अजूनकाही
खलिस्तानी चळवळीची फार मोठी किंमत पंजाबला मोजावी लागली आहे. या चळवळीचे पुनरुज्जीवन होण्यासंदर्भातील काही बातम्या सध्या समोर येत आहेत. या वृत्तांनुसार ‘आयएसआय’ ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना या सर्वाच्या मुळाशी असून तिच्यामार्फत खलिस्तानी चळवळींचे पुनरुज्जीवन केले जात असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच (रविवारी १८ नोव्हेंबर रोजी) अमृतसरमध्ये निरंकारी पंथाच्या एका धार्मिक स्थळावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. हे एक दहशतवादी कृत्य असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात लष्करप्रमुख बिपीन रावत हे पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पंजाबमध्ये घातपाताचे कृत्य घडण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच फिरोजपूर जवळच्या भारत-पाकिस्तान सीमेवरून काही दहशतवादी भारतात शिरल्याचे वृत्त होते. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे सदस्य असल्याचे वृत्त आहे. तसेच मागच्या आठवड्यात अल् कायदाचा कमांडर झाकीर मुसा हादेखील पंजाबमध्ये विशेषतः अमृतसरमध्ये दिसला होता. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी घातपाती कृत्याची सूचना यापूर्वीच दिली होती. काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळींशी संबंधित असणाऱ्या एका तरुणाला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. रविवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या माध्यमातून आयएसआय पंजाबमधील शांतता आणि ऐक्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण या हल्ल्याच्या माध्यमातून शीख विरुद्ध निरंकारी पंथ असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, १९७८ मध्ये ज्या वेळी शीख विरुद्ध निरंकारी यांच्यात जातीय संघर्ष झाला होता, त्यात १३ शीखांच्या हत्या झाल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरच खलिस्तानवादाची चळवळ पुढे आली होती. या संघर्षामधूनच जर्नालसिंग लोंगुवाल यांचे नेतृत्व पुढे आले होते. संपूर्ण पंजाब खलिस्तान चळवळीत होरपळला होता. आता तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
या घटनांमुळे आयएसआय पुरस्कृत पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी थायलंडमध्ये जगतारसिंग तारा या शीख दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. गुप्तहेर संघटनांकडून झालेल्या चौकशीमध्ये त्याने दिलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. जगतारसिंगने दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमध्ये प्रामुख्याने शीख दहशतवाद्यांसाठी एक लष्करी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण केंद्र आयएसआयकडून संचलित केले जात आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये भारतामधून युरोपमध्ये गेलेल्या शीख तरुण सहभागी होत आहेत. २०१६ मध्ये पाच ब्रिटिश शीख नागरीक अचानक बेपत्ता झाले होते. ते पाचही नागरिक अशा प्रकारचे दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी थायलंडला गेल्याचे उघड झाले होते.
गेल्या काही वर्षांपासून ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘बब्बर खालसा’, ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’, ‘खलिस्तान कमांडो फोर्स’, ‘दल खालसा’ या सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘आयएसआय’कडून केला जात आहे. ही अतिशय घातक गोष्ट आहे. जगतार सिंगने चौकशीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असतुल्ला याच्याशी लाहोरमध्ये भेट झाल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर या दोघांनी मिळून जम्मू-काश्मीरच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रास्त्र आणण्याची योजना बनवल्याचे उघड झाले होते. त्यामुळे भारतविरोधी कारवाया करणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटना आणि खलिस्तानी दहशतवादी संघटनांना एकत्र आणून भारतात अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न आयएसआयकडून सुरू असल्याचे उघड झाले होते.
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्याकडून २० मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला दिली होती. या यादीमध्ये पाच शीख दहशतवाद्यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, जवळपास १७० शीख दहशतवादी सध्या पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत आणि त्यांना आयएसआयकडून प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये ‘बब्बर खालसा’ या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश असून ते पाकिस्तानच्या आश्रयाला आहेत. भारताने पाच शीख दहशतवाद्यांना हस्तांतरणाची मागणीही पाकिस्तानकडे केलेली आहे; परंतु पाकिस्तानने याबाबत कोणतीही पावले उचललेली नाहीत.
१३ ऑगस्ट २०१३ रोजी भारताचे तत्कालीन गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी राज्यसभेमध्ये बोलताना यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती. त्यानुसार काही खलिस्तानवादी दहशतवादी पाकिस्तानमध्ये असून ‘आयएसआय’कडून या खलिस्तानवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अब्दुल करीम टुंडा याला नेपाळच्या सीमेवर पकडण्यात आल्यानंतर त्यानेही आयएसआयच्या या खलिस्तानवादी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याच्या षडयंत्राला दुजोरा दिला होता.
तसे पाहता आयएसआयचा हा प्रयत्न नवा नाही. १९८०च्या दशकात जनरल झिया उल हक् हे पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा होते, तेव्हापासूनच पाकिस्तानकडून खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देण्यास सुरूवात झाली होती. मात्र, आताच या चळवळीचे पुनरुज्जीवन का केले जात आहे? गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे भारताची झपाट्याने आर्थिक प्रगती होत आहे. भारतामध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढतो आहे. भारत अनेक बहुराष्ट्रीय, करारांचा सदस्य बनतो आहे. ही बाब पाकिस्तानला आणि विशेषतः आयएसआयला असुरक्षित बनवणारी आहे. त्यामुळे भारताचा वाढता आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करून तो दक्षिण आशियापुरताच कसा मर्यादित ठेवता येईल यासाठी पाकिस्तानने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतामध्ये अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले तर भारत यामध्येच गुंतून पडेल आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढवता येणार नाही हा त्यामागचा विचार आहे. त्यामुळे भारतामध्ये असे अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण करणे आणि परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांकडून भारताचे लक्ष वळविणे असा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे.
.............................................................................................................................................
‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळ निर्माण होणे हे जवळपास अशक्य आहे. याचे कारण अशा प्रकारच्या चळवळी सुरू करण्यासाठी स्थानिकांचा पाठिंबा असावा लागतो; मात्र यापूर्वी पंजाबमधील नागरिकांनी खलिस्तानी चळवळींची खूप मोठी किंमत मोजलेली असल्यामुळे अशा चळवळीला स्थानिकांचा पुन्हा पाठिंबा मिळणे अशक्य आहे. परंतु खलिस्तानी चळवळींसंदर्भातील घडणाऱ्या या छोट्या-मोठ्या घटनांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. याचे कारण, सध्या पंजाबमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे तेथील खेड्यापाड्यांमधला पंजाबी तरुण हा रोजगारासाठी युरोपमध्ये जाऊन छोटी-मोठी कामे करत आहे. सध्या ‘आयएसआय’कडून युरोपीय देशांमध्ये दहशतवादी कारवायांसांठी तरूणांचा शोध सुरू आहे. त्यामुळे पंजाबमधून युरोपमध्ये गेलेला तरुण ‘आयएसआय’च्या या मोहजालात अडकण्याची शक्यता आहे. पंजाबमधून परदेशात जाणाऱ्यांची संख्या अधिक असून यामध्ये १९८४ नंतर जन्माला आलेल्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे आणि आयएसआयकडून अशाच तरुणांना लक्ष्य केले जात आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यातीलच काही तरुणांनी जर्नालसिंग लोंगुवाल यांच्या मृत्यूला ३१ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सभा घेण्याचे ठरवले होते. मात्र या सभेला हिंसाचाराचे गालबोट लागले आणि त्यानंतर जम्मूमध्ये तीन दिवस संचारबंदी लागू झाली होती. यावरून या विचारांचा प्रभाव किती आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या सर्व गोष्टी चिंताजनक असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
.............................................................................................................................................
लेखक शैलेंद्र देवळाणकर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.
skdeolankar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment