अटलबिहारी वाजपेयी : विरोधकांनाही प्रिय असलेलं व्यक्तिमत्त्व
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ
  • अटलबिहारी वाजपेयी
  • Sat , 03 November 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची अटलबिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee

“जब लोकतंत्र खतरे में हो तब व्यवस्था (पर्यायी) कौनसी हो, ये प्रश्न गौण हो जाता है...” आणीबाणीविरोधी लढ्यात भिन्न विचारप्रणाली असलेल्या लोकांनी एकत्र येऊन उभारलेल्या लढ्याचे वर्णन दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या शब्दांत केले होते. देशातील नागरिक, राजकारणी यांचे देशातील व्यवस्थेबाबत काय धोरण-आचरण काय असावे याचे उत्तर देण्यासाठी जिथे हजारो शब्दांचा, युक्तीवादांच्या साखळीचा खेळ अपुरा पडेल, तिथे एका वाक्यात वाजपेयी यांनी नेमके व नि:संदिग्ध उत्तर दिले आहे. राजकारण-लोकशाही यांच्या चिंतनातून आणि कवीच्या प्रतिभेतूनच हे अल्पाक्षरी पण अत्यंत प्रभावी उत्तर वाजपेयी यांनी दिले आहे.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले ते अपघाताने नव्हे तर कर्तृत्व आणि विरोधकांनाही प्रिय असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर. हे लक्षात घ्यायचे यासाठी की त्याआधी अगदी राजीव गांधींपासून पी. व्ही. नरसिंह राव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल असे १२ वर्षांतील चार पंतप्रधान हे अपघाताने पंतप्रधान झाले होते. (व्ही. पी. सिंग आणि त्यानंतर चंद्रशेखर यांनी हे पद आपल्याकडे खेचून घेतले होते.) १९९६ मध्ये औटघटकेचे पंतप्रधानपद सोडताना अत्यंत हुशारीने भाजप सरकारने वाजपेयी यांचे शेवटचे भाषण देशभरात जाईल याची व्यवस्था केली होती. पण २४ तास आदळणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांचा लवलेश नसताना केवळ वृत्तपत्रे असतानाही (तोही विशिष्ट प्रदेशात विशिष्ट वृत्तपत्रांचा प्रभाव आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आवृत्ती असण्याचा काळ नसताना) ४० वर्षे परिश्रम, आपले वक्तृत्व आणि राजकीय कौशल्याच्या जोरावर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राष्ट्रीय नेता अशी ओळख निर्माण करणारे अटलबिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षातील एकमेव होते (रथयात्रेमुळे लालकृष्ण अडवाणी घराघरात पोहोचले. पण त्यांची प्रतिमा सर्वसमावेशक नेतृत्व अशी नव्हे तर कट्टरपंथीय अशी झाली.) हे लक्षात घ्यावे लागेल.

वाजपेयी यांना ते शक्य झाले ते सर्वसमावेशक आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर. त्यातील काही गोष्टी व्यक्तीच्या स्वभावात असतातच आणि काही गोष्टी विचारांच्या आणि मूल्यांच्या निरंतर आचरणातून कमवाव्या लागतात. त्यासाठी काही वेळा किंमतही मोजावी लागते. समाज या गोष्टींची कळत-नकळत नोंद घेत असतो. वाजपेयी यांचे राजकीय जीवन हे याचे उदाहरण होते. सहिष्णुता-उदारमतवाद-लोकशाही या शाश्वत मूल्यांवर वाजपेयी यांचा विश्वास होता, हे ते पंतप्रधान होण्याआधीच त्यांच्याबद्दल प्रत्येकाला वाटत होते. त्यामुळेच हा माणूस पंतप्रधान झाला तर हरकत नाही, अशी भावना भाजपशी वैचारिक नाळ न जुळणाऱ्यांचीही झाली होती. पंतप्रधान झाल्यावरही वाजपेयी यांनी या शाश्वत मूल्यांचे सारथ्यच केले हे त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा दिसून आले. मग काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी घटनेची चौकट हा शब्द न वापरता ‘इन्सानियत का दायरा’ हे धोरण स्वीकारणे असो की, पक्षांतर्गत लोकशाहीचे संवर्धन करत सामूहिक नेतृत्वाचा विकास होईल याची काळजी घेणे असो. या सर्व गोष्टींतून वाजपेयी यांचा लोकशाही मूल्यांवरील विश्वास वेळोवळी दिसून आला.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

आजचे भाजप सरकार हे नेहरूविरोधासाठी कुप्रसिद्ध होत असताना सत्तांतरानंतर परराष्ट्र मंत्रालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमधील नेहरूंचे छायाचित्र गायब झाल्याची नोंद घेत ते पुन्हा लावण्याचा वाजपेयी यांचा आदेश हाही त्यांच्या उदारमतवादी विचारांची प्रचीती देतो. तीच गोष्ट काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान युनोत ठराव आणला, त्यावेळी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना पक्षभेद विसरून केलेल्या मदतीची. विरोधकांशी कसे संबंध असावेl, याचे ते भारतीय राजकारणातील एक मोठे उदाहरण होते.

अटलबिहारी वाजपेयी १९९६ ते १९९९ या तीन वर्षांत तीन वेळा पंतप्रधान झाले. तरुण मतदारांची संख्या वाढत असणाऱ्या काळात एक सत्तरी ओलांडलेला राजकारणी इतका लोकप्रिय असण्याचे उत्तर वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेले होते. पंडित नेहरू यांच्यानंतर पी. व्ही. नरसिंहराव आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपाने ‘विद्वान’ असे वर्णन करता येईल असे दोन पंतप्रधान मिळाले हे भारताचे सुदैव आहे.

लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे कर्तबगार व हुशार पंतप्रधान होते, पण नेहरूंकडे आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारणासह साहित्य आणि भारतीय संस्कृतीबाबत विद्वत्तेच्या पातळीवर असलेली जाण, ही त्यानंतर नरसिंह राव आणि वाजपेयी यांच्याकडे होती. भारताचे सुदैव हे की, अशा गुणांच्या नेतृत्वाची देशाला सर्वाधिक गरज असतानाच्या १९९० च्या दशकात राव आणि वाजपेयी हे पंतप्रधान झाले. रशियाचे विभाजन, जागतिकीकरण यामुळे चार दशकांची जागतिक राजकारणाची चाकोरी बदलत होती. रशिया व अमेरिका या दोन ध्रुवीय राजकारणाऐवजी अमेरिका या एकाच सत्ताकेंद्राकडे झुकलेल्या जगात भारताचे स्थान कुठे असावे, याची फेरमांडणी करण्याची ती वेळ होती. दोघांनी ते काम चोखपणे पार पाडले.

पण नरसिंह राव हे लोकप्रियतेच्या बाबतीत वाजपेयी यांच्या खूपच मागे होते. लोभस व्यक्तिमत्त्व ही वाजपेयी यांची मोठी जमेची बाजू होती. एक चाणाक्ष व कर्तबगार राजकारणी असलेल्या वाजपेयींमध्ये एका प्रेमळ आजोबाचे दर्शन व्हायचे. खळखळून हसणाऱ्या त्यांच्या या छबीतूनच त्यांच्याबदद्ल एक जिव्हाळा-आत्मीयता वाटायची. भाजपबद्दल वैचारिक विरोध असणाऱ्या अनेकांना वाजपेयी यांच्याबद्दल विश्वास वाटायचा तो त्यामुळेच. अर्थात त्यामुळे पोटशूळ उठणारेही अनेक होते. आजही आहेत. त्यांतूनच वाजपेयी यांच्या चांगल्या-वाईटाचे तटस्थ विश्लेषण करण्याऐवजी त्यांचे राजकीय चारित्र्यहनन करण्याचे, त्यावर ओरखडे ओढण्याचे काम केले जाते. कदाचित सध्याच्या काळात नेहरूंवर होत असलेल्या हल्ल्याची ती सव्याज परतफेड करण्याची धोरणात्मक रणनीती असावी.

वाजपेयी यांचे वक्तृत्व ओजस्वी होते, तर त्यांच्या कवितांमध्ये विचार-भावनांचा संगम होऊन निर्माण होणारा आवेग होता, त्वेष होता. एखाद्या प्रपाताचा अनुभव देणारी त्यांची कविता सहजपणे प्रश्नही उपस्थित करायची आणि एखाद्या शब्दाच्या रूढ अर्थाला छेद देत त्याचा नवा परिचय करून द्यायची. भारतीय राजकारण-समाजकारणात ‘हिंदू’ या शब्दाला कट्टरपंथी हिंदुत्वामुळे जो अर्थ प्राप्त झाला, त्याला नवा आशय वाजपेयी यांनी १९४० च्या दशकातच आपल्या तरुणपणी दिला, तो आपल्या ‘हिंदू तन मन हिंदू जीवन’ या कवितेत.

“होकर स्वतंत्र मैंने कब चाहा है कर लूं सब को गुलाम, मैंने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम, गोपाल राम के नामोंपर कब मैंने अत्याचार किया, कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किया, कोई बतलाए काबुल में जाकर कितनी मस्जिद तोडी, भूभाग नहीं शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय, हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय॥”

अनेक कडवे असलेल्या या कवितेमधील हा भाग जरी वाचला तरी ‘हिंदुत्व’ म्हणजे ‘सहिष्णुता’ हा विचार समोर येतो. आपण असे आहोत हे प्रत्येक हिंदूला वाटेल. हिंदू असण्याचा अर्थ वाजपेयी या कवितेत सांगतात. हिंदू असण्याची त्यांची जाणीव केवळ गौरवाच्या पातळीवर नाही. हिंदू धर्मातील स्पृश्यास्पृश्यतेसारख्या दोषांमुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात हजारो वर्षे अमानवी वागणूक आली. इतकेच नव्हे तर देश म्हणूनही आपले मोठे नुकसान झाले यावर वाजपेयी यांनी सावरकरांवरील एका व्याख्यानाच्या निमित्ताने आसूड ओढले आहेत. प्लासीची लढाई झाली त्यावेळी जितके लोक लढत होते, त्यापेक्षा अधिक लोक काय निकाल लागतो हे बघत होते. देशाच्या भवितव्याचा निर्णय होणार होता आणि परिस्थिती अशी होती. कारण उच्चनीचतेच्या भेदातून आपण म्हणजेच हिंदू समाजाने एका मोठ्या गटाला लढण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले, असा उल्लेख वाजपेयी करतात. इतिहासाची केवळ गौरवपर पारायणे नाही तर डोळस चिकित्सा केली पाहिजे याची जाणीव त्यांना होती हेच त्यातून दिसते. त्यांच्या याच चिंतनातून भारतीय समाजमनाची नस पकडणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आकाराला आले.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/ya2ydx3u

.............................................................................................................................................

धोरणात्मक टीका-टिप्पणी ही लोकशाही व्यवस्थेचा भाग आहे आणि ती कधीही बंद होता कामा नये, ही वाजपेयी यांची पक्की धारणा होती. कोणी आपल्यावर टीका केली, खिल्ली उडवली म्हणजे तो आपला शत्रू नसतो. टीकाकाराशीही सौख्याचे संबंध जपले पाहिजे असेच त्यांचे संसदीय जीवन होते. म्हणून तर विरोधी पक्षातील नेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुंबईत बोलताना त्यांनी आजकाल तर एखाद्यावर टीका करणे म्हणजे शत्रुत्वाला आमंत्रण देणे ठरत आहे, अशा शब्दांत राजकारणात नव्याने येऊ घातलेल्या असहिष्णू राजकीय प्रवृत्तीवर बोट ठेवले होते. त्याच वेळी आपण केलेल्या टीकेनंतरही तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपल्या भाषणाचे कसे नंतर भेटल्यावर कौतुक केले याचा दाखलाही दिला होता.

पंतप्रधान झाल्यावर वाजपेयी यांनी उत्कृष्ट राज्यकर्ता कसा असतो हेही दाखवून दिले. देश म्हटल्यावर त्याला काही धोरणात्मक दिशा असते, असावीच लागते. अधिकार आहेत, मनात आले, म्हणून वाट्टेल ते केले असे धोरण वाजपेयी यांनी राबवले नाही. देशाच्या वाटचालीची सलगता पुनर्स्थापित करण्याचे महत्त्वाचे काम त्यांना करावे लागले. कारण मध्ये देवगौडा-गुजराल यांच्या आघाडी सरकारच्या दोन वर्षांत बराच घोळ झाला होता. गुजराल यांनी तर इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव यांच्या काळात मोठ्या कष्टाने उभारण्यात आलेले भारतीय गुप्तचर संस्थांचे परदेशातील जाळेच कमकुवत करून टाकले होते. राव सरकारने सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा व परराष्ट्र संबंधांच्या फेरमांडणीचे (अमेरिका-इस्रायलशी जवळीक) सूत्र वाजपेयी यांनी चाणाक्षपणे पुढे नेले.

पोखरणमधील १९९८ मधील अणुचाचणी हा अनेक अर्थांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा मास्टरस्ट्रोक होता. एक तर या स्फोटाने देश म्हणून वाजपेयी यांनी भारताला अणुक्षेत्रात २१ व्या शतकात नेऊन ठेवले (त्याचीच परिणती २००८ च्या भारत-अमेरिका अणुकरारात झाली), चाचण्यांशिवाय ते अशक्य होते. त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि एक समर्थ राष्ट्र अशी भारताची ओळख निर्माण झाली. भारत हा आता सहज हल्ला करण्याजोगा देश नाही याची जाणीव चीनला करून दिली. दुसरीकडे या चाचणीद्वारे भाजपला राष्ट्रीय राजकारणात एक खमका पक्ष अशी ओळख वाजपेयी यांनी मिळवून दिली. त्याचा मतांच्या राजकारणात भाजपला निश्चितच लाभ झाला. वैयक्तिक पातळीवरही देशाची मान उंचावणारा नेता आणि कठोर निर्णय घेणारा, देशाच्या हितासाठी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानणारा नेता अशी प्रतिमा वाजपेयी यांची झाली. ते आणखी लोकप्रिय झाले. शिवाय या अणुचाचण्यांनंतर जगातील अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यावरही भारताला त्याची फार झळ पोहोचणार नाही याची काळजी घेतली. त्यातूनच काही काळात त्या देशांनी निर्बंध मागे घेतले. चाचणीनंतर देशातील विरोधकांनी (त्यात काही लेखक-पत्रकारही आले) टीकेचा सूर लावला. चाचण्यांची गरजच काय होती असा सवाल केला आणि त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून सगळे तर नरसिंह राव यांनी करून ठेवले होते, वाजपेयी यांचे त्यात काय योगदान अशी संभावना केली. मात्र, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने हे सारे विरोधाचे सूर-युक्तीवाद हा जळफळाट होता. विरोधकांची जातकुळी उघडी पडली. या स्फोटासाठी आवश्यक तयारी नरसिंह राव यांच्या कारकीर्दीत झालेली होती. पण राजकीय निर्णय हाच या चाचण्यांमधील सर्वांत मोठा भाग असतो. तो घेणे तत्कालीन परिस्थितीत राव यांना शक्य झाले नाही.

१९९६ मध्येच सत्ता सोपवताना राव यांनी त्याबाबतचा संदेश वाजपेयी यांना दिला होता. पण १३ दिवसांतच सरकार गेले. वाजपेयी यांनी त्यावेळी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली होती की, हा निर्णय घ्यायचा व १९९८ मध्ये पुन्हा पंतप्रधान होताच त्यांनी तो घेतला. पोखरणमधील स्फोटांद्वारे भारताला एक आण्विक शक्ती म्हणून जगात उभे केले. पण केवळ अणुचाचणी करून हेतू साध्य होणार नाही याची जाणीव वाजपेयी यांना होती. आपण आगळीक केल्यास भारत अणुक्षमतेचा वापर करण्यासही समर्थ आहे, हा स्पष्ट संदेश देण्यासाठी वाजपेयी यांनी लांबपल्ल्यांच्या क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम अब्दुल कलाम यांच्या मदतीने राबवला.

केवळ संरक्षण क्षेत्रापुरते वाजपेयी यांचे कर्तृत्व सीमित नव्हते. देशाच्या प्रगतीचा वेग हा रस्त्यांचे जाळे किती मोठे, पायाभूत सुविधा किती चांगल्या यातून ठरतो याची जाणीव ठेवत देशाचे चारही कोपरे महामार्गाने जोडणारा सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प हाती घेतला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्याच वेळी गावांना शहरांशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. दूरसंचार तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार करण्यासाठीही आवश्यक धोरणे वाजपेयी यांनीच राबवली. पायाभूत सुविधा प्रकल्पांची इतक्या मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी त्यापूर्वी झाली नव्हती. शैक्षणिक गती देण्यासाठी सर्व शिक्षा अभियान राबवले. पाण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. त्याच्या एकंदर व्यवहार्यतेबद्दल अनेक प्रश्न असले तरी मुळात हे काम करावे लागेल हा विचार देशाला दिला. त्यातून नंतर राज्यांच्या पातळीवर छोटे-छोटे नदीजोड प्रकल्प राबवले गेले, यावरून नदीजोड प्रकल्पाच्या संकल्पनेचे महत्त्व आणि वाजपेयी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाची कल्पना यावी. आर्थिक सुधारणांच्या राव-मनमोहन सिंग पर्वाची पुढची वाटचाल वाजपेयी यांच्याच पुढाकाराने झाली. अमेरिकेसोबत आर्थिक व धोरणात्मक क्षेत्रांत संबंध वाढवत असताना वाजपेयी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला इतर ठिकाणांहूनही रसद मिळाली पाहिजे, या हेतूने पूर्वेकडे पाहा हे धोरण राबवले. पूर्व आशियातील छोट्या देशांशी अनेक करार केले.

वाजपेयी यांच्याबाबतीत त्या काळात झालेला राजकीय वाद म्हणजे ते भाजपचा ‘मुखवटा’ आहेत आणि अडवाणी हा ‘चेहरा’. वाजपेयी यांना निस्तेज करण्याचा तो पक्षातील गोविंदाचार्यांसारख्यांचा प्रयत्न होता. त्या ‘मुखवटा’ शब्दावरून विरोधकांनी-माध्यमांनी वाजपेयी यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. वादासाठी मान्य केले तरी वापरण्यासाठी का होईना संघ व भाजपला ‘मुखवटा’ म्हणून वाजपेयीच का लागत होते, याचे उत्तर शोधताना वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते हे मान्य करावेच लागते. लोकांची स्वीकारार्हता असल्याशिवाय ‘मुखवटा’ म्हणूनही उपयोग नसतो. दुसरे म्हणजे मुखवटाप्रकरणावरून गोविंदाचार्य यांना राजकीय झोतातून दूर अंधारात जावे लागले, यातून वाजपेयी यांची ताकद दिसते.

आपण नेता आहोत याचा आत्मविश्वास त्यांना होता. त्यामुळे कसलाही भयगंड नव्हता, असुरक्षितता नव्हती. अशी व्यक्ती नेतृत्व करत असली की, आपोआप इतरांनाही नेतृत्व विकसित करण्याची संधी मिळते. वाजपेयी यांच्या काळात त्यातूनच सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, प्रमोद महाजन असे अनेक नेते राष्ट्रीय पातळीवर चमकले, मोठे झाले. एकीकडे सामूहिक नेतृत्व विकसित करत, दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्याचे त्यांचे धोरण होते. पण त्याचा अर्थ कोणी काहीही करेल आणि ते खपवून घेतले जाईल असे नव्हे, असा खमका संदेश वाजपेयी यांनी गोविंदाचार्य प्रकरणात दिला होता.

तसाच काहीसा प्रकार पक्षीय पातळीवर जेव्हा विकासपुरुष-लोहपुरुष अशा संकल्पनांचा वापर करून तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केला तेव्हाही घडला. त्यावेळी पंतप्रधान वाजपेयी परदेशात होते. परत येताच त्यांनी एका कार्यक्रमात ‘ना टायर्ड ना रिटायर्ड, अडवाणीजी के नेतृत्व में विजय की ओर प्रस्थान’ अशी घोषणा केली. साऱ्या भाजपमध्ये पळापळ सुरू झाली. वाजपेयी जर बाजूला गेले तर धडगत नाही याची जाणीव झाल्याने साऱ्या नेत्यांनी वाजपेयी हेच नेते असे स्पष्टीकरण दिले. मगच वाजपेयी शांत झाले. सर्वांशी सौहार्दाने वागणूक, सामूहिक नेतृत्वाला चालना देणे याचा अर्थ दुबळेपण नव्हे, याची जाणीव करून देताना साऱ्या पक्षाला एका झटक्यात सूतासारखे सरळ करण्याची क्षमता व राजकीय चातुर्य यांनी त्याही वयात दाखवले होते.

वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व-कारकीर्दीला असलेल्या या चंदेरी रेखांबरोबरच अस्वस्थ व निरुत्तर करणारे काही उणे आहेच. वाजपेयी यांच्या राजकारणाचा एक वेगळाच पैलू बाबरी मशीद पाडली गेल्याच्या घटनेच्या निमित्ताने बघायला मिळतो, तो आदल्या रात्रीच्या लखनऊमधील भाषणात. ‘जमीन समतल करनी होगी’ हे त्यांचे विधान दुसऱ्या दिवशी काय घडणार आहे, याची व्यवस्थित जाणीव असणारे आणि त्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन देणारे होते. आता यूट्यूबच्या माध्यमातून आणि समाजमाध्यमांतून ही ध्वनिचित्रफीत बरीच प्रसारित झाली. पण त्यावेळी मशीद पडल्यावर त्याचा सगळा राजकीय दोष लालकृष्ण अडवाणी यांच्यावरच आला. वाजपेयी चलाखीने नामानिराळे राहिले.

पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत विमान अपहरण झाल्यावर आणि संसदेवर हल्ला झाला, तेव्हा वाजपेयी सरकार भाजप ज्या पुरुषार्थाची ग्वाही देतो तसे आचरण करू शकले नाही. विमान अपहरण झाल्यावर इंधनाअभावी ते अमृतसर विमानतळावर उतरले होते. ते उतरणार हे स्पष्ट झाल्यानंतर ज्या वेगाने आणि आक्रमकतेने निर्णय व्हावे अशी अपेक्षा होती तसे झाले नाही. ती संधी वाया गेली. त्यातून दहशतवाद्यांना सोडून द्यावे लागले त्याचे अपश्रेय वाजपेयी सरकारचेच. विमान भारतात थांबलेच नसते तर प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी वगैरे युक्तीवाद मान्य करता आले असते. या घटनेने वाजपेयी सरकारच्या खमकेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दहशतवाद्यांनी आणि त्यांची सूत्रे हलवणाऱ्या पाकिस्तानने ते हेरले नसते तरच नवल. त्यातूनच त्यांची मजल संसदेवर हल्ला करण्यापर्यंत गेली. भारताच्या सार्वभौमत्त्वावरील तो सर्वांत मोठा हल्ला होता. त्यांनी थेट आव्हान दिले. पण उत्तर देणे वाजपेयी सरकारला जमले नाही. नुसतीच सीमेवर सैन्याची जमवाजमव झाली. त्यापलीकडे काही नाही. वाजपेयी यांच्याकडून त्यावेळी मोठी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. आंतरराष्ट्रीय दबावाच्या गप्पांना अशा वेळी फार अर्थ नाही. ज्यांनी वाजपेयी सरकारला निवडून दिले होते, त्यांनी तर असल्या गोष्टींना झुगारण्यासाठीच वाजपेयींना मत दिले होते. युद्धाच्या खुमखुमीचा हा विषय नाही. तर देशाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देणाऱ्यांना अद्दल घडवण्याच्या क्षमतेचा आहे. ती दाखवण्यात वाजपेयी कमी पडले याची सल कायम राहील.

.............................................................................................................................................

लेखक स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ दै. ‘लोकसत्ता’ (मुंबई)मध्ये सहायक संपादक आहेत.

ksaurabha@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख