आयुष्याला सर्वाधिक परिपक्व करणारी भूमिका ही ‘आई’चीच आहे!
पडघम - बालदिन विशेष
नयना आगलावे
  • नयना आगलावे आपल्या लेकीसह
  • Wed , 14 November 2018
  • पडघम बालदिन Children's Day १४ नोव्हेंबर 14 November नयना आगलावे Nayana.Agalave

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. त्याचबरोबर एम.फिल.साठीही प्रवेश घेतला होता. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करताना पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फिजिकलच्या मैदानी चाचणीतही चांगले गुण मिळाले.

दरम्यान माझ्या आणि दीपकच्या लग्नाला दोघांच्या घरच्यांकडून संमती मिळाल्याने आम्ही आनंदात होतो. यथावकाश आमचं लग्न पार पाडलं.

लग्नानंतर तीन-चार महिन्यांतच मी पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला. नाशिकच्या पोलीस अकादमीतून एक वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मला पहिलं पोस्टिंग मुंबई मिळालं. बोरीवलीच्या (पूर्व) कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात मला नेमणूक देण्यात आली. दीपक पुण्यात पत्रकारिता करत होता. त्याचं पुणे-मुंबई अप-डाऊन सुरू झालं.

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत संजय गांधी नॅशनल पार्क, अनेक झोपडपट्ट्या, उच्चभ्रू वसाहती असा मोठा परिसर आहे. यापूर्वी कधीही पोलीस ठाणं न पाहिलेल्या माझा पोलीस अधिकारी म्हणून प्रवास सुरू झाला. मुंबईत नव्याने रुजू झालेले आम्ही सर्व प्रोबेशनरी पीएसआय पोलीस खात्याचा एक भाग बनून दररोज नवनवीन गोष्टी शिकायला लागलो. काही दिवसांमध्येच स्टेशन हाऊसची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यात आली. सकाळी ९ ते रात्री ९ किंवा रात्री ९ ते सकाळी ९ अशी १२-१२ तासांची ड्युटी आम्हाला पार पाडावी लागत होती. स्टेशन हाऊस ड्युटीच्या काळात घडलेल्या चोरी, खून, मारामाऱ्या, बलात्कार, अपघात आदी स्वरूपाच्या सर्व गुन्ह्यांची फिर्याद दाखल करून घेणं, घटनास्थळी जाऊन पंचनामे करणं आदी जबाबदाऱ्या स्टेशन ऑफिसरवर असत. आमच्या ड्युटीच्या काळात घडलेले सर्व गुन्हे नोंदवले गेल्याशिवाय घरी जाता येत नसे. त्यामुळे १२ तासांची ड्युटी असली, तरी प्रत्यक्षात त्याहीपेक्षा जास्त वेळ पोलीस ठाण्यात थांबावं लागे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत एखादी मोठी रेड वगैरे पडली, तर दोन-दोन दिवसही घरी जायला मिळत नसे. असं धावपळीचं आयुष्य सुरू होतं. यातून खूप काही अनुभवायला मिळत होतं, खूप काही शिकत होते.

पोलीस खात्यात महिला अधिकाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढते आहे. त्यामुळे खात्याचा चेहरामोहरा वेगाने बदलतो आहे. फिर्याद द्यायला येणाऱ्यांशी महिला अधिकारी अधिक संवेदशनशीलपणे वागतात. तक्रारदार महिलेच्या मनातलं दु:ख, तिची वेदना त्या अधिक आपलेपणाने समजून घेतात. त्यामुळे पोलीस खात्याविषयी निर्माण झालेली प्रतिमा वेगाने बदलते आहे. त्या वेळी मुंबईतल्या बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये स्टेशन हाऊस अधिकारी म्हणून माझ्या बॅचमेट सक्षमपणे जबाबदारी हाताळत होत्या. त्याच वेळी नोकरीमध्ये बंधनकारक असलेलं एसआरपीएचं एक महिन्याचं प्रशिक्षण आलं. मग गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये जाऊन ते पूर्ण केलं.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

प्रोबेशनचा कालावधी पूर्ण होऊन पोलीस खात्यात कायमस्वरूपी नियुक्ती झाल्याचं पत्र मला मिळालं. आता नोकरीतल्या जबाबदाऱ्या वाढत चालल्या होत्या. मात्र त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष देणंही आवश्यक होतं. त्यामुळे नोकरी आणि संसार यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न मी करत होते.

दरम्यान आमचं आयुष्यच बदलवून टाकणारी गोड बातमी आम्हाला समजली. आम्ही आई-बाबा होणार, याचा आनंद गगनात मावेना झाला. मग माझा गरोदरपणाचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. मुंबईत मी एकटी राहत होते. या अवघडलेल्या अवस्थेत सोबत जवळचं कुणीच नव्हतं. दीपक त्याच्या सुट्टीच्या दिवशी पुण्याहून मुंबईला यायचा. पोलीस ठाण्यातली स्टेशन हाऊस ऑफिसरची ड्युटी सांभाळत डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जाणं, गोळ्या-औषधं घेणं अशी ओढाताण सुरू झाली होती.

माझ्यात वाढत असलेला इवलासा अंश त्याच्या अस्तित्वाची सातत्याने जाणीव करून देत होता. पाचवा महिना सुरू झाला, वजन खूप वेगाने वाढत होतं. त्याचबरोबर पोटही मोठं दिसायला लागलं होतं. खात्यातून रीतसर परवानगी घेऊन ड्रेसऐवजी खाकी साडी नेसायला सुरुवात केली. कामाच्या जबाबदाऱ्या मात्र कमी झालेल्या नव्हत्या.

पहाटे पाच वाजता माझ्या दिवसाची सुरुवात होत असे. स्वयंपाक करून सगळं आवरायचं. त्यानंतर मुंबईच्या त्या प्रचंड गर्दीतून प्रवास करत पोलीस ठाणं गाठायचं. त्याच वेळी पोटातल्या इवल्याशा जिवाला जिवापाड जपायचं अशी कसरत सुरू होती. बसमधल्या गर्दीमध्ये मी जेव्हा पोटावर हात ठेवायचे, तेव्हा आतून एक सुक्ष्म आवाज आल्याची जाणीव व्हायची, ‘नको काळजी करूस, मी मस्त आहे.’

एकटीच राहत असल्याने रात्री निवांत वेळ मिळेल तेव्हा माझ्यातल्या इवल्याशा जिवाशी मी गप्पा मारायचे. त्या वेळी त्याची पहिली शिकवण मला हीच होती, ‘आई, स्वत:ची काळजी पहिल्यांदा घे, तरच तू माझी काळजी घेऊ शकशील ना!’

कस्तुरबा पोलीस ठाण्यात काम करत असताना तिथले सहकारीही वेळोवेळी मदतीला धावून यायचे. त्या वेळी तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूप सहकार्य केलं. माझी मैत्रीण वर्षा खूप काळजी घ्यायची.

आठवा महिना पूर्ण होत आल्यानंतर मात्र घरच्यांनी सुट्टी घेण्याचा तगादा लावला. दीपकलाही माझी खूप काळजी वाटायला लागली होती. मी सुट्टीवर जाण्यासाठी अर्ज केला, मात्र पोलीस खात्यात सुट्टीवर जाणं एवढं सोपं नसतं. माझ्याकडे असलेल्या सर्व कामांचा निपटारा करणं मला भाग होतं. माझ्याकडे तपासासाठी असलेले गुन्हे सहकारी अधिकाऱ्यांकडे वर्ग करणं, कागदोपत्री सर्व पूर्तता करणं याला मी सुरुवात केली. या काळात कामाची दगदग खूपच वाढली होती. मात्र माझ्या बाळाने मला कधीच त्रास दिला नाही. पोटातूनच ते आईची धावपळ पाहत होतं. त्यामुळे अजून आपला त्रास कशाला, असा विचार त्याने केला असावा.

माझ्या माहेरी सावळीविहीरला बाळंतपणासाठी जाण्याची तयारी सुरू झाली. दीपक सोडवायला आला, नाशिकच्या ताईकडे एक-दोन दिवस थांबून माहेरी आले. बाळाच्या जन्माचा दिवस वेगाने जवळ येत होता.

डॉक्टरांनी बाळंतपणासाठी दवाखान्यात अ‍ॅडमिट व्हायला सांगितलं. त्यानुसार शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. दीपकही लगेच शिर्डीला आला. बाळाच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहायला लागलो. सोनोग्राफी आणि इतर तपासण्या पार पडल्यानंतर डॉक्टरांनी ‘सिझर केलेलं योग्य राहील’, असं सांगितलं.

बाळाचा जन्म झाला अन डॉक्टरांनी मुलगी झाल्याचं सांगितलं. छोट्याशा परीला हातात घेतल्यानंतर दीपकच्या डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू वाहायला लागले. आम्ही सगळेच खूप आनंदात होतो.

सिझर करताना खूप रक्तस्राव झाल्याने मला बाहेरून दोन-तीन बाटल्या रक्त द्यायला लागलं. त्यामुळे नंतरचे काही दिवस खूप त्रास झाला. इवल्याशा परीला जवळ घ्यावंसं वाटत होतं, मात्र मला उठूनही बसता येत नसल्याने तिला जवळ घेऊ शकत नव्हते. त्रास होत असला, तरी तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यानंतर मिळणारं समाधान शब्दांत व्यक्त करता न येण्याजोगं होतं.

नऊ महिन्यांमध्ये आम्हा दोघींच्या नात्याचा एक वेगळाच बंध तयार झाला होता. हळूहळू माझ्या तब्येतीमध्ये सुधार झाला अन् माझ्या मायेचा अखंड झरा तिच्यावरून वाहायला लागला.

या काळात घरच्यांनी माझी आणि लेकीची खूपच काळजी घेतली. माहेरी काळजी घेण्याबरोबरच खूपच लाड झाले. मी माहेरी लाडकी आहेच. आता माझ्या लेकीचेही खूप लाड सुरू झाले. तीन महिन्यांनी पुण्याला दीपककडे आले. काही दिवस सासू-सासरे येऊन राहिले. त्यानंतर आम्ही दोघंच परीला सांभाळायला लागलो.

गरोदरपणाची सहा महिन्यांची रजा संपली, त्यानंतर तीन महिन्यांची बालसंगोपनाची रजा घेतली. त्यासाठी प्रत्येक महिन्याला मुंबईच्या नागपाडा पोलीस रुग्णालयात जाऊन रजा वाढवून घ्यावी लागायची. परीला सोबत घेऊनच मला आणि दीपकला मुंबईला जायला लागायचं. परी लहान असताना तिला घेऊन खूप प्रवास करावा लागला.

बहुतेक प्रवास मी रात्रीच करायचे. यावर माझा भाऊ आशिष एकदा गमतीने म्हणाला, परी विचार करत असेल, ‘आपण रात्री जिथे असतो, त्यापेक्षा वेगळ्याच ठिकाणी सकाळी उठल्यावर असतो’.

रजा संपत आल्या होत्या, आता नोकरीवर पुन्हा रुजू होण्याशिवाय पर्याय नव्हता. दिवस-रात्र परीच्या विश्वात रमलेल्या आईला आता पोलीस अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य बजावण्यासाठी हजर व्हायचं होतं. एवढ्याशा परीला घरी सोडून ड्युटीवर जाण्याच्या कल्पनेनेही जीव कासावीस होत होता. ‘मुंबईमध्ये इवल्याशा परीला घेऊन नोकरी कशी करणार?’, हा खूप मोठा प्रश्न होता.

बाळ अवघं सात-आठ महिन्यांचं असताना त्याला घरी ठेवून नोकरीवर रुजू होणं, हा नोकरी करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला सर्वांत आव्हानात्मक अन् कठीण काळ असतो. विशेषत: पोलीस आयांसाठी तर तो आणखीनच अवघड असतो. पोलिसांच्या बारा-बारा तासांच्या नोकºऱ्या असल्याने दिवसा आणि रात्री आटलून-पालटून शिफ्टमध्ये काम करावं लागतं. त्यामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या ऑफिसच्या वेळेत चालणाºऱ्या पाळणाघरांचा पर्यायही पोलीस आयांसाठी उपयोगाचा ठरत नाही.

पोलीस खात्यातल्या अनेक महिलांना आई झाल्यानंतर रजा संपवून नोकरीवर रुजू होताना मोठा मानसिक संघर्ष करावा लागतो. बाळ तीन-चार वर्षांचं होईपर्यंत हा संघर्ष सुरू राहतो. काही वेळेला बाळाला सांभाळणाऱ्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं, त्या वेळी सुट्टी न मिळाल्यामुळे बाळाला सोबत घेऊन येऊन पोलीस ठाण्यात काम करणाºऱ्या मैत्रिणी मी पाहिल्या आहेत. आम्ही पोलीस खात्यातली नियुक्ती स्वीकारतानाच या जबाबदाऱ्यांचाही स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याबाबत आमची कुठलीच तक्रार नाही.

मुंबईला कस्तुरबा पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी मी आणि दीपक तयारी करत होतो. मुंबईला आई किंवा सासूबाई यांच्यापैकी कुणाला सोबत न्यायला जमतं का, याची चाचपणी करत होतो. मात्र घरातल्या वेगवेगळ्या अडचणींमुळे ते शक्य होत नव्हतं. परीला सांभाळण्यासाठी दीपकने त्याची नोकरी सोडून मुंबईला येण्याची तयारीही दाखवली होती. मात्र त्याने मध्येच नोकरीतून ब्रेक घेणंही मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनाच मोठी काळजी लागून राहिलेली होती.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांच्या ऑर्डर्स जाहीर झाल्या. माझी बदली नाशिकला करण्यात आली होती. त्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंदाचा धक्का बसला. माझी ताई आणि भावोजी नाशिकला असतात. त्यामुळे परीकडे लक्ष देण्याचं आमच्यासमोर उभं राहिलेलं मोठं टेन्शन दूर झालं. नाशिकला झालेल्या बदलीमुळे उभे ठाकलेले अनेक प्रश्न आपोआप सुटले!

नाशिक पोलीस आयुक्तालयात रुजू झाले. ताई-भावोजी परीचे दुसरे आई-बाबाच बनले. आम्हा दोघांपेक्षाही आता ती त्यांचीच जास्त लाडकी बनली आहे. तिला काही हवं असेल, तिला कुठे जायचं असेल, तर ती आमच्याऐवजी त्यांनाच सांगते. रांगणारी परी आता घरभर पळायला लागली आहे. छोटी छोटी पावलं टाकत जिने चढायला-उतरायला लागली आहे. एक माणूस कायम तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं. परीला वेळच्या वेळी खाऊ-पिऊ घालणं, झोपवणं, फिरायला नेणं, तिची आजारपणं सांभाळणं ही कामं ताई आवडीने करते. स्वतःची घरातली कामं, स्वतःच्या ट्युशन्स आदींचा व्याप सांभाळून हे सगळं ताई करते. आज मी पोलीस खात्यात नोकरी करू शकत आहे, ते केवळ त्या दोघांमुळेच.

नाशिकमध्ये ताई-भावोजींचा मोठा आधार मिळाल्यामुळे दीपकलाही त्याची पुण्यातली नोकरी सोडावी लागली नाही. मात्र त्याला आता पुणे-मुंबईऐवजी पुणे-नाशिक अप-डाऊन करावं लागतं आहे. नोकरीमुळे आम्ही दोघंही परीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, मात्र ती आम्हा दोघांनाही समजून घेते आहे.

कधी कधी महत्त्वाच्या कामानिमित्त, बंदोबस्तासाठी सकाळी लवकर घर सोडावं लागतं, तेव्हा आदल्या रात्रीच परीला याची कल्पना दिली की, तिच्या मनाची तयारी होते. अवघी वर्षा-दीड वर्षांची असतानाही तिने या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या.

कधी कधी मात्र तिच्याकडून प्रतिक्रिया येतात, ‘‘तू आज ऑफिसला जाऊ नकोस. मॅडमना फोन करून सांग, परीला बरं वाटत नाही. तू ऑफिसचे फोनच घेऊ नकोस. मी आता तुला जाऊच देणार नाही.’’

दीपक पुण्याला जायला निघाला की, ‘‘जाऊ नको ना!’’ असा हट्ट ती आता करायला लागली आहे. दीपकला ती म्हणते, ‘‘बाबा, तुझं ऑफिस नाशिकला घेऊन ये ना, बाबाला माझी आठवणच येत नाही!’’ तिचे हे बोल ऐकले की, आम्ही दोघंही आतून हेलावून जातो. तिला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याच्या विचारांनी खूप त्रास होतो. मात्र ताईच्या घरात रमलेली परी पाहिली की, दोघंही निश्चिंतपणे आपापल्या कामाला लागतो.

अनेकदा घरी आल्यानंतरही ऑफिसचे फोन सुरू असतात. मोबाइल वाजल्यानंतर ती पटकन जाऊन फोन उचलते. त्या स्क्रिनवर बाबा किंवा मामाचा फोटो नसेल, तर लगेच ‘‘आई, तुझ्या ऑफिसचा फोन आहे.’’, असं सांगत फोन घेऊन येते.

आता तर आईची बाजू घेऊन ती बाबासोबत लुटूपुटूची भांडणंही करायला लागली आहे. आईला कुणीही काही बोललेलं तिला अजिबात आवडत नाही. इवल्याशा हातांनी ती लगेच ठोसे लगावायला धावते.

एकदा मी तिला कशावरून तरी रागावले, त्यावर तिला दीपकने विचारलं, ‘‘आई रागावल्याने तुला वाईट नाही वाटलं का?” त्यावर ती म्हणाली, ‘‘अरे बाबा, मी काहीतरी उद्योग करते ना, तेव्हाच ती मला रागावते. पण मला रागावल्यावर तिलाच त्रास होतो. आई, तू त्रास करून नको घेऊस.’’ तिची इतक्या लहान वयातली ही समज पाहून थक्क व्हायला होतं. तिला मोठं करताना आम्हालाही खूप काही शिकायला मिळतं आहे.

प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन गोष्टी शिकत असते. आधी ती आपला पहिला गुरू असणाऱ्या आईकडून शिकते, नंतर जन्म दिलेल्या मुलीकडून शिकते. पुढे ती आजी होते, तेव्हा नातीकडून शिकते. मात्र या सगळ्या टप्प्यांवर आयुष्याला सर्वाधिक परिपक्व करणारी भूमिका ही ‘आई’चीच आहे. आई झाल्यावर मुलांचं संगोपन करताना आपण त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडूनच शिकत जातो.

 नोकरीमध्ये पोलीस खात्यातलं धगधगतं वास्तव एकीकडे अनुभवत असतानाच लहानग्या परीच्या विश्वातल्या गमतीजमतींनी आयुष्य अधिक समृद्ध होत चाललं आहे.

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखिका नयना आगलावे या नाशिक इथं पोलिस उप-निरीक्षक आहेत.

nayana.agalave2015@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......