अजूनकाही
मराठीमध्ये साधारण ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ नंतरच्या कालखंडात सिनेमा आणि अगदी मालिकांमध्येही ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रणात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. अर्थात त्यात काही अपवाद वगळता इतर निर्माते सदर पार्श्वभूमीला न्याय देऊ शकत नाहीत ही बाब वेगळी. असं असलं तरी नागराज मंजुळेच्या ‘आटपाट’ आणि उमेश कुलकर्णीचा ‘आरभाट’ यांच्या आणि प्रभावी ठरणाऱ्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांचा घनिष्ठ संबंध आहे. हे सगळं सांगण्याचं कारण हे की सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ’ हा चित्रपट ‘आटपाट’नं प्रस्तुत केला आहे, तर उमेश कुलकर्णीचे त्यात विशेष आभार मानले आहेत. कुलकर्णी आणि मंजुळेच्या बहुतांशी चित्रपटांचं छायाचित्रण करणाऱ्या या छायाचित्रकाराचं हे दिग्दर्शकीय पदार्पण नक्कीच आश्वासक आहे.
चैतन्य ऊर्फ चैत्या (श्रीनिवास पोकळे) हा गावातील जमीनदार शंकरचा (नागराज मंजुळे) मुलगा. आई (देविका दफ्तरदार), वडील आणि आजीचा समावेश असलेलं आपलं चौकोनी कुटुंब, गावातील मित्र, शाळा, शाळेतील मित्र असं लहानसं विश्व असलेलं त्याचं आयुष्य अगदीच हसतखेळत सुरू आहे. तो भूतकाळ वा भविष्याची फिकीर अशा कुठल्याही बंधनांपासून मुक्त आहे. ‘नाळ’ साधारणतः त्याला नायकस्थानी ठेवून त्याभोवती फिरत राहतो, आणि त्याच्याच दृष्टिकोनातून त्याचं छोटेखानी भावविश्व उलगडत जातो.
‘नाळ’चा ट्रेलर पाहिल्यास त्याच्या मूलभूत, ढोबळ कथानकाचा अंदाज येत नाही. अगदी चित्रपट सुरू झाल्यावरही एक असा पॉइंट येतो की पुढे काय हा प्रश्न पडतो. म्हणजे चित्रपटाचा विचार करता तो कुठल्या दिशेनं वाटचाल करणार हा प्रश्न उद्भवतो. लागलीच त्याचं उत्तर कथानकाला गरजेच्या असलेल्या लहानशा कन्फ्लिक्टच्या माध्यमातून मिळून चित्रपटाला पुन्हा गती प्राप्त होते. अर्थात ते कारण किंवा कथानक निर्मात्यांना उघड करावंसं वाटत नसल्यानं त्याविषयी न बोलणं अधिक उचित ठरेल.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’ आणि ‘हायवे : एक सेल्फी आरपार’सारख्या चित्रपटांचा सिनेमॅटोग्राफर राहिलेल्या सुधाकर यक्कंटीच्या स्वतःच्या सिनेमाचं छायाचित्रण सुंदर नसतं तरच नवल. इथं ‘नाळ’मधील कन्फ्लिक्ट फारच मूलभूत स्वरूपाचा असल्यानं चित्रपटाला प्रभावी बनवण्यासाठी सदर पात्रांच्या आणि त्यांच्या भोवतालाच्या अंतरंगात जाणं गरजेचं होतं. जेणेकरून खिळून राहण्यासाठी एक रंजक कारण मिळेल. इथं यक्कंटीचा कॅमेरा सदर पात्रांशी कनेक्ट होण्याचा दुवा तर बनतोच, पण सोबतच मूलतःच सुंदर असलेली लोकेशन्स ते अगदी ‘नेक्स्ट डोअर’ भासणारा भोवताल, असं सर्व काही तितक्याच सुंदरतेनं टिपलं जातं.
अद्वैत नेमळेकर यांचं पार्श्वसंगीत यक्कंटीच्या कॅमेऱ्याला अगदीच तरलपणे साथ देतं. ते या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग बनतं, समोर येणाऱ्या दृश्यांना पूरक ठरत महत्त्वाची कामगिरी बजावतं. समोर येणारी दृश्यं आणि पार्श्वसंगीत यांच्यात असलेलं ट्युनिंग उल्लेखनीय आहे. सदर संगीत चित्रपटाला भावनिक आणि सिनेमॅटिक पातळीवर उंचावण्याचं काम करतं.
सुधाकर यक्कंटीची कथा नातेसंबंधांना उलगडत परिणामकारक ठरत जाते. बाप-लेक, सासू-सून किंवा आई-मुलगा अशा ‘परम्युटेशन कॉम्बिनेशन’ स्वरूपातील नात्यांच्या अनेक सुंदर छटा कलाकारांच्या आणि अगदीच अचूक संवादांच्या माध्यमातून टिपल्या जातात. नागराज मंजुळेचे संवाद चित्रपटातील कथेला पूरक ठरतात. काहीशा आर. के. नारायण शैलीत ग्रामीण सभोवताल उभा केला जातो. अर्थात त्याला ‘पॉलिटिकली करेक्ट’ राहण्याचं किंवा कुठला तरी वैशिष्ट्यपूर्ण आशय-विषय समोर आणण्याचं बंधन नाही. कारण हे सगळं काही आपण चैत्याच्या भूमिकेतून आणि त्याचं प्रत्येक गोष्टीला समोर जाण्याच्या रूपातून अनुभवत असल्यानं त्याची गरजही भासत नाही.
श्रीनिवास आणि इतरही बालकलाकार उत्तम कामगिरी करतात. जे मंजुळे हे नाव निगडित असलेल्या आधीच्या चित्रपटातील बालकलाकारांचे परफॉर्मन्सेस पाहता अपेक्षितही होतंच. ‘फँड्री’ आणि गजेंद्र अहिरेच्या ‘द सायलन्स’नंतर मंजुळे पुन्हा एकदा बऱ्यापैकी विस्तृत म्हणाव्याशा भूमिकेत दिसून येतात. मंजुळे, देविका दफ्तरदार आणि ओम भुतकर ही मंडळी सहाय्यक भूमिकांमध्ये प्रभावी कामगिरी ठरतात.
‘नाळ’ हा त्याच्या सिनेमॅटिक मूल्यांना उंचावणारं संगीत आणि तितकेच चांगले परफॉर्मन्सेस यांनी अधिक उत्तम बनतो. तो न आवडणं तसं कठीण आहे, कारण मुळातच त्यात उणीवा तशा नाहीतच. थोडक्यात हा सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनं सुंदर आणि पहावा असा सिनेमा आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Amit Trivedi
Sat , 17 November 2018
अक्षय शेलार.. दादा खुप छान समिक्षा लिहली आहे