अजूनकाही
८ ते १० नोव्हेंबर १९३८ या तीन दिवसांत जर्मनीत शंभरच्यावर ज्यू नागरिकांची जमावाने हत्या केली. सात हजार ज्यूंचे उद्योगधंदे आणि दुकानं आणि एक हजार सिनेगॉग (ज्यू प्रार्थना मंदिरं) नष्ट करण्यात आली. तीस हजार ज्यू नागरिकांना अटक करून त्यांना छळछावण्यात पाठवण्यात आलं. जर्मनीसोबत ऑस्ट्रिया, पोलंड आणि झेक रिपब्लिकचे काही भाग या सरकारप्रणीत हिंसेत सामील झाले होते. हे देशहिटलरच्या अधिपत्याखाली होते. या तीन दिवसांना ‘द नाईट ऑफ द ब्रोकन ग्लास’ (भंगलेल्या काचांच्या रात्री) असंही म्हटलं जातं.
या तीन दिवसांत जॉन इझबिकी या आठ वर्षाच्या मुलाच्या आई-वडिलांच्या दुकानावर हल्ला झाला. इझबिकी कुटुंबानं तत्काळ अमेरिकेत स्थलांतर केलं. हे कुटुंब अमेरिकेला पोचलं हा चमत्कार मानला पाहिजे, कारण त्या काळात कोणतीही ज्यू व्यक्ती नाझी यंत्रणेच्या कचाट्यातून सुटणं अशक्यप्राय होतं. ज्यूंचा निर्वंश करण्याचं ‘फायनल सोल्युशन’ नाझी सरकारनं ‘शोधून’ काढलं होतं.
पुढे जॉन इझबिकी मोठे प्रत्रकार आणि लेखक म्हणून नावारूपाला आले. ‘लाइफ बिटवीन द लाईन्स’ या पुस्तकांत त्यांच्या नाझी जर्मनीच्या हिंसेच्या, सरकारधार्जिण्या नागरिकांच्या आणि नाझी पार्टीत असूनही ज्यूंना मदत करणाऱ्या शुल्त्झसारख्या जर्मनांच्याही आठवणी आहेत.
इझबिकी यांच्या आठव्या वाढदिवसानंतरच्या तिसऱ्या दिवशी ज्यू हॉलोकॉस्ट आणि दहा महिन्यांनी दुसरं महायुद्ध सुरू झालं.
या पुस्तकाला हा संपादित अंश.
- अलका गाडगीळ
.............................................................................................................................................
८ नोव्हेंबर १९३८ बर्लिन
माझा आठवा वाढदिवस. माझ्या आई-बाबांनी माझ्यासाठी सुंदरसं घड्याळ आणलं होतं, मनगटावर लावण्याचं. छानंच होतं ते, पण फरक इतकाच की आई-बाबा मला नेहमी खेळातल्या वस्तू द्यायचे. उदाहरणार्थ तीन चाकी लाल सायकल किंवा पंच अॅन्ड ज्यूडी शो. अशा अद्भूत गिफ्ट मला मिळायच्या. तीन चाकी सायकलवर बसून मी जवळच्या पार्कमध्ये जात असे.
पण घड्याळासोबत मात्र मी खेळू शकलो नाही. माझी निराशा आई-बाबांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ‘वाईट वाटून घेऊ नकोस होर्स्ट, पुढच्या वर्षी आपण तुला भारी गिफ्ट घेऊ’. मी चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवत म्हंटलं ‘थँक्यू पापा’.
माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या घरावर थाप पडली. सात वाजले होते. मुट्टीने (आई) दार उघडलं. दरवाज्यात हेअर (श्री) शुल्त्झ उभा होता. आमच्या विभागाचा तो जवळजवळ प्रमुख असल्यासारखाच होता. त्याच्या युनिफॉर्मवर ‘नॅशनल सोशालिस्ट’ (एस्ए) पार्टीचा बिल्ला होता.
‘शुल्त्झ अरे आत ये ना कॉफी घेऊया’. शुल्त्झचा आवाज ऐकून बाबाही दरवाज्याजवळ आले. ‘नको नको फ्राउ इझबिकी मला अजिबात वेळ नाहीए’. नंतर तो जरासा आत आला आणि दबक्या आवाजात म्हणाला, ‘मी तुम्हाला सांगायला आलोय. तुमच्या दुकानावर आज रात्री सात वाजता हल्ला होणारे. मी काही बोल्लो नाही आणि तुम्ही काही ऐकलं नाही. समजलं?’
‘अरे हो, काळजी करू नको’, असं बाबा म्हणत असतानाच तो धाडधाड पायऱ्या उतरत निघूनही गेला.
आई-बाबांना धक्का बसला होता. कोणीच काही बोलत नव्हतं. त्यांनी शांतपणे कॉफी प्यायली आणि पुढं काय करायचं याची चर्चा सुरू झाली.
आमचं दुकान आमच्या घराच्या पुढच्या चौथ्या इमारतीत होतं. स्वेटर स्टॉकिंग्ज आणि बायकांच्या आणि मुलांच्या अंतर्वस्त्रांनी दुकान काठोकाठ भरलेलं होतं. आठ वाजता दुकान उघडलं जायचं.
बाबांनी ठरलेल्या वेळेवर दुकान उघडलं. आई आणि मीही त्यांच्यासोबत होतो. एरवी बाबा एकटेच जायचे. दर्शनी भागात ठेवलेला माल आम्ही मागच्या खोलीत ठेवायला सुरुवात केली. नंतर आईनं मला परत पाठवलं आणि ती दुकानात बाबांच्या मदतीसाठी थांबली. आई-बाबांना आपला माल वाचवायचा होता. ते तो कसा वाचवणार होते कोण जाणे!
शुल्त्झ नाझी स्वयंसेवक असला तरी आस्थेवाईक होता. त्यानं इशारा दिलेला होता. आई-बाबा त्याचे मनोमन आभार मानत होते. आम्हाला पुढे काय वाढून ठेवलंय याची सूचला मिळाली होती. हे सगळं स्पष्टपणे समजण्याचं माझं वय नसलं तरी ते मला कळत होतं. वातावरणात ज्यू द्वेष भरला होता.
दुपारचं जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ झोप काढत असे. काचांच्या फुटण्याच्या आवाजानं त्या दिवशी मला जाग आली. समोरच्या चामड्याच्या दुकानावर दगडफेक होत होती. दुकानाचा चक्काचूर झाला. दगड विटा आणि काचांच्या राशीवर ‘जे’चं चिन्ह विराजलं होतं. जे म्हणजे ज्यू. सर्व ज्यू दुकानादारांना ‘जे’ चिन्ह लावणं सक्तीचं करण्यात आलं होतं.
थोड्या वेळानंतर तिथं एक वृद्ध बाई आली. सगळीकडे पाहात ती ओरडली, ‘ज्यूंच्या व्यापारांवर बंदी आणली पाहिजे. त्यांना मारून टाकलं पाहिजे. त्यामुळे जर्मनी स्वच्छ होईल’. तिचा आवाज एवढा वाढत गेला की, एका पातळ तारेवर कसाबसा लटकत असलेला काचेचा तुकडा नेमका त्या वृद्धेच्या डोक्यावर पडला. तो घाव एवढा जबर होता की, ती तत्काळ गतप्राण झाली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजीकडे पाहून मला वाईट वाटलं तरी देव दुष्टांना शिक्षा देतो यावर माझा विश्वास बसला.
बर्लिनमधल्या ‘इव्हालिदेन स्ट्रास’ या आमच्या विभागाचं वर्णन मला करू द्या. लंडनच्या बॉन्ड स्ट्रीटसारखाच हा भाग आहे. नॉर्ड बानोफ आणि जनरल पोस्ट ऑफिस स्टेशनला जोडणारी रेल्वेगाडी आमच्या रस्यावरून जायची. इथं खूप हॉटेलं तर होतीच, शिवाय रस्ता जिथं संपतो तिथं विद्यापीठाची हद्द सुरू होते. त्यामुळे खूप वर्दळ असलेला हा रस्ता.
आमचं दुकान पोस्ट ऑफिसच्या शेजारीच होतं. लोकरीचे कपडे मिळत असल्यामुळे नॉर्ड बानोफला जाणारे स्कॅन्डिनेव्हियन पर्यटक आमच्या दुकानात खरेदी करायचे.
शुल्त्झनं सांगितल्याप्रमाणे हिटलर युथ आणि एसए पलटणी तिथं हजर झाल्या. बघे तर प्रचंड संख्येनं आले होते.
हिटलर युथनं आमच्या दुकानावर दगडफेक करायला सुरुवात केली. पण काचा तुटल्याच नाहीत. बघे हसायला लागले. त्यांनी या पायदळाची ‘हुर्यो’ केल्यामुळे त्यांनी आपला मोहरा मांसाच्या दुकानाकडे वळवला. दुकानाच्या मालकाने विचारलं- ‘काय हवंय तुम्हाला?’
‘तुझ्या पहिलवानांना सांग यिदच्या दुकानाची काचेची खिडकी फोडायला’, फलटणीचा प्रमुख गरजला.
‘ते होण्यातलं नाही’, मांसाच्या दुकानाच्या मालकानं उत्तर दिलं. क्षणार्धात जमावानं त्याला खाली पाडून ठेचायला सुरूवात केली. त्याच्या दुकानातली वजनं आमच्या अर्धगोल आकाराच्या शोकेसवर फेकली. त्या सुंदर शोकेसचा चक्काचूर झाला. मी आमच्या बाल्कनीतून सगळं पाहात होतो आणि जोरजोरात किंचाळत होतो.
नंतर रहिटलर युथनं आमच्या दुकानावर काचांचे असंख्य तुकडे फेकले. दुकानात असलेले माझे आई-बाबा मरून गेले असणार या विचारानं मला वेडं केलं. माझी आजी ओमा माझ्याबरोबर होती. ओरडून ओरडून माझा आवाज कर्कश्श झाला. तिनं मला घट्ट धरून ठेवलं. नंतर मला झोप लागली आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा माझे आई-बाबा माझ्या पलंगाच्या टोकाशी बसले होते. त्यांना मिठी मारून मी पुन्हा जोरजोरात रडू लागलो, ओरडू लागलो.
माझ्या स्वरातला कर्कश्शपणा नंतर गेलाच नाही, तो अजूनही आहे. हिटलरकडून मला मिळालेली ती भेट आहे असं मी मानतो.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment