अजूनकाही
“ती मला नेहमी बॉलिवुडच्या सिनेमातली हिरो वाटायची... कितीही कठीण प्रसंग ओढवला असला, आत्ता संकटाशी दोन हात करत असली, तरी लवकरच त्यातून ती मार्ग काढेल असं वाटायचं...आणि तसंच व्हायचंही...”
अस्माँ जहांगीर यांची मुलगी मुनीजे जहांगीर अम्मीची आठवण सांगताना भारताचा धागा इतक्या सहजपणे तिच्या भावविश्वासोबत जोडते. अमेरिकेमधल्या एशिया सोसायटीनं अस्माच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
११ फेब्रुवारी २०१८ रोजी, वयाच्या ६६व्या वर्षी ब्रेन हॅमरेजनं अस्मा आपल्या सर्वांना सोडून गेल्या. त्यांच्या निधनानं उठलेली वेदनेची कळ पाकिस्तान आणि भारत इथपर्यंतच मर्यादित राहिली नाही, तर जगभरात अनेक ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर महिन्यात ‘अस्माँ जहांगीर परिषद’ भरवण्यात आली. या परिषदेत सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपासून ते अस्माच्या कुटुंबीयांपर्यंत प्रत्येकानं अस्माँचं काम थांबू न देण्याची शपथ घेतली. पाकिस्तानच्या नकाशावर मानवी हक्कांना जागा मिळवून देण्याचं ऐतिहासिक काम अस्माँनं केलंय...
म्हणूनच २६ ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्रसंघानं २०१८चा मानवी हक्क पुरस्कार अस्माँ यांना जाहीर केला. अस्माँ जहांगीर या केवळ पाकिस्तानमधल्याच नव्हे, तर जागतिक पातळीवरच्या मानवी हक्कांच्या पुरस्कर्त्या होत्या. मानवी हक्कांसाठी भांडायचं, ते हक्क मिळवून द्यायचे, त्याचं संरक्षण करायचं आणि हे हक्क ठिकठिकाणी प्रस्थापित करत राहायचे, अशी प्रचंड मोठी लढाई अस्माँ लढल्या. ‘लोकशाही जिवंत राहण्यासाठी मानवी हक्क टिकलेच पाहिजेत’, अशी त्यांची राजकीय भूमिका होती. ‘मानवी हक्कवाले’ असं म्हणून टीकेची झोड उठवणाऱ्यांसोबत १४० शब्दांमध्ये ट्विटरवर मिश्किलपणे लढायचं कसबही त्यांनी अंगी बाणवलं होतं.
......................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
......................................................................................................................................................
त्यांची एक सहकारी आलिया मलिक हिच्या शब्दांमध्ये सांगायचं, तर ‘पाकिस्तानमध्ये मानवी हक्क रुजवण्यासाठी त्यांनी लीगल एड सेलच्या माध्यमातून आयुष्याचा प्राईम टाईम दिला’. १९८७मध्ये बहीण हिना जलानीसोबत त्यांनी हा सेल स्थापन केला. अल्पसंख्याकांवरचे अत्याचार, महिलांवरचे अत्याचार, महिलाविरोधी कायदे, वेठबिगार मजुरांचा लढा, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणं अशा एक ना असंख्य केसेस लीगल एड सेलच्या माध्यमातून त्यांनी लढवल्या; आंदोलनं केली. यामुळे पाकिस्तानमध्ये १७ नवे कायदे झाले. उदाहरणार्थ, वेठबिगारी निर्मूलन कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक हिंसेविरोधातला कायदा, बलात्कारविरोधी कायदा, धर्मनिंदेविरोधातल्या कायद्याच्या जाचक तरतुदी रद्द होणं, निवडणूक विधेयक २०११ हे त्यांपैकी काही लक्षवेधी कायदे अस्माँ यांच्या लढ्यामुळे होऊ शकले. त्यांच्या उमेदीच्या काळातल्या कर्तृत्वाची १९९५ सालीच मॅगसेसे पुरस्कारानं दखल घेतली. त्यानंतर २०१४मध्ये राईट लाईव्हलीहूड पुरस्कारानं त्यांच्या निर्भीड कामाचा गौरव करण्यात आला. अस्माँ यांना अशा अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याची यादी खूप मोठी आहे.
अस्माँ यांनी लढवलेल्या पाकिस्तानमधल्या एकेका माईलस्टोन केसेसबद्दल आजपर्यंत खूप लिहून आलेलं आहे. अल्लाहची निंदा केल्याबद्दल एका ख्रिश्चन मुलावर खटला टाकण्यात आला होता. त्याची केस अस्माँ यांनी घेतली आणि त्याला न्याय मिळवून दिला, म्हणून त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या आणि त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये प्रचंड घोषणाबाजी झाली होती. पाकिस्तानमध्ये त्यांना राष्ट्रद्रोही मानलं जात होतं, पण या घटना म्हणजे, तीव्र ध्रुवीकरण झालेल्या सध्याच्या राजकीय वातावरणातल्या त्यांच्या कामाची पावतीच ठरतात!
झिया उल हकच्या हुकूमशाहीविरोधात आणि लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी महिलांचा पहिला मोर्चा पाकिस्तानमध्ये काढला, तो अस्माँ यांनी. लाहोरमध्ये परवेझ मुशरर्फ यांच्या कारकिर्दीत महिलांना मॅरेथॉनमध्ये सहभागी होता यावं यासाठी महिलांचा मोर्चा घेऊन अस्माँ रस्त्यावर उतरल्या. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यांना खेचत पोलीस स्टेशनला नेलं. पत्रकार म्हणून बातमी कव्हर करायला आलेली त्यांची मुलगी अम्मीला वाचवण्यासाठी तेव्हा काहीच करू शकली नाही. काळजीनं ती पोलीस स्टेशनला पोचली, तेव्हा पोलिसांच्या मारहाणीत मागच्या बाजूनं फाटलेल्या शर्टला सेफ्टी पीन लावून माध्यमांना हुकूमशाहीविरोधात प्रतिक्रिया देत असलेल्या अस्माँ आणि बाजूला निमूटपणे उभे असलेले पोलीस, असं चित्र मुनीजे आजही हसत सांगते.
झिया उल हक यांनी पहिल्यांदाच अस्माँ यांची तुरुंगात रवानगी केली. ‘तुरुंगवासातून परत आल्यानंतर तुरुंगातल्या दिवसांबद्दलचा कडवडपणा अम्मीच्या मनात घर करून राहिला असेल’, असं तिच्या मुलांना वाटत होतं, पण अत्यंत अनपेक्षित प्रतिसाद देऊन धक्का देणाऱ्या अस्माँ यांनी या बाबतीत तर तुरुंग अधिकाऱ्यांनाही सोडलं नव्हतं. त्याचं असं झालं की, ज्या रात्री झिया उल हक यांच्या पोलिसांनी अस्माँ आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांना अटक केली, त्या संपूर्ण रात्रभर त्यांनी तुरुंगात मोठमोठ्यानं लोकशाही-स्वातंत्र्यांची गाणी गायली. तुरुंगात दुमदुमणाऱ्या त्या बुलंद आवाजानं तुरुंग अधीक्षकही घाबरून रात्रभर जागा होता. हा सिलसिला चालूच राहिला. त्यामुळे अस्माँ जेव्हा जामिनावर सुटल्या, तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला!
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
धर्माच्या नावाखाली होणाऱ्या मानवी अधिकारांच्या उल्लंघनाला अस्माँ सातत्यानं आव्हान देत. केवळ न्यायालयातच नव्हे, तर रस्त्यावर उतरून आंदोलनं करत. त्यामुळे अस्माँ यांना ‘धर्मद्रोही’ ठरवून ‘गुन्हेगार’ ठरवणाऱ्या बातम्या एक प्रमुख वृत्तपत्रानं छापल्या. त्यामुळे अस्माँ यांच्यावरच्या कारवाईची मागणी जोर धरायला लागली. ज्या वेळी अस्माँ यांच्या कुटुंबीयांविरोधात राजकीय वातावरण तापवण्यात आलं, तेव्हा अस्माँ यांनी आपल्या मुलांना कारमध्ये बसवलं; मुलांचा सांभाळ करणाऱ्या मदतनीस महिलेलाही सोबत घेतलं आणि थेट त्या संपादकाचं घर गाठलं. मुलांना त्याच्या घरी सोडून अस्माँ यांनी निरोप दिला की, ‘माझ्याविरोधात तुम्ही प्रसिद्ध केलेली एकतर्फी बातमी माझा जीव धोक्यात घालायला कारणीभूत आहे. तेव्हा माझ्या पश्चात माझ्या मुलांचा सांभाळ तुम्हीच करा’. असं सांगून अस्माँ तिथून निघून गेल्या. अस्माँ यांच्यावर संपादकानं केलेला अन्याय समजून घेऊन वृत्तपत्रामध्ये त्यांची बाजू मांडायची संधी देण्याची सूचना या संपादकाच्या पत्नीनेच नवऱ्याला केली आणि अशा तऱ्हेनं वातावरण निवळलं. अस्माँ कुठल्या व्यक्तींकरता नव्हे, तर मूल्यांकरता मैदानात उतरत...
अस्माँ यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी वकील आहे. लीगल एड सेलमध्ये ६४ कर्मचारी काम करतात. त्यांपैकी १७ वकील आहेत. काही जण गेल्या ३० वर्षांपासून अस्माँ यांच्यासोबत काम करत आहेत. अस्माँ यांचा अकाली झालेला मृत्यू हा सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारा आहे. त्यांची एक मैत्रीण सांगते, ‘अस्माँ एक कर्तव्यदक्ष वकीलच नव्हती, तर तितकाच जीव लावून तिनं कुटुंबकबिला वाढवला; मुलांवर प्रेम केलं. वकील म्हणून तिच्यातला कठोरपणा जेवढ्या सहजपणे दिसायचा, तेवढ्याच सहजपणे घरी आल्यावर ती मृदू मनाची अम्मी बनून जायची... मुलीच्या लग्नाला नटून-थटून पाहुण्यांचं स्वागत करणारी हीच अम्मी मुलीचं लग्न लागलेल्या रात्री वकील बनून इस्लामाबादला जायला निघाली, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी एका महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी होणार होती. अस्माँची ही सगळी रूपं असंख्य तरुण मुलींना शिकायची, लढायची, निडरपणे कर्तव्य बजावण्याची प्रेरणा देतात’.
अस्माँ यांची भारतातली मैत्रीण, प्रसिद्ध कार्यकर्त्या कमला भसीन यांनी अस्माँ यांना दिल्लीत दिल्या गेलेल्या आदरांजली दरम्यान त्यांचा एक अफलातून किस्सा शेअर केला – ‘इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान होते, तेव्हा साऊथ एशियन फोरम फॉर ह्यूमन राईट्स सेहरची बैठल ढाका इथं होती. कमला भसीन, अस्माँ असे सगळे जण बैठकीनंतर बोलत होते. एवढ्यात ईर्षाद हे बांग्लादेशचे हुकूमशहा गुजराल यांची भेट घेण्यासाठी तिथं पोचले. गुजराल यांनी अस्माँ यांची ओळख करून दिली, तेव्हा गुजराल यांच्याकडे बघत अस्माँ म्हणाली, ‘गुजरालजी, मैं डिक्टेटर्स से शेक हँड नहीं करती’...’ आचार-विचार आणि काम यांच्यातून अस्माँ यांनी एवढी नैतिक ताकद कमावलेली होती की, मृत्यूनंतरही ‘अस्माँ’ नावाची शक्ती जागतिक मानवी अधिकार क्षेत्रावर प्रभाव टाकत राहील.
कारगील युद्धानंतर निघालेल्या पीस बसचं स्वागत करण्यासाठी पाकिस्तानमध्ये तरुण महिलांना घेऊन अस्माँ हजर होत्या. निळ्या बांगड्या आणि स्कार्फ देऊन त्यांनी महिलांचं स्वागत केलं. फाळणीच्या वेळी बांगड्यांचे बॉक्स पाठवून दंगल भडकण्याच्या पाश्वर्भूमीवर अस्माँ यांनी बांगड्यांना पुन्हा मिळवून दिलेली प्रतिष्ठा वाखाणण्याजोगी असल्याची आठवण रमी छाब्रा या भारतीय पत्रकार करून देतात.
अस्माँ यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये ‘लाऊड सायलेन्स’ पसरल्याची जाणीव अनेकांना झाली. ती शांतता भंग करण्यासाठीच मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. ‘पाकिस्तानमध्ये यंदा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दर्जेदार मुद्दे चर्चेत आले नाहीत. अस्माँ हयात असत्या, तर हे चित्र पालटलं असतं...’, असं आजही म्हटलं जातं. मानवी हक्कांची लढाई लढताना राजकीय गृहपाठ पक्का करून मैदानात उतरणं, हे अस्माँ यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य! मग बलुचिस्तानची केस असो किंवा पख्तुनी विद्यार्थ्यांची... त्या कधीच डगमगल्या नाहीत.
पाकिस्तानमधली अस्माँ यांची मैत्रीण बीना सरवार म्हणतात, ‘नवनवीन केसेसमुळे आणि कामांमुळे ती खूप मोठी जोखीम उचलत होती, पण कधीच भावुक किंवा प्रतिक्रियावादी न होता ती हे सर्व करत होती’. अस्माँ यांच्या जिवाला कायमच धोका होता. त्यांच्या कुटुंबीयांनाही सतत भीतीच्या छायेखाली राहावं लागलं. या दहशतीचा परिणाम असा झाला की, अस्माँ यांना आणि त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या मुलांनाही मानवी हक्कांसाठी लढायला दहा हत्तींचं बळ मिळालं! पाकिस्तान सरकारचा तरुण विरोधक बिलावल भुट्टो म्हणतो, ‘No case was too small for her and no fight was too big for अस्माँ...’
अस्माँ स्वतः म्हणायच्या, ‘Justice is a rare commodity in our country and fighting for Human Rights is not a job, it’s a conviction….’ खरंच, एक अनोखी दास्ताँ होती अस्माँ जहांगीर!
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकाऱ्यांना एक क्षण, एक लम्हा सारं काही संपल्यासारखं वाटलं होतं, पण ते सगळे जण अस्माँ यांचा वारसा पुढे नेणं हे आपलं कर्तव्य मानतात. ‘अस्माँचा आवाज मरू देता नये’, हीच तिच्यासाठी आदरांजली असल्याचं ते मानतात. ‘हर बच्ची की आँखों मे जो चमक है, वोह अस्माँ जहांगीर है. हर काले कोट मे अस्माँ जहांगीर जिंदा है...’, असं आलिया मलिक सांगते, ते उगाच नव्हे!
............................................................................................................................................
लेखिका अलका धुपकर या सकाळ मीडिया ग्रुपच्या ‘SYMPLE TIMES’च्या संपादक आहेत.
alaka.dhupkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment