आदरणीय श्री. प्रसन्नभाऊ पेठे यांना सप्रेम नमस्कार.
तुम्ही लिहिलेले ‘मला उमगलेला वुडहाऊस’ हे पुस्तक आत्ताच वाचून खाली ठेवले आणि लगेच तुम्हाला हे पत्र लिहायला बसलो. खरे सांगायचे तर या क्षणी माझ्यासमोर ‘थॅन्क यू, जीव्ज’ या वुडहाऊसच्या कादंबरीचा नायक बर्टी वूस्टर उभा आहे. त्याचे कॉटेज जळल्यावर आणि स्टोकरपासून जीव वाचवायला तो लंडनच्या ट्रेनची वेळ होईपर्यंत रात्रीच्या अंधारात बगिच्यात लपून बसतो, त्यावेळी तो त्याने तेव्हापर्यंत 'काय मिळवले, काय गमावले' या जमाखर्चाचा एक लेखाजोखा मनातल्या मनात तयार करतो. तुमचे पुस्तक वाचून माझ्याही मनात तुमच्याबद्दलची अशीच एक क्रेडिट- डेबिटची बॅलन्स शीट आपोआप तयार झाली.
म्हणजे असे बघा की, माझ्या मते तुमच्या क्रेडिट बाजूला एक(च) फार मोठी बाब आहे आणि ही प्लसची गोष्टच कदाचित डेबिट साईडच्या तुमच्या सगळ्या बाबींना नॉनप्लस करेल, म्हणजे त्यांच्यावर मात करेल. म्हणून तर मनात एकदा येऊनही मी तुमच्यावर कठोर शब्दांत टीका करणे टाळतो आहे. तुमची जमेची ही बाजू अशी आहे की, तुम्ही पी. जी. वुडहाऊसचे भक्त, प्रेमी, दिवाणे आहात. म्हणजेच तुम्ही माझ्या बिरादरीचे आहात. त्यात पुन्हा तुम्ही वुडहाऊसचे जीवन मराठी वाचकांसमोर पेश करण्याचे धाडस केले आहे. या तुमच्या कामगिरीबद्दल तुम्हाला खरे तर शाबासकी द्यायला हवी. माझ्याच वुडहाऊसीयन जातकुळीचे तुम्ही असल्यामुळे तुमच्यावर मी रागावूही शकत नाही.
पण आता तुमच्या डेबिट साईडला वळले तर तुमचे हे लेखन एवढे सदोष आणि उणिवांनी भरलेले आहे की, तुमची सगळी मेहनत पाण्यात तर गेली नाही ना अशी शंका मनात येते. त्यामुळे तुमच्या पुस्तकाची सखोल चिरफाड करावी असा मोह होतो. पुस्तकातले अनेक मुद्रणदोष म्हणजे टायपोज् सोडून देऊ या. तुमच्या लेखनात तपशिलाच्याच इतक्या जास्त चुका आहेत की, इतर गोष्टी लक्षात न घेतल्या तरी चालतील. तुम्ही ज्या काही मोठ्या चुका केल्या आहेत, त्याबद्दल काय बोलावे? हसावे की रडावे की, तुमच्यावर रागवावे हेच कळत नाही.
त्याचप्रमाणे तुमच्या लिखाणातील उणिवाही लक्षात घ्यायला हव्यात. या त्रुटींमुळे तुमच्या लेखनाला अपूर्णत्व आले आहे. पृष्ठसंख्येची, शब्दसंख्येची मर्यादा मान्य करूनही, काही अत्यावश्यक बाबींकडे लक्ष न दिल्याने तुम्ही वुडहाऊसचे जीवन रंगवण्यात कमी पडलात असे खेदाने म्हणावेसे वाटते. तुम्ही तुमच्या विषयाला यथोचित न्याय देऊ शकला नाहीत, असे माझे मत आहे. तुमची लेखनशैली कशी आहे, तुम्ही जे काय लिहिले त्याचे सादरीकरण कसे केले, या इतर सर्व गोष्टी सोडून देऊ; पण या उणिवा आणि तुम्ही केलेल्या चुकांचे काय? अनवधानाने एखाद-दुसरी चूक होऊ शकते. पण जेव्हा जवळपास प्रत्येक एक-दोन पानांआड अशा चुका आढळतात, तेव्हा नाइलाजाने तुमच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करायचा मोह होतो. लेखन करताना किंवा नंतर त्याचे संपादन करताना, मुद्रणप्रत तयार करताना, तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही, घाईघाईत पुस्तक लिहून हातावेगळे केले. त्यावर संस्कार केले नाहीत, असे तर नाही ना? मोठी कठीण परिस्थिती आहे, राव! तुमचा हेतू अतिशय स्तुत्य, प्रामाणिक होता. त्यामुळे तुम्हाला नाउमेद न करता तुमचे कौतुक करायची खरेच इच्छा असतानाही तुमच्यावर हे असे टीकात्मक लिहावे लागते आहे, याचेच दुःख आहे.
तुम्ही म्हणाल, हा माणूस नमनालाच घडाभर तेल जाळतो आहे. मुळात हे लिहिण्याचा याचा अधिकार आहे का? तर, याचे थोडक्यात उत्तर ‘हो’ असे आहे. कारण मीही तुमच्या एवढाच वुडहाऊसचा भक्त आहे. त्यामुळे माझ्या आराध्यदैवताबद्दल जर कोणी (अनावधानानेही का होईना पण) चुकीची माहिती देतो आहे, तर सौम्य शब्दांत त्याची ती चूक दाखवून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो. याचे कारण इतकेच की तुमच्या मूळच्या स्तुत्य हेतूला आलेली ही बाधा दूर व्हावी. तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या प्रस्तुत आवृत्तीतील या चुका/उणिवा काढून टाकून त्याची नवी, सुधारित आवृत्ती प्रकाशित करावी, या सदिच्छेपोटीच मी हे लिखाण करतो आहे.
२.
शब्दमर्यादा मलाही पाळायची असल्याने आता मी सरळ विषयाला हात घालतो. प्लम (पी. जी.) वुडहाऊसच्या अत्युच्च दर्जाच्या आंग्ल विनोदाचा परिचय नवीन पिढीच्या मराठी वाचकांना करून देण्याच्या फार चांगल्या उद्देशाने तुम्ही या महान लेखकाच्या जीवनाचा आणि त्याच्या अजरामर साहित्याचा थोडक्यात धांडोळा घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी तुम्ही रॉबर्ट मक्क्रम (Robert McCrum) याने लिहिलेल्या वुडहाऊस चरित्राचा आधार घेतला आहे. मात्र त्याच्या पुस्तकाची ही कोणती आवृत्ती होती हे तुम्ही सांगितलेले नाही. २००४ ची मूळ आवृत्ती की, २००६ ची सुधारित पेपरबॅक आवृत्ती? याशिवाय तुम्ही सोफी रॅटक्लिफने संकलित/संपादित केलेल्या वुडहाऊसच्या पत्रसंग्रहाचाही आधार घेतला आहे. सोफीच्या पुस्तकाची तुमची निवड एकदम चांगली व योग्यच आहे. पण उपलब्ध चरित्रांपैकी तुम्ही फक्त एकट्या मक्क्रमच्याच पुस्तकावर अवलंबून राहिलात ही तुमच्या लेखनातली पहिली उणीव आहे. जेसनने लिहिलेल्या चरित्राचा तुम्ही उल्लेख केला आहे. वुडहाऊसला प्रत्यक्ष भेटून त्या मुलाखतींवर आधारित त्याचे पुस्तक आहे. म्हणजे ते जास्त विश्वासार्ह आहे. त्याचाही आधार तुम्ही घ्यायलाच हवा होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे २००४ च्या मक्क्रमच्या पुस्तकानंतर गेल्या दहा वर्षांत वुडहाऊसवर किती तरी नवी पुस्तके लिहिली गेली, लेख लिहिले गेलेत. तुम्ही तुमचे पुस्तक २०१४ मध्ये लिहून २०१५ मध्ये ते प्रकाशित केले असे वाटते. तरी अगदी २०१३च्या अखेरीसपर्यंतचे हे नवे संशोधन तुम्ही विचारात घेऊ शकला असता. Norman Murphy, Tony Ring, John Dawson, Murray Hedgecock, Brian Taves, Richard Usborne, Terry Mordue, Neil Midkiff प्रभृति आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वुडहाऊस संशोधकांचे मौलिक लेख पुस्तकरूपांत किंवा इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात वुडहाऊसच्या जीवना/लेखनाबद्दल नवी माहिती मिळते. या खेरीज ‘TWS’ म्हणजे ‘द वुडहाऊस सोसायटी ऑफ अमेरिका’ आणि ‘PGWS UK’ म्हणजे यू.के.ची ‘वुडहाऊस सोसायटी’ या दोन्ही वुडहाऊस अभ्यासक आणि चाहत्यांच्या फार मोठ्या संस्था आहेत. त्यांच्यातर्फे अनुक्रमे 'प्लम लाईन्स' आणि 'वूस्टर सॉस' या नावाची दोन त्रैमासिके प्रसिद्ध केली जातात. यामधूनही दर वेळी काही तरी नवीन शिकायला मिळते. तुम्ही त्यांचाही उपयोग करून घेऊ शकला असता. तुमच्या लेखनाचा आवाका मर्यादित आणि उद्देश फक्त नवीन वाचकाला प्लमची तोंडओळख करून देण्याइतपतच सीमित आहे, असे मान्य केले तरी या नवनवीन संशोधनाचा तुम्ही वापर केला असता, तर तुमचे हे लिखाण अधिक समृद्ध झाले असते असे वाटते.
मक्क्रमलिखित चरित्राबद्दल पट्टीच्या वुडहाऊस अभ्यासकांचे फार चांगले मत नाही, हे तुम्हाला माहीत आहे का? तो पत्रकार आहे, वुडहाऊस संशोधक नाही. तो मेडिकल डॉक्टर किंवा अधिकृत मानसशास्त्रज्ञही नाही. अशा अनधिकारी व्यक्तीने वुडहाऊसच्या खासगी आयुष्यात डोकावून केवळ काही कच्चे सुताचे धागे सापडले म्हणून त्यावरून अनेकदा स्वर्ग गाठला आहे, आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत, दुष्ट निष्कर्ष आणि कुतर्क काढले आहेत. तुम्ही या आडरस्त्याला गेलेलाच नाही आणि मक्क्रमने दिलेले असे नाहक संदर्भ टाळले आहेत. हे बरे केलेत तुम्ही. तरी पण, तुम्ही ज्याचा आधार घेतला तोच हा मक्क्रम आपल्या चरित्रनायक वुडहाऊसला कसा बदनाम करतो, हे तुम्हाला कळायलाच पाहिजे, म्हणून मी हे सांगतो आहे. वुडहाऊसला १९०१ मध्ये (वयाच्या विसाव्या वर्षी) मम्प्स म्हणजे गालगुंड झाले होते. त्यामुळे त्याला पुढे वंध्यत्व आले असावे असा तर्क तो करतो. (पहा, प्रकरण ३ आणि ९). मक्क्रम इतका मूर्ख आहे की, त्याला वंध्यत्व (sterility) आणि नपुंसकत्व (impotence) यातला फरकही कळत नाही. वुडहाऊसच्या वंध्यत्वामुळे तो आपल्या खासगी जीवनात सेक्सचा आनंद घेऊ शकला नाही, म्हणून त्याची आणि त्याच्या बायकोची वेगवेगळी बेडरूम होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या लिखाणात कधी सेक्सचा आधार घेतला नाही, ही मक्क्रमची तर्कटे हास्यास्पद आहेत. आपल्याच चरित्रनायकाचा असा अपमान/अधिक्षेप कोणत्याही चरित्रकाराने केला नसेल. हा अधिकार त्याला कोणी दिला? Impotence असणाऱ्या पुरुषाचे सेक्स लाईफ आणि sterility असणाऱ्या पुरुषाचे सेक्स लाईफ यातला फरक मक्क्रमला कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरने सांगितला असता. (या संदर्भात 'प्लम लाईन्स'च्या २०१४ च्या हिवाळी (vol. 35, number 4) अंकात Dr Christopher W. Dueker, MD यांचा Of Mumps and Men हा फार अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाला आहे. तो पाहावा. या लेखाची प्रत तुम्हाला हवी असेल तर मी पाठवू शकतो.) Dr Dueker या लेखात म्हणतात की मक्क्रमला हे नसते उद्योग करायची गरजच काय होती? जी गोष्ट आपल्याला कळत नाही, त्यात डोके घालावेच कशाला? गंमत म्हणजे, थेट विधान करायला मक्क्रम घाबरतो. ''the mumps he suffered in 1901 MAY HAVE left him sterile'' असे त्याचे शब्द आहेत. हा may have चा उपयोग हेच दाखवतो की मक्क्रमचा हा तर्क आहे, त्याच्याजवळ कोणताही ठोस पुरावा नाही. मुळात, वुडहाऊसच्या बेडरूममध्ये डोकावून बघण्याचा आंबटशौक आपल्या वाचकांना असावा असे त्याने गृहितच कसे धरले? म्हणून मग आर. जे. बी. बॉबी डेन्बी हा आर्मी कॅप्टन आणि वुडहाऊसची बायको एथेल यांच्यात विवाहबाह्य संबंध असावेत असेही तो ध्वनित करतो. याची पण काहीच गरज नव्हती.
ही एकच बाब नाही तर अशा असंख्य अवगुणांनी भरलेले हे मक्क्रमलिखित चरित्र आहे. नमुना म्हणून हे एक उदाहरण पुरे झाले. तुम्ही म्हणत असाल तर मक्क्रमच्या अजून किती तरी चुकांची जंत्री मी तुम्हाला पाठवू शकतो. आणि तुम्ही फक्त त्याचाच आधार घेतला राव. याचा परिणाम असा झाला की, तुमच्याही लेखनात काही ठिकाणी हे दोष शिरले आहेत.
तुमच्या लेखनातली पुढची उणीव म्हणजे तुम्ही वुडहाऊसच्या लिखाणातील भारतीय संदर्भांवर काहीच भाष्य केले नाही. किमान शंभर वेळा तरी त्याने भारत/भारतियांचा थेट किंवा आडून उल्लेख केला आहे. त्याच्या 'The Luck Stone' या बालकादंबरीत राम नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचे पात्र आहे. त्याची पत्नी एथेल ही आपल्या पहिल्या नवऱ्यासोबत म्हणजे लेनर्ड रॉअली Leonard Rowley सोबत त्यांच्या चिमुकल्या लिओनोराला घेऊन काही वर्षे बंगलोरजवळ कोलार गोल्डफिल्ड येथे राहत होती, हे तुम्ही सांगितले नाही. लेनर्ड रॉअली अकाली मेल्यामुळे एथेल आपल्या मुलीला घेऊन इंग्लंडला परत गेली आणि नंतर ती अमेरिकेत गेली असताना तिची प्लमशी भेट झाली. लेनर्ड जर मेला नसता तर वुडहाऊसच्या आयुष्यात एथेल आणि लिओनोरा आल्याच नसत्या.
३.
आपल्या वुडहाऊसचा मोठा भाऊ अर्नेस्ट अर्मिन (E. A. Wodehouse) काही वर्षे पुण्यात राहत होता आणि त्याला थिऑसॉफीचे चांगले ज्ञान होते एवढाच मोघम उल्लेख तुम्ही केला आहे. पण तत्पूर्वी तो बनारसला थिऑसॉफिकल सोसायटीचे काम करायचा. (थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्तींचा तो शिक्षक होता.). त्याच्या या संबंधांमुळे आपल्या वुडहाऊसच्या सुरुवातीच्या लेखनात थिऑसॉफीचे उल्लेख सापडतात हे तुम्ही सांगू शकला असता. वुडहाऊसचा एक चुलत चुलत काका फिलिप मुंबई इलाक्याचा गवर्नर होता. मुंबईत कुलाब्यातल्या एका रस्त्याचे नाव याच्याच नावावरून ‘वुडहाऊस रोड’ असे ठेवण्यात आले होते आणि आजही त्याला लोक ‘वुडहाऊस रोड’ असेच म्हणतात (‘नाथालाल पारेख’ हे त्याचे नवे नाव फार कमी वापरात आहे.).
४.
‘The Luck Stone' वरून आठवले. तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या शेवटी वुडहाऊसने लिहिलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे. त्यात या पुस्तकाचा समावेश नाही. एवढेच नवे तर A Prince for Hire, A Man of Means, The Gem Collector, The Parrot and Other Poems यांचाही उल्लेख नाही. ही पुस्तके वुडहाऊसच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालीत म्हणून तुम्ही त्यांची नावे वगळलीत का? मग Sunset at Blandings याचा तरी उल्लेख का केला? खरे सांगायचे तर वुडहाऊसने एकंदर किती पुस्तके लिहिलीत/किती लिखाण केले याबद्दल आजही अभ्यासकांमध्ये एकमत नाही. एलीन मक्इल्वेन (Eileen McIlvaine) नावाच्या बाईने प्रचंड मेहनत घेऊन समग्र वुडहाऊस साहित्याची एक फार मोठी पुस्तकसूची प्रसिद्ध केली. ती तुम्ही पाहिली आहे का? याच मूळ यादीला नंतर एक पूरक यादी जोडण्यात आली. आता तर ही पूरक यादीही अपूर्ण वाटते आहे. म्हणून ऑर्थर रॉबिन्सन हा ग्रंथपाल/अभ्यासक यावर काम करतो आहे आणि या यादीला अद्ययावत करण्याचे प्रयत्न करतो आहे. त्यामुळे वुडहाऊसने (फक्त) ९३ पुस्तके लिहिलीत हे विधान योग्य वाटत नाही. ऑर्थर रॉबिन्सनची ही नवीनतम यादी तुम्ही या लिन्कवर जाऊन इंटरनेटवर बघू शकता- http://madameulalie.org/arobinson/pgwaddendum.html तसेच यू के वुडहाऊस सोसायटीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली ही ग्रंथसूचीसुद्धा बघा- http://www.pgwodehousesociety.org.uk/IS1.pdf वुडहाऊसच्या कथा-कादंबऱ्यांमधून कोणाला काय आवडेल, भावेल ही सब्जेक्टिव म्हणजे वैयक्तिक निवडीची बाब आहे हे मान्य केले तरी त्याच्या ज्या कलाकृतींना बहुतांश समीक्षकांनी टॉप टेनचा दर्जा दिला आहे, त्यापैकी दोन कथांचा तुम्ही साधा उल्लेखही केला नाही, ही एक फार आश्चर्याची बाब आहे. ‘यंग मेन इन स्पॅट्स’ या संग्रहात असलेल्या या दोन कथा आहेत, ‘अंकल फ्रेड फ्लिट्स बाय’ आणि ‘द अमेझिंग हॅट मिस्टरी’. वुडहाऊसच्या ‘Lord Emsworth and the Girl Friend’ या कथेला किपलिंगने इंग्रजीतल्या निवडक सर्वश्रेष्ठ कथांपैकी एक असे संबोधले होते. या कथेचा तुम्ही उल्लेख केला आहे. पण याच बरोबर ‘Uncle Fred Flits By’ आणि ‘The Amazing Hat Mystery’ याही दोन अजरामर कथांवर तुम्ही लिहायला हवे होते. त्यांचे नाव न घेता वुडहाऊसवरचे कोणतेही लिखाण पूर्ण होऊच शकत नाही, इतक्या त्या महत्वाच्या आहेत.
वुडहाऊसने १९२० पर्यंत अक्षरशः शेकडो लेख, कविता लिहिल्या तसेच वृत्तपत्रांसाठी स्तंभ-लेखन केले. यातले बरेच स्फुट लेखन पुढे पुस्तक स्वरूपात तो जिवंत असताना प्रकाशित होऊ शकले नाही. मात्र आता यापैकी बहुतेक सर्व लिखाण आज इंटरनेट्वर http://www.madameulalie.org वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे सुमारे सहा-सात वर्षांपूर्वीच या वेबसाईटची निर्मिती झाली. इंटरनेटवर वुडहाऊसप्रेमी लोकांसाठी ‘ब्लान्डिंग्ज’ (Blandings) नावाचा एक याहू वेबग्रुप आहे. मी स्वतः या वेबग्रुपचा एक संस्थापक आहे. चार्ल्स स्टोन-टोल्शे (ऑस्ट्रलिया) आणि दिवंगत टेरी मॉर्ड्यू (इंग्लंड) या माझ्या दोन जिवलग मित्रांसोबत मी या वेबग्रुपची स्थापना १७ एप्रिल २००१ रोजी केली होती. वुडहाऊसवर चर्चा/संशोधन करण्यासाठी जेवढे कोणते नेटग्रुप्स आहेत, त्यातला हा सर्वांत मोठा आणि लोकप्रिय ग्रुप आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो. देश-विदेशातले ४७९ वुडहाऊसप्रेमी वाचक, लेखक, संशोधक आमच्या या ग्रुपचे सदस्य आहेत. आज जरी फेसबुकवरच्या वुडहाऊस ग्रुपला सर्वांत जास्त सदस्य संख्येचा मान जात असला तरी आमच्या ग्रुपचा वुडहाऊसवर संशोधन करण्याचा जो मूळ उद्देश आहे, त्याची बरोबरी हा फेसबुक ग्रुप करू शकत नाही. पहा- https://groups.yahoo.com/neo/groups/blandings/info आमच्याच या Blandings ग्रुपतर्फे चालवण्यात येणाऱ्या http://www.madameulalie.org या वेबसाईटवर उपलब्ध असलेला उपरोक्त सर्व खजिना जगभरातील वुडहाऊसप्रेमींना विनामूल्य देण्यात आलेला आहे. आमच्या संशोधकांनी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून इंग्लंड आणि अमेरिकेतल्या जुन्या-जुन्या वर्तमानपत्रांत किंवा नियतकालिकांत १९०१ ते १९२३ या दरम्यान वुडहाऊसचे जे लेख / कथा / कादंबऱ्या / कविता / स्तंभलेखन प्रसिद्ध झाले त्यांच्या प्रती मिळवून, त्यांची मुद्रणप्रत तयार करून, हा सगळा मजकूर या साईटवर प्रकाशित केला आहे. या कामाला 'वुडहाऊस इस्टेट'चे आशीर्वाद आहेत. या संशोधनाला लागणारा बहुतेक सर्व खर्च राजा श्रीनिवासन आणि अनंत कैथाराम हे दोन अमेरिकास्थित भारतीय करत असतात, हे विशेष. या आमच्या वेबसाईटचा आणि तिथे असलेल्या वुडहाऊसच्या दुर्मिळ साहित्याचाही तुम्हाला उल्लेख करता आला असता.
वुडहाऊसला जून १९३९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने डी. लिट. या मानद पदवीने सन्मानित केले होते आणि हा एक फार मोठा बहुमान होता, याचाही उल्लेख तुम्ही केलेला नाही. त्याचप्रमाणे १९३६ मध्ये त्याला अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाणारे मार्क ट्वेन मेडलही प्रदान करण्यात आले होते, हेसुद्धा तुम्ही सांगितलेले नाही. वुडहाऊसला इन्कम टॅक्स/ आयकराच्या भानगडीमुळे इंग्लंड - अमेरिकेत काय त्रास झाला आणि त्यामुळे तो कसा सतत फ्रान्समध्ये रहायला जात होता, हे तुम्ही सांगितले असते तर त्याच्या या जीवनचरित्राला पूर्णता आली असती. आयकर वाचवायला त्याने जर असे केले नसते तर तो कदाचित १९४०मध्ये जर्मनांच्या कैदेत राहिलाही नसता.
५.
हे झाले तुमच्या पुस्तकातल्या उणिवा/त्रुटींविषयी. आता तुम्ही केलेल्या तपशिलाच्या आणि अन्य चुकांबद्दल बोलू या. थोडक्यात आटपायचे असल्याने मी प्रत्येकच चुकीवर भाष्य करणार नाही. पण काही बाबींवर बोलावेच लागेल. तुम्ही फुटनोट्स दिल्या नसल्याने तुम्हाला तो तो संदर्भ नक्की कुठे मिळाला हे, ज्यांच्याजवळ तुम्ही वापरलेले संदर्भग्रंथ नसतील त्यांना कळणार नाही. तरी पाहू या.
अगदी प्रस्तावनेपासून या चुका सुरू होतात. आदरणीय प्रस्तावनाकार पान १३ वर लिहितात की, सन १९०१ ते १९२० या काळाला एडवर्डीयन काळ म्हणतात. हे अगदी चुकीचे विधान आहे. हा काळ १९०१ मध्ये सुरू झाला आणि तो १९१० पर्यंत चालला. फार फार तर १९१४ पर्यंत त्याचे पडसाद ऐकू येत होते, असे म्हणता येईल. पण नंतर लगेचच पहिले महायुद्ध सुरू झाले आणि हे पर्व नामशेष झाले.
६.
आता तुमच्या चुका पाहू.
१. (पान २२) - तुम्ही म्हणता तसे 'सर गॅलॅहॅड' या नावाचे कोणतेही पात्र वुडहाऊसच्या कथानायकांच्या यादीत नाही. जो आहे तो ‘द ऑनरेबल गॅलॅहॅड’ आहे (लॉर्ड एम्जवर्थचा भाऊ), आणि त्याला सर हा खिताब मिळाला नव्हता. तुम्ही 'सर गॅलॅहॅड' या ऐतिहासिक पात्राशी या ‘द ऑनरेबल गॅलॅहॅड’ची गल्लत केलेली आहे. कारण वुडहाऊसच्या लिखाणात या ऐतिहासिक पात्राचा अनेकदा उल्लेख येतो.
२. (पान २८) - ''बिल टाउनेंडच्या सोबत वुडहाऊसने पुढे गाजलेल्या अनेक संगीतिका लिहिल्या'' हे तुमचे विधान चूक आहे. मक्क्रमच्या पुस्तकात असा कुठेही उल्लेख नाही.
३. (पान ३८) - लिओनोराला वुडहाऊसने सख्ख्या मुलीसारखेच जवळ केले हे लिहिल्यावर, त्याने तिला पुढे औपचारिकरीत्या दत्तकही घेतले होते हे तुम्ही सांगितले नाही. याच पानावर तुम्ही ''वुडहाऊस गंभीर प्रवृत्तीचा आणि शृंगाराला फार महत्त्व न देणारा, तर एथेल मात्र त्यात प्रवीण होती'' असे विधान केले आहे. मक्क्रमच्या आचरटपणाच्या निष्कर्षांशिवाय याला काहीच आधार नाही. वुडहाऊस sexually repressed होता म्हणजे त्याच्या कामवासनेचे दमन झाले होते असे अनर्गल विधान तो अनेक वेळा करतो. हा आगाऊपणाचा जावईशोध लावण्याची, या पंचायती करण्याची त्याला काहीही गरज नव्हती.
४. (पान ३९-४०) - फ्लर (फ्लूअर नाही) मार्सडेन या नटीसोबत वुडहाऊसचे प्रेमसंबंध होते ही एक केवळ अफवा आहे. त्यामुळे ''ती दोघे काही काळ एकमेकांत गुंतलीही'' या मक्क्रमच्या विधानाला काहीही आधार नाही. तो स्वतःही या प्रेमकथेला 'अपोक्रिफल' (apocryphal) असेच म्हणतो. (पहा प्रकरण आठवरच्या नोट्स), हे तुम्ही सांगायला हवे होते.
५. (पान ४३) - हन्स्टॅन्टन हॉलच्याच वास्तूवर आणि परिसरावर वुडहाऊसने आपला ''ब्लॅन्डिंग्ज कासल'' बेतलेला होता, हे तुमचे विधान चूक आहे. अगदी मक्क्रमदेखील तसे म्हणत नाही. तो लिहितो – “Wodehouse absorbed SOME OF ITS rambling, ivy-clad features into the topography of Blandings Castle...” SOME OF ITS म्हणजे काही प्रमाणात, पूर्णपणे नाही. यासाठीच मी म्हणतो की तुम्ही नॉर्मन मर्फीची In Search Of Blandings किंवा The Wodehouse Handbook ही पुस्तके वाचायला हवी होतीत. 'ब्लॅन्डिंग्ज कासल' हा कोणत्याही एका वास्तूला डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला प्रासाद नसून अनेक वेगवेगळ्या जागांचे ते मिश्रण आहे. याबद्दलची माहिती सार- स्वरूपात या लिंकवर वाचायला मिळेल. https://en.wikipedia.org/wiki/Blandings_Castle
६. (पान ५२/५४) - 'सिटाडेलची कोठडी' म्हणजे काय? एका जुन्या भक्कम किल्ल्यातले कारागृह. हा किल्ला HUY नावाच्या गावात होता. HUY चा फ्रेंच उच्चार मराठीत जसाच्या तसा तंतोतंत लिहिणे अवघड आहे, पण तुम्ही 'the Citadel of Huy' असे लिहिले असते तरी चालले असते. टोस्ट Tost हे गाव जर्मनीच्या अपर सायलेसिया Upper Silesia या भागात आहे. HUY मधून वुडहाऊसला जेव्हा या टोस्टला नेण्यात आले, तेव्हा तिथला तो सारा भणाण परिसर पाहून त्याने केलेला सुप्रसिद्ध जोक तुम्ही खरे तर या ठिकाणी सांगायला हवा होता - ''If this is Upper Silesia, I would hate to see Lower Silesia''.
७. (पान ६४) - या आणि अन्य काही ठिकाणी तुम्ही प्लमच्या 'डेली डझन' व्यायामांचा उल्लेख केला आहे, पण त्याचा काहीच तपशील दिला नाही. रॅटक्लिफने तिच्या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक १३० वर याबाबत जी माहिती दिली आहे, ती तुम्ही उदधृत केली असती तर वाचकांना या व्यायाम प्रकारांबाबत सविस्तर वाचता आले असते.
८. (पान ७३) - या पानावर तुम्ही (वुडहाऊसने) 'नेहमीप्रमाणे मनसोक्त ड्रिन्क्स पिऊन' असे लिहिले आहे. हे अगदी चुकीचेच नाहीत तर वुडहाऊसचे अवमूल्यन करणारे शब्द आहेत. तो कधीच जास्त दारू पीत नव्हता. मक्क्रमने २३व्या प्रकरणावरील नोट्समध्ये वुडहाऊसचे याबाबतचे शब्द उदधृत केले आहेत, “In February, after an exceedingly good lunch at his club ('two cocktails, dollops of Burgundy, about five cognacs and two fat cigars'), he was returning some books to the library, part of his routine, when ...” यातल्या about शब्दाचा अर्थ वुडहाऊसच्या व्याख्येप्रमाणे घ्यायचा. म्हणजे तो 'अतिशयोक्ती दर्शक' आहे. 'जवळपास, सुमारे' असे परिमाणदर्शक नाही. पुढील तीनही उदाहरणांतून हे स्पष्ट होईल. यात about चा वापर कसा केला आहे त्याने, हे बघा-
" I don’t suppose I could have counted more than about a platoon and a half of sheep when..." (Thank You, Jeeves)
"Whereas, if before kicking off I give about eight volumes of the man’s life and history, other bimbos, who were so hanging will stifle yawns and murmur ‘Old stuff. Get on with it." (The Code of the Woosters)
"He seemed to have grown a bit since our last meeting, being now about eight foot six..." (The Code of the Woosters)
एवढेच नाही, तर वुडहाऊसची शरीरयष्टी धिप्पाड होती. त्यामुळे किरकोळ प्रकृतीच्या माणसापेक्षा त्याची मद्य पचवण्याची शक्ती जास्त होती. त्यात त्याने exceedingly good lunch’ केला होता. याचा अर्थ हे जेवण तास- दोन तास सहज चालले असेल. पाश्चात्य जगात दारू पिण्याच्या कोणत्याही रूढ परिभाषेनुसार एवढ्या अवधीत त्याने प्यायलेल्या या दारूला heavy drinking session म्हणता येणार नाही. Cognac हे मद्य जेवण झाल्यावर (जेवणाआधी किंवा जेवणादरम्यान नाही) हळूहळू, सावकाश, घोट घोट सिप करत प्यायचे असते, एका झटक्यात संपवायचे नसते. त्यामुळे त्याच्या त्या दिवशीच्या मद्यसेवनाला मनसोक्त म्हणता येणार नाही. यातून वाचकांपर्यंत चुकीचा संकेत जातो. आपण भरपूर, उत्तम दर्जाचे जेवण केले, एवढेच त्याला या शब्दांतून सुचवायचे होते.
९. (पान ७५/७७) - या ठिकाणी वुडहाऊसने अमेरिकेत बिल टाउनेन्ड्च्या घराजवळ बास्केट नेक लेन येथे जागा घेतली असे तुम्ही लिहिले आहे. अहो साहेब, तुम्हाला गाय बोल्टन म्हणायचे आहे. तुम्ही अशी गल्लत कशी काय करू शकता? बिल टाउनेन्डची प्लमची शेवटची प्रत्यक्ष भेट जुलाई १९३९ मध्ये इंग्लडमध्ये डलिचला झाली होती. त्यानंतर त्यांचा फक्त पत्रव्यवहार चालला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर टाउनेन्ड कधीच अमेरिकेत आला नाही. बास्केट नेक लेन हा रेमझन्बर्ग या खेड्यातलाच एक मोहल्ला आहे. वुडहाऊस 'बास्केट नेक लेन' सोडून 'रेमझन्बर्गला' स्थलांतरित नाही झाला, तर '१०००, पार्क आवेन्यू, न्यू यॉर्क' येथले घर सोडून तो तिथे रहायला आला.
१०. (पान ८३) - इंग्लंडच्या सध्याच्या राणीची (क्वीन एलिझाबेथ दुसरी हिची) आई वुडहाऊसच्या लेखनाची चाहती होती. स्वतः क्वीन एलिझाबेथ दुसरी ही वुडहाऊसला अमेरिकेत जाऊन भेटायला उत्सुक होती असे खुद्द मक्क्रमसुद्धा म्हणत नाही. त्यामुळे तुम्ही ही चुकीची माहिती दिली आहे. क्वीन एलिझाबेथ दुसरी हिची आई (हिचे नाव पण एलिझाबेथ असेच होते) सहाव्या जॉर्ज राजाची पत्नी होती म्हणून तिलाही क्वीन एलिझाबेथ असेच म्हणत, पण जेव्हा सहाव्या जॉर्ज नंतर त्यांची मुलगी सध्याची क्वीन एलिझाबेथ दुसरी गादीवर आली तेव्हापासून या तिच्या आईला क्वीन एलिझाबेथ क्वीन मदर असे संबोधित केले जायचे. नाईटहूडचा खिताब स्वीकारायला म्हातारा वुडहाऊस स्वतः इंग्लंडला येण्याच्या स्थितीत नसल्याने या क्वीन मदरने अमेरिकेत जाऊन त्याला तो सन्मान बहाल करायचा असा एक बेत काही दरबारी लोकांच्या मनांत शिजत होता, असे म्हणतात. पण स्वतः मक्क्रम देखील या आवईला एक apocryphal आणि fanciful अशी विशेषणे देतो.
११. (पान ८५) - वुडहाऊसची Bring on the girls आणि Over Seventy ही दोन पुस्तके त्याच्या पत्रांची संकलने आहेत, हे तुमचे विधान चूक आहे. या त्याच्या आत्मचरित्रपर आठवणी (memoirs) आहेत. वुडहाऊसच्या जिवंतपणी त्याच्या पत्रव्यवहाराचे होते Performing Flea या नावाने फक्त एकच संकलन प्रसिद्ध झाले. तो मरण पावल्यावर फ्रान्सेज डोनल्डसन हिने संकलित/संपादित केलेले Yours, Plum हे संकलन १९९० मध्ये आणि सोफी रॅटक्लिफचे संकलन २०११ साली निघाले आहे.
१२. (पान ९६/११३ ..) - तुम्ही या ठिकाणी Jeeves जीव्जला चक्क 'बटलर' (butler) बनवून टाकले आहे. काय हे देवा! कोणताही हाडाचा वुडहाऊस भक्त ही घोडचूक कधीच करणार नाही, अगदी झोपेतसुद्धा. जीव्ज एक स्वीय सहायक आहे, खासगी नोकर, वॅली किंवा वॅले (valet). वेळप्रसंगी गरज पडल्यास तो बटलरची जागा घेऊ शकतो. एक दोन वेळा त्याने तसे केलेही आहे, पण बर्टीच्या घरात तो फक्त आणि फक्त वॅले म्हणूनच काम करतो. तुम्ही ही चूक कशी काय केलीत याचे मला सखेद आश्चर्य वाटते. पण जिथे बीबीसी सारख्या महान आणि साक्षात ब्रिटिश संस्थेनेदेखील ही चूक एक-दोन वेळा केली आहे, तिथे मी तुमच्यावर रागाऊ पण शकत नाही.Tsk, tsk (च्, च्) असे म्हणून मोकळा होतो.
१३. (पान ९७) - श्रॉपशर परगणा लंडनपासून तुम्ही म्हणता तसा 'थोडा' दूर नसून खूप दूर आहे.
१४. (पान १००) - पार्स्लो हा कधीच 'लॉर्ड' नव्हता. तो 'सर' आहे. एक बॅरोनेट.
१५. (पान १०६) - पोंगो Pongo हा अंकल फ्रेड Fred (फ्रेन्ड) नव्हे) चा पुतण्या आहे, भाचा नाही.
१६. (पान ११३) - डेलिया, आगाथा या दोघी बर्टी वूस्टरच्या वडिलांच्या बहिणी म्हणजे त्याच्या आत्त्या आहेत, मावश्या (आईच्या बहिणी) नाहीत. गंमत म्हणजे पान ११५ वर एका ओळीत तुम्ही त्यांना ‘मावश्या’ म्हणता आणि लगेच खाली पुढच्या परिच्छेदात त्यांना ‘आत्त्या’ म्हणता. हा शुद्ध निष्काळजीपणा आहे.
१७. (पान ११६) - डेलिया आत्त्या ही ग्रामर स्कूलची गवर्नर आहे, गवर्नेस नाही. गवर्नेस म्हणजे लहान मुलांना सांभाळणारी आया/दाई. नूट किंवा न्यूट (Newt) या प्राण्याला ‘पाणसरडा’ असे म्हणणे जास्त उचित ठरले असते.
१८. (पान ११९) - या पानावर तुम्ही काय ब्रह्मघोटाळा केला आहे, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? 'राईट हो, जीव्ज' या कादंबरीचे वर्णन करताना तुम्ही केलेली चूक बघून ‘what the hell!’ अशी प्रतिक्रिया मनात उमटली. ग्रामर स्कूलमध्ये 'गसी' भाषण करतो, 'टपी' नाही. हे भाषण म्हणजे वुडहाऊसच्या विनोदाचा परमोच्च बिंदू समजला जातो. या विलक्षण, अति-अप्रतिम विनोदावर तुम्ही ‘गसी’ऐवजी ‘टपी’ची मोहर लावावी हाच तर केवढा मोठा विनोद आहे! हे भाषण पुढील लिंकवर उपलब्ध आहे - https://www.cse.iitk.ac.in/users/amit/books/wodehouse-1999-right-ho-jeeves.html
१९. (पान १२९) - याही ठिकाणी तीच चूक, आत्त्याला मावशी करण्याची. मिस ज्युलिया यूक्रिज नाव असलेली बाई स्टॅन्ली यूक्रिजची आत्त्या आहे, मावशी नाही.
७.
मी आधीच सांगितले की शब्दमर्यादा लक्षात घेऊन थोडक्यातच लिहीत असल्याने तुमच्या प्रत्येकच चुकीवर मी बोलू शकणार नाही. तर हा एवढा ऊहापोह पुरे झाला. आता थोडक्यात तुमच्या पुस्तकातल्या काही मुद्रणदोषांबाबत. ‘बर्टीवूस्टर’ (पान २२) हा एकच शब्द नसून ‘बर्टी’ आणि ‘वूस्टर’ असे ते दोन शब्द आहेत. ‘अंकल फ्रेन्ड (फ्रेंड)’ नाही, अंकल फ्रेड (Fred) असे हवे (पान २२). ‘Performing Flee’ नाही, ‘Performing Flea’ (पान ८५) असे हवे. ‘बक-अप-प्पो’ (पान १४९) चूक आहे, ते ‘बक-यू-अप्पो’ (Buck-U-Uppo) असे पाहिजे. अशा आणखी पुष्कळ टायपोज पुस्तकात आहेत. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे १४९, १५०, १५१ या तीन पानांवर मलिनरच्या तीन कथांचा परिचय करून देताना इकडचे परिच्छेद तिकडे घालण्याची चूक तुमच्या पुस्तकाच्या मुद्रकाने केली आहे. या wrong cutting-pasting मुळे नीट अर्थबोध होत नाही. मुद्रितशोधन करताना हे लक्षात यायला हवे होते.
तर आदरणीय पेठे साहेब, हे होते तुमच्या पुस्तकावर मी थोडक्यात केलेले भाष्य. तुम्हाला नावे ठेवण्याचा किंवा तुम्हाला नाउमेद करण्याचा माझा उद्देश नाही, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. कारण मला तुमच्या प्रयत्नांचे कौतुकच वाटते. त्यात तुम्ही कमी पडलात ही खेदाची बाब आहे. म्हणून शेवटी विनंती एवढीच की, तुम्ही आपल्या या कलाकृतीचे स्वतःच सखोल पुनरीक्षण (Revision) करावे. झालेल्या चुका दूर कराव्यात आणि पुस्तकाची नवी, सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करावी. तुम्हाला आणि तुमच्या या उपकमाला माझ्या शुभेच्छा.
आपला
- हर्षवर्धन निमखेडकर
मला उमगलेला वुडहाऊस- प्रसन्न पेठे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, पाने – १९१, मूल्य – १८० रुपये.
लेखक वकील आहेत आणि वुडहाऊसचे अभ्यासकही.
bosham@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment