अजूनकाही
‘माय-लेक’ किंवा ‘बाप-लेक’ या विशेष नात्याकडे वळण्याआधी एकुणातच पालकत्वाची बदलत गेलेली आणि बदलत चाललेली रूपं, नवी आव्हानं आणि या आव्हानांवर मात करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न यांवर लिहायला हवं. खेरीज, मुदलात ‘मुलीला वाढवणं’ हा अनुभव ‘मुलग्याला वाढवण्याहून’ खरोखर वेगळा असतो का? असला तर का आणि कुठल्या वयात? या प्रश्नांचाही वेध घेणं अगत्याचं आहे.
माझी पिढी - जी आत्ता चाळीसच्या आसपास आहे - जेव्हा लहानाची मोठी झाली, तेव्हाचे आणि आताचे सारे संदर्भच वेगळे झालेले दिसतात. आमच्या पिढीत आम्ही वाढलो, तेव्हा पालक पन्नास टक्के घडवत असतील, तर समाज - शाळा, गाव, सोसायटी हे सगळे आले - उरलेले पन्नास टक्के घडवत असे. ही विभागणी मी अर्थातच कुठल्या सर्व्हेनंतर केलेली नाही, हे माझं खाजगी निरीक्षण म्हणू या… ज्याला अनेक समानधर्मी दुजोरा देतील. म्हणजे पालकांच्या हातात अपत्याला घडवण्याच्या – बिघडवण्याच्या - बऱ्यापैकी शक्यता होत्या.
आता हे प्रमाण मला बदललेलं दिसतं. थोड्या गमतीत म्हणू या की, पालक वीस टक्के, समाज वीस टक्के, टीव्ही तीस टक्के, गुगल, अॅप्स आणि मोबाईल गेम्स तीस टक्के या प्रमाणात हे सगळे एखाद्या बालकाला लहानाचं मोठं होताना घडवत किंवा बिघडवत आहेत. यातही पालकांचं वीस टक्के प्रमाण त्यांनाच लागू होतं, जे नोकरीनिमित्त किंवा पटत नाही म्हणून किंवा पटत नाही, पण नोकरीची सबब देत, एकत्र कुटुंबातून वेगळे झालेले आहेत आणि स्वतंत्र राहत आहेत. जे एकत्र राहत आहेत, त्यांच्या केसमध्ये पालक पाच-दहा टक्के आणि आजी-आजोबा पंधरा-वीस टक्के घडत-बिघडवत असल्याचं धरायला हवं.
हे ध्यानात घेतलं की, आपल्याला बऱ्याच मर्यादा लक्षात येतात. अनेकदा पालकत्वावर रोमँटिक भाषेत लेख लिहिले जातात आणि ते अनेक ‘खास’ पालक-व्हॉट्सॲप ग्रुप्सवर पसरले जातात. मग शेजारी पोरगं किरकिर करत असेल, तरी त्या ग्रुपमध्येच डोकं खुपसून आई-वडील पालकत्वाची कोरडी चर्चा करत राहतात आणि बेसिकली स्वतःला मित्र-मैत्रिणी मिळवत राहतात.
याला जे सन्माननीय अपवाद असतील, त्या ग्रुप्सनी आणि त्यांच्या ॲडमिननी स्वतःला यातून वगळावं, पण बऱ्याच जणांनी वगळू नये, कारण स्वत:ची प्रतिमा उजळवण्यासाठी स्वतःच्या मुलांना फेसबुकवर/ व्हॉट्सॲपवर अनेक जण उपयोगात आणताना मी आसपास नेहमी बघतो आणि वर तीच माणसं - विशेषतः बुद्धिजीवी असल्यानं - पालकत्वाचे कोर्स लावत असल्याचं, पालकत्वासंबंधीचे ग्रुप्स तयार करत असल्याचं आणि तात्त्विक चर्चा करत असल्याचं मला आढळतं. त्यामुळे एक अतिशय स्व-केंद्रित पिढीच्या पिढी मला आत्ता पालक म्हणून उदयाला आलेली दिसते आणि स्वतःला वाढण्यासाठी या मुलांना पालक सोडून दुसरे खांब शोधावे लागतील किंवा अहेतुकपणे ती शोधत असतील, असं मनोमन वाटतं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
हे वर लिहिलेलं कुणाला जास्तच कठोर वाटेल, पण माझ्या नेहमीच्या संयत शैलीतच मांडताना सद्यःस्थिती मला अशी दिसते आहे. म्हणजे सगळं चित्र काळं आहे, असं नाहीच. ‘उडदामाजी काळे-गोरे’ हेही मी जाणतो, पण जे ‘उजळ’ आहे, ते ‘अल्पसंख्य’ आहे, इतकंच. म्हणूनच ते अल्पसंख्य असलेलं ‘उजळ’ समाजासमोर आणणं, हे महत्त्वाचं काम आहे. या विशेषांकाच्या निमित्तानं अशी काही समर्थ पालक-चित्रं समोर येतील, असं मला वाटतं.
मुळात, पालकत्व हे जाणीवपूर्वक करायचं काम आहे, हेच अनेकांच्या ध्यानात येत नाही. प्रेम केलं की मूल होतं. ते वाढतं आणि मग त्या मुलाला शाळेत घातल्यावर परीक्षेआधी त्याचा अभ्यास घेणं आणि त्याच्या प्रोजेक्टना मदत करणं, म्हणजे पालकत्व असतं, असं अनेकांना नकळत वाटत असतं. ते काही चुकीचं नाही; पण अगदी अपुरं आहे.
दुसरीकडे, मुलाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्याचे आपण फोटो-व्हिडिओ घ्यायचे आहेत, प्रत्येक टप्प्यावर गुगल करत, त्या वाढीत काहीतरी हातभार लावायचा आहे, असाही अनेकांचा उत्साही समज असतो. काही जणांना फटके मारणं पटत नाही, पण मारले जातात. काही जण पोरांना धारेवर धरत स्वतः मात्र अतिशय बेशिस्तीचं दैनंदिन आयुष्य पार पाडत राहतात. करमणूक मॉलमध्येच असते किंवा मॉलमध्ये असूच शकत नाही, अशी दोन्हीही टोकांची मतं असलेले पालक आसपास आहेत. आता, या सगळ्या पार्श्वभूमीवर मुलगा आणि मुलगी असा अपत्य-भेद कुठे आणि कसा दिसायला लागतो, हे बघणं रोचक आहे.
पहिली सुरुवात होते, ती निळा आणि गुलाबी या रंगांच्या संकेतांनी. सगळ्या चकचकीत मॉल्सपासून तितक्याच चकचकीत पाळणाघरांपर्यंत मुलग्यांना निळा आणि मुलींना गुलाबी हे रंग चपलांच्या ट्रेपासून रुमालापर्यंत सर्वत्र लागू करणारी एक नवी, सामाजिक, भांडवलशाही व्यवस्था कार्यरत आहे आणि अनेक पालक ती मिरवतात.
याच प्रकारे खेळणी घेण्याच्या वेळी अनेकांना वाटतं की, मुलांना कार्स आणि मुलींना बाहुल्या हे जुनं झालं. म्हणून मुलींना दोन्ही आणलं जातं आणि मुलग्यांना मात्र बाहुले किंवा इंग्लंडमध्ये असतात तसे पलटणीतले शिपाई, असे कुठलेच रोल मॉडेलवाले खेळ पटकन दिले जात नाहीत.
हां… पण एखादा राक्षसी हल्क बक्षीस म्हणून मिळतो, इतकंच. मग मुलं जरा मोठी होतात, तेव्हा मुलींना वर्गात मुलगे मारतात, तेव्हा पूर्वीच्या काळात मुलींना जसं शांत राहायला सांगितलं जायचं, तसं आता सहसा कुणी सांगत नाही. विशेषतः मुलींचे बाप पुढचं सामाजिक वास्तव जाणून ‘दोन रट्टे तू दे’ असं मुलीला आधीपासूनच सांगतात. मग मुलं जरा पहिली-दुसरीत गेली की, वर्गात हार्ट्स मिळतात, मुलींना लव्ह-लेटर्स मिळतात आणि मुलीही लव्ह-लेटर्स लिहितात (हो, पहिली-दुसरीत! जवळजवळ सर्व मोठ्या शहरांमध्ये; विशेषतः इंग्रजी माध्यमात!!).
मग मुली जरा अजून मोठ्या झाल्या की, मुलींच्या मैत्रिणींच्या घरी आजकाल त्यांचे नाईट-आऊट सुरू होतात. मग कधीतरी पाळी येण्याच्या दरम्यान नवे, मोकळेपणाचा अभिमान बाळगणारे पालक - आया आणि कधी बाबाही - मुलींना वयात येतानाचे बदल सांगायला जातात, तोवर शाळा, गुगल आणि मैत्रिणी यांनी त्या मुलींना कधीच जाणतं करून टाकलेलं असतं. अशा या मुली वाढत वाढत मोठ्या होतील, शिकतील आणि ज्याप्रमाणे पूर्वी सगळे लग्नामध्ये मुलीच्या जन्माचं सार्थक शोधायचे, तसं त्या बघणार नाहीत आणि अनेक पालकही तसं बघणार नाहीत.
एकदा डॉक्टर्स-मित्र-कंपूमधे या चर्चा सुरू होत्या, तेव्हा काही अगदी पारंपरिक बाप (म्हणजे घरापुरते!) मुलींच्या लग्नातले दागिने वगैरेपर्यंत पोचले, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. ती केवळ पोज असती, तर मला आश्चर्य वाटलं नसतं, पण ती पोज नसावी, ते आंधळेपण असावं, उद्याचा काळ बघता न येण्याची ती मर्यादा असावी. मात्र म्हणून लग्नसंस्था नाहीशी होईल, असं मला वाटत नाही. अनेक गुणदोषांसह ती टिकली आहे आणि सर्वत्र जगभर आहे, पण आजच्या या मुली मोठ्या होतील, तेव्हा अनेक रिलेशन्समधून पार पडून, वळण घेत घेत, शारीर आणि मानसिक प्रेमाचे आणि फसवणुकीचे अनेक अनुभव घेत घेत लग्नापर्यंत पोचतील, असं मला वाटतं. म्हणूनच बिदाईचे खास दागिने मला बापाच्या प्रेमानं द्यायचेच असतील, तर मुलगी शिक्षणासाठी कुठे परदेशात जाण्यासाठी बाहेर पडेल तेव्हाच मी देईन; लग्नापर्यंत वाट बघणार नाही.
‘बिदाई’ हे एक प्रतीक आहे. मुली मोठ्या झाल्या, त्यांना पोरं-बाळं झाली तरी आजही अनेक आई-वडील त्या मुलींच्या आयुष्यात थोडा अधिक रस घेताना किंवा ढवळाढवळ करताना मला दिसतात. मुलगा काय, मुलगी काय, अपत्य मोठं होताना पालकांना आपल्या अपत्यांना मनानं एकदा निरोप द्यायला लागतो. मी ‘लयपश्चिमा’ या कार्यक्रमात बाप-लेकीचं एक गाणं दाखवतो- ‘बटरफ्लाय, फ्लाय अवे...’! फुलपाखरू मोठं झालं की, घरटं सोडून जातंच. या गाण्यातला अमेरिकी बाप मुलीला स्वतःहून सांगतो की, ‘आता तुझ्या पंखात ताकद आली आहे, तर तू थांबणार नाहीस घरात. तू उडणार आहेस आणि तू मस्त भरारी घे’.
ते गाणं दाखवलं आणि मी त्यावर पुढे बोललो की, समोर प्रेक्षागृहातले अनेक पालक डोळे पुसतात; विशेषतः बाप, आणि त्यावरून मी माय-लेक आणि बाप-लेक या दोन जोड्यांकडे वळतो. अनेक आया म्हणतात की, मुली बाप-धार्जिण्याच असतात. एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर अनेक बाप मुलापेक्षा मुलीचे जास्त लाड करतात (बहिणीनं दांडगाई केली, तरी बिचारा भाऊच मार खातो!). या संदर्भात फ्रॉईडच्या मनोलैंगिक सिद्धान्तापासून अनेक गोष्टी बोलता येतील, पण माझं निरीक्षण असं की, आताच्या काळात हा फरक कमी झाला असावा.
मॉडर्न बाप मुलींना लाड करून बिघडवूच शकतात आणि पोरीही बापाशी चलाखीनं गोड बोलत, त्याला गुंडाळत त्याच्याकडून हवं ते मिळवत राहतात! आया मात्र मुलींना होमवर्क वगैरेंसारख्या नकोशा कामांकडे वळवतात आणि आई-मुलगी भांडणं अनेकदा दुसरीकडे मुलगी-आई हे ब्रॅकेट खास शॉपिंगवेळी - विशेषतः हेअर-क्लिप्स वगैरे जोरात उफाळून येतं.
या सगळ्यावरून काही लगेच सामाजिक निरीक्षणं काढावीत, असं मला वाटत नाही (आणि काढता येतील, असंही नाही). चांगल्या घरात बाप ‘अर्धा आई’ असतो आणि आई ‘अर्धी बाप’ असते. त्यामुळे मुलगी मुलग्यांच्याही जगाला आनंदानं भिडू शकते. ते मला मोलाचं वाटतं; साऱ्या तात्त्विक चर्चांहून महत्त्वाचं वाटतं. मात्र हे होण्यासाठी मुळात पालकांकडे प्रत्यक्ष संवाद आणि एक चांगली सकारात्मक धारणा असणं अगत्याचं वाटतं. जिथं या गोष्टी असतात, तिथं मुलगी ही घरातली केवळ मुलगी नसते किंवा ‘आमच्या घरातला हा मुलगाच आहे’, वगैरे उद्गारही तिथं निघत नाहीत. ती पालकांइतकाच हक्क असणारी घरातला सदस्य असते आणि ती जशी वाढत जाते, तसं बाईपण आतून समजून घेत मोठी होत जगाला माणूस म्हणून सहृदय, तरी सशक्त नजरेनं जोखते.
तिथवर जाण्यासाठी आपण पालक म्हणून मेहनत करायची असते आणि नंतर त्या लिप्ताळ्यातून किंवा श्रेयाच्या वाट्यातून बाहेरही पडायचं असतं, असं माझ्या ज्येष्ठ स्नेही मित्र-मैत्रिणींशी बोलताना जाणवतं. त्यासाठी माझ्या मला आणि तुम्हा पालक-दोस्तांना शुभेच्छा आणि तुमच्या गोंडस लेकींनाही वाढण्यासाठी मनभर शुभेच्छा!
.............................................................................................................................................
लेखक आशुतोष जावडेकर लिहितात, गातात आणि दात काढतात.
ashuwriter23@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment