अजूनकाही
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक आनंदाचं झाड असतं. त्या झाडाच्या सहवासात गेल्यावर मन मोहरून जातं. कितीही दुःख, कितीही कष्ट, कितीही वेदना असल्या, तरी त्या झाडाच्या छायेत सगळं काही विसरायला होतं; एक नवी ऊर्जा अंगात संचारते. पुढच्या खडतर प्रवासासाठी बळ देण्याचं काम हे झाड सातत्यानं करत असतं. माझ्यासाठी माझी मुलगी ‘बेनझीर’ हे असं आनंदाचं झाड आहे. जेमतेम अडीच वर्षांची ही पोर; नैसर्गिक अंतःप्रेरणा सोडता कृत्रिम जगण्याचा कसलाच स्पर्श न झालेली निरागस परी; आपल्याच विश्वात हरवलेली! बेभानपणे वाट्टेल ते करणाऱ्या या अवखळ पोरीनं आमचंही आयुष्य समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवलं आहे.
‘तिचं नाव ‘बेनझीर’ का ठेवलं?’ असं मला अनेक जण विचारतात. मुळात हे नाव खूप विचारपूर्वक ठेवलं आहे. बेनझीर हे अर्थपूर्ण नाव आहे. बेनझीर म्हणजे Incomparable, matchless, peerless, unsurpassed, unique. मराठीत सांगायचं तर अतुलनीय, अनुपमेय, एकमेवाद्वितीय. हे नाव मूळ अरेबिक आहे; तितकंसं लोकप्रिय नाही. ‘बे’ हा उपसर्ग उर्दू, पर्शियन या भाषांमध्ये एखादी गोष्ट खोडून काढायला आणि वर्चस्व निदर्शक म्हणून वापरतात. उदा. बेमिसाल, बेशक, बेहद इ. एखाद्या गोष्टीच्या पलीकडची, म्हणून तुलनेच्या पलीकडली ती ‘बेनझीर’!
दुसरी गोष्ट म्हणजे, आमच्या घरात जात-धर्म मानणं तर सोडाच, पण कागदोपत्रीदेखील कुणालाच जात किंवा धर्म नाही. माझा मुलगा निसर्गच्या शाळेच्या दाखल्यावरदेखील जात आणि धर्म यांच्या जागी ‘मानवता’ असंच लिहिलं आहे. आपण जातीपाती मोडण्याच्या खूप गप्पा करतो; मात्र संधी असेल तेव्हा ही गोष्ट कृतीतूनही दिसली पाहिजे, असं मला वाटतं. या निमित्तानं मला संधी मिळाली आणि मी हे नाव ठेवलं, एवढंच.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq
.............................................................................................................................................
तर सतत घाईत असणारी ही मुलगी जन्माला आली तीदेखील अशीच गडबडीत. जग पाहण्याची तिला कसली घाई झाली होती काय माहीत! एक महिना आधीच काही चाचण्या केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, ‘लगेच डिलिव्हरी करावी लागेल, कारण आत बाळाची वाढच होत नाही, पण डिलिव्हरीनंतर काय होईल, याची काहीच खात्री देता येत नाही’. त्यांच्या या सांगण्यानं सर्व जण एकदम निराश झाले. अचानक हे काय झालं होतं, ते कुणालाच कळेना. मी मात्र त्या वेळीदेखील शांत होतो आणि सर्वांना सांगत होतो की, ‘‘काहीही होणार नाही. मला मुलगी होणार आहे आणि ती ठणठणीत असेल!’’. मुलगी व्हावी, ही आम्हा दोघांचीही तीव्र इच्छा होती. त्या आठ महिन्यांमध्ये हा विश्वास इतका दांडगा झाला होता की, मुलगी होणार असल्याचं आम्ही गृहीतच धरलं होतं. नाजूक अवस्थेत जन्माला येणाऱ्या मुली मुलांपेक्षा चिवट असतात आणि त्यांची पुढे लवकर वाढ होते, असं मी कुठेतरी वाचलं होतं. ‘मुलगी असेल, तर वाचण्याची शक्यता अधिक आहे’, असं डॉक्टरांनीही सांगितलं होतं. झालंही तसंच. अवघ्या अकराशे ग्रॅम वजनाचा हा जीव जन्माला आला. माझ्या तर आनंदाला पारावार नव्हता. अवघे काही क्षण मला दाखवून डॉक्टरांनी तिची रवानगी थेट एनआयसीयूमध्ये केली. दुसऱ्या दिवशी फक्त मला एकट्याला आत सोडण्यात आलं. तो क्षण मला अजूनही जशाचा तसा आठवतो. मी आत एनआयसीयूमध्ये गेलो. तिथं एका रांगेत आठ ते दहा बाळं होती. तितक्यात एका बाळानं जोरात पाय हलवले आणि ते रडायला लागलं. माझ्यासोबत असलेली नर्स हसून म्हणाली, ‘‘बघा! बाबा आल्याचं मुलीला बरोबर कळलं! तीच तुमची मुलगी.’’ मी एकदम शहारून गेलो. तो क्षण आमच्या नात्याचा श्रीगणेशा होता. तिथून एका हळुवार नात्याची वीण गुंफायला सुरुवात झाली. गेली अडीच वर्षं ही वीण अधिकाधिक घट्ट होते आहे.
बेनझीरसहित आम्ही घरात पाच माणसं आहोत. यांपैकी आई, मोठा मुलगा निसर्ग, माझी आई आणि तिची आजी आणि मी या सर्वांशी असणारं बेनझीरचं नातं वेगवेगळं आहे. या नात्याचं वैविध्य तिला अनुभवातून आपोआप कळलं आहे. त्यामुळे ती प्रत्येकाशी वेगवेगळ्या प्रकारे बांधली गेली आहे. अर्थात, यात ती सर्वांत जास्त जवळ आहे, तिच्या आईसोबत. आईशिवाय एक क्षणही राहण्याची कल्पना तिला सहन होत नाही. आई हाच प्रत्येक मुलाच्या जगण्याचा मूळ आधार असतो, हे इथंही खरं आहे.
सातत्यानं दंगा करायला, वाद घालायला, भांडायला बेनझीरला भाऊ लागतो, तर कुणी रागावलं की, धावत जाऊन आजीच्या पदराखाली निश्चिंत लपता येतं. ती कुणाकडून शिकलीये माहीत नाही, पण कधीकधी जास्तच मूडमध्ये असली की, ती आजीला हळूच ‘‘ये बुढी’’ म्हणून पळून जाते आणि लगेच कानाला हात लावत परत येत, ‘‘सॉरी, बुढी नाही म्हणायचं, माय म्हणायचं’’, असं म्हणत आजीच्या कुशीत शिरते. बाबा मात्र तिच्या सर्व इच्छा-आकांक्षा पुरवण्याचं हक्काचं ठिकाण आहे. तिच्यासाठी मी काय आहे, हे मला अजूनही नीटसं उमगलेलं नाही. मात्र माझ्यासाठी ती सर्वस्व आहे, हे मात्र मी निश्चित सांगू शकतो. हे नातं निव्वळ जैविक नाही, तर त्याला भावनिकतेचे अनेक पदर जोडले गेले आहेत.
मुलांच्या संगोपनाबद्दल माझ्या काही कल्पना आहेत. त्यांच्या वाढीत नैसर्गिक प्रेरणाच मध्यवर्ती असाव्यात, असं मला वाटतं. बालपणातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद त्यांना घेता यावा. खरं तर आपल्याला उगाच वाटत राहतं की, आपण त्यांना वाढवतो; वास्तविक असं काही नसतं. कुठलंही मूल नैसर्गिक वाढीचं अहर्निश वरदान घेऊनच जन्माला येतं. आपण फार तर एक छोटीशी सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून भूमिका बजावू शकतो. आमच्या आशा, अपेक्षा आणि गरजा यांप्रमाणे मुलांना आकार देण्याची भूमिका आम्ही कधीच घेत नाही.
या इवल्याशा जिवाकडेही एक महाशक्तिशाली मेंदू असतोच की! लहान मुलं जन्मतःच प्रतिभावंत असतात, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. त्यामुळे त्यांना आंतरिक उर्मीनं फुलू देणं महत्त्वाचं आहे. शिकल्याशिवाय मूल राहूच शकत नाही. सतत शिकत राहणं, ही त्याची सहजप्रवृत्ती असते. बेनझीरच्या बाबतीतदेखील आम्ही असंच करतो. तिची जास्तीत जास्त ऊर्जा कशी वापरता येईल, यासाठी आम्ही पडद्यामागून काम करत राहतो. त्याचे परिणामदेखील लगेच दिसून येतात.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
मुलं अनुकरणप्रिय असतात, या गोष्टीचा आम्ही खूप फायदा घेतो. म्हणून त्यांनी ज्या गोष्टी कराव्यात, असं आम्हाला वाटतं, त्या आधी आम्ही करतो. आपल्याला पाहून मुलं आपसूकच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करायला लागतात. मग ते सकाळी उठून आधी ब्रश करणं असो की जेवल्यानंतर स्वतःचं ताट उचलून ठेवणं असो. मुलांना जास्तीत जास्त अनुभव कसे देता येतील, यासाठी मी सतत प्रयत्न करत राहतो.
बेनझीर लहान असल्यापासून मी हे प्रयोग केले. तिला वेगवेगळे रंग, गंध, वेगवेगळ्या चवी यांची जाणीव करून देत राहिलो. आता तिला सगळे रंग बऱ्यापैकी कळतात. अनेकदा तिला घेऊन मी बाजारात फिरत असतो. तिथल्या वेगवेगळ्या भाज्या, फळं ती मनात साठवत असते. दिवसातला किमान एक तास तरी आम्ही एकत्र खेळतो. सुदैवानं माझं शासकीय घर मोठं आहे आणि त्याला स्वतंत्र गार्डनपण आहे. त्यामुळे शहरात असूनही एक वेगळंच नैसर्गिक वातावरण भोवती असतं. आमचं गार्डन हे तर आमचं हक्काचं ठिकाण! सुट्टीचा दिवस आम्ही बराच वेळ इथंच घालवतो. गार्डनमधली काही झाडं बेनझीरच्या आणि काही निसर्गच्या हातानं लावलेली आहेत. त्या झाडांची देखभाल ते दोघंही मनापासून करतात. मी घरी नसताना आई किंवा आजीसोबत जाऊन त्या झाडांचं निरीक्षण करत बसतात. संध्याकाळी ऑफिस संपल्यावर आम्ही न चुकता घराच्या परिसरात सायकलिंग करतो. बेनझीरपण आपली इवलीशी सायकल घेऊन आमच्यासोबत खेळत असते.
रोज रात्री झोपताना मी निसर्गला एक गोष्ट सांगतो. दुसऱ्या दिवशी आधी त्यानं आदल्या दिवशीची गोष्ट सांगायची, मग मी दुसरी नवीन गोष्ट सांगणार असा आमचा नित्यक्रम आहे. आता बेनझीरलापण गोष्टींमधलं थोडंसं का होईना, हळूहळू कळायला लागलं आहे. सातत्यानं बडबड करत राहणं, ही तिची सवय. ही बडबड निरर्थक होऊ नये म्हणून आम्ही नवनवीन शब्द तिला कसे उमगत जातील, असा प्रयत्न करत असतो. ती इतकी चंचल आहे की, एके ठिकाणी पाच मिनिटं शांत बसलेलं मी तिला अजून पाहिलेलं नाही. सतत काहीतरी खटपटी करत राहणं, घरभर फिरत राहणं आणि दंगा करत राहणं हेच तिला माहीत आहे. दररोज किमान एक वेळ तरी मला तिला बाहेर (तिच्या भाषेत भुर्रर्र) न्यावं लागतं. त्यासाठी चालणारी तिची लाडीगोडी पाहणं हा एक भन्नाट अनुभव असतो. बाहेर जाण्याच्या अटीवर आम्ही तिच्याकडून कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकतो, इतकं बाहेर फिरायचं तिला वेड आहे.
घरात लेक असणं, ही भावनाच मुळात काव्यमय आहे. तिच्या निरागस भावविश्वात चाललेल्या अनेक अतर्क्य गोष्टी अनुभवताना आपण समृद्ध होत जातो. एकूणच ‘बेनझीरचं असणं’ हे आमच्या कुटुंबासाठी वरदान ठरलं आहे. सातत्यानं हसत-खेळत-बागडत राहणारा हा इवलासा जीव आयुष्य सुगंधित करतो आहे. रोज घरात पाऊल टाकताना ‘ती काय करत असेल?’ अशी कल्पना सर्वांत आधी मनात येते. तिचा स्पर्श ही जगातली सर्वांत सुंदर गोष्ट आहे. कुणी रागावल्यावर धावत येऊन तिचं मला बिलगणं हे कुठल्याच शब्दांत मांडता येत नाही. खलील जिब्रान म्हणतो त्याप्रमाणे ‘आपली मुलं पालक म्हणून आपल्याला घडवत असतात’. मलाही सक्रिय आणि सर्जनशील ठेवण्यात बेनझीरचा मोठा वाटा आहे. ‘ती आपल्या भोवताली आहे’, या विलक्षण आनंदात माझी सकाळ सुरू होते आणि ‘ती शांतपणे झोपेच्या अधीन गेलेली आहे’, हे पाहतच मी रोज झोपतो.
.............................................................................................................................................
‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक किरण केंद्रे हे ‘किशोर’ या बालभारती (पुणे)च्या वतीने प्रकाशित होणाऱ्या मुलांच्या मासिकाचे संपादक आहेत.
kendrekiran@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment