सखी मला म्हणते, ‘तुझी आई लांब राहते ना, पुण्याला. मग मी तुझी आई आहे आणि तू माझी पिल्ली आहेस!’
पडघम - बालदिन विशेष
सीमा शेख – देसाई
  • सीमा शेख – देसाई लेकीसह
  • Wed , 14 November 2018
  • पडघम बालदिन Children's Day १४ नोव्हेंबर 14 November सीमा शेख – देसाई Seema Shaikh-Desai

या पृथ्वीतलावर सगळ्यात अवघड जॉब म्हणजे पालकत्व, असं मला वाटतं. ज्याच्या यशस्वितेचं मोजमाप कशातच नाहीये. तुम्ही उत्तम पालक आहात की नाही याची परीक्षा मूल जन्माला आल्यापासून  सुरूच होते. असा एकही क्षण नाही की, ‘चला, आता पालक म्हणून माझी भूमिका संपली. मी पास झालो.’ पहिल्या श्रेणीत, दुसऱ्या श्रेणीत असं यात काहीच नसतं. या जॉबचं कौतुक असं पटकन होत नाही. पण पाल्यात उणीवा दिसल्या की, पालकत्वावर बोट ठेवलं जातं आणि मग ‘ती एक लहान आहे, तुम्ही दोघं काय करत होतात?’ अशी सुरुवात होते आणि पालकाला स्पष्टीकरण द्यायलाही काही वाव रहात नाही.

आई होण्याची किंवा पालक होण्याची कोणतीही शाळा नसते. या सगळ्या गोष्टी अनुभवातूनच शिकाव्या लागतात. अलिकडे सुजाण पालकत्व वगैरे कार्यशाळा होतात, बाजारात पुस्तकं मिळतात. पण शेवटी प्रत्येक मूल वेगळं आहे. पुस्तकात वाचलेल्या किंवा कार्यशाळेत इतरांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी आपल्या पाल्याला लागू पडतीलच असं नाही. कारण हा अभ्यास मानसशास्त्राचा आहे. मुलाच्या कोवळ्या मनाचा आहे आणि आपल्या प्रत्येकापुढे आलेल्या मातीच्या गोळ्याचा आहे. त्याला आकार कसा द्यायचा हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. शेजारच्याच्या घरात घडणारा मातीचा गोळा पाहून तसंच्या तसं मूल आपल्याला घडवता येणार नाही. किंबहुना त्यापेक्षा वेगळं काय करता येईल यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करत असतो.

एकदा पालक म्हणून गळ्यात लेबल पडलं की, आपोआपच अनुभवाच्या शाळांचे दाखले कानावर पडतात. या सगळ्यातूनही आपल्याला काय पटतंय आणि आपली सावली कशी घडावी हे पूर्णपणे आई-बाबांनीच ठरवायचं असतं, असं माझं मत आहे. कारण या दोनच व्यक्ती पाल्याच्या चांगल्या-वाईटाची जबाबदारी घेणार असतात.

मीसुद्धा गेल्या चार वर्षांत खूप काही शिकलेय. खरं तर आई म्हणून आपण काही शिकायचंच नसतं. कारण आईची डिग्री देणारी कोणती शाळा नसते ना.. हा प्राइसलेस जॉब  ते मूल आपल्याला शिकवत असतं. मीदेखील माझ्या लेकीकडूनच आई कसं व्हायचं हे शिकतेय. माझ्या मुलीचा जन्म २७ डिसेंबरचा. दिवस थंडीचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला घेऊन उभं रहा असं सिस्टरनं सांगितल्यामुळे लेकीचे बाबा उत्साहानं माझ्या खोलीच्या खिडकीत अलगद हातात घेऊन कौतुकानं पिलाकडे पहात उभे राहिले. अचानक बाळ रडायला लागलं. शू केली आहे का, शी झाली का, सगळं तपासलं. भूकही लागलेली नव्हती. मग रडण्याचं कारण काय असेल? हॉस्पिटलच्या खोलीत आम्ही दोघेच होतो. विचारणार कोणाला? मग लक्षात आलं, कोवळ्या उन्हातून थोडं बाजूला झाल्यावर तिला थंडी वाजू लागली होती. लक्षात येताक्षणी आम्ही एकदम बोललो, ‘अरे हो, हिला थंडी वाजत असेल का?’ आणि पटापट गरम कपड्यात गुंडाळताच बाळ शांत. आम्हाला हायसं वाटलं. चला पहिला धडा शिकलो! ही होती आमच्या पालकत्वाची सुरुवात. असे अनेक धडे दिवसागणिक आम्ही शिकत गेलो आणि अजूनही शिकतोय. आमची लेक ईशा सलीम देसाई. आम्ही घरी तिला सखी म्हणतो. तीच आम्हाला शिकवतेय आई-बाबा कसं व्हायचं असतं. आत्ता ती चार वर्षांची आहे. इवल्याशा मेंदूत अनेक गोष्टी साठवत त्याचा योग्य वापर करून तीच आम्हाला आश्चर्याचे धक्के देत असते.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

घरात काम करताना गाणं ऐकण्याची सवय मला पहिल्यापासूनच आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम काहीही चालतं ऐकायला. सखी साधारण सहाच महिन्याची असेल. रविवारची सकाळ होती. तिच्या बाबांच्या मांडीवर खेळत होती. मोबाईलवर कुमार गंधर्वांचं ‘उठी उठी गोपाळा’ हे गाणं लागलं होतं. आम्हाला समजलंदेखील नाही आणि तिनं उजव्या हातानं डाव्या पायाचा अंगठा पकडून गाण्याचा ठेका धरला. त्या क्षणी आम्हाला जाणवलं- हिला गाणं आवडतंय. तो क्षण आम्हा सगळ्यांनाच चकित करणारा होता. या सगळ्याचा संदर्भ म्हणजे, तिच्या जन्मापासून कायमच गाणी ऐकत ती झोपली आहे. ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘नीज माझ्या नंदलाला’, ‘सुरमयी अखियोंमे’, ‘दो नैना इक कहानी’ अशी तिची आवडती गाणी. ही फक्त झोपतानाच ऐकायला आवडतात. अगदी पाळण्यात असल्यापासून ती ही गाणी ऐकत आली आहे. त्यामुळे संगीत कुठेतरी तिच्यात आहे, हे हळूहळू समजायला लागलं. मराठी, हिंदी आणि आता शाळेमुळे इंग्रजी बडबड गीतं तर तिला असंख्य पाठ आहेत. ती पोटात असतानादेखील मी वाद्यसंगीतापासून शास्त्रीय संगीत आणि चित्रपट गीतांपर्यंत सगळी गाणी भरपूर ऐकली होती. मुळात गाण्याचं थोडंफार शिक्षण झाल्यामुळे मला मनापासून ऐकण्याची आवड आहे. तीच आवड तिच्यात आल्याची जाणीव आम्हाला होऊ लागली. त्यामुळे तिला गाणं ऐकण्यासाठी आणि म्हणण्यासाठी आम्ही प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

अडीच वर्षांची असताना प्ले ग्रुपला घातल्यानंतर तिच्यात अनेक बदल झाले. आपण मूल उगाचच शाळेत अडकवतो आहोत, असा एक विचार मनात आला होता. पण मी रोज दीड तास ज्या ३० मुलांच्या घोळक्यात तिला सोडत होते, तिथं तिनं भरपूर मित्र-मैत्रिणी गोळा केले. मुळात ती मला चिकटून राहणारी नाही. सुटवंग आहे. त्यामुळे शाळा बघायला गेल्यानंतर लगेचच ती १५ मिनिटं त्या शाळेत रमली. त्यामुळे तिला तिथं घालायला हरकत नाही अशी माझी खात्री झाली. तिला मनापासून शाळा हा प्रकार आवडू लागला. शनिवार आणि रविवारीदेखील शाळेत जायचं म्हणून ती रडायची. खूप समजवावं लागायचं. तिथल्या गोष्टी, गाणी, नाच यात तिला रस होता याचं मला समाधान वाटलं.

प्ले ग्रुपच्या गॅदरिंगमध्ये नियोजित कार्यक्रमाखेरीज उत्स्फूर्तपणे स्टेजवर जाऊन गाणं म्हणणारी ही एकमेव मुलगी होती. त्यामुळे तिला समोर बसलेल्या माणसांची, गर्दीची भीती वाटत नाही, हे लक्षात आलं आणि अधिकाधिक कविता, गाणी ऐकवून किंवा स्वतः म्हणून दाखवून, कधीतरी हातवारे करून शिकवणे असे प्रकार आम्ही सुरू केले आणि ते ती चटकन आत्मसात करते. त्यामुळे पाच मनाचे श्लोक, भगवद् गीतेचा बारावा अध्याय, काही स्तोत्र तिला शिकवली. मुळात हे सगळं म्हण, असं तिला कधीच संगितलं नाही. ‘तू फक्त समोर बस. मी म्हणते आणि तू ऐक’ असं सांगितलं. त्यामुळे तिला मजा वाटायची. आपल्याला म्हणायचं तर नाहिये. फक्त बसायला काय हरकत आहे, याच विचाराने ती पाच–दहा मिनिटं बसत गेली आणि आपोआप या गोष्टी तिच्या मेंदूनं टिपल्या आणि तिला पाठ झाल्या.

मुलगी आहे म्हणून काळजी करावी, असं तिच्याबाबतीत कधीच वाटलं नाही. कारण प्ले ग्रुप आणि नंतर मोठ्या शाळेच्या नर्सरीमध्ये घातल्यानंतर पहिल्याच पेरेंट्स मीटिंगमध्ये ती वर्गात खूप बोलत असते, दंगा करते, अशा तक्रारी आल्या होत्या. मनातल्या मनात पालक म्हणून आम्हाला निर्धास्त वाटत होतं, गंमतही वाटत होती. मूल बोलत नसेल, चार पोरांमध्ये मिसळत नसेल, त्याला बोलतं करण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागत असतील तर ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे दंगा करण्याचं हेच वय आहे, करू दे, असं म्हणून आम्ही फक्त ऐकून घेतलं. ती टॉम बॉय आहे असं तिच्या शिक्षिकांनी सांगितलं. मग म्हटलं काय हरकत आहे. असू दे. आता मुलींनी असंच रहावं लागतं. तिचे बाबा मूळचे कोल्हापुरातले असल्यामुळे कोल्हापूरचं पाणीही ती दाखवतेच. थोडी अग्रेसिव्ह आहे. शाळेत ती मुलींची लीडर असते. तिच्या बेस्ट फ्रेंड्सना कोणी त्रास दिला तर हीच त्या बाकी मुलांशी पंगा घेते. तिच्या गुंडगिरीला आम्ही खतपाणी घातलं नाही, पण तिच्या या स्वभावाला मुरडही घातली नाही.  कारण आज अशा अटिट्यूडची गरज आहे, असं मला वाटतं. या वयातल्या मुलांच्या वागणुकीत होणाऱ्या लहान-मोठ्या बदलांवर आजूबाजूच्या परिस्थितीचा खूप गंभीर परिणाम होत असतो, हे मला या काळात प्रकर्षानं जाणवत आहे.

सखीला काही महिन्यांपूर्वीपर्यंत रोज दोन्ही वेळेस जेवताना मोबाईल किंवा टीव्हीवर बालगीतं बघण्याची सवय लागली होती. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांतली. ती टीव्हीवर बघायची तोपर्यंत ठीक होतं, त्याचा कंट्रोल आमच्या हातात असायचा. पण मोबाईल हातात घेतला की सगळंच संपायचं. तास अन् तास ती त्यात रमत होती. संध्याकाळच्या वेळी इतर मुलांशी खेळण्याची आवड संपत आली होती. घरात कोणी पाहुणे आले तरी बोलायचं नाही, आतल्या खोलीत पळून जायचं असं ती करायची. हे सगळं आमच्या लक्षात थोडं उशीरा आलं. पण वेळ निघून गेलेली नव्हती. असंच एकदा शाळेतल्या शिक्षिका म्हणाल्या, ‘ही मुलांना वर्गात खेळता खेळता मारते. घरात इतर भावंडं कोणी आहेत का? कोणाचं पाहून असं करते. तुम्ही तिला पाळणाघरात ठेवताय का?’ वगैरे वगैरे. हे प्रश्न समोर आल्यानंतर मी स्तब्धच झाले. त्या मागची कारणं शोधू लागले. दोनच दिवसांत लक्षात आलं, की तिने मोबाईल घेतल्यानंतर यू-ट्यूबवर तिला हवी ती नर्सरी ऱ्हाइम्स बदलण्याचं स्वातंत्र्य तिला राहतं. आणि बालगीतं कमी पण त्यात असलेल्या अक्टिव्हिटी प्रकारचे काही व्हिडिओ ती सतत बघायची. म्हणजे अंक, रंग, आकार यांची ओळख सांगणारे व्हिडिओ. पण त्यात दंगा करणारी मुलं, आईच्या विनाकारण खोड्या काढून त्रास देणारी मुलं अशा व्हिडिओंचं प्रमाण अधिक होतं. मग हेच सगळं बघून तर ती असं वागत नाही ना, याचा कयास लावला आणि तातडीने तिचं व्हिडिओ बघणं पूर्णपणे बंद केलं. सवय हळूहळू बंद करावी असं घरातल्यांनी सुचवलं. पण जितक्या कमी काळात ते थांबवता येईल ते आम्हाला दोघांना करायचं होतं. त्यामुळे आजी-आजोबांना कितीही कणव आली तरी तिला मोबाईल हातात द्यायचा नाही, या गोष्टीवर आम्ही ठाम होतो. निक्षून घरात सगळ्यांच्या मोबाईलला अप्लिकेशन लॉक, फोन लॉक इत्यादी सगळ्या गोष्टी केल्या. पहिले तीन-चार दिवस जेवताना रडारड झाली. एक – एक वेळ ती जेवली नाही. दोनच घास खाल्ले आणि जेवण थांबवलं. पण त्याला पर्याय नव्हता. किती दिवस न जेवता राहील, भूक लागली की आपोआप काहीतरी खाईलच या विचारानं आम्हीही थोडं शांत राहिलो. मग एक कल्पना सुचली. घरात तिच्यासाठी झोका बांधला होता. त्यावर तिला बसवून मी भरवायला सुरुवात केली आणि तिला जी गाणी मोबाईलवर बघायची असतात ती सगळी मी स्वतः म्हणू लागले. तीनही भाषांमधली. अगदी २०-२५ बडबड गीतं मी सकाळ – संध्याकाळ तिच्यासाठी म्हणत होते आणि ते ऐकताना ती जेवत होती. त्याचा परिणाम चांगला झाला. थोड्याच दिवसांत तिला मोबाईल, टीव्ही यावर गाणी बघण्याचा विसर पडला. इतर रिकाम्या वेळात तिला काहीतरी कोरे कागद, रंग देऊन गुंतवू लागले. कधीतरी कात्री, कागद, फेव्हिकॉल घेऊन टाकाऊमधून टिकाऊ वस्तू किंवा हस्तकलेचे लहान लहान प्रयोग आम्ही करत गेलो. हार्मोनिअम घेऊन संगीताचे अलंकार शिकवायला सुरुवात केली. ती आपोआप इतर गोष्टींमध्ये रमली. या सगळ्या प्रयोगांचा सकारात्मक रिझल्ट म्हणजे पुढच्या पेरेंट्स मिटिंगमध्ये शिक्षिकेनं सखीचं कौतुक केलं. मला म्हणाल्या, ‘तिच्या वागण्यात फारच बदल झालाय. खूप शांत झाली आहे ती. वर्गात जरा बडबड करते, पण पूर्वीसारखी ती आता राहिली नाही. तुम्ही या गोष्टीवर विशेष लक्ष दिलंत असं मला वाटतंय. काय केलंत नेमकं?’ असं म्हणून मलाही त्यांनी सगळं विचारून घेतलं. आणि तिच्यात झालेल्या बदलाचं पुन्हा कौतुक केलं. आम्हाला दोघांनाही एक मोहीम फत्ते केल्याचा आनंद झाला. खूप समाधान वाटलं. मुळात तिच्याबरोबर २४ तास घरात मीच असले तरी तिच्यासाठी घेतलेल्या काही निर्णयांना तिच्या बाबांनी मला साथ दिली. त्यामुळे आम्ही अगदी नियमितपणे काही वेळा कठोरपणे आमचा नेम सुरू ठेवला.

तिला शाळेत पोचवणं आणि परत आणायचं ही दोन्ही कामं माझ्याकडेच असल्यामुळे या काळात आम्ही दोघी खूप मजा करतो. गाडीवर गाणी म्हणतो. श्लोक म्हणतो. शाळेतल्या स्पर्धेची तयारी करतो. गप्पा मारतो. ती गाडीवर पुढे उभी राहिली की असंख्य प्रश्न विचारते. अगदी शेजारून जाणारी बस कोणाची आहे, ती कोण चालवतंय, ती कुठे चालली आहे, सिग्नलचे दिवे का बदलतात, चौकाचौकात दिसणाऱ्या १०८ नंबरच्या अम्ब्युलन्स काय करतात, त्या रोज इथेच का उभ्या असतात, आजूबाजूला इमारती कोणत्या आहेत, मग रस्त्यावर दिसणारी दुकानं कशाची आहेत, ते काय विकतात असं सगळं सगळं ती विचारते. आणि मीही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देते. मुलांच्या प्रश्नांना नकार कधी द्यायचा नाही किंवा गप्प बस तुला काय करायचंय, असं कधी सांगायचं नाही, हे मी फार पूर्वी ऐकलं होतं. तेच मी आता अमलात आणल्यावर लक्षात आलं की, तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिल्यामुळे पुढे आणखी प्रश्न विचारायची तिची उत्सुकता वाढते. तिच्या डोक्यात प्रश्नांचं चक्र सुरू होतं, हे मला बरं वाटलं; आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, दिलेलं प्रत्येक उत्तर ती लक्षात ठेवते आणि त्याचा कुठे ना कुठे वापर करते.

साधं उदाहरण म्हणजे, १०८ नंबरची अम्ब्युलन्स तिनं रस्त्यात पाहिली. गाडीवरचा दिवा आणि चिन्ह यावरून ती कसली गाडी आहे, एवढं तिला कळतं. आता आकडेदेखील कळतात. त्यामुळे १०८ हे आकडे कशाचे आहेत, असं तिनं मला विचारलं. मी तिला सांगितलं की, ‘‘रस्त्यात जर कोणी गाडीवरून पडलं आणि त्याला खूप लागलं असेल, तर आजूबाजूचे लोक या नंबरवर फोन करून ही गाडी बोलवतात. यात डॉक्टर असतात. मग ते दवाखान्यात नेतात आणि औषध लावतात. मग लोक बरे होतात.’’ काही दिवसांनी घरात माझ्या कानावर पडलं. ती तिच्या खेळातल्या मोबाईलवर बोलत होती.. ‘‘इथं गाडी पडली आहे. लोकांना बाऊ झाला आहे. तुम्ही लवकर या...’’ म्हटलं, हे काय चाललंय! पाहिलं, तर तिच्या शेजारीच खेळातली कार आणि जेसीबी यांची धडक झाली होती. म्हणून तिने अम्ब्युलन्सला फोन केला होता. तेव्हा या गोष्टीचीही जाणीव आम्हाला झाली की, मूल जसं टिपकागदाप्रमाणे सगळं टिपतं, तसंच सगळ्या गोष्टी अमलातही आणतं. त्यामुळे त्यांना सगळं खूप काळजीपूर्वक सांगावं लागतं. मात्र जे सांगायचं, ते खरंच असलं पाहिजे. अन्यथा ‘मला आत्ता माहीत नाही, मी नंतर सांगेन’, असं तरी सांगायचं, हे मी ठरवून टाकलं.

दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर कसं तपासतात, काय बोलतात याचंही ती बारीक निरीक्षण करते आणि ते सगळे प्रयोग घरात बाहुल्यांवर करते. अलीकडेच घडलेला असाच एक गमतीदार किस्सा. घरात पेनड्राइव्हचं एक प्लॅस्टिक आणि थर्माकोलचं कव्हर होतं. त्यांचा आकार कमोडच्या भांड्यासारखा होता. अनेक दिवस ते हॉलमध्ये सखीच्या खेळण्यात पडून होतं. जसा तिला कमोड हा प्रकार समजला, तसा तिने तो पेनड्राइव्हचा बॉक्स तिच्या खेळण्यातल्या घरात एका कोपऱ्यात ठेवला आणि भातुकली खेळताना सगळं घर सजवून मला बघायला बोलावलं. वर आवर्जून सांगितलं, ‘‘आई, बघ, आता माझ्या घरात कमोड आहे’’. मी पुन्हा अचंबित!

सखीला लहानपणापासूनच शहाळं खूप आवडतं आणि ठाण्यात उन्हाळा कायमच जाणवत असल्यानं शाळेतून घरी येताना मी अनेकदा तिला शहाळं घेऊन द्यायची. एकदा शहाळं घेऊन दिल्यावर त्या गाडीवरची बाकीची रंगीत फळंदेखील तिला खुणावायला लागली. शाळेत नुकतीच फळांची, रंगांची ओळख सुरू झाली असल्यामुळे तिनं प्रत्येक फळाचं नाव घेऊन ते मागायला सुरुवात केली. घरी आधीच केळी आणलेली होती, पण तिचा फारच हट्ट सुरू झाला. अखेर मी पर्स काढली, ती शहाळं पीत असताना तिच्या नकळत सगळे पैसे दुसऱ्या कप्प्यात टाकले आणि तिला रिकामी पर्स दाखवली. म्हटलं, ‘‘पिल्लू, माझ्याकडे आता काहीच पैसे नाहीयेत. आत्ताच मी तुला शहाळं घेऊन दिलं. घरी केळी पण आहेत. आता मी बाकीची फळं कशी घेणार? संध्याकाळी बाबा ऑफिसमधून आले की, मी त्यांच्याकडून पैसे घेते आणि मग उद्या आपण दुसरं काही तरी घेऊ.” तिला पटलं. मलाही समाधान वाटलं की माझा प्रयोग यशस्वी झाला. कारण मुलांच्या प्रत्येक हट्टाला होकार देत तो पुरवत गेलं तर त्याचा त्रास पुढे आपल्यालाच होणार हे नक्की. आईकडे कधीकधी  पैसे नसतात, हे तिला इतकं पटलं की एकदा मॉलमध्ये गेल्यावर तिने आइस्क्रिम मागितलं. मी सहज नको म्हणलं. तर मला पुढे येऊन म्हणाली, “मग उद्या घेऊ या का? आत्ता आपल्याकडे पैसे नाहीयेत का?’ क्षणभर मी काही चुकीचं करतेय का, हेच मला समजत नव्हतं. पण काही वेळा आपली आवड बाजूला ठेवायची असते, ही गोष्ट तिला पटावी, हाच माझा उद्देश होता. 

मार्च महिन्यात काश्मीरच्या टूरमध्ये आम्ही अमृतसर, वाघा बॉर्डरला जाऊन आलो. संचलन बघायला जाताना वाटेत अनेक विक्रेते तिरंगा, टोप्या, गॉगल्स विकायला येतात. खूप जास्त आग्रह करतात. एका विक्रेत्याला असंच वारंवार ‘नही चाहिये भैया’, आणखी कोणाला ‘नही बहनजी, नही चाहिये’ असं मी सांगत होते. खूप वैताग आला होता. अशातच मी पुटपुटले, ‘काय हे किती मागे लागतात हे लोक? नको म्हटलं तरी ऐकत नाहीत.’ काही वेळाने एक विक्रेता बरोबर लहान मूल हेरून सखीला म्हणाला, ‘बेबी तिरंगा ले लो, ये कॅप ले लो.’ त्याला वाटलं हे बारकं पोरगं लगेच आई-बापाकडे हट्ट करेल, पण काय मजा. ती उलट ओरडून म्हणाली, ‘अरे नहीं चाहिये बोला ना.. बार बार क्यू आता है?’ तो विक्रेता पण चमकलाच. मनापासून हसला. ‘क्या लडकी है दीदी!’ असं माझ्याकडे पाहून बोलला आणि निघून गेला. असंच फुगेवाल्यांच्या बाबतीत. काही विक्रेते तर लहान मुलांच्या हातात फुगे देतात आणि मग आपल्याकडे पैसे मागतात. पण सखीला एकदा नको म्हणून सांगितलं की, ती थेट विक्रेत्याशीच पंगा घेता. फुगा त्याच्या हातात देऊन, ‘अरे भैया नही चाहिये, नही चाहिये’ असं म्हणत तिची नकार घंटा सुरू ठेवते. 

काही महिन्यांपूर्वी बिल्डिंगची लिफ्ट बदलण्याचं काम सुरू होतं. नवीन लिफ्ट बसवल्यानंतर त्यात लावलेलं कंपनीचं प्रमाणपत्र सखीच्या नजरेस पडलं. लगेचच प्रश्न आला, ‘आई हे काय लिहिलंय?’ मी म्हटलं, ‘या लिफ्टमध्ये किती माणसांनी उभं राहायचं, ही लिफ्ट कोणत्या कंपनीने बनवली ते लिहिलंय.’ ‘मग कोणत्या कंपनीने बनवली आहे?’ म्हटलं, ‘रॉयल एलिव्हेटर्सने बनवली आहे.’ हा एकच प्रश्न ती मला अनेक दिवस विचारायची. जेव्हा आम्ही त्या लिफ्टमधून खाली–वर करायचो, तेवढ्या वेळा ती रॉयल या अक्षरांकडे माझं लक्ष वेधून विचारायची, हे काय लिहिलंय. मीसुद्धा तिला कायम तेच उत्तर दिलं. तिला अजूनही शब्द वाचता येत नाहीत. पण इंग्रजी आणि हिंदी बाराखडीच्या अक्षरांची ओळख आहे. या सगळ्या ज्ञानातून आणि निरीक्षणातून तिनं मला एकदा अचंबित केलं. असंच शाळेतून येताना वाटेत काही घेण्यासाठी मी गाडी थांबवली. शेजारी रॉयल इनफिल्ड गाडी होती. सखी गाडीवरून उतरली आणि खूप आनंदानं म्हणाली, ‘आई, हे बघ ही रॉयलची गाडी आहे ना…’ मला आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या डोक्यात चक्र सुरू असतानाच ती म्हणाली, ‘आपली लिफ्ट रॉयलने बनवली, तशीच ही गाडी पण रॉयलने बनवली ना?’ मला आणखी एक धक्का.

टीव्हीवरच्या सगळ्या चॅनलची नावं लक्षात ठेवणं, जाहिरात कंपन्या लक्षात ठेवणं हे याचंच उदाहरण आहे. इवल्याशा वयात रस्ते, चौकदेखील तिच्या लक्षात राहतात. अगदी सोसायटीत नवीन चेहरा दिसला, कुरिअर घेऊन कोणी आलं तर ती व्यक्ती कोण आहे, तिच्या सॅकमध्ये काय आहे, इथपर्यंत प्रत्येक गोष्ट तिला जाणून घ्यायची असते. घरापासून तीन किलोमीटर लांब असलेल्या एका सलूनमध्ये तिला तिच्या बाबांनी हेअरकट करायला एकदा नेलं. काही दिवसांनी त्याच रस्त्यानं आम्ही दोघी गाडीवरून जात होतो. तर तिनं मला लगेच ते दाखवलं, ‘हे बघ इथं बाबा आणि मी केस कापायला आलो होतो. राउंड अँड राउंड गाडीवरून चक्कर मारून इथे आलो.’

सखीला काही लागल्यावर, ती रडल्यावर मी तिला जसं जवळ घेते, जशी मिठी मारते किंवा रात्री तिला कुशीत घेते, तसंच ती घरात मला किंवा तिच्या बाबांना करते. रात्री कधीतरी बाबांनी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं तर त्यांना थोपटवून ती स्वतः अंगाई गाते. एखाद्या दिवशी माझं डोकं दुखतंय असं तिला समजलं तर ती चेहऱ्यावरून हात फिरवते, मला जवळ घेते. ‘कुशीत ये आणि झोप’ असं सांगते. स्पर्शानं नातं अधिक घट्ट होतं. दिवसातून शंभर किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ती मला मिठी मारते आणि मुका घेते. घरात बाकीच्यांना खूप ठासून सांगते, ‘ही माझी आई आहे आणि मी तिची पिल्लू आहे.’ आता तर नवीन म्हणजे मला म्हणते, ‘तुझी आई लांब राहते ना, पुण्याला. मग मी तुझी आई आहे आणि तू माझी पिल्ली आहेस!’ असं म्हणून खूप घट्ट मिठी मारते.

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

सीमा शेख – देसाई

seemashaikh11@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......