'डिअर जिंदगी' : बालिश कामासाठी शाबासकी
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
यश एनएस
  • 'डिअर जिंदगी'चं एक पोस्टर
  • Sat , 10 December 2016
  • हिंदी सिनेमा Bollywood डिअर जिंदगी Dear zindagi शाहरुख खान Shah Rukh Khan आलिया भट Alia Bhatt

'डिअर जिंदगी'बद्दल लिहिताना खूप विचार केल्यानंतर वाटलं की, 'चित्रपट चाळणी'चा वापर करावा लागेल. या चाळणीत सगळ्यात ढोबळ गोष्टी वर राहतात आणि बारीक, अर्थपूर्ण गोष्टी खाली जमा होतात. या चाळणीची गरज आहे. कारण चित्रपट पाहून मनात एक अती अंबट आणि असह्य अशी चव निर्माण झाली आहे. त्यामुळे चित्रपटातील काही मोजक्या चांगल्या बाबी सुटून जाऊ नये असा प्रयत्न करणं भाग आहे. गौरी शिंदेंचा 'इंग्लिश विंगलिश' हा या आधीचा, २०१२ मध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेला, श्रीदेवींबरोबरचा चित्रपट. मी तो पाहिला नसल्यामुळे या दिग्दर्शिकेने बनवलेला 'डिअर जिंदगी' हा पहिलाच चित्रपट पाहिला. याचा फायदा असा की, आधीचा चित्रपटा पाहून उरलेली सदिच्छा 'चित्रपट चाळणी'च्या आड बिलकूल आली नाही.

तर सगळ्यात आधी चाळणीत अडकलेल्या ढोबळ गोष्टी. आमिर खानने 'सत्यमेव जयते'वर कितीही रडून-ओरडून सांगितलं तरी भारतात अजूनही मानसिक आजारांच्या जाणीव-जागृतीबद्दल बोंबच आहे. भारत हा असा देश आहे जिथं २५-३५ टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात मानसिक आजारातून जावं लागतं. अंदाजे १ लाख ३५ हजार लोक दर वर्षी आत्महत्या करतात. त्यातले ६८ टक्के मृत्यू हे १५-४४ या वयोगटातले असतात. जिथं मानसिक आजारांबद्दल बोलणं प्रचंड अवघड आहे, अशा भारत देशात या विषयाच्या जवळ जाणारा चित्रपट बनवणं आणि त्यात 'आलिया भट' आणि 'शाहरूख खान'सारखे प्रसिद्ध कलाकार असणं याला नक्कीच काहीतरी महत्त्व आहे. 'डिअर जिंदगी'मधील सर्वांत महत्वाचे मुद्दे म्हणजे कुटुंबाकडून आधार व मान्यता न मिळणं आणि त्रास झाल्यावर डॉक्टरकडे न जाणं, या गोष्टी हाताळल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर तरुण स्त्रियांना तोंड द्यायला लागणाऱ्या काही विषयांबद्दल पण चांगला संदेश या चित्रपटात आहे. अशी आशा करता येईल की, कदाचित हा चित्रपट बघून डिप्रेशन किंवा आणखी कुठल्या मानसिक आजारांबरोबर एकट्यानेच, आतल्याआत झगडा करणाऱ्या काही प्रेक्षकांना मदत होईल.   

आलिया भटने नेहमीप्रमाणेच जीव खाऊन अभिनय केला आहे. काही मोजकी दृश्य तिच्यामुळे प्रभावी ठरतात. मे २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फोबिया' या चित्रपटानंतर लक्षात राहिलेल्या 'यशस्विनी दायमा'ने या चित्रपटातही प्रेक्षकांच्या लक्षात राहील असं काम केलं आहे. चाळणीत उरलेली शेवटची गोष्ट - 'डिअर जिंदगी'मध्ये खूपच छोटा प्लॉट आसला तरी, त्यात एका समलैंगिक पुरुषाला नकारात्मक किंवा विनोदी पद्धतीनं न दाखवता त्याला बाकी सर्व पात्रांसारखंच हाताळलं आहे, हे लक्षणीय आहे.

आता चाळणीतून खाली पडून जमा झालेल्या मोठ्या ढिगाकडे वळूयात. म्हणजेच 'चांगल्या चित्रपटा'च्या अंधुक व्याख्येत 'डिअर जिंदगी'तील कोणते पैलू बसत नाहीत, यांची एक यादी. ती बरीच मोठी होईल. त्यात सगळ्यात आधी हा प्रश्न- चित्रपटात 'चांगला' संदेश असला म्हणजे त्याला एक कलाप्रकार म्हणून पारखताना काही सूट मिळाली पाहिजे का? याचं उत्तर स्पष्ट असलं तरी 'डिअर जिंदगी'सारख्या चित्रपटांच्या बाबतीत बोलताना बऱ्याच वेळा असं आढळून येतं की, प्रेक्षक त्यातील दोष अनावश्यकपणे झाकायला तयार असतात. जसं की तो चित्रपट नसून एखादी सामाजिक हितासाठी केलेली घोषणा वा उपक्रम आहे. चांगला संदेश देणारा एखादा चित्रपट कलात्मकदृष्ट्याही एक मोहक अनुभव असू शकतो. 'फँड्री', 'कोर्ट', 'चक दे इंडिया', 'तारे जमिन पर', 'क्वीन', 'उडान' अशी बरीच अशा चित्रपटांची उदाहरणं आहेत.

'डिअर जिंदगी' त्याच्या विषयाला प्रवचनात्मक पद्धतीनं मांडतो. त्याची एक वाट त्यानं ठरवून घेतली आहे. आणि त्या वाटेवर येणाऱ्या अपेक्षित स्टेशनांवर हा चित्रपट थांबत थांबत शेवटापर्यंत पोचतो. हे टप्पे एकानंतर एक येत असले तरी त्यांच्यातून एक सलग वाट जात नाही. या सतत होणाऱ्या सरधोपट संदेशांचा सगळ्यात जास्त कंटाळा तेव्हा येतो, जेव्हा शाहरूख खान त्याच्या ठराविक फिल्मी स्टाईलनं अती गोड असे संवाद आपल्या दिशेनं झाडत जातो. त्याच्या बहुतांश चित्रपटांमध्ये तो 'शाहरूख खान' याच 'ब्रँड'चा अभिनय करत असतो. या चित्रपटातही त्याने नेहमीपेक्षा थोडा संयम ठेवला असला तरी तो त्या ब्रँडपासून फार लांब गेलेला नाही. मानसिक आजार आणि त्यांचं भारतातील अस्तित्व या विषयाला खूप खोली आहे, अनेकविध पैलू आहेत. पण त्यातलं फारचं थोडं दाखवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो.

आलिया भटने अल्पावधीतच चांगली अभिनेत्री म्हणून नाव कमावलं आहे. तिचा 'हाईवे'मधला अभिनय उत्कृष्ट होता आणि त्यानंतरच्या 'उडता पंजाब'मध्ये पण तिने चांगला प्रयत्न केला होता. तिचा जो काही ब्रँड बनला आहे, त्याला अनुसरून तिचं 'डिअर जिंदगी'मधलं पात्र आहे. त्यामुळे मुळात तिला अभिनयाला फार वावच नाही. तिचं पात्र एका सिनेमॅटोग्राफरचं आहे. ते सजवण्यासाठी तिला मोठी कॅमेरा उपकरणं काही दृश्यांमध्ये वापरताना दाखवलं आहे. पण तिच्या व्यवसायाचा त्याहून अधिक परिणाम तिच्या पात्रावर दिसत नाही. तीचं पात्र विद्यार्थ्याचं, लेखकाचं किंवा इंजिनियरचं असतं तर चित्रपटात फार फरक पडला नसता.

या चित्रपटातील शाहरूख सोडून बाकी पुरुषांच्या अभिनयाबद्दल फार काही सांगण्यासारखं नाही. त्यांच्यातल्या प्रत्येक पात्राला एक किंवा दोनच भावना/वैशिष्ट्यं नेमून दिली गेली आहेत आणि ते त्यांचं काम सर्वसाधारण अभिनय करून पार पाडतात. यशस्विनी दायमाला पण या पुढे 'सदा आनंदी'/'बब्बली' या कक्षेच्या बाहेरच काम करताना मला बघायला आवडेल. काही दृश्यं सोडून यातील सिनेमॅटोग्राफी फार कंटाळवाणी आहे. बरीच दृश्यं किंवा जागा आपण त्याच त्याच अर्थहीन कोनातून बघत राहतो. 'जस्ट गो टू हेल दिल', 'लेट्स ब्रेक अप' आणि 'लव्ह यु जिंदगी'सारखी तरुणांना आवडतील अशी गाणी यात असून अमित त्रिवेदीच्या संगीतामुळे ती सुसह्य होतात.

शेवटचे दोन महत्त्वाचे मुद्दे. पहिला यातील फार परिचयाची नसलेली लाईफस्टाईल. बऱ्याच बॉलिवुड चित्रपटांमधील पात्रं ही कसलं तरी वेगळंच, खूप श्रीमंत आयुष्य जगत असतात. त्यामुळे बहुतांश प्रेक्षकांच्या आयुष्याशी त्यांचं काहीच नातं राहत नाही. परिणामी हे चित्रपट सहानुभूतीतून घडणारा अनुभव बनत नाहीत. या चित्रपटांमधील चकचकीत  लाईफस्टाईल ही फक्त एक महत्त्वाकांक्षाच बनून राहते. खरं तर या चित्रपटातील पात्रांच्या अनावश्यक श्रीमंतीपेक्षा पटकथेत त्यांच्या पार्श्वभूमी आणि रचनेवर केलेलं अपूर्ण काम हे त्यांच्या अशक्तपणाला जास्त कारणीभूत आहे. त्यावर ही चकचकीत लाईफस्टाईल फक्त एक आवरण बनून राहते.

शेवटची गोष्ट म्हणजे या चित्रपटातील प्रमाणाबाहेरच 'प्रॉडक्ट प्लेसमेंट'. 'डिअर जिंदगी'मधील बरीच मिनिटं ही 'ईबे', 'बिंग', 'रागू', 'सिंगापूर एअरलाईन्स' आणि अजून अनेक उत्पादनांच्या 'जाहिरातींवर' घालवली आहेत. आजकाल चित्रपटांच्या कथेतच जाहिरातीचं गुंफण सर्रास चालत असलं तरी ते करण्याचं एक व्यवहारचातुर्य असतं. ते या चित्रपटात तरी अजिबात दिसत नाही. बऱ्याच वेळा आपण चित्रपट बघताना जाहीरात कशी काय बघू लागलो, असं वाटू लागतं. त्यामुळे 'डिअर जिंदगी'ची प्रेक्षकांबरोबरची नाळ तर तुटतेच, पण थोडी फसवणूक झाल्याचा रागही येतो.

'डिअर जिंदगी' चांगला चित्रपट असता तर मला फार आनंद झाला असता. मी 'एचबीओ'वरील १९९९ मधील 'सोप्रानोझ' या टीव्ही मालिकेला मानसिक आजारावरचं कथानक कसं असावं याचं सर्वोत्तम उदाहरण मानतो. १७ वर्षांनंतर भारतात या विषयावर एक तरी, उत्कृष्ट नाही पण चालण्याजोगा चित्रपट बनावा ही अपेक्षा अवास्तव ठरण्याचं कारण नाही. असा चित्रपट बनेपर्यंत या बाबतीत 'जे मिळत आहे त्यात समाधान मानणं', एखाद्या प्रौढ व्यक्तीला त्याच्या बालिश कामासाठी शाबासकी दिल्यासारखं वाटतं!

लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.

yashsk@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख