जाणिवेचा तळ गाठा । आणि भगवंताला भेटा ॥
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 09 November 2018
  • पडघम सांस्कृतिक विजय बाणकर Vijay Bankar

भगवंताला भेटावयाचे असेल किंवा मोक्ष हवा असेल तर जाणिवेच्या तळाशी किंवा मुळाशी जाऊन पहा, असे आत्मतत्त्वज्ञ संत सांगतात. जाणिवेच्या तळाशी जाणे म्हणजे तिच्या व पर्यायाने शरीराच्या मुळापर्यंत जाणे होय. शरीर छत्तीस तत्त्वांचे बनलेले असते. त्या छत्तीस तत्त्वांचे मूळ असलेले सदतिसावे तत्त्व म्हणजे हरी होय. श्रीहरी म्हणजे भगवंत भेटावा म्हणून जाणिवेच्या तळाशी जाण्यासाठी ध्यानयोगरूपी प्रयोग करावयाचा असतो. त्यासाठीची प्रयोगशाळा म्हणजे अर्थातच आपले शरीर होय. संत जो प्रयोग करून देवाचे दर्शन घेतात त्याचे वर्म उदा. संत श्रीज्ञानेश्वरकृत पुढील ओवी व अभंग तसेच श्रीएकनाथकृत पुढील अभंग समजून घेताना लक्षात येते -

१) या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।

ते तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥

२) जाणीव नेणीव भगवंतीं नाही ।

हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदा ॥

३) जाणीव नेणीव सांडोनिया मागे ।

शरण रिघे वेगें एकाजनार्दनीं ॥

वर उद्धृत केलेल्या ओवीत उपाधी हा एक शब्द आहे. उपाधी म्हणजे मर्यादा किंवा अडथळा होय. शरीरामुळे चैतन्य दिसत नाही. शरीराचे भान हे चैतन्याचे ज्ञान होण्याच्या आड येते. म्हणून शरीर चैतन्याची उपाधी होय. पृथ्व्यादी पंचमहाभूते व सत्त्वादी तीन गुण यांनी बनलेली अष्टधा प्रकृती म्हणजे शरीर होय. ते जड असते. जड शरीरात जे चेतना किंवा जाणीव निर्माण करते, त्यास चैतन्य म्हणतात.

चैतन्यामुळे पायांच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत शरीरात सर्वत्र जाणीव खेळत असते. या अर्थाने चैतन्य सर्वगत असते. डोळ्यांना सर्व आकारी वस्तू दिसतात; चैतन्य मात्र दिसत नाही. डोळ्यांप्रमाणे इतर ज्ञानेंद्रियांनादेखील ते गोचर वा कळत नसते. म्हणून ते गुप्त म्हणजे अदृश्य आहे, असे म्हटले जाते.

चेतना ही देवाची एक विभूतीही आहे. तिच्यामुळे म्हणजे देवामुळे शरीर सचेत होते व राहते. श्रीतुकारामांच्या भाषेत, देवाच्या सर्वंकष सत्तेमुळेच शरीर चालत असते; आपल्याला बोलता, ऐकता, पाहता येत असते. सर्व इंद्रियांमार्फत आपल्या शरीराचा कारभार, खरे तर, देवच चालवीत असतो. हे सत्य संत सदैव अनुभवत असतात. म्हणूनच उदा. तळहातावर असलेली वस्तू जशी आपण पाहू शकतो तसा देहात असलेला हरी आम्ही (दिव्य ज्ञानदृष्टीने) पाहत आहोत, असे श्रीज्ञानदेव ‘हरिपाठात’ म्हणतात.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://tinyurl.com/yajwg4nj

.............................................................................................................................................

हरीला पाहणे कसे शक्य होते ते ‘जाणीव नेणीव भगवंतीं नाही’ या अभंगचरणातून त्यांनी सूचित केले आहे. अर्थात, जाणीव व नेणीव या दोन्हींच्या पलीकडे गेल्यावर भगवंताचे स्वरूप कळते. जाणीव व नेणीव या दोन्ही गोष्टी शरीर व मन यांच्याशी संबंधित असतात. त्या भगवंत-दर्शनाच्या आड येतात. या अर्थाने त्या उपाधी होत. त्यांच्यामुळे आपला व भगवंताचा संबंध जणू संपलेला वा तुटलेला असतो. म्हणून, ध्यानरूपी प्रयोगाद्वारे त्यांच्यापलीकडे गेलो की, भगवंताशी आपला संबंध जोडला जातो.

अवतीभवतीच्या वस्तू जशा आपण जाणत असतो, तसा देव आपल्याला जाणता येत नाही. आपण जागे असतो तेव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारे अवतीभवतीच्या गोष्टींची जाणीव आपल्याला होत असते. सुषुप्तावस्थेत गेल्यावर ती व आपल्या शरीराचीही होत असलेली जाणीव हरपते. म्हणजे सुषुप्तीत नेणीव असते. ‘जाणीव नेणीव भगवंतीं नाही’ या विधानातून भगवंत जसा जागृतावस्थेत दिसत नाही, तसाच तो सुषुप्तावस्थेतही दिसत नाही, असे श्रीज्ञानदेव सांगतात. स्वप्नावस्था ही अर्धवट जागृतावस्था व अर्धवट सुषुप्तावस्था होय. ती जाणीव-नेणीव-मिश्रित भासमय असते. म्हणून स्वप्नावस्थेतही देव दिसू शकत नाही. थोडक्यात, जागृती, स्वप्न व सुषुप्ती यांपैकी कोणत्याही अवस्थेत असताना देव दिसत नाही.

देव जागृत्यादी तिन्ही अवस्थांच्या पलीकडचा आहे. म्हणूनच उदा. ‘श्रीगणपती-अथर्वशीर्षात’ त्यास उद्देशून ‘तू अवस्थात्रयातीत आहेस’, असे म्हटले आहे. तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अवस्थेला तुर्या म्हणतात. या अवस्थेत तिन्ही अवस्थांचे ज्ञान होते. म्हणून तिला सर्वसाक्षिणी म्हणतात. तसेच या चतुर्थ अवस्थेत भगवंत हा साक्षात आपला आत्मा आहे, असे ज्ञान होते म्हणून या अवस्थेस ज्ञानरूपिणी अवस्था म्हणतात. म्हणून श्रीहंबीरबाबा म्हणतात त्याप्रमाणे तुर्यावस्था हीच खरी पारमार्थिकी अवस्था ठरते.

जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा जिच्यावर प्रतिकूल परिणाम होतो, या अवस्थांमुळे जिची जाणीव खंडित होते, ती व्यक्ती बद्ध असते. याउलट, मुक्त व्यक्तीवर या अवस्थांचा प्रतिकूल परिणाम होत नसतो. या तिन्ही अवस्थांचा साक्षी मी आत्मा आहे, असे अखंड ज्ञान तिला असते. अर्थात, मुक्त व्यक्तीला तुर्यावस्था प्राप्त झालेली असते. तुर्यावस्थेची परिपक्व स्थिती म्हणजे उन्मनी होय. उन्मनीत व्यक्तीला सर्वत्र एक आत्मारूपी हरीच आहे, असे अनुभवास येते. श्रीज्ञानदेवांच्या भाषेत, अनंत रूपांनी नटलेला ‘तो हरी हा मी आत्मा आहे’, अशी तिची पूर्ण खात्री झालेली असते. अशा प्रकारे हरी ओळखल्यानंतर ‘हरी’ उच्चारण करणारी व्यक्ती आपण सदैव मुक्त असल्याचे अनुभवत असते, असे ते ‘हरीउच्चारणीं पाही मोक्ष सदा’ या विधानातून सूचित करतात.  

हरीदर्शन व हरी-उच्चारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा घडतात, ते त्यांनी श्रीमुक्ताईंना केलेल्रा पुढील उपदेशातदेखील स्पष्ट होते -

तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरीं । पाहता पाहणे दुरी सांडोनिया ॥

वाचेचा उच्चार नवल हे साचार । स्वरूप निर्विकार कोंदाटले ॥

ध्यानयोगरूपी प्रयोग करताना ‘पाहणारा मी’ व ‘मी पहात आहे या जाणीवेसह पाहणे’ या दोन्हीं गोष्टींचा लय करावयाचा असतो. म्हणजे ‘विशुद्ध वा ‘निखळ जाणीवयुक्त’ व्हावयाचे असते. अशा प्रकारे ‘जाणीव-नेणीव-रहित’ झाले की आत्मारूपी श्रीहरी दिसतो. हाच अनुभव, वैखरी, मध्यमा, पश्यन्ती व परा या चारी वाणींपल्याड गेल्याने श्रीहरीदर्शन घडते, अशा वेगळ्या शब्दातदेखील ते सांगतात. अर्थात, स्वदेहीं घडणारी ‘वैखरी ते श्रीहरी ही आध्यात्मिक वारी’ हे मोठे नवल होय, असे मार्गदर्शनही ते करून जातात.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yaj8ppqa

.............................................................................................................................................

‘वाचेचा उच्चार’ होणे हे ‘साचार नवल’ आहे, असे श्रीज्ञानदेव म्हणतात आणि ‘कोण बोलविते हरीविण ॥’ या वचनाने स्वदेहीं असलेला आत्मारूपी हरीच आपला ‘बोलविता धनी’ आहे, असे श्रीतुकाराम सांगतात. थोडक्यात, ध्यान करीत जाणीव-नेणीवेच्या पल्याड गेले की, चारी वाणींच्या तळाशी त्यांना प्रेरित करणारा आत्मारूपी हरी असल्याचे लक्षात येते.

हे सत्र ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमू शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥१॥’ या श्लोकातून श्रीरामदासही सूचित करतात. स्वदेहीं असलेल्या निर्गुण आत्मारूपी देवाच्या दिशेने जाताना आरंभी मूलाधार चक्रावर निर्गुण-सगुण गणपतीचे दर्शन घडते. ध्यानसाधनेत मन एकाग्र झाले वा ‘एकले अवधान देणे’ जमले की वैखरी, मध्यमा, पश्यन्ती व परा या चारी वाचांचे मूळ असलेली शारदा (मूळमायास्वरूप विद्या) प्रसन्न होऊन आत्मारामाकडे नेणाऱ्या ‘पंथाने’ आपल्याला घेऊन जाते.

ही संतकृत ध्यानसाधना म्हणजे नवविध भक्तीप्रकारातील आत्मनिवेदन-नामक नववी भक्ती होय. ही भक्ती करताना ‘जाणीव-नेणीव भगवंतीं नाही’ या अभंग विधानाचा अर्थ उमगतो.

‘जाणता जाणता जाणीव जाते । आपली वृत्ति तद्रूप होते ।

आत्मनिवेदन भक्ति ते । ऐसी आहे ॥’

असे तिचे वर्णन श्रीरामदास करतात. ध्यानसाधनेत ज्ञानेंद्रियांचे व कर्मेंद्रियांचे व्यवहार रोखावयाचे असतात; मनात अजपाशिवाय अन्य विचार येऊ द्यावयाचा नसतो. परिणामी जागे तर आहोत, पण इतर वेळी जे व्यवहार चालू असतात ते बंद आहेत, फक्त श्वासोच्छ्वासमय जप होत असल्याची हळुवार जाणीव आहे, अशी स्थिती असते. अशा वेळी डुलकी वा झोप येण्याची शक्यता असते. त्यामुळे अवधान खंडित वा विचलित होऊ नये म्हणून अखंड सावध रहावयाचे असते. या अभ्यासात केवळ जाणीवेकडे लक्ष ठेवत रहावयाचे असते. परिणामी बाह्य व आंतरिक व्यापारांची जाणीव न राहणे म्हणजे ‘जाणता जाणता जाणीव जाणे’ होय. झोपही येऊ दिली नसल्याने ध्यान करणाऱ्या आपला भाव नेणीवेच्या पलीकडे गेलेला असतो. या अर्थाने आपण ‘जाणीव-नेणीव-विरहित’ म्हणजे विशुद्ध जाणीवयुक्त झालेलो असतो. ही विशुद्ध जाणीवस्थिती निष्कंपपणे तेवणाऱ्या ज्योतीप्रमाणे अंत:करणात टिकून राहू लागली की, आत्मस्वरूपाची प्रचीति येण्याच्या दिशेने आध्यात्मिक प्रगती होऊ लागते. निष्काम बुद्धीने व निरहंकारपणे ध्यान करीत असलेल्या सत्शिष्यावर श्रीसद्गुरू कृपा करतात व ध्यानयोगसाधनेचे फळ म्हणून देह व मन राहून वेगळा असा मी आत्मा आहे, असे त्याला ज्ञान होते, म्हणजे जाणीव व नेणीव यांच्या पलीकडे असलेला भगवंत त्याला भेटतो.  

जाणीव व नेणीव म्हणजे देहबुद्धीयुक्त द्वैतभाव असेपर्यंत जीवाला देवाची समाधिस्थिती प्राप्त होऊ शकत नाही म्हणून आत्मनिवेदन भक्तीरूपी अद्वय-वाटेने जा, असाही उपदेश ‘हरिपाठातील’ चार अभंगाद्वारे श्रीज्ञानदेवांनी केला आहे.

थोडक्यात, विशुद्ध जाणीवयुक्त वा सद्भावयुक्त ध्यानयोगसाधना करून देहादी सर्व उपाधींमध्ये गुप्त वा त्यांच्या तळाशी असलेले आत्मतत्त्व स्वीकारणे म्हणजे भगवंताची भेट घेणे, असे संतांना अभिप्रेत व अपेक्षित आहे. 

….

संदर्भ व टिपा -

१) श्रीएकनाथ, हरिपाठ, अ.क्र.१५, २) ज्ञानेश्वरी, १४.२२४, ३). ज्ञानेश्वरी, २.१२६, ४). श्रीज्ञानदेव, हरिपाठ, अ.क्र. २५, ५). श्रीएकनाथ, अभंग : जनार्दन पायां…, ६) दासबोध, ७.३.१५, ७) गीता, १०.२२, ८) श्रीतुकाराम, अभंग : चाले हे शरीर.., ९) श्रीज्ञानदेव, हरिपाठ, अ.क्र. १२, १०) जीवनकलेची साधना, पृष्ठ क्र. २०, ११) श्रीएकनाथी भागवत, ११.१७८, १२) श्रीज्ञानेश्वराची सनद, अ.क्र. ३, १३) मनाचे श्लोक क्र. १, १४) दासबोध, १३.२.२८, १५) श्रीज्ञानदेव, हरिपाठ, अ. क्र. १३, १६) श्रीज्ञानदेव, हरिपाठ, अ. क्र. ८, ९ व १५.

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 12 November 2018

नमस्कार विजय बाणकर. सुंदर विवेचन आहे. त्याबद्दल आपणांस सादर नमन. भगवानच सर्व व्यवहार चालवतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माणसानं कर्तेपण घेण्यात कोणतं बरं शहाणपण आहे? कर्मे तर प्रकृतीच्या गुणांनी होतात ( -इति भगवद्गीता). आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......