अजूनकाही
आचार्य विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशनाचं वृत्तसंकलन करत असतानाची ही जशी नोंद आहे, तसं प्रदीर्घ आणि अविश्रांत परिश्रम घेऊनही एखादी बातमी चुकते कशी, याचीही ही हकीकत आहे. देशमुख आणि कंपनीच्या वतीने लवकरच प्रकाशित होणार्या ‘डायरी’ या पुस्तकातून साभार.
.............................................................................................................................................
आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी, जयंतीच्या कार्यक्रमांच्या उल्लेख ‘आजच्या कार्यक्रमा’त वाचला की, मन एकदम १९८२त जातं. तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो आणि नागपुरात येऊन जेमतेम दीड-पावणे दोन वर्षे, तर पत्रकारितेला चार-साडेचार वर्षे झालेली होती. तेव्हा विनोबा भावे यांचा पवनार आश्रम हे एक स्वतंत्र बीटच झालेले होते. कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींपासून वसंत साठे, एन. के. पी. साळवे, असे अनेक केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते महिना-दोन महिन्यांतून पवनार आश्रमला भेट देऊन विनोबांशी चर्चा करत असत. मुख्यमंत्री आणि विदर्भातील काँग्रेस मंत्र्यांना तर महिना-पंधरा दिवसांतून एकदा तरी ‘सलाम\दुवा’ करण्यासाठी पवनारला भेट द्यावीच लागे. पवनार हे काँग्रेससाठी त्या काळात ‘मारुतीचे देऊळ’च झालेले होते जणू! ही इव्हेंट वार्ताहर म्हणून कव्हर करण्यासाठी आम्हाला पवनारला नियमित जावे लागायचे.
विनोबा भावेंविषयीच्या माझ्या भावना संमिश्र होत्या. आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी भूदान चळवळीचे प्रणेत, सच्चे गांधीवादी वगैरे असा आदर विनोबांविषयी होता. आणीबाणीचे त्यांनी ‘अनुशासन पर्व’ असे समर्थन केल्यावर आमच्यासारख्या तेव्हाच्या अनेक समाजवादी ‘बालमना’तली त्यांची प्रतिमा मलीन झालेली होती. तरीही नागपूरला आल्यावर बहुसंख्य वेळा विनोबांचा पवनार आश्रम हे बीट माझ्याकडेच आले.
त्याच काळात एकदा पवनार आश्रमामागेच हातभट्टीची दारू कशी खुलेआम विकली जाते, ही बातमी उत्पादन शुल्क खात्याचे तत्कालीन अधीक्षक अनिल पोहेकर या मित्राने, तेथे धाड मारल्यावर मला एकट्यालाच दिलेली होती. दारूबंदीचे टोकाचे समर्थन करणार्या विनोबांच्या आश्रमामागेच दारू मिळते, ही बातमी प्रकाशित झाल्यावर साहजिकच खळबळ माजली. ज्येष्ठ संपादक गोंविदराव तळवलकर यांनी तर संपादकीयामधून या बातमीची नावनिशीवार दखल घेतल्याने जसा अतिशय आनंद झाला, तसा विनोबांवर आणीबाणीचे समर्थन केल्याबद्दल सूड उगवल्याचेही समाधान मिळालेले होते! ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि संपादक, दिवंगत अनंतराव शेवडे यांच्या पत्नी यमूताई शेवडे ‘नागपूर पत्रिका’च्या तत्कालीन मुख्य संपादक होत्या, तसेच कार्यकारी संचालक नरेश गद्रे, संपादक शं. बा. बेदरकर ही सर्व मंडळी विनोबांची भक्त होती.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq
.............................................................................................................................................
१९८२च्या नागपूरच्या प्रसिद्ध थंडीत नोव्हेंबरच्या पाच-सहा तारखेला विनोबा भावे यांनी ‘प्रायोपवेशन’ सुरू केल्याची बातमी आली. प्रायोपवेशन म्हणजे स्वेच्छामरण. त्याला आपल्या देशात तेव्हाही कायदेशीर मान्यता नव्हती. त्यामुळे विनोबांनी अन्नपाण्याचा त्याग करून म्हणजेच प्रायोपवेशन सुरू करून स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यांच्या प्रायोपवेशनाला कुणीही हरकत घेतली नाही, इतके त्यांचे राजकीय वर्तुळातले स्थान मोठे होते. प्रायोपवेशनाची बातमी जाहीर झाली आणि राष्ट्रीय पातळीवर अक्षरशः खळबळ माजली. पवनार आश्रमात २४ तास एक वार्ताहर दोन पाळ्यांत नागपूरच्या जवळ-जवळ सर्वच दैनिकांनी तैनात केला. सडाफटिंग असल्याने अर्थातच रात्रपाळी माझ्या वाट्याला आली. दिवसभर नागपुरात रिर्पोटिंगचं काम करून संध्याकाळी सात-साडेपाच वाजता, कुणाच्या तरी स्कूटरवरून वर्ध्याकडे पवनार आश्रमात जायचे आणि सकाळी सात-साडेसात वाजता परतीचा प्रवास सुरू करायचा, असा क्रम पहिले दोन-तीन दिवस सुरू होता.
युएनआय वृत्तसंस्थेचे नागपूरचे तु. भ. गोल्हर, पीटीआय वृत्तसंस्थेचे एस. एन. दत्ता, तसेच ‘तरुण भारत’चे सुधीर पाठक, ‘लोकमत’चे दत्ता कवीश्वर, युधिष्ठिर जोशी अशी ज्येष्ठ मंडळी रात्री तेथे असायची. पवनार आश्रमाचे नियम मोठे कडक होते. आम्हा पत्रकारांना आतमध्ये प्रवेश नव्हता आणि अगदी आश्रमाबाहेरच्या अर्ध्या-पाऊण किलोमीटर परिसरात धूम्रपान वगैरे तर सोडाच, पण साधा चहाही प्यायला बंदी होती. आश्रमाच्या गेटवर आम्हा पत्रकारांचा घोळका बसलेला असे आणि आळीपाळीने दोघे-तिघे जाऊन पवनार गावच्या एका टपरीवर चहा वगैरे पिऊन येत असत. पत्रकारांना दर तासाने एकदा आश्रमात जाऊन येण्याची परवानगी, काँग्रेसचे तत्कालीन खजिनदार सीताराम केसरी यांनी मिळवून दिलेली होती. विनोबांनी प्रायोपवेशन सुरू केल्यापासून इंदिरा गांधी यांनी केसरींची तेथे नियुक्ती करून टाकलेली होती आणि दर तासा-दीड तासाने केसरी लाइटनिंग कॉल करून फोनवरून गांधींना विनोबांच्या प्रकृतीविषयी माहिती देत असत. दिवसभर आश्रमात एकूणच सन्नाटा असे आणि रात्री तर एकदा प्रार्थना झाली, की हा सन्नाटा आणखीनच गडद होत जात असे. आश्रमातले दिवे अतिशय मंदपणे तेवत या वातावरणाचं गांभीर्य आणखी वाढवत असत. एका कुटीत मंद दिव्याच्या प्रकाशात विनोबा झोपलेले दिसत. अधूनमधून सीताराम केसरींचा फोनवरून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ही शांतता भंग करत असे.
पहिल्या दोन-तीन दिवसांतच एस.एन. दत्तांना आमच्याकडून वार्ताहरांची प्रवास आणि खाण्यापिण्याची आबाळ लक्षात आल्यावर, त्यांनी माहिती आणि जनसंपर्क खात्याची एक गाडी उपलब्ध करवून घेण्यात यश मिळवले. आश्रमातल्या लोकांशी भांडून आश्रमापासून थोड्या दूर अंतरावर चहा आणि पान-बिडीची एक टपरीही सुरू करवून घेतली. पहिल्या दोन-तीन दिवसांनंतर पवनारचा आश्रम एक खूप मोठे न्यूज सेंटर बनला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी येऊन विनोबांना भेटून गेल्या. प्रायेपवेशन सोडावं, अशी विनंती श्रीमती गांधींनी केली. ती अर्थातच विनोबांनी अमान्य केली. महाराष्ट्राचेच नाही तर अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारचे डझनावारी मंत्री, वरिष्ठ अधिकारी, जुन्या पिढीतले गांधीवादी, अशा अनेकांचा राबता पवनार आश्रमात सुरू झाला. हळूहळू विनोबांच्या प्रायोपवेशनाच्या बातमीसोबतच त्यांची दररोजची प्रकृती कशी आहे, महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या लोकांच्या भेटी, त्यांनी विनोबांविषयी व्यक्त केलेल्या भावना, अशा अनेक बातम्यांची जोड मिळाली. प्रत्येक वृत्तपत्राने एका पाळीत दोन-तीन वार्ताहर नेमले. प्रशासनानेही आश्रमाच्या बाहेरच्या मोकळ्या मैदानात एक मोठा तंबू टाकून पत्रकारांना बसण्याची सोय व दोन-तीन दूरध्वनी संचही उपलब्ध करून दिले. आश्रमाकडे वळणार्या मुख्य रस्त्यावरच एक पोलिस चौकीही उभारली गेली .
पाच दिवसांनतर तर हे चित्र आणखी बदलले. आश्रमाचा परिसर गर्दीने अक्षरशः फुलून गेला. नवे-जुने गांधीवादी, आमदार-खासदार, वर्धा जिल्ह्यातले लोक जसे होते, तसेच राज्याच्या आणि देशाच्याही अन्य भागातून येणार्यांची गर्दी वाढू लागली. यात विनोबांचे भक्त जसे होते, तसेच हौशे-नवशे-गवशेही होते. व्यावसायिकांनी रस्त्यालगत तात्पुरती हॉटेल्स उभारून या सर्वांच्या खाण्यापिण्याची सोय केली. दिवसा तर तेथे पानविडीची दुकाने, फुगे-कंगवे, बिस्किटे वगैरे विकणारे स्टॉलही सुरू झाले! नंतर एक-दोन किरकोळ विक्रेत्यांनी सटरफटर वस्तू विकण्याचे स्टॉल सुरू केले. आश्रमात कुटीच्या बाहेरून विनोबांचे दर्शन घेऊन बाहेर पडले की, अशा दुकानांवर खरेदी करणार्यांची संख्या वाढू लागली. त्याचसोबत अशा दुकानांचीही संख्या पुढच्या एक-दोन दिवसांत ५०-६०वर पोहोचली. आश्रमाबाहेरच्या या जागत्या वातावरणामुळे रात्र रटाळ होण्याचे पत्रकारांसाठी टळले. कंटाळा आला की, यापैकी एखाद्या स्टॉलवाल्याला उठवून खाण्या-पिण्याची सोय होऊ लागली. एव्हाना एका वेळी तेथे असणार्या पत्रकारांची संख्याही ५० पेक्षा जास्त झाली. मुंबई-पुणे, दिल्ली, अशा अनेक ठिकाणांहून मोठ्या संख्येने पत्रकार पवनार आश्रमात डेरेदाखल झाले.
एक आठवडा उलटला आणि पवनार आश्रम दिवसा एखाद्या जत्रेपेक्षाही जास्त फुलू लागला, तर रात्री लांबपर्यंत वेगवेगळे तंबू आणि स्टॉलचे मिणमिणारे दिवे, हा परिसर जागा असल्याचे दर्शवत असत. एव्हाना विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशनाचा शेवट काय होणार हे प्रशासनाच्या लक्षात आले होते आणि या परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बॅरिकेड्स उभारणे, रांग सुरळीत राहावी यासाठी लाकडाच्या बल्ल्या रोवून नियोजन करणे, अशा अनेक सोयी करण्यात आल्या. या सर्व सोयी उपलब्ध करताना या परिसरातील हे स्टॉल्स आणखी लांब गेले आणि याच काळात आश्रमातले वातावरणही अधिकाधिक गंभीर होत गेले. तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठेही मग आश्रमातच मुक्कामाला आले. वसंत साठे आल्यावर मात्र पत्रकारांच्या खाण्यापिण्याच्या, बातम्या पाठवण्याच्या, विश्रांतीच्या, अशा अनेक गैरसोयी दूर झाल्या, कारण वसंत साठेंनी त्यात जातीने लक्ष घातलेले होते.
दिवस असेच घाईगर्दीने उलटत होते. पत्रकारांना श्वास घ्यायलाही फुरसत मिळू नये, इतका प्रायोवेशन आणि प्रोयोपवेशनाशी संबंधित बातम्यांच्या मोठा ओघ सुरू झालेला होता. त्यातच दिवाळी आली. नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी सात-साडेसात वाजता विनोबा भावेंच्या प्रकृतीची माहिती आपापल्या वरिष्ठांना देऊन, रात्रपाळीचे पत्रकार नागपूरकडे परतले. आम्ही परतीच्या प्रवासाठी गाडीत बसणार नेमक्या त्याच वेळी युएनआय या वृत्तसंस्थेचे पुण्याचे प्रतिनिधी किरण ठाकूर तेथे आले. प्रायोपवेशनाच्या काळात पहिल्यांदाच ते वर्ध्याला आलेले होते. आमची ओळख झाली. जुजबी बोलणे झाले आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
नागपूरला घरी पोहोचलो तर दूरध्वनी नुसता ठणठणत होता. तो घेतला तेव्हा नरेश गद्रे बोलत होते आणि त्यांनी सांगितले- ‘विनोबा भावे गेले...’ आम्हा सर्व पत्रकारांच्या ९-१० दिवसांच्या अविश्रांत श्रमावर अक्षरशः पाणी पडले. कारण ती बातमी देणारा एकमेव पत्रकार म्हणजे युएनआयचे किरण ठाकूर होते. विनोबा भावेंनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा तेथे किरणशिवाय अन्य कुणीही पत्रकार उपस्थितच नव्हता. एका वेगळ्या अर्थाने ही इव्हेंट कव्हर करणार्या पत्रकारांना अपयशच आलेले होते आणि किरण ठाकूर बाजी मारून गेलेले होते. विनोबा गेल्याची बातमी ऐकल्यावर काही काळ सुन्नपणे बसून राहिलो आणि नंतर त्यांच्या अंत्यक्रियेची बातमी कव्हर करण्यासाठी जसा आलो तसा, टाकोटाक लगेच वर्ध्याकडे रवानाही झालो...
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment