‘मनःशांती’ (मूळ तुर्की ‘हूजुर’, अहमत हमदी तानपिनार, मराठी अनु. सविता दामले, पॉप्युलर प्रकाशन, २०१५ ) वाचत होतो. तुर्कस्तानच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घुसळणीच्या काळाचा (विसाव्या शतकाचा पूर्वार्ध ) हा दस्तऎवज. बारीक तपशीलांचं जरतारी विणकाम. त्यात एक संवाद येतो, "मानवजात नेहमी काळाला पुन्हा नव्याने रचते. वर्तमानाच्या सूरीची धार भूतकाळातील प्रत्येक शब्दाला बदलत असते." पटकन अलिकडेच वाचलेली दोन पुस्तकं आठवली. ‘बाक़र गंज के सैयद' (यावर थोडेसे आधीच्या लेखात आले आहेच) आणि ‘मुअनजोदडो'.
दोन्हींचा तसा परस्परांशी म्हटलं तर काही संबंध नाही, पण म्हटलं तर माणसाला भूतकाळाविषयी असलेल्या प्रेमाचा आहे. भुतकाळाची पुनःपुन्हा मांडामांड करण्याच्या आपल्या आवडत्या चाळ्याचा आहे. तसाच त्यातून पुनःपुन्हा स्वतःलाच नव्यानं शोधण्याचा आहे.
१.
"मेरा मानना है की वर्तमान बहुत घटिया चीज है… सबको उससे शिकायतही नही बल्की बडे बडे शिकवे है. और भविष्य? उसके बारेमें तो भगवान भी नही जानता… अब बचता अतीत. आखिर जो हो चुका है वही सत्य है नं? ट्रेन स्टेशन से गुजर गई है ये ज्यादा पक्की बात है. बनिस्बत इसके के ट्रेन स्टेशन से गुजरने वाली है… भविष्य की आशंकाएं हमे तंग करती है, अतीत की नही. अतीत के तो दुखभी सुंदर लगते है. क्यों की वो हमें झेलने नही पडते… इसलिये कहते है अतीत का जितना बडा भंडार जिसके पास वो उतनाही भाग्यशाली..बडी दुनिया होने का सुख..." अशी नांदी सुरुवातीलाच गात अजगर वजाहत 'बाकरगंज के सय्यद' (राजपाल एण्ड सन्स, दिल्ली २०१५ ) मधून 'अशा' सुखाच्या शोधात निघतात.
बाकरगंज हे आजच्या उत्तरप्रदेशातलं पूर्वीच्या कुठल्याशा मुघलशाहीतलं सुलतानगंज, महाराजगंजसारखंच निमशहरी गाव. सैय्यद आडनावाच्या लोकांची भरती असलेलं. कधी काळी यांचे पुर्वज बाबर-हुमायून वगैरे कुणाच्या टोळीबरोबर जगण्यासाठी इकडे आलेले. (जगण्यासाठीच बहुदा. कारण कादंबरीत याचा तपशील येत नसला तरी सत्तेच्या निकट वर्तुळात वा सैन्यात महत्त्वाच्या ठिकाणी असते तर अवध, लखनौ वा अन्य ठिकाणच्या गॅझेटियरादी दस्तऎवजात वा मोठ्या घराण्यांच्या उपलब्ध वंशावळीत कुठे सापडले असते न् कादंबरीला हेतूच उरला नसता. असो.) तर या आज गावभर पसरलेल्या सय्यदांना मुळात इराणमधून आलेल्या त्यांच्या 'मूळपुरुषा' शी जोडणाऱ्या धाग्याचा शोध ही म्हटलं तर कादंबरीची थीम.
नंदा खरे यांच्या ‘अंताजीची बखर’ आणि ‘बखर अंतकाळाची' या अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध असे शतक व्यापणाऱ्या दोन कादंबऱ्या काहीशा दुर्लक्षित ठेवणारे आपण करंटेच म्हणायला हवे. नागपूरपासून कोलकात्यापर्यंतच्या प्रदेशातला हा काळ सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तपशीलांनिशी यात खरेंनी जिवंत केलाय, यावर काही विचार असणाऱ्यांनी स्वतःलाच काही प्रश्न विचारावेत इतका. (अर्थात एरवी विदर्भाचं महाराष्ट्रातच असणं- राहणं हा प्रश्न आपण सहज भावनिक करतो, पण पेशवाईच्या काळात नागपूरकर भोसले काय करत होते, हा आपल्या जिज्ञासेचा प्रश्न होत नाही हे जाताजाता) तरी दोन्ही कादंबऱ्यांमध्ये अंताजी नायक. त्यामुळे त्याला प्रथमपुरुषी एकवचनी सूत्र आणि त्यामुळे सलग कथानक आहे. त्यावर भाष्य करायला अवकाशही.
पण सैय्यदाख्यानात त्यांच्या शोधाच्या निमित्ताने भारताच्या विशाल सांस्कृतिक विविधतेतलं मुस्लिम संस्कृतीचं स्वतंत्र अस्तित्व तपशीलानिशी वजाहत यांना उभं करायचं आहे. त्याचं आजच्या एकुण भारतीय संस्कृतीतलं मिसळून जाणं अधोरेखित करायचं आहे. त्यामुळे ते काळालाच नायक करतात. अवध, लखनौच्या बाजूने कलकत्त्याला भिडतात. सारा मुघल - मुस्लिम राजवटींचा भाग. (खरे नागपूरच्या बाजूने कलकत्त्याला गेले होते, सारा मराठा पोहोच असलेला इलाका) आधी मोगलाई न् मग इंग्रजी अमलाखाली असलेली अनेक छोटी संस्थानं, शाह्या - यातल्या सत्तेतले हेवेदावे, कटकारस्थानं, मांडलिक सत्तेसाठीदेखील चाललेली लाचार चढाओढ… या सर्वांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक तपशीलांनी वजाहत हे सैय्यदाख्यान रंगवतात. ते दीर्घकाळ स्मरणात राहणारं आहे.
अबू तालिब हा अवधच्या सत्तावर्तुळात दीर्घकाळ निकट वावरलेला अधिकारी. राजकारणात मोगलाईचा वावर संपून इंग्रजी सत्तेचा वरवंटा फिरू लागल्याचा सुरुवातीचा काळ. उंदरांनी डुबत्या जहाजातून उड्या माराव्यात तसा हा संधीकाळ. तालिब इमानदार, नवाबाशी एकनिष्ठ. अशा लोकांना या काळात 'काळाची पावलं ओळखणारे 'उंदीर टारगेट' करतात हे नवं नाही. आयुष्यभर नेकीनं वागलेला तालिब उतारवयात आलेल्या बालंटानं हतबल होतो न् सारं सोडून प्रवासाला निघतो. काहीसं विषयांतर करून सांगितलेला हा अबू तालिबच्या जगप्रवासाचा भाग पुस्तकाला संदर्भमूल्य बहाल करणारा आहे.
१७९९-१८०४ एवढ्या दीर्घकाळातला हा प्रवास. लंडनला निघालेला तालिब (आपली काही गाऱ्हाणी थेट व्हिक्टोरिया राणीपुढेच मांडावीत असाही त्याचा एक हेतू आहे) अनेक धक्के, संकटं पचवत लक्षद्वीपवरून सुरुवात करत अनेकवार बोटी बदलत केपटाऊन मार्गे अखेर तब्बल वर्षभराने स्फॉटलंडला पोचतो. तदनंतर दोन वर्षं लंडनमध्ये काढून पुढे वर्षभर युरोप, तिथला निसर्ग, तिथलं वेगळं समाजजीवन कुतूहलानं न्याहाळतो. दोनशेवर वर्षांपूर्वीचा विचार करता हे असे फक्त दर्यावर्दी समाजजीवन असलेल्या हॉलंड, स्पेनसारख्या देशातच घडत होतं. १८०४ साली परत कलकत्त्याला परतल्यावर अबूने हे सारे अनुभव शब्दांकित केले. १८१२ साली प्रकाशित झालेले आणि त्या काळीही अनेक परदेशी भाषात गेलेले ‘मसीरे तालबी फी बलाद अफरंजी’ अर्थात ‘योरोप के क्षेत्रमें तालीब की यात्राएं' हे पुस्तक कुणा भारतीयानं लिहिलेल्या पहिल्यावहिल्या परदेश प्रवासानुभवांपैकी असावं. त्यातली अबूची निरिक्षणं अफलातून आहेत. सय्यदांच्या शोधयात्रेतला कथानकापासून काहीसं वळण घेत विस्तारानं आलेला हा महत्त्वाचा अॅसेट.
...अखेर सोळाव्या शतकात केव्हातरी सुरू झालेले सैय्यदाख्यान विसाव्या शतकात पूर्ण इंग्रजी कालखंड पाहून स्वातंत्र्यानंतर काही काळाने संपलं.पण संपले तरी कसं म्हणावं? मुघल संस्थानं स्थिरस्थावर झाल्यावर सुस्थितीत आलेल्या बाकर अली खाँचं आपल्या नावे गाव वसवण्याचं स्वप्न काही पिढ्यांनंतर एकोणिसाव्या शतकात पूर्ण झालं. उंच किल्लेवजा निवासी गढीभोवती सर्व बलुतेदार वस्त्यांसह पूर्ण गाव वसले, बाकरगंज. पण कितीही वाटलं तरी काळ आपल्याला हव्या त्या अवस्थेत गोठवून ठेवता येत नाही. इंग्रज गेले, फाळणी आणि जातीय दंग्यांनी नवा देश होरपळला. बाकरगंजमधले मुसलमान काही स्वेच्छेनं, तर बाकी अनेक जिना, मुस्लिम लीगच्या समर्थनाची किंमत मोजून पाकिस्तानात गेले. गढीवरच्या सय्यदांनी मात्र देश न सोडता नव्या संदर्भात राजकारणात नशीब अजमाऊन पाहिलं. पण तिथं अपयश आलं. नव्या सरकारनं जमीनदारीही नष्ट केली. आधी अट्टाहासाने नाकारलेले आधुनिक इंग्रजी शिक्षण आणि त्यासाठी शहरात जाणं अपरिहार्य झालं. शिक्षणासाठी असे गाव सोडलेले सय्यद परत आले नाहीत. तसंही परत कोण येतो? जगण्यसाठी इराण सोडलेला सैय्यद इकरामुद्दीन परत इराणला कुठे गेला?
बाकरगंजच्या सैय्यदांचा आता सौदी अरब, हाँगकाँग, लंडन, हंगेरी असा जगभर विस्तार झाला आहे, पण प्रत्येकाचं स्वतंत्र आख्यान सुरू झालं आहे... मुळांच्या शोधातली अस्वस्थ भटकंती कालांतरानं पुन्हा नव्याने सुरू होणार आहे.
२.
‘मुअनजोदडो’ (अर्थात् ‘मुर्दों का टीला’, ‘मुडद्यांची टेकडी’ या नावाने उत्खननानंतर ओळखला जाणारा परिसर) हा ओम थानवींचा अनंत कुतुहलांबरोबरच अपार कृतज्ञतेनं भरलेला शोधक, बौद्धिक प्रवासानुभव (वाणी प्रकाशन, २०११). त्याचं वाचन हाही घ्यावाच असा अनुभव.
'वह आपपर लादता थोपता कुछ नहीं. साथ चलता रहता है बहैसियत एक इमानदार दोस्त. आपको एहसास दिलाता है कि आप किसी बहुमंजिला इमारत के लिफ्ट में हो और हर मंजिल एक कथा है… हमारे पूर्वजोंकी अनवरत कथा, जो जारी है, अनन्तिम है...' असं मधुकर उपाध्याय यांनी पाठराखणीत म्हटलंय तिथूनच काहीशी गुढ उत्सुकता वाटू लागते.
अतीत कभी मरता नहीं
अतीतपर जिसका जितना कब्जा होगा
भविष्य उसका उतनाही काबूमें होगा
जो वर्तमान पर काबिज है
अतीत पर उसीका काबू होगा
- जॉर्ज ऑरवेल
रोज सवेरे मैं थोडा अतीत में जी लेता हूँ
क्योंकी रोज शाम मै थोडा भविष्य में मर जाता हूँ
- अज्ञेय
पुर्ण पुस्तकभर भूतकाळाविषयी अशी दार्शनिक वाक्यं मधूनमधून येत तुम्हाला जाणीव करून देत राहतात, हा केवळ प्रवास नाही, हे नुसतं पाहाणं नाही, गतकाळाशी जोडून घेणं आहे. पुस्तकातलं शेवटचं वाक्य आहे, ‘मुअनजोदडो में मैं कई जिंदगीयाँ एकसाथ जीकर आया हूँ...'
ओम थानवी (गेली बारा वर्ष संपादक जनसत्ता, नवी दिल्ली) जोधपूरचे. राजस्थानातल्या जोधपूर, जेसलमेर या पाक सीमेशी जवळीक असलेल्या भागाचे सिंध लाडकाणा या वाळवंटी भागाचं तसंही जैविक नातं आहे, भूगोल सारखाच. मोहेंजोदडोच्या उत्खननानं इतिहासाशीही नातं जोडलं. जेसलमेर जवळ कुलधरा नावाचं गाव आहे (खरं तर होतं म्हणायला हवं) बैठ्या दगडी घरांचं टुमदार वाळवंटी गाव. दीडशे वर्षांपूर्वी राजाशी काही तक्रार झाली न् स्वाभिमानी गावकरी रातोरात राहती घरं सोडून गेले, परत आले नाहीत. भुरट्या चोरांनी रिकाम्या घरांच्या चौकटी, वासे काढून नेले. घरांच्या दगडी भिंतींचे भग्नावशेष मागे उरले, कुणाची वाट पाहत असल्यासारखे, आजही आहेत. लोक निघून गेले, काळ गोठून राहिला. राजस्थानी साहित्यात त्याचे पडसाद उमटत राहिलेत. कवी नंदकिशोर आचार्य यांनी कवितांची मालिका लिहिली, खोई दुनियांमें. मधुकर उपाध्याय यांनी ‘कुलधरा’ नावाचं नाटक लिहिलं. सुरुवातीला नाटकात काही काळ उमेदवारी केलेले थानवी हे पाहात-ऐकत-वाचत आले. मोहेंनजोदडोचे भग्नावशेष स्वतः याचि देही याचि डोळा पाहावेत (पहले कितना भी पढा - सुना हो, देखना बस् अपनी आँखसे देखना है, बाकी सब आँख का झपकना) असं वाटणं साहजिकच होतं.
कराचीहून लाडकाणा (हे भुट्टो परिवाराचं गाव) पर्यंतचा उत्सूक अधीरतेनं झोप उडवलेला रात्रभराचा खटारा गाडीतला वाळवंटी प्रवास. पुढे टॅक्सीने मोहेंजोदडो. टुरिस्ट बंगला रिकामा. पर्यटक इतक्या लांब येत नाहीत. साहजिक आहे, काळाशी नातं. मुळं शोधणं वगैरे गुंत्यात न अडकणारे मुडद्यांची टेकडी पाहायला कशाला येतील?
३.
मला ‘इजिप्तायन’मध्ये मीना प्रभूंनी नोंदवलेला अनुभव काहीसे विषयांतर करूनही इथं मुद्दाम सांगावासा वाटतो. तुतनखामेन या फेरो राजाची ममी असलेल्या पिरॅमिडचा शोध हा पुरात्त्वातला विसाव्या शतकात लागलेला सर्वांत महत्त्वाचा शोध मानला जातो. हॉवर्ड कार्टर या ब्रिटिश संशोधकाने ओसाड वाळवंटातल्या दहा वर्षांच्या तन मन धनानं अपार श्रमवलेल्या मोहिमेत त्याचा शोध लावला. त्याचा वेगळा, रोमांचक अनुभव टुम्ब ऑफ तुतनखामेन या पुस्तकात मांडला.
१९१२-१९२२ अशा दहा वर्षांच्या निष्फळ परिश्रमानंतर एका कोवळ्या सकाळी पिरॅमिडची पहिली पायरी सापडली. पुढे फक्त दहा बारा पायऱ्यांवर असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचायला आणखी दोन दिवसांची अधीर उत्सुक तरी दमवणारी मेहनत. तिथं तुतनखामेनच्या नावाची मोहोर… उंचंबळलेल्या आनंदाला थोपवत कार्टरनं दाराला फक्त छोटंसं भोक पाडत आत हजारो वर्षांत साठलेल्या विषारी वायूला वाट करून दिली. नंतर मेणबत्तीच्या प्रकाशात डोळे अंधाराला सरावल्यावर दिसलेल्या असंख्य चित्रविचित्र मूर्ती, पुतळे आणि अपार सोनं. आतल्या रंगवलेल्या भिंतीवर उमटलेला कामगाराच्या हाताचा ठसा हजारो वर्षांचं अंतर मिटवून गेला. पिरॅमिड रचनेचा दांडगा अभ्यास असल्याने बाहेरची मोठी खोली, अँटीचेंबर, अॅनेक्स इथल्या डोळे दिपवणाऱ्या खजिन्याकडे केवळ साक्षीभावानं पाहत कार्टर शेवटच्या खोलीत जातो. सोन्यानं मढवलेला मोठा लाकडी पिंजरा, त्यात सोन्याच्या एकात एक तीन शवपेट्या, त्यातल्या शेवटचीत छातीपर्यंत सोन्याचा चमकणारा मुखवटा असलेली रसायनांच्या परिणामानं खाली पेटीला पूर्ण चिकटलेली तुतनखामेनची ममी. तत्कालीन पुरातत्त्वातलं सगळ्यात महत्त्वाचं गूढ.
लुक्सॉरला येताना अनेकवार तपशीलानं हे सारं वाचलेलं अनुभवण्याची अधीर उत्सुकता मीनाताईंकडे आहे. आता पूर्ण रिकाम्या असलेल्या थडग्यातल्या तीन हजारांवर वस्तू, पुतळे कैरो म्युझियममध्ये दाटीवाटीनं मांडलेल्या त्यांनी बारकाईनं पाहिल्या आहेत. इथं आता कार्टरनं १९२२ साली केलेला प्रवास ८० वर्षांनंतर पुन्हा अनुभवायचा आहे, तुमच्या-आमच्यापर्यंत शब्दांतून पोचवायचा आहे.
कबर रिकामी, फारसे पर्यटक नाहीत. भकास वाटणाऱ्या शेवटच्या खोलीत फक्त रिकामी शवपेटी. शेजारचा पर्यटक म्हणाला, 'हेच ते प्रसिद्ध थडगं? इथं तर काहीच नाही…'
मीना प्रभू म्हणतात, ‘सारं तर तिथंच होतं, पण कार्टरची नजर कुठे होती...’
४.
मोहेंजोदडोला येताना थानवी अशी 'नजर' घेऊन आले आहेत. (मोहेंजोदडो, हडाप्पा आणि सिंधू संस्कृतीशी संबंधित ३५ पुस्तकं संदर्भ सूचीत आहेत) मुर्दोंका टीला प्रत्यक्षात रिकामा, उदास वाटत असला तरी थानवींना तिथं हजारो वर्षांचा काळ ओलांडून एकेकाळी भरभराटलेली नांदती संस्कृती दिसते. मुख्य रस्त्याकडं पाठ करून आत छोट्या बोळात उघडणारी घरं पाहून त्यांना चंदीगडची आठवण होते, तिथंही मोठ्या रस्त्यावर असणाऱ्या घरांत जाण्यासाठी सेक्टरमधल्या छोट्या गल्लीत जावं लागतं... ला कार्बूजिए इथं येऊन गेला असेल? थानवी इथं सहज म्हणतात 'कहते है कवितामेंसे कविता निकलती है...'
सिंधू संस्कृतीतल्या नव्हे तर मानवी इतिहासातल्या या अत्यंत प्रगत, सुसंस्कृत (उत्खननात असंख्य अलंकार, अवजारं सापडली तरी एकही हत्यार सापडले नाही) कालखंडाचा शोध हडाप्पामध्ये (हे पाकिस्तानातल्या पंजाबात आहे ) १९०९ साली प्रो. हिरानंद शास्त्री (हे हिंदी कवी अज्ञेयांचे वडील) यांनी तर नंतर मोहेंजोदडोमध्ये तत्कालीन भारतीय पुरातत्त्व महानिदेशक जॉन मार्शल यांच्या प्रयत्नांतून १९२४ साली लागला. पुढे स्वातंत्र्यलढ्याच्या काळातही काही काम झालं, पण १९६० पासून पाकिस्तान सरकारने या भागात उत्खननास बंदी घातली. (झालेल्या उत्खननावरही पाकिस्तानात फारसे विश्लेषणात्मक संशोधन झालेले नाही). त्यामुळे अद्याप जमिनीखाली असलेल्या दोन तृतीयांशापेक्षा जास्त भागाने आपल्यात दडवून ठेवलेली रहस्य उघड होणार नाहीत. इजिप्तमध्ये फेरोंचा कालखंड खूप प्राचीन असल्याने (इसवीसनपूर्व तीन ते चार हजार वर्षं, म्हणून इस्लामशी दुरान्वयेही संबंध नसलेला) इजिप्शियन जनतेत त्याबद्दल वारसा, परंपरा याअर्थी ममत्व, आपलेपण नाही. पर्यटनातून येणाऱ्या महसुलामुळे पिरॅमिड किमान जपले इतकेच, असं अलीकडे वाचनात आलं. पाकिस्तानच्या उदासीनतेचंही कारण हेच असेल काय? कारण काही असलं तरी त्यामुळे सिंधू संस्कृतीच्या भारतातील भागात (हरियाणातील राखीगढी, लोथल, कच्छमधल्या धोलावीर, भिरीणा) उत्खनन, संशोधन होत राहिलं. अगदी अलिकडे त्यावरील तथ्यांवर आधारित संशोधन ‘नेचर’मध्ये प्रसिद्ध झाल्याची बातमी वाचली. त्यानुसार सिंधू संस्कृतीचा काळ इ. स. पूर्व नऊ ते दहा हजार वर्षं इतका मागे गेलाय. सिंधू संस्कृती जगातली सर्वांत पुरातन ज्ञात संस्कृती ठरते आहे. (अर्थात मतांतरं आहेतच) आजच्या आपल्या जगण्यातल्या अनेक गोष्टी सिंधू संस्कृतीतून आल्या आहेत. शांतीची आस, अहंकार लोप करणारा योग, कलेचे लघुत्तम रूप, (small is beautiful) ढोबळमानानं हे सगळं या संस्कृतीचं देणं. तपशीलात अनेक गोष्टी सांगता येतील.
अर्थात कालनिर्णयनातील मतमतांतरे, शिलालेख - नाणी यांवरील लिपीची नि:संदिग्ध स्वरूपात न झालेली उकल, यामुळे डाव्या-उजव्या अशा विचारसरणीच्या दोन्ही बाजूंनी टोकाची मतं मांडली गेली आहेत. त्याचा विस्तृत परामर्श थानवी घेतात.
६.
पावले अडखळली तरी सावल्या लांबायला लागल्या की, परतावं लागतंच. या उन्मादी गलबल्यात, उद्या उत्खननात सापडले तरी, निखळ सत्याप्रत पोचता येईल का? संस्कृतीच्या या आदिपुरुषाशी संवाद करता येईल का? जड पावलांनी परतताना मन या आणि अशा शंकांनी व्याकूळ झालं आहे... भूतकाळात दडलेल्या आपल्या मुळांचा शोध घेणं ही तर लक्झरी. साधं जुन्या आठवणीत रमणंही (नॉस्टाल्जिया) न परवडणारा (किंवा मुद्दाम आठवावा असा भूतकाळच नसणारा) मोठा वर्ग भारतात (तसा कमीअधिक प्रमाणात सगळीकडेच) आहे. 'बहुरुपिया शहर' (राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली, २००७ ) हे दिल्ली शहराच्या अशा व्यवस्थेनं वर्तमानातच, तेही कायम अस्तित्वसंघर्ष करीत, जगणं बाध्य केलेल्या श्रमजीवींनी काढलेल्या क्षणचित्रांचं कोलाज काहीसं उशीराच वाचनांत आलं. महानगरांमध्ये पूर्ण देशातून हजारो लाखो लोक फक्त जगणं, एवढीच अपेक्षा ठेवून येतात, इथलेच होतात. गावाकडे असलेली घरं कधी इथं उभारण्याची स्वप्नं विझलेल्या डोळ्यात घेऊन जगत राहतात.
दिल्लीत एलएनजेपी, नांगलामाची, दक्षिणपुरी या आणि अशा अनेक कच्च्या वस्त्या, पुनर्वसितांच्या वसाहती, झोपडपट्ट्या आहेत. अंकूर (सोसायटी फॉर अल्टरनेटीव्ज इन एज्यूकेशन) तिथल्या काही प्रमाणात का होईना, पण शिकलेल्या तरुणाईसाठी काम करते. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी मदत, मार्गदर्शन आहेच पण त्याही पलिकडे स्वतंत्र विचार करायला, ते मांडायला प्रवृत्त करते, त्यांना सृजनाचं, अभिव्यक्तीचं महत्त्व पटवून आपल्या रोजच्या जगण्यातले संदर्भ शब्दबद्ध करायला उद्युक्त करते. सृजनशील अभिव्यक्ती जगायला उभारी तर देतेच सोबत विपरीत परिस्थितीत उभं राहण्याचं बळही देते. यातून माहितीजालातील ब्लॉगची सायबरमोहल्ला 'ही कम्युनिटी निर्माण झाली. काही काळातच दोन-अडीचशे तरुण-तरुणी आपले अनुभव तिथे नियमित मांडायला लागले.. ही संख्या वाढत गेली तसे प्रत्येक वस्तीच्या स्वतंत्र कम्युनिटी निर्माण झाल्या.. नांगलामाची लॅब, एलएनजेपी लॅब असा सृजनाला बहर आला. रोजच्या जगण्यात अस्तित्वसंघर्षापलीकडेही काही आहे आणि ते आनंददायक आहे याचा जणू त्यांना नव्यानंच शोध लागला. त्यातल्या निवडक वीस जणांच्या ब्लॉगचं (एकुण १०० नोंदी) हे संकलन ‘बहुरुपिया शहर’. त्यातल्याच एकानं म्हटल्याप्रमाणे 'जिंदगी कहानियाँ बुनते रहती है अपने जी पानेकी वजह बनाने के लिये...'
नांगलामाची ही दिल्लीतली बरीच जुनी उभी-आडवी प्रचंड पसरलेली झोपडपट्टी. जगायला येणाऱ्या स्थलांतरितांनी १९६० पासून प्रगती मैदानालगतच्या भयानक दलदलीत आपल्या झोपडीपुरती भर पाटीपाटीनं घालत ती उभी केली. एरवी या दलदलीकडे कुणाचं लक्ष नव्हतं, पण शहर बेसुमार गतीनं वाढत गेलं, तशी आता शहरात मोक्यावर आलेली 'बेकायदा' वस्ती सगळ्यांच्याच डोळ्यात खुपायला लागली. 'सनदशीर' प्रयत्न सुरू झाले. अखेर २०१०सालच्या राष्ट्रकुल युवा स्पर्धांसाठी गरजेच्या निमित्ताने कोर्टाने तिच्या अवैधतेवर शिक्कामोर्तब केलं. ३० ऑगस्ट २००६ रोजी तत्परतेनं असंख्य पोलिसांसह बुलडोझर वस्तीत शिरले. यापुढील दोन दिवसांच्या भयानक अनुभवाच्या ४२ नोंदी 'अवसान' या विभागात आहेत. घर पाडलं जाण्याचा पिळवटणारा अनुभव. यात 'रहना बसना क्या है? राशन कार्ड, वोटर आयडी बनाना या फिर वो रिश्ता बनाना जिसमें अपने घरकेही नही बल्की पुरी गलीके लोग अम्मा कहकर पुकारे?' असा मूक करणारा प्रश्न आहे तसा दिल्ली बनने के बजाय सिमट रही है' असा निष्कर्षही.
अरे शहर का जायकाही भीड की वजह से है, लोगही कम होते गये तो जगह सांस कैसे लेगी?
दुनियां दूर से जितनी खुबसुरत होती है जीनेमें उतनीही मुश्कील होती है..
असं बरंच शिकत शिकवत वस्ती अखेर उदध्वस्त होते. कुणा एकाला प्रश्न पडतो 'रोजमर्रा की जिंदगीमें इतना कुछ देखने के बाद नॉर्मल जिंदगी क्या होती है?'
तरी यात जीवनालाच विटून जाणं नाही. कुणी म्हणतो ये विस्थापनने जैसे जिंदगी की किताबके कुछ पन्ने जरूर निकाले वैसे कुछ नये पन्ने भी जोड दिये हो नया कुछ लिखने के लिये. मुळातून उखडून फेकलं गेल्यावरही नव्या खडकांत पुन्हा रुजण्याचं नव्हे बहरण्याचं स्वप्न कुठे मिळत असेल?
नांगलामाचीच्या या रहिवाशांचे कालांतराने आणखी दूर घेवराच्या माळरानावर पुनर्वसन करण्यात आले. घरटं पुन्हा उभं होत असतानाचे २५ अनुभव 'किनाराकशी' या विभागात आहेत. शहरमें हजारों कोने होते है, दूरही सही, उसमें अपने नाम की जगह कहीं न कहीं तो होगीही..' या आयुष्यावरच्या अदम्य विश्वासाच्या या नोंदी. बीते हुए वक्त के साएंसे उभरने की चाहत का नजारा. यांत कष्टानं मिळवलेलं गमावण्याचं दुःख आहेच (अपनी पावर खोने का गम) तसा तुम्हा आम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे (‘फॅण्ड्री’तला जब्या शेवटी दगड भिरकावतो तसा तो थेट अंगावर येतो) ये बडेबडे शॉपिंग मॉल, क्लब सालोंसे चल रहे बडेबडे निर्माण हमसे चुनौती भरा सवाल करते है इनमें आप कहाँ हो?'
याशिवाय ३३ छोट्या स्वतंत्र कथाही यात आहेत. टिकून राहण्याचा संघर्ष यांत आहे, तसे या धबडग्यातही काळजात जपलेले पारिजातकाच्या देठाइतके कोवळे हळवे क्षणही आहेत. कधीही बेघर व्हावं लागेल, या भीतीपोटी येणारं अनिश्चिततेचं सावट आहे तसंच व्यवस्थेत टाचा घासल्यावर येणारं हताशपण आहे. तरी या सगळ्यावर दशांगुळे व्यापून उरते ती आयुष्याबद्दलची असोशी आणि प्रेम, विपरीत परिस्थितीतही जगण्याच्या हाकेला ‘ओ’ देणारी शहाणीव आणि स्विकारशीलता...
निहत्थे लोग इस समाज में किस तरह उतरें? असा प्रश्न अगदी सुरुवातीच्या मनोगतातच करणारा श्वेता सारदा यांनी संपादित केलेला हा अस्वस्थ करणारा वाचनानुभव....
लेखक पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment