अजूनकाही
ट्रोल आहेत, ट्रोलांचे पोशिंदे आहेत आणि दररोजचा दिवस ‘एप्रिल फुल’चा आहे. सगळीकडे ‘विकास’चा गलबला आणि राष्ट्रवादाचा धुव्वा सुरू आहे. सतत खोटे सांगणारा भोंगा दिवसातील चोवीस तास भो भो करत आहे आणि या सगळ्याचा मुकाबला करण्यासाठी, एक माणूस, मात्र एक मशाल घेऊन उभा आहे. ‘पोस्ट ट्रुथ’च्या या युगामध्ये प्रतीक सिन्हा हा तंत्रज्ञ, आपल्या ज्ञानाच्या जोरावर या कराल व्यवस्थेशी एकटा दोन हात करत आहे.
आता खूप छान चालले आहे, अशा एका राष्ट्रीय भ्रमामध्ये लोक जगत आहेत. हा देश, आता एका नव्या फोटोशॉपच्या व्हर्च्युअल युगामध्ये वावरू लागला आहे. या आभासी जगात वावरणाऱ्या प्रत्येकाला गदागदा हलवून जागे करण्याचा प्रतीक सिन्हा यांचा प्रयत्न असून, त्यांना मात्र त्याची किंमत मोजावी लागत आहे.
स्पॅनिश सरहद्दीवरचे छायाचित्र भारतातील म्हणून खपवले जाते, सिंगापूरचा रस्ता भारतातील असल्याचे दाखवले जाते. परदेशातील बसस्थानक राजकोटमधील असल्याचे छातीठोकपणे दाखवण्यात येते. मोदींशी जगातले सगळे नेते आदराने पाहत चर्चा करत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध होते आणि भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो, हे आणि असे बरेच काही चक्क खोटे असते. आणि ते दररोज उघड करण्याचे मोठे काम प्रतीक करत आहे.
प्रतीकने ‘अल्ट न्यूज’ या नावाने एक वेब पोर्टल तयार केले असून, या पोर्टलमुळे भल्याभल्यांच्या पोटात गोळा आला आहे. खोटे छापण्याची, दाखवण्याची सवय लागलेल्या मीडियाने, मोदी शहा यांच्या भक्तांनी, संघाच्या स्वयंसेवकांनी आणि राष्ट्रवादाचा उमाळा असणाऱ्या प्रत्येकाने प्रतीक सिन्हा आणि ‘अल्ट न्यूज’चा धसका घेतला असून, त्यामुळेच प्रतीकला धमक्यांचा सामना करावा लागत आहे.
३६ वर्षे वय असणारा, चारचौघांसारखा दिसणारा, थोडेसे टक्कल असलेला प्रतीक नेहमी जीन्स, टी शर्ट, आणि शर्टमध्ये दिसतो. फेसबुकमुळे अतिशय प्रसिद्ध असला, तरी रस्त्यावरून जाताना तो लगेच ओळखूही येत नाही, की टेकी दिसतात, तसा दिसतही नाही.
......................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
......................................................................................................................................................
गुजरातमधील मानवी अधिकार कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील मुकुल सिन्हा आणि निर्झरी सिन्हा यांचा प्रतीक हा मुलगा. १९९९ ते २००३ या काळात प्रतीकने बंगळूरमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर २००७ पर्यंत बंगळूरमध्येच त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका आयटी कंपनीमध्ये काम केले. २००७ मध्ये ते अमेरिकेत गेले आणि २०१० पर्यंत काम केले. त्यानंतर व्हिएतनाममध्ये काम करून ते २०१३ मध्ये पुन्हा अहमदाबादमध्ये परतले.
इकडे अहमदाबादमध्ये परिस्थितीने वेगळे वळण घेतले होते. २००२ मध्ये दंगली झाल्या होत्या. चार एन्काऊंटर झाले होते. प्रतीकचे वडील ‘जन संघर्ष मंचा’च्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींची तड लावण्याचा प्रयत्न करत होते.
गुजरात दंगलीनंतर मानवी अधिकारांसाठी डॉ. मुकुल सिन्हा न्यायालयात लढत होते. खोटी माहिती पुढे आणत होते. २ जुलै २०१३ मध्ये इशरत जहा एन्काऊंटर केसमध्ये दुसरे आरोपपत्र दाखल झाले, त्याचवेळी प्रतीक भारतामध्ये परतले होते. ते फ्रीलान्स काम करत असतानाच वडिलांना कागदपत्रांमध्ये मदत करत होते.
प्रतीक म्हणाले, “या सगळ्यात मला असे जाणवले, की माझ्या वडिलांकडे खूप माहिती आहे. मला वाटलं की, ती जगासमोर आली पाहिजे. आणि त्यातूनच मी ‘ट्रुथ ऑफ गुजरात’ या नावाची वेबसाईट सुरू केली. त्यावर वडीलच लिहायचे. मी फक्त एडिट करायचो. यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. खूप माहिती जगासमोर आली.”
गुजरातमधील दंगल आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे खरे स्वरूप बाहेर आणण्याचा मुकुल सिन्हा यांनी प्रयत्न केला. पुढे मोदी पंतप्रधान झाले. ऑगस्ट २०१४ मध्ये मुकुल यांचे निधन झाले. ‘जन संघर्ष मंचा’चे काम प्रतीक यांची आई निर्झरी यांनी हातात घेतले.
प्रतीक म्हणतात, “हे सगळे काम करतानाच फोटोशॉपचा प्रताप दिसू लागला होता. मी वडिलांनंतर साईटसाठी लिहायला लागलो होतो. नंतर उना येथील घटना घडली. चार मुलांना मारण्यात आले होते. ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१६ मध्ये आम्ही उना मार्च काढला. जिग्नेश मेवाणी त्यामध्ये सहभागी झाले होते. त्या मार्चचे मी डॉक्युमेंटेशन केले. लोकांमध्ये असलेला संताप सगळा त्यातून बाहेर आला. मुख्य धारेतील मीडियाने या घटनेकडे तेवढे गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र डॉक्युमेंटेशन झाल्यावर त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. पुढे अहमदाबादमध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी ३६ दिवसांचा संप केला. त्याचेही डॉक्युमेंटेशन केले आणि पत्रकार नसतानाही, पत्रकारिता करू लागलो.”
प्रतीक यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये ‘अल्ट न्यूज’चा प्रस्ताव एका मित्राशी बोलताना तयार केला आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याची सुरुवात झाली. त्यांचे दोन मित्र सुरुवातीला त्यांना मागे राहून मदत करत होते. पुढे पसारा वाढला आणि लोकांकडून त्यांनी मदतीचे आवाहन केले.
काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून अनेकांनी भारतीय जनता पक्षाला, मते दिली आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले. भाजपला नकारात्मक मते मोठ्या प्रमाणावर मिळाली होती. पण ती मते, केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी या एकच व्यक्तीला मिळाली आहेत, असा प्रचार सुरू झाला आणि त्यातून पुढे व्यक्तिकेंद्री राजकारण सुरू झाले.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तीमहात्म्य वाढवण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू झाले. ते दिवसाचे १८ ते २२ तास काम करतात. कधी कधी तर ते सलग २४ तास काम करतात, अशा व्हॉटसअॅप पोस्ट सुरू झाल्या. त्यांनी अनेक इमानदार अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरही पुन्हा बोलवून घेतले आणि खूप काम सुरू केले आहे. अशा स्वरूपाच्या पोस्ट आल्या. त्या मागोमाग अहमदाबादमध्ये कसा विकास झाला आहे, राजकोटचे बसस्थानक कसे बदलले आहे, अशा स्वरूपाच्या पोस्ट सुरू झाल्या.
अशा पोस्ट पसरवणारी एक व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटी सुरू झाली आणि त्याला उत्तर देणे गरजेचे वाटू लागले. त्यातून ‘अल्ट न्यूज’ (AltNews.in)ची सुरुवात झाली. ९ फेब्रुवारी २०१७ रोजी, बनावट बातम्यांना उघड करण्यासाठी, सत्य पडताळणी करणारे हे पोर्टल, प्रतीक यांनी सुरू केले.
सध्या भारतात दररोज एक किंवा दोन खोट्या बातम्या पसरवल्या जातात. खोटी गोष्ट खरी असल्यासारखी सांगितली जाते आणि लोक ती खरीच मानून, त्यावर चर्चा करतात. एकमेकांशी तावातावाने भांडतात. अभिमानाने सोशल मीडियावर पोस्ट टाकतात. अभिमान बाळगतात, गर्व झाल्यासारखे उगाचच कॉलर ताठ करून एकमेकांना धमक्या देतात.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
सत्य हे राज्य यंत्रणेचे सर्वांत मोठा शत्रू असते. सध्याची राजवट पाहता हे तर अधिकच खरे आहे, की यांना खरेपणाचेच वावडे आहे! त्यामुळे दररोज एक खोटे अर्थात फेक न्यूज पसरवण्यात येते. ‘खोटे अनेक वेळा खरे म्हणून सांगितले, की लोकांनाच नव्हे, तर शेवटी तुम्हालाही खरे वाटू लागते. प्रपोगंडा करतानाही, असा करायचा, की जे प्रपोगंडा करणाऱ्यांनाही असे वाटले पाहिजे, की ते स्वतःहूनच तसे करत आहेत,’ ज्योसेफ गोबेल्सची ही वाक्ये आज भारतामध्ये तंतोतंत खरी ठरताना दिसतात. खोटी गोष्ट पुन्हा पुन्हा खरी असल्याचे अनेक वेळा सांगितले, की ती खरी वाटू लागते.
यासाठी ‘अल्टन्यूज’ एक अतिशय महत्त्वाची गरज म्हणून पुढे आले. सिन्हा म्हणतात, “ ‘अल्ट न्यूज’, ही वस्तुस्थिती काय आहे, हे सांगणारी वेबसाईट आहे. मुख्य धारेतील माध्यमांमधून आणि सोशल मीडियातून येणारी खोटी माहिती, चुकीची माहिती आणि अपायकारक माहितीशी दररोज लढण्यासाठी ‘अल्ट न्यूज’ची स्थापना करण्यात आली आहे.”
सिन्हा पुढे म्हणाले, “राजकीय पक्षांनी, नेत्यांनी केलेल्या दाव्यांची वस्तुस्थिती पाहणे; सोशल मीडियावर पसरणारी रूमर काय आहे, हे पाहणे आणि त्यातील वस्तुस्थिती पडताळणी करणे; लोकमतावर प्रभाव पडणाऱ्या, मुख्य धारेतील माध्यमांमधून येणाऱ्या चुकीच्या बातम्यांची तपासणी करण्याचे काम ‘अल्ट न्यूज’ करते.”
सिन्हा म्हणाले, की यांशिवाय, जातीवर आधारीत अत्याचार, धार्मिक अत्याचार, कामगारांचे शोषण, शेतकऱ्यांचे प्रश्न, असे मुख्य माध्यमांमधून न येणाऱ्या बातम्या ‘अल्ट न्यूज’तर्फे दिल्या जातात. कधी कधी मुख्य माध्यमांमध्ये मुद्दामहून अपुरी माहिती देण्यात येते. त्यावर ‘अल्टन्यूज’तर्फे प्रकाश टाकला जातो.
‘अल्ट न्यूज’ हे प्रावदा मीडिया फाऊंडेशनतर्फे चालवले जाणारे स्वतंत्र प्रकाशन आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवले जाणारे हे पोर्टल, वाचकांनी दिलेल्या पैशांवर आणि देणग्यांवर चालते. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्याची स्वतंत्र कंपनी म्हणून नोंद करण्यात आली. १० जणांची टीम हे प्रचंड काम अहमदाबादमध्ये बसून करते. कमी लोकांमध्ये हे चालवले जाते, कारण खर्च ही न परवडणारी बाब आहे. बंगळूरच्या ‘आयपीएसएम’ फाउंडेशनतर्फे नुकतीच देणगीही मिळाली आहे.
आज आपण फोटोशॉप युगात जगत आहोत. अचानक फोटोमध्ये कोणतीतरी वेगळीच माणसे दिसू लागतात. ज्या गोष्टी इतिहासामध्ये वाचल्या होत्या, त्या तशा नव्हत्याच, हे आता नव्याने अचानक कळू लागते. बुद्धी तसाच विचार (?) करू लागते. सगळीकडे भ्रम आणि भास होऊ लागतात आणि या सगळ्याच गोष्टी शेवटी खऱ्या वाटू लागतात. यालाच ‘पोस्ट ट्रुथ’ असे म्हटले गेले आहे. प्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑरवेल यांनी ‘१९८४’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीमध्ये या परिस्थितीचा उल्लेख केला आहे.
या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी ‘अल्ट न्यूज’तर्फे वास्तव दाखवणारी आकडेवारी आणि माहिती देण्यात येते. वेगवेगळ्या थिंक टँक आणि सरकारी प्रकाशनांची लिंक देण्यात येते. कोणाचेही अवतरण देताना, त्या व्यक्तीची पूर्ण माहिती, नाव त्याचे पद देण्यात येते. निनावी अवतरण देण्यात येत नाही.
चित्र अथवा छायाचित्रांची पडताळणी करण्यासाठी ‘रिव्हर्स इमेज सर्च’सारख्या इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एखाद्या छायाचित्राची पडताळणी कशी केली आहे, हेही सांगण्यात येते. म्हणजे एखाद्या वाचकाला जर पडताळणी करायची असल्यास तो करू शकेल. इतकी पारदर्शकता त्यामध्ये ठेवण्यात येते.
दररोज येणाऱ्या बातम्या आणि माहिती पडताळून बघणे, हे अतिशय अवघड आणि जिकिरीचे काम आहे. त्यासाठी ‘अल्ट न्यूज’तर्फे सतत सोशल मीडियावर आणि मुख्य धारेतील माध्यमांवर लक्ष ठेवण्यात येते. नेत्यांची, अधिकाऱ्यांची भाषणे, ट्वीट, राजकीय पक्षांनी केलेले दावे, राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया पेजेसवरून करण्यात आलेले दावे, वेगवेगळे हॅश टॅग, खोट्या बातम्या पसरवणारे नेहमीचे स्त्रोत यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यात येते.
फेक न्यूज इतक्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत, की त्यावर लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे ‘अल्ट न्यूज’ने काही गोष्टी ठरवून घेतल्या आहेत. एखादी गोष्ट किती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. किती मोठ्या नेत्यांनी, अथवा महत्त्वाच्या सोशल मीडिया अकाउंटने काही गोष्टी पसरवल्या असल्यास, किंवा नेमके काय पसरवले गेले आहे, की ज्यामुळे हिंसा होऊ शकते, किंवा समाजावर विपरीत परिणाम होत असल्यास, ‘अल्टन्यूज’तर्फे त्याची पडताळणी करण्यात येते.
ज्याची पडताळणी करायची, ते एकदा निवडले, की मग गुगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून एखादे छायाचित्र कुठून आले असावे, याचा शोध घेतला जातो. ‘इनव्हिड’सारखे टूल वापरून, व्हिडिओचे वेगवेगळ्या फ्रेममध्ये वर्गीकरण करून शोध घेतला जातो. तारीख, वेळ यांचा वापर करून पोस्ट कधी आल्या, याचे विश्लेषण केले जाते.
गरज पडल्यास स्थानिक प्रशासन, पोलीस, स्थानिक लोक यांच्याशी संपर्क साधला जातो. त्या त्या विषयातील तज्ज्ञांची मदत घेतली जाते आणि वास्तव काय आहे, हे सांगितले जाते. नवीन गोष्टी पुढे आल्यास, त्या अपडेट केल्या जातात.
सिन्हा यांनी खोट्यानाट्या बातम्या पसरवणाऱ्या स्त्रोतांची यादी तयार केली असून, ही यादी ४० पेक्षा मोठी झाली आहे. अर्थातच त्यामध्ये सध्याच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांची संख्या जास्त आहे.
फेक न्यूज ही गोष्ट आता केवळ भारतातच नव्हे, तर जगभर पसरत असून, तो एक गंभीर विषय झाला आहे. त्यामुळे या गोष्टींशी दोन हात करण्याचे प्रयत्न सगळीकडेच सुरू आहेत. २०१७ मध्ये गुगलच्या न्यूजलॅबने यासाठी एशिया-पॅसिफिक शिखर परिषद आयोजित केली होती आणि त्यामध्ये प्रतीक सिन्हा यांना आमंत्रित करण्यात आले होते.
पुरस्कार मिळाले आणि वाहवाही झाली, पण त्याचबरोबर प्रतीक सिन्हा यांना टीकेचे धनीही व्हायला लागले आहे. ‘अल्ट न्यूज’ सुरू झाल्या झाल्याच मार्चमध्ये सिन्हा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्याची पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली असून, नेहमीप्रमाणे तपास सुरू आहे.
प्रतीक म्हणतात, की ट्वीटरवर द्वेष पसरवणे सुरूच आहे. त्यातून धमक्या दिल्या जातात. काही लोक वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण पाठिंबाही खूप मिळतो.
प्रतीकला ट्वीटरवर ८० हजार फॉलोअर्स आहेत. ‘अल्ट न्यूज’ला ९० हजार फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ‘अल्टन्यूज’ला एक लाख ९ हजार फॉलोअर्स आहेत.
मोदी नेमके कोणाला फॉलो करतात आणि ते समाजामध्ये कसे हिंसा पसरवत असतात, हे ‘अल्ट न्यूज’ने उघड केले. कथुआ बलात्कार प्रकरणामध्ये दैनिक ‘जागरण’ने असा बलात्कार झालाच नसल्याचे प्रसिद्ध केले होते, ते असत्य ‘अल्टन्यूज’ने उघड केले. दैनिक भारत डॉट ओआरजी, ही वेबसाईट उजव्या विचारसरणीच्या एका व्यक्तीकडून चालवली जात असल्याचे ‘अल्टन्यूज’ने बाहेर काढले. बिहारमध्ये निवडणुकीच्या काळात तीन मुलांनी राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचे प्रसिद्ध झाले होते, ते खोटे असल्याचे ‘अल्टन्यूज’ने सिद्ध केले. ‘अल्ट न्यूज’ने सिद्ध केले की, बिहारमध्ये एका हिंदू माणसाला मुस्लीम मारत असल्याचा व्हिडिओ, हा खरा नसून ती एक बांगलादेशातील घटना आहे. बुरखा न घातल्याबद्दल एका मारवाडी मुलीला, मुस्लीम मारत असल्याचा व्हिडिओ हा प्रत्यक्षातील ग्वाटेमालातील आहे. भारतीय गृह मंत्रालयाने स्पॅनिश-मोरक्कन सीमेवरील एक छायाचित्र वापरून, भारतातील फ्लडलाइट्स असल्याचे प्रसिद्ध केले होते, हे एवढे भीषण असत्य ‘अल्टन्यूज’ने उघडे पडले. ‘अल्ट न्यूज’द्वारे असे दररोज अनेक दावे खोडून काढण्यात येतात आणि सत्य उघडकीला आणण्यात येत आहे. अनेक जण उघडे पडत आहेत.
येणाऱ्या जाणाऱ्याला, सत्याचा मार्ग कुठे आहे, हे निरंतरपणे सांगण्याचा प्रयत्न प्रतीक आणि त्यांची टीम करत आहे. पण हे असे कुठपर्यंत चालणार? प्रतीक म्हणतात, “हे एक अतिशय छोटे पाऊल आहे. पण आपल्याला विचार करणारा समाज निर्माण होणे अपेक्षित आहे. काय खरे आणि काय खोटे, हे समजण्याची शक्ती निर्माण होणे, गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये फेक न्यूज कशा ओळखाव्यात, याचे शिक्षण द्यायला हवे. फेक न्यूजचा प्रत्येकाच्या जीवनावर थेट परिणाम होत असल्याने, त्याचा नेहमीच्या शिक्षणामध्येही अंतर्भाव व्हायला हवा. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांकडे मोबाईल फोन असल्याने फेक न्यूजशी लढण्यासाठी प्रत्येकालाच सक्षम बनवणे अपेक्षित आहे. साक्षेपी विचार करणारी पिढी तयार करणे, हेच ध्येय असले पाहिजे.”
.............................................................................................................................................
लेखक नितीन ब्रह्मे यांना मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये काम करण्याचा १५ वर्षांहून अधिक अनुभव असून, माध्यम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.
brahmenitin@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment