गजानन माधव मुक्तिबोध : आत्ममश्गुल प्रवृत्तीचा बुरखा फाडणारा कवी
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
आसाराम लोमटे
  • गजानन माधव मुक्तिबोध
  • Wed , 07 November 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची आसाराम लोमटे Aasaram Lomte गजानन माधव मुक्तिबोध Gajanan Madhav Muktibodh

उभ्या हयातीत ज्या कवीचा कवितासंग्रह प्रसिद्ध होत नाही, तो कवी मृत्युनंतर पन्नास वर्षांनीही आजचा वाटावा? आजच्या कवीलाही त्याच्या कुळाशी नाते जोडून घ्यावेसे वाटावे? प्रत्येक वळणावर त्याची कविता आव्हानात्मक वाटावी? ज्याला सार्वकालिक म्हणता येईल असा हा कवी! हयातीत जरी नीट मूल्यमापन झालं नाही तरी आजही या कवीची कविता तितकीच आवेगी आणि लखलखीत वाटावी म्हटलं तर ही कुणाला दंतकथाही वाटू शकेल. एकाच कवीची मृत्युनंतर पिढीगणिक पुनर्वाचनं व्हावीत आणि प्रत्येक वाचनात तो नव्यानं आकळावा, असं गजानन माधव मुक्तिबोध यांच्या बाबतीत आहे.

मुझे कदम कदम पर

चौराहे मिलते है

बाहे फैलाए

एक पैर रखता हूँ

कि सौ राहे फुटती

या मुक्तिबोधांच्याच ओळी आहेत. पण कोणत्याही वाचकाला त्यांची कविता वाचताना येणारी अनुभूती ही साधारणपणे अशी आहे. पावलापावलावर चौरस्ते आढळावेत बाहु पसरल्यासारखे आणि एक पाय ठेवला तर शंभर वाटा फुटाव्यात अशी स्थिती त्यांची कविता वाचताना वाचकाचीही होऊन जाते. मुक्तिबोधांची कविता वाचणं ही सुखद गोष्ट नाही. ती कोणाही वाचकाला दमवणारी बाब आहे. एखाद्या ओबडधोबड रस्त्यावरचा प्रवास तुम्हाला दमवतो. या प्रवासाचाही एक शीण येतो. प्रवासानंतरची थकावट सर्वांग घेरून टाकते असा काहीसा अनुभव मुक्तिबोधांची कविता देते. गेलेले वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे होते. मराठी मातृभाषा असलेला हा कवी हिंदीतल्या अढळ अशा स्थानी आहे. महाराष्ट्रातल्याच जळगाव जिल्ह्यातून कधी काळी मुक्तिबोधांचे पूर्वज ग्वाल्हेरला मध्य प्रदेशात गेले. आणि मुक्तिबोध तिकडचेच झाले. १३ नोव्हेंबर १९१७ ही गजानन माधव मुक्तिबोधांची जन्म तारीख. उणं-पुरं ४७ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. १९६४ सालच्या सप्टेबर महिन्यात त्यांचं एका दीर्घ आजारानं निधन झालं. फार संपन्न असं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं नाही. अभाव आणि वंचनांनी कायम पाठलाग तर केलेला होताच, पण स्वतः मुक्तिबोधांनीही जणू हा अभावांचा रस्ता निवडला होता.

त्यांची आठवण जागवताना प्रसिद्ध चित्रकार भाऊ समर्थ यांनी लिहून ठेवलंय की, ‘त्यांनी गरिबी हेतुपुरस्सर खरेदली होती.’ समाजातल्या तळाशी जणू त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला जोडून घेतलं होतं. हयातीत त्यांचे कवितासंग्रह आले आणि लौकिक अशा अर्थानं त्यांना मान्यता मिळाली असे घडलं नाही. ‘चाँद का मूंह टेढा’ हा त्यांचा कवितासंग्रह मृत्युनंतर आला. ‘भुरी भुरी खाक धूल’ हा त्यांचा कवितासंग्रह मृत्युनंतर पंधरा वर्षांनी आला. मुक्तिबोध वेगवेगळ्या प्रकारात लिहीत राहिले. जिथं कविता अपुरी आहे असं वाटलं, तिथं त्यांनी ‘डायरी’ लिहिली आणि डायरीच्या ‘नोंदी’ मावत नाहीत म्हटल्यावर त्यांनी कथा लिहिली.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

कवी, समीक्षक, कथाकार अशा नाना रूपात ते स्वतःला व्यक्त करत राहिले. त्यांची सर्जनाची ऊर्जा प्रचंड होती. ‘काठ का सपना’, ‘विपात्र’, ‘सतह से उठता आदमी’ हे त्यांचे कथात्म साहित्य, ‘कामायनी : एक पुनर्विचार’ ही त्यांची समीक्षा. आता तर सहा खंडांमध्ये ‘मुक्तिबोध रचनावली’ उपलब्ध आहे. त्यांनी अभ्यासक्रमासाठी ‘भारत इतिहास और संस्कृती’ हे पुस्तक लिहिलं. प्रकाशकांच्या व्यावसायिक स्पर्धेतून अन्य एका प्रकाशकानं या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. या पुस्तकातून महापुरुषांची बदनामी होत असल्याचा आरोप केला. बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या ज्या संघटना होत्या, त्यात त्या काळचा जनसंघही होता. हा सारा कालखंड मुक्तिबोधांचीही कसोटी पाहणारा होता.

‘अंधेरे में’ या त्यांच्या दीर्घ कवितेचा निर्मितीकाळही साधारणपणे हाच. स्वातंत्र्य मिळून पंधराएक वर्षांचा कालखंड उलटला होता. स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण भूक, गरिबी, सामाजिक विषमता हे प्रश्न होतेच. स्वातंत्र्याचा भारावलेला कालखंड, त्या काळी पाहिलेली स्वप्नं आणि पुढच्या काळात या स्वप्नांचा झालेला चुराडा, सर्वसामान्य जनतेचा झालेला अपेक्षाभंग. मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली अविश्वासाची भावना, सत्तेच्या षडयंत्राचं भेसूर दर्शन, आजूबाजूचा संभ्रम, कुठेच न जाणवणारी विश्वासाची ओल असा हा काळ मुक्तिबोधांना अस्वस्थ करणारा ठरला. याच दीर्घकवितेत सत्ता आणि बुद्धिजीवी वर्गाच्या हितसंबंधाचा त्यांनी दंभस्फोट केला. शासनकर्त्या वर्गांनी सामान्यांच्या आकांक्षा पायदळी तुडवणं आणि समाजातल्या तथाकथित विचारवंतांनी सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून सामान्यांशी जणू द्रोह करणं याचे प्रतिध्वनी मुक्तिबोधांच्या ‘अंधेरे में’ या कवितेत उमटत राहतात. आपण काय जीवन जगलो, आपल्याच विश्वात रममाण राहिलो आणि आयुष्य जणू एक निष्क्रिय असं तळघर बनलं, ही त्यांनी या कवितेत व्यक्त केलेली भावना जणू त्या काळच्या आत्ममश्गुल अशा वर्गाविषयीचीच होती.

बुद्धि का भाल ही फोड दिया

तर्कोंके हाथ उखाड दिए

जम गए, जाम हुए, फंस गए

अपने ही कीचड में धस गए

विवेक बघार डाला स्वार्थांके तेल में

आदर्श खा गए

अब तक क्या किया

जीवन क्या जिया

ज्यादा लिया, और दिया बहुत बहुत कम

मर गया देश, अरे जिवीत रह गए तुम

हा त्यांच्या कवितेचा तुकडा या आत्ममश्गुल प्रवृत्तीचा बुरखा फाडणारा आहे. ‘अंधेरे में’ या मुक्तिबोधांच्या दीर्घ कवितेचा अनुवाद आधीच्या पिढीत मराठीत वा.रा. कांत यांनी केला आणि त्यानंतर तो चंद्रकांत पाटील यांनी केला.

मुक्तिबोधांची ‘ब्रह्मराक्षस’ ही कविताही तत्कालीन बुद्धिजीवी वर्गाच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाला उघड करते. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखाशी फारकत घेतलेल्या, तळातल्या वर्गाशी फटकून राहाणाऱ्या बुद्धिजीवींसमोर आरसा धरते. ज्यात या कथित बुद्धिजीवींना आपला चेहरा पाहण्याचीही भीती वाटावी आणि या आरशापासून तोंड लपवावं अशी ही कविता आहे. त्या काळाचं वर्णन करणारी ही कविता आजचं वर्णन वाटावी इतकी जिवंत आहे, हे नागडं सत्य केवळ कालचंच नाही, आजचंही आहे.

रूढ अर्थानं मुक्तिबोधांच्या कवितेत गीतात्मकता नाही, ती वरकरणी ओबडधोबड वाटते, संगमरवरी असं तिचं शिल्प नाही. काळ्या कभिन्न आणि कातळासारख्या टणक दगडातून आकाराला यावी तशी ही कविता आहे. मात्र तिला तिची आंतरिक लय आहे. ही कविता वाचताना ती तुम्हाला घेरून टाकते. तुम्ही स्वतःच्या सुरक्षित अशा कोषात राहू शकत नाहीत. असं कवच भेदण्याची आणि तुम्हाला आतून बाहेरून भोवंडून टाकण्याची गती या कवितेला आहे. त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे ती वाचताना तुमची दमछाक करते. विस्तृत असा सामाजिक अवकाश ही कविता कवेत घेते, मात्र ती केवळ विस्तीर्ण नाही, गहिरीसुद्धा आहे. ‘मुझे भ्रम होता है कि प्रत्येक वाणी में महाकाव्य पीडा है’ असं मुक्तिबोध म्हणतात. मात्र ही ‘पीडा’ हेच एक सत्य आहे. बाकी सगळं काही मिथ्या आहे, भ्रम आहे. दुःखाचा क्रम हेच जणू एकमेव सत्य आहे, असं मुक्तिबोध म्हणतात. शोषणमुक्तीचा मार्ग हा एकटेपणातून कधीच मिळणार नाही. परिवर्तन हे शेवटी लोकजीवनातूनच येत असतं. त्यामुळे लिहिणाऱ्यांनी लोकजीवनाशीच स्वतःला जोडून घेतलं पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. मुक्तिबोधांच्या ‘अंधेरे में’ आणि ‘ब्रह्मराक्षस’ या कवितांमध्ये एक फँटसी आहे, ती तत्त्व म्हणून येते. जीवनाची जंगलं जळत आहेत, वेदनेच्या नद्या वाहत आहेत, युगायुगातील पूर्वजांच्या चितांचा उद्विग्न रंग या नद्यांमध्ये मिसळलाय, विवेकाचा धारदार रंधा चालतो आहे आणि जणू काही माझ्या स्वत्वाचीच सालटी काढली जात आहेत. आकाश कंपायमान झालं आहे. अशा निसर्गातील किती तरी चमत्कारिक घटना, अघटितं मुक्तिबोधांच्या ‘अंधेरे में’ या कवितेत येतात. ही सृष्टीतली उलथापालथ राहात नाही ती वाचणाऱ्यालाही अंतर्बाह्य हादरून टाकते. अनेकदा वाचकाला त्या दीर्घकवितांमध्ये विलक्षण चित्रात्मकता जाणवते, पण अर्थसंगती लागली नाही की अशा वाचकांना ती फँटसी वाटते. पण या प्रकारची फँटसी मुक्तिबोधांआधीच्या कवितेत दिसत नाही म्हणूनच कवितेत त्यांचा कोणी पूर्वज नाही असंही म्हटलं जातं.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/ya2ydx3u

.............................................................................................................................................

‘अंधेरे में’ ही कथनशैलीच्या दृष्टिकोनातून एक स्वप्नकथा आहे, मात्र ती सामान्य अशी स्वप्नकथा नाही. ही सारी दुःस्वप्नं आहेत. कोणत्या ना कोणत्या वाईट घटनेची चाहूल या कवितेतल्या नायकाला लागलेली असते आणि सदैव आपला कोणी तरी पाठलाग करत आहे, अशा गंडानंही तो पछाडलेला असतो. मात्र या दुःस्वप्नांसोबतच मुक्तिबोधांच्या कवितेत होऊ घातलेल्या क्रांतीचंही सूचन येते. ‘यह कथा नही, यह सब सच है’ असं मुक्तिबोध या कवितेत म्हणत असले तरीही एक आशावादाची किनारही या कवितेतल्या दुःस्वप्नांना आहे.

नागपूरातल्या वास्तव्यात ‘नया खून’ साप्ताहिकातली पत्रकारिता, हरिशंकर परसाई संपादक असलेल्या ‘वसुधा’ मासिकातून लिहिलेली ‘एक साहित्यिक की डायरी’ आणि अशा लेखनानंतर शेवटच्या सात-आठ वर्षांत राजनांदगाव (आताच्या छत्तीसगढमध्ये असलेले) या ठिकाणी प्राध्यापक म्हणून केलेलं काम, असा मुक्तिबोधांच्या आयुष्यातला उत्तरार्ध होता. राजनांदगावमधला कालखंड हा आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं सुवर्णकाळ होता असं त्यांच्या मुलानं लिहून ठेवलंय. पण याच काळात एका आजारानं त्यांना घेरलं. आजारपणाच्या काळात त्यांचा स्वभाव अधिकच शंकेखोर बनला, ते स्वतःला असुरक्षित समजू लागले. कोणी मदत जरी करू लागला तरी ‘पार्टनर, इसका इरादा क्या है’ असं ते विचारायचे. (‘पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?’ हा त्यांचा जुमला तर प्रसिद्धच आहे!) आरोग्याबाबतची बेफिकिरी आधी स्वभावात होतीच. पुढे आजारपणानं त्यांना घेरलं. ते कोमात गेले ते पुन्हा उठलेच नाहीत. दिल्लीतल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. दिल्लीत न्यायच्या आधी ते जेव्हा भोपाळला उपचार घेत होते, तेव्हाच आपला आजार हा जीवघेणा ठरू शकतो, याची त्यांना कल्पना आली होती.

शेवटच्या आजारपणाच्या विकलक्षणी ‘आई गं’ असा मराठी उद्गार वारंवार त्यांच्या तोंडून यायचा आणि बायकोला बोलावून घेण्यासाठीही ते ‘अगं’ असंच म्हणायचे असंही हरिशंकर परसाई यांनी लिहून ठेवलंय. मुक्तिबोधांची मातृभाषा मराठी होती, घरातही ते मराठी बोलायचे, पण त्यांनी त्यांची सर्व रचना हिंदी भाषेतून केली आणि हिंदीत स्वतःचं अविचल असं स्थान निर्माण केलं.

त्यांच्या छोट्या कविता आणि दीर्घकविताही जणू एकाच सृजनाच्या बिंदूतून उगम पावल्या आहेत असं वाटतं. छोट्या कविता वाचताना त्या अपुऱ्या वाटतात, काही तरी सांगायचं राहिलंय असं वाटतं. आणि हे सगळे तुकडे जणू एकाच कवितेचे आहेत असंही वाटत राहातं. याची कारणं कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असावीत. मानवी दुःखाचा सतत शोध घेण्याचं झपाटलेपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होतं, तेच त्यांच्या कवितेत, गद्यात झिरपलं. संघर्षशील अशा शब्दांचं आकर्षण त्यांच्या कवितेत त्यामुळेच आहे. त्यांचं जगणं आणि कविता यांच्यातलं अभिन्न नातंच त्यांना असाधारण अशा कोटीत नेऊन बसवणारं आहे. सारं जगणं कवितेत उतरतं, तेव्हाच ती कविता नव्या पिढ्याही पुन्हा पुन्हा वाचतात. मुक्तिबोधांची कविता कधीच जुनी होणार नाही, कारण ती सार्वकालिक आहे. मृत्यु कवीचा होतो कविता कुठं मरते?

.............................................................................................................................................

लेखक आसाराम लोमटे हे मसाप, औरंगाबादच्या ‘प्रतिष्ठान’ या द्वैमासिकाचे संपादक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आहेत.

aasaramlomte@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा