कुणीच काही बोलत नव्हतं. पण प्रत्येकाच्या नजरेतून जाणवतं होतं. लग्नाला सात-आठ वर्षं उलटून गेली. घरात अजून आनंदवार्ता नाही? बरं लग्नाचं म्हणावं तर, तेव्हाही माझ्या अटी होत्याच. लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं कुठलाही विधी न करता होईल. कुठलाही व्यवहार तर सोडाच पण मांडवात किंवा मंगल कार्यालयात लग्न होणार नाही. विवाह नोंदणी अर्जाचा खर्च तेवढा ग्राह्य असेल. दोघांनाही नोकरी असल्यामुळे मुलीनं स्वतःच्या आवडीचे कपडे स्वतः घ्यावेत. त्याचप्रमाणे मुलानंही हवे तसे कपडे स्वतः घ्यावेत. पारंपरिक कुटुंबात हे अवघड होतं. पण मोठ्या मनानं सगळ्यांनी संमती दिली. शेवटी जसं ठरवलं तसंच लग्न केलं/झालं. मग आता आपत्याच्या बाबतीत काही वेगळा विचार असेल, असं समजून कोणी या विषयावर बोलायचं नाही. किंवा काही विषयाबद्दल प्रचंड उत्कंठा असते. पण शक्यतो त्या विषयावर प्रत्यक्ष बोललं जात नाही. माघारी मात्र अशा विषयावर बरंच बोललं जातं. त्यातल्या त्यात बायकांमध्ये असे विषय चवीनं चघळले जातात.
आम्ही दोघं मात्र मास्तरकीत मग्न होतो. शिवाय लग्न झाल्यानंतर बायकोनं म्हणजे ऊर्मिलानं बी.ए. पूर्ण केलं. तिला एम.ए. करायचं होतं. तिचं आधी डी.एड. झालेलं होतं. माझंही पीएच.डी.चं काम अनेक वर्षांपासून रेंगाळलेलं होतं. महाविद्यालयात शिकवण्याशिवाय अनेक उपक्रमांत चांगलाच रमलो होतो. त्यामुळे अपत्याचा विचार आमच्या डोक्यात आलेला नव्हता. माझा जनसंपर्क चांगला असल्यामुळे घरी सारखी वर्दळ असे. बरेचदा गप्पा मारायला विद्यार्थीही येत. आलेल्यांचं अगत्यानं चहापाणी करून ऊर्मिला स्वतःच्या कामाला लागे किंवा झोपी जाई. कारण रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगलेल्या असत.
एकदा तर शाहीर आलेले. चहापाणी झालं. शाहिरांची कवन रंगात आली होती. मलाही झोप येत होती. शाहीर मात्र ऐकवत होते. उर्मिलाची एक झोप होऊन ती बाहेर हॉलमध्ये येऊन पाहतेय तर, मी चक्क डुलक्या घेत होतो आणि शाहीर मात्र गातच होते. सकाळी लवकर उठून, स्वयंपाक उरकून तिला शाळा गाठायची असे. मलाही सकाळी कॉलेजात जायचं असे. त्यामुळे रात्री लवकर निजानिज होई. रात्री गप्पा रंगल्या की, झोपायला उशीर व्हायचा.
मी नाट्य चळवळीत होतो. एकांकिका स्पर्धा, नाटकाच्या तालमी, नाटकं पाहण्यासाठी औरंगाबादहून मुंबई-पुण्याला जाणं. नाटकवाल्या मित्रांसोबत भटकणं. दिवसभर प्रचंड चहा पिणं. गप्पांचे फड असा माहोल होता. ऊर्मिलाला मात्र अशा वातावरणाचा परिचय नव्हता. अशात एक नाटकवाला ग्रुप रात्री अचानक टपकला. एकांकिका स्पर्धेत बक्षिसं मिळवून वापस निघाले होते. सात-आठ मित्र-मैत्रिणी होत्या. सगळे भुकेले होते. या मित्रांनीच खिचडीची फर्माइश केली. तीन कुकर भरून खिचडी तयार झाली. मंडळी मनसोक्त जेवली. सकाळी आल्या वाटे निघूनही गेली. असे कलंदर लोक ऊर्मिलासाठी नवीन होते. घरात येणार-जाणाऱ्यांची वर्दळ होती.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. तिथं घरमालकाची ऋतुजा नावाची दोन वर्षांची मुलगी होती. या मुलीची माझ्याशी चांगलीच गट्टी जमली. ऊर्मिलाची शाळा सुटून तिला घरी यायला संध्याकाळचे पाच वाजत. मी मात्र दुपारी दीड-दोन वाजता कॉलेजातून घरी येई. ऋतुजा माझी वाटच पाहत असे. मी कुलूप उघडून घरात आलो की, मागोमाग ऋतुजा यायची. या चिमुरडीमुळे घरातलं वातावरण खेळकर होऊ लागलं. दुपारी मी घरी असल्यामुळे तिच्याशी चांगलीच गट्टी झाली. या अनुभवावर पुढे मी कविता लिहिली. ‘मौज’ दिवाळी अंकात छापून आलेली ही कविता माझ्या ‘तत्पूर्वी’ कवितासंग्रहात ‘कुरळ्या केसांची छोटी मुलगी’ अशा शीर्षकानं आलेली आहे. त्यातला काही भाग-
‘आल्याबरोबर तातडीने
तिला फोनवर असतं बोलायचं,
टेबलावर दिसतात खूप पेन्स
पण पेनला हात लावायची
नाही परवानगी म्हणून
ती काचेच्या टिपॉयवर ओणवी होऊन
न्याहाळते स्वतःचा चेहरा
(कधी स्वतःच्या प्रतिबिंबाची घेते पप्पी)
कोपऱ्यातल्या घालून चपला
फरकते घरभर
अंग चोरून उभ्या झाडांची पानं
कधी तिच्या लागतात हाती,
मधेच तिला आठवतो
बिस्किटांचा डबा
काही बिस्किटं खाण्यासाठी
काही खराब करण्यासाठी
लागतातच तिला द्यावी
माझी नक्कल करताना
तीही हातात पेपर घेऊन
टेकते लोडाला
तिचं वाचन चित्रलिपीतलं
म्हणजे फोटोत मुलगी दिसली
की दीदी
बाई = मम्मी
पुरुष = मामा
आणि कुठलंही वाहन दिसलं की
पमपम
एवढ्या तुटपुंज्या भाषेत
गुंडाळते ती अवघा पेपर’
शेजारच्या लहान मुली रमण्याची एक परंपराच आमच्याकडं आहे. मोठ्या भावाकडेही शेजारच्या हिंदी भाषिक कुटुंबातील छोटी मुलगी मुक्कामालाच असे. गाढ झोपल्यावर रात्री ११-१२ वाजता तिची आई तिला घेऊन जाई. ऋतुजाही आमच्या घरात मस्त रमली होती. ऋतुजासाठी वडिलांनी खाऊ आणला की, आधी तो खाऊ घेऊन ती आमच्याकडे यायची.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पुढे आम्ही भाड्याच्या घरातून स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेलो. तिथं ऋतुजाची जागा शेजारच्या श्रेयानं घेतली. तीन वर्षांची श्रेया आमच्या घरातली सदस्यच झाली. शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या श्रेयाला आमच्या घरी राहायला खूप आवडे. संध्याकाळचं तिचं जेवण हमखास आमच्याकडेच असे. तेही माझ्या ताटातच. आमच्या घरी कुणी आलं तर त्यांना पाणी देण्याचं कामही श्रेया करू लागली. श्रेयाचा आमच्या घरातील एकंदर वावर बघून ती आमचीच मुलगी आहे असं वाटायचं. एक-दोनदा तर बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांनी श्रेयाला आमचीच मुलगी समजून निघताना पैसे दिले. आम्हीही खुलासा केला नाही. बऱ्याचदा श्रेयाची आई तिला घ्यायला येई, तर श्रेया जायला तयार नसे. कधी तरी रात्री झोपल्यावर तिला तिच्या घरी आम्ही अलगद उचलून नेत असू.
ऋतुजा व श्रेयामुळे आमच्या घराला लहान मुलांची चांगली सवय झाली. घरातली रचनाही बदलली होती. काही नाजूक वस्तू लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत अशाच ठेवल्या जाऊ लागल्या. पाणी प्यायचा छोटा ग्लास असे. घरात बिस्किटांचा भरपूर स्टॉक असे. हव्या असलेल्या मुलाच्या हव्यासापोटी मुलींचे हे लाड नक्कीच नव्हते. किंवा अपत्याच्या रितेपणातून हा मुलींचा लळा लागणं वगैरे प्रकारही नव्हता. कुणी बोलत नव्हतं. पण लोक काय विचार करत होते, कोण जाणे!
एकदा एक कौटुंबिक मित्र ‘महत्त्वाचं बोलायचंय’ म्हणून घरी आला. सगळ्या जगाच्या गप्पा मारत होता, पण महत्त्वाचं बोलतच नव्हता. ऊर्मिला चहा करायला म्हणून किचनमध्ये गेली. तेव्हा मित्रानं महत्त्वाचं बोलणं सुरू केलं. म्हणजे ऊर्मिलाच्या समोर त्याला बोलणं प्रशस्त वाटत नव्हतं. थोड्या वेळात बरंच काही बोलून झाल्यावर मित्र शांत झाला. त्याची तळमळ, आत्मीयता त्याच्या बोलण्यातून जाणवत होती. कुठल्या तरी महाराजांना आम्ही भेटावं, त्यांच्या सूचनांचा, व्रताचा अवलंब करावा. जेणेकरून संतती प्राप्त होणार होती. मित्राला नम्रपणे ठाम नकार मी दिला. अशा गोष्टीवर आमचा मुळीच विश्वास नव्हता. मित्राच्या भावना मी समजू शकत होतो, पण स्वीकारू शकत नव्हतो.
घरात बिस्किटांचा स्टॉक केला म्हणजे पालक होण्याची तयारी झाली, एवढ सोपं असतं का आई-बाबा होणं? पालक होण्यासाठीची आम्हा दोघांची मानसिक तयारीच नव्हती, हे खरं कारण होतं. त्यात पुन्हा ऊर्मिलाचा थायरॉईडचा त्रास वाढलेला होता. ट्रीटमेंट सुरू होती. थॉयरॉईड प्रभावी असण्याच्या काळात गर्भधारणा झाली तर जन्मणारं बाळ व्यवस्थित नसतं, असं वाचनात, ऐकण्यात आलेलं होतं. ती जोखीम आम्हाला पत्करायची नव्हती. अपत्य या विषयावर आम्हाला घरचं कोणी बोलत नव्हतं. पण त्यांना अनेक जण बोलत असणार. दिवस मजेत जात होते. अशात एक दिवस ऊर्मिलानं ती वार्ता (जिला एरवी ‘आनंदवार्ता’ म्हणतात) मला सांगितली. कसं व्यक्त व्हावं मला कळेना. सांगताना तिचा स्वरही जरा त्रासिक होता. शेवटी या वार्तेचं रूपांतर ‘आनंदवार्ते’त करण्याचा निश्चय आम्ही केला. आणि एक नवा अध्याय सुरू झाला.
दासू वैद्य मुलीसह
जालन्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी झाली. सर्व काही व्यवस्थित होतं. पण एकदा औरंगाबादला इंडोक्राईन स्पेशालिस्टचा सल्ला घ्यावा असं सांगण्यात आलं. आम्ही औरंगाबादला येऊन तज्ज्ञ डॉक्टरांना येऊन भेटलो. डॉक्टरांच्या पुढ्यात आम्ही दोघं बसलेलो. डॉक्टरांनी जुनं प्रिसक्रिप्शन्स, रिपोर्टस पाहिले आणि फाडफाड बोलायला सुरुवात केली. आमच्या सुशिक्षितपणावरच त्यांनी पहिला ठपका ठेवला. थायरॉईड प्रभावी असताना गर्भधारणा होऊ देणं हे कसं मूर्खपणाचं आहे, त्यातून जन्मणारं अपत्य मतिमंद जन्मू शकतं, अशी रिस्क घेता कामा नये, असे डोस पाजून डॉक्टरांनी चक्क अॅबार्शनचा सल्ला कागदावर लिहून दिला. ऊर्मिलाला धरून मी बाहेर आणलं. ती एकही शब्द बोलत नव्हती.
लग्नानंतर अकरा वर्षांनी लेकराची चाहूल लागलेली आणि डॉक्टर कठोर शब्दांत त्या चाहुलीचं अस्तित्वच नाकारतात. डॉक्टरांनी एवढे कठोर शब्द ऊर्मिलापुढे तरी वापरायला नको होते. कुठली आई हे स्वीकारू शकते? ऊर्मिला नुस्ती मूक झाली नव्हती, तर बधीर झाली होती. काय निर्णय घ्यावा? ऊर्मिलाला कसं समजवावं? मला काही सूचेना. फक्त एक चांगली गोष्ट डोक्यात आली. ती म्हणजे डॉक्टर मित्र सुहास जेवळीकरांना फोन केला. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी ताबडतोब घरी बोलावलं. आम्ही त्यांच्या घरी पोचलो. जेवळीकर आणि वहिनी दोघंही डॉक्टर. माझे जुने स्नेही. वैद्यकीय क्षेत्रातली आमची कुठलीही समस्या त्यांच्यामुळे सोपी होते. गेल्याबरोबर त्या ‘तज्ज्ञ’ डॉक्टराच्या मूर्खपणाचे अनेक किस्से त्यांनी आम्हाला सांगितले. पण त्या तज्ज्ञ डॉक्टराच्या मूर्खपणापेक्षा आमच्या डोक्यात घुसलेली शंका त्रासदायक होती.
डॉ. जेवळीकर एका डॉक्टराशी बोलले. या होत्या डॉ. मंजू जीला. मराठवाड्यातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी त्यांच्याकडे जन्मली होती. आम्ही जीला मॅडमकडे पोचलो. मॅडमनी ऊर्मिलाला तपासलं. सोनोग्राफी केली. अॅबार्शनचा सल्ला देणारे डॉक्टर वयानं आणि ज्ञानानं कसे जुनाट झाले आहेत ते सांगितलं. थायरॉईड व प्रेग्नसीबद्दल ताजे संदर्भ नेटरवर दाखवले. तरीही मी मॅडमशी स्पष्ट बोललो- व्यवस्थित वाढ न झालेलं अपत्य आम्हाला नकोय. यावर मॅडमनी बेबी व्यवस्थित असल्याची खात्री दिली. फक्त दर महिन्याला तपासणीसाठी येण्यास सांगितलं. बऱ्यापैकी आश्वस्थ होऊन आम्ही जालन्याला परतलो. ऊर्मिलालाही जीला मॅडममुळे विश्वास प्राप्त झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेणं सुरू होतं.
गावातच ऊर्मिलाची आई असल्यामुळे मला जास्त काळजी नव्हती. डॉक्टरांचा सल्ला, आयुर्वेदिक उपाय, शास्त्रीय संगीताची श्रवणभक्ती असं सारं काही नीट सुरू होतं. माझ्या अंतरमनात मात्र ‘तज्ज्ञ’ डॉक्टरांची आशंका घट्ट रुतली होती. वरकरणी मी समजावणीचं बोलायचो, पण आतून हादरलेलो होतो. समजा जन्मलेलं मूल व्यवस्थित नसेल तर? मतिमंद मूल असलेलं कुटुंब आठवे. जयवंत दळवीचं ‘नातीगोती’ नाटक, त्यातला ‘बच्चू’ डोळ्यापुढे येई. रात्री झोपीतून दचकून उठायचो. घामाघूम झालेला असे. याबद्दल घरात कुणाशी चर्चा करणंही शक्य नव्हतं. तीनेक महिने औरंगाबादला जीला मॅडमकडे तपासणीसाठी गेलो. बाळाची वाढ उत्तम असल्यामुळे जीला मॅडमनी जालन्याच्या डॉक्टरकडे रेफर केलं. जीला मॅडम आणि सुभेदार मॅडम मैत्रिणी होत्या. कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांचे सुभेदार हे नातेवाईक होते. मागे कधी तरी कवठेकर सरांबरोबर मी डॉ. सुभेदार डॉक्टरांच्या घरीही गेलेलो होतो. एरवीही छोट्या गावात तसे परिचय असतातच. सुभेदार डॉक्टर सोनोग्राफी करून रिपोर्ट द्यायचे. मी त्यांना असंख्य प्रश्न विचारायचो. तेही माझ्या शंकांचं समाधान करायचे. मुलगा की मुलगी हे जाणून घेण्याची आम्हाला मुळीच इच्छा नव्हती. फक्त होणारं अपत्य व्यवस्थित असावं एवढीच अपेक्षा होती. त्याकरिता अनेक टेस्ट केल्या गेल्या. अनेकाचं ओपेनियन घेतलं गेलं. जन्मणाऱ्या बाळाचा ओठ तुटका तर नाही ना, याचीही एक टेस्ट असते. तीसुद्धा करण्यात आली. पोटात लाथा मारणारं हे बाळ कधी एकदा बाहेर येतं असं झालं होतं. त्या काळातली सगळी घालमेल एका कवितेत उतरली आहे. ‘तत्पूर्वी’ संग्रहात आलेल्या कवितेचा काही अंश...
‘गर्भात झोपलेल्या सुखनैव बाळा
किती दिवस खेळणार आहेस
आतल्या आत
किती काळ झाकून ठेवणार आहेस
तुझा धर्म-जात-रंग,
तुझं कोरं कपाळ रंगवूच आम्ही
एखाद्या विटक्या रंगानी,
काहीही निश्चय केलेले असलेच तरी
किमान ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ या वर्गवारीत
विभागला जाशीलच,
बाहेरचे दहशतीचे कंप
पोचतात कारे नाळेवाटे
आतपर्यंत?
बाहेर अमानुष दंगल सुरू आहे
आणि आपण भीतीने दार लावून
घरात बसलोय
असं तर तुला नाही ना वाटत?’
ही ख्यालीखुशाली विचारून पुढचा संवाद अपेक्षांच्या पातळीवर जातो. कदाचित जन्माला येण्याआधीच अपेक्षांच ओझं इथं लादलं जातंय. पण एका बापाच ते मनस्वी सांगणं आहे…
‘बाप म्हणून मी उच्चारतो तुझं भविष्य
ज्या असतात माझ्या अतृप्त इच्छा,
माझ्या अति सामान्यपणाला मी गुंडाळतो
तुझ्याबद्दलच्या भाराभर अपेक्षा,
तू दुर्लक्ष कर माझ्या अपेक्षांकडे
चालू लाग तुला वेडावणाऱ्या वाटेने
मी तरी कुठं भजतोय
पूर्वसूरींनी दाखविलेल्या दिशेला
तू जगप्रसिद्ध कलावंत नाही झालास
तरी चालेल
फक्त दारापुढची रांगोळी
मात्र कधी नकोस तुडवू,
तुला वादळाचे अंदाज
बांधता आले नाही तरी
हरकत नाही
श्वासाची लय मात्र समजून घे
तुला तरंगायला शिकवण्याच्या मोहात
मीच गटांगळ्या खातोय उपदेशी पाण्यात
प्रत्येक काळात बापाने केलेला विचार
जुनाटच ठरत जातो
याची आहे मला जाणीव
तरीही शेवटी एक सांगतोच
कसल्याही परिस्थितीत
जगण्याला धरून ठेव घट्ट
आणि
निसटू देऊ नको बाळमुठीतली माती
गर्भात झोपलेल्या सुखनैव बाळा’
एकतर्फी का होईना, लेकराशी झालेला हा माझा पहिला संवाद आहे. आता घटिका जवळ येत होती. डॉक्टरांनी अपेक्षित तारीख दिली १४ एप्रिल! ही तारीख मागे-पुढं होऊ शकते. पण १४ एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. या दिवसाचा योगायोग आम्हाला भावला होता. अशा वेळी अनेक छोट्या-छोट्या गोष्टींनी आम्ही भावूक झालो तर कधी साशंकही झालो. आता डिलेव्हरी होईपर्यंत घरीच थांबायचं असं मनोमन ठरवलं. पण १४ एप्रिल खूप लांब आहे. २६ मार्चला कथासंग्रहाच्या प्रकाशनाला आलं पाहिजेच, असं म्हणून डॉ. दादा गोरे सरांनी गळ घातली. सरांच्या पत्नी सुनंदा गोरे यांच्या कथासंग्रहाचं प्रकाशन होतं. या संग्रहावर मी बोललं पाहिजे असा गोरे सरांचा आग्रह होता. त्यांनी निमंत्रण पत्रिका छापल्या. माझं नावंही टाकलं. मी मात्र वेगळ्याच चिंतेत होतो. नेमकं २६ मार्चला सकाळी ऊर्मिलाला दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं. जन्मलेल्या बाळाला काही प्रॉब्लेम असेल तर पूर्वनियोजन म्हणून पेडियाट्रिक डॉक्टरांना अपॉईंट केलं होतं. दुपारी तीन वाजता डिलेव्हरी झाली. मी बाहेरच्या कक्षात बसलेला होतोच. नर्स बाहेर आल्या आणि मुलगी झाल्याची बातमी दिली. सिझर झालं होतं. ऊर्मिला ओके होती. मला मात्र आधी मुलीला पाहायचं होत. मी आत गेलो. नुकताच सृष्टीतलावर प्रवेश केलेल्या त्या जीवाला मी हातावर घेतलं. (‘तुला आईनं जन्म दिला पण सर्वप्रथम घेतलं मी,’ असं मुलीला सांगितलं तेव्हा तिला गंमत वाटली.) अधाशीपणे तिला बघितलं. वजन थोडं कमी होतं. पण बाकी सर्व काही उत्तम होतं. माझा कित्येक दिवसांचा ताण एकदम हलका झाला. आणि आमच्या घरात, आयुष्यात मुलीनं प्रवेश केला. मला मुलगी झाल्याची बातमी सर्वप्रथम ध्वनिक्षेपकावरून जाहिररीत्या सांगण्यात आली. औरंगाबादला २६ मार्चच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात माझ्या अनुपस्थितीचं कारण सांगताना मुलगी झाल्याची बातमी प्रेक्षकांना जाहीर सांगण्यात आली. अनेकांनी आमच्या घरातील लेकराची कमतरता अधोरेखित करत अभिनंदन केलं. आपल्यासाठी अनेक लोक चिंतीत असतात, ही भावना माणसाला मृदू मुलायम बनवते.
दासू वैद्य पत्नी व मुलीसह
आता संगोपनाचा अध्याय सुरू झाला. एक नवं नातं प्रत्यक्षात आलं. भूक लागली की रडणारा, पोट भरलं की बाळात्यावर हात-पाय हलवणारा छोटासा जीव, पण त्यानं मला आतून वेगळीच जाणीव करून दिली. उठली का? झोपली का? रडतेय? दूध पिलं का? सू केली? शी केली? औषध दिलंय का? हेच सारं घरातलं हॅपनिंग झालं. बाळाच्या खोलीत सारं घर एकवटलं. बाकी तीन खोल्या ओस पडायच्या. मार्च महिन्यात मुलगी झाली आणि एक मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक पदासाठी माझी मुखाखत झाली. मुलाखत उत्तम झाली आणि माझी निवडही झाली. लोक म्हणाले, मुलीचा पायगुण उत्तम आहे. पहिली बेटी धनाची पेटी. औरंगाबादला जायला मिळणार होतं. पायगुण वगैरे नाही मानलं तरी औरंगाबाद स्थलांतराशी मुलीचा जन्म कायम जोडला गेला.
मला पाच बहिणी, मोठ्या भावाला एकुलती एक मुलगी. तरी आमच्याकडे नव्यानं आलेल्या मुलीचं अप्रूप होतं. भाऊ, बहिणी, नातेवाईक, मित्र अशी घरी वर्दळ होती. सगळ्यात मोठ्या बहिणीनं माझ्यासाठी प्रस्ताव मांडला. खूप दिवसांनी लेकरू घरात आलंय, आता मोठ्ठं बारसं केल पाहिजे. खरं तर या मोठ्या बहिणीची सूचना, प्रस्ताव कोणी नाकारत नसे. पण मी विनम्रपणे नकार दिला. कारण मुलीच्या नामकरणाचा कार्यक्रम अनाथाश्रमात करायचा असं मी ठरवलेलं होतं. बहिणीच्या नाराजीमुळं त्यात एक सुवर्णमध्य काढला. तो म्हणजे, बारश्याला जो काही खर्च आला असता तेवढ्या रकमेचा धनादेश अनाथाश्रमाला द्यायचा. बहीण पुन्हा काही बोलली नाही. तिला हे काही पटलं नसावं. आम्ही ठरल्याप्रमाणे अत्यंत साध्या पद्धतीनं नामकरणाचा कार्यक्रम अनाथाश्रमात केला. धनादेश दिला. मुलीला हाक मारायला एक नाव मिळालं, अन्वयी!
अन्वयी नावामागे मोठी गंमत आहे. हे नाव मी प्रथम मित्राच्या मुलीसाठी सुचवलं होतं. (जालन्यात बऱ्याच वेळा मुलांची/दुकानांची नावं सुचवण्याची जबाबदारी माझ्याकडे असे.) त्याला हे नाव आवडलंही होतं. पण नावात जोडाक्षर असल्यामुळे उच्चारायला अवघड म्हणून हे नाव मागे पडलं. या नावाच्या उच्चारापेक्षा त्याचा अर्थ मला खूप महत्त्वाचा वाटला. अन्वयी म्हणजे जोडणारी! खरं तर प्रत्येक स्त्री जोडणारी असते. इथला संसार स्त्रीनेच जोडलाय. घराशी आपण जोडलेले असतोच, पण अन्वयीमुळे हा जोड अधिक घट्ट झाला.
अन्वयीनं सात महिन्याची असताना सर्वप्रथम ‘बाबा’ असा शब्द उच्चारला. तो क्षण श्रवणक्षमतेचा सर्वोच्च सन्मान होता. घरात बदलाचं वारं वाहू लागलं. पहिला ठळक बदल म्हणजे, अन्वयीबरोबर उर्मिलाही मला ‘बाबा’ म्हणायला लागली. मला उगीचच जबाबदार झाल्यासारखं वाटू लागलं. शिवाय माझ्यासाठीचं ‘अहो-जाहो’ संपून चक्क एकेरी ‘अरे-तुरे’ म्हणायला लागली. हा चांगला बदल होता. असे छोटे-छोटे अनेक बदल होऊ लागले. एरवी भटकंतीवर असणारा मी जास्त घरातच रमू लागलो. समजा गेलोच कुठे बाहेर तर सारखा घरी फोन करायचो. अन्वयीबद्दल चौकशी करायचो. उर्मिला अन्वयींची आई असली तरी एक स्त्रीसुद्धा होती. तिचा स्त्रीसुलभ उश्रमा जागा व्हायचा, ‘‘आता सारखे फोन करतोस, आधी कधी घरी फोन करायचं सुचत नव्हतं.’’ तिचं म्हणणं खरं होतं. मी गप्प बसायचो. एक भारलेली अवस्था होती. अन्वयीशिवाय दुसरं काही सुचायचं नाही.
एकदा चित्रकार मित्र चंद्रमोहन कुलकर्णीकडे गप्पा सुरू होत्या. त्यावेळी मी घेतलेला नवा मोबाईल चंद्रमोहन पाहत होता. फोटोशॉपीमधले अन्वयीचे असंख्य फोटो चंद्रमोहन लक्षपूर्वक पाहत होता. चंद्रमोहनलाही एकुलती एक मुलगी. माझ्या भारलेल्या अवस्थेचा त्याला चांगला अनुभव होता. पानशेत धरणाच्या काठावर बाप-लेकीच्या नात्याबद्दल आम्ही भरभरून बोलत होतो. त्या चर्चेत आम्हाला एक भरतवाक्य सापडलं- ‘‘मुलगी झाल्यावर आपण दुसऱ्यांदा प्रेमात पडतो’’. आदिबंधाचे संदर्भ देऊन किंवा फ्रॉईडची साक्ष काढून ही चर्चा वाढवताही येईल. पण चंद्रमोहन आणि मी स्वअनुभवावर बोलत होतो. बरं ही ओढ अन्वयीच्या बाजूनंही मला जाणवायची. मी विद्यापीठात रूजू झालो. उर्मिलाला एक वर्षं रजा घ्यायला लावली. किमान एक वर्षं तरी आई आणि बाळानं सोबतच राहावं असा त्यामागे विचार होता. जालना-औरंगाबाद मी ये-जा करायचो. संध्याकाळी साडेसातपर्यंत अन्वयीच्या ओढीनं मी घरी पोहोचायचो. बेल वाजवली की ऊर्मिला दार उघडायची. मी दरवाज्यातच उभा, दरम्यान मागच्या बेडरूममधून प्रचंड वेगानं रांगत किचन ओलांडून अन्वयी येऊन मला बिलगायची. मी शूजही काढलेले नसत. अन्वयीच्या त्या घट्ट बिलगण्यानं माझी पाघळणारी मेणबत्ती झालेली असे. तिचं ते ओढीनं रांगत येणं मला अद्भुत वाटे.
अन्वयीनं काढलेली चित्रं
अन्वयीमुळे शेजारच्या श्रेयावरचा फोकस हलला होता. श्रेयानंही आता बाळाकडे म्हणजे अन्वयीकडे मोर्चा वळवला होता. सदा न कदा श्रेया अन्वयीच्या शेजारी बसलेली असे. काही वेळा तर अन्वयी श्रेयाच्या घरात घुसलेली असायची आणि श्रेया आमच्याकडे असे. अन्वयीला झोक्यात टाकून ऊर्मिला गाणं म्हणायची. पुढं या गाण्याची अन्वयीला सवय झाली. मग ती गाणं म्हटल्याशिवाय झोपायचीच नाही. कधी झोपी घालताना मीही गाणं म्हणायला लागलो. हृदयनाथांच्या आवाजातलं कवी ग्रेसांचं ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादात होता’ हे एकमेव गाणं मी म्हणायचो. खरं तर मुलांना झोपवण्यासाठी हे गाणं सुसंगत नव्हतं. पुढं ती लवकर बोलू लागली. झोका देताना अन्वयी झोपलीय असं समजून मी गाणं थांबवून पेपर वाचू लागायचो तर झोक्यातून डोकं वर काढून अन्वयी म्हणायची ‘निनादत म्हण ना’. मी पेपर वाचलेला तिला आजही आवडत नाही. मी कुणाशी बोलू लागलो तर ती मुद्दाम मध्ये येणार.
अन्वयी दीड वर्षाची झाली. ऊर्मिलाचीही औरंगाबादला बदली झाली. तोपर्यंत जालना-औरंगाबाद मी येणं-जाणं केलं. आम्ही औरंगाबादला राहायला आलो. कॉलनीतच नातेवाईकांकडे अन्वयीला ठेवण्याची सोय झाली. त्यामुळे पाळणाघराचा प्रश्नच आला नाही. या कॉलनीच्या मागे देवीचं जुनं मंदिर होतं. मंदिराचा मोठा हिरवागार परिसर होता (आता बांधकाम करून मंदिराचा तोंडवळाच बदलून टाकलाय). सकाळीच अन्वयीला घेऊन मी या मंदिरात जात असे. तिकडे बकरी, कुत्रा, सरडा, चिमणी, साळुंकी, पोपट, खार, गाय, कबुतर, मुंगळे, मुंग्या, कावळा, घोडा असे अन्वयीचे मित्र झाले. ती पोपटाला ‘पोपटू’ म्हणे, तर कबुतरला ‘कब्बू’. एकदा पाऊस पडून गेला होता. रस्त्यात साचलेल्या पाण्यात ती वाकून पाहत होती. तिला त्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. मग ती ‘अन्वयी पाण्यात पडली’ असं सांगत होती. अशा अनेक गमती घडत होत्या.
कोकणातल्या मित्रानं हापूस आंब्याची पेटी पाठवली होती. त्यातले पिकलेले आंबे वापरणं सुरू होतं. एक दिवस ऊर्मिलानं उंदरानं खाल्लेला आंबा मला दाखवला. आंब्यावर टोकरलेलं होतं. आम्हाला आश्चर्य वाटलं. पण दुसऱ्याच दिवशी हा उंदीर पकडला गेला. अन्वयीचा सगळ्या खोल्यांत वावर होता. बऱ्याचदा कुटाणे करून ठेवलेले असत. त्यातच तिला आंब्याचा बॉक्स दिसला. त्यातला रंगीत आंबा काढून सळसळणाऱ्या दातांनी त्याला चावायची. ते कोवळ्या दाताचे व्रण उमटायचे आणि आम्ही उंदराचा शोध घ्यायचो. पुढं हा पराक्रम फ्रिजमधले चॉकलेट पळवण्यापर्यंत विकसित झाला. तेव्हा अन्वयीसाठी मी पहिली बालकविता लिहिली...
बंदूक नाही, नाही चाकू
असा कसा हिमऱ्या डाकू
हल्ला करतो फ्रिजवर
चॉकलेट लुटतो खिसाभर
झोपेत हसतो, झोपेत रडतो
चालताना धपकन पडतो
फेकतो भांडी, सांडतो पाणी
पाय घसरून पडतात कोणी
मुंग्या मारतो, मुंगळे धरतो
कुत्रोबाची शेपूट ओढतो
दिवसा उजेडी करतो हल्ला
स्वयंपाकघरात मारतो डल्ला
कधी पकडला गेला तर
कापत नाही थरथर
मस्त मारतो गरम थापा
तरीही घेते आई पापा
ही कविता सवंगडी दिवाळी अंक-२०१० मध्ये छापून आली. ऊर्मिलानं कविता वाचून दाखवताना ‘हिमऱ्या डाकू’ म्हणजे तू आहेस असं अन्वयीला सांगितलं. दोन दिवसांनी घरी आलेल्या मित्रानं तिला नाव विचारलं तर अन्वयीनं स्वतःचं नाव सांगितलं- हिमऱ्या डाकू!
जालन्यात असतानाची एक घटना मला महत्त्वाची वाटते. अन्वयी असेल वर्षाची. मी नेमका औरंगाबादहून येऊन फ्रेश होत होतो. ऊर्मिला किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तेवढ्यात अन्वयीचा जोरात रडण्याचा आवाज आला. मी बाथरूममधून तसाच पळत बाहेर आलो. उर्मिलाही किचनमधून आली. अन्वयी दोन फूट उंचीच्या दिवाणावरून खाली पडलेली होती. मी विचित्र ओरडलो, “त्या स्वयंपाकाहून काही बंद नाही. आधी तिला घे. मी बॉम्बस्फोटाचा आवाज ऐकू शकतो, पण तिच्या रडण्याचा आवाज ऐकू शकत नाही.’’ मी असं काहीतरी विचित्र बोललो होतो. हा माझा डायलॉग ऊर्मिलालाही भयंकर वाटला होता. पण ती काही बोलली नाही. त्यामुळे या विचित्र शब्दांचा मी विचार करू लागलो. खरं तर माझ्या बोलण्यातली शब्दरचना चूक असेल, पण आशय बरोबर होता. खरंच, लहान मुलाच्या रडण्याचा आवाज मला ऐकवत नाही. अन्वयीचं रडणं तर ऐकूच शकत नाही.
या घटनेतून मी भूतकाळात गेलो. मला पाच बहिणी आणि एक भाऊ. बहिणींना रागावलं की वडिलांना राग यायचा. एखादी बहीण काही कारणांनी रडू लागली की, वडिलांना फार पुळका यायचा. मी आईजवळ बाबांबद्दल तक्रार करायचो, ‘बाबांना मुलींबद्दलच जास्त प्रेम आहे. मुलांबद्दल त्यांना काही वाटतच नाही.’ आई माझी समजूत घालायची. आता मी विचार करतोय, माझ्यासारखाच बाबाही मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू शकत नसतील. कदाचित त्यांनाही मुलीच्या रडण्यापेक्षा बॉम्बस्फोटाचा आवाज सुसह्य वाटत असेल. पण हे आकलन व्हायला मला मुलगी व्हावी लागली. पण हे सर्व कबूल करण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी आता बाबा नाहीएत.
अन्वयी होण्याच्या आधीपासून माझ्यातला बाप कवी म्हणून जागृत होता. अन्वयी असेल तीनेक वर्षांची. औरंगाबादेत अंजली अंबेकर या मैत्रिणीचं लग्न होतं. मेघना पेठे लग्नाला आलेल्या होत्या. गोंड्याची टोपी घालून विवाहस्थळी अन्वयी तुरूतुरू पळत होती. कुणाकडेही बिनधास्त जाणारी, बोबडं बोलत फिरणारी अन्वयी मेघनांच्या नजरेस पडली. चौकशीत ती मुलगी दासूची म्हणजे माझी आहे असं मेघनाला कळलं. एक चांगली मोठी मुलगी असताना पुन्हा ही छोटी मुलगी? असं आश्चर्य मेघनानं मित्राजवळ व्यक्त केलं. वास्तविक माझी ‘मौजे’तील पौंगड मुलीवरची कविता वाचून, मी एका मोठ्या मुलीचा बाप आहे असा मेघनाचा गैरसमज झाला होता. ‘मुलगी आता मोठी झालीय’ या कवितेत बापाला ऋतुप्राप्त मुलीची काळजी, चिंता सतावत असतात. मुलगी मोठी झाल्याचं बापाचं मन मान्य करेना...
‘मलाही कळेना,
मुलगी नेमकी कधीपासून मोठी झाली,
परवापर्यंत तर पाठकुळी बसत होती,
एवढी कशी एकदम ताणली गेली
म्हणून मावेना फुलाफुलांच्या फ्रॉकमध्ये,
गेल्या कित्येक दिवसांत दारामागे लपून
भ्वाऽऽही केलं नाही तिनं,
तरीच अशात आरशाला चिकटलेली असते
बरेचदा’
मुलीत झालेले बदल टिपताना मी माझ्या परीनं बाप झालो होतो. अनेक मुलींमधली माझी मुलगी शोधताना माझ्यातला कवी, माझा ‘बाप’ म्हणून समज निर्माण करण्यात यशस्वी झाला होता. पण माझ्यातला बाप मात्र चिंताक्रांत राहील, अनेक मुलींमधील माझ्या मुलीसाठी.
मी बेसीनसमोर दाढी करीत उभा असतो, तेव्हा अन्वयी अचानकपणे मला टपली मारून पळते. एखाद वेळी धक्क्यामुळं ब्लेड लागू शकतं असं समजावलं तर तिचं उत्तर तयार होतं, ‘मग मी मस्ती कुणाबरोबर करू?’ मग माझ्या लक्षात येतं मी तिचा फक्त बाबाच नाहीये. अन्वयी जेव्हा कथ्थक शिकते, चित्र काढते तेव्हा ती माझ्या पार्टीची वाटते. पण जेव्हा नियमित शाळेत जाते, गणितं सोडवते तेव्हा उर्मिलाच्या पार्टीची वाटते, अशी माझी न्यायी भूमिका असते. उर्मिलाच्या मते मात्र, अन्वयीनं कुटाणे केले, भांडणं केली, मस्ती केली की अन्वयी बाबावर गेलीय. हा मला आरोप न वाटता गौरव वाटतो. चारचाकी गाडी आपण चालवायला लागलो की, दाही दिशांचा विचार करायला लागतो. गाडी चालवताना हळूवारपणा, संयतपणा, समजूतदारपणा अंगी यायला लागतो. तसं मुलगी झाली की बापाच्या सगळ्या संवेदना जागृत होतात. हुरहुर, रूखरूख, हळवेपणा उगवून येतो. मुख्य म्हणजे बापाला घर लहान वाटतं आणि मुलीला मात्र अंगण कमी पडतं.
आज अन्वयी पाचवीत आहे. तिला शाळेत घालताना माझ्या मराठी माध्यमाच्या विचाराला कुणी उठावच येऊ दिला नाही. मित्रासगट घरच्यांनी काळाची पावलं ओळखावीत म्हणून इंग्रजी माध्यमावर शिक्का मारला. पुढं काय करते माहीत नाही, पण सध्या चित्रं काढते तेव्हा शब्दांच्या भाषेपार तिचा पतंग उडताना मला मनापासून आनंद होतो. आजही एखादे दिवशी रात्री घरी यायला मला उशीर होतो. तेव्हा अन्वयीचा हमखास फोन येतो, ‘बाबा, काय चाललंय तुझं? किती वाजलेत आता? केव्हा येणारयेस तू?’
तिचा आवाज, काळजीयुक्त स्वर, थोडा दटावणीचा सूर पाहता मला पटतं- मुलगी फक्त मुलगीच नसते.
.............................................................................................................................................
‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक दासू वैद्य प्रसिद्ध कवी, नाटककार, चित्रकार आहेत.
dasoovaidya@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment