अजूनकाही
१९६० ते १९८० या दोन दशकांत मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीवर डॉ. काशिनाथ घाणेकर नामक अभिनेत्याचे ‘गारुड’ होते. त्यांचा ‘बिनधास्त’ आणि एकदम ‘कडक’ अभिनय पाहायला रसिक प्रेक्षक नेहमीच गर्दी करायचे. त्यामुळे त्यांची भूमिका असलेले नाट्यप्रयोग शक्यतो ‘हाऊसफुल’ व्हायचेच. त्यांचा ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधील ‘संभाजी’ जेवढा गाजला, तेवढाच ‘अश्रूंची झाली फुले’मधील ‘लाल्या’ गाजला. रंगमंचावरील एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या घेण्याची पद्धत याच अभिनेत्याने सुरू केली. तसेच नाटकाच्या श्रेयनामावलीत अभिनय करणाऱ्या प्रमुख कलावंतांची नावे लिहिल्यानंतर ‘ ... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ अशी नवी पद्धत याच अभिनेत्यामुळे सुरू झाली असे म्हणतात!
अशा या ‘कलंदर’ अभिनेत्याचे वैयक्तिक तसेच रंगभूमीवरील जीवन मात्र खूपच गुंतागुंतीच्या घटनांनी भरलेले होते. ज्या रसिक प्रेक्षकांनी या अभिनेत्याला डोक्यावर घेतले, त्याच रसिक प्रेक्षकांनी शेवटी शेवटी त्याला पायदळीही तुडवले.
अशा एका विलक्षण बेदरकार आणि ‘कलंदर’ अभिनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर साकार करणे ही खरे तर मोठी अवघड गोष्ट होती. मात्र अभिजित देशपांडे या ‘घाणेकरवेड्या’ लेखक-दिग्दर्शकाने हे शिवधनुष्य उचलले आणि चांगले पेललेही. ‘... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा मराठी चित्रपट पाहिल्यावर त्याची साक्ष पटते.
कोणत्याही नावाजलेल्या कलावंतावर जीवनपट करायचा म्हटले म्हणजे की, त्याच्या गाजलेल्या कलाकृतींबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा संदर्भ येणे हे स्वाभाविकच आहे. या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनातील प्रमुख गोष्टी नेमकेपणाने टिपल्या आहेत. व्यवसायाने दंतवैद्य असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांना अभिनयाचे खूपच वेड होते. नाटकांमध्ये काम मिळण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, तसेच एकदा काम मिळाल्यानंतर आपल्या अभिनयाबद्दल असलेला प्रचंड मोठा आत्मविश्वास आणि त्याला तडा देणाऱ्या संबंधितांना फटकारण्याची आणि वेळप्रसंगी ते काम सोडून देण्याची बेदरकार वृत्ती, ही डॉ. काशिनाथ घाणेकर यांची स्वभाववैशिष्ट्ये चित्रपटाच्या सुरुवातीलाच लक्ष वेधून घेतात.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq
.............................................................................................................................................
चित्रपटाच्या कथेत डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी अजरामर केलेल्या ‘संभाजी’ (‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’), ‘लाल्या’ (‘अश्रूंची झाली फुले’), ‘बापू’ (‘गारंबीचा बापू’) या मोजक्याच भूमिकांचा उहापोह करण्यात आला आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या सुरुवातीलाच नाटककार वसंत कानेटकर यांच्याशी झालेले मतभेद तरीही त्यांनी साकारलेला ‘संभाजी’ आणि ‘लाल्या’ प्रचंड आवडल्याने केवळ त्यांच्या अभिनयासाठी वसंत कानेटकर यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’ हा ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा उत्तरार्ध लिहिणे आणि त्यामध्ये पुन्हा घाणेकर यांनी ‘संभाजी’ साकारणे आदी गोष्टींवर चित्रपटात भर देण्यात आला आहे. तसेच अभिनेत्री सुलोचना यांच्या ओळखीमुळे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याशी झालेला परिचय आणि त्यामुळे ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात डॉ. घाणेकर यांना मिळालेले काम आणि त्याद्वारे चित्रपटसृष्टीचा उघडलेला दरवाजा या प्रमुख बाबींचाही अंतर्भाव आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील तसे ‘फिल्मी’च होते. डॉ. इरावती यांच्यासारखी सुविद्य पत्नी असतानाही ते सुलोचनादीदी यांची कन्या कांचन घाणेकर यांच्या प्रेमात पडले आणि दोघांच्या वयात खूप अंतर असताना आणि सुलोचनादीदींचा विरोध असतानाही दोघेही विवाहबद्ध झाले. डॉ. काशिनाथ आणि डॉ. इरावती घाणेकर यांचा संसार कसा ‘दुःखी’ होता हे काही प्रसंगातून छान चित्रित करण्यात आले आहे. तसेच काशिनाथ आणि कांचन यांचे ‘प्रेमनाट्य’ खूपच संयत पद्धतीने रंगवण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने तत्कालीन नाट्यव्यवसायातील लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यामधील मतमतांतरे, हेवेदावे, वैयक्तिक स्पर्धा यांचेही दर्शन घडवण्यात आले आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे रंगमंचावरील ‘नखरे’ फारसे आवडत नसूनही केवळ त्यांच्या अभिनयाला दाद देण्यासाठी प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्याशी केलेली अतूट मैत्री आणि त्यातून नाट्यव्यावसायिकांच्या बैठकीत डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर बंदी घालण्यासाठी आलेला ठराव फेटाळण्याची केलेली कृती, डॉ. श्रीराम लागू यांचा अभिनेता म्हणून झालेला उदय, त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा आणि त्याचबरोबर प्रेक्षकांची बदलत चाललेली अभिरूची आदी गोष्टी रंगतदार झाल्या आहेत.
चित्रपटातील प्रमुख त्रुटी मात्र ठळकपणे जाणवत राहते. ती म्हणजे चित्रपटाचा काळ उभा करण्यात आलेले अपयश. त्यामुळे त्याच त्या स्टुडिओत चित्रित केलेले अनेक प्रसंग पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात.
कलाकारांची अचूक निवड हे मात्र या चित्रपटाचे प्रमुख यश म्हणावे लागेल. सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका अतिशय तन्मयतेने रंगवली आहे. त्याला डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या ‘रूपात’ उभा करण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. प्रसाद ओक यांनीही प्रभाकर पणशीकर यांची भूमिका उत्तम वठवली आहे. याशिवाय नंदिता पाटकर (इरावती घाणेकर), सोनाली कुलकर्णी (सुलोचना दीदी), वैदेही परशुरामी (कांचन घाणेकर), सुमित राघवन (डॉ. श्रीराम लागू), मोहन जोशी (भालजी पेंढारकर) यांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. थोडक्यात मोठ्या पडद्यावरील हा ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ मूळ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच वरून जेवढा ‘कडक’ तेवढाच आतून ‘मऊ’ बनला आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment