अजूनकाही
बीबीसीने नुकतीच भारतातील १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. त्यात कर्नाटकच्या १०५ वर्षांच्या सालूमरदा थिमक्का यांचा समावेश आहे. त्यांनी ८० वर्षांत ८ हजार वडाची झाडं लावली आहेत. थिम्मक्का वडाच्या शेकडो झाडांची आई आहे. आईच ती! कारण तिने वडाची रोपं केवळ लावली नाहीत, तर त्यांचं अगदी पोटच्या मुलासारखं संगोपनही केलंय. या कार्यामुळेच तिला ‘सालुमरदा’ ही नवी ओळख बहाल केली गेली आहे. सालुमरदा म्हणजे झाडांची रांग!
थिम्मका आणि चिक्कय्या हे कर्नाटकमधल्या कोडूर गावातलं एक सामान्य, गरीब जोडपं आहे. चिक्कय्या गुरं राखायचे आणि थिम्मक्का स्वत:च्या शेतीच्या वितभर तुकड्यात राबायच्या. यातून या जोडप्याला जेमतेम पोट भरेल एवढंच उत्पन्न मिळायचं. त्यात पुन्हा मूलबाळ नसल्याचं आभाळाएवढं दु:ख पाचवीला पुजलं होतंच. मात्र या दु:खाला उतारा म्हणून या जोडप्याने स्वीकारलेला मार्ग अगदीच असामान्य आहे! नुसताच असामान्य नाही, तर हिरवागार आणि शीतलही आहे! पुन्हा तो केवळ स्वतःला किंवा एकट्या-दुकट्याला शांतावणारा नाही, तर या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला शांताई देणारा आहे.
कर्नाटकमधला बंगळुरू-निलमंगला महामार्ग! या महामार्गावरून प्रवास करताना अचानक रस्त्याच्या दुतर्फा वडाच्या झाडांची रांग दिसायला लागते. रखरखत्या उन्हात गारवा जाणवायला लागतो. त्यामुळे कोडूर आणि हुलिकल या गावांमधून जाणारा सुमारे चार किलोमीटरचा हा महामार्ग अगदी जादूई वाटायला लागतो. ही जादू केली आहे, थिम्मक्का आणि चिक्कय्या या जोडप्याने, त्यांच्या ६० वर्षांच्या परिश्रमाने आणि त्यातून निपजलेल्या या विस्तीर्ण वृक्षांच्या छायेनं!
गुब्बी गावातल्या गरीब घरात जन्मलेल्या थिम्मक्का यांनी शाळेचं तोंडही बघितलेलं नाही. लहानपणापासून त्या गावातल्या खाणीत खडी वाहायचं काम करायच्या. कमी वयात चिक्कय्या या गुराख्याशी त्यांचं लग्न झालं. चिक्कय्याही अशिक्षित आणि घरी अठरा विश्व दारिद्र्य! कष्टातून सतत काहीतरी पेरणं, निपजणं आणि आकाराला आणणं, हेच धन आणि तीच या जोडप्याची दानतही. लग्नाला बरीच वर्षं उलटून गेल्यानंतरही त्यांना मूलबाळ झालं नाही. भौतिक सुखांना पारख्या कुटुंबाची ‘मूल’ हीच संपत्ती, मिळकत आणि आशा असते. त्यामुळे मुलाशिवाय या घरात आणि मनातही रितेपण होतं. अर्थात, हे रितेपण संपवण्याचा मार्गही त्यांच्या कष्टकरी हातांमधूनच गेला होता. साधारण साठेएक वर्षांपूर्वी एके दिवशी या जोडप्याला हा मार्ग सापडला... झाडांचं पालकत्व स्वीकारणं! त्यांनी झाडं लावायचं ठरवलं आणि त्यांच्या संगोपनासाठी या माय-बापाचं खस्ता खाणं सुरू झालं.
त्यांच्या हुलिकल गावातून अनेक जण बहुधा रोजच कामानिमित्त कोडूर गावात जायचे. या रस्त्यावर एकही झाड नव्हतं. रखरखत्या उन्हामुळे हा प्रवास अधिकच त्रासदायक व्हायचा. हा उजाड मार्ग उजवायचं त्यांनी ठरवलं खरं; पण रोपं विकत घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र गावात वडाची झाडं खूप होती. त्यांच्या फांद्यांपासून या दोघांनी कलमं तयार केली आणि त्यांची ‘संगोपन’ मोहीम सुरू झाली.
त्यांच्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या महामार्गाच्या दुतर्फा पहिल्या वर्षी त्यांनी वडाची दहा रोपं लावली. केवळ रोपं लावणं हे त्यांचं ध्येय नव्हतं. या झाडांचं योग्य संगोपन हे त्यांनी स्वतःचं कर्तव्य मानलं आणि अगदी आदर्श पालकांप्रमाणे ते यशस्वीरित्या पारही पाडलं. खरं तर, घरापासून इतक्या दूर अंतरावर असलेली ही रोपं जगवणं हेच एक आव्हान होतं, पण जातिवंत आई-बापांप्रमाणे त्यांनी ते विनातक्रार पेललं. त्यासाठी खूप कष्ट घेतले. थिम्मक्का आणि चिक्कय्या यांचं हे आगळंवेगळं, पण अस्सल आईबापपण इथं खऱ्या अर्थाने गवसतं.
डोक्यावर पाण्याचा घडा घेऊन तीन किलोमीटर दूर असलेल्या या रोपांना ते रोज पहाटे नियमित पाणी घालत. हळूहळू रोपांची मुळं सशक्त झाली तसं त्यांनी तीन दिवसांमधून एकदा असं वर्षभर पाणी घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर झाड चांगलं धरल्यावर आठवड्यातून एकदा असं दहा वर्षं या झाडांना पोसलं; तयार केलं. शिवाय गुरांपासून लहान रोपांचं रक्षण होण्यासाठी त्याभोवती लोखंडी जाळीही लावली. एकंदर त्यांनी लावलेलं प्रत्येक रोप जगेल आणि त्याचा पूर्ण विकसित वृक्ष होईल, याची त्यांनी पुरेपूर काळजी वाहिली; पण या कामासोबत पोटापाण्यासाठी पैसा कमावणं आवश्यक असल्याने त्यांनी त्यांचं गुराख्याचं, शेतीचं आणि इतर कामंही सुरू ठेवली.
पुढे त्यांनी मुद्दामहून पावसाळ्यापूर्वी रोपांची लागवड करायला सुरुवात केली. त्यामुळे झाडं आणखी जोमाने वाढायला लागली. मग हळूहळू या कामात जम बसल्यावर दुसऱ्या वर्षी त्यांनी झाडांची संख्या वाढवून १५ केली आणि दरवर्षी ही रोपलागवडीची संख्या वाढवत नेली. या दोघांच्याही अथक परिश्रमांमुळे या महामार्गावर आता वडांचे भले मोठे वृक्ष आहेत! खरं तर थिक्कम्मा किंवा चिक्कय्या यांनी आपली ही मुलं कधीही मोजली नाहीत; पण त्यांच्या या अभिनव कार्याविषयीची सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि शासनाने एका उपक्रमांतर्गत या झाडांची मोजणी केली.
पण या कामाची पावती अनुभवण्यापूर्वीच १९९१ साली चिक्कय्या यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नव्वदीतल्या थिम्मक्का यांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या एकटीनं हे काम करणं शक्य झालं नाही. त्यामुळे १९९१ सालानंतर वडाचं एकही रोप लावता न आल्याची खंत थिम्मक्कांच्या मनात आहे; पण त्या खचलेल्या नाहीत. या वयातही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. स्वतःच्या मुलांच्या संगोपनाचं कर्तव्य त्या आजही पार पाडताहेत. अर्थात, आता या कार्यात त्यांना राज्यशासनाचीही मदत मिळते आहे. या कार्याबद्दल शाळेची पायरीही न चढलेल्या या विदुषीला ‘वनमित्र’, ‘वृक्षप्रेमी’, ‘वृक्षश्री’, ‘निसर्गरत्न’ अशा अनेक पदव्या मिळाल्या आहेत. १९९५ साली पर्यावरणसंवर्धनासाठी केलेल्या या नि:स्वार्थी कार्यासाठी त्यांना ‘नॅशनल सिटिझन अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला होता. कर्नाटक राज्याच्या प्राथमिक शालेय पुस्तकात त्यांच्याविषयीचा एक धडाही समाविष्ट करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन अमेरिकेतल्या एका पर्यावरण संस्थेने स्वतःच्या संस्थेचं नाव ‘थिम्मक्काज रीसोर्सेस फॉर एन्व्हायर्मेन्टल एज्युकेशन’ असं ठेवलं आहे.
खरं तर, हातावर पोट असणार्या थिम्मक्का आणि चिक्कय्या यांनी लावलेल्या या वडाच्या झाडांच्या लाकडाची किंमत काही दशलक्ष रुपये असेल. याशिवाय झाडांमुळे वातावरणात वाढलेलं ऑक्सिजनचं प्रमाण, कमी झालेली जमिनीची धूप, भूजल पातळीत झालेली वाढ, वाढलेली वृक्षसंख्या हे पर्यावरणाला होणारे सकारात्मक फायदे तर आणखी वेगळे आणि चिरंतन ठरतील असे. त्यामुळे थिम्मक्कांची ही लेकरं अमूल्यच म्हणायला हवीत. या अर्थी विचार केला, तर थिम्मक्कांचा ‘नफा’ कमी, पण ‘मिळकत’ मात्र भरपूर; कोणीही कधीही हिरावून घेऊ शकणार नाही आणि वृक्षांच्या वाढीसोबत वृद्धिंगत होत जाईल अशी.
प्रत्येकाने हे काम करायची गरज असल्याचं सांगताना त्या म्हणतात, “प्रत्येक व्यक्तीनं मानव जातीच्या भल्यासाठी आपल्या पश्चात काहीतरी सोडून जायला हवं.” सोबत “स्वत:मधली पोकळी भरून काढण्यासाठी एखादं झाड तरी लावा आणि त्याचं स्वत:च्या मुलाप्रमाणे पालनपोषण करा”, अशी विनंतीही त्या करतात. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपला हा संदेश सर्वत्र पसरावा, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांनी त्यांचं कार्य केवळ झाडांपुरतंच सीमित ठेवलेलं नाही. इतर सामाजिक कार्यातही त्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या गावात पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी त्यांनी हौद बांधला आहे आणि सध्या एक हॉस्पिटल बांधण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
देशातल्या, बहुधा जगातल्या सर्वांत वृद्ध अशा या निसर्गप्रेमीची आर्थिक परिस्थिती अजूनही बेताचीच आहे. दरमहा मिळणारी तुटपुंजी पेन्शन आणि पारितोषिकांमार्फत मिळणारी रक्कम एवढीच त्यांची आर्थिक आवक. तरीही, त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. कारण भौतिक अभिलाषा नसल्याने त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. जीव असेपर्यंत कष्ट करत राहणं, हेच त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान आणि सारही! उदात्त ध्येयाच्या स्पष्ट जाणिवेतून केलेल्या कामापेक्षाही सहजसोप्या नैसर्गिक प्रेरणेतून जन्माला आलेलं सामान्य माणसाचं हे असामान्यपण म्हणूनच अधिक प्रेरणादायी ठरतं!
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Pashte
Sat , 10 December 2016
truly inspirational !!