अजूनकाही
गाणं-गायकी हे मी लहानपणापासून अनुभवत आहे. लग्नानंतरही त्यात कुठल्याही प्रकारे खंड पडला नाही. पण आईपणाची सरगम मला माझ्या मुलांनीच शिकवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मातृत्वाची पहिली जाणीव मला राहीकडूनच मिळाली. राही आज सात वर्षांची आहे, तर रिहान चार वर्षांचा. पण या दोघांच्या बाललीळा आणि त्यांच्या चकित करणाऱ्या समंजसपणाने मी रोज नव्याने समृद्ध होते. राहीच्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा मी गर्भवती होते, तेव्हा माझ्यासाठी तो ट्रान्झिशनचा काळ होता. गोंधळ नव्हता मात्र आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यात शिरताना आता आपण एकटा स्वतंत्र जीव नसून आपल्यासोबत आणखी एक जीव आहे याची जाण होती मनाच्या, रियाजाच्या तळाशी. त्यावेळेस गाणं सोडलेलं नव्हतं, पण जाहीर कार्यक्रमांचे प्रमाण कमी केलं होतं. अगदी आठव्या महिन्यांपर्यंत गाण्यांचे कार्यक्रम सुरू होते. अर्थात बाहेरगावचे कार्यक्रम नव्हते, मात्र पुण्यातले आणि आसपास कार्यक्रम करत होते. प्राधान्यक्रम आता बदलला होता. साहजिक काही अंशी करिअरच्या सुरेल प्रवासाची मळलेली पायवाट बदलणार होती. आता नव्या जीवासह नवे निर्णय, नवे टप्पे येणार होते. मनात असे सारे निरनिराळे प्रश्न होतेच. पण त्यांची उत्तरंही अलगद मिळत गेली. मुख्य म्हणजे माझ्या चिमुकल्या मुलांसह घरातली सपोर्ट सिस्टम खूपच महत्त्वाची ठरली.
राही अगदी दीड महिन्यांची होती, तेव्हा मी गाण्यांचा कार्यक्रम करण्यासाठी घराबाहेर पडले होते. मनात हुरहूर होती. चलबिचल होती. अनेक भावनांचे हिंदोळे होते. इवलीशी आपली लेक तिला सोडून जायचं... पण कुठल्यातरी क्षणी हे घडणारंच होतं. आमचं एकत्र कुटुंब असल्यानं सुदैवानं मला माझ्या पतीसह सासू-सासऱ्यांचं पाठबळ मुबलक होतं, आहे. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माझी या क्षणासाठी मनाची तयारी केली. मुळातच मी जरा ‘होमसिक’ वर्गात मोडणारी आहे. बाहेरगावचे कार्यक्रम असले की कार्यक्रमापलिकडचा एखादा जास्तीचा दिवस राहायची वेळ आली की, मला लगेच घरची आठवण येते. आता तर राहीची भर पडली होती. पण घरातल्यांनी सांभाळून घेतलं. करिअर थांबलं नाही तर त्याचं स्वरूप बदललं. त्यातले प्राधान्यक्रम बदलले. सुरुवातीला वाटलं की, माझ्याच आयुष्यात हे बदल घडलेत आणि ते मी स्वीकारलेत. पण नीट पाहिल्यावर लक्षात आलं की, हे बदल मी स्वीकारले नव्हते, तर माझ्याही आधी माझ्या मुलीने ते स्वीकारलेले होते. तिचा हा समजूतदारपणा मला नेहमीच चकित करतो.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq
.............................................................................................................................................
आजही जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमातून परतते, तेव्हा राही-रिशान माझी वाट पाहत असतात. “आई तू आलीस की छान वाटतं,” असं जेव्हा ती म्हणते तेव्हा कार्यक्रमाचा शीण जातो. आपली मुलं आपली वाट पाहतात, त्यांनाही आपल्यासारखीच भेटीची ओढ आहे हे खूप सुखावणारं आहे. दरवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाऊनही त्यांना त्यांच्या ते अंगवळणी पडलेलं नाही. ‘हं आपली आई जातेच’ अशी सवय झाली नाही. अनेकदा मुलं आपल्या आईबाबांपासून पटकन तुटण्याची शक्यता असते. त्यांना आई बाहेर असते की घरात, याचं अप्रुप वाटेनासं होतं. तसं माझ्याबाबत अजिबात घडलं नाही. मुलांना हूरहूर लागून राहते. आपली आई इतर मैत्रिणींच्या आईपेक्षा वेगळी आहे. तिला गाणं सादर करण्यासाठी पुण्याबाहेरही जावं लागतं. पुण्यातही कार्यक्रम असला तरी परतायला रात्र होणार हे त्यांनी इतक्या सहज समजून घेतलंय की, त्याचं ते समजून घेणं थक्क करणारं आहे. त्यांच्यातील हा समंजसपणा, पेशन्स मी आता नव्यानं त्यांच्याकडून शिकत आहे. ती छानरीत्या मोठ्यांना समजून घेतात. त्यांच्या अडचणींच्या आणि गरजेच्या वेळा समजून घेतात, हे फार गोड वाटतं.
आणखी एक गोष्ट. मी गायिका आहे आणि नाही म्हटलं तरी माझ्या क्षेत्राला एक वलय आहे. आज इतक्या वर्षानंतर माझ्या गायिकीनं मला एक ओळख दिली आहे. त्यातून प्रसिद्धीही आपोआप वाट्याला येते. मात्र सुदैवानं राहीला या गोष्टीनं फार फरक पडत नाही. माझा नेहमीच प्रयत्न राहिला की, आपल्या मुलांना प्रसिद्धीची हवा लागू नये. त्यांचे पाय कायमच जमिनीवर राहायला हवेत, अशी आई म्हणून माझी तीव्र इच्छा आहे. मात्र अनेकदा आपण याबाबत कितीही कटाक्ष पाळला तरी मुलांना शाळेत-बाहेर आपल्या पालकांच्या वलयामुळे मिळणारी वागणूक त्यांच्या डोक्यात भलत्यासलत्या कल्पना घर करण्याची शक्यता असते. मात्र तसं माझ्या सात वर्षांच्या राहीबाबत घडलं नाही. तिला जर कुणी तिच्या मैत्रीणीनं सांगितलं की, तुझ्या आईला टीव्हीवर पाहिलं किंवा ‘अगं तिच्या कार्यक्रमाचा पोस्टर पाहिला’ यावर ती अत्यंत शांतपणे प्रतिसाद देते- “हो का! नाही मी तर नाही पाहिलं. असेल तिचा कार्यक्रम” असं ती अगदी सरळपणे म्हणते. तिचे मातीचे पाय आम्हालाही जमिनीवरच राहण्यास उद्युक्त करतात.
वयाच्या मानानं तिच्यात खूप प्रगल्भता आहे. कुठलाही बालीश हट्ट ती करत नाही. काही वेळा आमच्या कार्यक्रमाच्या वेळांप्रमाणे घरातील वेळापत्रक जुळवून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ राहीची परीक्षा आणि माझ्या कार्यक्रमांचे दिवस जर एकाच वेळेस असतील तर मी तिचा अभ्यास बऱ्याच आधीपासून घ्यायला लागते. त्याबाबत तिला सांगते की, तुझ्या परीक्षेच्या दिवसांत कार्यक्रमाची तयारी सुरू असेल. त्यामुळे आपण आधीपासून अभ्यास करूयात आणि आपण आधीपासून अभ्यास केला की, आपल्याला परीक्षेच्या दिवसात त्रास होत नाही. तिच्याशी असं स्पष्ट बोलल्यामुळे तीही तिच्याबाबत घडणाऱ्या गोष्टीसुद्धा शेअर करते. मोकळेपणाने सारं काही मांडते.
काही काही वेळा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना किंवा दिवसांना बाहेरगावी जावं लागतं. मात्र त्याही वेळेस ती अत्यंत छान समजून घेते. “आत्ता तुझं कार्यक्रमला जाणं ठरलेलं आहे ना, तर मग आमची काळजी करू नको. तू जा. फक्त कार्यक्रम झाला की लगेच निघ,” अशा शब्दांत ती हिंमत वाढवते. परगावी गेल्यावर बॅग उघडली की, त्यात गुपचूप ठेवलेली एखादी चिठ्ठी सापडते. त्यावर मोठ्या ठळक अक्षरांत लिहिलेलं असतं- ‘मिस यू’. या छोट्या छोट्या गोष्टीतील तिची संवेदनशीलता आणि प्रगल्भता दोन्हींनं आम्ही घरातले चाट पडतो. नि:शब्द होतो. हा ओलावा टिकवून ठेवण्यात मुलांचा वाटा सर्वाधिक आहे.
एकदा पुण्यातच कार्यक्रम होता. घरी पोहचायला रात्रीचे साडेअकरा झाले. दोन्ही मुलं झोपली असतील या विचारानं मी घरात प्रवेशले, तर दोघंही जागे होते. “आई दमली असशील ना” म्हणत दोघांनी मानेभोवती हात टाकला. सासूबाई जेवण घेऊन आल्या तर मुलीनं हट्ट केला की आई मी भरवते आणि तिने दहीभात भरवला. त्याक्षणी भरून आलं. मुलं अशी छोट्या गोष्टीतून सुख कसं द्यायचं हे छान जाणतात. त्या अद्वितीय सुखानं मुलांबरोबरचा बंध अधिक दृढ झाला.
राही अभ्यासातही हुशार आहे. आमच्या घरात वाचनाची आवड आहे. तिची आवड तिनेही आत्मसात केली आहे. झोपण्याआधी तिला काहीतरी वाचायला लागतं. मलाही अशीच सवय आहे. काही वेळा माझ्या या सवयीत खंड पडतो, मात्र तिच्या नाही. आम्ही घरात असलो की, पूर्ण वेळ एकमेकांच्या सोबत असतो. त्यांच्या शाळांच्या वेळात मी माझा रियाज आणि इतर कामं करते. ती घरी आली की, मात्र माझा वेळ राही-रिशानचा असतो. पेटिंग, होम गार्डींगमध्ये तिला फार रस आहे. ‘नॅशनल जिओग्राफीक’ चॅनेल आम्ही एकत्रित पाहतो. पोहायला आणि बॅडमिंटन एकत्र खेळतो.
शाळेतही ती शिक्षकांची लाडकी आहे. अभ्यास, इतर उपक्रम असो किंवा घरातला वावर ती अगदी निगुतीने आणि मनापासून सगळ्यात सहभागी होते. तिला गाण्याची आवड आहे, पण तिने गायिका व्हावं कि नाही हा तिचा निर्णय असेल. आजवर तरी मी तिला कुठल्याही गाण्यासाठी किंवा बंदीशसाठी जबरदस्ती बसवलेलं नाही. अद्याप असं काही शिकवलंही नाही. पण तिच्यात जर उपजतच आवड निर्माण झाली तर ते रोखण्याचा प्रश्नही नाही. तिच्यासाठीचा निर्णय खुला आहे. ती इतक्या समजुतीनं आजवर वागत आली की, नकळत तिनेच आम्हाला प्रत्येकाचा अवकाश समजून घेण्याची कला शिकवली आहे.
मुलांकडून शिकण्यासारखं काही असेल तर ते म्हणजे निस्वार्थी प्रेम कसं करावं हे. आई आपल्याजवळ नसेल तरी तिची काळजी करत राहणं, तिच्यावर प्रेम करत राहणं हे गुण या राही-रिशानेच शिकवले आहेत. राहीच्या बरोबरीच्या इतर मुलींपेक्षा तिच्यात भरपूर प्रगल्भता आहे. तिला काही सांगायला अगर शिकवायला जावं लागत नाही. तिला ते आधीपासूनच माहीत असतं. साधारणत: तिच्या वयाची मुल-मुली जंक फुड खातात, पण ती असे पदार्थ स्वत:च नाकारते. असे अनेक अनुभव रोज येतात. आम्हाला तिला काही वेगळं सांगावंच लागत नाही. तिचं पाहून रिशानही तसाच समजूतदारपणे वागतो.
आजच्या काळात मात्र मुलींबाबतच्या वाईट घटना ऐकल्या की मन घाबरतं. हळवं होतं. याचा अर्थ तिला कोंडून तर ठेवू शकत नाही. अशा वेळी तिला कळेल असं ‘गुड टच’, ‘बॅड टच’ याविषयी सांगून ठेवलं आहे. ती अगदी पहिलीत होती, तेव्हाच तिच्या मनात या गोष्टी बिंबवल्या आहेत. मनानं खंबीर राहण्यास मी तिला सांगायला जाते आणि अनेकदा तिच्या मनाची खंबीरता पहायला मिळते आणि आम्ही रोज नव्याने चकित होतो. तिच्यामुळे जाणिवांनी समृद्ध होतो.
शब्दांकन - हिनाकौसर खान-पिंजार
.............................................................................................................................................
‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखिका सावनी शेंडे प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment