मी प्रचंड आशावादी आहे, कारण माझं भविष्य माझी लेक आहे! एकुलती एक!!
पडघम - बालदिन विशेष
सरफराज अहमद
  • सरफराज अहमद यांची लेक
  • Wed , 14 November 2018
  • पडघम बालदिन Children's Day १४ नोव्हेंबर 14 November सरफराज अहमद Sarfraj Shaikh

जगायचे कोणतेही क्षण व्यवस्थित भरजरी वेष्टनात गुंडाळून ललाटानं माझ्या पदरी टाकले नाहीत. तारुण्यात प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या पेलत तारुण्य अक्षरशः भोगून मोकळा झालो. बालपणात कुटुंब दुभंगलं. मायबाप काय असतात, ते आपल्याला काय देतात ते आजही कळलं नाही. मायबापांनी संस्कार करावेत, त्या वेळी रस्त्यावरचा प्रत्येक जण माझा संस्कारक्षम पालक होता. तंबाखू मळली, गुटखा चघळला, सारे उडाणटप्पू धंदे केले.

२००८च्या डिसेंबर महिन्यात ‘सबम्युकस फायब्रोसिस’ या कधीही न ऐकलेल्या रोगानं आयुष्याचं रूप बदललं. नियती पालकाच्या रूपात उभी राहिली; गुटखा सोडवला, तंबाखूही पळवली. आजारपणाचे चटके सोसत, जगणं मरणाच्या भीतीनं भोगत राहिलो. युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद, ॲलोपॅथी असे वैद्यकीय उपचाराचे सारे प्रकार हाताळून, रुबी हॉस्पिटल ते हिंदुजा रुग्णालय वाऱ्या संपल्यावर रोगानं थोडीशी माघार घेतली. डॉक्टरांनी ‘तू आता बरा झालायस’ म्हणून दिलासा दिला. मित्रांनी आणि नातेवाइकांनी माझ्या लग्नाचा घाट घातला. ‘‘आता बरा झालायस, किती दिवस भटकणार!’’ असे सल्ले अखेर गळी उतरवण्यात त्यांना २०१२ साली यश आलं.

लग्नाआधी इतिहासाविषयी सुरू असलेलं संशोधन कौटुंबिक स्थैर्य मिळाल्यानं पुन्हा सुरू केलं२०१३ च्या मध्यात पुन्हा ‘सबम्युकस फायब्रोसिस’नं आघाडी उघडली. आणि तो दर्द सहन करत असतानाच ‘तिचा’ जन्म झाला, माझ्या लेकीचा- मारियाचा. बाप होणं काय असतं, हे तेव्हा कळलं नाही. रोगाचा दर्द वाढला होता. वाटायचं मुलगा होईल. ‘सबम्युकस’नं सोबत नेलं तरी निदान कोणताही आधार नसणाऱ्या पत्नीला मुलगा सांभाळेल. पण मारियानं जन्म घेतला. निराशा बायकोसमोर दाखवायची नाही, म्हणून आनंदाचं उसणं आवसाण आणून अक्षरशः नातेवाईकांवर मिठाईचा भडीमार केला. ती वाढत होती. आणि आजारपणही.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

तिचा पहिला जन्मदिवस आजारपणाच्या फेऱ्यात कधी आला आणि गेला कळलं नाही. ती मोठी होत होती. डॉक्टरांनी सांगितलं, ‘‘ऑपरेशन करा’’. पण सबम्युकस फायब्रोसिसमध्ये ऑपरेशन धोक्याचं असतं, हे अर्धवट डॉक्टरांनी निर्माण केलेलं भय मनात घर करून होतं. म्हटलं ऑपरेशनला सामोरं जाण्यापूर्वी, टिपू सुलतानचा ग्रंथप्रकल्प पूर्ण करूया.

एकापाठोपाठ आलेल्या संकटामुळे आणि महत्त्वाकांक्षेपोटी तिला खेळणी देण्याच्या काळात, मी तिच्या पदरी तडजोड टाकली. अखेर त्या ग्रंथप्रकल्पाला पूर्णत्व आलं. मग ऑपरेशनच्या अपरिहार्यतेतून जायचं ठरवलं. सोलापूरच्या केळकर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या सर्व तपासण्या तिच्या कोमल आणि मजबूत हातांनी दिलेल्या धैर्यानं त्रासदायी वाटल्या नाहीत. साऱ्या रुग्णालयात गंभीर चेहरे घेऊन बसलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या बाजारात आम्हा बाप-लेकींचा खेळ रंगायचा. घराच्या पटांगणाऐवजी रुग्णालयात सुरू असलेल्या या खेळाच्या धुंदीत ऑपरेशनचा दिवस उजाडला. सकाळी मारिया सोबतच होती. ऑपरेशनची वेळ जवळ आली, तेव्हा तिला नातेवाईकांच्या हवाली करून मी आणि बायकोनं नियतीचा सामना केला. ऑपरेशन थिएटरमध्ये चालतच गेलो. ऑपरेशन बेडवर  झोपलो. डॉक्टारांनी भूल दिली. डोळ्यांसमोरचा  अंधार गडद झाला. शरीर डॉक्टरांच्या हवाली करून अंधाराच्या काळ्याशार डोहात शुद्ध हरपली. डोळे अर्धवट उघडले, तेव्हा कुणीतरी उचलून कॉटवर झोपवत होतं. ..आणि तेव्हा मी म्हणालो ‘‘मारिया कहाँ है?’’

तोंडातून रक्त येत होतं. डॉक्टर आणि नातेवाईकांनी म्हटलं तोंड उघडू नको. तेव्हा माझ्यापेक्षा माझ्यातल्या तिच्या बापाला माझं जगणं महत्त्वाचं होतं. तिच्यासाठी, तिचं जगणं पाहण्यासाठी, तिला नियततीच्या कराळ, विक्राळ जबड्यात टाकून माघार न घेण्यासाठी.

रुग्णालयातून सुट्टी मिळाली. घरी कुणीच नाही, तेव्हा नातलगांनी माझा मुक्काम त्यांच्याकडे हलवला. घरी आल्यानंतरही दोन दिवस तोंडातून रक्त येतच होतं. नेहमी अंगाखांद्यावर खेळणारी ती एक क्षणभरही माझ्याजवळ आली नाही. इवलंसं ते लेकरू आपल्या बापाला काहीतरी झालंय, या भीतीनं आईच्या कुशीत लपत होतं.

कालांतरानं बरा झालो. माझ्या टिपू सुलतानाच्या पुस्तकाला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्या काळात टिपू सुलतान हे इतिहासातलं पात्र माझ्या घरातलं सदस्य बनलं होतं. पुढे कुठेही फिरायला गेलो, टिपू सुलतानचे फोटो दिसले की माझी मुलगी ‘अब्बू पोटू सुलतान’ असं विचित्र शब्द उच्चारून आपण आपल्या बापाच्या जगण्याची किती दखल घेतो, याची जाणीव करून द्यायची.

माझ्याशी  संबंधित असणाऱ्या प्रत्येक गोष्टींच्या ती नोंदी ठेवते. तिची ही नोंदवही मात्र मला कुठेच दिसत नाही. माझ्या आजारपणात माझी औषधं, त्याच्या रिकाम्या बाटल्या ही तिच्या खेळण्याची साधनं होती. आता थोडं आर्थिक स्थैर्य आलं आहे. मात्र फिरणं वाढलं. पण मी प्रवासात गेलो की, रोज तिचे पाच-सहा फोन असतात. पहिला प्रश्न असतो ‘अब्बु क्या कररे?’ आणि दुसरा ‘कब आरे?’ आणि यानंतर गावावरून परतताना काय आणायचं याची यादी सादर होते. आता मीदेखील ठरवलं आहे- तिला खेळणी म्हणून आपल्या औषधांच्या बाटल्या कधी द्यायच्या नाहीत. म्हणून जाईल तिथून एखादं तरी खेळणं आणि तिचे दात खराब झाले तरी मिठाया आणतो. एखाद्या  सुखवस्तू घरात जितकी खेळणी असावीत त्याहून आधिक माझ्या मुलीकडे आहेत! पुस्तकांच्या वाढत्या संग्रहासोबत माझ्या घरात खेळण्यांचं कपाट भरत चाललं आहे. कुठेही गेलो की, मी आता स्वतःला जपायला लागलोय. डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य स्वतःच काटेकोरपणे पाळतोय. कारण तिच्या असण्याचा भास मला सातत्यानं होत राहतो. काहीही झालं तरी आपल्या ललाटी आलेलं जगणं तिच्या पदरी टाकायचं नाही, याचा ठाम निश्चय केलाय. पाहूया काय होतंय ते…

हे सारं घडताना मी प्रचंड आशावादी आहे, कारण माझं भविष्य माझी लेक आहे. एकुलती एक!

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक सरफराज अहमद हे इतिहास संशोधक आणि टिपू सुलतानचे गाढे अभ्यासक आहेत.

sarfraj.ars@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......