हार्दिक, जिग्नेश, कन्हय्या, चंद्रशेखर : सत्तेविरोधातल्या नव्या हाका!
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
राजा कांदळकर
  • चंद्रशेखर, जिग्नेश, कन्हय्या आणि हार्दिक
  • Tue , 30 October 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची हार्दिक पटेल Hardik Patel कन्हय्या कुमार Kanhaiya Kumar जिग्नेश मेवानी Jignesh Mevani चंद्रशेखर आझाद Chandrashekhar Azad

२०१४ हे साल भारताच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरलं. देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मोदी लाटेनं जुनं डॉ. मनमोहनसिंग यांचं सरकार उलथवून टाकलं. नवं नरेंद्र मोदी यांचं सरकार पाशवी बहुमतानं सत्तेवर आलं. हे सरकार सत्तेवर आलं, तेव्हा असं बोलंलं जाऊ लागलं की, आता पुढची काही वर्षं विरोधी पक्ष पंगू बनतील. मोदींची लोकप्रियता एवढी आहे की, त्यांच्याविषयी काही बोललं तर लोक ऐकून घेणार नाहीत. मुळात मोदी हे नवे देव बनलेत. त्यांनी पूर्ण देश कब्जात घेतला आहे. आता त्यांच्या विरोधात असणार्‍यांची विश्वासार्हता संपली आहे. त्यांच्या एकछत्री अमल सुरू झालाय वगैरे.

मोदीचं पहिलं वर्षं अफाट कौतुक, नवलाईचं गेलं खरं. पण त्यानंतर विरोधाचे आवाज ऐकू येऊ लागले. मोदी विरोधाचा पहिला मोठा आवाज घुमला त्यांच्याच गुजरातमध्ये. हार्दिक पटेल या पोराच्या रूपानं. गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं ‘आम्हाला ओबीसी आरक्षण द्या’ ही मागणी घेऊन आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाच्या वणव्यात हार्दिक पटेल या पोरसवदा नव्या नेत्याचा जन्म झाला. गुजरातमध्ये सत्तेच्या विरोधातली नवी हाक दिल्लीत पोहचत नव्हती, तोच दिल्लीतही दुसरी हाक जेएनयूमध्ये घुमली. ती कन्हय्या कुमारच्या रूपानं. जेएनयूमध्येच कन्हय्याच्या हाकेसोबत शहला रशीद आणि उमर खालीद हे नवे नेतेही सत्तेविरोधात बोलू लागले.          

हैद्राबाद विद्यापीठात रोहिथ वेमुल्लाची हाक दाबण्याचा प्रयत्न सरकारनं केला, पण रोहिथच्या आत्महत्येनं देश सुन्न झाला होता. विशेषतः कॉलेज आणि विद्यापीठांचे परिसर हादरून गेले होते. आपल्या एकछत्री अमलाला आव्हान कुणी देईल याची मोदींना जराशीही कल्पना नसताना हैद्राबादेतून बसलेला हादरा जबर मोठा होता.

क्रांती आपल्या पिल्लांना खाते म्हणतात. आणि सत्ता दडपादडपी करण्याच्या उचापतीस स्वतःच्या बुडाखाली सुरुंग पेरत जाते. हैद्राबादेत रोहितचा बळी घेऊन मोदी सत्तेनं स्वतःच्या खुर्चीखाली पहिला सुरुंग पेरला. रोहिथ वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशात सत्तेविरोधी विद्यार्थी उभे राहिले. त्या चळवळीत जेएनयूचे विद्यार्थी अग्रेसर होते.

या नव्या हाका सत्तेला ललकारत असताना देशात राजकीय वातावरण कसं होतं? काँग्रेस हा देशातला सर्वांत जुना, प्रमुख विरोधी पक्ष गलितगात्र झाला होता. राहुल गांधी हा माणूस ‘पप्पू’ आहे. तो काँग्रेसला वाचवू शकत नाही. उलट आणखी जाळात घालील, बुडवील, अशी चर्चा सुरू होती. सोनिया गांधी थकल्या आहेत. आता काँग्रेसचं काही खरं नाही. भाजप हाच पक्ष आता जो काही आहे ते आहे. देश भाजपनं पूर्ण कब्जात घेतलाय. अमित शहा हे खूप बलवान गृहस्थ आहेत. ते कर्तबगारही आहेत, असा बोलबाला झाला. कारण त्यांनी भाजपला जगातला सर्वांत मोठा सत्ताधीश पक्ष बनवलाय. ते आता जगज्जेते आहेत, अशा थाटात सारं काही सुरू होतं. इतर विरोधी पक्ष भाजपच्या यशानं बिचकले होते, कोशात गेले होते. आपण या मोदी लाटेत वाहून तर जाणार नाही ना, अशी धडकी त्यांच्या मनात भरलेली होती. त्यामुळे सारे निस्तेज होते.

संपूर्ण देशात भाजपचा वरचष्मा, रा.स्व.संघाची सरकारवर पकड, नोकरशाही, न्यायालयं, संसद, मंत्रीमंडळ, सीबीआय, परराष्ट्र धोरण असा सगळीकडे मोदीचा बेफाम बोलबाला असताना या सत्तेनं जी दडपशाही सुरू केली त्या दडपशाहीनेच तिच्या विरोधात नवे नेते उभे केले. देशात आता फॅसिझम, अघोषित आणीबाणी आली आहे, असं सगळेजण म्हणत असताना हा विरोधी आवाज संघटित होत होता. त्याला जनतेचं बळ मिळतं होतं.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://tinyurl.com/yajwg4nj

.............................................................................................................................................

मोदींच्या एकछत्री अमलाला सर्वांत मोठा तडाखा बसला तो हार्दिक पटेलच्या उदयानं. हा पोरगा अगदी मध्यमवर्गीय पाटीदार (पटेल) कुटुंबात वाढला. शाळा-कॉलेजात फार हुशार विद्यार्थीही नव्हता तो. एक बेतासबात विद्यार्थी होता. बी.कॉम होण्यासाठी त्याला दोन वर्षं लागली. पण कॉलेजबाहेर तो विद्यार्थ्यांचा नेता म्हणून घडत होता. गुजरातमधलं विरगाम हे त्याचं गाव. अहमदाबादजवळ आहे. अहमदाबादच्या सहजानंद कॉलेजात बी.कॉमला असताना सरदार पटेल ग्रूपमध्ये सामील झाला. हा गट पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सक्रिय होता. हार्दिक या गटात सामिल झाला, तेव्हा अहमदाबाद परिसरातले जवळपास ५० हजार तरुण या गटात सक्रिय होते. सगळे रोजगाराच्या चिंतेत होते. आरक्षण नाही, नोकरीसाठी सरकार दरबारी पैसा मागितला जातो, म्हणून आपल्याला नोकरण्या नाहीत, या चिडीनं हा गट कार्यरत होता.

पाटीदार समाज एका कात्रीत सापडला होता. शहरीकरण आणि खाजगी, सरकारी विकास योजनांत त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात होत्या. त्या बदल्यात मोबदला अल्प मिळत होता. गुजरातच्या भल्यासाठी त्याग करावाच लागेल अशी सक्ती होती. त्या सक्तीनं तो वाकला होता. पाटीदार (पटेल) समाजातले पारंपरिक उद्योजक मेटाकुटीला आले होते. ऑनलाईन रिटेलर्सच्या नव्या स्पर्धेत ते मागे पडत होते. उत्पन्न घटत होत त्यांचं. मंदीचा तडाखा बसत होता. हिरे व्यापारावर या पटेल समाजाचं वर्चस्व होतं, पण या व्यवसायात मंदीचा मार बसत होता. छोटे हिरे व्यापारी संपत चालले होते. जवळपास २० हजार छोटे व्यापारी आपली दुकानं बंद करते झाले होते. या दुकारात काम करणारे लाखो कामगार आपापल्या गावात परतले होते. या कामगारांत पाटीदार समाजाची  संख्या मोठी होती. या कामगारांच्या डोक्यात राग होता. पोटात भुकेची आग होती. या परिस्थितीनं पाटीदार अनामत आंदोलन समिती जन्माला आली. ही समिती म्हणजे सारा पोरांचा कारभार होता. भाषा भडक होती. मोदी-शहा यांचा निषेध होता या पोरांत. हिंसाचार करण्याची रग होती.

२०१५ सालं गुजरात पेटवणारं ठरलं. जुलै महिन्यात सारा गुजरात ढवळून निघाला. शेकडो गावं, शहर पाटीदार आंदोलनानं व्यापली. शेकडो सभा, मोर्चे, आंदोलनं, हिंसाचार अशा मालिकेत गुजरात होरपळला. कर्फ्यू, दडपशाही, मारझोड, आंदोलकांची तुरुंगवारी, धरपकड अशा सत्रांनी आंदोलन घराघरात पोचलं. काही तरुण आंदोलकांचा बळी गेला.

या आंदोलनाचं नेतृत्व हार्दिक करत होता. दाढी वाढवलेला. नुकतीच विशी ओलांडलेला हा पोरगा भाषण जोशात करी. त्याच्यात धाडस होतं. मोदी-शहा यांच्या अनिर्बंध सत्तेला त्यानं घाम फोडला. पुढे गुजरात विधान सभा निवडणुकांत त्यानं काँग्रेससोबत भाजपला लोळवायचा विडा उचलला. पण कडाकाठावर भाजपचे आमदार निवडून आले आणि कशीबशी मोदी-शहा यांची अब्रू वाचली. पण गुजरातमधून मोदी-शहांचा दरारा या पोरानं संपवला.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yaj8ppqa

.............................................................................................................................................

गुजरातमध्ये मोदी-शहांच्या सत्तेला दुसरा हादरा दिला तो जिग्नेश मेवानीनं. उना गावात मेलेल्या गायीची कातडी काढून तिच्यावर चर्मोद्योग करणार्‍या कामगारांवर सवर्णांनी हल्ले केले आणि तिथं दलित-सवर्ण वाद पेटला. या वादाला जिग्नेशनं आंदोलनाचं रूप दिलं. त्यातून दलित समान जागा झाला. जिग्नेश मूळचा वकील. मानवी हक्क कार्यकर्ता. पस्तिशीतला. मेहसाणा जिल्ह्यात मेऊ हे त्याच्या कुटुंबाचं मूळ गाव. पण जिग्नेशचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. त्यानं इंग्रजी साहित्यात बी.ए. केलं. पत्रकारितेचा कोर्सही केला. नंतर डी.टी. लॉ कॉलेजातून (अहमदाबाद) एलएलबी झाला. उना घटनेनंतर त्यानं ‘दलित अस्मिता यात्रा’ काढली. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या यात्रेत २० हजार दलित कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांनी मेलेल्या जनावरांची कातडी काढणार नाही, असा सत्याग्रह सुरू केला. आणि या सत्याग्रहानं देशाचं लक्ष वेधलं गेलं.

या घटनेनंतर जिग्नेश देशभरातल्या दलित तरुणांचा आयकॉन बनला. त्याला दलित तरुण रोहिथ वेमुलाच्या रूपात बघू लागले. गुजरातमध्ये दलितांत अशी जागृती कधी झाली नव्हती. गुजरात २०१७च्या विधानसभा निवडणुकांत पाटीदार समाजाबरोबर दलितांनीही मोदी-शहा यांच्या भाजप विरोधात दंड थोपटले. या विधानसभा निवडणुकांत जिग्नेशनं वडगाम येथून निवडणूक लढवली. आणि तो आमदार झाला. चळवळीतून पुढे आलेला हा ३५ वर्षांचा नेता गुजरात विधानसभेत पोचला. जिग्नेशनं महाराष्ट्र आणि इतर राज्यांत दलित हक्कासाठी काम करणार्‍या गटांसोबत जेाडून घेतलंय. जेएनयूच्या कन्हय्याकुमार आणि इतर विद्यार्थी चळवळीशी तो संवाद ठेवतो.

हार्दिक, जिग्नेश यांनी गुजरातेत मोदी-शहांच्या सत्तेला धक्के दिले. पण दिल्ली या केंद्रात कन्हय्या कुमारनं जे आव्हान उभं केलं, ते यापेक्षा व्यापक होतं. कन्हय्या जेएनयू या विद्यार्थी. तो तिथल्या विद्यार्थी युनियनचा नेता. त्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ऑन इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचा सदस्य. विचारानं पक्का कम्युनिस्ट. ऑफ्रिकन स्टडीज या विद्याशाखेत त्यानं पीएच.डी. केली आहे. जेएनयूमध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. जेलमध्ये टाकलं. आणि तो चर्चेत आला. त्याच्यावरचे आरोप खोटे होते हे त्यानं न्यायालयात सांगून जामीन मिळवला. पण या घटनेनं त्याला देशाच्या विद्यार्थी चळवळीच्या केंद्रस्थानी आणलं.

कन्हय्या मूळ बिहारचा. बेगुसराय जिल्ह्यातल्या बरुणीचा. अंगणवाडी शिक्षिकेचा मुलगा. शेतकरी कुटुंबातला. भूमिहार या सवर्ण शेतकरी जातीतला. वडिलांना लकवा झालेला आणि आईच्या तुटपुंज्या पैशातून घर चालत असलेल्या या तशा गरीब कुटुंबातला. कन्हय्याचं वैशिष्ट्य असं की, तो उत्तम वक्ता आहे. त्याची युक्तिवाद मांडणी प्रभावी असते. त्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. मार्क्सवादाचा वैचारिक पाया आणि विश्लेषणाची उत्तम कला अंगी असलेला हा नेता भविष्यात कम्युनिस्ट चळवळीचं देशव्यापी नेतृत्व करू शकेल एवढ्या ताकदीचा दिसतो. त्याची देश, समाज, राजकारण, संस्कृतीबद्दल मतं थक्क करणारी आहे.

कम्युनिस्ट असला तरी तो पोथीनिस्ट नाही. गांधी-आंबेडकराच्या विचारांवर त्याची भिस्त दिसते. तिशीत असलेल्या या नेत्याला ऐकायला देशाच्या सर्व भागांत तरुण जमतात! रा.स्व.संघ आणि भाजपच्या सत्तेचा काळा चेहरा तो जनतेला समजावून सांगत फिरतोय.

जेएनयूच्या ज्या विद्यार्थी नेत्यांनी दडपशाहीविरुद्ध एल्गार पुकारला त्यात कन्हय्याबरोबर शहला रशीद शोरा ही विद्यार्थfनी पुढे होती. जेएनयूमध्ये ती विद्यार्थी युनियनची उपाध्यक्ष होती. कन्हय्यावर देशद्रोहाचा खटला झाला. त्याला अटक झाली. त्याची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी जे आंदोलन जेएनयू आणि दिल्लीत पेटलं त्याचं नेतृत्व शेहलानं केलं. शेहला ही मूळची काश्मीरमधील श्रीनगरची. श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ती कम्प्युटर इंजिनिअर झाली. काही दिवस नोकरी करून ती जेएनयूमध्ये पीएच.डी. करायला आली. सामाजिक शास्त्रात ती पीएच.डी. करतेय. ही काश्मिरी मुलगी हिंसक वातावरणात वाढली. म्हणून ती शांततेचं महत्त्व पटवून देते. स्त्रियांचे हक्क, मानवी अधिकार हे तिच्या आस्थेचे विषय आहेत. काश्मीरनं मुळात तिला देश, समाजाकडे बघायची व्यापक दृष्टी दिली, असं ती सांगते.

शहला संविधानाच्या विचारांवर निष्ठा दर्शवते. देशात मानवी हक्क चळवळीत काम करत राहण्याचा, स्त्रियांच्या हक्कासाठी आवाज उठवत राहण्याचा तिचा निर्धार आहे. देशात पुढच्या काळात मानवी हक्क चळवळीला शहलाच्या रूपानं एक धाडसी, बुद्धिमान प्रवक्ती, कार्यकर्ती मिळाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

जेएनयूच्या विद्यार्थी नेत्यांत उमर खालीदचं नावही नेहमी चर्चेत असतं. २०१६च्या देशद्रोह आरोपात त्याचं नाव आलं. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला. काही काळ तो फरार होता. नंतर त्याला जामीन मिळाला. दिल्लीतल्या किरोडीमल कॉलेजात तो बी.ए. झालाय. जेएनयूत पीएच.डी. करत असताना भगतसिंग-आंबेडकर स्टुडंट ऑगनायझेशनमध्ये तो सामिल झाला. तो माओवादी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मी नास्तिक आहे, असं तो सांगतो. उमरचं कुटुंब मूळचं महाराष्ट्रातलं, अमरावतीचं. ३५ वर्षांपूर्वी खालीद कुटुंब दिल्लीत गेलं. तिथं जामियानगर विभागात स्थायिक झालं.

जिग्नेश आणि उमर यांची पुण्यातल्या शनिवारवाड्यावरची एल्गार परिषदेतील भाषणंही गाजली होती. या परिषदेनंतर दुसर्‍या दिवशी भीमा कोरेगाव हल्ला झाला. त्यानंतर त्यांची भाषणं आणि हा हल्ला देशभर चर्चेचा विषय झाला होता. उमर स्वतः सांगतो की, मी वैर, द्वेष या प्रवृत्तीच्या विरोधी लढणारा कार्यकर्ता आहे, आयुष्यभर हा लढा मी लढत राहीन.

हार्दिक, जिग्नेश, कन्हय्या, शहला, उमर या सत्तेविरोधातल्या हाका आहेत. यांच्या रांगेतली पुढची हाक उत्तर प्रदेशातल्या चंद्रशेखर आझाद उर्फ रावण या तरुण नेत्याची आहे. तो भीम आर्मी या संघटनेचा नेता आहे. त्याचं नाव सहारणपूर हिंसाचारानंतर पुढे आलं. मे २०१७ मध्ये सहारणपूरमध्ये दलित आणि राजपूत-ठाकूर यांच्यामध्ये संघर्ष उफाळला. आंबेडकर जयंती आणि महाराणा प्रताप गौरव सोहळा दरम्यानच्या कुरबुरीतून हा हिंसाचार पेटला. त्यात २५ दलितांची घरं जाळण्यात आली. या हिंसाचारात १ दलित आणि १ राजपूत समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. १६ जण जखमी झाले. राजपूत-ठाकूर यांच्या दादागिरीविरुद्ध भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत जंतरमंतरवर धरणं धरली. त्यात जवळपास दोन हजार लोक सहभागी झाले. या घटनेनंतर चंद्रशेखर आणि त्याचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर चंद्रशेखरला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये अटकही झाली होती. अलीकडे त्याची सुटका करण्यात आली. ‘हिंदू धर्म आम्हाला न्याय देऊ शकत नाही, म्हणून आम्ही बौद्ध होऊ. मोदी-शहा आणि भाजप-रा.स्व.संघ मनुवादी आहेत. आम्हाला संविधान हवंय, त्यासाठी मनुवाद्यांविरुद्ध कुठलीही किंमत देऊन आम्ही लढू,’ असा या भीम आर्मीचा अजेंडा आहे. उत्तर प्रदेशातला दलित तरुण चंद्रशेखरच्या मागे आशेनं उभा आहे. ‘जय भीम, जय संविधान’ ही त्यांची घोषणा आहे.

हार्दिक ते चंद्रशेखर... अघोषित आणीबाणी विरोधातल्या नव्या हाका... त्या रा.स्व.संघ, भाजप यांच्या सत्तेला प्रश्न विचारत विद्यार्थी तरुणांना, लोकांना जागं करताना दिसताहेत. हे नवे नेते आहेत. त्याच्या कार्यशैलीच्या तर्‍हा निरनिराळ्या आहेत. त्यातल्या काही नेत्यांचा अजेंडा, बलस्थान अजून अस्पष्ट आहे. हे सगळे पस्तीशीच्या आतले तरुण.

समाजकारण-राजकारण ही खूप ठिसूळ प्रक्रिया असते. इथं दररोज बदल घडत असतात. त्यामुळे या नव्या नेत्यांविषयी काही निष्कर्ष काढणं घाईचं होईल. पण एक नक्की म्हणता येईल की, २०१४ नंतर आलेल्या मोदी पर्वाच्या फुग्याला या नव्या नेत्यांनी काही टाचण्या टोचण्याचं काम केलं. सत्तेला टोकदार प्रश्न विचारलेत. सत्तेला  प्राणपणाने विरोध केलाय. त्यातून निस्तेज झालेल्या राजकीय पक्षांना उभारी आली. काँग्रेस पक्षाला लढायला व बळ मिळताना दिसतंय. इतर प्रादेशिक पक्षांना आत्मविश्वास आलाय. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं हे चांगली चिन्ह आहे, असं म्हणता येईल. मोदी-शहा यांना विरोध केला तरी आता लोक ऐकणार नाहीत, हा मोदी समर्थकांचा दृढ विश्वास होता. या नव्या नेत्यांनी त्याल गेल्या साडेचार वर्षांत तडा दिला. आता तर मोदी-शहा यांचेही पाय मातीचेच आहेत, त्यांनाही उद्या जनता विरोधात गेली तर सिंहासन सोडावं लागेल असा विश्वास जनतेत बळावत चाललाय. हे घडवण्यात हे नवे नेते, त्यांच्या नव्या हाकांचा सिंहाचा वाटा आहे.

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ADITYA KORDE

Sat , 03 November 2018

खूप नेटकी प्रतिक्रिया गामा पैलवान ह्यांची , आम्हाला लिहायला काही ठेवलेच नाही ,


Gamma Pailvan

Fri , 02 November 2018

जवाहर नेहरू विद्यापीठात असतांना कन्हैय्यास एका मुलीसमोर लघवी केल्यावरून तीनहजार रुपये दंड झाला होता. उमर खालिद कशासाठी फरार होता बरं? शेह्ला रशीद शोरा ने रास्व संघ व नितीन गडकरी मिळून मोदींना ठार मारायचा कट करताहेत असा लेखी आरोप केला होता. त्यानिमित तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल आहे. जिग्नेश मेवाणी ने पुण्यात भाषण केल्यावर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली. हे महत्त्वाचे मुद्दे निसटलेले दिसतात. बाकी, शीतल साठे व सचिन माळी ही नावं ऐकलीत का कुणी? दोघेही अटकेत पडलेत. त्यांना कोण विचारतो. वापर झाल्यावर नखं कुरतडून फेकून देतात. अशी ही उकीरड्यावर फेकली गेलेली नखं आहेत. उदोउदो भलत्यांचाच होतो. अतीव सुंदर. दिल खूष हुवा हमरा. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख