भावंडांमधलं पहिलं मूल असल्यानं म्हणा किंवा इतरांची अतिशय काळजी घेणाऱ्या आईच्या सहवासात वाढल्यामुळे म्हणा, माझे ‘मॅटर्नल इन्सटिंक्ट्स’ अगदी लहानपणापासूनच तीव्र होते. त्यामुळे लग्नानंतर काही वर्षांनी आई होण्याचा निर्णय आयुष्यातल्या सगळ्यात एक्सायटिंग निर्णयांपैकी एक होता. दुर्दैवानं आमचं पहिलं बाळ दोन महिन्यांतच मिसकॅरेजमध्ये गेलं आणि पुढचं एक अख्खं वर्ष बाळाची चाहूल लागेना. तो काळ खूप अवघड होता. त्यामुळे वर्षभरानंतर बाळ येणार असल्याचं कळल्यावर झालेला आनंद मनात अजूनही ताजा आहे.
गर्भारपणाचा तो काळ मस्त एन्जॉय केला. ‘बेबीसेंटर’ या साइटवर रजिस्टर केल्यानंतर दर आठवड्याला आता बाळ लहानशा चेरीएवढं आहे, आता अक्रोडाएवढं झालंय. बाळाला आता छान ऐकू येतंय, तेव्हा त्याच्याशी बिनधास्त गप्पा मारा. आता बाळाची ज्ञानेंद्रियं विकसित झाली आहेत, तेव्हा संगीत- नृत्याचा आनंद घ्या, म्हणजे तो बाळापर्यंत पोहोचेल आणि त्यालाही त्याची आवड निर्माण होईल असं सगळं ईमेलवर यायचं. बेबीसेंटरनं दिलेल्या त्या सूचना मी मनापासून पाळल्या. गंमत म्हणजे, पोटात असताना बाळाला मी जे काही सांगितलं, ते आपसूकच तिच्यात आलं. म्हणजे, बाळा, तू कलासक्त आहेस बरं का! तुझा स्वभाव धाडसी, दयाळू आणि चेहरा सदैव हसरा आहे. तू एकदम खेळकर, अक्टिव्ह, दंगेखोर मूल आहेस (हे उगाच म्हटलं) वगैरे वगैरे...
२०१३ च्या पहिल्याच महिन्यात बाळ जन्माला येणार होतं. नववा महिना संपत आला तसं ऑफिसला जाणं बंद केलं खरं, पण बाळाच्या जन्माची वाट बघत बसण्याचा आणि अर्थातच अवघडलेपण सहन करण्याचा अतिशय कंटाळा आला होता. कधी एकदा बाळ जन्माला येईल असं झालंय असं म्हटल्यावर ओळखीच्या एक काकू म्हणाल्या, “अगं, बाळ आल्यानंतर वाटेल, की पोटातच बरं होतं.” आज सहा वर्षं झाल्यानंतर त्यांचं म्हणणं मनापासून पटतंय.
नऊ जानेवारी २०१३ या दिवशी पहाटे पोटातलं बाळाभोवती असलेली पाण्याची पिशवी फुटली आणि तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. बाळाची पूर्ण वाढ झाल्यामुळे काळजीचा प्रश्न नव्हता. कळाही सुरू झाल्या, म्हटलं चला, तासा- दोन तासात आपण रिकाम्या! एवढं सोप नसतं हे तेव्हा कुठे माहीत होतं. पुढचा आख्खा दिवस, शेजारी कळा देत ओरडणाऱ्या माझ्यासारख्याच इतर जणी, माझ्या कळा बंद झाल्यामुळे त्याची वाट पाहत राहणं, त्या कृत्रिमपणे सुरू करण्यासाठी दोन-तीनदा इंजेक्शन्स, मग कळा, त्या सुसह्य होऊन नॉर्मल डिलfव्हरी व्हावी म्हणून एपिड्युरलचं इंजेक्शन आणि सरतेशेवटी बाळानं बराच वेळ हनुवटी वर करून ठेवल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी शक्य नाही असं सांगत रात्री साडेअकरा वाजता करायला घेतलेलं सी-सेक्शन... हे बाळ कडक शिक्षकांसारखं सतत आईपणाच्या परीक्षा घेणार हे तेव्हाच ओळखायला हवं होतं.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq
.............................................................................................................................................
नंतरचे काही दिवस खरं तर काहीच झेपत नव्हतं. तोपर्यंत आपापलं जगायची सवय होती. आता आपण कुणाला तरी जबाबदार आहोत किंवा एक काहीही कळत नसलेला जीव आपल्यावर अवलंबून आहे, ही कल्पना सुरुवातीला चक्क मनावर ताण निर्माण करणारी होती. मला आठवतं, सुरुवातीचे काही दिवस बाळ झोपल्यावर बाहेरच्या खोलीत जाऊन बसणंही अवघड वाटायचं. कोणत्याही बाळाचे पहिले तीन महिने, त्यात पहिल्या बाळाचे पहिले तीन महिने त्याला समजून घेण्यात जातातच म्हणा. जागरणातून एकंदर वेळापत्रक बसायला तीन महिने गेले आणि पुढे खरी गंमत सुरू झाली. ऑफिसला परत रूजू व्हायचं होतं. बाळाला सोडून राहाण्याची कल्पना सहन होत नव्हती. शिवाय आपण नसताना बाळ कसं राहणार याहीपेक्षा आपण कसं राहणार हा प्रश्न सतावत होता. आईच्या मदतीनं तेही जमलं, पण कायमस्वरूपी आईकडे राहणं शक्य नव्हतं.
वर्तमानपत्रात काम करत असल्यामुळे सुरुवातीला कामाच्या वेळा वरिष्ठांनी शिथिल केलेल्या असल्या, तरी एखाद्या महिन्यात नेहमीप्रमाणे कामावर जाणं भाग होतं. ती सहा महिन्यांची होईपर्यंत कधी आईकडे राहायला जाऊन, तर कधी मुंबईतल्या सासूबाई आमच्या घरी राहायला येऊन काढले खरे, पण तिला सांभाळण्याच्या बाबतीत कायमस्वरूपी निर्णय घेण्याची वेळ आली होती. सईचा बाबा- निखिल आयटी क्षेत्रात मोठ्या पदावर असल्यामुळे त्याच्या कामाच्या वेळाही जास्त होत्या. अशात तिला पूर्ण वेळ डे-केअरमध्ये ठेवायचं एवढा एकच पर्याय दिसत होता.
आपली मुलं, घर यांच्या जबाबदाऱ्यांतून आत्ता कुठे मोकळ्या होत स्वतःचं आयुष्य खऱ्या अर्थानं जगायला लागलेल्या आई किंवा सासूबाई यांना या वयात परत एकदा इतक्या लहान बाळात अडकवण्याचा विचार मनाला पटत नव्हता. डे-केअरवर सगळी जबाबदारी टाकून निवांतपणे ऑफिसला जाण्याचा पर्यायही नकोसा वाटत होता, कारण वर्तमानपत्राच्या इतरांपेक्षा वेगळ्या असलेल्या कामाच्या वेळा, खूपच कमी सुट्ट्या, सणासुदीला उलट जास्त असणारे कामाचे तास या सगळ्यात एका मर्यादेनंतर डे-केअरचा पर्यायसुद्धा निरुपयोगी ठरणार होता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इतकं लहान मूल डे-केअरवर सोपवायचं हा विचार जड वाटत होता. मूल होत नसताना घाबरायचं आणि मग ते झाल्यावर त्याची जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे द्यायची, बाळ मोठं होत असताना त्यातली प्रमुख भूमिका आपल्याऐवजी डे-केअरला द्यायची हे पटत नव्हतं. गंमत म्हणजे, डे-केअरमध्ये तिला ठेवायचंच हे मनाशी पक्कं होतं, पण ते बंधन नसावं किंवा अगदी पूर्णवेळ नसावं असं वाटत होतं. बाळाचं संगोपन कसं करायचं असा विचार कधीच केलेला नव्हता, पण संगोपनात समतोलपणा हवा. शिवाय आपल्याला हव्या त्या पद्धतीनं संगोपन व्हावं एवढं मनात कुठेतरी पक्कं होतं. मूल पूर्ण वेळ आपल्याच जवळ असावं किंवा डे-केअरमध्ये दिवसभर ठेवायचं असं कुठलंच एक टोक नको होतं. हो-नाही करता शेवटी नोकरी सोडून घरून काम करण्याचा निर्णय घेतला आणि तो सर्वांत महत्त्वाचा निर्णय ठरला.
अर्थात नोकरी सोडून घरून काम करण्याचा निर्णय एका दिवसात यशस्वी होणार नव्हता, स्वतंत्रपणे जम बसवायला थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे आईपण आणि करिअर अशा आयुष्यातल्या अतिशय महत्त्वाच्या दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळेस संघर्ष सुरू झाला. सई आठ महिन्यांची झाल्यावर तिला दोन तासांसाठी डे-केअरमध्ये ठेवायचं ठरवलं आणि त्या दिशेनं संशोधन सुरू केलं. एकदा एक डे-केअर निवडल्यानंतर ते परत बदलायचं नव्हतं, कारण मुलांचं तिथं भावविश्व तयार होतं आणि सारखं डे-केअर बदलणं हे त्यांना त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे स्वच्छता, चांगला स्टाफ, मुलांना चालेल असं जेवण, सुरक्षितता, घरापासूनचं अंतर अशा कितीतरी निकषांवर चाळणी लावत एक डे-डेअर निश्चित केलं.
डे-केअरच्या पहिल्या दिवशी आमच्या दोघींपैकी कोण जास्त रडलं हे सांगणं आजही कठीण आहे! पहिले दोन दिवस अगदी अर्धा-एक तास ठेवलं. मी तिथे बाहेरच बसून असायचे. खरी कसोटी तिला तिथंच सोडून घरी आल्यावर होती. तिच्याशिवाय घर भकास वाटत होतं. आपण तिला अनोळखी माणसांमध्ये सोडून आलोय असं वाटत होतं. पण तोपर्यंत तिला वेगवेगळ्या माणसांकडे जायची मुद्दाम लावलेली सवय उपयोगी पडली. मूल सतत आईवरच अवलंबून राहिलं तर तिला जराही उश्वास घेता येत नाही. त्यामुळे सईला सुरुवातीपासून आम्ही आजी, आजोबा, मावशी, घरी नेहमी कामाला येणाऱ्या मावशी यांच्याकडे किमान पंधरा मिनिटं स्वतंत्रपणे, आई-बाबा जवळ नसताना राहायची सवय लावली होती. त्यामुळे अमुक एका व्यक्तीच समोर हवी असा तिचा हट्ट नव्हता.
दोन-तीस दिवसांत डे-केअर ओळखीचं झाल्यावर तिथलं रंगीबेरंगी वातावरण, भरपूर मावश्या, खेळणी, चिकार लहान मुलं यात ती छान रमली. प्रत्येकाला आपापल्या वयाची संगत हवी असते ही भावना इतक्या लहान वयातही तीव्र असते ते तिला डे-केअरमध्ये इतर मुलांशी खेळताना पाहून जाणवलं. या डे-केअरमध्ये केव्हाही जाण्याची आणि आपलं मूल काय करतंय हे पाहण्याची मुभा होती (ती फार कमी ठिकाणी असते, कारण डे-केअरच्या पालकांसमोर रंगवल्या जाणाऱ्या गोड- गुलाबी चित्राला धक्का लागण्याची शक्यता असते!). रोज तिला कांगारू बॅगमध्ये घालून डे- केअरमध्ये सोडणं परिस्थितीवर नियंत्रण देणारं वाटायला लागलं.
तिचं व्यक्तिमत्त्व धीट आणि बर्हिमुख व्हावं या आमच्या प्रयत्नांना डे-केअरमुळे नवा पैलू मिळाला. इतर लहान मुलांबरोबर राहणं, त्यांच्याशी खेळणं यातून शेअरिंग, शिस्त, आपल्याला पाहिजे जे ते मिळण्यासाठी, आपला ‘टर्न’ येण्यासाठी थांबणं या गोष्टी घरी जितक्या प्रभावीपणे शिकवता आल्या नसत्या, तितक्या तिथं सहजपणे अंगी बाणवल्या गेल्या. मुख्य म्हणजे इतरांबरोबर राहाताना ‘सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स’ विकसित होत गेलं.
ती वर्षाची होईपर्यंत रोज चार तास डे-केअर (त्यातले दोन तास झोपेत जायचे) आणि नंतर घर असं छान रूटिन बसलं. रोज सकाळी सूर्यप्रकाश आला, की सन आला सन आला म्हणत ती जरा जास्तच लवकर उठायची. मग बाबाबरोबर अंथरूणात मनसोक्त लोळत-दंगा करत दिवसाची सुरुवात करायची. बाबासुद्धा आपल्याबरोबर उठला याची गंमत तिला अनुभवायला मिळावी म्हणून निखिल रोज आधीच उठलेला असला, तरी ती उठायच्या दरम्यान मुद्दाम तिच्या शेजारी पांघरूण घेऊन पडून राहायचा. त्याच्या डोक्यावरून पांघरूण ओढून काढून त्याला उठवण्यात तिला खूप आनंद मिळायचा. आई म्हणजे माया व शिस्त आणि बाबा म्हणजे शारीरिक दंगा, उलटं- पालटं करणं, त्याच्या अंगावर उड्या मारणं, त्याच्याकडून मुद्दाम धक्का खाऊन पडणं असं समीकरण तिचं तिनंच ठरवलं.
आई फक्त गोष्टी सांगणारी अशी प्रतिमा होऊ नये म्हणून कधीकधी मी मुद्दाम तिच्याबरोबर पकडापकडी खेळायचे आणि निखिल बदल म्हणून तिला शिस्त लावायचा. बाबा ऑफिसला गेला, की साडेदहा वाजता तिला डे-केअरमध्ये सोडेपर्यंत घरात आमचं राज्य असायचं. मग, पोळ्या करायला येणाऱ्या मावशींबरोबर गप्पा मारणं, कणकेचे गोळे करत बसणं, तिला कपड्यांच्या ढिगात मधोमध बसवून घड्या घालणं, घड्या घालताना बाबाचा टी-शर्ट घालून फोटो काढणं, साबणाचे फुगे बनवत पाण्यात खेळत आंघोळ घालणं असा सगळ्यात मजेशीर वेळ घालवायचो. डे-केअरला तिनं हसत हसत जावं यासाठी मी मुद्दाम जाण्याधी तिथल्या तिच्या मित्र-मैत्रिणींबद्दल गप्पा मारायचे. ‘अनय वाट बघत असेल ना तुझी’, ‘आज नाश्ता करताना तू हर्षीशेजारी बसणारेस का?’ वगैरे गप्पा मारल्यामुळे तिची डे-केअरला जाण्याची उत्सुकता वाढायची. डे-केअरला जाणं ही शिक्षा असल्याची भावना बऱ्याच मुलांमध्ये दिसते आणि कदाचित ती आईमध्ये आपण मुलाला बराच वेळ डे-केअरला ठेवतो या अपराधीपणातून आलेली असते. ते सईबाबत टाळायचं होतं. आई- बाबांना काम करायचं आहे, कारण त्यातून त्यांना आनंद मिळतो. तुला तुझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळायला, मजा करायला मिळावी म्हणून तू डे-केअरमध्ये जातेस हेच तिच्यात रूजवण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मी घरून काम करत असल्यामुळे डे-केअरमध्ये जाणं हे तिच्यासाठी कधीच बंधनकारक नव्हतं. एखाद्या दिवशी तिचा मूड नसेल किंवा तिला चक्क सरप्राइज म्हणून मी डे-केअरला सुट्टी द्यायचे. तिला घेऊन बाहेर पडायचे, पण डे-केअरऐवजी दुसरीकडेच फिरायला जायचे. ते तिला फार छान वाटायचं. पण आज काम नाही, तर तिला सोडायचं नाही असं केलं नाही, कारण नाहीतर तिच्या डोक्यात रूटिनचा गोंधळ झाला असता. ती आजारी असताना घरून काम करण्याचा विशेष फायदा झाला, कारण तेव्हा तिला घरी ठेवणं, तिची सोबत करणं, गोष्टी सांगणं, हे सगळं सहज शक्य झालं.
दुपारी चार-साडेचार वाजता काम संपवून परत घेण्यासाठी डे-केअरमध्ये गेल्यावर ती धावत येऊन मिठी मारायची तो दिवसातला सगळ्यात छान क्षण असायचा! मग आमची अनुभवभ्रमंती व्हायची. तिला वेगवेगळे अनुभव, जे आपल्यासाठी अगदी दैनंदिन असू शकतात, ते तिला देणं मला आजही आवडतं. त्यामुळे सगळीकडे संध्याकाळची घाई-गडबड सुरू होण्याआधी मंडईत भाज्या बघणं, त्यांची रंगसंगती लक्षात घेणं, ती पिशवीत भरायला आईला मदत करणं किंवा किराणा मालाच्या दुकानात गहू कसे भरतात, तिथल्या काकूंशी गप्पा मारणं, देवळात जाणं, घराच्या पार्किंगमध्ये झाडं मोजणं, खाली पडलेली फुलं वेचणं, शर्यत लावणं, गाडीवर उभं राहून तिनं ती चालवणं आणि मी तिला मागे धरून बसणं, असे उद्योग आम्ही करायचो.
बाबा किंवा आई ऑफिसला जातात, त्यांनाही काम करणं गरजेचं आहे हे तिला कळत नसलं, तरी आम्ही तिला सांगायला सुरुवात केली. ‘तू लहान आहेस, हे तुला कळणार नाही’ असं मुलांना अंडरएस्टीमेट करायची आपल्याला खूप सवय असते आणि ते शक्य तितकं मला टाळायचं होतं. सई वर्षाची झाल्यापासूनच तिला स्वतंत्र व्यक्तीसारखं वागवायला सुरुवात केली. मी चक्क तिचं मत विचारायचे. अमुक एक गोष्ट करण्याबद्दल तिला काय वाटतंय किंवा एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्येही तिचं मत विचारणं आम्ही आवर्जून केलं. त्यातून तिला आपलं मत मांडणं आणि ते योग्य शब्दांत मांडणं या दोन्ही गोष्टी कळत गेल्या. यामुळे आता जरा अतीच स्पष्टवक्तेपणा आलेला असला, तरी उद्या जगात वावरताना तिला तो उपयोगी पडेल.
सईचा स्वभाव आजकालच्या बऱ्याच मुलांप्रमाणे हायपर-अॅक्टिव्ह असल्यामुळे तिची ऊर्जा खर्च करणं मोठं आव्हान असायचं. अगदी दोन वर्षांची असतानाही घरात खेळणं, डे-केअरमध्ये तर अव्याहतपणे खेळणं, परत संध्याकाळी घरी आणि मग कॉलनीतल्या बागेत मुलांसोबत खेळणं एवढं सगळं केल्यानंतर कुठे ती रात्री दहा वाजता झोपायची. तिच्या डोक्याला खुराक मिळावा म्हणून जवळच्या खेळण्यांच्या लायब्ररीतून खेळणी, विशेषतः लाकडी पझल्स, तुकडे जोडून चित्र बनवणं वगैरे आणायला सुरुवात केली. कोडं सोडवायला घेतल्यानंतर ते सुटेपर्यंत ती त्यातच अखंड- म्हणजे कित्येकदा फक्त दहा मिनिटं रमलेली असायची आणि एकदा ते जमलं, की त्यातला रस संपून जायचा. मग, परत तिला रमवण्यासाठी दुसरी काहीतरी सोय करणं गरजेचं असायचं. जोडीला सतत बडबड आणि प्रश्न सुरूच असायचे. ‘टेरिबल टु’च्या फेजमध्ये रंगीत खडूंनी मोठी मदत केली. चित्रं काढणं आणि रंगवणं या बहुतेक मुलांप्रमाणे तिच्याही अतिशय आवडीच्या गोष्टी. सुरुवातीला तिला हव्या तितक्या रेघोट्या मारू देणं, आंबा, झाड, घर असे ठोकताळ्यासारखे विषय न देता तिला स्वतःच विषय शोधायला लावणं, रंग शक्य तितका आउटलाइनच्या बाहेर न जाता रंगवणं असे टप्पे पार करत गेलो. मुख्य म्हणजे कधीच सूर्य पिवळा आणि आकाश निळं रंगव असा हट्ट मुद्दाम धरला नाही आणि चित्र काढताना नक्कल करण्याऐवजी निरीक्षणातून, पाहिलेलं आठवून काढण्यासाठी तिला जास्त प्रवृत्त केलं. रंगचित्रांच्या तिच्या शिकण्याच्या प्रक्रियेतली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे घरातल्या सगळ्याच भिंतींना तिच्या चित्रकलेचा भरपूर अनुभव मिळाला आहे. तिनं सगळ्याच भिंती रंगवू नयेत म्हणून मी घरातली एकच भिंत रंगवण्यासाठी राखीव ठेवून पाहिली, पण ती भरल्यानंतर इतर भिंतींकडे मोर्चा वळलाच. खरं सांगायचं, तर तिच्याबरोबर मीसुद्धा भिंतींवर मनीमाऊ आणि डोंगराआड लपलेले सूर्य काढले आहेत.
सतत काहीतरी उद्योग करण्याच्या किंवा नवं आजमावून पाहण्याच्या मुलांच्या स्वभावाचं पालक म्हणून आव्हान पेलताना मला अभिनेता अतुल कुलकर्णीनं सांगितलेला एक किस्सा कायम आठवतो. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये काम करताना अतुल कुलकर्णी त्याच्या एका नव्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ऑफिसमध्ये आला होता. सोबत दोन तरुण कलाकारही होते. नव्या पिढीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता असं विचारल्यावर अतुल म्हणाला, “या पिढीचा आत्मविश्वास जबरदस्त आहे. त्यांना नवं काही करताना भीती वाटत नाही. उलट आमचं. मला आठवतं, लहान असताना बाबांनी घरी टेपरेकॉर्डर आणला होता. त्याला पहिल्यांदा हात लावल्यानंतर घरच्यांचे उद्गार म्हणजे - गप रे, हात लावू नकोस. तोडशील. त्यांचा केवढा हा आत्मविश्वास आणि आमच्या आत्मविश्वासाचं थेट खच्चीकरण. त्यामुळे अजूनही काही नवं करताना धाकधूक होते.” या प्रसंगानं मला सईच्या नवं आजमावण्याच्या किंवा घरातल्या विविध वस्तूंना हात लावताना आपला काय दृष्टीकोन असावा हे सांगितलं. त्यातून तिच्याशी होकारात्मक बोलण्याची सवय लावून घेतली. म्हणजे अमुक एका गोष्टीला हात लावू नकोस किंवा ते करू नकोस असं सांगण्यापेक्षा जपून बघ, नीट हाताळ किंवा आपण दोघी मिळून हे करूया वगैरे.
सईच्या संगोपनात आम्ही दोघं आणि डे-केअरबरोबर गुगलचा मोठा वाटा आहे. अखंड ऊर्जा किंवा ‘डिमांडिंग’ स्वभाव, डे-केअरमध्ये वेगवेगळ्या वयाच्या इतर साठ-सत्तर मुलामुलींबरोबर वावरताना आत्मसात केल्या जाणाऱ्या बऱ्या-वाईट गोष्टी यामुळे कित्येक प्रसंगांत कोणतं वागणं जास्त योग्य ठरेल, हे जाणून घेण्यासाठी गुगलची मदत झाली. रोज दिवसातून किमान शंभर वेळा मुलांना ‘अमुक एक करू नको’ असं सांगावं लागतं, तेव्हा ‘काय करू नको’ हे सांगण्याऐवजी ‘काय कर’ हे सांगावं किंवा ‘आत्ता तुला काय खायला देऊ?’ असं विचारण्याऐवजी ‘तुला सफरचंद देऊ की दूध पिणार?’ असे नेमके पर्याय द्यावेत, हे मला गुगलनं शिकवलं.
मुलांच्या बाबतीतली एखादी ‘ट्रिकी’ परिस्थिती कशी हाताळावी, हेही खूपदा गुगलनं सांगितलं. एका प्रसंगात तर गुगलची फारच मदत झाली. सई दोन वर्षांची असताना नवऱ्याच्या एका मित्राच्या घरी गेट-टुगेदरला गेलो असताना, तिथं आलेल्या तीन वर्षांच्या एका मुलानं सईच्या हातातलं खेळणं हवं म्हणून तिच्या गालाचा कडकडून चावा घेतला. गालावर उठलेले अक्षरशः सगळ्या दातांचे काळेनिळे वण पाहणं वेदनादायी होतंच, पण त्यातून एक अनपेक्षित अडचण निर्माण झाली. या प्रसंगानंतर आठवड्याभरातच डे-केअरमध्ये तिनं एका मुलीला चावण्याचा प्रयत्न केल्याचं तिथल्या शिक्षिकेनं सांगितल्यावर मी हादरलेच. तो मुलगा चावल्यानंतरची वेदना सईच्या मनातून गेलेली नाही याची कल्पना होती, पण त्याचबरोबर अमुक एक मिळावं म्हणून चावायचं असतं हा धडा तिनं त्या मुलावरून घेतला आहे, हे आमच्या लक्षात आलं नव्हतं.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
गुगलनं सांगितलं, की तिच्यावर बारीक लक्ष ठेवा. मनाविरुद्ध घडत असताना तिच्यासोबत राहा. तिला चावावंसं वाटलं तर सुरुवातीला चक्क तिला तुम्हाला चावू देत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया देऊ नका. तिचं लक्ष दुसरीकडे वळवा आणि मग सावकाशीनं चावल्यामुळे कसं दुखतं हे सांगा. हे काही वेळा तरी घडणार, पण धीर सोडू नका. रागवण्याऐवजी तिला त्रासदायक वाटलेल्या प्रसंगाच्या आठवणीत तुम्ही तिच्यासोबत आहात हे दाखवून द्या. अक्षरशः दोनच दिवसांत सगळं पूर्ववत झालं. भावनिक घालमेलीतून आलेल्या प्रतिक्रियेवर आई-वडिलांनी विरोध व्यक्त करण्याऐवजी पाठिंबा देणं कसं उपयोगी पडतं, याची कायमस्वरूपी शिकवण गुगलमुळे मिळाली.
मुळातच बहुतेक मुलींचे स्वभाव बोलके असतात आणि त्यात लहानपणापासून तिच्या मैत्रीपूर्ण स्वभावाला खतपाणी घातल्यामुळे आपल्या दुकानात, लिफ्टमध्ये, बाहेर कुठेही गेल्यावर आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाशी बोलणं हे तिला आद्य कर्तव्य वाटायला लागलं. ती मोठी व्हायला लागली, तशी अनोळखी माणसांशी हसण्या-बोलण्याची सवय मला खुपायला लागली. डे-केअर, शिशुगटातून डे-केअरला इतर मुलांसोबत व्हॅननं जाणं असं सगळीकडे तिला मित्रत्वानं वागताना पाहून माझी झोप बऱ्याचदा उडाली आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येक पालकासाठी डोकेदुखी झालेला ‘स्ट्रेंजर्स’शी न बोलण्याचे किंवा ‘गुड टच- बॅड टच’चे धडे तिला जरा जास्तच आधीपासून द्यावे लागले. यातून आपण तिच्या मनात उगाच बागुलबुवा तयार करतोय असंही वाटायचं, पण आजच्या काळात त्याला पर्याय राहिलेला नाही.
एक गोष्ट ती अगदी लहान असतानाच ठरवली होती, की ती पाच वर्षांची नृत्य, संगीत, चित्रकला यापैकी तिचा कल असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्याही छंदवर्गाला पाठवण्याआधी तिला स्वसंरक्षणाचे धडे द्यायचे. पालक म्हणून तिला सतत सुरक्षित ठेवावं असं कितीही वाटलं तरी त्यातून येऊ शकणारी बंधनं तिची वाढ खुरटवू शकतात. त्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा हे तिला शिकवणं जास्त योग्य वाटलं. त्यासाठी लावलेल्या कराटेच्या वर्गात सुदैवानं तीही मनापासून रमली.
मी दोन भावंडांबरोबर मोठी झाले. एक बहीण आणि एक भाऊ. (आजच्या पिढीला फार फार तर यातलं एकच भावंड मिळू शकतं.. अँड दे डोंट नो व्हॉट दे आर मिसिंग. बिचारे!) त्यांच्याबरोबर केलेली धमाल- विशेषतः सणावारापासून पर्यटनापर्यंत प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे केलेली मजा, भरपूर भांडणं, शेअरिंग हे सगळं माझ्या व्यक्तिमत्त्वाचा खूप मोठा हिस्सा आहे. आई-वडील कितीही जवळचे असले, तरी भावंडांशी जास्त गुळपीठ आहे. त्यामुळे दोन मुलं हवीत हे माझं खूप आधीपासून ठरलेलं होतं. लहानपणी मला ‘मोठा दादा’ या व्यक्तिमत्त्वाचं फार आकर्षण होतं. खोड्या काढणारा, एरवी खूप प्रेमळ असणारा, तिच्यासाठी कायम हजर असणारा दादा आणि शेंडेफळ म्हणून जास्त लाडात, ‘तू मोठी आहेस ना...’ या आपसूक येणाऱ्या वाक्याशिवाय वाढणारी, लग्नानंतर तिच्यावर कित्येक नात्यांच्या जबाबदाऱ्या येणार असतातच, पण त्यापूर्वीच ताईपणामुळे इतरांचा सतत विचार करण्याची- काळजी करण्याच्या आपोआप लागणाऱ्या सवयीशिवाय वाढलेली मुलगी असं ‘कॉम्बिनेशन’ आपल्याकडे हवं. केवळ या एकमेव सुप्त इच्छेसाठी पहिलं बाळ मुलगा असावं असं वाटायचं. आता आपल्या धाकट्या भावाची अतिशय काळजी घेणाऱ्या, त्याला हिरीरीने जपणाऱ्या, त्याच्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या सईला पाहून वाटतं, मोठ्या बहिणीचे गुण ही उपजतच घेऊन आली आहे! तिला मनापासून आवडणारं ताईपण हिरावून घेणारी मी कोण होते? शिवाय, ती पहिली आल्यामुळे आईपण शिकताना झालेल्या माझ्या असंख्य चुका सहन करत त्यातून फुलणं हे कदाचित मुलगी म्हणून तिला जास्त चांगलं जमलंय त्याचं काय?
बरं झालं सई, तू माझं पहिलं बाळ आहेस!
किंवा
बरं झालं सई, तू माझं पहिलं बाळ आहेस! तू दिलेलं आईपण मला जास्त आवडलंय!
.............................................................................................................................................
‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखिका कीर्ती परचुरे मुक्त पत्रकार आहेत.
kirtiparchure2016@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment