अजूनकाही
सर व्ही. एस. नायपॉल (१९३२-२०१८) हे नाव भारतीय वाचकांना नवीन नाही. या जागतिक दर्जाच्या लेखकानं भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनावर तब्बल तीन पुस्तकं लिहिली. या तीन पुस्तकांना नायपॉल यांची ‘भारतविषयक त्रिपुटी’ म्हणतात. यातील पहिलं आहे- ‘अॅन एरिया ऑफ डार्कनेस’. ते १९६४मध्ये प्रकाशित झालं. तेव्हा भारतात नेहरूंचा प्रभाव होता. या पुस्तकात भारताबद्दल बरीच कठोर निरीक्षणं आहेत. त्यानंतर नायपॉल भारतात १९७५ साली आले, तेव्हा आपल्या देशात इंदिरा गांधींनी लादलेली अंतर्गत आणीबाणी होती. त्या अनुभवांवर आधारित त्याचं ‘इंडिया - ए वुंडेड सिव्हीलायझेशन’ हे पुस्तक १९७७ साली प्रकाशित झालं. नंतरचे व तिसरं पुस्तक म्हणजे ‘इंडिया - ए मिलियन म्युटिनीज नाऊ’ हे पुस्तक १९९० साली प्रकाशित झालं. या पुस्तकाच्या निमित्तानं नायपॉल नामदेव ढसाळ व मल्लिका अमरशेखला भेटला होता. त्यानं त्यांची मुलाखत घेतली होती. नायपॉलच्या मृत्युनंतर त्याच्यावर मराठीत प्रकाशित झालेल्या अनेक लेखांत ही सर्व माहिती दिली होती.
नायपॉलची भारतविषयक व एकुणच प्रवासवर्णनं गाजली असली तरी तो मूलतः एक सर्जनशील लेखक होता हे विसरता कामा नये. त्याच्या लेखनाची सुरुवात १९५७ साली प्रकाशित झालेल्या ‘द मिस्टिक मासियर’ या कादंबरीपासून झाली. या कादंबरीला वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नायपॉलच्या चौथ्या कादंबरीनं ‘ए हाऊस फॉर मिस्टर बिस्वास’नं मात्र चोखंदळ वाचकांचं लक्ष वेधून घेतलं. ही कादंबरी १९६१ साली प्रकाशित झाली. मात्र नायपॉलला मानकऱ्यांच्या पंगतीत जागा मिळवून दिली, ती १९७१ साली प्रकाशित झालेल्या ‘इन अ फ्री स्टेट’ या कादंबरीनं. तिला त्या वर्षीचं बुकर पारितोषिक मिळालं. या कादंबरीनं नायपॉलचं एक ‘गंभीर प्रवृत्तीचा लेखक’ हे स्थान पक्कं केलं.
कोणताही सर्जनशील लेखक त्याचं आशयद्रव्य आजूबाजूच्या परिस्थितीतून, त्याला आलेल्या अनुभवांतून, त्याच्या निरूक्षणातून घेत असतो. नायपॉल याला अपवाद नव्हता. म्हणून त्याचं जीवन अगदी थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे.
नायपॉलचा जन्म त्रिनिनाद आणि टोबॅगो या एके काळी इंग्लंडच्या वसाहती असलेल्या देशात १७ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. हा देश त्रिनिदाद व टोबॅगो दोन बेटांचा बनलेला आहे. सुरुवातीला ही बेटं स्पेनच्या वसाहती होत्या. या वसाहती इ.स. १७९७ साली इंग्लंडच्या ताब्यात आल्या. या देशाला १९६२ साली स्वातंत्र्य मिळालं व १९७६ साली प्रजासत्ताक झालं. या देशाची खासीयत म्हणजे तिथं भारतातून गेलेला व तिथंच स्थायिक झालेला समाज एकूण लोकसंख्येच्या १८.१५ टक्के असून तेथील इतर गटांच्या तुलनेत दोन नंबरवर आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार त्रिनिनादची लोकसंख्या अवघी साडेतेरा लाख आहे.
......................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
......................................................................................................................................................
नायपॉलचे वंशज असेच भारतातून गेलेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ते भारतातून तिकडे गेले व तिथंच स्थायिक झाले. म्हणून नायपॉल भारतीय वंशाचा लेखक आहे. त्रिनिदादची राष्ट्रीय भाषा इंग्रजी आहे. हे सर्व तपशील समोर ठेवले म्हणजे नायपॉल एवढं वैविध्यपूर्ण लेखन कसा करू शकला, याचा अंदाज येतो.
नायपॉल जरी भारतीय वंशाचा होता तरी त्याच्या भावविश्वात त्याचं त्रिनिदादमध्ये गेलेलं बालपण, नंतर इंग्लंडमध्ये गेलेलं तारुण्य व नंतर तिथंच स्थायिक होणं, लेखनाच्या निमित्तानं केलेले विविध देशांचे प्रवास यांचा फार मोठा वाटा आहे. मोठेपणी तो आफ्रिका व आशियात होत असलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदल बघत होता. त्याला दिसत होतं की, या दोन खंडांतील अनेक वसाहती दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र होत गेल्या, पण त्यापैकी अनेक वसाहतींमध्ये स्वातंत्र्यानंतर सुबत्ता येण्याऐवजी यादवी युद्ध भडकलं आणि आधीचे राज्यकर्ते बरे होते असं म्हणण्याची वेळ आली. काही वसाहती तर बघताबघता नव-वसाहतवादाच्या शिकार झाल्या.
एक लेखक म्हणून नायपॉलला वसाहतवादाबद्दल, त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांबद्दल फार रस होता. हा विषय त्याच्या अनेक पुस्तकांत येतो. हा वसाहतवादसुद्धा साधासुधा नव्हता. यात तीव्र स्वरूपाचा सांस्कृतिक संघर्ष दडलेला होता. यात असं नव्हतं की, भारतानं बांगलादेशला किंवा जर्मनीनं फ्रान्सला गुलाम केलं आहे. तिथं फक्त ‘राजकीय व आर्थिक गुलामगिरी’ हा मुद्दा नव्हता तर ‘श्रेष्ठ पाश्चात्य संस्कृती व ती राज्य करत असलेली आशिया/ आफ्रिकेतील मागासलेली संस्कृती’ असा व्यापक सांस्कृतिक संघर्ष होता.
नायपॉलचा जन्म जरी अशाच एका गुलाम देशांत झाला होता, तरी त्यानं तारुण्य व नंतरची सर्व वर्षं प्रगत इंग्लंडमध्ये काढली होती. परिणामी तो मनानं, वृत्तीनं, सवयींनी युरोपीयन झाला होता. एका व्यापक अर्थानं नायपॉल लॉर्ड मेकालेनं वर्णन केलेल्या पिढीचा प्रतिनिधी होता. लॉर्ड मेकॉले (१८००-१८५९) भारतात अनेक कारणांनी बदनाम आहे. त्याच्या १८३४ साली तयार केलेल्या अहवालामुळे भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झालं. या अहवालच्या निमित्तानं त्यानं २ फेब्रवारी १८३५ रोजी इंग्लंडच्या लोकसभेत केलेलं भाषण उपलब्ध आहे. हे भाषण प्रत्येक अभ्यासक आपापल्या सोयीनं वापरतो. नायपॉलचं भावविश्व समजून घेण्यासाठी त्या भाषणातला काही भाग डोळ्यांसमोर ठेवणं गरजेचं आहे. मेकॉले या भाषणात म्हणतो- “इंग्रजी शिक्षण देऊन आपल्याला भारतात creating ‘a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect”. या उद्देशाचा त्रिनिनाद येथील उत्तम आविष्कार म्हणून नायपॉलकडे बोट दाखवता येतं.
नायपॉलच्या ‘इन अ फ्री स्टेट’ या कादंबरीला एकच एक असा प्लॉट नाही. यात तीन दीर्घ कथा आहेत. पहिली ‘वन आऊट ऑफ मेनी’, दुसरी आहे ‘टेल मी व्हू टू किल’, तर तिसरी आहे ‘इन अ फ्री स्टेट’. या तिन्ही दीर्घ कथांतून एकच सूत्र दिसून येतं. आपल्याकडे भाऊ पाध्येंचा ‘वासूनाका’ हा जसा प्रकार आहे, तसाच काहीसा हा प्रकार आहे. पारंपरिक अर्थानं ‘वासूनाका’ला एकसंध असं कथानक नाही, तसंच ‘इन अ फ्री स्टेट’ला नाही. तरीही या तिन्ही कथा एका अंतर्गत सूत्रानं बांधल्या आहेत. या कादंबरीसाठी नायपॉलनं ‘आफ्रिकन ग्रेट लेक’ नावाचा काल्पनिक देश उभा केला असला तरी त्यातलं वर्णन पूर्व आफ्रिकेतील तेव्हाच्या युगांडाला लागू पडतं.
या दीर्घ कथेच्या नावानुसार ही कथा एका स्वतंत्र झालेल्या देशात घडते. नायपॉलनं ‘आफ्रिकन ग्रेट लेक’ नावाचा काल्पनिक देश निर्माण जरी केलेला असला तरी हे कथानक नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या कोणत्याही आफ्रिकेतील देशांत घडू शकलं असतं. इतर अनेक आफ्रिकन देशासारखा आफ्रिकन ग्रेट लेकसुद्धा अलिकडेच स्वतंत्र झालेला आहे. आता मात्र तिथं राजा व लोकशाहीच्या नावानं हिंसाचार करणारा नेता यांच्या समर्थकांत घनघोर यादवी युद्ध सुरू असतं. या दीर्घ कथेचा नायक बॉबी हा ब्रिटिश असून स्थानिक सरकारी कार्यालयात अधिकारी असतो. अजून या देशांत सत्तांतर पूर्णपणे झालेलं नाही याचाच हा एक पुरावा.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
कादंबरीची सुरुवात होते, तेव्हा बॉबी देशाच्या राजधानीच्या शहरात एका सेमिनारसाठी आलेला असून लवकरच त्याला कारनं त्याचं कार्यालय असलेल्या दूरच्या भागात जायचं असतं. नायपॉलनं एका रात्रीच्या वर्णनात बॉबी समलिंगी असून एका बारमध्ये तो एका झूलू जमातीच्या तरुणाला वश करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो असं सांगितलं आहे. दुसऱ्या दिवशी बॉबी निघतो तर त्याच्याबरोबर लिंडा, त्याच्या मित्राची पत्नी, येते. ती ब्रिटिश असते. त्यांचा हा कारचा प्रवास म्हणजे स्वातंत्र्य मिळालेल्या, पण ते पचनी न पडलेल्या व रक्तरंजीत यादवी युद्धानं गांजलेल्या देशाचं चित्रण ठरतं. या कादंबरीत चार महत्त्वाचे सामाजिक घटक आहेत. एक, तिथं असलेला ब्रिटिश समाज, दुसरा तेथील गरीब आफ्रिकन समाज (जो दोन गटांत विभागला आहे. एक गट राजाशी एकनिष्ठ आहे तर दुसरा नव्या नेत्याशी एकनिष्ठ आहे) आणि तिसरा, यादवी युद्धात गुंतलेलं सैन्य. चौथा पण अगदी छोटा सामाजिक गट म्हणजे भारतीय.
लिंडाला ड्रायव्हिंग येत नसल्यामुळे कार नेहमी बॉबी चालवत असतो व अधूनमधून लिंडाशी बोलत असतो. तो समलिंगी असल्यामुळे लिंडाला त्याच्यापासून ‘तशी’ भीती नसते. लिंडा स्वतः या प्रवासादरम्यान एक विवाहबाह्य संबंध निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करते.
प्रवासाच्या सुरुवातीलाच लेखक तिथं श्रीमंतीत जगणाऱ्या भारतीयांचं प्रानिनिधिक चित्रण करण्यासाठी एक प्रसंग योजतो. या प्रसंगाचं वर्णन करताना नायपॉल लिहितो, “He heard then the sound of an engine; and a little later a car came banging up the broken street. It was a Chevrolet, driven by an Indian girl. She stopped outside one of the shops. She barely looked at Bobby and hurried in, her high-heeled shoes tapping on the road and the concrete.” सर्व देशभर हाहाःकार माजलेला असताना भारतीय समाज मात्र स्वतःच्या जगात मजा करत होता. या समाजाला माहिती होतं की, ही भांडणं एक तर मागे राहिलेल्या ब्रिटिश समाज विरुद्ध स्थानिक निग्रो यांच्यामध्ये आहेत आणि दुसरीकडे निग्रोंच्या दोन गटांत यादवी युद्ध सुरू आहे. ही गुंतागुंतीची वस्तुस्थिती नायपॉलनं एका वरवर साध्या दिसणाऱ्या प्रसंगातून वाचकांसमोर मांडली आहे.
या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बॉबी व लिंडांनी एका इंग्रज म्हाताऱ्यानं चालवलेल्या लॉजमध्ये घालवलेली रात्र व सकाळचा थोडा वेळ. या लॉजमधल्या अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगातून नायपॉल ब्रिटिशांचा साम्राज्यवादी दृष्टिकोन व नवस्वतंत्र झालेल्या पण अजून स्वातंत्र्याचा अर्थ नीटसा न समजलेल्या निग्रो समाजातील संबंधांवर प्रकाश टाकला आहे. हा म्हातारा कधी काळी इंग्रजांच्या सैन्यात कर्नल या पदावर होता. त्यामुळे त्याची लॉज चालवण्याची पद्धत खास लष्करी असते. कर्नल दररोज रात्री कोणती तरी चांगलं पुस्तक वाचतो. नायपॉलनं एका प्रसंगी कर्नलला शेक्सपियरची नाटकं वाचताना दाखवलं आहे.
कर्नलला खात्री असते की, आज ना उद्या त्याच्याच नोकरवर्गातील कोणीतरी त्याचा खून करेल व लॉज स्वतःच्या ताब्यात घेर्इल. कर्नलचा संशय पिटर या निग्रो नोकरावर असतो- जो त्यातल्या त्यात राजकीयदृष्ट्या जागरूक असतो. कर्नलला जरी बदलेल्या राजकीय परिस्थितीचं भान असलं तरी तो या नव्या परिस्थितीशी जळवून घेऊ शकत नाही. आता जरी राजकीय परिस्थिती बदललेली असली तरी या मूलतः जंगली लोक युरोपीयन संस्कृतीमुळे थोडी तरी सुसंस्कृत झाले, याबद्दल त्यांनी आपल्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव ठेवावी अशी कर्नलची अपेक्षा असते. कर्नलचा आज ना उद्या खून होर्इल याबद्दल शंका नसली तरी नायपॉलनं तो प्रसंग न रंगवता त्याचं फक्त सूचन केलं आहे.
याच लॉजच्या प्रसंगात नायपॉलनं एका निग्रो नोकराच्या माध्यमातून त्यातील काहींना आधुनिक शिक्षणाची गरज कशी पटली आहे आणि ते त्यासाठी कसे जमतील तसे प्रयत्न करत आहेत, यावरही प्रकाश टाकला आहे. तिथं करोलस नावाचा तरुण नोकर असतो, जो बॉबीला विनंती करतो की, त्यानं त्याला फ्रेंच भाषा शिकवावी.
नायपॉलनं साध्या प्रसंगातून देशभर असलेला ताण पकडला आहे. या देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी अजूनही ब्रिटिशांबद्दलचा भीतीयुक्त आदर कमी झालेला नसतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉबी पेट्रोल भरायला जातो तो प्रसंग. मात्र बदललेल्या परिस्थितीचा ताण बॉबीसारख्यावरही असतोच. जेव्हा बॉबीला पेट्रोल मिळतं, तेव्हाच त्याच्या मनावरचा ताण कमी होतो. तसंच रस्त्यानं जात असलेल्या आफ्रिकन माणसाला कारमध्ये लिफ्ट द्यायची की नाही, या मुद्दावरून त्याच्यात व लिंडात वाद होतो.
या दोन पात्रांच्या माध्यमातून नायपॉलनं वसाहतींबद्दल युरोपियन समाजाचा काय दृष्टिकोन आहे यावर प्रकाश टाकला आहे. यात बॉबीच्या मनांत या नवस्वतंत्र देशांबद्दल थोडं प्रेम आहे आणि त्यांना स्वातंत्र्याचा हक्क आहे असंही त्याचं मत आहे. लिंडा मात्र नखशिखांत साम्राज्यवादी आहे. एका प्रसंगी ती म्हणते की, आपण इथं मुळात यायलाच नको होतं. दुसऱ्या एका प्रसंगी बॉबी या मानसिकतेवर कोरडे ओढताना म्हणतो, “You go out driving with Sammy Kisenyi, making educated conversations, and you see a naked savage with penis one foot long. You pretend you have seen nothing. You see two naked boys painted white running about the public highway, and you don’t talk about it. Sammy Kisenyi reads a paper on broadcasting at the conference. He’s lifted whole paragraphs from T. S. Eliot, of all people. You say nothing about it.” यातून नायपॉल दाखवून देतो की, आपल्या माणसाच्या चुका काढायच्या नसतात, कारण तो आपला आहे, आपल्यापैकी एक आहे.
या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना समजतं की, राष्ट्राध्यक्षांच्या सैनिकांनी राजाला क्रूरपणे मारून टाकलं आहे. राष्ट्राध्यक्षांचे सैनिक आता राजाचे समर्थक राहत असलेली गावंच्या गावं जाळत सुटले आहेत. अशाच एका पोलिस चौकीत बॉबीलासुद्धा अमानुष मारहाण होते. शेवटी ते दोघंही ब्रिटिश लोकांसाठी असलेल्या सुरक्षित वसाहतीत पोहोचतात. या प्रवासादरम्यान त्यांना व त्यांच्या नजरेतून वाचकांना जे जग दिसतं, त्यानं मात्र आपण अंतर्मुख होतो.
नायपॉल हा गंभीर प्रवृत्तीचा लेखक आहे. तो वाचकांचं मनोरंजन करण्यासाठी लिहिणारा लेखक नाही. एका मुलाखतीत तो म्हणतो, “लेखकानं सतत धोका पत्करला पाहिजे. सतत एकच एक थीमवर लिहिण्यात काय आव्हान आहे?’’ नायपॉलच्या बाबतीत हे अक्षरशः खरं आहे. त्यानं सतत वेगवेगळ्या थीम हाताळल्या.
नायपॉलची ही कादंबरी म्हणजे अस्थैर्याची कादंबरी मानली जाते. आज जागतिक पातळीवर ‘अस्थैर्य’ ही थीम फार लेखकप्रिय आहे. पण जेव्हा १९७१ साली नायपॉलनं ही कादंबरी लिहिली तेव्हा ही मानसिकता अगदी नवीन होती. ‘इन अ फ्री स्टेट’मधील सर्व पात्रं या ना त्या कारणांनी अस्थिर असतात. लिंडा, बॉबी परदेशी असल्यामुळे तर कर्नल स्वतःचा कधीही खून होर्इल या भावनेनं, तर तेथील स्थानिक समाज कधी आपला प्रतिस्पर्धी गट आपल्यावर हल्ला करेल, या भीतीनं. काही अभ्यासकांच्या मते या कादंबरीवर जोसेफ कॉनरॉडच्या ‘हार्ट ऑफ डार्कनेस’चा प्रभाव आहे.
एक लेखक म्हणून नायपॉलमध्ये एक वेगळ्या प्रकारचं धाडस होतं. ही कादंबरी १९७१ साली आली, तेव्हा वसाहतवादाच्या विरोधात जगभर एकमत झालेलं होतं. याला काही सन्माननीय अपवाद होतेच. त्यात नायपॉलचा जरी स्पष्टपणे समावेश करता येत नसला तरी तो उघडपणे निर्वसाहतीकरणाची बाजू घेत नाही हे उघड आहे. तो एका तटस्थ लेखकाप्रमाणे वसाहतवाद, स्वातंत्र्य व त्याचे परिणाम वाचकांसमोर मांडत जातो. विंस्टन चर्चिल जसे उघडपणे साम्राज्यवादी होते, तसा नायपॉल अर्थातच नाही. पण ज्याप्रमाणे मॅक्सिम गॉकी डाव्या विचारांचा होता, तसाही नायपॉल नाही, हे लक्षात ठेवलेलं बरं!
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment