अरुणा ढेरे सध्याच्या भयग्रस्त वातावरणात आपली जबाबदारी कशी निभावतात, हे महत्त्वाचं!
पडघम - साहित्यिक
कुणाल रामटेके
  • अरुणा ढेरे आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Mon , 05 November 2018
  • पडघम साहित्यिक अरुणा ढेरे Aruna Dhere साहित्य संमेलन Sahitya Sanmelan

गेल्याच आठवड्यात अरुणा ढेरे यांची निवड यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाल्याची बातमी आली. मुळात दर वर्षी होणाऱ्या वाद - प्रवादांना फाटा देत संमेलनाध्यक्षांची सन्मानपूर्वक निवड करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे फलित म्हणून अरुणाजींची ही निवड निश्चितच नव्या बदलांची नांदी म्हणून बघण्यास हरकत नसावी. त्यांच्या या निवडीने मराठी साहित्य विश्वात एक नवे पर्व सुरू होत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांमधून व्यक्त होते आहे. या निवडीवर सोशल मीडियावरही अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर आदींवर शुभेच्छा देणारी रीघ लागली. माझ्या फेसबुक पेजसाठी मीही अरुणाजींबरोबरचे जुने फोटो शोधत होतो आणि मनात मात्र त्यांना भेटल्याच्या, त्यांच्याशी बोलल्याच्या आठवणी जाग्या होत होत्या.

मी पुण्याच्या ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालया’त असतानाची गोष्ट. पत्रकारिता विभागाचा एक विद्यार्थी म्हणून त्यावेळी मी तिथे शिकत होतो. सांस्कृतिक समृद्धी ही पुण्याची ओळख. अर्थातच, आमचं महाविद्यालयही त्याला अपवाद नव्हतं. त्या वेळी बरेचसे मान्यवर आमच्या महाविद्यालयाला भेट देत असत. त्यातून त्यांच्या व्याख्यानाची, त्यांच्याशी भेटण्या-बोलण्याची संधी आम्हा विद्यार्थ्यांना मिळत असे. त्यावेळी पत्रकारिता विभागातील आम्ही काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या उपक्रमांमध्ये आवर्जून सहभाग घेत असू. एकदा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनसाठी अरुणाजी आमच्याकडे येणार असल्याची बातमी मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी आम्हाला सांगितली. आम्ही आनंदून गेलो. मुळात, ज्यांच्याविषयी, ज्यांच्या साहित्याविषयी नेहमी वाचायला मिळतं, त्यांनाच साक्षात भेटण्याची ही संधी आम्हाला चालून आली होती.

कार्यक्रमाच्या दिवशी जरा तास-दीड तास आधीच आम्ही काही निवडक विद्यार्थी मराठी विभागात दाखल झालो आणि अरुणाजींच्या येण्याची वाट बघत बसलो. त्या आल्या. त्यावेळी त्यांना भेटणं आमच्यासाठी सुवर्णसंधीच होती. त्यांची फार काही पुस्तकं वाचली होती असं नाही, पण एक अनामिक आकर्षण साहित्य क्षेत्रातल्या या हस्तीबद्दल आमच्या मनात होतं. त्या आल्या त्यावेळी नेमकं काय बोलायचं? सुरुवात कुठून करायची? असं काहीच सुचत नव्हतं. आमच्या मनातलं बहुतेक अरुणाजींनी ओळखलं असावं. त्यांनीच स्वतःहून आमच्याशी बोलायला सुरुवात केली आणि मनावरचा भार हलका झाला. मुळातच त्यांच्या आवाजात एक प्रकारचा आश्वासक असा मातृत्वाचा आधार आहे. खूप छान वाटलं. आम्ही फुलत गेलो.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

त्यांच्या साहित्यातलं फार काही वाचलं नसल्याबद्दल मी सांगितलं. त्यावर त्या छान हसल्या. नंतर मात्र आमच्या गप्पा आणखीच फुलायला लागल्या. अनेक विषयांवर त्यांनी आपलं मत आमच्यासमोर व्यक्त केलं. तेव्हा सहज बोलता - बोलता कुणीतरी माझ्या मित्रानं मी विदर्भातल्या ‘रिद्धपुर’ गावाचा असल्याचं त्यांना सांगितलं. त्यावर अगदी आतुरतेनं त्यांनी गावाबद्दल विचारलं. मराठी साहित्याचा आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ माहिमभट्टांनी याच आमच्या ‘रिद्धपुर’ गावात लिहिला. मराठी भाषेची आद्य कवयित्री महदंबा हीनही ‘धवळे’ या भूमीवर रचलं. महानुभाव मराठी साहित्याची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव. त्यांनाही या साऱ्या विषयाची मुळातच गोडी असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं.

माझ्या गावाविषयी, महानुभावांच्या मराठी साहित्यातील योगदानाविषयी त्यांच्याकडून ऐकून एक वेगळा जिव्हाळा आमच्यात निर्माण झाला. पुढे कार्यक्रमाची वेळ झाली. आणि आम्ही त्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन आलो. त्यावेळी त्यांनी स्नेहसंमेलन आणि वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून खूप सुंदर भाषण केलं. त्यांच्या विद्यार्थिदशेतले वक्तृत्व स्पर्धेतले अनुभवही आम्हाला सांगितले. ते सारं काही प्रेरणा देणारं होतं. कार्यक्रम संपला. आम्ही त्यांना सोडायला आलो. त्यावेळी घेतलेली त्यांची सही मी अजूनही तशीच जपून ठेवली आहे.

पुढे मात्र, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं सातत्यानं त्यांच्याशी संपर्क आला. पुण्यात पत्रकारिता करत असताना बऱ्याच विषयांवर त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मला मिळाली. आजही फोन वरून कधीतरी त्यांच्याशी बोलणं होतं. तो मायेचा आवाज नवं काहीतरी करण्याची, धडपडण्याची प्रेरणा देतो.

आज जेव्हा अरुणाजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या, तेव्हा मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या कुणाही इतका आनंद मलाही झाला. मुळात साहित्य संमेलनाच्या निवडणुका, त्यातील घाणेरडं राजकारण, गठ्ठा मतं आणि त्यातून साहित्य बाह्य आरोप-प्रत्यारोपातून कलुषित होणारं वाङमय विश्व यातून उच्च दर्जाच्या साहित्यिकांना अध्यक्षपदापासून दूर राहावं लागलं आहे. त्यातून साहित्यिक, उपसाहित्यिकाही नसणारे लोक अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून स्वनामधान्य झालेत. या साऱ्या प्रक्रियेत कुठे तरी खंड पडावा आणि अत्यंत मानाचं, महत्त्वाचं असं हे पद सन्मानानं देण्यात यावं याविषयी मराठी साहित्य विश्वात सातत्यानं चर्चा होत होती.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/ya2ydx3u

.............................................................................................................................................

याविषयी सहज एकदा प्रा. सदानंद मोरे सरांना विचारलं असता, “लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रणाली स्वीकारली की हे जय-पराजय होणारच,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. ते ही खरंच आहे. मात्र, महामंडळाच्या आजच्या या निवड प्रक्रियेनेॉं नवा मार्ग पुढे आणला आहे. काळाच्या कसोटीवर कोणत्याही साहित्य प्रवाह आणि साहित्यिकांवर अन्याय न होता हे सारं सुरू राहिलं तरच ते प्रासंगिक ठरेल.

अखिल भारतीय साहित्य महामंडळानं यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सन्मानपूर्वक निवडीचा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय निश्चितच मोलाचा मानावा लागेल. अरुणाजी या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या गेल्या आहेत. तब्बल १८ वर्षांनी एक महिला साहित्यिक संमेलनाध्यक्षपदी विराजमान होणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. संमेलनाच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच महिलांना आजवर संमेलनाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. पाचव्या महिला संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना मिळालेला हा मान मोलाचा आहे. अध्यक्षीय भाषणातून त्या आता नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्याच्या भयग्रस्त वातावरणात साहित्य आणि साहित्यिकांची जबाबदारी त्या कशी निभावतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

.............................................................................................................................................

लेखक कुणाल रामटेके हे टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई इथं दलित – आदिवासी अध्ययन व कृती विभागात शिक्षण घेत आहेत.

ramtekekunal91@gmail. com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 10 November 2018

लेख चांगला आहे. शेवटच्या वाक्यातल्या 'भयग्रस्त' या शब्दामुळे आश्चर्य वाटलं. एव्हढी कशाने फाटली आहे, असा प्रश्न मनी तरळला. -गामा पैलवान


ramesh singh

Tue , 06 November 2018

"गेल्याच आठवड्यात अरुणा ढेरे यांची निवड यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाल्याची बातमी आली." सदरहू वाक्य पुढीलप्रमाणे लिहिल्यास वाचकांना कोडी सोडवत बसावे लागणार नाही: "यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाल्याची बातमी गेल्याच आठवड्यात आली". संपादकमहाशय झोपा काढत आहेत काय! अथवा वाचकांशी प्रतिक्रियांमधून उथळ झटापट करण्यात मग्न असावेत!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......