अजूनकाही
एखादी मूळ साहित्यकृती फारशी मोडतोड न होता इतर माध्यमात साकारणे अथवा त्याचे रूपांतरण करणे तसे सोपे नसते. मुळात एखाद्या कलाकृतीच्या आधारावर दुसरी कलाकृती अथवा इतर माध्यमांत त्याचा आविष्कार करण्याचा मोह होणे हा तिच्या उपजत दमदारपणाचा प्रभाव असतो. ही सरळ कबुली असते त्या-त्या कलाकाराच्या सृजनशीलतेला दिलेली. तिचा अंगीकृत प्रवाहीपणा, पावित्र्य अबाधित राखत त्याचा अन्य माध्यमातला आविष्कार हासुद्धा तेवढाच मोहक आणि रसग्रहण करण्यासारखा असतो.
२१ व्या शतकातील जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट असे शंभर चित्रपट निवडण्यात आले आहेत, ज्यात आपल्या ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत एकाच भारतीय चित्रपटाची वर्णी लागू शकली यावरून अद्याप चर्चा सुरू व्हावयाची आहे. सत्यजित रे यांच्या दिग्दर्शनाखालील ‘पथेर पांचाली’चा गौरव हा बिभुतिभूषण बंधोपाध्याय यांचाही गौरव आहे. १९२९ साली बिभुतिभूषण बंधोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘पथेर पांचाली’ या साहित्यकृतीवर याच नावाने सत्यजित रे यांनी १९५५ साली चित्रपट काढला. रे यांचा हा मोठ्या पडद्यावरचा कलाविष्कार खरेतर हल्लीच्या सर्वांनाच पथदर्शक ठरावा असा आहे.
चित्रपटनिर्मिती हा धंदा झाल्याचा आजचा काळ आणि ‘पथेर पांचाली’चा निर्मितीचा काळ यात तसे महद्अंतर आहे. दिग्दर्शकाला त्यातला धंदा, व्यवसाय न कळण्याचा हा काळ आहे. मुळात सृजनशीलता ही अशी भौतिक समीकरणांनी बांधली जाणारी कृती असतेच कुठे? काहीतरी आतून सांगण्याची ही अनिवार अशी ओढ असते, त्यातून विकसित झालेली, गुण-दोषांसकटची अभिव्यक्ती असते ती. बीबीसीने पाहणी करून तयार केलेल्या यादीत परदेशी भाषांमधील कलाकृतींचा समावेश आहे.
......................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
......................................................................................................................................................
यात भारतीय म्हणून ‘पथेर पांचाली’चा समावेश करण्यात आला असून सर्वोत्कृष्टच्या निकषांत हिंदी चित्रपटाचा समावेश नाही, ही एक गोष्ट आणि जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या १९५० साली प्रदर्शित ‘सेव्हन सामुराई’चा यादीत समावेश असला तरी तो जपानी समीक्षकांच्या पसंतीस पडलेला चित्रपट नाही, ही दुसरी गोष्ट समाधानकारक आहे. कलाकृतींना बांध घातले जाऊ शकत नाहीत, नव्हे ते असे घालायचेच नसतात, या तत्त्वानुसार ‘पथेर पांचाली’चा हा सन्मान निखळ कलाकृतीचा सन्मान मानायला हवा. तसाच तो बंधोपाध्याय यांच्या कसदार लेखणीचाही सन्मान आहे. बंगाल तसा प्रथमपासूनच सर्वार्थाने समृद्धच. बंधोपाध्याय यांचे ‘पथेर पांचाली’ असो वा आरण्यक, सुनील गंगोपाध्याय यांचे ‘प्रथम आलो’ असो वा ‘मुजरिम हाजिर हो’सारखी अर्थगर्भ कलाकृती असो. या बंगाली कलाकृतींनी त्या-त्या काळातल्या समष्टीचा आणि एका अथांग काळप्रवाहातील सर्वांगाचा घेतलेला वेध, त्यांनी रसिकमनांवर केलेले साहित्यसंस्कार, वाचनानंदाची गोडी सगळेच अद्भुतरम्य आहे. साहित्याचे समीक्षक या सगळ्यांबद्दल यथार्थ व अधिकारवाणीने सांगू शकतील. भारतात असा दरारा, लौकिक बंगालपाठोपाठ महाराष्ट्राचाही मानला जातो.
आधुनिकीकरणाच्या सर्वच टप्प्यांतील नवता, उदारमतवाद, मोकळेपणा, स्वीकारार्हता आणि सौंदर्यदृष्टी आंगोपांगी व पानोपानी खेळवणारे बंगाली साहित्यविश्व जसे पुढे सरकत गेले, उन्नत होत गेले तसा प्रवाहीपणा अन्यत्र क्वचितच पहावयास मिळेल.
काळानुसार बदलते प्रवाह सामावून घेत अथवा त्यापलीकडेही मजल मारत सुरू असणारी ही साहित्यविश्वाची वाटचाल यथार्थपणे वैश्विकतेशी जोडल्या जाते. अशा साहित्यकृती सार्वकालिक अभिजात असतात. ‘पथेर पांचाली’सारख्या साहित्यकृती अशा सर्वव्यापक असतात. त्या अभिजात तर असतातच शिवाय लोकप्रियही असतात. सध्या प्रकर्षाने पाहावयास मिळणारी सवंगता त्यात प्रवेश करू शकत नाही.
मराठी साहित्यजगतातही काही प्रतिभावंतांनी अशी मजल मारलेली आहे, अर्थात कंपूशाही, आत्मप्रौढी आणि कोशाबाहेर न पडण्याची मानसिकता हे त्रिदोष इतरांपेक्षा इथे जरा अधिक दिसून येतात हे खरे. मूळ कलाकृतीचा गाभा न हरवता त्याचा इतर माध्यमात आविष्कार साधण्यासाठी अंगी प्रतिभाशक्तीच हवी. त्याची कसर तंत्रज्ञानातल्या कसरतींनी भरून काढण्याचा केविलवाणा प्रकार सत्यजित रे यांच्या काळात नव्हता. एक अभिजात शब्दसौंदर्य रसिकांसमोर चित्रमय स्वरूपात सादर करण्याचा ध्यास सोडला तर चित्रपटासाठी पैसेही नव्हते.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
प्रतिकूलतेशी दोन हात करत तीन वर्षांच्या कालावधीत ‘पथेर पांचाली’ मोठ्या पडद्यावर आला. हे वास्तव आजच्या गल्लाभरू निर्मात्यांनी व नकलाकार सुपरस्टार्सनी आवर्जुन लक्षात घेण्यासारखे आहे. अभिव्यक्तीच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड, लोकभावनांशी खेळ करत कोट्यवधींचा चुराडा करूनही चित्रपटात एखादे आयटम साँग घालावेच लागत असेल तर या सगळ्यांची गुणवत्ता व दर्जा याची चर्चाच न करणे बरे. चित्रपटसृष्टी असो वा साहित्यविश्व गुणवत्ता व लोकप्रियता असे दोन स्वतंत्र निकष पहावे लागतात ते वरील सवंगतेमुळेच. लोकांना पचेल न पचेल ते लिहिण्याचे धाडस आणि लोकांना हवे ते विकण्याचा धंदा करणारे यातला हा फरक आहे.
कसदार साहित्यापेक्षा अशी दुकानदारी करणारे या सवंग मलिनतेचे सहप्रवासी होतात. कलाविष्कारापेक्षा, थेट अभिव्यक्तीच्या आग्रहापेक्षा ‘प्रति आणि आवृत्ती’चा खेळ बेधुंद व्हायला लागतो. या गढूळ लोंढ्याला मूळ प्रवाह समजण्याचा मूर्खपणा वाचक करत नाही हे यांचे दुर्दैव! या लोंढ्यात साहित्याचा आत्मा भरकटत गेला तरी त्याची तमा बाळगण्याएवढा विवेक राखण्याचे भान या सुमारांना कुठचे राहणार? प्रस्थापिताविरोधातून मुळे रोवणारे लेखक लेखकराव होतात आणि प्रस्थापित चौकटीत आपली वीट रचून मोकळे होतात. या सगळ्या आत्मविलासी कंपूशाहीत वाचक, रसिकांशी असणारा ऋणानुबंध तुटतो तो कायमचाच. संमेलनाचे सुंदर सोहळेदेखील या गलिच्छ राजकारणातून सुटत नाहीत.
वाचकांशी, साहित्याशी बांधीलकी जोपासून समर्पित आयुष्य जगणारे दिग्गज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात, पण संमेलनापासून दूर राहतात तर काहीजण अध्यक्षपदी विराजमान झाल्यावरच त्यांच्या साहित्यिक असल्याचा साक्षात्कार घडवून आणतात. सर्वोत्कृष्टच्या यादीत ‘पथेर पांचाली’चा समावेश आणि यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणाताईंची बिनविरोध झालेली निवड ही कलाविश्वाने सवंगतेपासून दूर राहण्याचा निर्णय असेल तर या घडामोडींचा आनंद मानायलाच हवा.
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment