अजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती झाली, तेव्हा त्यांचे नावही अनेकांना ठाऊक नव्हते. त्यांना ते माहीत असण्याचे कारणही नव्हते. त्यांना हेही माहीत असण्याचे कारण नव्हते, की १९६८ मध्ये अजित डोभाल यांनी पोलिस दलात प्रवेश केला होता. ते केरळ केडरचे आयपीएस अधिकारी होते. किंवा त्यांना याचीही कल्पना असण्याचे कारण नव्हते, की १९७२ मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)मध्ये दाखल झाले आणि सुमारे ३३ वर्षांच्या सेवेनंतर आयबीचे संचालक म्हणून निवृत्त झाले.
आयबीमध्ये असतानाच डोभाल यांचा कल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बाजूने होता. निवृत्तीनंतर चार वर्षांनी, डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी दिल्लीतल्या चाणक्यपुरीत विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनची स्थापना केली. ही संस्था म्हणजे एक विचारमंच. थिंक टँक. तो स्वतंत्र आणि नि:पक्षपाती आणि राष्ट्रवादी विचारांचा असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात येते. त्यांचा हा राष्ट्रवाद म्हणजे हिंदू राष्ट्रवाद. आता अशा समस्त थिंक टँक नामक व्यवस्थेचे काम चालते, ते अत्युच्च वर्तुळातच. तेव्हा त्याबद्दलही अनेकांना काही ठाऊक असण्याची शक्यता नव्हती.
ही अनभिज्ञता एवढी, की २०११-१२च्या अण्णा आंदोलनामागे डोभाल यांच्या या संस्थेचा मोठा हात असल्याच्या बातम्या तेव्हा प्रसिद्ध होऊनही लोकांलेखी ते दुर्लक्षितच राहिले. आजच्या राजकीय स्थितीत हे भलतेच विचित्र वाटेल, परंतु अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेवबाबा या मंडळींना त्यावेळी एकत्र आणण्यात या संस्थेचा मोठा वाटा होता. ही सगळी मंडळी उजव्या विचारांची तरी आहेत किंवा उजवीकडे झुकलेली तरी, हे त्यांच्यातील एक साम्य. भारताच्या मोदीपूर्व इतिहासात या आंदोलनाचे महत्त्व किती हे कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. २०१४चा पाया रचला तो या आंदोलनाने. हे आता सहसा मान्य केले जात नाही, हा भाग वेगळा. पण हे आंदोलन झाले. पुढे अत्यंत पद्धतशीरपणे मोदींचे वादळ निर्माण करण्यात आले. आणि ‘२०१४’ झाले. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोभाल यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची (एनएसए) जबाबदारी सोपवली. हा घटनाक्रमही लक्षणीय.
डोभाल एनएसए झाले, तेव्हाही सर्वसामान्यांना त्यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती. सामान्यांचे सोडा. वृत्तपत्रांतील अनेक उपसंपादकही तेव्हा कोड्यात पडले होते, की या सद्गृहस्थाची नियुक्ती झाली हे ठीक आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व काय आहे, हे सांगण्यास वृत्तसंस्थांच्या बातम्या होत्या. गुगलही अशा वेळी कामास येते. पण त्यांच्या आडनावाचा उच्चार काय आहे? ते मराठीत कसे लिहायचे? डोवल की डोवाल की दोवाल की डोव्हल? बहुतेकांनी ‘डोवाल’ हे नाव स्वीकारले. त्याचा योग्य उच्चार आहे – डोभाल. अजित डोभाल.
......................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
......................................................................................................................................................
हे भारताचे ‘जेम्स बॉण्ड’. म्हणजे, फेसबुकवर २०१४ नंतर उगवलेल्या असंख्य पानांवरील, इंटरनेट ब्लॉगवरील लेखांमधून डोभाल यांचा गौरव केला जातो तो असाच. असंख्य ‘फॅन पेजेस’ आहेत त्यांची फेसबुकवर. ‘अजित डोभाल – द ग्रेट डिटेक्टिव्ह’, ‘चाणक्य अजित डोभाल’, ‘अजित डोभाल द सुपरस्पाय’ अशी त्यातील काहींची नावे. एका चाहत्याने तर ‘अजित डोभाल फॉर प्राईम मिनिस्टर इन २०२४’ अशी द्वाहीच दिली आहे. आजवरच्या कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या वाट्याला हे असले काही आले नव्हते. त्यांतील ब्रजेश मिश्र, जे. एन. दीक्षित, शिवशंकर मेनन हे परराष्ट्र सेवेतून आले होते. त्यामुळे तसे असेल म्हणावे, तर एम. के. नारायणन हे तर पोलिस सेवेतून त्या पदावर गेले होते. ते आयबीचे गुप्तचर होते आणि नंतर संचालकही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाच्या त्यांच्या कारकिर्दीत भारत-अमेरिका नागरी अणुकरारासारखी महत्त्वाची घटना घडली होती. त्यात त्यांची मोठी भूमिका होती. तरीही त्यांना काही डोभाल यांच्यासारखे वलय लाभले नाही. असे का?
याचे कारण दडले आहे डोभाल यांच्या मिथकात. फेसबुक, ब्लॉग, ऑनलाईन फोरम, यूट्युब यांतील कथा-कहाण्यांतून हे मिथक तयार करण्यात आले होते. ‘स्टुडिओ-नॅशनॅलिस्ट’ पत्रकारांनी ते लोकांपर्यंत पोचवले होते. गुप्तचरांच्या कहाण्या एरवीही रोचक, रंजक असतात. त्यामुळे त्या लोकप्रिय होतच असतात. पण डोभाल यांच्याविषयीच्या कहाण्यांच्या लोकप्रियतेला काळाचीही साथ मिळाली होती. काळाच्या एका विशिष्ट टप्प्यावर त्या आल्या होत्या.
२०१२ ते १४चा तो काळ. मनमोहनसिंग सरकारने लोकप्रियतेची नीचतम पातळी गाठली होती तेव्हा. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रतिदिन काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या, घोटाळ्यांच्या बातम्या येत होत्या. आदर्श हे त्यातले एक महत्त्वाचे प्रकरण. कारण त्या इमारतीशी लष्कराचा, कारगिल शहिदांचा थेट संबंध होता. त्यातच महिला अत्याचार, महागाई, भ्रष्टाचार यांविरोधात वातावरण तापले होते. आंदोलने होत होती. मनरेगा, अन्नसुरक्षा यासारख्या गरीबकेंद्री योजनांचा बोलबाला होता आणि परिणामी मध्यमवर्गात नकारात्मक भावना निर्माण झाली होती. तशातच मनमोहनसिंग यांचे व्यक्तिमत्त्व. ते कधीही धडाकेबाज नव्हते. अत्यंत धिमी, थकलेली, कंटाळलेली अशी त्यांची देहबोली. नीरस, हळुवार भाषणांची त्यांची शैली. भारतीयांना सतत एक नायक हवा असतो. धडाकेबाज नायक. तो राजबिंडा असला तर उत्तमच. नसला तरी हरकत नाही. पण त्याच्याकडे उत्तम वक्तृत्व हवे. भाषणबाजी ‘भारी’ केली पाहिजे त्याने. तो तरुण नसला तरी चालेल, पण थोडासा ‘अँग्री’ हवा. तो व्यवस्थेचा भाग असला तरी कोणाचे काही म्हणणे नसते. अट एकच. त्याने व्यवस्थेवर टीका करायला हवी. ‘अभ्युत्थानमधर्मस्य’ अशी त्याची भूमिका हवी. मनमोहनसिंग याच्यात कुठेही बसत नव्हते. तशात त्यांचे ९१चे वलयही यूपीए-एक नंतर विरत चालले होते. एकंदर मनात उबग निर्माण व्हावी अशीच ती परिस्थिती होती. नरेंद्र मोदी हा ‘नायक’ पुढे आणला जात होता तो या पार्श्वभूमीवर. खंबीर, स्वच्छ, धडाकेबाज, गरिबांचा तारणहार... असा तो नायक. देशाची आन-बान-शान ते परत मिळवून देणार होते. जनमनातील राष्ट्रवादाला झालेल्या जखमांवर नवराष्ट्रवादाचा मलम ते लावणार होते.
सामाजिक-राजकीय पटलावरील हवामानाचा नेमका अंदाज घ्यायचा असेल, तर त्यासाठी एक उपयुक्त वेधशाळा आहे. ती म्हणजे जनप्रिय माध्यमे. उदाहरणार्थ बॉलिवुडी चित्रपट. बदललेल्या वातावरणाची चाहूल त्यांना पटकन लागत असते. आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. तर या हिंदी चित्रपटांतून भारतीय नवराष्ट्रवादाचा गौरव करणारे नायक पुढे येऊ लागले होते. २०१२चा ‘एजंट विनोद’ हा चित्रपट त्यांपैकी एक. त्यानंतर त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ‘एक था टायगर’ प्रदर्शित झाला. पुढच्या वर्षी आणखी दोन चित्रपट आले –‘मद्रास कॅफे’ आणि ‘डी डे’. या सगळ्यांत एक समान सूत्र होते. त्यांतील नायक रॉचे गुप्तचर होते. या चित्रपटांनी भारतीय गुप्तचरांबाबतची उत्सुकता तर वाढवलीच, पण त्याचबरोबर लोकमानसातील त्याबाबतचा छुपा न्यूनगंड पुसून टाकण्यासही त्यांनी मदत केली. आपल्याकडेही ‘जेम्स बॉण्ड’ आहेत हे त्यांनी दाखवून दिले. मोसादप्रमाणे रॉही कारवाया करू शकते हे पटवून दिले. पण काहीही झाले तरी ते फिल्मी नायक. त्यांच्याऐवजी तसाच एखादा खराखुरा नायक समोर आला तर? असा नायक आपल्यासमोर आणण्यात आला अजित डोभाल यांच्या रूपाने. तो आणण्यात आघाडीवर होते ‘स्टुडिओ-राष्ट्रवादी’ पत्रकार आणि काही परिवारातले पत्रकार.
ते आपल्याला सांगत होते, की आपला हा नायक पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रात तब्बल सात वर्षे ‘अंडरकव्हर’ राहिला होता. आजही त्याचे नाव ऐकताच आयएसआयच्या अंगावर काटा येतो भयाचा. मोगलांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे. आयएसआयचीही तीच अवस्था केली होती आपल्या या नायकाने.
ते आपल्याला सांगत होते, की मिझो नॅशनल फ्रंटचा दहशतवाद एकहाती संपवून डोभाल यांनी भारताची एकता आणि अखंडता कायम ठेवली. ‘ऑपरेशन ब्लूस्टार’च्या आधी ते अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गुपचूप घुसले होते. पुढे ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर-टू’च्या वेळी तर दोन्ही बाजूंनी होत असलेल्या गोळ्यांच्या वर्षावाची पर्वा न करता ते सुवर्णमंदिरात जात-येत होते. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी म्हणून ते शीख दहशतवाद्यांना भेटत होते आणि सुवर्णमंदिरातील सगळी माहिती बाहेर येऊन लष्कराला सांगत होते.
अशा अनेक कहाण्या. या कहाण्या, त्यातील थरारकता, रोमांचकता यामुळे आपली छातीही भरून येत होती. आपणही काही कमी नाही हे आपले आपल्यालाच पटत होते. मन समाधानाने फुलून येत होते. या अशा कहाण्यांमुळे डोभाल लोकप्रिय झाले नसते, त्यांच्या चाहत्यांच्या फळ्या उभ्या राहिल्या नसत्या, तरच नवल म्हणायचे. या कहाण्यांनी डोभाल यांची प्रतिमा प्रत्यक्षाहून उत्कट बनवली. त्यांना वलय मिळवून दिले. प्रोपगंडाशास्त्रात ‘हॅलो बायस’ नावाचे एक तंत्र वापरले जाते. एखाद्या व्यक्तीभोवती दैवी गुणांची, नायकत्वाची प्रभा निर्माण केली जाते त्या तंत्रात. डोभाल यांच्याबाबत हेच घडताना दिसत होते. त्यांच्याभोवतीचे वलय दिवसेंदिवस विस्तारत होते.
पण त्यांच्याविषयीच्या या कहाण्यांत खरे काय, अतिरंजित काय आणि काल्पनिक काय?
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
अजित डोभाल यांची आयबीतील कारकीर्द सुरू होते ऐज्वॉलमधून. आयबीच्या स्थानिक युनिटचे प्रमुख म्हणून ते तेथे काम करत होते. २८ फेब्रुवारी १९६६ रोजी मिझो नॅशनल फ्रंटने सशस्त्र बंड पुकारून मिझोरामच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याला आता दहा वर्षे उलटून गेली होती. ते बंड इंदिरा गांधी यांनी कणखरपणे मोडून काढले. पण लालडेंगा यांच्यासह अनेक बंडखोरांनी तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात पळ काढला. पुढे चितगाँग पर्वतीय क्षेत्रातील साजेक भागात तळ ठोकून ते भारतविरोधी दहशतवादी कारवाया करत होते. एवढ्या वर्षांत त्यांचे बळ कमी झाले होते. पण तरीही तो परिसर अशांतच होता. धुमसत होता. अशा काळात डोभाल यांनी तेथील आयबी युनिटची सूत्रे स्वीकारली. येथून पुढे सुरू होते कहाणीपर्व. सांगण्यात येते, की १९८६च्या जुलैमध्ये मिझो करार झाला तो प्रामुख्याने अजित डोभाल यांच्या पुढाकारामुळेच. तो कसा? तर मिझो नॅशनल फ्रंटच्या नेत्यांच्या भूमिगत तळांमध्ये डोभाल यांनी शिरकाव करून घेतला. त्याच्या सहा प्रमुख नेत्यांना त्यांनी हळूहळू फितवले. त्यांना शांततेसाठी राजी करून लालडेंगा यांची कंबर तोडली.
अजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती झाली, तेव्हा पत्रकार सैकत दत्त यांनी डोभाल यांचा ‘जायंट अमंग स्पाईज’ असा गौरव करणारा एक वृत्तलेख लिहिला होता. त्यात त्यांनी लालडेंगा यांच्या मुलाखतीतील एक भाग उद्धृत केला होता. ते सांगतात, की लालडेंगा असे म्हणाले होते, की ‘माझ्याकडे सात लष्करी कमांडर होते... पण डोभाल यांनी जाताना त्यातील सहा जण सोबत नेले. त्यामुळे पुढे येऊन शांतता करारासाठी वाटाघाटी करण्याखेरीज माझ्या समोर दुसरा पर्यायच उरला नाही.’ थोडक्यात काय, तर शांतता करार झाला तो डोभाल यांच्यामुळे. तसे असेल, तर एका गुप्तचरासाठी ही केवढी तरी मोठी गोष्ट. देशाने कृतज्ञच राहायला हवे त्यांचे. पण वस्तुस्थिती खरोखरच तशी होती का?
१९७२ मध्ये डोभाल ऐज्वॉलमध्ये गेले, तेव्हा तेथील परिस्थिती काय होती? बांगलादेश मुक्तीयुद्धाच्या काळात रॉच्या नेतृत्त्वाखालील ‘एस्टॅब्लिशमेन्ट टूटू’च्या कमांडोंनी आणि भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत नागा आणि मिझो बंडखोरांची कंबर तुटून गेली होती. बांगलादेश स्वतंत्र झाल्यामुळे तेथील त्यांचा आसरा गेला होता. चीनची मदत त्यांना लाभत असे. तीही बंद झाली होती. मिझो बंडखोरांच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी तर डोभाल यांच्या आगमनापूर्वीच शरणागती पत्करली होती. तशात १९७२ मध्ये भारताने मिझोरमला केंद्रशासीत प्रदेश म्हणून मान्यता देऊन त्याचा स्वतंत्र राज्याचा मार्ग मोकळा केला होता. तशात १९७५ मध्ये तेथे जी. एस. रंधवा यांची पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. ते लष्करातील निवृत्त ब्रिगेडियर. त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन बंडखोरांविरुद्ध मोहीम सुरू केली. या सगळ्याचा परिणाम पुढे लालडेंगा वाटाघाटीच्या टेबलावर येण्यात झाला. त्या वाटाघाटींत आयबीचा मोठा वाटा होता. मार्च १९७६ मध्ये आयबीच्या पुढाकाराने कोलकत्त्यात मिझो बंडखोरांची एक परिषद घेण्यात आली होती. त्या परिषदेत सर्व बंडखोर नेत्यांनी सामील व्हावे यासाठी डोभाल यांनी जिवाचे रान केले होते. ते श्रेय त्यांचेच. परंतु मिझो शांतता करार ही पूर्णतः राजकीय बाब होती आणि तीही पूर्णत्वास गेली ती राजीव गांधी यांच्या काळात. लालडेंगा यांच्याशी डोभाल यांनी मैत्रीचे संबंध जोडले होते. त्यांचा विश्वास संपादन केला होता. या अशा गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांचा फायदा या करारास झाला ही यातील खरी गोष्ट. डोभाल यांच्यामुळे हा करार झाला, ही अतिशयोक्ती.
ही अशीच अतिशयोक्ती पाहावयास मिळते ती पंजाबातील कहाणीमध्ये. अत्यंत रोमांचक आहे ती. १९८४चे ऑपरेशन ब्लू स्टार नुकतेच होऊन गेले होते. सुवर्ण मंदिरातून लष्कर बाहेर पडल्यानंतर खलिस्तानवाद्यांनी हळूहळू पुन्हा तेथे आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली होती. पुन्हा एकदा सुवर्ण मंदिरात दहशतवाद्यांचा अड्डा तयार होऊ लागला होता. त्यांना बाहेर काढणे आवश्यक होते. त्यासाठीची पहिली कारवाई झाली ३० एप्रिल १९८६ रोजी. नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या सुमारे ३०० कमांडोंनी सुवर्ण मंदिरात घुसून त्यावेळी २०० दहशतवाद्यांना जेरबंद केले. त्या आठ तासांच्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. हे ऑपरेशन ‘ब्लॅक थंडर’. त्याच मोहिमेचा दुसरा भाग घडला दोन वर्षांनी, ९ मे १९८८ रोजी. त्या कारवाईची सूत्रे पंजाबचे पोलिस महासंचालक के. पी. एस. गिल यांच्या हाती होती. अत्यंत हुशारीने केलेल्या त्या कारवाईतही सुमारे २०० दहशतवाद्यांना पकडण्यात आले. ४१ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
याच कारवाईदरम्यानची एक घटना आपल्याला इंटरनेटवर सापडते. पोलिसांनी सुवर्ण मंदिराला वेढा घातला होता. खास निशाणेबाज आजूबाजूच्या इमारतींवर नेमले होते. पण मंदिरात घुसायचे कसे? आत किती दहशतवादी आहेत, त्यांचे बळ, त्यांचे मोर्चे अशी माहिती मिळाल्याशिवाय आत जाणे म्हणजे आत्महत्याच. पोलिसांपुढे मोठेच प्रश्नचिन्ह होते. याच काळात मंदिराच्या बाहेर एक फेरीवाला (काहींच्या म्हणण्यानुसार, एक रिक्षावाला) फिरत होता. नेहमीचा नव्हता तो. त्यामुळे दहशतवाद्यांना त्याचा संशय आला. त्यांनी त्याला पकडले. आत नेले आणि अहो आश्चर्यम्. तो फेरीवाला दुसरा-तिसरा कोणी नव्हता, तर आयएसआयचा एजंट होता. दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी त्याला आयएसआयने पाठवले होते. त्याने आत गेल्यानंतर लागलीच दहशतवाद्यांच्या ताकदीचा अंदाज घेतला.
काही काळाने अचानक भारतीय जवान मंदिरात शिरले. त्यांनी दहशतवाद्यांचा खातमा केला. अनेकांना अटक केली. पण त्या आयएसआय एजंटला मात्र हातही लावला नाही. कारण?– कारण तो हेर म्हणजे डोभाल होते. गोळीबाराची पर्वा न करता ते मंदिर परिसरात गेले होते. आयएसआयचा हेर म्हणून त्यांनी दहशतवाद्यांना चकवले होते. त्यांनीच आतली सगळी परिस्थिती गुपचूप बाहेर कळवली होती. त्यांच्यामुळेच हे ऑपरेशन यशस्वी झाले.
डोभाल हे गोळीबार होत असतानाही मंदिरात आत-बाहेर करत असल्याचे स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे करन खर्ब. हे तेव्हा एनएसजीच्या एका स्क्वार्डनचे प्रमुख होते. ते सांगतात, की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डोभाल मंदिरात जात होते. सुवर्णमंदिरात नेमके काय चालले आहे याची माहिती त्यांनीच आम्हाला दिली. नंतर आम्हाला समजले की, ते तेथे आयएसआयचे एजंट बनून गेले होते. हे खर्ब आणि डोभाल हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बाकी मात्र कोणीही डोभाल यांच्या या अचाट कामगिरीचे साक्षीदार नाही. त्या कारवाईच्या वेळी तेथे एनएसजी कमांडोंच्या सोबत सतीश जेकब यांच्यासारखे पत्रकार होते. ९ मे रोजी गोळीबार सुरू झाला तेव्हा मंदिर परिसरात दिनेश कुमार हे पत्रकार होते. डोभाल तेथे होते की काय याबाबत त्या दोघांनाही शंका आहे. आता यावर असे म्हणता येईल, की डोभाल यांच्यासारखा गुप्तचर, जो आयएसआय एजंट बनून आत गेला होता, तो या पत्रकारांना दिसला नाही किंवा त्यांना त्याची माहिती मिळाली नाही, म्हणून ते तेथे नव्हतेच असे कसे म्हणता येईल? पण तेव्हा पंजाबातील आयबीच्या ऑपरेशन्समध्ये सहभागी असलेले आयबीचे संयुक्त सचिव एम. के. धर हेही याबाबत डोभाल यांचे नाव घेत नाहीत. सुवर्ण मंदिराच्या परिक्रमेत गुप्तचरांचे खबरे होते असे ते सांगतात. त्यांच्याकडून तेथे येत असलेल्या शस्त्रांची, दारूगोळ्याची माहिती ते देत असत असेही ते सांगतात, पण तो खबऱ्या म्हणजे डोभाल असे काही त्यांनी म्हटलेले नाही.
मुळात आयबीच्या कारवायांची एक पद्धत आखलेली असते. आयबीचे संयुक्त सचिव अशा उच्च पदावरील अधिकाऱ्याने अशा प्रकारे आत जावे हे त्यात बसतच नाही. कारण त्यात धोका प्रचंड असतो. माहिती काढण्यासाठी कोणाला पाठवायचेच असेल, तर कॉन्स्टेबल वा हेडकॉन्स्टेबल अशांना पाठवले जाते. एखादी बाहेरची व्यक्ती आत गेली आणि आपण आयएसआयचे एजंट आहोत असे सांगू लागली, तर त्यावर कोणतीही दहशतवादी संघटना विश्वास ठेवील? हे एका माजी आयबी अधिकाऱ्याचे मत. ‘कॅरॅव्हॅन’चे पत्रकार प्रवीण दोंथी यांनी त्यांच्या ‘अंडरकव्हर’ या लेखात ते उद्धृत केले आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे.
पण याचा अर्थ असा नाही, की पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीच्या विरोधातील लढ्यात डोभाल नव्हते. ते होतेच. आयबीचे एक अधिकारी म्हणून त्यांनी तेथे महत्त्वाच्या मोहिमा आखल्या आहेत, त्यांत भाग घेतला आहे. या मोहिमांबद्दल १९८९ मध्ये त्यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले. लष्कराबाहेरील व्यक्तीला त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे ही बाब येथे आवर्जून उल्लेखली पाहिजे. पंजाबातील त्यांच्या मोहिमा वा कारवायांची नेमकी माहिती अर्थातच उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या पंजाबातील कारवायांबद्दल ‘ओपन सिक्रेट्स’ या पुस्तकात एम. के. धर यांनी जे म्हटले आहे ते पाहता डोभाल यांची तेथील कार्यपद्धती फार वाखाणण्यासारखी होती असे काही म्हणता येत नाही. धर यांच्यानुसार, ‘(पंजाबात) शांती प्रक्रिया पुढे जाण्याकरीता प्रयत्न करण्याऐवजी दहशतवाद्यांना ठार मारण्याकडे ए. के. डोभाल यांचा कल होता. याच्यातूनच, डोभाल हे खंडणीवसुली करत होते, खेड्यांतील लोकांकडून जीवदान देण्यासाठी पैसे घेत होते, असे आरोप पंजाबातील अनेक निरीक्षकांनी केले आहेत.’ अत्यंत गंभीर असे हे आरोप आहेत. परंतु त्यांनी डोभाल यांच्या प्रतिमेवर किंचितसाही डाग पडलेला नाही हे विशेष. याचे कारण त्यांच्याविषयीच्या कहाण्यांनी ती प्रतिमाच अशा उंचीवर नेलेली आहे, की तिथपर्यंत कोणताही आरोप पोचूच शकत नाही.
या कहाण्यांतील सर्वांत लोकप्रिय कथा आहे ती डोभाल यांच्या पाकिस्तानातील हेरगिरीची. या कथेनुसार डोभाल हे तब्बल सात वर्षे पाकिस्तानात मुसलमान बनून राहिले होते. या काळात अनेकदा त्यांच्या जीवावर बेतले, परंतु त्याची पर्वा न करता त्यांनी पाकिस्तानी लष्कराची अनेक गुपिते हस्तगत केली. त्यातील सर्वांत महत्त्वाचे गुपित म्हणजे काहुटा अणुकेंद्रातील अणुबॉम्ब निर्मितीचे. ते त्यांनी अत्यंत हुशारीने हस्तगत केले. इंटरनेट पत्रिका, समाजमाध्यमे, ब्लॉग, यूट्यूब, एवढेच नव्हे, तर मुख्य प्रवाहातील नियतकालिके आणि चित्रवाणी वाहिन्यांनी ही कहाणी इतक्यांदा सांगितली आहे, की तिच्याविषयी शंका घेणारा लोकांच्या दृष्टीने देशद्रोही ठरेल. या कहाणीला स्वतः डोभाल यांनीही वेळोवेळी मसाला पुरवला आहे. यूट्यूबवर त्यांची एक ध्वनिचित्रफित आहे. त्यात ते सांगतात, की ते पाकिस्तानात असताना एकदा एका मजारमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीने त्यांना जवळ बोलावले आणि विचारले, की तू हिंदू आहेस काय? डोभाल यांनी नाही असे उत्तर दिले. त्यावर ती व्यक्ती म्हणाली की, तू हिंदू आहेस, कारण तुझे कान टोचलेले आहेत. त्यावर कडी म्हणजे तो वृद्ध म्हणाला, की मीसुद्धा हिंदूच आहे. त्या वृद्धाने त्याच्या घरातील कपाटात ठेवलेल्या शंकर आणि दुर्गेच्या मूर्तीही डोभाल यांना दाखवल्या. या कहाणीतून डोभाल हे पाकिस्तानात मुस्लिम म्हणून वावरत होते हेच स्पष्ट होते. पण यात कितपत तथ्य आहे?
वस्तुस्थिती अशी आहे, की पाकिस्तानातील उच्चायुक्तालयात डोभाल यांची नियुक्ती झाली होती. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार, उच्चायुक्तालयातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आयबीने त्यांच्यावर सोपवली होती. माहिती अधिकारी या पदाच्या आडून ते त्यांचे काम करत होते. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, व्यापार विभागाचे प्रमुख हा त्यांचा ‘कव्हर’ होता. पाकिस्तानात तीर्थयात्रेसाठी येणाऱ्या शीख भाविकांवर, त्यांचे मन वळवण्यासाठी पाकिस्तानद्वारे करण्यात येणाऱ्या प्रोपगंडावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, कोणताही हेर परराष्ट्रात हेरगिरी करण्यास जातो, तेव्हा तो कुटुंबकबिला घेऊन जात नाही. डोभाल यांच्यासमवेत त्यांची पत्नी आणि मुलगा शौर्य हे होते. शौर्यला तेथील एका शाळेत प्रवेशही घेण्यात आला होता. तेव्हा डोभाल हे सात वर्षे मुसलमान बनून हेरगिरी करत होते, ही जरा अतिशयोक्तीच झाली. कदाचित काही काळासाठी, एखाद्या मोहिमेसाठी त्यांनी वेशांतर केले असावे. पाकिस्तानातील भारतीय दूतावास आणि उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांनाच नव्हे, तर पाकिस्तानात जाणाऱ्या भारतीय पत्रकारांच्याही मागे सतत आयएसआयचे हेर असतात. ज्या व्यक्तींचा आयएसआयला संशय येतो, त्यांच्यावर तर ‘बंपर टू बंपर’ पाळत ठेवण्यात येते. अशा परिस्थितीत उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या कोणालाही तेथे गुप्त कारवाया करणे अवघडच. ते जर डोभाल यांनी केले असेल, तर त्यांना ‘सुपरस्पाय’ म्हणतात, ते योग्यच असे म्हणावे लागेल. पण तसे काही दिसत नाही. गुप्तचरांच्या कारवाया या नेहमीच गूढ, छुप्या आणि म्हणून सहसा पुराव्याने शाबीत न होणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांच्याविषयीची मिथके तयार करणे सोपे असते, हेच यातून स्पष्ट होते.
आणि आज भारतात त्या पद्धतीने ‘डोभाल मिथक’ तयार झालेच आहे. त्यामुळेच या माणसाला पाहून पाकिस्तान चळाचळा कापतो असे चित्रवाणी वाहिन्यांतील स्टुडिओ-राष्ट्रवादी म्हणतात आणि त्यावर सर्वजण डोळे झाकून माना डोलावतात.
परंतु याचा अर्थ असाही नाही, की सर्वच डोभालचरित्र ‘फेक’ आहे. तशी शंकाही घेणे हा या आयबी गुप्तचरावरील अन्याय ठरेल. त्यांच्या शौर्याचा, बलिदानाचा तो अपमान ठरेल. पण हेही तेवढेच खरे, की सारेच डोभालचरित्र खरे मानणे आणि ते ‘जेम्स बॉण्ड’ होते या कारणाने ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ म्हणून त्यांची सर्व धोरणे डोक्यावर घेऊन नाचावीत अशीच आहेत असे मानणे हेही अयोग्य ठरेल.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल आणि आयबी अधिकारी डोभाल यांच्यात गल्लत करता कामा नये.
.....................................................
संदर्भ –
१) Undercover - Ajit Doval in theory and practice:Praveen Donthi, The Caravan, 1 Sept. 2017
२) Ajit Doval – The great Indian spy who spent 7 years in Pakistan as a Muslim : Zeenews, 24 Dec. 2015
३) The legend of Ajit Doval – India’s Super Spy–linkedin.com, 31 Aug. 2017
४) Open Secrets - India’s Intelligence Unveiled : Maloy Krishna Dhar, Manik Dhar, Kindle Edition, 2012
.............................................................................................................................................
लेखक रवि आमले मुंबई सकाळचे निवासी संपादक आहेत.
ravi.amale@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vividh Vachak
Sat , 19 January 2019
आपण मनमोहनसिंगांच्या सरकारचा २०१४ मध्ये जो दारूण पराभव झाला त्याचे श्रेय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला देता, आणि भारतीयांना कसा हिरोसारखा नेता पाहिजे असतो वगैरे टिप्पणी करता, याला भाबडेपणा म्हणावे की आपण वेड पांघरून पेडगावला निघालात म्हणावे? भारतीयांनी लोकशाही प्रक्रियेतून यापूर्वी असे नेते निवडून दिलेत ज्यांना हे "हिरो" व्यक्तिमत्त्व नव्हते. सौम्य व्यक्तिमत्त्वामुळे मनमोहन सरकार पडले यासारखा दुसरा वस्तुस्थितीचा विपर्यास नसेल. ते सरकार कोसळले कारण त्यांनी उभे केलेले भ्रष्टाचाराचे पर्वत भेडसावू लागले म्हणून, आणि मनमोहनांचा पुचाटपणा दुर्लक्षित करणे शक्य होईना इतका वाढला, म्हणून. राहुल गांधींचा नाकर्तेपणा आणि सोनियांचा पाताळयंत्रीपणा स्पष्ट दिसून लागला म्हणून. आता ही गोष्टसुद्धा कदाचित पुरोगामी "राष्ट्रवादी शक्तींनी पसरवलेली अफवा" म्हणून सांगतील, पण किमान सध्या तरी लोकांची अक्कल आणि स्मृती शाबूत आहे म्हणून हे सगळ्यांना आठवत असेल. बाकी डोभाल यांच्यावरचा लेख ठीक वाटतो. त्यांच्या कर्तृत्वाबद्दलचे मूल्यमापन खोलात जाऊन केले आहे, (यात ज्या माहितीच्या आधारे त्यांचे मूल्यमापन केले आहे ती माहिती "बनवलेली" नसून खरी आहे,आहे असे मानून). हल्ली सवंग ठोकताळे आणि आरोप यांनाच इन्वेस्टिगेटिव्ह पत्रकारिता म्हणण्याचे दिवस आलेत त्यामुळे हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य. फक्त, इतके लक्षात घ्यावे की एक जरी पुळचट दावा लेखातून केला गेला (जसा: मनमोहन सरकार का पराभूत झाले? याबद्दलचे विवेचन) -- तरी लेखाची एकंदर विश्वासार्हता लगेच झटकन कमी होते. तिसरी गोष्ट म्हणजे, डोभाल यांच्या ज्या आरत्या गायल्या जातात, त्या त्यांच्या पी आर टीम चे कर्तृत्व आहे. हे कर्तृत्व सगळेच पक्ष दाखवतात, आणि सध्याच्या जाहिरातीच्या युगात तर हे वाढत चालले आहे. ही फालतूची व्यक्तिपूजा हा आपल्या लोकशाहीला मिळालेला शाप आहे, पण सामान्य जनता याला भुलते की नाही हे अजून समजायचे आहे. एक सामान्य नागरिक म्हणून असे म्हणावेसे वाटते की, त्यांना मिळालेले पद हे त्यांच्या अनुभवावर आधारित मिळाले होते खास. त्यांचा कल हा भा ज प कडे होता, म्हणून त्यांना पद मिळाले, ह्यातही आश्चर्यजनक काहीही नाही, हे सगळीकडे असेच चालते. हे काँग्रेसकाळातपण चालत होतेच, म्हणूनच त्यांचे अंधपणे गुणगान करणाऱ्यांचे एवढे पीक अजूनही भारतात दिसते.