‘व्हॉट विल पीपल से’ : इंटरेस्टिंग पात्रांकडे पाहण्याचा नीरस दृष्टिकोन
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘व्हॉट विल पीपल से’ची पोस्टर्स
  • Sat , 27 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie व्हॉट विल पीपल से What will people say

एखादा चित्रपट त्याच्या काहीशा चांगल्या असण्याच्या आशावादी सुरुवातीवरून इंटरेस्टिंग पात्रं समोर उभी करतो. मात्र जसजसा पुढे सरकू लागतो, तसा रटाळ, कंटाळवाणा होण्याकडे वाटचाल करू लागण्याची उदाहरणं तशी कमी नाहीत. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नॉर्वेची अधिकृत एंट्री असलेल्या ‘व्हॉट विल पीपल से’ला अगदीच कंटाळवाणं किंवा रटाळ नसलं तरी कंटाळवाणं होण्याचं ग्रहण लागतं.

निशा (मारिया मोजदा) या मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या मात्र सध्या नॉर्वेमध्ये स्थायिक असलेल्या मुलीची ही कथा आहे. बऱ्याच कर्मठ म्हणता येईल अशा कुटुंबियांमुळे तिच्यावर असलेल्या काहीशा सौम्य बंधनांची कल्पना सुरुवातीलाच येते. त्यातही हा कर्मठपणा तिच्या आईकडून जरा अधिक प्रमाणात लादला जाताना दिसून येतो. आपल्या बॉयफ्रेंडला घरच्यांपासून लपवून बेडरूममध्ये प्रवेश देते खरी, पण पकडलं गेल्यानंतर तिच्या आयुष्याला वेगळं वळण लाभून तिची रवानगी पाकिस्तानात होते. ज्यामुळे सांस्कृतिक पातळीवर अधिक प्रखर देशात आल्यानं ती जणू आगीतून फुफाट्यात पडते.

आता हे मूळ कथानक असल्यावर सदर पात्राशी गुंतवणूक होणं साहजिक आहे, जे दिग्दर्शिका-लेखिका इरम हक चांगल्या अभिनेत्यांच्या आणि वास्तववादी दृष्टिकोनातून साध्य करतेही. मात्र ती त्याहून अधिक काही साध्य करण्याचा प्रयत्नही करताना दिसत नाही. ज्याचं कारण विषयाच्या प्रेमात पडून मांडणीकडे दुर्लक्ष करणं हे मानता येण्यास वाव आहे.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category/

.............................................................................................................................................

जे अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह सोनिया’बाबत जे घडलं, तेच इथंही घडतं. ‘व्हॉट विल पीपल से’मध्ये रूट करता येतील अशी पात्रं तर समोर आणली जातात, मात्र त्यांना अधिक मानवी छटा प्रदान करण्याबाबत लेखिका काहीशी नीरस असल्याचं दिसतं. कारण एकदा साधारण कथानक उभं झाल्यावर पात्रांना त्यात फुलू देत, एकमेकांशी कनेक्ट होऊ देण्याऐवजी वारंवार एकच मुद्दा अधोरेखित केला जातो. पाकिस्तान-नॉर्वेतील सांस्कृतिक बदल आणि फरक, मूलभूत स्वातंत्र्य ते परंपरागत चालत आलेला कर्मठपणा, इतर देशांतील चाईल्ड वेलफेअर ते पाकिस्तानसारख्या देशात किमान मदतीचाही अभाव असणारी यंत्रणा (?) अशा एक अन् अनेक गोष्टी, समस्या आहेत. वुई गेट द पॉइंट. पण पुढे काय?

चित्रपटाला किंबहुना प्रेक्षकाला छळणारी समस्या म्हणजे पुढे काहीच होत नाही. अर्थात पटकथेच्या अनुषंगानं पाहिलं तर बरंच काही होतं. निशा दुःख सोसते, त्यापासून पळते, भौतिक-मानसिक अडथळ्यांमुळे परत येते, पुन्हा दुःख, पुन्हा त्यापासून पळणं, पुन्हा परतणं हे चक्र सुरू राहतं. क्वचित त्यात बदल होतो, पण क्वचितच.

मिर्झा, निशाच्या वडिलांच्या पात्रामध्ये (आदिल हुसैन) काही शक्यता दिसून येतात. मात्र त्याही निशा किंवा इतर पात्रांप्रमाणे अर्धवट सोडल्या जातात. सदर पात्रांचा, त्यांच्या अधूनमधून जाणवणाऱ्या निरनिराळ्या छटांचा म्हणाव्या तितक्या सामर्थ्यानिशी आढावा तसा घेतला जात नाही. उदाहरणार्थ, मिर्झा हा निशाची आई, नजमापेक्षा (एकावली खन्ना) काहीसा पुढारलेला असल्याच्या सौम्य का होईना, पण सहजासहजी दिसून येणाऱ्या छटा त्यामध्ये दिसतात. ज्यामुळे दरवेळी तो समोर असताना फारच प्रतिगामी स्वरूपाच्या घटना समोर घडताना त्यात जी, अस्वस्थता जाणवते, तिला कधी मूर्त स्वरूपच मिळत नाही. त्यामुळे त्याचं या गोष्टींना विरोध न करणं अधिक अतर्क्य वाटत राहतं. उत्तरार्धात तर ही भावना आणखी बळावत जाते. ज्यामुळे सुरुवातीला एक व्यक्ती म्हणून सदोष असलेली पात्रं काही काळानं केवळ वाईटरीत्या लिहिलेली भासू लागतात. उत्तरार्धात आदिल आणि मारिया एअरपोर्टवर बसलेल्या एकट्या फ्रेमनं जो प्रभाव निर्माण होतो, तसा पूर्ण चित्रपटभर किंवा अगदी त्याच्या शेवटीही होत नाही. अगदी चित्रपटाच्या नावालाही त्याच्या पात्रांइतकंच अंडररेट करून दोघांनाही न्याय न दिल्याची भावना निर्माण होते.

त्याचं वास्तववादी स्वरूप त्याला काही प्रमाणात पाहण्यास त्रासदायक बनवतं. जे त्याचा विषय पाहता नक्कीच सकारात्मक मुद्दा आहे. अगदी तळातलं, प्रखर वास्तव पडद्यावर आणण्याबाबत काहीच आक्षेप नाही, किंबहुना तो नसावा. मात्र बऱ्याचदा त्याला अधिक वास्तववादी बनवण्याच्या भरात त्यातील मांडणीकडे दुर्लक्ष होताना दिसतं. ज्यामुळे भाषा, स्थळ, काळाच्या संदर्भापलीकडे जाऊन पारिणामकारक ठरण्याचं पोटेन्शियल असलेल्या ‘व्हॉट विल पीपल से’ला डॉक्युमेंटरीचं स्वरूप प्राप्त होतं.

शिवाय विषय म्हणजे सर्व काही आणि मांडणीला महत्त्व नाही अशी अवस्था होऊन बसते. सदर चित्रपट जसा नॉर्वेची अधिकृत ऑस्कर एंट्री आहे, तसाच ‘लव्ह सोनिया’ भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या शर्यतीत होता, याचं आता विशेष आश्चर्य वाटत नाही. खासकरून ‘व्हॉट विल…’ पाहिल्यावर तर नाहीच नाही.

टीप : ‘व्हॉट विल पीपल से’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ऑनलाईन स्ट्रीमिंग सर्व्हिसवर प्रदर्शित झालेला आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......