अजूनकाही
‘नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे’ या परशुराम बल्लाळ गोडबोले यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीला लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश...
.............................................................................................................................................
मराठी वाक्याचे अध्ययन, अध्यापन आणि आस्वाद यांच्या इतिहासात ‘नवनीत’ म्हणजेच ‘मराठी कवितांचे वेंचे’ या संपादनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील मराठी अभिरूची कशावर पोसली असेल तर ‘नवनीत’मधील वेच्यांवर. जाता जाता हे सुद्धा सांगायला हवं की, या काळातील महाराष्ट्रामधील इंग्रजी काव्याची अभिरूची ‘Golden Treasure’ या अशाच एका संपादनानं विकसित झाली.
‘नवनीत’ १८५४ मध्ये प्रकाशित झालं. तोपर्यंत महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता चांगलीच स्थिरावली असून शाळा कॉलेजांच्या माध्यामातून इंग्रजी साहित्याचा परिचय एतद्देशियांना होऊ लागला होता. संस्कृत भाषेतील साहित्य हे पंडित परंपरेनं पूर्वीपासून जपलं होतंच. मराठी साहित्य या दोन भाषांच्या कैचीत सापडलं होतं, असं म्हणण्यास हरकत नाही. पारंपरिक संस्कृत आणि आधुनिक इंग्रजी हे शिकण्या-शिकवण्याचे विषय होते, तसा दर्जा मराठीला मिळणं कठीणच होतं. पारंपरिक संस्कृत पंडित तिच्याकडे ‘प्राकृत’ म्हणून तुच्छतेनं पाहत असत. एकीकडे संस्कृत ही देववाणी तर दुसरीकडे इंग्रजी ही नव्या राज्यकर्त्यांची वाणी. मग मराठीकडे दुर्लक्ष झालं नसतं तरच नवल!
दुसऱ्या बाजूला अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं यांचं नियंत्रण ज्यांच्या हातात होतं, त्या इंग्रज राज्यकर्त्यांना मराठी साहित्याचं महत्त्व कळणंही अवघडच होतं. महाराष्ट्राच्या आधी पन्नास-पाऊणशे वर्षं बंगालवर ब्रिटिशांच्या अमल चालला होता. तेथील विल्यम जोन्स प्रभृती प्रशासकांनी संस्कृत भाषेची व साहित्याची समृद्धी लक्षात घेऊन त्यांनी ज्यास ‘ओरिएंटल’ म्हणतात, तो ज्ञानक्षेत्रातील संप्रदाय सुरू केला होता. त्यात संस्कृत ही ग्रीक-लॅटिनच्या तोडीची अभिजात भाषा मानली जाऊ लागली होती. महाराष्ट्रातील ब्रिटिशांनाही ते मान्य करून त्याची अंमलबजावणी अध्ययन, अध्यापन, मुद्रण, प्रकाशन या व्यवहारांमध्ये करण्यात अडचण नव्हती. मराठी ही या प्रांतातील लोकांच्या दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे हे त्यांना ठाऊक होतं, पण त्यापलीकडे जाऊन तिच्यात उच्च कोटीचं काव्य असेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. या संदर्भात ‘नवनीत’ च्या १९५४ साली निघालेल्या शतसांवत्सरिक आवृत्तीचे संपादक अ. का. प्रियोळकर यांनी १८२४ साली प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी मराठी व मराठी-इंग्रजी कोशात कर्नल व्हॅन्स कँडी यांचं विधान उदधृत केलं आहे. साहेब लिहितात - "It must be observed that Marathi is merely a spoken language, and that it has never been cultivated or refined by authors either in prose or verse.'
कँडीसाहेबांच्या अज्ञानाची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्नही प्रियोळकर करतात. त्यानुसार ‘ज्ञानेश्वरांपासून मोरोपंतांपर्यंत कवींनी ज्या भाषेत ग्रंथ रचना केली, ती ‘प्राकृत’ या नावानं सामान्यत: प्रसिद्ध असलेली भाषा, मराठीहून भिन्न आहे अशी त्यांची चुकीची समजूत झाली होती हेच दिसतं.’ प्रियोळकरांचं म्हणणं बरोबरच आहे. वस्तुत: जो संबंध शेक्सपियर-मिल्टनच्या इंग्रजीच्या व कँडीच्या इंग्रजीचा होता, तोच संबंध ज्ञानेश्वर-मोरोपंतांच्या मराठीत व कँडीच्या समकालीन मराठी बोलणाऱ्यांच्या मराठी भाषेचा होता. आता शेक्सपियर मिल्टनच्या इंग्रजीला कोणी ‘प्राकृत’ म्हणत नव्हतं, पण ज्ञानेश्वर-मोरोपंतांच्या मराठीला ‘प्राकृत’ म्हटलं जाई, असं कुणी म्हणेल. ते बरोबरच आहे पण याच प्राकृताला ज्ञानेश्वर-मोरोपंतांपर्यंत ‘मराठी’ असंही म्हटलं जाई आणि याच नावानं तिचं गुणगान फादर स्टिफन्ससारख्या इंग्रजी मिशनऱ्यानं केलं होतं, हे विसरता कामा नये.
अर्थात इंग्रजांना आपली चूक कळून येण्यास फारसा वेळ लागला नाही हेही इथं नमूद करायला हवं. ते प्रियोळकरांनाही मान्यच आहे. या संदर्भात त्यांनी डॉ. स्टीव्हन्सन यांच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई जर्नलच्या जुलै १८४९ च्या अंकामधील विधवनाकडे लक्ष वेधलं आहे- "They (Marathas) are by no means so far behind in literary matters as has often been supposed.' हेच स्टीव्हन्सन ‘नवनीत’ च्या कल्पनेचे जनक होत असे प्रियोळकर सांगतात. आपल्या उपरोक्त लेखात स्टीव्हन्सन पुढे म्हणतात- "The style of Maratha composition is in danger at present from an almost exclusive attention to foreign literature. To a learned native English is needful to open up to him a store house of ideas but the Pracrit must be studied in order that he may be able to diffuse beneficially among his countrymen, the knowlege he has acquired.''
इंग्रजीच्या उपयुक्त मूल्यामुळे मराठी भाषक मराठीपासून दुरावत असल्याचं लक्षात आल्याबद्दल वा आणून दिल्याबद्दल या साहेबांचे आभार मानले पाहिजेत यात शंका नाही, पण त्या मागचा त्यांच्या हेतू सुद्धा काहीसा उपयुक्ततावादीच असल्याचं दिसून येतं. इंग्रजीतून घेतलेल्या कल्पना आपल्या मराठी देशबांधवापर्यंत नीट पोहचवण्यासाठी मराठीचं ज्ञान आवश्यक असल्याचं त्यांना वाटतं. म्हणजे इथं मराठीचं मूल्य स्वयंभू नाही.
तरीही सद्भावना म्हणून स्टीव्हन्सनच्या मताची कदर करायला हवी, पण केवळ मत प्रदर्शनाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीचा विचार केला तर पहिल्यांदा कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी पूना कॉलेजचे प्राचार्य मेजर कँडी यांना मराठी कवितेचा समावेश शिक्षणक्रमात करण्याविषयी सूचना केली. संस्कृत आणि इंग्रजी यांच्या माहात्म्याच्या काळात कृष्णशास्त्रींना ही बुद्धी व्हावी हे विशेष आणि त्यासाठी ते प्रशंसापात्र आहेत. मेजर कँडी त्यांच्या ऐकण्यातले असल्यामुळे त्यांनी या या कामात पुढाकार घेऊन सूत्रं हलवली. त्यांची निष्पत्ती म्हणजे परशुरामपंत गोडबोले यांनी सिद्ध केलेली १८५४ मधील ‘नवनीत’ची पहिली आवृत्ती.
त्यानंतरच्या १६ आवृत्त्यांचा इतिहास प्रियोळकरांनी संपादित केलेल्या १८व्या शतसांवत्सरिक आवृत्तीत वाचायला मिळतो. मधल्या आवृत्यांना श्रीकृष्णशास्त्री तळेकर, रावजीशास्त्री गोडबोले, भास्कर दामोदर पाळंदे, ना. बा. गोडबोले, ग. वि. डांगे, शं. गो. साठे, म. सा. तिरोडकर अशा विद्वानांचा हातभार लागला होता.
‘नवनीत’तील वेच्यांच्या निवडीची काही चर्चा करणं आवश्यक आहे. ‘नवनीत’च्या सुरुवातीच्या आवृत्त्यांच्या काळात महानुभव संप्रदायाच्या कवींची काव्यरचना उपलब्ध झालेलीच नसल्यामुळे त्यांच्या समावेशाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. प्रियोळकरांच्या काळात महानुभवसंशोधन बऱ्यापैकी पुढे गेलं होतं. त्यामुळे त्यांच्या संपादनात महानुभाव कवींच्या रचनांना स्थान मिळालं आहे. इतकंच नव्हे तर शेख महंमदासारख्या परधर्मीय, पण मराठीत रचना करणाऱ्या कवीलाही सामावून घेऊन प्रियोळकरांनी आपला व्यापक दृष्टिकोन सिद्ध केला.
संत आणि पंडित यांच्या कवितेबरोबर प्रियोळकरांनी शिवकालीन पोवाड्यात स्थान दिलं हे उचितच झालं. खरं तर परशुराम तात्यांपासूनच्या पूर्वीच्या संपादकांच्या काळात मराठी लावण्या लोकप्रिय होत्या. कृष्णशास्त्रींसारख्या व्युत्पन्न पंडितांनाही त्यांचा मोह सुटत नसावा असं मानण्यास जागा आहे. हळूहळू या लावण्यांची पुस्तकंही प्रकाशित होऊ लागली. तथापि शालेय अभ्यासक्रमात अशा शृंगारिक रचना नसाव्यात या भूमिकेतूनच बहुधा लावण्यांचा समावेश करण्यात आला नसावा. मराठी संवेदनशीलतेच्या या बाजूवर दादोबा पांडुरंग (तर्खडकर) यांनी टीका केली आहे. होनाजीसारख्या लावणीकारांचं कौतुक करताना दादोबा संस्कृतसारख्या भाषेत याहीपेक्षा ग्राम्य वर्णनं आढळतात, हे निदर्शनास आणून द्यायला विसरत नाहीत.
अगोदरच्या आवृत्यांमध्ये पोवाडेही आढळत नाहीत. वस्तुस्थितीचं एक संभाव्य स्पष्टीकरण असं सुचतं की, शेवटी या निवडीवर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचं नियंत्रण होतं. आपल्या पराक्रमाच्या उज्ज्वल इतिहासाचं स्मरण झालं, तर कदाचित महाराष्ट्रातील लोकांना परकीय सरकारविरुद्ध बंडखोरी करण्यास उत्तेजन मिळेल अशी भीती त्यामागं असावी.
ते काहीही असो, वासाहतिक काळातील महाराष्ट्रातील काही प्रमाणात सामान्य वाचकांच्या आणि बऱ्याच प्रमाणात विद्वान पंडितांच्या (तेच संग्राहक संपादक होते) अभिरूचीच्या ज्ञानाचं साधन म्हणूनही ‘नवनीत’कडे पाहता येईल. लावण्यांचा समावेश तर दूरच, परंतु अगदी संतपंत काळातील काही अश्लील वा ग्राम्य भासणाऱ्या शब्दांमुळे तशा काही कविता मधल्या संपादकांनी वगळल्या होत्या, याचा उल्लेख इथं करायला हवा.
पण अधिक गंभीर वाटावी अशी संक्रांत ज्ञानेश्वर, मुकुंदराज यांच्या कवितेवर आली आणि तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या साक्षेपी टीकाकारानं या प्रकृतीवर परखड टीका केली. या कवितेत अध्यात्म असल्यामुळे त्या कठीण वाटल्याने नंतरच्या संपादकांनी या दोन कवींचे वेचे वगळावे हे आश्चार्यकारक मानायला हवं. नंतरच्या आवृत्त्यांमध्ये त्यांचा परत समावेश करून चूक दुरुस्त करण्यात आली हा भाग वेगळा. पण मुळात हे वेचे कठीण वाटत असतील तर त्याच कवींच्या कमी कठीण वेच्यांनी त्यांची जागा भरून काढता आली असती. मुख्य म्हणजे दांते, मिल्टन, गटे अशा पाश्चात्य कवींच्या कविता अभ्यासताना त्या ख्रिस्ती धर्माचं तत्त्वज्ञान सांगतात म्हणून कुणी तक्रार करत नाही. मग मराठीच्या बाबतीतच असं का व्हावं? याच धारणेच्या परिणाम म्हणून संतसाहित्य हे धार्मिक, पारंपरिक, मठा-मंदिरात पारायणं करण्याचं, त्याच्याशी आम्हा आधुनिकांना काही देणं-घेणं नाही अशी समजूत उत्तरोत्तर दृढ होत गेली असली पाहिजे.
सामान्य वाचक आणि विद्वान, संपादक यांच्या अभिरूचीचा व काव्यजाणीवेचा उल्लेख वर केला आहे. वस्तुत: त्या कालखंडातील सर्वसाधारण वाचकांना संतांच्या कवितांची अधिक गोडी होती, हे वेगळं सांगायची गरज नाही. सर अॅलेक्झांडर ग्रँटसारख्या थोर अभ्यासकानं अनेकांना महाराष्ट्राचे ‘राष्ट्रकवी’ म्हटलं, तेव्हा नवनीतांच्या चार-पाच आवृत्त्या तरी छापून खपून गेल्या होत्या. तथापि पंडिती वळणाच्या संपादकांनी तुकोबांच्या कवितांपेक्षा मोरोपंतांच्या कविता अधिक छापाव्यात हा त्यांच्या संस्कृतानुगामी अभिरूचींचा परिणाम म्हणावा लागतो.
अर्थात ‘नवनीत’मधील ही उणीव दरम्यानच्या काळात तुकारामगाथेच्या निघालेल्या अनेक आवृत्त्यांनी भरून काढली असल्याने त्याबद्दल तक्रार करण्याऐवजी ‘नवनीत’मुळे प्राचीन मराठी कविता टिकून राहण्यास मदत झाली म्हणून समाधानच मानलं पाहिजे. ‘नवनीत’ला तेव्हा कोणताही स्पर्धक नव्हता ही एकच गोष्ट त्याचं महत्त्व सिद्ध करण्यास पुरेशी आहे. प्रियोळकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘नवनीता’ची ही आवृत्ती पाहून कोणत्याही धर्माच्या पंथाच्या किंवा जातीच्या माणसाला मराठी मातृभाषेबद्दल आपुलकी वाटावी व त्याद्वारा महाराष्ट्र व भारत याबद्दल त्याच्या मनात प्रेम व अभिमान निर्माण व्हावा हाही त्यात एक हेतू आहेच. शिवाय मराठी अभिरूचीचं एक ऐतिहासिक प्रमाण हे त्याचं स्थानही महत्त्वाचं आहे.
.............................................................................................................................................
नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे – संपादक : परशुराम बल्लाळ गोडबोले, प्रकाशक – ८८वे.अ.भा.म.सा.संमेलन\सरहद्द, खडके फाउंडेशन, पुणे, पाने ५७२, मूल्य – ३०० रुपये.
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment