‘‘बाप रे! अगं तुला आता सहा पूर्ण होतील ना!’’
गेल्याच आठवड्यात अनयाला, धाकट्या लेकीला म्हटलं आणि चेहऱ्यावर शक्य तितके आश्चर्याचे भाव उमटले. आणखी काही महिन्यांनी किमयाला, मोठ्या लेकीलाही हेच वाक्य आकडा बदलून बोलणार आहे मी. तसं दर वाढदिवसाच्या आधी होतंच माझं.
काय होतं?
आपण आई झालोय, आपल्याला इतक्या मोठ्या मुली आहेत, मोठी मुलगी तर आता मोठी व्हायला लागलीये वगैरे गोष्टी मला अजूनही दचकवतात.
हो, वेगवेगळ्या अर्थानं दचकवतात… या एका वाक्यात, मला वाटतं, माझं आई असणं सामावलेलं आहे. हे दचकवणं कधी आनंदाचं असतं, कधी असहाय्यतेचं, कधी भीतीचं, कधी जबाबदारीचं… अनेक अर्थांचं.
…….
मी लग्न करेन, संसारात रमेन असं माझ्या ओळखीतल्या कोणाला फारसं कधी वाटलं नव्हतं. फक्त एक माजी बॉस नवऱ्याला म्हणाला होता, ‘‘अमिता छान संसारी बायको होईल’’. त्यांनाच कसा काय अंदाज आला, कोण जाणे! अगदी आई-वडलांसकट सगळ्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना ‘माझं आयुष्यात कसं होणार?’ याची फारच काळजी वाटत होती.
पण सगळ्यांचा अंदाज चुकवत अगदी वेगळ्याच मार्गाला माझी गाडी गेली.
मला समजायला लागलं तेव्हापासून, असं नाही म्हणता येणार, पण साधारणपणे आपण लग्नाचा वगैरे विचार करू लागतो, तेव्हापासून माझी एक फँटसी होती. एक सीन मला डोळ्यांपुढे दिसायचा… आपल्या दोन मुली छान वेण्या घालून, सुंदर युनिफॉर्म घालून शाळेत जाताहेत. मी खिडकीत उभी आहे आणि त्या वळून मला ‘टाटा’ करताहेत.
मला या विचारानंही फार छान वाटायचं! पण हा फार म्हणजे फारच सुप्त मनातला विचार होता. वास्तवात मी नोकरीत छान रमलेले होते. वेळकाळ न पाहता काम करत राहायचं वगैरे सगळं छान सुरू होतं. पण मग हळूहळू ‘आपल्याला आता एखादं मूल हवं’, असं वाटायला लागलं. नवऱ्यानं जरा समजवायचाही प्रयत्न केला, “तुझं सगळं आयुष्य बदलून जाईल अगं. नीट विचार कर”, असं काहीबाही तो बिचारा सांगत राहायचा, पण माझ्या डोक्यावर आई बनण्याचं भूत बसलं होतं.
मग एक दिवस ती गोड की काय म्हणतात तशी बातमी आलीच. पण त्याआधी तसा बराच त्रासही झाला होता. माझे पिरियड्स नियमित नसल्यानं सतत महिनाभर ट्रिटमेंट सुरू होती. त्यातून खरं तर चिडचिड व्हायला लागली होती. का कोण जाणे, पण ही बातमी ऐकली, तेव्हा जवळपास वर्षभर केलेला विचार, तो उत्साह, आनंद सगळं मावळलं आणि मनात अचानक भीती दाटून आली. आईला ही बातमी सांगताना तर ‘‘मला कसली तरी भीती वाटतेय’’ असं म्हणता म्हणता भस्सकन रडू आलं.
दोन महिन्यांनी तो गर्भ दगावला आणि माझ्यात आईपण रुजलं!
मी डॉक्टरांना शांतपणे सांगितलं, ‘‘मी डी अँड सीसाठी तयार आहे”. पण आठवड्याभरानंतर नवऱ्याच्या कुशीत शिरून फोडलेला, घर हादरवून टाकणारा हंबरडा मला आईपणाची जाणीव करून देऊन गेला कदाचित.
हे सगळं आता वाटतंय लिहिताना. आजवर हे सगळं आपल्यात आहे, हे असं लिहून काढेपर्यंत जाणवलंही नव्हतं.
पहिल्या अनुभवानंतर काही काळातच मी पुन्हा गरोदर राहिले. यावेळी कोणत्याही डॉक्टरला भेटले नाही आणि काही नाही. जे जेव्हा व्हायचं, जसं व्हायचं, तेव्हा आणि तसं होऊदेत, असं आम्ही ठरवलं होतं. खरं तर हासुद्धा एक धडाच होता आयुष्यानं शिकवलेला.
तेव्हा गर्भसंस्कार वगैरे प्रकार एकदम नवीन फॅशनमध्ये आले होते. पण, आपलं मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्ट्राँग असावं, बाकी त्यानं कसंही असूदेत, असं आमचं दोघांचं पक्कं मत होतं. पहिला अनुभव वाईट असल्यानं मी यावेळी नोकरी सोडली. हा आयुष्यातला फारच मोठा निर्णय होता. अत्यंत करिअरिस्टिक बाईसाठी हा निर्णय फार जड असतो. पण, मी तो घेतला, आनंदानं घेतला. इतका मस्त एन्जॉय केला मी हा काळ. उत्तमोत्तम सिनेमे पाहिले, पुस्तकं वाचली, गाणी ऐकली, धमाल केली. पण, या सगळ्यात काळजीचा फॅक्टर फार मोठा होता. घरातले पण अतीच काळजी घ्यायचे. गर्भातल्या किमयाशी मी इतक्या गप्पा मारायचे… बापरे बाप! ती आता किती बोलते यावरून साधारण अंदाज येतोच!
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
मी दुसऱ्यांदा गरोदर आहे, ही बातमी घरी सांगितली तेव्हाची घरातल्यांची रिअॅक्शन मी आयुष्यात विसरणार नाही! जेवताना मी हे बोलले आणि अक्षरश: सगळ्यांचे हातातले घास हातातच राहिले. मी असा निर्णय घेईन, यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता.
पण, असं झालं होतं खरं.
अर्थात, हे गरोदरपण आधीपेक्षा अगदी वेगळं होतं. आता मी पार्टटाइम नोकरी सुरू केली होती. शिवाय, पहिल्या वेळचा अनुभव असल्यानं काहीशी बिनधास्त झाले होते. काहीही खा, कुठेही जा. त्यावेळी नव्यानं आलेला कॉफी फ्लेवर्ड व्होडकाही बाबांनी एक घोट चाखवला होता. अर्थात, त्यामुळे हे दुसरं पिल्लू भन्नाट, अजब रसायन झालंय.
धाकटी लेक, अनया अवघ्या सहा दिवसांची असताना तिच्या पाठीवर पुळी येऊन त्यात पू झाला. अकराव्या दिवशी तिची सर्जरी केली. ते दिवस आठवले तरी आपसूक डोळ्यांत पाणी येतं. इतकुसा जीव एनआयसीयूच्या छोट्या चौकोनी काचेच्या बेडवर ठेवलेला होता. लहानपणी तिला सारखी भूक लागायची. इतकी की पोट न भरल्यानं ती झोपायचीही नाही. खूप रडायची हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांनी सांगितलं, “आम्ही फक्त सर्जरी करणार, औषधं देणार. तिला बरं करण्याची जबाबदारी तुझी. तिला शक्य तितक्या वेळा दूध पाज. दूध पाजताना तिच्याशी गप्पा मार. तिला सांग तू लवकर बरी होणार आहेस. तू स्ट्राँग बच्चा आहेस.”
सात दिवसांच्या अनयाशी हे सगळं बोलताना आई म्हणून माझाही टप्प्याटप्प्यानं नव्यानं जन्म झालेला मीच अनुभवला.
…….
अशा प्रकारे मी आता दोन मुलींची आई झालेय. म्हणजे काय ते देवालाच ठाऊक!
पण, जे आहे ते साधारणपणे छान आहे.
जे जसं आहे तसं आनंदानं स्वीकारायचं, असं आम्ही दोघांनीही ठरवलं होतंच. शिवाय, दोन मुली झाल्यानं बोनस मिळाला होता. मग नकळतच या चौकोनाला एक छान आकार देण्याचा प्रयत्न सुरू झाला. खरं तर नकळत असं तरी कसं म्हणता येईल? ते आपल्यात आहेच ना कुठेतरी? म्हणून तर ते दिसतंय.
आपली मुलं म्हणजे आपल्याला कंपनी देणारी माणसं आहेत, असं मला बेसिकमध्येच वाटतं. त्यामुळे त्या लहान असल्यापासूनच एकत्र सिनेमे पाहणं, गाणी ऐकणं, पुस्तकं वाचणं असं सगळं छान सुरू असतं. मोठी लेक साधारण वर्षांची असताना फुटबॉल वर्ल्डकप होता. तिला मी हॉलमध्येच चटईवर झोपवायचे मॅच पाहताना. धाकट्या लेकीनंही असा लहानपणीच एक वर्ल्डकप पाहिलाय. त्यामुळेच की काय पण यंदाच्या वर्ल्डकपला त्या फायनल मॅचच्या आधी स्वत:च गालांवर झेंडे रंगवून बसल्या होत्या.
मला नाचाची प्रचंड आवड आहे. मोठ्या लेकीमध्ये ती उतरलीय. धाकटीला तसं नाचाचं फारसं अंग नाही. पण, सुट्टीत आम्ही तिघी छोट्या स्पीकरवर गाणी लावून मनसोक्त नाचतो. घरात एखादं लग्न असेल तर हळदीला कोणत्या गाण्यावर कसं नाचावं, याची आम्ही धमाल प्रॅक्टिस करतो. हल्लीच आम्ही तिघी शॉपिंगला गेलो होतो. शॉपिंग म्हणजे काय… घरगुती वापराच्या प्लॅस्टिकच्या वस्तू मिळतात अशा एका प्रशस्त दुकानात गेलो. दोघी जाम खुश झाल्या. शिवाय, या दोघींनाही घरातल्या वस्तूंबद्दल बरंच कळतं, हेही लक्षात आलं.
आपली मुलं मोठी होताना पाहणं, त्यांच्यासोबत आपणही पालक म्हणून मोठं होणं, नव्यानं अनेक गोष्टी शिकणं, यात आनंद आहेच. पण, यात शिकण्याचा भाग मोठा आहे. पेशन्स, चटकन रिअॅक्ट न होणं, संपूर्ण ऐकून घेणं, त्या त्या वयात काय वाटत असेल हे सतत भूतकाळात जाऊन शोधणं, ही कसोटी असते पालकांची.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq
.............................................................................................................................................
मी पालीला प्रचंड घाबरते. म्हणजे छोटंसं पिल्लू दिसलं तरी मी भीतीनं रडू लागते. यावर अनेकदा माझं हसू झालंय, चार लोकांत माझी टिंगल झालीय. एकदा आईच्या घरी रहायला गेलो होतो. किमया अचानक जीवाच्या आकांतानं रडत घरी आली. आधी कळेचना काय झालंय. तिला धड बोलताही येत नव्हतं. जवळ घेऊन खूप धीर दिला. तेव्हा तिनं सांगितलं की, तळमजल्यावर खेळताना कुणा मुलानं प्लॅस्टिकची पाल अचानक समोर आणून घाबरवलं होतं. एव्हाना आसपासचे सगळे गोळा झाले होते. किमयानं कारण सांगितल्यावर साधारण सूर उमटला, ‘अगं काय हे, खेळता असं होतंच. इतकं काय रडायचं, प्लॅस्टिकची खोटीच होती ती वगैरे.’
मी तिला अगदी घट्ट जवळ धरून म्हटलं, ‘किमू, इट्स ओके. वाटते भीती. वाटली तर वाटू देत.’
ती शांत झाल्यावर तिला घेऊनच खाली गेले. त्या मुलाला ओरडले नाही, पण समजावलं की असे खेळ खेळू नयेत. तिलाही तो खेळण्यातला प्राणी दाखवला. म्हटलं, बघ. खोटं आहे हे. आता काढून टाक भीती आणि पुन्हा खेळायला लाग.
माझ्यात इतकी भीती का बसलीय मला माहीत नाही. पण, किमू माझ्या कुशीत रडत होती, तेव्हा इतकंच आठवलं की मी लहान असताना आईनं असं समजावलं नव्हतं.
अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या लहानपणी काय घडलं, आपण काय केलं यावर आपण मुलांशी कसं वागतो, हे ठरतं बऱ्याचदा. त्यातून काही वेळा आपण थोडं अधिक ताणतो, काही वेळा एखाद्या गोष्टीचा अट्टाहास करतो.
पण, मला वाटतं हे पण ठीकच. नाहीतरी कधी आपण मागे वळून पाहिलं असतं. मुलांच्या निमित्तानं पाहतो, शक्य असेल ते बदलण्याचा प्रयत्न करतो.
…….
माझ्या आईच्या मते मी एक ‘आळशी आई’ आहे.
लहान मूल असलेल्या घरात साधारणपणे दोन प्रकारे स्वयंपाकाचे पदार्थ बनवले जातात. एक नेहमीचा आणि दुसरा मुलांसाठी बिनतिखटाचा. मी हे असले लाड कधीच केले नाहीत. चिकन-मटण बनवलं की, त्यातल्या तुकड्यांना लागलेला मसाला जरासा चपातीनं पुसून तेच भरवायचे मी मुलींना. वेगळं जेवणं असं कधीच केलं नाही त्यांच्यासाठी. यामुळे अगदी चौथ्या-पाचव्या वर्षीच दोघीही अगदी खेकडाही मनसोक्त खाऊ लागल्या.
मला मुळातच किचनमध्ये जाण्याचा कंटाळा आहे. त्यामुळे माझ्या आईला वाटतं की, मी आळस म्हणून असं करतेय. स्वयंपाकाची नावड हा त्यातला एक मुद्दा आहेच हं पण. नवरा उत्तम स्वयंपाक करतो. तो घरूनच काम करत असल्यानं रोज काही ना काही बनवतो मस्त. धाकट्या लेकीला किचनच्या कामात जरा गती आहे. तिला आतापासूनच बरंच कळतं, अगदी यात फोडणीची हळद जरा करपलीय, इथपर्यंत. त्यामुळे बाबासोबत ती मस्त किचनमध्ये रमते. शिवाय अमूक कामं मुलींनी करायची, अमूक मुलांनीच करायची, असलं काही त्यांना वाटत नाही. घरातली बाई रोज बाहेर जाते आणि पुरुष रोज घरी काही ना काही खायला बनवतो, हे त्यांना अगदी सहज वाटतं.
घरातल्या कामांबद्दलही तेच. घर टापटीप असावं, याबद्दल मी जरा आक्रस्ताळी आग्रह करते बहुधा. मुली अजूनही बराच पसारा करत असल्या तरी घर आवरणं वगैरे करतातच. याबद्दलही मला अनेकांनी टोमणे मारले होते. पण, मोठी लेक कचरा काढते, धाकटीला भांडी घासायला आवडतं याचं आताशा आजीला कौतुक वाटायला लागलंय. तिच्याकडे रहायला गेल्या की, दोघी अगदी कौतुकानं कामं करतात.
मुलांना फार नाजूक वागणूक देणंही मला कधी जमलं नाही. मूल रडतंय म्हणून त्याचे हट्ट पुरवा, हे मी कधीच केलं नाही. अगदी काही महिन्यांच्या असतानाही मी त्यांना थोडा वेळ रडू द्यायचे. पण, त्यामुळे मी अनेकांच्या मनात ‘व्हिलन’ बनलेय. आता तर माझ्या लेकींनाही कळलंय की, या बाईसमोर रडून काहीच फायदा नाही.
…….
आता खरं तर मुली मोठ्या झाल्या. मोठी लेक बऱ्याचदा माझे काही हलके कानातले मला न विचारताच घालते. अजून काही वर्षांनी माझ्या अनेक वस्तू वापरू लागेल. मला वाटतं अगदी तान्हं बाळ असतानापेक्षा हा काळ अधिक छान आहे. आता आम्ही एकमेकींच्या अधिक जवळ असतो. प्रत्येक गोष्टीवर छान रिअॅक्शन असतात. त्यामुळे त्या नेमक्या कशा मोठ्या होताहेत, काय विचार करताहेत, हे कळतं. आपण खरंच त्यांची मैत्रीण बनू शकू का माहीत नाही… पण, या वयातच बंध अधिक घट्ट होतात, असं मला वाटतं.
आता सकाळी पेपर वाचताना किमया ‘बॉम्बे टाईम्स’चे फोटो पाहून मला सांगते, ‘या ब्युटी काँटेस्टमधल्या सगळ्या मॉडेल्स किती एकसारख्याच दिसतात! हाऊ बोअरिंग!!’
आता मी तयार होताना धाकटी अनया मला सांगते, मी कोणत्या साडीत अधिक छान दिसते.
यापेक्षा अधिक काय हवं असतं?
हा मोकळेपणा, हा संवाद टिकून रहावा, इतकंच वाटतं मला. अजून तशा त्या फार लहान आहेत. हळूहळू त्या तरुण होतील. काही वर्षांतच त्यांच्या आयुष्यात मासिक पाळीचा महत्त्वाचा टप्पा येईल. मग, खास मित्र येतील. करिअरचे निर्णय ठरतील. बरंच काही घडेल.
आपली मुलं एक स्वतंत्र माणूस म्हणून घडताहेत, याचा आनंद असतो, तशी जबाबदारीही फार मोठी असते. मी मुलींची घट्ट मैत्रीण बनेन, असं मला अजिबात वाटत नाही. तसं मला बनायचंही नाही. मी त्यांची आई आहे आणि मला आईच रहायचं आहे.
पण, कधीही कोणतीही गोष्ट त्या माझ्याशी बोलू शकतात, हा विश्वास मला त्यांना द्यायचा आहे. कुठे अडलं तर आई मदत करेल, याची खात्री त्यांना द्यायची आहे, आपण चुकलो तरी आई आणि बाबा ही दोन माणसं समजून घेतील आणि चूक सुधारायला मदतही करतील, हा विश्वास त्यांना वाटायला हवा, असं वाटतं.
…….
मी एक ‘दुष्ट आई’सुद्धा आहे…
व्यक्ती म्हणून माझ्यामध्ये अनेक कॉम्प्लेक्स आहेत. अर्थात, आई म्हणूनही ते आलेच. आपल्या स्वभावाचे, गुणदोषांचे असे कप्पे नाही पाडता येत.
सगळ्यात भयंकर गोष्ट मला कोणती वाटते? माझ्या मनात मुलींच्या संदर्भात इतके भयानक विचार येतात... कधी कधी स्वत:चीच लाज वाटते, राग येतो.
आम्ही ज्या सोसायटीत राहतो, तिथं सगळीच मुलं अगदी बिनधास्त मैदानात खेळत असतात. लहान लहान सात-आठ बागा आहेत, शिवाय एक मोठं मैदान आहे. त्या त्या वेळच्या मूडनुसार आणि कोणत्या ग्रुपसोबत खेळतोय त्यानुसार मुली वेगवेगळ्या ठिकाणी खेळायला जातात. खूप चांगल्या पद्धतीनं इथं गणपती, गरबा, ईदचं जेवण, दिवाळी पार्टी, ख्रिसमस असं सगळं साजरं होत असतं. मला स्वत:ला या सगळ्याची आवड आहेच. त्यामुळे मुलीही सगळ्यात अगदी छान नटूनथटून सहभागी होतात. आताशा बऱ्याचदा त्या एकट्याच जातात. तसं पहायला गेलं तर आमच्या या कॉम्प्लेक्समधली ९० टक्के माणसं त्यांना नावानिशी ओळखतात म्हणायला हरकत नाही.
हल्लीच त्या सोसायटीचा गणपती येणार म्हणून खाली गेल्या होत्या. सगळीच मुलं अगदी रात्री ११ पर्यंत खालीच होती. एकदा मी जाऊन त्यांना पाहूनही आले. पण, घरी आल्यावर मनात भलभलते विचार यायला लागले. दोघींपैकी कुणालाही कुणी फसवून कुठे नेलं तर? काही केलं तर? खाली नाशिक बाजा सुरू होता, तर त्या आवाजात कुणाला मुलीच्या रडण्याचा आवाजही यायचा नाही, इतपत इमॅजिन केलं मी.
हे असं वारंवार होतं. का ते माहीत नाही? पण, एक कायमस्वरूपी भीती मनात घर करून आहे.
मुलगी आहे म्हणून आहे का ही भीती? असेलही. सुदैवानं मला व्यक्तिश: असा अनुभव लहानपणी आला नाही. त्यामुळे त्याची भीती असण्याचं तसं वरकरणी कारण नाही. पण, ही भीती आहेच. मुली शाळेत जायला लागल्या त्याआधीपासून मी त्यांना ‘बॅड टच’ ही संकल्पना हसतखेळत शिकवली आहे. काय करावं, काय करू नये, कसं ओरडायचं, नाही म्हणायला शिकलं पाहिजे वगैरे सगळं शिकवलंय. पण, तरीही भीती उरतेच.
खरं तर मुलगी झाली, पहिली आणि दुसरीही, तेव्हा जितका आनंद झालाय आयुष्यात, तितका कधीच झाला नव्हता. माझ्या आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डॉक्टरलाही धक्का बसला होता. पण या एका बाबतीत मला मुली असल्याचं जाम टेन्शन येतं.
.............................................................................................................................................
‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
पालक म्हणून आम्ही दोघं कसे आहोत, मुलांना काय शिकवायचं, त्यांना कसं घडवायचं वगैरे बैठका आम्ही दोघांनी कधीच केल्या नाहीत. नवऱ्याच्या भाषेत सांगायचं तर हे सगळं इतकं सिरिअसली घेण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या कलानं, वेगानं वाढू द्यावं. तेही खरंच.
पण, माझ्यामध्ये अनेक न्यूनगंड आहेत, हे मी आधीच मान्य केलंय. त्यामुळे बाहेर जाताना त्या दोघींनी कसं तयार व्हावं, अभ्यास कसा करावा, घर नेटकं ठेवावं वगैरे असंख्य बाबतीत मी सतत त्यांना ओरडत असते. नवऱ्याला हा जाच वाटतो, त्यालाही तो होतच असणार!
मुलं नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, इतर आजारपणांमुळे होणारा वैताग, कधी आर्थिक चणचण या सगळ्याचा राग सगळ्यात आधी त्यांच्यावर निघतो. मागाहून प्रचंड वाईट आणि अपराधी वाटतं. पण, रागाच्या भरात त्या दोघींवर प्रचंड ओरडते.
इतकं होऊनही, अनया दिवाळीत देवाला नमस्कार करून आली आणि म्हणाली, ‘मी बाप्पाला सांगितलं, मम्माला शांतता मिळू दे. तुला शांतता हवी असते ना? आम्ही नीट वागू आता.’
डोळ्यांत पाणी आलं. कारण, यावर काही बोलण्याची आपली कुवत नाही, हे मला नीटच कळलंय.
.............................................................................................................................................
लेखिका अमिता दरेकर मुक्त पत्रकार आहेत.
darekar.amita@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Prashant
Thu , 15 November 2018
superb article, one of best article on 14 the November, children's Day.