अजूनकाही
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट वसुधा देशपांडे-कोरडे यांचं ‘मुलांबरोबर वाढताना’ हे पुस्तक नुकतंच उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आणि त्यातील एक लेख, यांचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
‘I hate my parents...’ हे वाक्य मी जवळपास दिवसाआड ऐकते. ऐकलं कि मनात कालवाकालव होते. वाटतं, मुलं या पायरीपर्यंत कशी पोहोचत असतील आणि का जात असतील?
बरं या मुलांचे आई-वडील जेव्हा भेटतात, बोलतात, तेव्हा जाणवतं की, त्यांना मुलांपेक्षा प्रिय दुसरं काहीही नसतं. मग चुकतं कुठे?
आपण आई-बाबा झालो की, आपल्याला असं वाटतं- आपण फार मोठे झालो आहोत. आपल्या समोरच्या त्या इवल्याशा जिवाला वाढवण्याची, शिकवण्याची, यशस्वी करण्याची जबाबदारी फक्त आपली आहे. आई-बाबा म्हणून आपल्याला ‘माझ्या मुलाचं कसं होणार?’ हा विचार खूप त्रास देतो.
या प्रश्नाची आपण आपल्या परीनं निरनिराळी उत्तरं शोधतो. आपल्या वागण्याची एक पद्धत ठरवतो. तसंच वागू लागतो. मग काही वेळेस आपल्याला पाहिजे तशी मुलांची प्रगती दिसत नाही, वागणं दिसत नाही, तेव्हा परत आपल्याला पहिलाच प्रश्न छळू लागतो. वाटतं, ‘माझ्या मुलाचं कसं होणार?’ हा प्रश्न एवढा सैरभैर करतो की, आपण चिडतो, ओरडतो. ध्येयानं पछाडले जातो.
मुलाचं भवितव्य घडवण्याच्या नादात कितीदा तरी, तो नेमका कसा आहे, आपण नेमके कसे आहोत, हा विचारच आपण करत नाही. त्याला शिकवताना आपण स्वत: काहीतरी शिकायला हवं, हा विचार मनातच येत नाही.
कधी कधी मुलं मोठी झाली की, अचानक जाणवतं, की, आपलं जरासं चुकलंच मग एकदम अपराधी वाटू लागतं. माझ्यामुळेच माझा मुलगा असा झाला असं वाटू लागतं. “आई-बाबा म्हणून आम्ही failure आहोत. नालायक आहोत,” असे उद्गारही अनेकदा ऐकायला मिळतात. ‘माझं काहीच चुकत नाही’, हा विचार जेवढा घातक, तेवढाच ‘माझं सगळंच चुकलं’, हा विचारही.
मग आई-बाबा म्हणून नक्की कसं वागायचं?
आपण आई-बाबा झालो म्हणजे आपल्याला एक स्वत:ला पारखण्याची, बदल करण्याची आणि एका माणसाला गुणदोषांसह स्वीकारण्याची संधी मिळालेली असते. आपली मुलं त्यांना येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवातून शिकणार आहेत. हे अनुभव निरनिराळ्या प्रकारानं मिळवून देणं आणि बाकी त्यांचं त्यांनाच ठरवू देणं महत्त्वाचं.
आई-बाबा होणं म्हणजे नेमकं काय? हा विचार जेव्हा मी करते तेव्हा वाटतं, ‘आई-बाबा होणं म्हणजे एक असं व्यक्तिमत्त्व घडवणं जे स्वत: एका लहान मुलांतून दुसरं व्यक्तिमत्त्व घडवू शकेल.’ या दृष्टीनं विचार केला तर मला माझ्या मुलांकडून नेमकं काय हवंय आणि मला त्यांना नेमकं काय द्यायचंय हे स्पष्ट होत जातं.
आई-बाबा म्हणून आपण मुलांबरोबरच जन्माला येतो आणि मोठे होत जातो. आपली मुलं आपल्याला कळत-नकळत अनेक गोष्टी शिकवत असतात. आपण जेव्हा या गोष्टी शिकतो, स्वत:ला बदलतो, तेव्हा मुलांबरोबर वाढतानाचा प्रवास खूप आनंददायक होत जातो.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq
.............................................................................................................................................
मैत्री प्रत्येक नात्याची गरज असते. मैत्री म्हणजे नेमकं काय, हे व्याख्येत बांधता येत नाही. नात्यात मैत्री असते तेव्हा कसलाही मुखवटा, खोटेपणा, लपवाछपवी करावी लागत नाही.
मुलांच्या आणि पालकांच्या नात्यांत अशी मैत्री असणं आवश्यक आहे. आपल्या मुलाचा मित्र व्हावं असं सगळ्याच पालकांना वाटत असतं. म्हणून काही वेळेस खूप मोकळेपणानं वागलं जातं. हवे ते लाड पुरवले जातात. मुलांच्या चुकांनाही पाठीशी घातलं जातं. कोणत्याही गोष्टीला होकार दिला जातो. असं केल्यानं मुलं मित्र होतात का? मग मुलांच्या चुकांचं काय? आधी मोकळं सोडून मग धाक दाखवला जातो. मैत्री लांबच राहते.
मुलांचे मित्र होण्यासाठी, मुलं लहान असल्यापासून त्यांचं बोलणं नीट ऐकून घेण्याची सवय ठेवायला हवी. आपण ऐकतो ते प्रतिक्रिया देण्यासाठीच, समजून घेण्यासाठी नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे उत्तर, सल्ला किंवा उपदेश तयार असतो. मुलं बोलताना कित्येकदा आपण काय प्रत्युत्तर द्यायचं याचाच विचार करत असतो. खरं तर याची गरज नसते. मुलं काय बोलतायत ते समजून घेण्याची, त्यांच्या भावनांना शब्दरूप देण्याची गरज असते.
पूर्वी, मिहिका (माझी मुलगी) आणि मी काहीसे खालीलप्रमाणे बोलायचो.
शाळेतून आल्यानंतर,
मिहिका : आई, तू मला पेन्सिल का दिली नाहीस? तुझ्यामुळे मला फटके बसले. (खरं तर तिचं दप्तर तीच भरते. मी भरलेलं तिला आवडत नाही.)
मी : तुझी पेन्सिल न्यायची हे तुला कळत नाही का?
मिहिका : (रडत) इथून पुढे तूच मला पेन्सिल दिली पाहिजेस. नाही दिलीस ना तर बघच आता. बावरट.
मी : तुला किती वेळेस सांगितलंय, असं बोलायचं नाही. बावरट म्हणायचं नाही.
मग एकमेकींवर आवाज चढवायचा. रागवायचं आणि मग कसंबसं जेवायचं.
मग एक दिवस, मी माझी बोलण्याची पद्धत बदलली.
मिहिका : आई, तू मला लिटरेचरची नोटबुक दिली नाहीस. टीचर मला ओरडल्या.
मी : खूप वाईट वाटलं असेल ना तुला?
मिहिका : हो, मारलं पण.
मी : अरेरे! लागलं का ग?
मिहिका : हो ना, आमच्या टीचर काहीही झालं तरी मारतात.
मी : मारायला नको, नाही का?
मिहिका : हो ना... मारलेलं मला आवडतच नाही.
मी : बरं, आज एक गंमत करायचीये. पटकन जेवण करू यात. आणि पेपरचा ससा बनवूया (पेपर, कात्री, डिंक आणि रंग हा मिहिकाचा वीक पॉइंट.)
एवढ्यावर ती खुश झाली आणि मी भांडणाचा एक एपिसोड यशस्वीपणे टाळू शकले.
माझ्या लक्षात आलं, तिला माझ्याकडून सोल्यूशन किंवा उपदेश नको होता. तिला होणारा त्रास तिला मला सांगायचा होता. मला तो समजतोय हा विश्वास हवा होता. मी तो ऐकून घेतला, समजावून घेतला त्यादिवशी भांडण टळलं!
ऐकून घेणारा कान लहानपणापासून, आयुष्यभरासाठी प्रत्येकालाच हवा असतो. जेव्हा आपण तो मुलांना पुरवतो, तेव्हा त्यांना आपोआपच आपल्याशी बोलावंसं वाटू लागतं. सांगावंसं वाटू लागतं. संवाद साधला जाऊ शकतो.
मुलांनी बोललेलं ऐकणं हा मैत्रीतला फक्त एक टप्पा झाला. मुलांशी मैत्री करताना, आणखी एक गोष्ट आवश्यक असते. ती म्हणजे मुलांना स्पेस देणं. काही गोष्टी या मुलांच्या मुलांनाच कराव्याशा वाटतात. सोडवायच्या असतात. काही वेळेस एकटं राहावंसं वाटतं. त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत जावंसं वाटतं. अगदी विचित्र रंगाचं nail polish लावावंसं वाटतं. काही गोष्टी सांगायच्या नसतात. अशा वेळी त्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी. त्यांना मोकळं वाटावं असं वागू द्यायला हवं.
आता हेच बघा,
आई : काय लिहितोयस डायरीत?
मुलगा : काही नाही आपलं असंच.
आई : लपवाछपवी का करतोस? नक्कीच काही तरी चुकीचं लिहितोयस.
मुलगा : नाही गं. फक्त जरा पर्सनल आहे.
आई : पर्सनल? माझ्यापासून पर्सनल? आई आहे मी तुझी. तुला चांगली ओळखून आहे. तुझ्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्यात मी.
आणि बरंच काही.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
बऱ्याचदा, आई फक्त एवढ्यावर थांबत नाही. मुलगा नसताना त्याची डायरी चोरून वाचते. नंतर त्याला जाबही विचारते. जर आपण मुलांना एवढं सगळं देऊ शकतो, तर जराशी स्पेसही नक्कीच देऊ शकतो. स्पेस देणं म्हणजे काही गोष्टी, त्याचे विचार, कल्पना भावना वेगळ्या असू शकतात, हे समजून घेणं. त्याला त्या ठरवू देणं.
आता मैत्रीतली सर्वांत महत्त्वाची गोष्ट. विनाअट-विनातक्रार स्वीकार. मुलांना ते आहेत तसं स्वीकारणं, पालक म्हणून गरजेचं आहे. आपल्याला त्यांच्यावर संस्कार करण्याची खूप घाई झालेली असते. म्हणून त्यांना मुळापासून बदलण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग स्वीकार राहूनच जातो. ‘त्या अमुक मुलाला जमलं, ते तुला का नाही जमत?’ हा प्रश्न मुलाला विचारत बसलो तर मूल दुरावणार हे नक्की.
काही दिवसांपूर्वी एक काकू भेटल्या होत्या. त्यांच्या शरीरानं अधू असणाऱ्या आणि स्लो लर्नर असणाऱ्या मुलीला घेऊन आल्या होत्या. म्हणाल्या, ‘माझी मुलगी आहे ही अशी आहे. यांतून तिच्यातलं जे चांगलं आहे, ते मला वर काढायचं आहे.’ स्वीकार म्हणजे काय आणि संस्कार म्हणजे काय, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. मुलांशी मैत्री करायची तर त्यांच्यातले गुण-दोष, यश-अपयश सारख्याच पद्धतीनं स्वीकारता यायला हवं.
मुलांशी मैत्री करताना आपण त्यांना स्पेस द्यायची, स्वीकारायचं, ऐकून घ्यायचं तर मग आपलं म्हणणं कधी सांगायचं? काय चांगलं, काय वाईट मुलांना कधी कळणार? आपण नाही तर कोण सांगणार?
फार पूर्वी, एकदा आईशी खोटं बोलले होते. आईपासून काहीच लपत नसतं, तसं खोटंही लपलं नाही. आईनं मला विश्वासात घेतलं आणि समजावून सांगितलं. माझं म्हणणं तिला पटतंय असं सांगितलं, पण दुसरी बाजू समोर ठेवली. ‘विचार कर’, म्हणाली. तिथून पुढे तिनं तीच स्ट्रॅटेजी ठेवली. चुकल्यानंतर कडक शिक्षा मला कधीच झाली नाही; पण विचार करण्याची, चूक सुधारण्याची संधी मात्र मिळाली. आईनं मला, माझ्या चुकांना स्वीकारलं, माझं बोलणं ऐकून घेतलं, मला विचार करण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक दिली. त्यानंतर खोटं बोलणं, लपवाछपवी याला आमच्या नात्यात स्थानच उरलं नाही. ती माझी मैत्रीण झाली, तिचं आईपण न गमावता.
मुलांशी जेव्हा अशा प्रकारे मैत्री केली जाते, तेव्हा मुलं एक चांगली व्यक्ती म्हणून विकसित होऊ लागतात. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मैत्री ही प्रत्येक नात्याची गरज असते. मुलांशी मैत्री करण्यातून त्यांना इतरांशी मैत्री करणं, ती टिकवणं, नाती जोडणं आणि सांभाळणं, इतरांचा स्वीकार करणं, आदर करणं या गोष्टी शिकवता येऊ शकतात. धाक दाखवूनही आपल्याला त्यांना हेच तर शिकवायचं असतं, नाही का?
.............................................................................................................................................
‘मुलांबरोबर वाढताना’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment