…‘शरयू’ म्हणजे ‘निस्सीम’ नाही, याची जाणीव तोपर्यंत झाली होती!
पडघम - बालदिन विशेष
भक्ती चपळगावकर
  • भक्ती चपळगावकर त्यांच्या लेकीसह
  • Wed , 14 November 2018
  • पडघम बालदिन Children's Day १४ नोव्हेंबर 14 November भक्ती चपळगावकर Bhakti chapalgaonkar

एकदा मी ‘पालकत्व’ या विषयावर छोटी मुलाखत दिली होती. त्यावेळी आणि इतरही बऱ्याच वेळा आपण पालक म्हणून कसं वागतो, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत असते. शिवाय तुमच्या आजुबाजूला तुमच्यावर खूप प्रेम करणारे सुहृद असले की, तेही तुम्हाला, ‘बघ बाई, एवढे लाड करू नकोस. मुलं बिघडतील’, किंवा ‘आम्ही नाही बाबा असं मुलांशी वागत’, किंवा ‘आमची मुलं नाही बाबा असं वागत’, अशा प्रकारची प्रेमळ विधानं करून तुमच्या पालकत्वाला पैलू पाडण्याचं काम करत असतातच. मी बऱ्यापैकी पक्की असल्यानं फारसे पैलू पाडून घेत नाही ही गोष्ट वेगळी! पण इतर पालक आपल्या मुलांशी कसं वागतात याचं निरीक्षण मी जरूर करते. 

या निरीक्षणातून मला बरंच शिकायलाही मिळतं. प्रत्येक घराचा वेगळा बाज असतो आणि त्यानुसार त्यातली माणसं वागतात. काही घरं खूप शिस्तशीर असतात, काही घरं आळशी असतात, काही एकमेकांशी घट्ट बांधलेली असतात. फुटबॉलचा खेळ सुरू होण्यापूर्वी खेळाडू जसं कोंडाळं करतात आणि इतरांना त्यात प्रवेश नसतो, तसं त्यांचं असतं; तर काही घरं म्हणजे सर्वांना मुक्तद्वार. अशा वेगवेगळ्या बाजाच्या घरातल्या व्यक्ती घराच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर स्वत:ला जुळवून घेतात. म्हणजे कसं - एखाद्या घरात आई-वडील वेळच्या वेळी कामाला जातात, मुलांचा अभ्यास घेतात. ती मुलं शाळेत चांगले गुण मिळवतात. इतकंच नाही तर फावल्या वेळात छंद जोपासतात वगैरे वगैरे. असं सगळं घरच गुणी असतं.

आमचं घर या उलट आहे असं माझं नाही, माझ्या आजुबाजूच्या लोकांचं मत आहे. (माझ्या घराएवढं टापटीप घर आणि माझ्या मुलांइतकी गुणी आणि आदर्श मुलं शोधून सापडणार नाहीत, असं माझं प्रामाणिक मत आहे!) आमच्या कुटुंबातला एक जण चोवीसपैकी चौदा तास कामात व्यस्त असतो आणि घराला शिस्तीत ठेवायचा प्रयत्न करतो, पण बाकी सदस्यांचं ब्रिद वाक्य ‘घाई कशाची आहे?’ हे आहे. त्यामुळे घरातल्या एकमेव वक्तशीर माणसाचं काही चालत नाही. पण ही परिस्थिती पाच वर्षांपूर्वी बदलली. माझ्या आयुष्यात एक झंझावात आला - शरयूच्या रूपात. 

शरयू, माझी लेक. तिचा जन्म होऊन पाच वर्षं झाली असली तरी घरात मुलगीच जन्माला येणार याचा आनंदोत्सव तिच्या जन्माच्याआधीच सुरू झाला होता. अपवाद मी. ‘उगाच मुलगी मुलगी असा घोष करू नका. मुलगा झाला तर काय वाईट आहे?’, असं माझं म्हणणं होतं. त्यात माझं बाळंतपण जरा अवघड होतं. नऊ महिने रोज पोटात एक ब्लडथिनर किंवा रक्त पातळ ठेवण्याचं इंजेक्शन घ्यावं लागलं. स्वभावानं चिंतातूर असल्यानं सगळं नीट होईल ना, या चिंतेत हा काळ घालवला. हालचालींना आलेली मर्यादा आणि सततचे विचार यामुळे या काळात खूप मरगळ आली होती. एकदा बाळ जन्माला आलं की, आपलं पूर्वीचं आयुष्य पुन्हा सुरू होईल असा मला विश्वास होता. पूर्वीचं आयुष्य ज्याला सुशेगात म्हणता येईल असं होतं.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

घरात पुस्तकं असली म्हणजे लेकाला, निस्सीमला आणखी काही नको असायचं. (त्या वेळी मोबाईलचं एवढं वेड नव्हतं!). तो शाळेतून आला की, घराच्या एका कोपऱ्यात पुस्तकं किंवा गाड्या घेऊन किंवा गाड्यांबद्दलची पुस्तकं घेऊन बसत असे. तासनतास तो घरात आहे की नाही, याचा काही पत्ता नसायचा. त्याचा स्वभाव शांत. त्यामुळे आज शाळेत काय झालं, या प्रश्नालाही उत्तर द्यायचा नाही (आजही देत नाही). पण खूप आनंदी प्राणी. सतत हसतमुख. माहिती गोळा करायचा नाद, मग ती गाड्यांबद्दल असो का किटकांबद्दल किंवा ग्रहताऱ्यांबद्दल. रात्री नऊ वाजले की झोपणार!

तर अशा निस्सीमच्या स्वभावामुळे माझी मुलांबद्दल (आणि पर्यायानं पालकांबद्दल) ठोस धारणा होती. मुलं रात्री वेळेवर झोपलीच पाहिजेत, ती जर वेळेवर झोपत नसतील तर आई-वडीलच कारणीभूत असतात. मुलांनी वयाच्या पाच वर्षांपर्यंत चॉकलेट खाऊ नये. त्यांना समजावलं तर ते पण चॉकलेट्स किंवा इतर गोड पदार्थ मागत नाहीत. मुलं मुळात भांडखोर नसतात वगैरे वगैरे. तर असं हे आदर्श आयुष्य एकदा मी बाळंतीण झाले की पुन्हा सुरू होईल, असा ठाम विश्वास मला होता. आणि घरात निस्सीमचीच एक छोटी आवृत्ती येणार आहे या (गैर)समजात मी होते. २२ ऑक्टोबर २०१३ ला अंधेरीला एका हॉस्पिटलमध्ये दुपारी एक वाजून सतरा मिनिटांनी शरयूचा जन्म झाला. ही वेळ काळ सांगण्याचं कारण असं की, या क्षणापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. हा बदल आत्ता कुठे मी थोडा थोडा स्वीकारला आहे. 

शरयू जन्माला आली, तेव्हा लाल लाल होती, अगदी चेरीसारखी! पूर्वायुष्यात पुनर्प्रवेश करायला उत्सुक असलेल्या मला तिनं लगेचच दणका दिला. बाळंतपणानंतर मला सगळं काही धूसर धूसर दिसू लागलं. खूप थकल्याचा परिणाम असावा, पण शरयूनं रात्रभर जागून मला इशारा दिला, ‘लवकर बरी हो, मला सांभाळायचंय तुला’. घरी आल्यावर एक दिवस अचानक माझं सगळं अंग सुजलं. जेवताना हाताची बोटं घास घ्यायलासुद्धा वळेनात. पुन्हा इंजेक्शन्स सुरू करा असं डॉक्टरांनी सांगितलं, पण मी नकार दिला. महिना-दीडमहिना औषधं मात्र घेतली. सुरुवातीचा महिनाभर सासूबाई शरयूला तेल लावणं, आंघोळ घालणं, माझ्या जेवणाची व्यवस्था बघणं या कामांसाठी मुंबईत थांबल्या. (त्यावेळी त्या आणि माझे सासरे अहमदाबादला राहत होते). दिवसभर त्या असल्या तरी रात्र माझीच होती.

नवजात बाळ दिवसाचे पंधरा-पंधरा तास झोपलेलं असतं, हा समज शरयूनं खोटा ठरवला. जन्मल्यापासून (आजवर) ती कधीही सलग आठ तासही झोपली नाही. (बराच काळ माझं व्हॉटस्अॅप स्टेटस् ‘sleep deprived’ असं होतं!). बरं आवाजही खणखणीत. त्यामुळे नुसती जागी आहे, तर आपण काही पुस्तक वाचत बसू असंही नाही. शेवटी अजयनं उपाय शोधून काढला, गाणी लावायचा. त्यातल्या त्यात तिला ‘भरजरी गं पितांबर दिला फाडून’ हे गाणं फार आवडायचं. शांत, संथ लयीतल्या गाण्यांच्या संगतीत ती थोडी शांत व्हायची. पण आपल्या आजुबाजूची मंडळी सुस्तावली आहेत, असं लक्षात येताच पुन्हा आवाज काढायची. या सगळ्या प्रकारात एक लक्षात आलं की, घरातल्या या नवीन सदस्याला आपल्याकडे ही मंडळी दुर्लक्ष करतील की काय अशी भीती सतत असते की काय! जेणेकरून सतत स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणं आवश्यक आहे, असं तिला वाटावं. 

स्वभावातला तापटपणा तिनं पुढेही कायम ठेवला. पण त्याच्याबरोबरीला उत्साह आणि आनंदाची जोड आहे. तिच्याकडून शिकण्यासारखा आणखी एक गुण म्हणजे सतत नवी गोष्ट अनुभवण्याचा ध्यास. पाच महिन्यांची असताना तिनं पहिल्यांदा आंबा चाखला. चाखला म्हणजे जोपर्यंत पूर्ण कोय चोखून चोथा केली नाही, तोपर्यंत सोडला नाही. शरयू म्हणजे निस्सीम नाही याची जाणीव तोपर्यंत झाली होती. त्यामुळे निस्सीमला वाढवताना जो अॅटिट्यूड होता, तो ठेवून चालणार नाही याची जाणीव आतापर्यंत झाली होती. त्याचबरोबर एक गोष्ट बदलली होती, ती म्हणजे निस्सीम जन्मला तेव्हा मी पूर्णवेळ नोकरीत होते, आणि शरयू जन्मली तेव्हा मी घरी होते. पण घरात आहे म्हणून सतत मुलांबरोबरच वेळ घालवणं किंवा त्यांच्यासाठीच काहीतरी काम करत राहणं, हा माझा स्वभाव नाही. शरयू इतकी लहान होती आणि घरी पूर्ण वेळ मदतनीस नसल्यानं (आणि मी घरी असल्यानं) तिच्याबरोबर वेळ घालवावा लागला. ‘घालवावा लागला’ असं म्हणण्याचं कारण तिच्या कमी झोपण्यामुळे किंवा तापट स्वभावाला मी सुरुवातीला कंटाळले. आजुबाजूचे लोक ‘बाळ किती गोड आहे’, ‘किती गरीब आहे’ (‘गरीब’ या शब्दाचा तर मला फार राग येत असे. ‘कुणी ‘गरीब’ असेल तर मी आहे, दिवसरात्र जागी असते’ असं मला वाटे!) अशी वाक्यं ऐकवत. त्यात ती तिच्या बाळलीलांनी सगळ्यांना आकर्षिक करून घेई. दिसायला गोड, गुटगुटीत आणि हुशार. सगळं घर तिच्या अवतीभवती. त्यांच्यासाठी ती गोड बाहुली होती. मी मात्र तिला घाबरून असे. ती झोपली की, काही झालं तरी तिची झोप मोडू नये असा माझा प्रयत्न, पण खुट्ट व्हायचा अवकाश, तिची झोप मोडायची आणि मी वैतागायचे. माझ्या गोड गोबऱ्या बाळाच्या प्रेमात मी गुरफटले होते, पण याच बाळापासून मला ब्रेक हवा होता.

माझं मला आश्चर्य वाटू लागलं. ज्या लेकीसाठी जिवाचा आटापिटा केला, पोट काळंनिळं होईपर्यंत इंजेक्शनं टोचून घेतली, ती एवढी सुंदर साजरी लेक जन्माला आल्यावर तिचा मी दुस्वास का करतेय? मला काही कळेनासं झालं. माझ्या रागाचं टार्गेट ठरू लागला, निस्सीम. आधीच स्वभावानं अबोल असलेल्या लेकराला आई अशी का वागतेय कळेना.

मुलं आपल्याला खूप शिकवतात. ज्या काळात मी घरात खूप त्रागा करत असे, त्या काळात निस्सीम शांतपणे एकदा म्हणाला, ‘तू ओरडू नकोस, बोल माझ्याशी. तू ओरडलीस की मला भीती वाटते.’ त्याचे शब्द इतक्या खोलवर भिडले की, पुढे कित्येक दिवस संताप झाला की, त्याचा भेदरलेला चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला. माझी परिस्थिती ‘कळतंय पण वळत नाही’ अशी झाली होती. बरं कुणाशी बोलू हे कळेना. शेवटी दादरच्या आमच्या जिपींशी बोलले. बोलले म्हणजे त्यांच्यासमोर ढसाढसा रडले. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि मला त्या डिप्रेशनसदृश परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी औषधं दिली. औषधांचा परिणाम असेल किंवा कोणाजवळ मन मोकळं केलं म्हणून असेल, थोड्या काळानं बरं वाटू लागलं आणि मी कामासाठी घराबाहेर पडले. 

उणंपुरं वर्षभर नोकरी केली आणि सोडली. जेवढा काळ आई-बाबा घरात नव्हते, मोठ्यानं धुमाकूळ घातला होता. शाळेतून परतल्यावर जो कम्प्युटर सुरू व्हायचा, तो मी रात्री नऊ-साडेनऊ वाजता घरी पोचल्यावरच बंद व्हायचा. शरयू इतकी माझ्या सहवासाला आसुसली होती, की नोकरी करत असतानाच्या काळात एकदा आम्ही बाहेरगावी गेलो होतो. त्या सात-आठ तासांच्या प्रवासात रस्ताभर ‘मम्मा कुठे?’ हा प्रश्न माझ्या शेजारी बसून तिनं निदान पाचशे वेळा विचारला. मी नोकरी सोडायचीच संधी बघत होते, ती मला मिळाली! पण यावेळी घरी राहण्याचा निर्णय घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यायचं ठरवलं. एक तर शरयूकडे म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नव्हतं. लेकाला मी सहा महिन्यांचा असल्यापासून पुस्तकं वाचून दाखवत होते, पण लेकीच्या अशा गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. रोज नियमानं काही गोष्टी करायची तिला सवय लावली तर तिचं आणि माझं आयुष्य सुरळीत होईल, असा अजयचा अंदाज होता. तो खरा होता. तिची स्वतंत्र आणि चौकस बुद्धी आधी त्यानं हेरली आणि त्यानुसार त्यानं सकाळी उठल्यापासून तिच्याबरोबर वेळ घालवायला सुरुवात केली. त्याचा कित्ता मीही गिरवला.

तिचे दात घासून देण्यापेक्षा तिचा ब्रश तयार करून तिच्यासमोर ठेवायचा आणि आपले दात घासायचे, की ती तिला जमेल तसा ब्रश करू लागली. तिला निरीक्षणानं गोष्टी करायला आवडतात. ‘तू लहान आहेस, मी सांगेन तसं कर’ असं म्हणणं तिनं ऐकून घेतलं नाही. तीच गोष्ट पुस्तकांची. मी तिला घेऊन पुस्तक वाचायला बसे. प्रत्येक पानावरची गोष्ट वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे आवाज काढून नाट्यमयरीत्या वाचून दाखवायची माझी पद्धत तिनं धुडकावली. ती पुस्तक हातात घेऊन त्यातली चित्रं बघून गोष्ट तयार करू लागली. ती गोष्ट तिच्या पद्धतीनं ती enact करू लागली. सुरुवातीला मला खूप त्रास होई. ‘अरे, पुस्तकात काय लिहिलंय? ही काय म्हणतेय? काही संबंध?’ पण अजय शांत होता. ‘अगं, तिच्या कल्पनाशक्तीचा वापर ती करतीए. तिला प्रोत्साहन द्यायला हवं’ असं त्याचं म्हणणं. (मुलगीच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाच्या भूमिकेत शिरून हा माणूस विचार करतो, बायको सोडून!). तिचं वाचन अजूनही अशाच पद्धतीचं आहे. पुस्तक हातात घ्यायचं, त्यातील चित्रं बघायची, त्यांच्याशी बोलायचं. ती गोष्ट वाचत नाही, त्या गोष्टीतलं एक कॅरेक्टर बनते.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

निस्सीमसाठी पुस्तक खरेदी करताना जास्तीत जास्त माहिती असलेली, नॉन-फिक्शन प्रकारची पुस्तकं आणणारी मी आता गुलाबी रंगाची, पऱ्यांची चित्रं असलेली, चमकदार पुस्तकं शोधू लागले. तिच्या वाचनपद्धतीत मला अजून एक गोष्ट खटकत होती. ती म्हणजे ती अक्षरांकडे दुर्लक्ष करते. अक्षरांचा उच्चार समजून घेत नाही. त्यामागचं लॉजिकही लक्षात घेत नाही. वर्षभर ‘ए’ फॉर ‘बी’ आणि ‘सी’ फॉर ‘डी’ असं म्हणायची. पण तिचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. त्यामुळे ज्या शिशुवर्गात ती जात होती, त्याची शिक्षिकाही तिचं मत बदलू शकली नाही. वाचनापेक्षा तिला चित्रकलेत जास्त रस आहे. तिला भातुकली खेळायला आवडतं. तिला मैत्रिणींबरोबर खेळायला आवडतं. तिला स्वत:चे कपडे निवडून तयार व्हायला आवडतं. या गोष्टी हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागल्या.

तिला तिच्या कलानं वाढू द्यायचं आणि आवश्यक तिथं शिस्त लावायची असं मी आणि अजयनं ठरवलं. याचबरोबर काही गोष्टी वाढत्या वयाबरोबर बदलतील असा विश्वास होता. नाही बदलल्या तर आपण विचार करू असं ठरवलं. कित्येकदा हा काळ माझ्यासाठी तणावाचा ठरला. आता शरयू आणि मी खूप आनंदात होतो. पण आजुबाजूच्या अनेक लोकांना, ही अशी का वागते, तुम्ही असं कसं सहन करता, अशा प्रकारचे प्रश्न पडू लागले. याचं कारण निस्सीम आणि तिच्या स्वभावातला आणि वयातला फरक. एक अतिशांत तर दुसरी स्वच्छंदी. एक कधीही तक्रार करणार नाही, तर दुसरी अंगाला हात लावायचा अवकाश रडून रडून गरगटं करणार. ‘निस्सीमला ही किती त्रास देतीए’ असंही काही जण म्हणू लागले. आपली मुलं ज्या वयाची तेच आपलं पालक म्हणून वय, असं माझं आणि अजयचं ठाम मत. त्यामुळे पालकांनी मुलांवर, लहान मुलांवर अधिकार गाजवू नये असं आम्हाला वाटतं.

मुलं मोठी होताना, विशेषत: किशोरवयात असताना कधीकधी ठामपणे त्यांना सरळ करावं लागतंच, याचा अनुभव आम्ही सध्या घेतच आहोत. पण पालक म्हणून कसं वागावं याचे सुहृदांनी दिलेले सल्ले आम्ही शांतपणे ऐकले. योग्य होते त्याच्यावर विचार केला. पण त्या सल्ल्यांचा ताण घेऊ नये असा अजयचा स्वभाव आणि सगळे जण मलाच का बोलतात, असा गळा काढण्याचा माझा. पण शांत राहायचं ठरवल्यानं मी फारशी स्पष्टीकरणं देण्याच्या भानगडीत पडले नाही. ज्या झंझावाताला समजून घेण्याचा मीच अजून प्रयत्न करतेय, त्याला इतर कसे समजू शकतील, याची कल्पना मला आली होती.

या सगळ्या गोंधळात माझी आई आणि सासूबाई शरयूच्या प्रेमात आखंड बुडालेल्या होत्या. हिनं तुमच्या आयुष्यात प्रवेश करून तुम्हाला अपरिमित आनंद दिला म्हणून आईनं तिचं नाव ‘आनंदिता’ ठेवलं. सासूबाई तिला ‘राधा’ म्हणतात. ‘तिच्याइतकी हुशार मुलगी जगात नाही’ असं त्यांचं तिच्या जन्मापासून ठाम मत आहे. पहिल्या पंधरा दिवसांत तिची दृष्टी स्थिरही झालेली नसताना, मी रूममध्ये आले की, ती तिच्या पाळण्यातून माझ्याकडे बघते, असं त्यांचं म्हणणं. त्यांचं राधाप्रेम इतकं गाढ की, त्यांची इतर तीन नातवंडं ‘आजी आमच्याकडे जरा लक्ष दे’ असं त्यांना सुरुवातीला सांगायची. तिच्या व्यवस्थितपणाचं त्यांना भारी कौतुक!

तिला चौकटीच्या बाहेर मुक्त बागडू द्यायचं ठरवल्यानंतर तिच्यातले गुण अजून बहरले. तिची भाषेवरची पकड माझ्या लक्षात येऊ लागली. ती चार वर्षांची असताना एकदा आम्ही परदेश प्रवासाला गेलो. त्या काळात आमच्या मित्रांच्या इंग्रजी भाषक मुलांशी तिनं उत्तम संवाद साधला. तिचे उच्चार कोणत्या वळणाचे असावेत, याकडे आम्ही फार लक्ष देत नाही. ‘घरी इंग्रजी बोला’ असा शाळेचा आग्रह असताना आम्ही घरी मराठीतच बोलतो. त्यामुळे ती इंग्रजीत कसा संवाद साधेल, असा माझ्यासमोर प्रश्न होता. कारण संवाद साधता आला नाही तर त्या काळात ती चिडायची आणि जोपर्यंत तिला काय म्हणायचं आहे, हे समजायचं नाही, तोपर्यंत तो मुद्दा ती सोडायची नाही. पण तिनं पंधरा-वीस दिवसांचा हा प्रवास खूप एन्जॉय केला. तिला स्वतंत्र वागवल्यामुळे तिची फार वेगळी अशी काळजी घ्यावी लागत नाही.

ज्या क्रोएशिया देशात आम्ही गेलो होतो, तिथल्या जेवणात, ग्रील केलेलं मांस, सॅलड्स आणि वाईनचा समावेश होता. आठवडाभर तिनं भरपूर सॅलड्स आणि थोडंफार ग्रिल्ड फिश - चिकन - मटन खाल्लं. आई-बाबा आपल्याला वाईन पिऊ देत नाहीत, याबद्दल ती जरा नाराज होती. तिला थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मी कानटोप्या, जॅकेट्स वगैरे बरोबर घेतले होते. ते तिनं घालणार नाही म्हणून ठामपणे सांगितलं. इतक्या वर्षांत आम्ही दोघींनी एकमेकींबरोबर जुळवून घ्यायचं ठरवलं असल्यानं मीही फार आग्रह धरला नाही.

आमच्या जवळच्या मित्रांबरोबर आम्ही हा वेळ घालवला. शरयूची खाण्याची आवड बघून तेही अचंबित झाले. एवढी लहान असूनही आम्ही तिच्यासाठी कधीही वेगळ्या जेवणाची व्यवस्था केली नाही. आम्हालाही उत्तम जेवणाची आवड आहे. आम्ही निवडलेल्या गोष्टींतील काही गोष्टी ती निवडायची आणि त्यावर ताव मारायची. जिथं जाऊ तिथलं जेवण चाखायचं हा नियम शरयूसह आम्ही सगळे जण पाळतो. कित्येकदा निस्सीमच्याच तक्रारी असतात, पण हिच्या नाही. ती अगदी लहान असताना मी फेसबुकवर ‘बेबी लेड विनिंग’ नावाचा ग्रूप जॉईन केला होता. मुलांसाठी वेगळा स्वयंपाक करू नका, आपल्यातलेच कमी तिखट मसाल्याचे पदार्थ खायला द्या असं या ग्रुपचं म्हणणं. त्यामुळे तिला कधीही खिमट किंवा सूप दिलं नाही. पाच महिन्यांची असताना तिनं आंबा खाल्ला आणि नऊ महिन्यांची असताना चिकन सूप झिडकारून रस्सा ओरपला! 

शरयूचा निदादा तिच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठा. तो दीड वर्षांचा असताना शिशूवर्गात जायला लागला. त्याला शाळेतही वर्षभर आधी घातलं आहे. तसं करण्यासाठी त्याच्या आधीच्या शाळेनं भरीला पाडलं. ही चूक शरयूच्या वेळी केली नाही. शासनानंही नियम काटेकोर केल्यामुळे आम्हाला फार विचार करावा लागला नाही. तीन वर्षं पूर्ण झाल्यावर ती नर्सरीच्या वर्गात गेली. ते वर्ष मी मुलुंड-भांडूप प्रवासात घालवलं. चार वर्षांची झाल्यावर तिला स्कूल बस लावली. पहिल्या दिवशी तिच्याबरोबर बसमध्ये बसले. एक लहान मुलगा एका स्टॉपवर बसमध्ये शिरला. बसमावशींनी सांगितलं, ‘या मुलाच्या शेजारी आम्ही कुणाला बसवत नाही. तो खूप मारकुटा आहे. तुम्ही शरयूलाही सांगा’. मी त्यांना सांगितलं, ‘बरं झालं सांगितलंत ते.  पण मला शरयूची चिंता नाही. तिच्या अंगाला त्यानं बोटही लावलं तर त्याची खैर नाही. ती त्याला सोडणार नाही.’ पहिल्या दिवशीच तिनं मला सांगितलं, ‘मी एकटी बसीन, मी मोठी आहे. मला बसमध्ये खायला वेगळा डबा दे.’ परवाच तिच्या बसमावशींनी सांगितलं, ‘स्वत:चं पाणी ही तिच्या दादालाही पिऊ देत नाही.’ मी मनातल्या मनात म्हटलं, ‘ठीक आहे, हिची काळजी करायची गरज नाही’.

तिच्या जन्माच्या आधीच तिचा निदादा त्याच्या इतर भावंडांमध्ये सगळ्यात लहान. त्याच्या शांत आणि हसतमुख स्वभावामुळे तो सगळ्या तायांचा लाडका. आता शरयूही या सगळ्या तायांमध्ये मिळून मिसळून वागते. गंमत म्हणजे तिची सगळ्यात मोठी ताई, सावनी तिच्यापेक्षा सतरा वर्षांनी मोठी आहे. मी सावनीची मावशी आणि माझ्या व सावनीच्या वयातही सतरा वर्षांचंच अंतर आहे. वयातल्या अंतराचा शरयूला काही फरक पडत नाही. सावनीताई, शर्वरीताई, नुपूरताई यांचे कपडे, मेकअप आणि मोबाईलचा वापर यांचा तिच्यावर फार प्रभाव आहे. त्यातलीच एक ताई, जानकी गेलं दीड वर्षं माझ्याकडे राहतेय, आणि पुढची तीनएक वर्षं तरी राहणार आहे. जानकीची आणि शरयूची खूप गट्टी आहे. ती तिची मनापासून काळजी घेते. आता मला एक मायाळू (क्वचित डांबरट) मोठी मुलगीही (रेडीमेड) मिळाल्यामुळे मी समाधानी आहे! 

शरयूला तिच्या वयाच्या इतर मुलींप्रमाणे गुलाबी आणि निळ्या रंगाचं वेड आहे. इंग्रजी साहित्य आणि डिस्नेच्या सिनेमात दिसणाऱ्या राजकुमाऱ्या तिच्या कल्पनाविश्वाचा फार मोठा भाग व्यापून आहेत. तिला स्वत:ला कुणी ‘राणी’ म्हटलेलं चालत नाही, कारण ‘राण्या म्हाताऱ्या असतात’ असं तिचं मत आहे. तिचं लग्न एका प्रिन्स चार्मिंगबरोबर होणार आहे, असं तिनं मला सांगितलं आहे. स्त्री-पुरुष समानतेवर ठाम विश्वास असल्यामुळे मला कधी कधी ही मतं धोक्याची वाटतात. तुला वाचवायला प्रिन्स चार्मिंगची गरज नाही असं तिला मी लवकरच सांगणार आहे. पण ती ‘अपनी मर्जी की मालिक’ असल्यामुळे माझ्या मतांचा तिच्यावर काही परिणाम होईल का, याबद्दल मला शंका आहे.

या सगळ्यात एक गोष्ट अतिशय आश्वासक आहे, ती म्हणजे तिचा स्वत:वर आणि एकूणच मुलींच्या श्रेष्ठत्वावर फार विश्वास आहे. इतका की, कित्येकदा श्रेष्ठत्वापेक्षा समानता योग्य आहे, हे तिला तिच्या शब्दांत समजवावं लागतं. स्वत:च्या गोष्टींबद्दल अतिशय आग्रही असणाऱ्या शरयूला तिच्या आईचं, माझं फार वेड आहे. आई ही जगातली सगळ्यात चांगली आणि सुंदर व्यक्ती आहे, असं ती वारंवार बोलून दाखवते.

एकूणच माझा तयार होऊन घराबाहेर पडणं या गोष्टीवर विश्वास नाही, पण मी मेकअपशिवाय घराबाहेर पडू नये असा तिचा आग्रह असतो. मी तिच्या या आग्रहाला बळी पडून व्यवस्थित राहण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करते, पण कित्येकदा तिच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. एकदा बॅंकेत जाताना तिनं बंद केलेलं दार उघडायला लावून जरा लिपस्टिक लाव, लेडीलाईक दिसशील असं सांगितलं. खाली निस्सीम भेटला. तेव्हा त्यानं ‘बॅंकेतच चाललीएस ना, मग लिपस्टिक कशाला लावलंयस?’ असा प्रश्न विचारला.

‘सौंदर्य’ या शब्दाची आमची दोघींची व्याख्या फार वेगळी आहे. पण तिच्या दृष्टीचं सौंदर्य समजून घेण्याचा मी प्रयत्न करतीए. मोठी झाल्यावर तीही मला समजून घेईल किंवा मोठी होतानाच तिला त्याचा अनुभव यावा असा आमचा प्रयत्न असतो.

असेच काही फार सुंदर क्षण आम्ही अनुभवतो. एकदा संध्याकाळी पुण्याहून मुंबईला परतताना आकाशात सूर्याचा लाल गोळा दिसला. भवतालचं सुंदर आकाश आणि रस्त्यांवरची तुरळक वाहनं बघता बघता मी तिला म्हणालं, ‘शरयू, किती सुंदर दिसतंय नाही सगळं, एखाद्या चित्रासारखं!’ परवा घरी तिचा पसारा आवरताना एक चित्र सापडलं. पिवळ्या आकाशात केशरी सूर्याचा गोळा. खाली रस्त्यावर एक गाडी धावतीए आणि गाडीत तिची ‘फॅमली’ बसलीए. तिच्या चित्रानं तो क्षणच नाही, तर क्षणभर आयुष्यच सोनेरी झालं! 

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhaktic3@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......