अजूनकाही
अगदी अलीकडेपर्यंत सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स वगळता टेनिसमध्ये गौरेतर किंवा मिश्र वा कृष्णवर्णीय महिलांनी वर्चस्व गाजवल्याची किंवा अस्तित्व दाखवल्याची फारशी उदाहरणंच आढळत नव्हती. गेल्या सहस्त्रकाच्या अखेरीस काही काळ झिना गॅरिसन खेळताना दिसायची. पण तिला मार्टिना नवरातिलोवाची डबल्स पार्टनर यापलीकडे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली नव्हती.
नवीन सहस्त्रकाच्या पहिल्या दशकातच प्रथम व्हीनस आणि नंतर सेरेना या विल्यम्स भगिनींनी बराच काळ टेनिस विश्वावर वर्चस्व गाजवलं. आता व्हीनस जवळपास निवृत्तीकडे झुकलेली आहे. मातृत्वाच्या जबाबदारीनंतर सेरेनाच्या खेळण्यावर मर्यादा आल्या असल्या, तरी खेळण्याची आणि जिंकण्याची तिची भूक कमी झालेली नाही, हे मान्य करावं लागेल.
ही परिस्थिती काहीशी बदलल्याची चिन्हं अलीकडे दिसू लागली आहेत. उदा. गेल्या वर्षी अमेरिकन ओपनमध्ये व्हीनस विल्यम्स, स्लोआन स्टीफन्स आणि मॅडिसन कीज अशा तीन गौरेतर टेनिसपटूंनी उपान्त्यपूर्व फेरी गाठून दाखवली. अमेरिकन स्पर्धेच्या इतिहासात हे प्रथमच घडत होतं. त्या स्पर्धेत स्लोआन स्टीफन्स अजिंक्य ठरली होती. विल्यम्स भगिनींच्या मक्तेदारीपासून खरं तर तो एक रिलीफच होता. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, विल्यम्स भगिनींपलीकडेही टेनिससारख्या खेळात कृष्णवर्णीय, मिश्रवर्णीय मुली खेळू आणि चमकू लागल्याची ती नांदी होती. ती स्पर्धा म्हणजे केवळ अपघात नव्हता हे यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेनं दाखवून दिलं. याही वेळी महिलांच्या अंतिम फेरीत दोन गौरेतर प्रतिस्पर्धी होते. कृष्णवर्णीय सेरेना विल्यम्स विरुद्ध मिश्रवर्णीय नाओमी ओसाका. हा सामना सेरेनाच्या चिडचिडीमुळे गाजला. त्यामुळे नाओमी ओसाकाचं पहिलंवहिलं अजिंक्यपद काहीसं झाकोळलं गेलं. तरी व्यापक विचार केल्यास पाठोपाठच्या स्पर्धांमध्ये गौरेतर टेनिसपटू अजिंक्य ठरतात आणि त्या विल्यम्स भगिनींपैकी कुणी नसतात हे अभूतपूर्व आहे.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा -
.............................................................................................................................................
नाओमी ओसाका जपानची. पण मारिया शारापोवाप्रमाणेच गेली अनेक वर्षं अमेरिकेत राहते. टेनिसमध्ये करिअर करायचं असल्यास आणि हाती पैसा असल्यास बरीचशी मंडळी हा पर्याय निवडतात. अमेरिकेतील अॅकॅडम्या आणि उपलब्ध स्पर्धांची मोठी संख्या हे दोन्ही करिअरच्या दृष्टीनं सोयीचं पडतं. तिचे वडील लेओनार्ड फ्रान्सवा हे मूळचे हैतीचे. अमेरिकेत शिकले. मग नोकरीनिमित्त जपानमध्ये गेले. तिथं नाओमीची आई तमाकी ओसाकाशी ओळख, मैत्री, विवाह झाल्यानंतर नओमी आणि मारी अशा दोन मुलींचे ते पालक बनले. या दोघी आता टेनिस खेळतात. मारी हेदेखील व्यावसायिक टेनिस खेळते. जपानमध्ये फार कोणी विचारणा करू नये यासाठी सर्वसंमतीने ओसाका हेच आडनाव ठेवलं गेलं. नाओमीकडे जपान आणि अमेरिका अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. ती तीन वर्षांची असतानाच नाओमीचे पालक जपानमधून अमेरिकेला स्थलांतरित झाले. ती जपानतर्फे खेळत असली, तरी तिला जपानी फारसं येत नाही.
नाओमीचे पालक सुरुवातीला न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड आणि नंतर फ्लोरिडात राहू लागले. नाओमीनं जपान आणि अमेरिकेत लाँग आयलँड आणि फ्लोरिडा इथं सुरुवातीचे टेनिसचे धडे गिरवले. २००७मध्ये म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी तिनं मारीच्या साथीनं अमेरिकेतील मुलींच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत डबल्स विभागात जेतेपद पटकावलं. तिथपासून विशेषतः नाओमीच्या प्रगतीचा आलेख चढताच राहिला. २०१३पासून ती दुय्यम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू लागली, त्यावेळी तिच्या वडिलांनी आयटीएफ टेनिस सर्किटमध्ये तिची नोंदणी जपानी टेनिसपटू म्हणून केली. २०१३पासून नाओमी डब्ल्यूटीए सर्किटमध्ये म्हणजे व्यावसायिक टेनिस खेळू लागली. तिनं पहिल्याच स्पर्धेत हुनर दाखवून दिली. या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तिनं २०११ मधील अमेरिकन ओपन विजेती ऑस्ट्रेलियाची समांथा स्टोसुर हिला एक सेटची पिछाडी भरून अडीच तासांत हरवलं. २०१५मध्ये नाओमीनं डब्ल्यूटीए वर्ल्ड टूरमध्ये निमंत्रितांची स्पर्धा जिंकली. तिच्या सुरुवातीच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सातत्य नव्हते, पण ती चमक दाखवत होती. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत ती तिसऱ्या फेरीपर्यंत जाऊन हरली. त्या वर्षी म्हणजे २०१५मध्ये नाओमीला विम्बल्डन स्पर्धेत दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं. अमेरिकन ओपन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत मॅडिसन कीजविरुद्ध ती तिसऱ्या सेटमध्ये ५-१ अशी आघाडीवर होती. तरीही त्या सामन्यात नाओमी पराभूत झाली. तिच्यासाठी हा मोठा धडा होता. निव्वळ गुणवान असून भागत नाही. विजयासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करावे लागतात, हा तो धडा. पुढील वर्षी जपानमधील दोन स्पर्धा तिच्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. पहिल्या स्पर्धेत तिची मजल दुसऱ्या फेरीपलीकडे गेली नाही. मात्र, पुढच्याच आठवड्यात झालेल्या दुसऱ्या स्पर्धेत तिनं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्या सामन्यात नाओमी कॅरोलिन वॉझनियाकी या मातब्बर टेनिसपटूसमोर पराभूत झाली. परंतु, एव्हाना महिला क्रमवारीत अव्वल ५० टेनिसपटूंमध्ये समावेश होण्याइतपत कर्तृत्व नाओमीनं दाखवलेलं होतं. त्यावर्षी सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख टेनिसपटूचा किताब नाओमीलाच मिळाला.
२०१७ या वर्षाच्या सुरुवातीला नाओमीची कामगिरी निराशाजनक होती. पहिल्या सहा महिन्यांत कोणत्याही स्पर्धेत तिला दुसऱ्या-तिसऱ्या फेरीपलीकडे मजल मारता आली नाही. मात्र अमेरिकन ओपन म्हणजे ऑगस्टनंतर परिस्थिती पालटू लागली. त्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत तिने अँजेलिके कर्बर या जर्मन टेनिसपटूला पहिल्याच फेरीत हरवलं. त्या स्पर्धेतही नाओमीला तिसऱ्या फेरीपलीकडे जाता आलं नाही, पण मातब्बर खेळाडूंविरुद्ध खेळण्याच्या अनुभवाने ती समृद्ध होऊ लागली होती. वर्षाअखेरीस झालेल्या हाँगकाँग टेनिस स्पर्धेत तिनं (स्पर्धा जिंकली नसली तरी) एका फेरीत व्हीनस विल्यम्सला हरवलं, जो एक महत्त्वाचा टप्पा होता.
२०१८च्या सुरुवातीला तिनं साशा बायजिन या निष्णात मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याचे परिणामही लगेच दिसून आले. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत तिनं प्रथमच चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली. त्यावेळी सिमोना हिलेपनं तिला हरवलं. मग बीएनपी पारिबास स्पर्धेत तिची कामगिरी खऱ्या अर्थानं दखलपात्र झाली. त्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तिनं मारिया शारापोवाला हरवलं. विल्यम्स भगिनी आणि शारापोवा यांच्याशी कधीतरी दोन करण्याचं नाओमीचं स्वप्न होतं. तिनं व्हीनस आणि शारापोवा यांना हरवत ते स्वप्न दोन तृतीयांश पूर्ण केलं. यानंतर अग्निस्का राडवान्स्का, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, सिमोना हालेप अशा एकाहून एक सरस टेनिसपटूंना हरवत नाओमीनं ती स्पर्धा जिंकली.
मार्च २०१८मध्ये एका स्पर्धेत नाओमीची गाठ पडली सेरेना विल्यम्सशी. मायामी ओपन स्पर्धेची ती पहिलीच फेरी होती. सेरेना प्रदीर्घ काळाच्या बाळंतपणानंतर केवळ चौथा सामना खेळत होती. या सामन्यात नाओमीनं तिच्या आवडत्या टेनिसपटूवर सरळ सेट्समध्ये मात केली. नाओमीसाठी एक चक्र पूर्ण झालं होतं, पण आता खरा प्रवासही सुरू झाला होता. येथून पुढे ती निव्वळ उदयोन्मुख टेनिसपटू म्हणून मिरवू शकणार नव्हती. तिचे मातब्बर खेळाडूंसमोरचे विजय धक्कादायक ठरणार नव्हते. दडपण तिच्यावरही सारखेच असणार होते. या वर्षीच्या फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेत नाओमी पुन्हा एकदा तिसऱ्या फेरीपलीकडे पोहोचू शकली नाही. तिच्यासारख्या प्रतिभावान टेनिसपटूसाठी ही निराशाजनक कामगिरी होती. कारकीर्दीत तिसऱ्यांदा तिनं प्रशिक्षक बदलला. तिची यशाची भूक वाढू लागली होती. एखादी कार वेग वाढवताना गियर बदलत जाते, त्याप्रमाणे नाओमीलाही वेग वाढवण्यासाठी गियर म्हणजे प्रशिक्षक बदलणे गरजेचे वाटले. मे महिन्यात नाओमी फ्लोरिडाला (अमेरिकेतली टेनिस प्रशिक्षण पंढरी) स्थलांतरित झाली आणि एव्हर्ट टेनिस अॅकॅडमीत खेळू लागली.
फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये नाओमीला प्रतिभावन प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली होती. मॅडिसन कीज आणि अँजेलिके कर्बर. पहिल्या पन्नासमध्ये प्रवेश मिळवणं तुलनेनं सोपं असतं. पण पहिल्या दहात येणं आणि त्यानुसार खेळत राहणं महाकठीण. इथं शारीरिक कौशल्याबरोबरच मानसिक कणखरपणाचाही कस लागतो. नाओमीसाठी कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती हे आव्हान राहिलेलं नव्हतं. पण मानसिक कणखरपणा आणि तोही मोक्याच्या सामन्यांमध्ये राखणं हे कोणत्याही क्रीडाप्रकारात निर्णायक ठरतं. जिंकण्याची ईर्ष्या प्रत्येकात असतेच. पण विजयाच्या उंबरठ्यावर आल्यानंतर आपण जिंकलोच असं वाटल्यामुळे सर्वाधिक घोळ होतात. चांगली खेळाडू आणि चँपियन खेळाडू यांतील सीमारेषा अशी पुसट आणि फसवी असते. नाओमीचं वैशिष्ट्य म्हणजे, ज्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिनं चौथ्या फेरीपलीकडे मजल मारली, ती अमेरिकन ओपन स्पर्धा तिनं जिंकूनही दाखवली. तिच्या मानसिक परिपक्वतेची ही पावती होती.
उपान्त्य फेरीपर्यंत नाओमीची वाटचाल तुलनेनं सुरळीत होती. उपान्त्य फेरीत तिच्यासमोर होती मॅडिसन कीज. गेल्या अनेक सामन्यांमध्ये मॅडिसननं नाओमीला हरवलं होतं. दडपण दुहेरी होतं. उपान्त्य फेरीतून अंतिम फेरी गाठण्याचं आणि मॅडिसन कीजला हरवण्याचं. ते बहुधा मॅडिसनवरच अधिक आलं असावं. कारण तो सामना नाओमीनं सरळ सेट्समध्ये जिंकला. अंतिम सामन्यात समोर होती सेरेना विल्यम्स. दडपण आता तिहेरी होतं. पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धा अजिंक्यपदाचं, सेरेना विल्यम्सच्या मातब्बरीचं आणि सेरेना ही आपली आदर्श आहे या भावनेनं हुरळून न जाण्याचं!
पण कदाचित या कोणत्याही दडपणाला मनात चंचुप्रवेश करू न देता, नाओमी खेळली. आणि पुन्हा एकदा सरळ सेट्समध्ये जिंकली. कदाचित दडपण सेरेनावरच होतं का? तीन वेळा पंचांसमवेत कडवी हुज्जत घालून, एकदा गुण आणि एकदा तर गेम गमावून सेरेनानं स्वतःचा आणि चाहत्यांचाही विरस केला. तो दिवस तिचा नव्हताच. पंच कार्लोस रामोस यांच्याशी वाद घालता घालता सामना कधी संपला हे सेरेनाला कळलंही नाही. यामुळे नाओमी ओसाकाचा काहीसा हिरमोड झाला असेल तर ते स्वाभाविक आहे. एका अभूतपूर्व विजयाचा आनंद तिला मनापासून चाखता आला नाही. टेनिस कोर्टवरील त्या वादानं तीदेखील विचलित झाली असू शकते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, न्यूयॉर्कच्या कोर्टवर ज्या प्रकारे सेरेनाची प्रेक्षकांनी सामन्यादरम्यान आणि पारितोषिक वितरणादरम्यान हुर्यो उडवली, त्यामुळे नाओमीही खंतावली असावी. कारण नंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना तिला अश्रू आवरता आले नाहीत.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
नाओमी अजून लहान आहे. पण तिच्यात प्रचंड ऊर्जा आणि ईर्ष्या आहे. टेनिस कोर्टवर आक्रमक खेळण्यावर तिचा भर असतो. ती बेसलाइनवरून खेळणं पसंत करते. दोन्ही दिशांना विनर्स लगावते. तिचा फोरहँड ताकदवान आहे. पण बॅकहँडही परिणामकारक आहे. सर्विस अतिशय वेगवान (२०० किमी ताशी) आहे. हार्डकोर्ट आणि ग्रासकोर्टला अधिक पसंती असते, पण मातीच्या कोर्टवर अजून तिला जम बसवायचा आहे.
जपानसारख्या एकवांशिक देशामध्येही नाओमीचं मिश्रवर्णी किंवा मिश्रवांशिक असणं हा चर्चेचा विषय ठरतोच. जपानमध्ये अशा लोकांना ‘हाफू’ असं संबोधलं जातं. मी एक काळी मुलगी आहे, असं माझ्या जपानी नावावरून लोकांना खरंच वाटत नाही, असं नाओमीनं एका मुलाखतीत म्हटलंय. काळा जावयबापू आणल्यामुळे नाओमीच्या आजोबांना संताप आला होता. दहा वर्षं तिच्या आजीबाईंनीही बोलचाल बंद केली होती.
सेरेना विल्यम्सच्या नावावर यापूर्वीच २३ ग्रँड स्लॅम अजिंक्यपदं आहेत. तरीही चोविसाव्या अजिंक्यपदासाठी नाओमीविरुद्ध खेळताना ती चवताळल्यासारखी झाली होती. त्यामुळेच तिचे पंचांशी खटके उडत होते. त्याहीपेक्षा कदाचित प्रेक्षकांकडून हुर्यो उडवली जात असल्यामुळेही ती वैतागली असावी. कदाचित त्या वर्षभरात सलग दुसऱ्या स्लॅम फायनलमध्ये (विम्बल्डन) पराभूत होण्याची तिची अजिबात इच्छा नसावी. विम्बल्डन फायनलमध्ये यंदा तिला अँजेलिके कर्बरनं हरवलं. २००४, २००६ आणि २०११ या तीन वर्षांचा अपवाद वगळता २००२पासून सेरेना प्रत्येक वर्षी एखादे तरी स्लॅम जिंकत आलीये. त्यात आणखी एका भाकड वर्षाची भर पडू नये, असं तिला मनोमन वाटत होतं. तिच्या त्राग्याला आणखीही कारणं आणि परिमाणं होती. पंच तिच्यासाठी लावत असलेले शिस्तीचे निकष पुरुष टेनिसपटूंना लावले जात नाहीत, या तिच्या मताशी बिली जीन किंग आणि ख्रिस एव्हर्ट यांच्यासारख्या दिग्गज (गोऱ्या) टेनिसपटूंनी सहमती दर्शवली. आता ट्रम्पोत्तर अमेरिकेत टेनिस कोर्टवर जाहीर टिंगल, हुर्यो उडवली जाऊ लागल्यानंतर सेरेना चवताळली नसती तरच नवल होते.
डोनाल्ड ट्रम्प या तऱ्हेवाईक अध्यक्षाच्या अमदानीत गौरेतर अमेरिकनांसाठी एकंदरीतच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि मिश्रवर्णीय खेळाडू आणि अमेरिकी माध्यमे, नागरिक व सरकार यांच्यातील नाते गुंतागुंतीचे आणि काही वेळा ताणलेले असते. महिला टेनिसमध्ये निदान गेला काही काळ विल्यम्स भगिनी होत्या आणि आता त्यात भर पडू लागली आहे. पुरुषांच्या बाबतीत मात्र परिस्थिती फारच उदासीन आहे. आर्थर अॅश यांनी १९६८मध्ये अमेरिकन ओपन जिंकल्यानंतर एकाही अमेरिकी किंवा बाहेरच्या गौरेतर खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. याचं एक प्रमुख कारण म्हणजे अमेरिकी समाजव्यवस्था, कॉर्पोरेट्स आणि काही प्रमाणात सरकारी यंत्रणा यांनी जणू काळ्या खेळाडूंनी कुठे खेळावं हे आखूनच ठेवलेलं आहे! त्यानुसार काळ्या खेळाडूंना बास्केटबॉल आणि अमेरिकन फुटबॉल या खेळांकडे ‘वळवलं’ जातं. फार तर बेसबॉल किंवा आइस हॉकी वगैरे.. या पार्श्वभूमीवर सेरेना किंवा (अमेरिकेत राहत असल्यामुळे) नाओमी ओसाका किंवा अगदी स्लोआन स्टीफन्स, मॅडिसन कीज यांचं यश वेगळं आणि प्रथांशी टक्कर देणारं ठरतं.
.............................................................................................................................................
लेखक सिद्धार्थ खांडेकर पत्रकार आहेत. क्रीडा, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत.
sidkhan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment