अयोध्येतील बाबरी मशिद विध्वंसानंतर देशभर धार्मिक दंगली उसळल्या. भाजपसह संघ परिवार आक्रमक झाल्यानं धार्मिक प्रश्न देशाच्या अजेंड्यावर आला. अशा वेळी मी कॉ. शरद् पाटील यांची मुलाखत घ्यावी, असं त्यांनी मला सांगितलं. परंतु विषयाचा आवाका आणि कॉ. शरद् पाटील यांची भूमिका मांडण्याची पद्धत पाहता ते शक्य होणार नाही, असं मला स्वत:लाच वाटत होतं. एक तर मी ज्या धुळ्यातल्या एका जिल्हा वर्तमानपत्रात होतो, तिथं ती छापणं शक्य नव्हतं. आणि प्रस्तुतही नव्हतं. त्यामागील आणखी एक मुख्य कारण हे होतं की, कॉ. शरद् पाटील यांच्याकडे पाहण्याचा स्थानिक पत्रकार, संपादकांचा दृष्टिकोनही फारसा निकोप नव्हता. त्यांच्या साध्या बातम्या, निवेदनंही फारशी प्रसिद्ध केली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक वर्तमानपत्रांत ही मुलाखत यावी असंही कॉ. शरद् पाटील यांना वाटत नव्हतं. ही शंका वेगळ्या शब्दांत मी त्यांना बोलून दाखवली, तेव्हा त्यांनी मुंबईच्या ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ वगैरे वर्तमानपत्रांकडे मुलाखत पाठवायला सुचवलं. त्यामुळे छापून येण्याबाबतची माझी शंका निकाली निघाली. मात्र तरीही माझ्या मनात धाकधूक कायम होती. ती अशी की, कॉ. शरद् पाटील यांच्यासारख्या प्राच्यविद्यापंडिताची मुलाखत शब्दांच्या चिमटीत जशीच्या तशी पकडणं हे दिव्य काम होतं. एकतर ते अत्यंत दुर्बोध, क्लिष्ट लिहितात. सर्वसामान्यांना त्याचं आकलन होत नाही, असा आरोप होत होताच. आजही होतोच. त्यामुळे मुलाखत घेताना मनावर दडपण होतं. त्यातूनच मुलाखत घ्यायला टाळाटाळ करत होतो. त्याला आणखीही एक कारण होतं. ते म्हणजे त्यांच्या स्वभावाचं. एखादी बाब मनासारखी झाली नाही की, ते संताप प्रकट करायचे. चारचौघांत पाणउतारा करायला कमी करत नसत. हे मी अनेक वर्षांपासून पाहत होतो.
अशी आपत्ती आपल्यावर यायला नको म्हणून मी माझ्यापरीनं काळजी घेत होतो. ठरवून दिलेलं काम काटेकोर होईल याची दक्षता बाळगत होतो. पण पत्रकारितेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या असाव्यात. त्यातून ही मुलाखतीची जबाबदारी त्यांनी टाकली.
डिसेंबर १९९२मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पाडली गेली. तत्पूर्वीही रामरथयात्रा, शिलान्यास यामुळे धार्मिक उन्माद वाढला होता. अशा वेळी आपलं म्हणणं व्यापक प्रमाणावर जनतेसमोर यायला हवं, असं कॉ. शरद् पाटील यांना वाटू लागलं. तशात त्यांच्या एकाकीपणाच्या या काळात -सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या अपहरण काळात - माझ्यासह मोजक्याच म्हणजे चारच जणांनी त्यांना साथ दिली होती. त्यातून त्यांनी माझ्यासमोर या मुलाखतीचा प्रस्ताव ठेवला.
बाबरी मशिद पडल्यानंतर ही मुलाखत घेतली असल्यानं आणि त्यावेळी भाजप, संघपरिवार यांचं आक्रमण वाढत गेल्यानं, त्या केंद्रीय सत्तेच्या अगदी जवळ येऊन ठेपल्यानं त्याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारावेत म्हणून तयारी केली. आठ-दहा प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. सोबतीला टेपरेकॉर्डर घेतला आणि मुलाखत साकारली.
पहिलाच प्रश्न भाजपच्या आक्रमणाचा आणि एकूणच देशासमोर उभ्या ठाकलेल्या प्रबोधनाचा असल्यानं कॉ. शरद् पाटलांनी सविस्तर उत्तर दिलं. ही मुलाखत टेप होत असल्यानं त्या मुक्या यंत्रासमोर तोंड करून, जणू माईकच आहे, असं समजून कॉ. शरद् पाटील बोलत होते. त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की, तल्लीन होऊन, बेभानपणे बोलत जायचे. मुलाखत असली तरी मुलाखतकर्त्याला मध्येच हस्तक्षेप करण्याचा वा मध्येच थांबवण्याचाही प्रश्न नव्हता. त्यामुळे पहिल्याच प्रश्नावर कॉ. शरद् पाटील यांनी बोलायला सुरुवात केली, ती विस्ताराचीच होती. अर्थात प्रश्नकर्ता कितीही बाळबोध प्रश्न विचारत असला तरी बोलणारे, उत्तर देणारे कॉ. शरद् पाटील होते. त्यांना जे काही सांगायचं, मांडायचं होतं, ते त्यांनी आपल्या नेहमीच्या धाटणीत मांडलं.
कॉ. शरद् पाटील अडीच-तीन तास बोलत होते. त्यांना जे सांगायचं होतं, ते सांगून झालं होतं. मुलाखत घेतल्यानंतर ती जशीच्या तशी त्यांच्याच शब्दांबरहुकूम डायरीत उतरवून काढली. त्यानंतर पुन्हा कोऱ्या कागदावर आणखी व्यवस्थित लिहून काढली. एकेका प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक स्वतंत्र लेख. त्यामुळे कोणतंही वर्तमानपत्र ही मुलाखत छापणार नाही याची जाणीव मला तेव्हाच होती. पण तसं सांगण्याचं धारिष्ट्य झालं नाही. म्हणून कॉ. शरद् पाटलांना मुलाखत दाखवली. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ यांना पाठवून दिली. ही मुलाखत काही छापून आली नाही.
मुलाखत कुठेही छापून न आल्याची रुखरुख माझ्याही मनाला लागलेली होती आणि त्यांनाही चुटपूट लागली होती. त्यातून काही दिवस गेल्यावर मधूनच ते मुलाखतीबाबत विचारणा करायचे. मुंबईला गेला तर चौकशी कर म्हणायचे, नाही तर मुंबईच्या या या कार्यकर्त्याला सांग म्हणायचे. या मुलाखतीचा त्यांचा पाठपुरावा सुरूच होता. पण ते काहीच शक्य झालं नाही. शेवटी मुलाखतीचा नाद हळूहळू त्यांनी आणि मीही सोडून दिला.
त्यामुळे हा विषय तिथंच संपला. त्यानंतर म्हणजे १९९३ सालानंतर अनेक स्थित्यंतरं झाली. नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर मला नंदुरबारला जावं लागलं. तिथं चारेक वर्षं वास्तव्य. त्यानंतर मुंबईची वाट. डोंबिवलीत काही महिने काढल्यानंतर बदलापूरला भाड्याच्या घरात. दर दोन वर्षांनी सामानाची हलवाहलव. या सर्व काळात माझी पुस्तकं, वह्या, डायऱ्या, कागदपत्रं बरीचशी हरवली. गहाळ झाली. जीर्ण होऊन गतप्राण झाली, पण काही बाबी जशाच्या तसा राहिल्या. त्यातून १९९३ सालची डायरी अकस्मितपणे एका कागदपत्राच्या शोधात असताना हाती लागली. त्यात ही मुलाखत जशीच्या तशी सापडली. मुलाखतीच्या तारखेची नोंद नाही. पण डायरीची सुरुवात तपशीलवार नोंदीनं झाली आहे. पहिलीच नोंद ही मोराणे इथं झालेल्या शिबिराची आहे. प्रा. विलास वाघ, उषाताई वाघ यांच्या पुढाकारानं तिथं तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या आश्रमशाळेत कार्यकर्त्यांचं शिबीर झालं. त्याच्या समारोपाच्या वेळी कॉ. शरद पाटील यांनी २० एप्रिल १९९३ रोजी केलेल्या भाषणाचं सविस्तर टिपण आहे. त्यानंतर ही मुलाखत. म्हणजे एप्रिल १९९३च्या शेवटच्या आठवड्यात ही मुलाखत घेतली असावी. ती पुन्हा नव्यानं जशीच्या तशी उतरवून काढली. आज इतक्या वर्षांनंतर या मुलाखतीचा आशय बदलला नाही, म्हणून हा ठेवा आता सार्वजनिक केला जात आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
प्रश्न : भाजप आक्रमक झाल्यामुळे देशासमोर ज्या समस्या उभ्या राहिल्या आहेत, त्यांविषयी काय वाटतं?
कॉ. शरद् पाटील : प्रबोधनाचा प्रश्न हा बाबरी मशिद भंजनानंतर पुढे आला हे माझ्या मते बरोबर होणार नाही. प्रबोधनाचा प्रश्न बाबरी मशिद तोडणाऱ्या भाजपनं यापूर्वीच निर्माण केलेला होता. ‘सोबत’मध्ये प्रथम बुद्धाच्या निंदानालस्तीचा लेख मुंबई विद्यापीठात संस्कृतचे रिडर असलेल्या डॉ. बाळ गांगल यांनी लिहिला. या लेखात बुद्ध हा जनावरांशीसुद्धा मैथून करत होता इथपर्यंत त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर बुद्ध क्षत्रियांचे श्रेष्ठत्व मानत होता म्हणजे तो जातिव्यवस्था मानीत होता आणि त्याच्या संघामध्ये उच्चवर्णियांचं वर्चस्व होतं, अशी त्याची टीका आहे. परंतु हा माणूस ब्राह्मण असल्यानं बुद्ध हा स्त्री-पुरुष विषमतेचा पुरस्कर्ता होता ही टीका त्यानं केली नाही. नवबौद्ध ज्याला आपला शास्ता म्हणतात, ते बुद्धावरील या टीकेमुळे खवळून उठले नाहीत. बाळ गांगल यांनी फुलेंवर केलेली टीका किती निंद्य होती हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि त्यामुळे त्यावेळेला महाराष्ट्रात प्रक्षोभ झाला. बुद्ध ही जागतिक व्यक्ती आहे. निदान भारतीय, भारतव्यापी तरी व्यक्ती आहे. या टीकेच्या विरोधात फक्त शरद पाटलांनीच आवाज उठवावा आणि देशातल्या कुठल्याही विद्वानानं, पुरोगाम्यानं आवाज उठवू नये, हे या देशावरच्या ब्राह्मणी वैचारिक वर्चस्वाचं लक्षण आहे.
फुले हे समजा महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते, त्यांच्यावरच्या निंद्य टीकेमुळे महाराष्ट्रात प्रक्षोभ निर्माण झाला आणि बाळ गांगलला माघार घ्यावी लागली, माफी मागावी लागली. यावेळी वैचारिक प्रबोधनाची पहिली गरज होती. या पर्वामध्ये डावे कुठे होते? त्यांनी बुद्धाचं समर्थन करण्याकरिता काहीही प्रयत्न केला नाही. फुलेंवरच्या टीकेमुळे प्रबोधनाच्या रणमैदानामध्ये उतरले ते दलित आणि दलितेतर पुरोगामी.
त्यानंतर दुसरे पर्व जे आहे, ते आहे महाराष्ट्र सरकारचं. शिवसेनेच्या व मराठा महासंघाच्या दडपणावरून ‘रिडल्स ऑफ कृष्ण’ हे जे आंबेडकरांच्या ‘रायटिंग अँड स्पिचेस’च्या चौथ्या खंडातलं परिशिष्ट आहे, ते वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात दुसरा प्रक्षोभ उसळला. मराठा महासंघ व शिवसेनेनं निदर्शनं केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दलितांनी एकजुटीनं निदर्शनं केली. आणि मग सर्वांना एकत्र बोलावून महाराष्ट्र सरकारनं ते परिशिष्ट त्या खंडात टाकायचा सर्वानुमते निर्णय घेतला. परंतु भाजप-सिवसेनेचं काम झालेलं होतं, हे दलितांच्या लक्षात आलं नाही. त्यांना विजयाचं समाधान त्याच्यातून मिळालं की, आम्ही परिशिष्ट टाकायला लावलं. परंतु इथं दोन कलाखंडातला फरक लक्षात घेतला पाहिजे. १९३० साली ब्राह्मणेतर चळवळ काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या आधी फुलेंच्या सत्यशोधक पंथापासून अब्राह्मणी अन्वेशन पद्धतीनं इतिहास मांडला जात होता आणि त्याच्यावर आंबेडकरांनी, ब्राह्मणेतर चळवळीनं, स्वत: फुलेंनी, भास्करराव जाधवांसारख्यांनी टीका केली होती, हे य. दि. फडकेंनी त्यांच्या लेखात दाखवलं. ही टीका सर्व ब्राह्मणेतर जाती समुदायांनी केली होती. त्यावेळच्या ब्राह्मणेतर चळवळीत दलित होते, आदिवासीही होते. या टीकेनं ब्राह्मणी छावणीच्या विरोधात सर्व ब्राह्मणेतरांना एकत्र आणलं. परंतु रिडल्सच्या वादळानं ओबीसींना दलितांपासून आणखी दूर नेलं. एकसंध ब्राह्मणेतर फळी होती, ती फुटली. दलितांचा विजय झाला, परंतु पराजयही झाला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
दलितांनी या देशातल्या जातिव्यवस्था अंतक लोकशाही क्रांतीचं नेतृत्व करावं अशी व्यूहरचना आंबेडकरांची असल्यामुळे दलितांनी स्वत:पुरता विजय मिळवायचा आणि आपले दोस्त दूर करायचे, यात दलितांचा खऱ्या अर्थानं पराभव होता. त्यांनी आपल्यापुरता विजय मिळवला आणि आपल्याला जी क्रांती करायची आहे त्यादृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले नाहीत. त्यांचा दोस्त दूर गेला. गमावला आहे असं मी म्हणणार नाही. कारण राजकारणात कायमचं गमावलं जातं असं मानलं जात नाही.
तर नेमक्या या वेळेला दोन प्रबोधनाच्या लढाया झाल्या. यात पहिल्या लढाईत पारंपरिक डावे नव्हते. आणि दुसरी फार मोठी संधी डाव्यांना होती. दलित त्यांना जर बरोबरीनं घ्यायला तयार नव्हते, तर सर्व डाव्यांनी एकत्र येऊन हे परिशिष्ट खंडात टाकायला भाग पाडायला हवं होतं. आंबेडकरवाद्यांच्या मांडणीला पूर्णपणे पाठिंबा द्यायचं कारण नव्हतं. ‘परिशिष्ट टाकावं’ या मागणीला पाठिंबा देऊन त्यांनी आपले मतभेद आंबेडकरांच्या अन्वेशन पद्धतीशी, मांडणीशी व्यक्त करायला पाहिजे होते. पण ते व्यक्त करू शकत नव्हते. कारण त्यांच्यापाशी ब्राह्मणी अन्वेशन पद्धतीशिवाय दुसरी कोणतीही अन्वेशन पद्धत नव्हती. आणि ती ब्राह्मणी अन्वेशन पद्धत भाजपचीच अन्वेशन पद्धत होती. भारतामध्ये पारंपरिक डाव्यांनी हा ‘ब्राह्मणी मार्क्सवाद’ टाकला आहे, हे या वेळेलाही स्पष्ट झालं. कारण मार्क्सवादी म्हणवत नसलेले परंतु पुरोगामी असलेले दोन पुरोगामी यावेळेला सरसावले. दुर्गा भागवतांचा सामना करण्याकरता य. दि. फडके आणि रूपा कुलकर्णी मा.गो. वैद्यांचा सामना करण्याकरिता. रूपा कुलकर्णी या संस्कृत तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांचा अधिकार या विषयावर होता. फडके हे इतिहास संशोधक आहेत, परंतु संस्कृत तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांचा अधिकार त्या विषयावर नव्हता. तरीसुद्धा या दोन विद्वानांनी आंबेडकरांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, हे खरोखरच अभिनंदनीय आहे. परंतु हे दोन्ही विद्वान आंबेडकरांच्या समर्थनार्थ रणमैदानात उतरले आणि ब्राह्मणी विद्वानांकडून पराभूत झाले. आंबेडकरांचे समर्थन करायला ते दलितांचे ‘चॅम्पियन्स’ म्हणून पुढे आले आणि हरले. म्हणजे हा दलितांचा पराभव होता. परिणामी परिशिष्टाचा समावेश करायला लावणं हा विजय सोडला तर एका बाजूला ओबीसी गमावले आणि दुसऱ्या बाजूला प्रबोधनाची लढाई हरले. हा दुसरा पराभव आहे पारंपरिक डाव्यांचा, प्रबोधनात हस्तक्षेप केला नाही - ते हस्तक्षेप करू शकत नव्हते – असं माझं म्हणणं आहे. कारण त्यांच्यापाशी ती अन्वेशन पद्धत नव्हती.
नंतरच्या काळात असं दिसलं की, लोकसभेत आणि लोकसभेच्या निवडणूक सभेत रामाची प्रतिष्ठा माकपचे सोमनाथ चटर्जी आणि भाकपचे ए.बी. बर्धन यांनी मान्य केली. हे मी वारंवार सांगितलं आहे. अशा प्रकारे भाजप रामाचं स्तोम वाढवून, दुसरं यादवी युद्ध आणून ब्राह्मणी प्रतिक्रांती करत असताना तिला परत्वे पारंपरिक डाव्यांनी हातभार लावलेला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे.
तर ही धोरणात्मक लढाई आणि ‘रिडल्स ऑफ राम अँड कृष्ण’ हा प्रश्न अयोद्धेच्या प्रश्नाशी निगडित होताच. राम-कृष्णाच्या प्रश्नावर हजारो, लाखोंच्या सभा संत आणि विहिंप उत्तर भारतात घेतच होते. त्यांची तयारी अनेक वर्षांपासून चालूच होती. त्यांना प्रत्युत्तर करणारं प्रबोधन यासबंध काळात केलं गेलं नाही. महाराष्ट्रात राम-कृष्णावर फक्त मी बोलत होतो आणि यावर माझं पुस्तक मैदानात होतं- ‘रामायण-महाभारतातील वर्णसंघर्ष’. परंतु एका पाखंड्याचं पुस्तक म्हणून पारंपरिक डाव्या चळवळीनं ते नाकारलं. त्याचा उपयोग करून घेतला नाही. इतका अभिनिवेश या पारंपरिक डाव्या चळवळीत आहे. आणि त्याचा परिणाम आज जो काही होतो आहे ते - केंद्र सरकारनं लक्ष दिलं नाही, तिथं निमलष्करी दल तैनात करून बाबरी मशिद वाचवायला पाहिजे होती, अशीही टीका झाली असली. आणि ती बरोबर असली तरी - वास्तव हे असं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
मी वारंवार सांगतो त्याप्रमाणे काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डाव्यांच्या म्हणण्याप्रमाणे भांडवलदार, जमीनदारांचे हे दोन्ही पक्ष आहेत. मी एकटा म्हणतो की, भांडवलदार, जमीनदार जातवर्गाचे ते दोन्ही पक्ष आहेत. आणि असं म्हणण्यात काँग्रेससुद्धा तथाकथित सेक्युलर राहत नाही. तर तीसुद्धा धार्मिक आणि जातीयवादी होते. तीचं समीकरण भाजपशी करता येतं. आणि मग म्हणता येतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा करणं, विसंबून राहणं, आक्रमण होत चाललं आहे असं म्हणणं म्हणजे दुसऱ्या बाजूला त्यांना विरोध होत आहे, असा त्याचा अर्थ आहे.
काँग्रेस भाजपचीच शक्ती आहे. राष्ट्रीय आघाडी, डावी आघाडी यांचा भाजपला विरोध होत आहे. आणि मग या शक्तीला भाजपचं आक्रमण होत चाललेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. ‘आक्रमण’ हा फक्त एका शक्तीचा अर्थ दाखवणारा शब्द नाही, तो ‘रिलेटिव्ह’ शब्द आहे. राष्ट्रीय आघाडी, डावी आघाडी हे विरोध करत होते का? माझं म्हणणं आहे, नाही. मुंबईला जी राखीव जागा समर्थन समितीची सभा झाली, तिचे प्रमुख पाहुणे शरद यादव होते. त्यांनी सांगितलं की, राम स्त्रियांचा आणि शूद्रांचा कैवारी होता. हे सांगत असताना आमचा पक्ष ब्राह्मणेतर असल्यानं आम्ही मंडल आयोग आणला असं त्यांनी म्हटलं. म्हणजे जो मंडल आयोग लागू करण्यापुरता ब्राह्मणेतर आहे, परंतु भाजप आणि संघ परिवाराच्या आक्रमणाला विरोध करण्यामध्ये तो ब्राह्मणी पक्ष आहे. म्हणून भाजपचं आक्रमण चालू आहे, हे जे विधान आहे ते माझ्या दृष्टीनं समर्पक नाही.
प्रश्न : विषमता निर्मूलन आंदोलन आणि इतर आंदोलनं यांच्यात नेमका काय फरक आहे?
कॉ. शरद् पाटील : देशभर ज्या अनेक धर्मनिरपेक्ष समर्थक आघाड्या स्थापन झालेल्या आहेत, त्या कम्युनॅलिझमला विरोध करण्यासाठी स्थापन झाल्या आहेत, असा त्यांचा दावा आहे. ‘कम्युनॅलिझम’ हा शब्द धर्मामधील संघर्षाला लागू आहे. पण त्याचं भाषांतर मराठीत ‘जातीयवादी’ असं केलेलं आहे. ‘जातीयवाद’ हा शब्द जातीतील संघर्षाला उद्देशून आहे. ‘कम्युनॅलिझम’ हा शब्द वापरताना मुख्यत: हिंदू मूलतत्त्ववाद्यांविरोधात आमची आघाडी आहे, असं ही मंडळी सांगतात. परंतु ‘धर्मांधवाद’ असं जर त्याचं भाषांतर केलं तर मग त्याला काही तरी निश्चित असं उद्दिष्ट प्राप्त होतं. परंतु कम्युनॅलिझमला विरोध असं इंग्रजीत सांगायचं आणि मराठीत सांगायचं की, आम्ही जातीयवादाला विरोध करतो म्हणून.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
महाराष्ट्रात फुले-आंबेडकरांचा प्रभाव असल्यामुळे असं दाखवता येतं की, आम्ही जातिव्यवस्थेच्या विरोधी आहोत, कम्युनॅलिझमविरोधी आहोत, तसंच आम्ही जातिव्यवस्थेच्या विरोधी आहोत, असा आभास निर्माण करता येतो. परंतु माकपचे प्रभाकर संझगिरी, सीताराम येचुरी हे जे काही वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी काही लेख लिहिलेले आहेत. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की, आम्ही हिंदू धर्माला, धर्मश्रद्धेला, रामभक्तीला विरोध करू इच्छित नाही. हे दिसायला निरुपद्रवी दिसतं. ही खरोखर धर्मनिरपेक्षता वाटते आणि त्यांच्यापाशी मार्क्सवाद, सर्वांत पुढारलेलं, दूरदृष्टी असलेलं, सर्वांत क्रांतिकारी असलेलं तत्त्वज्ञान आहे, असा त्यांचा दावा आहे. ते या देशात पारंपरिक पक्ष आहेत. ते जी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना वापरत आहेत, ती भारतीय नाही, पाश्चात्य आहे. पाश्चात्य देशात धर्माला झालेल्या सरंजामशाही, भांडवलशाही विरोधातून ती आली. त्यांचा प्रधान धर्म ख्रिश्चन आहे. म्हणजे उगवत्या भांडवलदार वर्गाच्या बुद्धिजीवींनी सरंजामशाहीशी सर्वकालीन संघर्ष उभा केला, विज्ञानापासून समाजकारणापर्यंत. कार्ल निकोलस, गॅलिलिओ वगैरे शास्त्रज्ञांना चर्चचा किती विरोध झाला हे इतिहास वाचणाऱ्या सर्वांना माहीत आहे. काही लोकांना जिवंत जाळलं गेलं. त्यामुळे त्यांना ख्रिश्चन धर्माचं जे पीठ होतं, त्यांना विरोध करणं भाग होतं. धर्माला विरोध करण्यातून पाश्चिमात्य देशात धर्मनिरपेक्षतेचा, सेक्युलॅरिझमचा उदय झाला. परंतु भांडवलदार वर्गाचं उद्दिष्ट भांडवलदारी लोकशाही क्रांती करून समाजवाद आणण्याचं नव्हतं, तर एक प्रतिगामी वर्गसमाज नष्ट करून त्या जागी पुरोगामी वर्गसमाज आणण्याचं होतं. चर्चनं राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात लुडबूड करू नये म्हणून धर्माचा हस्तक्षेप या क्षेत्रात असू नये, अशी पाश्चिमात्य सेक्युलॅरिझमची धारणा होती. परंतु त्यानं वर्गसमाजाला विरोध करावा, अशी त्याची गरज नव्हती. कारण नवोदित भांडवलशाहीविरोधी भ्रमनिरास आणि त्याच्याविरोधी संघर्ष ही अवस्था यायची होती. म्हणजे नव्या वर्गसमाजाबद्दलचा भ्रमनिरास आणि त्याच्याविरोधी क्रांतिकारी संघर्ष यायचा काळ पुढे होता. त्यामुळे एकुण शोषण, पीडनाला संघर्ष करून समतेवर आधारलेला समाज आणावा, हे त्यावेळेला सेक्युलॅरिझमचं उद्दिष्ट असू शकत नव्हतं. आणि अशा प्रकारे धर्माला विरोध नाही, फक्त धर्मानं सार्वजनिक, राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, ही धर्मावर मर्यादा घालावी एवढंच उद्दिष्ट पाश्चात्य देशात राहिलं. आणि अशा प्रकारचा शोषण, पीडनाबाबत तटस्थ असलेला, धर्माला विरोध करू न इच्छिणारा सेक्युलॅरिझम भारतात आला आणि तो राष्ट्रवाद्यांपासून कम्युनिस्टांनी जसाच्या तसा स्वीकारला. परंतु या ठिकाणी या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा होतो की, ज्याला हिंदू धर्म म्हटलं जातं त्याला विरोध. प्रत्येकाला आपला धर्म आचारायचं स्वातंत्र्य आहे, पण ते खाजगी जीवनात आहे. मात्र तो धर्म जर सार्वजनिक जीवनात, राजकारणात आणायचा प्रयत्न झाला, तर त्याला विरोध करायचा की नाही? याबाबतीतही गुळगुळीत भूमिका घेतली जात आहे. परंतु मी जे वारंवार सांगतो आहे ते हे की, ज्याला हिंदू धर्म म्हटलं जातं, ते नावच चुकीचं आहे. हे नाव या धर्माला जे अरब आणि तुर्क बाहेरून आले, त्यांनी या देशाच्या लोकांना सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे, आसमंतात राहणारे म्हणून दिलं. त्यांच्या भाषेत ‘स’चा ‘ह’ होत होता. म्हणून ‘सिंधू’वरून ‘हिंदू’. आणि मग भारतातले सर्व हिंदू म्हटले गेले. परंतु अरब आणि तुर्कांचं आगमन महंमद बीन कासीमपासून आहे. त्यापूर्वी काही प्रवासी आले असतील, परंतु तथाकथित हिंदू धर्म म्हणजे जातिव्यवस्थेचा धर्म बुद्धाच्या काळापासून अस्तित्वात आलेला आहे. इसवी सनापूर्वी ६०० आणि ७०० या शतकात अरब, तुर्कांनी हे नाव ठेवलं. नंतरचा सहाशे ते बाराशे वर्षांचा जो काळ आहे, त्या काळात या देशातल्या धर्माला नाव नव्हतं का? नाव होतं आणि परंपरेत ते नाव ‘श्रौत स्मार्त’ असं आहे. ‘श्रौत’ म्हणजे ‘वैदिक म्हणजे श्रृतीचा धर्म’ आणि ‘स्मार्त’ म्हणजे ‘जातिव्यवस्थेचा धर्म’.
तर जागतिक आणि भारतीय धर्मनिरपेक्षता खऱ्या अर्थानं इथं येते. श्रौत धर्म वैदिक काळापर्यंत चालत होता, तो पूर्णपणे विषमतेवर आधारलेला होता. आणि श्रौत स्मार्त धर्म म्हणजे चौकट, जातीवर्णाचा. म्हणजे आतल्या पिजन होलमध्ये जाती टाकायची व्यवस्था. असे हे कम्पोझिट स्वरूप श्रौत स्मार्त धर्माचं आहे. आणि जातिव्यवस्था ही तर पूर्णपणे विषमतेवर आधारलेली आहे. चातुर्वर्ण्याचा धर्म हा वैदिक खुला धर्म नव्हता यावर कुणीही प्रश्न उभा करणार नाही. आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे तो वर्गसमाज होता, हे त्यांचं म्हणणं मी खंडित केलं आहे. चातुर्वर्ण्याचा धर्म हाही बंद समाज होता, हे मी माझ्या अनेक लेखांत अनेक उदाहरणं देऊन सिद्ध केलेलं आहे. तर श्रौत धर्मापासून श्रौत स्मार्त धर्मापर्यंत म्हणजे आतापर्यंत जो बहुंख्याकांचा धर्म प्रचलित आहे आणि ज्या धर्मामुळे बाकीचे सगळे धर्म – ख्रिश्चन, मुसलमान वगैरे, धर्म प्रभावित झालेले आहेत, तो धर्म सुरुवातीपासूनच विषमताधिष्ठित आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
ख्रिश्चन धर्म हा असा सुरुवातीपासून विषमताधिष्ठित होता का? देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचं धर्मावर जे पुस्तक आहे, त्यात दोन पाश्चिमात्य लेखकांचा हवाला देऊन सांगितलेलं आहे की, येशू ख्रिस्त हा सेंट जॉनप्रमाणे त्यावेळच्या समाजात गुलाम वगैरे तत्सम हीनवर्णीयांचा सशस्त्र उठाव होता. म्हणजे हा धर्म प्रारंभिक अवस्थेत समतेवर, क्रांतिकारी अवस्थेत होता. नंतर प्रस्थापितांच्या ताब्यात गेल्यावर तो विषमतेचा पुरस्कर्ता बनला. पण तो थेट पुरस्कर्ता बनला नाही. त्यानं वर्गसमाजाचं समर्थन केलं नाही, याला ‘बायबल’चा आधार नाही. अशा प्रकारे प्रारंभिक अवस्थेत समतेवर अधिष्ठित असलेला ख्रिस्चन धर्म हा भांडवलदारी लोकशाही क्रांतीच्या बुद्धिजीवी नेत्यांनी घेतला. चर्चचा सामना प्रारंभिक ख्रिश्चन धर्माच्या अनेक पंथांनी केला.
अशा प्रकारे प्रारंभिक अवस्थेत श्रौत स्मार्त धर्माची क्रांतिकारी अवस्था होती का- समतावादी-विषमतावादी? नाही. तर हा धर्म सुरुवातीपासूनच विषमतेचा पुरस्कर्ता होता. मग या धर्माच्या विरोधी काही संघर्ष झाला की नाही, हा प्रश्न येतो. बळीला ब्राह्मण वामनानं पाताळात गाडलं. त्याचं कारण त्याच्या काळात बळी वर्णसंकर करत होता, वर्णव्यवस्थेला विरोध करत होता, हे मी मांडलेलं आहे. त्याच्या काळात आदर्श समाजव्यवस्था होती म्हणून तो आदर्श समाजव्यवस्थेचा राजा होता, हे जे पारंपरिक मत आहे, ते अपूर्ण आहे. नंतर नृश नावाचा राजा होता. अजगर पर्वात, महाभारत वनपर्वात, तो युधिष्ठिराशी वादविवाद करताना चातुर्वर्ण्य समाजाला विरोध करतो. शूद्र हे ब्राह्मणांशी बरोबरीनं आहेत हे सिद्ध करतो आणि युधिष्ठिराला निरुत्तर व्हावं लागतं. आणि हे तो राजर्षि असताना त्यानं केले म्हणून त्याच्या राज्यात ब्राह्मण वर्णानं बदनाम करून त्याला गणराज्याच्या बाहेर हाकललं. ही दोन उदाहरणं सांगतात की, त्या काळात जे लोकायतासारखे स्त्रीप्रधान पंथ होते, ते (चातुर्वर्ण्याला) विरोध करत होते. तर अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाचे जे पंथ आहेत, ते सबंध काळात या वर्णविषमतेला विरोध करत होते.
भारताचे अनन्य वैशिष्ट्य हे असं आहे. वर्णाधिष्ठित दासप्रथाक नष्ट करण्यासाठी, क्रांती करण्यासाठी. म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म हे क्रांतीकारक होते. आणि भारतातून ११व्या-१२व्या शतकातून त्यांचं उच्चाटन झालं, तोपर्यंत ते जातिव्यवस्थेला विरोध करत राहिले. जातिव्यवस्था विरोधी शक्तींचा अग्रक्रम राहिले.
तर भारतात श्रौत स्मार्त धर्मच होता आणि त्याला विरोध करणारे धर्म किंवा पंथ नव्हते, असा जो समज डाव्यांमध्येही आहे, तो कसा चुकीचा आहे, हे मी माझ्या ‘दासशूद्रांची गुलामगिरी’च्या पहिल्या खंडात सिद्ध केलेलं आहे. आणि दुसरा, पुढचा जो खंड येतो आहे, त्यात मी तपशीलात सिद्ध करणार आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तर भारतात श्रौत स्मार्त धर्माच्या काळात दोन धर्म होते. बौद्ध धम्म हा भिक्खूंचा धर्म होता. गृहस्थांचा धर्म नव्हता. कारण गृहस्थांना त्यात दीक्षा नव्हती. त्यामुळे गृहस्थ आचरणात बुद्धाचे अनुयायी होते, परंतु धर्म, जातकर्म, अग्निसंस्कार हिंदू होते. जातीधर्माचं आचरण करत होते. परंतु आता प्रश्न हा आहे की, जो गृहस्थांच्या जीवनाचं नियमन करत होता, तो धर्म मात्र मुळात सुरुवातीपासूनच विषमतावादी होता. त्यामुळे त्याची तुलना ख्रिश्चन धर्माशी करून चालणार नाही. आणि म्हणूनच पाश्चिमात्य देशातल्या धर्मनिरपेक्षतेला श्रौत स्मार्त धर्माशी गाठ असल्यानं त्याला धर्मनिरपेक्ष राहून चालणार नाही, तर त्याला धर्मविरोधी राहावं लागलं. हा धर्म अधिकृतपणे जातिव्यवस्थेला पाठिंबा देतो, धर्म म्हणून पाठिंबा देतो. म्हणून विषमतेच्या धर्माला विरोध म्हणजे जातिव्यवस्थेलाही विरोध करणं आहे. स्त्री-पुरुष विषमतेलाही विरोध करणं आलं. कारण हा धर्म स्त्री-पुरुषांच्या विषमतेलाही अधिकृतपणे पाठिंबा देतो. ‘न स्त्री स्वातंत्र्या अर्हती’ असं मनू अधिकृतपणे सांगतो. ‘शूद्राय मती दद्यात’ हे धर्मवचन आहे.
तर अशा प्रकारे समाजातल्या स्त्री-पुरुषांच्या विषमतेला पाठिंबा देणारा, जातिव्यवस्थेला उचलून धरणारा हा धर्म आहे. त्याला आम्ही विरोध करणार नाही. हे पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेच्या इम्पोर्टेड संकल्पनेच्या नावाखाली जे आज पारंपरिक डावे, लोकशाहीवादी, राष्ट्रवादी करत आहेत आणि त्यांची जी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे ती ब्राह्मणी आहे, असं मी वारंवार म्हणतो आहे. अब्राह्मणी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना तटस्थ राहू शकत नाही. ती धर्माला विरोध करते. तिनं जातीव्यवस्थेला, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध केला पाहिजे, तरच या देशातील धर्मनिरपेक्षता सार्थ होऊ शकेल.
आजच्या ज्या धर्मनिरपेक्षतावादी, कम्युनॅलिझमविरोधी आघाड्या आहेत, त्या एकाच प्रकारच्या इम्पोर्टेड धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर आधारलेल्या असल्यामुळे त्या फक्त जिल्ह्यापासून दिल्लीपर्यंतच्या मोर्चानंतर कम्युनॅलिझमला विरोध करतात. म्हणजे नेमकं काय करतात? निषेध करतात. पण धर्मापासून तटस्थ राहतात. म्हणजे धर्म ज्या विषमतेला पाठिंबा देतो, त्याच्यापासून तटस्थ राहतात.
अशा प्रकारच्या परधर्मद्वेष्ट्या, शूद्रस्त्रीद्वेष्ट्या धर्माचा पुरस्कार करणाऱ्या ज्या ब्राह्मणी शक्ती आहेत, त्यांना यांच्या निषेधातून कोणता धक्का पोहचतो? ब्राह्मणी शक्ती बिनबोभाटपणे आपलं काम करत आहेत, करा तुम्ही कितीही निषेध. म्हणून मी म्हटलं, त्यांचं आक्रमण एकतर्फी आहे. आणि ज्या क्षेत्रात त्यांचं आक्रमण चालू आहे, त्या क्षेत्रात त्याविरोधी शक्तींचं सैन्यच नाही. निरंकुशपणे त्यांची वाटचाल चालू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विषमता निर्मूलन आंदोलनाचा जो जाहीरनामा मराठी, इंग्रजीत प्रसिद्ध झालेला आहे, त्याचं सूत्र हे आहे की, या देशातल्या ब्राह्मणी शक्तीचं दर्शनी उद्दिष्ट परधर्मद्वेष हे जरी असलं तरी या परधर्मद्वेषातून सर्व हिंदूंना एकत्र करणं. अशा प्रकारे ब्राह्मणी वर्चस्वाखाली एकत्रित आलेला, तथाकथित श्रौत स्मार्त पाळणारा जो समाज आहे, ते या व्यवस्थेचे कट्टर वैरी आहेत. शूद्रातिशूद्र, आदिवासींच्या विरोधी आहेत. ज्याप्रमाणे ज्यूंच्या कत्तली हिटलरनं केल्या, त्याप्रमाणे या देशामध्ये मुसलमानांच्या बरोबर दलित आणि आदिवासींचं दमन करणं, हिंसक दमण करणं, हे त्यांचं ध्येय आहे. जे मंडलला रोखण्यासाठी हिंसक आंदोलन करू शकतात; ते दलित, आदिवासींचं दमन अहिंसेनं करतील असं समजण्याचं कारण नाही, हे सूत्र विषमता निर्मूलन आंदोलनाचं आहे.
आणि हे सूत्र दुसऱ्या कोणत्याही आघाडीचं नाही. ही आघाडी राष्ट्रीय पातळीवर तयार होऊ शकत नाही आणि ती मोबीलायझेशनचं काम करू शकत नाही, हा त्या आघाडीच्या कर्त्यांचा दोष नाही. तर अशा प्रकारच्या आघाडीला, तिच्या या संकल्पनेला, तिच्या जाहीरनाम्याला या देशामध्ये अजूनही ब्राह्मणी वर्चस्वाखाली ज्या भाजपेतर आणि काँग्रेसेतर शक्ती आहेत, त्या पाठिंबा देऊ शकत नाहीत. त्या पाखंडी मानतात. या देशामध्ये खरोखरची धर्मनिरपेक्षतेची आघाडी तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा ती अब्राह्मणी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आणि कार्यक्रम स्वीकारेल. जनतेचं प्रबोधन हाती घेईल आणि मग अयोध्येमध्ये या ब्राह्मणी शक्तींना रोखेल आणि या निमित्तानं जातिव्यवस्था अंताची आतापर्यंत न होऊ शकलेली लढाई सुरू होईल.
प्रश्न : या नंतरच्या काळात आपल्या देशाचं, लोकशाहीचं काय भवितव्य असेल असं तुम्हाला वाटतं?
कॉ. शरद् पाटील : लोकशाहीच्या मार्गानं हिटलरनंही सत्ता हस्तगत केली होती. तोही निवडून आला होता. त्याची फॅसिस्ट पार्टीही निवडून आली होती. तर लोकशाहीच्या मार्गानं निवडून आल्यानंतर हुकूमशाही स्थापन करता येते. लोकशाहीच्या मार्गानं निवडून काँग्रेस सरकार पोटनिवडणुका रद्द करतं. राज्यांच्या निवडणुका रद्द करतं. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका अनेक दशकं होत नाहीत. ती काय लोकशाही आहे? आणि या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीवादी देशामध्ये दाऊद इब्राहीम ते शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जे गँगस्टर आहेत, त्यात इब्राहीमच्या नेतृत्वाखाली असलेले बहुसंख्य गँगस्टर हिंदू आहेत. सराफापासून ते व्यापाऱ्यापर्यंत जे स्मगलर्स आहेत, ते हिंदू आहेत. इथं धर्माचा प्रश्न येतो कुठे?
इब्राहीमला जर मुसलमान मारायचा असेल तर तो मुसलमान गँगस्टरला पाठवतो आणि हिंदू मारायचा असेल तर हिंदू पाठवतो. शिवसेनेनं कृष्णा देसाईचा खून केला. तो कोण होता? त्याच्या खूनापासून शिवसेनेची करिअर सुरू होते. हिंदूंनी हिंदूचा खून पाडणं हे ठाकरेंच्या पक्षात होतं. या लोकशाहीवादी देशात राजकारणी आणि गँगस्टर यांचे संबंध किती जवळचे आहेत, हे बॉम्बस्फोटामुळे सर्व देशाला कळून चुकलेलं आहे. गँगस्टर राजकारणी बनलेले आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
सर्वांत मोठं प्रबोधनाचं अमोघ साधन जे आहे, त्या फिल्म इंडस्ट्रीत ८५ टक्के भांडवल हे गँगस्टरचं आहे. एखाद्या अॅक्टरला मानधन मिळत नसेल तर तो गँगस्टरकडे जातो. अॅक्टर जर करार करून कामावर येत नसेल, तर डायरेक्टर किंवा प्रोड्यूसर गँगस्टरकडे जातो. आणि आता तर कोणती फिल्म थिएटरमध्ये चालू द्यायची की नाही हे शिवसेना ठरवते. आणि त्याच्या विरोधी काहीही शासन करायला सरकार तयार नाही. शिवसेनेला हात लावायला तयार नाही. अशी पर्यायी सत्तेची केंद्रं मोडून काढायला तयार नाही. म्हणजे हे दर्शनी लोकशाहीवादी असलेलं सरकार स्वत: हुकूमशाहीवादी आहे. त्यातून नोकरशाहीचं ब्राह्मणीकरण होऊन गेलं आहे.
अशा परिस्थितीमध्ये आता फक्त निवडणुकीच्या मार्गानं तांत्रिकदृष्ट्या भाजप सत्तेवर येणं, एवढंच उरलेलं आहे. आणि मग भाजप जी सत्ता चालवेल ती परधर्मद्वेष्टी असेल आणि शूद्रातिशूद्रद्वेष्टी असेल, हे स्पष्ट होऊन चुकलेलं आहे. आणि त्यात उत्तर प्रदेशमधील क्रमिक पुस्तकं, इतिहासाची पुस्तकं बदलायची होती. आजची शिक्षणव्यवस्था ब्राह्मणीच आहे, पण ती आणखी ब्राह्मणी करायची, असा प्रयत्न कल्याणसिंग सरकारचा होता. इतर राज्यातही तसंच झालं आणि केंद्रात त्यांचं सरकार आल्यानंतर या देशात ब्राह्मणी सत्तेच्या धर्मशास्त्राचा अमल चालू होईल आणि शेवटी तांत्रिकदृष्ट्या लोकशाहीचं सरकार उलथवून पाडून, बळजबरीनं सत्ता हातात घेऊन आणि लोकशाहीनं आलेलं सरकार उलथवून पाडून जे लोकशाहीविरोधी सरकार स्थापन करतात, त्यांना ‘हुकूमशाही’ म्हणणं हे तांत्रिकदृष्ट्या मान्य होऊ शकेल. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारलेलं राजकारण पाहिजे. लोकशाहीच्या मार्गानं निवडून यायचं आणि काँग्रेससारख्यांनी त्याची पूर्वतयारी करणाऱ्या पक्षाच्या सहकार्यानं हुकूमशाही आणायची, ब्राह्मणी सत्ता स्थापायची, ही या देशातील हुकूमशाही असू शकते.
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माचं वेगळेपण कशात आहे असं तुम्हाला वाटतं?
कॉ. शरद् पाटील : आपण कोणत्याही दृष्टीचा विचार टोकाला जाऊन करत असतो- ही गोष्ट आहे किंवा नाही. परंतु आहे आणि नाही याच्यामध्येच जीवन चालत असतं, सृष्टी चालत असते. जन्म आणि मृत्यू म्हणजे जीवन नाही. जन्म आणि मृत्यू म्हणजे सृष्टी नाही. जन्म-मृत्यूच्या दरम्यान त्या वस्तूची जी कालक्रमणा असतं, ते जीवन असतं. आणि त्याच्याकरता टोकाचे नियम लागू पडत नाहीत. म्हणून बुद्धानं आपल्या तत्त्वज्ञानाला ‘मज्जीमपरीपदा’ (मध्यमार्ग) म्हटलं आहे. तो अनीत्यतावादी होता. वस्तू असतेही आणि नसतेही असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्या दृष्टीनं कोणत्याही विषयाला किंवा मुद्द्याला अॅब्सॉल्युट टेस्ट लावणं चुकीचं आहे. सापेक्षपणे त्याकडे पाहिलं पाहिजे. महापुरुष एक तर मान्य आहे किंवा मान्य नाही, अशा तऱ्हेचा पर्याय ठेवून काही त्या महापुरुषाला समजलं जाऊ शकत नाही. आणि तो महापुरुष अशा प्रकारचे टोकांचं मत स्वत: मान्य करतो का? तर नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
बुद्धाचं वारंवार म्हणणं किंवा सांगणं असे की, ‘धम्मेवे मा भिक्ख वे मा अमीस दायादा’. माझा कालबाह्य धम्म टाकून द्या. म्हणजे त्याच्याही शिकवणुकीत कालबाह्य गोष्टी होत्या. आणि स्वत: आंबेडकरांनी ज्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला, तो जगभरच्या बौद्ध धर्मीयांना मान्य नाही. कारण त्यांनी अनेक सुधारणा केल्या. बुद्धांना गृहस्थांना दीक्षा देणं मान्य नव्हतं. आंबेडकरांनी गृहस्थांना दीक्षा दिली.
अशा प्रकारे अनेक फरक आंबेडकरांनी केले म्हणून त्याला ‘नवबौद्ध’ म्हणतात. मग जर आंबेडकरांचा आपल्या शास्त्याशी मतभेद होऊ शकत होता, तर आंबेडकरांशी मतभेद होऊ शकतो की नाही, हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि तौलनिकदृष्ट्या सामान्य बुद्धीचा आनंद जर स्त्री-पुरुष विषमतेच्या बाबतीत बुद्धांशी मतभेद व्यक्त करतो, बुद्धाला चूक ठरवतो, त्याचे मन वळवतो, तिथं आपण अशी कसोटी लावतो का, ‘आनंद इतका हुशार आहे का?’ नवी दृष्टी स्वीकारली पाहिजे. मतभेद व्यक्त करणारा माणूस आंबेडकरांच्या बरोबरचा आहे की नाही? मार्क्सच्या बरोबरीचा आहे की नाही? बुद्धाच्या बरोबरीचा आहे की नाही? हे सगळे कर्मठ वाद आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तर आंबेडकरांच्या पुढे त्या काळातल्या समस्या या नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांच्या जीवनाचं सूत्र जातिव्यवस्था अंत हे होतं. आणि त्या सूत्राच्या भोवती त्यांचं संबंध जीवन फिरताना आपल्याला दिसतं. त्याच्यातून त्यांचे सुसंगती-विसंगतीचे निष्कर्ष आपल्याला दिसतात. आणि विसंगतीच्या बाबतीत त्यांचं म्हणणं होतं, ‘सुसंगती हा गाढवाचा गुण आहे.’ म्हणजे विसंगती करणं हा माणसाचा गुण आहे असं त्यांना म्हणायचं होतं. हिंदू धर्मात राहून जातिव्यवस्थेचा अंत होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग ते म्हणाले, मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. मग त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला. शोध घेतला. आणि मग त्यांनी बौद्ध धम्म पसंत केला. त्यांच्या एकूण शोधाचं सूत्र काय होतं? जातीव्यवस्था अंत. आणि त्याकरता इस्लाम उपयोगी नाही, ख्रिश्चन धर्म उपयोगी नाही. कारण ते परकीय धर्म आहेत, अभारतीय धर्म आहेत, हे नाही, तर ख्रिस्ताला आणि मोहंमद पैगंबरांना जातीव्यवस्थेशी सामनाच करावा लागला नाही. कारण त्यांच्या देशात जातिव्यवस्थाच नव्हती. त्यामुळे तिथं संघर्ष करायचा प्रश्नच उदभवला नाही.
भारतामध्ये जे काही जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये धर्म उदयाला आलेत, विरशैव वगैरे त्यांचा आंबेडकरांनी अभ्यास केला. परंतु हे धर्म जातिव्यवस्थाग्रस्त झालेले आहेत, असं त्यांना आढळून आलं. बौद्ध धम्मानं भारतातून जाणं पसंत केलं, परंतु त्यानं जातिव्यवस्थेपुढे गुडघे टेकले नाहीत, हे कोसबींचं म्हणणं आहे. बाकीचे धर्म भारतात राहिले. कारण त्यांनी जातिव्यवस्थेशी तडजोड केली. जैन धर्मानं केली. तत्सम इतर अब्राह्मणी धर्मानं केली. परंतु बौद्ध धम्मानं या देशातून जाणं श्रेयस्कर मानलं. शेवटपर्यंत तो जातिव्यवस्थेशी त्याच्या परीनं झगडत राहिला. आंबेडकरांनी असा धम्म जातिव्यवस्था अंताच्या उद्दिष्टाकरता पसंत केला. स्त्री-पुरुष या प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिलं नाही. त्यांनी असं गृहित धरलं असेल की, जातिव्यवस्था अंत आणि एकूण समता त्याच्या मागोमाग येणार आहे. ती जर आली तर त्याच्यामध्येही स्त्री-पुरुष विषमतेचाही निकाल लावता येईल.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment