स्टॅन ली : कित्येक सुपरहिरोजना जन्माला घालणारा स्टॅन नशिबाला सगळ्यात मोठा सुपरहिरो मानी
संकीर्ण - श्रद्धांजली
भक्ती चपळगावकर
  • स्टॅन ली (२८ डिसेंबर १९२२-१२ नोव्हेंबर २०१८)
  • Fri , 16 November 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली स्टॅन ली Stan Lee मार्व्हल कॉमिक्स Marvel Comics

“एखादा माणूस भिंतीवर कोळ्यासारखा सरसर चढतो आहे, किंवा एखादा हिरवा महाकाय सैतान बनतोय…. या गोष्टी सुपरहिरो बनवायला पुरेशा आहेत. सुपरहिरो असेच असतात हे लोकांना पटतं. पण त्या पलिकडे जाऊन मी विचार केला की, हे सुपरहिरो प्रत्यक्ष जगात समजा असले, तर त्यांनाही सर्वसामान्यांना सतावणारे प्रश्न पडतील ना, त्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत असेल, एखाद्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून जाईल, एखाद्याच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतील, हे आणि असे कित्येक. हीच गोष्ट ‘मार्व्हल कॉमिक्स’ (आधीचे ‘टाईमली कॉमिक्स’) चे वैशिष्ट्य ठरली.” मार्व्हलच्या आणि पर्यायाने स्टॅन लीच्या यशाचे गमक सांगताना स्टॅन ली एकदा म्हणतो.

जॅक कर्बि आणि स्टीव डिटको सारख्या साथीदारांच्या मदतीने स्टॅन लीने सुपरहिरोजची फौज उभी केली. आज हे हिरो जगातल्या कोट्यवधी जनतेच्या मनावर राज्य करतात. वयाच्या सतराव्या वर्षापासून कॉमिक्ससाठी चित्र चितारायला लागलेला स्टॅन तब्बल पंच्याण्णव वर्षं जगला. आयुष्याचा शेवटचा फार थोडा काळ वगळता ही सगळी वर्षं तो अव्याहत काम करत होता. मार्व्हलच्या काल्पनिक जगातले महानायक-नायिका निर्माण करण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. 

चाळीसच्या दशकात ज्या बालीश पद्धतीनं कॉमिक्स लिहिले जायचे, त्याची स्टॅनला फार लाज वाटे. खरं तर त्याचं नाव स्टॅनली लीबर, पण चारचौघांमध्ये ‘मी कॉमिक्ससाठी चित्र काढतो’ हे सांगायची त्याला लाज वाटू लागली. मग त्यानं व्यवसायासाठी स्वतःचं नाव स्टॅन ली असं बदललं. ‘टाईमली कॉमिक्स’ नावाच्या कंपनीत तो फार लहान असतानाच कामाला लागला. लवकरच काही अंतर्गत वादामुळे कंपनीतले ज्येष्ठ चित्रकार कंपनी सोडून डीसी कॉमिक्स या स्पर्धक कंपनीला जाऊन मिळाले. प्रतिभाशाली स्टॅन वयाची वीस वर्षे पूर्ण करायच्या आधीच कंपनीचा मुख्य संपादक बनला. कॅप्टन अमेरिकासारखा सुपर हिरो टाईमलीमध्ये दाखल झाला होता. पण त्याच्या हाती त्याची सुप्रसिद्ध ढाल देण्याचे श्रेय स्टॅनचं.

डीसी कॉमिक्स एकाहून एक सरस सुपरहिरोज तयार करत होती. सुपरमॅन, बॅटमॅन, वंडरवुमन, ग्रीन लॅंटर्न… त्या सामना करणं आवश्यक होतं. त्यातच डीसीची“जस्टिस लीग’ ही सुपरहिरोजची गॅंग कॉमिक्सच्या बाजारात आली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मग स्टॅननं ‘फॅंटॅस्टिक फोर’ आणले. इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, स्टॅनने एकट्यानं ही सगळी मंडळी निर्माण केली नाहीत. यातील काही कॅरेक्टर्स उभी करण्यामागे जॅक कर्बि व स्टीव डिटको आणि इतरांचा हात होता. आज कॉमिक्स आणि सुपरहिरोजच्या चाहत्यांमध्ये या मंडळींना फार मान आहे. 

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

आयर्न मॅन, स्पायडरमॅन, ब्लॅक विडो, कॅप्टन अमेरिका, हल्क आणि हॉक आय यांची टीम म्हणजे अॅव्हेंजर्स. या टीमला उणीपुरी पन्नास वर्षं झाली आहेत. पृथ्वीवर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी ही टीम सदैव सज्ज असते. सहसा पृथ्वीचा शत्रू अंतराळातून आलेला असतो. या टीमचं वैशिष्ट्य म्हणजे यातला प्रत्येक सुपर हिरो त्याच्यातल्या सुपर पॉवरला बाजूला ठेवलं तर माणूस म्हणून एक नमुना आहे. टोनी स्टार्क नावाचा प्रचंड श्रीमंत उद्योगपती आयर्नमॅन बनून अभेद्य चिलखत चढवतो. प्रचंड अहंकार आणि बेदरकार वागणं या स्वभावामुळे टोनीच्या सुपरपॉवरवर अनेकदा पाणी फिरतं. स्पायडरमॅन तर नुकतीच मिसरूड फुटलेला एक कॉलेजयुवक.

स्पायडरमॅनच्या निर्मितीचं श्रेय पूर्णपणे स्टॅनचं. स्पायडरमॅनच्या जन्माची कथा फार रंजक आहे. स्टॅनला भिंतीवर सरासरा चढणारा सुपरहिरो हवा होता. त्यानं फ्लाय मॅन, इन्सेक्टमॅन अशा अनेक नावांचा विचार केला. पण कोणतंच नाव फारसं नाट्यमय वाटत नव्हतं. मग त्याला नाव सुचलं, स्पायडरमॅन. कोळ्यासारख्या किटकाची शक्ती असलेला महानायक. पण स्टॅनला हा महानायक लोकांत वावरणारा हवा होता. स्वतःला मॅन म्हणत असला तरी प्रत्यक्षात किशोरवयीन मुलगा. दिसायला फारसा ग्रेट नाही, चेहऱ्यावर पुरळ, गर्लफ्रेंड फार भाव देत नाही, आई-वडलांविना पोरका, पण काका काकूंनी सांभाळलेला हा मुलगा.

या नव्या सुपरहिरोचं वर्णन स्टॅनच्या प्रकाशकांनी ऐकलं आणि त्याला वेड्यात काढलं, “आपल्याला सुपरहिरो हवाय स्टॅन, पोरगा नाही. फार फार तर त्याला साईड किक (हिरोचा साथीदार) कर. (मार्व्हलच्या प्रतिस्पर्धी डीसी कॉमिक्सच्या बॅटमॅनला असाच पोरगेला साईडकिक रॉबिन आहे). पण त्याला हिरो कशाला करतोस?” पण स्टॅन मागे हटला नाही आणि स्पायडरमॅन स्टॅनला जसा हवा होता, तसाच साकार झाला. फक्त साकारच नाही तर लहानथोरांचा आवडता बनला. 

या दरम्यान स्टॅनच्या मनात अनेक वेळा कॉमिक्सची दुनिया सोडण्याचा विचार डोकावून गेला. कॉमिक्स मुख्यतः लहान मुलांना समोर ठेवून बनवले जातात. त्याला मानवी चेहरा नसतो. याची त्याला सतत खंत वाटायची. त्याची बायको जोनीनं त्याला मोलाचा सल्ला दिला. कॉमिक्सची दुनिया आता सोडू नकोस. उलट कुणाचीही पर्वा न करता मनासारखं, मनाला पटेल ते काम कर. आणि त्यात तू अयशस्वी झालास तर मग तुला हवं तसं वाग. तिच्या सल्ल्याला मानून त्यानं त्याच्या साथीदारांबरोबर एकाहून एक सरस कॅरेक्टर्स बनवली. सुपरहिरोजनाही कुठलं ना कुठलं दुःख असतं, वंचना असतात ही कल्पना त्यांनी उचलून धरली आणि हिरो व सामान्य माणसाच्या मिश्रणानं एक धमाल उडवून दिली. कॉमिक्सचं जग कुठल्या एका वयोगटापुरतं मर्यादित न ठेवता आबालवृद्धांना कॉमिक्स पुरवण्याचं काम मार्व्हलनं केलं. डेडपूल, जेसिका जोन्स किंवा ल्युक केजसारखी पात्रं तर मोठ्यांसाठीच बनवलेली आहेत. 

कॉमिक्ससाठी चित्र चितारण्यातच स्टॅनला रस नव्हता, तर त्यापुढे जाऊन वेगवेगळी वैशिष्ट्यं असणारे सुपरहिरो किंवा व्हिलन्स बनवणाऱ्या कलाकारांचा तो नायक होता. मार्व्हल कॉमिक्स आणि डीसी कॉमिक्सनं स्वतःची अशी एक दुनिया निर्माण केली आहे. त्या दुनियेत किंवा युनिवर्समध्ये त्यांची पात्रं असतात आणि या पात्रांच्या करामतीत सामान्य वाचक किंवा प्रेक्षक रमून जातात. कॉमिक्स फॅन्स अमेरिकेत ‘कॉमिक कॉन’ नावाची परिषद आयोजित करतात. परिषद कमी आणि उत्सव जास्त असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं. कॉमिक्समधली पात्रं किंवा त्यांच्याशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी या निमित्तानं फॅन्सना मिळते. स्वतः स्टॅन ली या मेळ्यात आवर्जून हजर राही. आज जगभरात अनेक ठिकाणी, अगदी मुंबईतसुद्धा कॉमिककॉनचं आयोजन केलं जातं. कॉमिक्सचा जनसामान्यांवर विशेषतः तरुणाईवरचा प्रभाव थक्क करणारा आहे. या प्रभावाची कल्पना स्टॅनला होती. अतिशय तीक्ष्ण बुद्धी आणि दूरदर्शिता या गुणांनी स्टॅनला वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षांपर्यंत साथ दिली. 

छापिल कॉमिक्समध्ये स्वतःला अडकवून न घेता स्टॅननं नव्या माध्यमांचा वापर केला. आज इंटरनेट, टीव्ही आणि थिएटरच्या माध्यमातून हे सुपरहिरोज घरोघरी पोचले आहेत. डीसीच्या सुपरमॅननं एकेकाळी लोकांना वेड लावलं. त्यांचा बॅटमॅन आजही खूप लोकप्रिय आहे. इतकंच नव्हे तर त्याला मध्यवर्ती ठेवून कित्येक सिनेमे काढण्यात आले आहेत. मार्व्हल डीसीच्या मागे नाही, उलट काकणभर पुढेच आहे. आज घरोघरी सुपरहिरोजचे फॅन्स आहेत. देश, धर्म, भाषा या सगळ्या चौकटी या हिरोजनी मोडल्या. ‘ब्लॅक पॅंथर’सारखा सुपरडुपर हिट सिनेमा वर्णवादावर विजय मिळवून कोट्यवधी डॉलर्सचा धंदा करतो, हे स्टॅनचं यश आहे.

ब्लॅक विडोसारख्या नायिका ‘हम भी कुछ कम नहीं हैं’ इतर सुपरहिरोजना दाखवून देतात. अॅव्हेंजर्स, एक्स मेन, स्पायडर मॅन, आयर्न मॅनसारख्या सुपरहिरो थीमवर आजपर्यंत अनेक सिनेमे आले आहेत, भविष्यातही येतील. कॉमिक्सच्या जगात स्वतःला अडकवून न घेता, स्टॅननं सिनेमा क्षेत्रात प्रवेश केला आणि मग मागे वळून बघितलं नाही. शिवाय याच सुपरहिरोजवर अनेक चॅनल्स आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म्सवर मालिका सुरू आहेत हे वेगळंच. 

पाश्चिमात्य सिनेमा आणि टीव्हीच्या माध्यमात एक मोकळेपणा आहे. त्यामुळे सुपरस्टार्सही पाहुण्या भूमिका करतात. त्यात कित्येकदा त्यांची टर उडवली जाते. काही सेकंदांपुरतंच त्यांना पडद्यावर दाखवलं जातं, पण त्याला त्यांची हरकत नसते. मूळ कथानकाला धक्का न लावता हे लोक पडद्यावर झळकतात. मार्व्हलच्या प्रत्येक सिनेमामध्ये स्टॅन एकदा तरी झळकतो. मोठ्या पडद्यावर झळकणं त्याला मनापासून आवडायचं. त्यामुळे त्याला ‘स्टॅन द मॅन’ किंवा ‘किंग ऑफ कमियो’ या नावांनी ओळखलं जायचं. हिचकॉकच्या सिनेमात कुठल्या ना कुठल्या दृश्यात हिचकॉकचं दर्शन व्हायचं. मार्व्हलच्या सिनेमातही स्टॅन मध्येच झळकतो.

‘आयर्नमॅन’ सिनेमा मालिकेतल्या एका चित्रपटात टोनी स्टार्क स्टॅनलाच ह्यु हेफनर (प्ले बॉय फेम) समजतो. त्यावर स्टॅनचं उत्तर असतं, ‘हरकत नाही, बऱ्याच जणांना असंच वाटतं.’ तर दुसऱ्या एका ‘आयर्नमॅन’ सिनेमात तो पोस्टमन बनून येतो. टोनी स्टार्कचं नाव स्टार्क न वाचता, स्टॅंक (घाण वासाचा) असं वाचतो.

माझा फेवरेट कमियो आहे, ‘अमेझिंग स्पायडरमॅन’मधला. त्यात तो लायब्ररीमध्ये हेडफोन लावून क्लासिकल सिंफनी ऐकतोय आणि मागे स्पायडरमॅन आणि लिझर्ड धुमाकूळ घालत असतात. आपल्या मागे काय गोंधळ चालू आहे, याची कल्पनाही नसलेला हा लायब्ररीयन शांतपणे हेडफोन लावून काम करतोय आणि मागे तुफान मारामारी चालू आहे. धमाल! स्वतः स्टॅनला ‘अॅव्हेंजर्स - एज ऑफ अल्ट्रॉन’मधला रोल आवडतो. म्हातारा स्टॅन थॉरच्या बाटलीतली दारू पितो आणि दुसऱ्या क्षणाला ढेर होतो. ‘बिग बॅंग थिएरी’ या मालिकेतले वेडे सांयटिस्ट कॉमिक्सचे वेडे असतात आणि त्यातला सगळ्यात अतरंगी शेल्डन कूपर एकदा थेट त्याच्या घरी पोचतो. त्याने पोलीस बोलावल्यावरही त्याला काही फरक पडत नाही, उलट स्टॅनच्या सहवास मिळेल या आशेनं कोर्टाची फेरी मारायलाही तयार असतो.

स्टॅनच्या यशात त्याच्या बायकोचा, जोनीचा फार मोठा वाटा आहे, आधी सांगितल्याप्रमाणे तिचा सल्ला त्यानं मानला आणि कॉमिक्सच्या दुनियेत टिकून राहिला. जवळपास सत्तर एक वर्षांचं त्यांचं वैवाहिक जीवन होतं. गेल्या वर्षी जोनीचा मृत्यू झाला आणि स्टॅनला मोठा धक्का बसला. नव्वदी पार केल्यानंतरही ठणठणीत तब्येत राखलेला स्टॅन अचानक गडबडला. त्यात त्याच्या मुलीनं त्याच्या इस्टेटीवर ताबा मिळवल्याच्या बातम्या येऊ लागल्या. स्टॅनचा घरात छळ होतोय असे आरोपही झाले, त्याची चौकशी सुरू होती. हा त्रास फार काळ सहन न करता स्टॅन जोनीच्या भेटीला गेलाय.

कित्येक सुपरहिरोजना जन्माला घालणारा स्टॅन स्वतः नशिबाला सगळ्यात मोठा सुपरहिरो मानी. ते माझ्या बरोबर होतं, म्हणून मी एवढं काही करू शकलो, असं तो म्हणे. पण नशीबाच्या जोडीला त्याची अलौकीक प्रतिभा नसती, तर तो रोजच्या वंचनांमुळे कंटाळलेल्या लोकांना सुपरहिरोजच्या जगात नेऊ शकला नसता. त्यानं गेल्या ऐंशी वर्षांत जे काम केलं आहे, त्या जोरावर जगभरातले रसिक प्रेक्षक आणि वाचक भविष्यातही सुपरहिरोज आणि व्हिलन्सचे कारनामे एन्जॉय करणार आहेत.

डिसक्लेमर - मी स्वतः कॉमिक्स किंवा सुपरहिरोजची वेडी/ फॅनॅटिक नाही. सिनेमे आणि मालिका बघण्याच्या नादामुळे स्टॅनचं कित्येक वेळा दर्शन झालं, म्हणून त्याच्याबद्दल थोडंसं लिहावंसं वाटलं. 

.............................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhaktic3@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......