सखा, गाय बोल्टन! “तुला लोनली वाटत नाही का?”, असं विचारल्यावर प्लम म्हणाला होता की, “माझी बायको व गाय माझ्या सोबतीला असतात. यू नीड ओन्ली वन फ्रेंड.” मला नाही वाटत त्याला कधी पुलंसारखं होता आलं असेल!
मात्र त्याची पात्रं अगदी त्याच्या उलट आहेत, नाही? वुडहाऊसियातील बहुतेक नागरिक ओपन व फ्रेंडली आहेत. पण या स्वप्नभूमीतील इंग्लंडचं हवामान जसं कधीच खरं इंग्लिश नव्हतं – ते होतं सनी कॅलिफोर्नियातलं – तसंच वुडहाऊसियाचा इंग्रज नागरिक हा स्वभावानं अमेरिकन असला पाहिजे. पण त्यांचा जनक, सर प्लम प्लम मात्र एकदम वेगळा होता. परक्या माणसांचा सहवास टाळण्याचा हा मॅनिया त्याला एवढा होता की, तो सहसा कधी कोणा अनोळखी – अनाहूत पाहुण्याला भेटत तर नसेच, पण कोणी अपॉइंटमेंट मागितली किंवा चहा प्यायला, फराळाला त्याला बोलावलं तरी हा गडी त्यासाठी नाखूश असायचा.
जानेवारी १९२९च्या ‘स्ट्रँड’ मासिकात त्याच्या मुलीचा, लिओनोराचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात तिनं प्लमच्या या स्वभावावर प्रकाश टाकला आहे. “कोणी समाज एखादे दिवशी घरी यायचं आमंत्रण दिलं की, हा उलट टपाली कळवतो की, सॉरी मी त्या दिवशी तर कॅनडाला जातो आहे – आणि केवळ असं कळवलं म्हणून गरज नसतानाही, तो आजच कॅनडाला खरंच निघून जाईल!” आता बोला! या तुलनेत त्यानं आपल्या श्री. मधु अभ्यंकर यांना “हरी, कम व्हाईल आय अॅम ऑन द राईट साईड ऑफ द क्लाऊडस” असं कळवलं हे एक महदाश्चर्यच म्हणावं लागेल (*६). पण हे आमंत्रण १९७४ सालातील होतं हे विसरता यायचं नाही.
या अशा प्लमजवळ तो कितीही रसिक व गुणग्राहक असला तरी मित्रांचं कोंडाळं राहील, हे कसं शक्य आहे? अर्थात तो फार बडा व थोर माणूस होता व त्याचे चाहते जगभर होतो. राजे-रजवाडे आणि सामान्य जन सगळेच त्याला पसंत करायचे, फॅनमेल पाठवायचे. बडीबडी मंडळी त्याला भेटत असणार! पण ती सारी परिचित असली तरी जिवलग नव्हती. मित्रपरिवार खूपच मोठा असूनही प्लमचे सख्खे म्हणण्यासारखे तीन-चारच मित्र होते. बालपणीचा बिल- विल्यम चाऊनेड, तारुण्यापासून मरेपर्यंत साथ देणारा गाय बोल्टन व मधल्या काळातले माल्कम मगरिज आणि डेनिस मक्केल. गाय हा त्याच्यासारखा च इंग्रज होता – आर्किटेक्ट असून नाटकं लिहायचा. त्याचा जन्म १८८४ सालचा व मृत्यू १९७९ सालचा. या दोघांची भेट न्यूयॉर्क येथे झाली – आणि त्यांचं जे घट्ट सख्य झालं, ते कायमचं. प्लम व गाय आणि या दोघांच्या बायका – एथेल आणि व्हर्जिनिया या चौघांची कंपनी लाँग आयलंडवरही एकमेकांना म्हातारपणात साथ देत होती. प्लमला वादविवाद, डिस्प्युट, भांडणं या साऱ्यांचा मनस्वी कंटाळा होता. कधीही बखेडा उत्पन्न न करण्याचं त्याचं ब्रीद होतं. “डोन्ट आर्ग्यू, जस्ट अॅग्री” असं तो म्हणायचा. त्या मानानं पुल निदान शाब्दिक लढाया करताना तरी मागेपुढे बघत नाहीत. माधव मनोहर यांच्यावरील त्यांचा हल्ला आठवा (*७).
प्लमच्या व पुलंच्या आणखी एका समान गुणाचा उल्लेख करायला हवा, तो म्हणजे दोघांचंही पूर्वग्रहदूषित न होता एखाद्याचं कौतुक करणं. भालचंद्र नेमाडे यांच्याशी पटत नसतानाही पुल ‘कोसला’ कादंबरीचं वर्णन करताना थकत नाहीत (*८). ए.ए. मिल्न यानं प्लमला फार गोत्यात आणलं. (याचा उल्लेख पुढे केला आहे.) पण उत्तरायुष्यात प्लम हे सारं विसरून त्याची आवर्जून चौकशी करायचा. ‘मिल्नचं ‘टू पिपल’ हे पुस्तक कितीदा वाचलं तरी आपलं समाधान होत नाही’, असं तो म्हणायचा.
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
एथेल आणि सुनीताबाई नसत्या तर…
प्लमनं खूप पैसा कमावला, त्यानं स्वत: मात्र त्याचा फार उपयोग करून घेतला नाही. खरा उपभोग घेतला त्याच्या पत्नीनं. एन्जॉयमेंट हीच तिची जीवनापासून अपेक्षा होती. नवनवीन महाग कपडे, मोठमोठी घरं आणि कॅसिनो – जुगारखान्यांना भेटी हे तिचे शौक होते. सारं प्लमच्या पैशांवर. एथेल एक अत्यंत ‘ग्रेगॅरियस’ बाई होती. पुलंप्रमाणेच तिला माणसांची कंपनी खूप आवडायची. पार्ट्या देणं हाही तिचा छंद होता. मात्र प्लमला ती फार थोडा पॉकेटमनी द्यायची. “just enough for tobacco, golf balls and self-respect” असं प्लमच्याच एका पात्राच्या शब्दांत सांगता येईल. पण प्लमची या गोष्टीला कधीही हरकत नव्हती. तो कमवायचा व एथेल तो पैसा त्या दोघांसाठी – पण जास्त करून स्वत:साठी – खर्च करायची. प्लमच्या गरजाही फार कमी होत्या. लाँग आयलंडवर मात्र त्याला पूर्ण एकांत मिळावा यासाठी तिला हे सगळं त्यागावं लागलं आणि तिनं आनंदानं हा त्याग केला. बदल्यात तिला मिळाला कंटाळा, बोअरडम्!
एक गोष्ट निर्विवाद. जर एथेल नसती तर प्लम ‘वुडहाऊस’ झाला नसता. एखाद्या आईच्या ममतेनं, मायेनं तिनं त्याला पोटाशी धरलं, पंखाआड दडवलं – जगातल्या संकटांची सावली त्याच्यावर पडणार नाही याची तिनं काळजी घेतली. डोळ्यात तेल घालून दक्षतेनं ती त्याचे सारे व्यवहार बघायची. फक्त प्रकाशक व एजंट यांच्याशी प्लम बोलायचा – पण तेही तिच्याच सल्ल्यानं. ‘शी ऑर्गनाईज्ड अँड रॅन हिज लाइफ फ्रॉम मॅडनिंग क्राऊड अँड दॅट परमिटेड हिम टू कॉन्सन्ट्रेट ऑन हिज रायटिंग’ असं तिचा नातू एडवर्ड म्हणतो (*९). ती त्याची ‘प्रोटेक्टर’ होती. त्याच्या अनेक पुस्तकांची शीर्षकं तिनं सुचविली आहेत.
एथेल नॉरफॉक, इंग्लंडमधल्या एका शेतकऱ्याची मुलगी. तिचं पहिलं लग्न लेनर्ड रॉली याच्याशी झालं होतं व त्याच्यासोबत ती भारतात राहायला आली. या दाम्पत्याला १९०५ साली एक मुलगी झाली, लिओनोरा. १९१० साली दूषित पाणी पिऊन लेनर्ड मेला व विधवा एथेल मुलीला घेऊन इंग्लंडला परतली. पुढे १९१४ साली एका नाटक कंपनीसोबत ती अमेरिकेत गेली असताना ३ ऑगस्ट १९१४ रोजी तिची प्लम प्लमशी ओळख झाली व ३० सप्टेंबर १९१४ रोजी त्यांनी लग्न केलं. प्लमला लिओनोराचा एवढा लळा लागला की, त्यानं तिला रीतसर दत्तक घेतलं.
एथेलनं प्लमचा पैसा उधळला, पण त्या पैशांसाठी तिनं त्याच्याशी लग्न केलं नाही, कारण लग्नाच्या वेळी त्याच्याजवळ फक्त १०० डॉलर्स होते. पण पुढे अमाप पैसा मिळाल्यावर व तो उधळून, तरीही खूप शिल्लक राहिल्यावर, एथेलला अचानक बचतीचं खूळ लागलं. म्हाताऱ्या प्लमला आर्थ्रायटिसमुळे बाथटबात बसता येत नव्हतं, म्हणून त्यानं त्याच्या बाथरूममध्ये शॉवर बसविण्याची कल्पना तिच्यासमोर मांडली. पण बचतीच्या नावाखाली तिनं ती फेटाळली. बिचाऱ्या प्लमला मरेपर्यंत शॉवर काही मिळाला नाही. एथेल अशी का वागली? श्रीमंत असणं ही कल्पना तिच्या पचनी पडली नव्हती, म्हणून?
प्लमचं तिच्यावर आणि तिचं प्लमवर खूप प्रेम होतं. जवळपास ६० वर्षं ती एकत्र राहिली – डायव्होर्स न घेता! प्लमला आयुष्यात जो एकाकीपणा वाटत होता, तो तिनं दूर केला. तिनं त्याला इमोशनल सिक्युरिटी दिली, म्हणून तो तिचा ऋणी होता. पण त्याला त्याच्या कमजोरीचं दु:ख होत असेल का? बर्टी वुस्टरच्या माध्यमातून नंतर नंतर प्लम स्वत:चंच सेल्फ-डेरॉगेटरी मनोगत मांडत होता, असं एक मत आहे. ते जाऊ द्या. पण एथेलचे (प्लम तिला ‘बनी’ म्हणायचा!) त्याच्यावर खूप उपकार होते, हे नक्की. प्लमचं बालपण व तारुण्य एकाकी गेलं. त्याचे वडील हाँगकाँगला नोकरीत होते. त्याच्या आईनं लहानग्या प्लमला दोन मोठ्या भावांसह इंग्लंडला जे पाठवलं, ते कायमचंच. घर, आई-बापाचं प्रेम या गोष्टींना तो पारखा झाला. पुढे तर काय, त्याला नोकरीच करावा लागली. प्लमची आई तशीही एक मठ्ठ आणि भावनारहित स्त्री होती. तिला ‘मेमसाब’ म्हणत. या मेमसाबची (म्हणजे तिच्यातल्या आईची) जागा एथेलनं भरून काढली. (या मेमसाबवरून आठवलं – प्लमचा आणि भारताचा एक चमत्कारिक पण लांबचा संबंध आहे. त्याचा मोठा भाऊ अर्मिन भारतात शिक्षक म्हणून वावरला. जे. कृष्णमूर्ती व त्यांचे बंधू नित्यानंद यांना त्यानं शिकवलं. तो एक थिऑसॉफिस्ट होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’त ‘सेनेक्स’ नावानं तो नेहमी कविता लिहायचा. दक्षिण मुंबईतील (कुलाब्यात) एका रस्त्याला त्याचं नाव दिलं आहे. {प्लमच्या नावाचा एक रस्ता नॉरफॉकमधील हनस्टॅनटन गावात आहे.} याशिवाय, एथेल भारतातच रहायला होती. लिओनोराचा जन्म कुठला? भारतातला की इंग्लंडमधला? आणि लेनर्ड रॉलीची कबर कुठे आहे? यांची उत्तरं शोधणं मनोरंजक ठरेल. आणखी एक योगायोग म्हणजे प्लमचा जगप्रसिद्ध अभ्यासक रिचर्ड अस्बर्न याचाही जन्म भारतातच झाला. स्वत: प्लम मात्र येथे कधी आल्याचं ऐकलं नाही. त्याच्या लेखनात भारताचा तुरळक उल्लेख येतो, तेवढाच. असो!)
एथेलनं प्लमला खूप काही दिलं. मुख्य म्हणजे तिनं त्याला लिओनोरा दिली. प्लमचं लिओनोरावर एवढं प्रेम होतं की, ऐन चाळीशीत लिओनोरा अचानक वारली, तेव्हा तो उदगारला, “आय थॉट शी वॉज इममॉर्टल!” (*१०) एथेल प्लम प्लमच्या निधनानंतर जवळपास नऊ वर्षांनी, ऑक्टोबर १९८४ साली, वयाच्या ९९ व्या वर्षी मरण पावली.
या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुलंच्या सहचरी कम सेक्रेटरी कम मॅनेजर कम हेडमास्टर अशी भलीबुरी बिरुदं आणि दूषणं ज्या माऊलीला मिळाली आहेत, तिचं कर्तृत्व एथेलसारखंच थोर आहे. सुनीताबाईंनी पुलंना आंगोपांगी फुलू दिलं, स्वत:ला अंधारात ठेवून त्यांचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून त्या सतत जागरूक राहिल्या. केलेल्या कामाचा पै-पै मोबदला ठणकावून घेतला. पैसा जमविला. एथेलनं जर लाखो डॉलर्सची बचत केली असेल, तर सुनीताबाईंनी लाखो रुपयांची. पण…
आणि या ‘पण’मुळेच सुनीताबाई एथेलपेक्षा श्रेष्ठ ठरतात. एथेलनं आपला पैसा फक्त आपल्यावर खर्च केला. नाही म्हणायला, त्यातला काही हिस्सा ‘पी.जी. वुडहाऊस शेल्टर फॉर स्ट्रे कॅटस अँड डॉग्ज’ या मुक्या प्राण्यांच्या आश्रयस्थानावर खर्च झाला आहे. प्लम व एथेल या दोघांनाही कुत्र्या-मांजराचं प्रेम असल्यानं तिनं प्लमच्या मागे लागून पस्तीस हजार डॉलर्सची देणगी या संस्थेला दिली होती. पण प्लमच्या बाकी पैशांचं काय? त्याच्या मृत्युपत्राची कलमं तर काही माहीत नाहीत. पण त्यातला मोठा हिस्सा त्याच्या व एथेलच्या मृत्यूनंतर त्याच्या नातलगांना मिळाला असणार. प्लमच्या मृत्युपत्रात याच डॉग शेल्टरसाठी तीन लाख डॉलर्सची तरतूद होती. पण तिथल्या नव्या मॅनेजरनं एकदा एथेलचा अपमान केला आणि बस्! तिनं ताबडतोब प्लमला मृत्युपत्र बदलायला लावलं. नो डोनेशन टू डॉग्ज. त्यांच्या आवडत्या पेकिनीज कुत्र्यांच्या स्मृतीपीत्यर्थही नाही. थोडक्यात, आपली सारी कमाई काही प्लम-एथेलनं खैरात म्हणून वाटली नाही. प्लम स्वत: तिच्या नकळत त्याच्या मित्रांना खूप मदत करायचा, पण तेवढाच एक-दोन डॉलर्ससाठी तो जीव काढायचा. एकूणच पैशांबाबत तो केअरलेस असल्यानं त्याची विल्हेवाट लावण्याचं काम करावं लागलं एथेलला. पुलंची पैशांबाबतची भूमिका कशी आहे? त्याहीपेक्षा, सुनीताबाईंची कशी आहे? पुलंनी आपल्या पैशातला फार प्रचंड हिस्सा सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. (गोविंद तळवलकर यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा पंचाहत्तर लाख रुपये एवढा आहे.) पैसा जरी पुलंचा असला तरी त्यांना तो असा मुक्तहस्तानं उधळू देणारी, पतीच्या पैशाचा मोह न बाळगता त्याला तो दान करू देण्यास उद्युक्त करणारी – वा त्याबाबत कसलाही आक्षेप न घेणारी सुनीताबाईंसारखी महान स्त्री विरळा आहे.
पुल व सुनीताबाई यांना भरपूर पैसा मिळाला. त्यांची राहणी साधी आहे, त्यांच्या गरजाही मध्यमवर्गीय आहेत. दोघंही रसिक असल्यानं त्यांनी जीवनाचा सर्वांगानं आस्वाद घेतला, पण त्यात ती गुंतून पडली नाहीत. ऐषोआरामात फालतू खर्च त्यांनी केला नाही. प्लमनं अनेक देशात घरं केली. पुलंनी अनेक गावांमध्ये. पंचाहत्तरीनंतर प्लमनं स्वत:ला लाँग आयलंडवर कोंडून घेतलं होतं. पुलं आता पुण्याला राहतात व त्यांच्या दुखऱ्या गुडघ्यांना न जुमानता ते अजूनही अॅक्टिव्ह आहेत. त्यांनी शंभरी गाठेपर्यंत असंच अॅक्टिव्ह राहावं ही हार्दिक शुभकामना व्यक्त करावीशी वाटते. (प्लमचा आर्थ्रायटिस व पुलंचा दुखरा गुडघा – हाही एक योगायोग म्हणावा लागेल!)
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
जीवनविषयक दृष्टिकोन
शेवटी, आणखी एका विलक्षण गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा. पुल आणि प्लम यांच्या एकूणच प्रकृतीवर आणि प्रवृत्तीवर त्यातून प्रकाश पडू शकतो.
लिओनोरा ही प्लमची दत्तक मुलगी. स्वत: प्लम व एथेल यांना मात्र मूळबाळ झालं नाही. त्याचा कधी त्याला खेद वाटला असावा का? याबाबतची एक आख्यायिका अशी आहे. लेखक ए.एम. मिल्न स्वत:ला प्लमचा मित्र म्हणवायचा, पण मनातून तो त्याचा फार राग करायचा. युद्धकाळात प्लमच्या बर्लिन ब्रॉडकास्ट्सवर काही जोरदार टीकाटिपण्णी इंग्लंडमध्ये चालू असताना मिल्ननं ‘डेली टेलिग्राफ’मध्ये एक पत्र लिहून प्लमवर गरळ ओकलं. तो म्हणतो, “Poor, Silly Plum, he’s escaped again. He ought to have fought in the First war, but he stayed in America and didn’t. He ought to have paid his income taxes between the wars, but he didn’t. And now for the sake of a comfortable suite in the Adlon Hotel in Berlin, He’s giving weekly talks on the Nazi radio. He has escaped again… I remember that he told me once that he wished he had a son, and he added characteristically (and quite sincerely) : ‘But he would have to be born at the age of fifteen, when he was just getting into his House eleven.’ You see the advantage of that. Bringing up a son throws a considerable responsibility on a man but by the time the boy is figteen one has shifted the responsibility on to the housemaster, without forfeiting any reflected glory that may be about. This I felt has always been Wodhouse’s attitude to life…”
हा मजूकर मराठीत द्यायची इच्छा होती, पण मिल्नची मते त्याच्याच भाषेत वाचायला मिळावीत म्हणून मूळ इंग्रजी पत्रच उदधृत केलं आहे. ए.ए. मिल्नजवळ आपण असं काही कधी बोललं असल्याचं प्लमनं नाकारलं आहे, पण तरी जवळपास अगदी याच अर्थाचे शब्द त्याच्या १९१० साली प्रसिद्ध झालेल्या (म्हणजे लग्नाअगोदर) ‘स्मिथ इन द सिटी’ या कादंबरीत आढळतात.
मिल्नची ही आठवण खरी असो वा खोटी किंवा प्लमचा मुलांबद्दल वा एकूणच आयुष्याबद्दल असा बेजबाबदार नजरिया असो वा नसो (आणि मी तरी तो खरा मानत नाही) माझ्या मते तो पूर्णपणे निर्दोषच आहे. युद्धाच्या जबाबदारीतून तो वाचला हे त्याचं नशीब. जर्मन रेडिओवर बोलला हा शुद्ध मूर्खपणा. आणि स्वत:चं मूल नसणं याचा विषाद त्याला कधी वाटला असल्यास ते आपल्याला ठाऊक नाही. पण स्नॉर्की उर्फ लिओनोरामुळे ही उणीव भरून निघाली होती.
पुल-सुनीताबाई या जोडप्यालाही अपत्य नाही. त्याचा खेद त्यांना कधी वाटला असल्यास अर्थातच तो त्यांच्यापुरता मर्यादित आहे. ही त्यांची खाजगी बाब आहे. (केवळ ओघाओघानंच आला म्हणून या योगायोगाचा उल्लेख केला आहे. कृपया याला ‘इन बॅड टेस्ट’ वा अप्रस्तुत समजू नये.) मुद्दा आहे की मुलांबाबत पुलंचा दृष्टिकोन काय आहे ते आपल्याला माहीत नसलं तरी जीवनाबाबतची त्यांची भूमिका मिल्न म्हणतो तशी वुडहाऊसियन निश्चितच नाहीय. सामाजिक जबाबदारी, सामाजिक दायित्व मानून आयुष्याचा कणनकण आणि जवळची पै-पै पुल व सुनीताबाईंनी समाजासाठी आजवर खर्च केली आहे. एखाद्या कलोपासकापासून काय किंवा कोणत्याही सामान्य माणसापासूनही काय यापेक्षा अधिक अपेक्षा ती काय करायची? या अशा जोडप्याचं वर्णन थोडक्यात करायचं असेल तर कवी बोबडे यांच्या शब्दांत म्हणता येईल, “जो करी कर्म अहेतू निरंतर, वेद तयास कळो न कळो रे || ओळख पटली ज्यास स्वत:ची, देव तयास मिळो न मिळो रे ||” पुल आणि सुनाताबाई नास्तिक आहेत असं म्हणतात. पण मला वाटतं की, खऱ्या परमेश्वराची प्राप्ती त्यांना केव्हाच झाली आहे.
आणि वुडहाऊसबद्दल काय लिहायचं? “त्याचं मानवजातीवर प्रेम नव्हतं म्हणून तो संत किंवा संतसदृश होऊ शकत नाही. पण सभ्य, दयाळू, नम्र, साधा, कोणाचाही हेवा वा द्वेष न करणारा आणि जात्याच आक्रमक नसलेला वुडहाऊस याच गुणांमुळे संतपदाच्या जवळ पोहचला होता. तो स्वत: तर आनंदी होताच, पण इतरांना आनंद देण्याची फार थोड्यांना मिळणारी दुर्मीळ संधी त्याला प्राप्त झाली होती” असं डॉनल्डसन म्हणते.
तर ऑबेरॉन वॉ म्हणतो, “Nobody deserves any sympathy in these hard times, if he has not at least tried to banish his cares by applying himself to the long line of Wodhouse masterpieces. (*११)”
किती खरं आहे हे! “करील जो मनोरंजन सकलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे” अशी थोडी वेगळी शब्दरचना करून त्यात प्लमला शोधा. आजच्या या संभ्रांत, वेड्या, क्रूर जगात खुऱ्याखुऱ्या ‘एस्केपिझम’चा विरंगुळ्याचा एकच तर अढळ, अमर, अक्षय स्त्रोत आहे – तो म्हणजे वुडहाऊसचं लेखन. अशा या वैश्विक मनोरंजनकर्त्याला आणि त्याला तसं घडविणाऱ्या त्याच्या प्रियतमा एथेलला स्वर्ग प्राप्त होणार नाही, तर काय तो तुम्हा आम्हाला मिळणार आहे?
संदर्भ - *१) एडवर्ड कॅझॅलेटची एथेलच्या मृत्यूवरील प्रतिक्रिया (न्यूजटाइम, २८ ऑक्टोबर १९८४), *२) पुल - एक साठवण, दु. आ. (पृष्ठ ९), *३) पुलंची साहित्यसूची, ती फुलराणी, प्रथमावृत्ती, *४) साठवण, दु. आ. (पृष्ठ १४), *५) मद्रासच्या ‘द हिंदू’ वृत्तपत्रातील एच. राजेंद्र प्रसाद यांचा लेख ( ३ मे १९९२), *६) रवींद्र पिंगे यांचा लेख (महाराष्ट्र टाइम्स, १२ एप्रिल १९९२), *७) साठवण, दु. आ. (पृष्ठ १९), *८) साठवण, दु. आ. (पृष्ठ १७-१८), *९) न्यूजटाईम (२८ ऑक्टोबर १९८४), *१०) वुडहाऊसवरील पु.लं.चा लेख, साठवण, दु.आ. (पृष्ठ ६४), *११) ‘ऑन्टस आरन्ट जन्टलमेन’ या पुस्तकाच्या परीक्षणातील वाक्य, इव्हिनिंग स्टँडर्ड (२२ ऑक्टोबर १९७४) (डॉनल्डसनच्या पुस्तकातून).
.............................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Aniruddha Nimkhedkar
Wed , 21 November 2018