१. प्रास्ताविक
कधी अचानकच मनाच्या तळाशी कसल्याशा आठवणींच्या धाग्यांमुळे सुप्त रूपात साठलेल्या अनेक गोष्टींची चित्ररूप फिल्म मनात उलगडत राहते. मनाकडे निवांतपण असले की ती फिल्म पाहताना आठवणीतील माणसांचा आवाज आणि विचार यातून ती बोलू लागते. आठवणींना उजाळा मिळतो....
थंडीच्या दिवसात पहाटे उठून चादर लपेटून अभ्यासाला बसलेलो असायचो. लांबवरचे देवळातील घंटा आणि काकड आरतीचे स्पष्ट-अस्पष्ट आवाज यायचे. कधी आकाशातील त्या निर्गुणाला साद घालणारी बांग हलकेच कानावर यायची. अभ्यासातून लक्ष उडून जायचे आणि ते त्या ईश्वराच्या रूप गुणांकडे आणि निर्गुणाकडे जायचे. हळूहळू पाखरांचा चिवचिवाट सुरू व्हायचा. घरात हळूहळू जाग यायची आणि मग रेडिओवर मराठी-हिंदी भजन सुरू व्हायची. मोठं रम्य वाटायचं. संध्याकाळी वयस्क माणसं देवळात दर्शनाला जायची. देवाला नमस्कार वगैरे झाल्यावर परस्परांना भेटायची. सुख-दुःखांच्या चार गोष्टी करायची. घर ही भेटण्याची खासगी जागा. तर देऊळ हा त्या जागेला एक मोफत आणि मुक्त सार्वजनिक पर्याय होता. आजूबाजूला आम्ही लहान मुलं धांगडधिंगा घालायचे. तरुण पोरापोरींच्या नजरा परस्परांना तिथेच भेटायच्या. देवळे म्हणजे अध्यात्मासोबतच परस्परांना भेटण्याची सार्वजनिक ठिकाणं होती. ती सांस्कृतिक केंद्रं होती. तिथं भजन, कीर्तन, आणि प्रवचन या अंगानं काव्य, संगीत, अभिनय, वक्तृत्व अशा अनेक कलांचं शिक्षण घडायचं. अवचितपणे गाठ पडलेल्या वारकऱ्यांची चित्रं नजरेसमोर तरळत जातात. कंटाळा आला, घरात नकोसं वाटलं, अशा कौटुंबिक कारणांबरोबरच देवाची ओढदेखील त्यांच्या नजरेत दिसायची. अशा देवळांना, मोत-माऊली (माउंट-मेरी)सारखी ख्रिश्चन देवता आणि दर्ग्यांना केंद्र मानून जत्रा-उरूस रंगल्याचं अनुभवलं. त्यानिमित्तानं बाजार, करमणूक, पर्यटन याप्रमाणेच परस्पर संबंध दृढ करणाऱ्या परंपरा रुजल्या. पीरांना मानणारी, मोहरमचे ताबूत आपल्या घरात बसवणारी हिंदू माणसं भेटली. मंगळसूत्रं, नऊवारी साड्या, पायात जोडवी घालणाऱ्या मुस्लीम स्त्रिया दिसल्या. सामवेदी ख्रिश्चन मित्र भेटले. थोडक्यात म्हणजे ही मंदिरं, मशिदी, चर्चेस, गुरुद्वारा आणि त्यांच्या भोवताली परंपरेनं उभारले गेलेले सण, उत्सव, जत्रा, या साऱ्या गोष्टींतून माणसं परस्परांना जोडली गेली. त्याचीही ठळक मोहोर इतिहासात उमटली.
२. भगवंताचा भगवंतराव
लहानपणी स्वतःची फजिती झाल्याच्या आठवणी कधी मनाच्या तळातून सुळूकन वर येतात आणि माझं मलाच हसू येतं.
‘घराकडे लक्ष ठेव रे, मी आलेच भगवंताला जाऊन’, नेहमीप्रमाणे काकूनं मला आवाज दिला. तेव्हा आम्ही बार्शीला काका-काकूंकडे राहायचो. माझं वय असेल आठ दहा वर्षांचं. बार्शीचं ग्रामदैवत भगवंत. त्याच्या देवळात जाणं हा अनेकांप्रमाणे काकूचाही नेम होता. ‘भगवंताला जाऊन येते’ असे काकू कसं काय म्हणू शकते, असं मला आपलं नेहमी वाटायचं. त्या दिवशी एक नातेवाईक घरी आले. घरी मी एकटाच होतो. त्यांनी माझ्याकडे चौकशी केली, ‘काका- काकू कुठे आहेत?’ मी सांगून टाकलं, ‘काका शाळेतून यायचे आहेत आणि काकू किनई भगवंतरावांकडे देवळात गेलीय. तुम्ही बसा.’ माझ्या या उत्तरावर ते जोरजोरात हसले. त्यांनी घरी सगळ्यांना हा किस्सा नंतर सांगितला. त्यानंतर बरीच वर्षं भगवंताला ‘भगवंतराव’ म्हणणं, हा माझ्या चेष्टेचा विषय झाला होता. शाप-आशीर्वाद देणारा, स्वर्गा-नरकात धाडणारा, प्रसन्न झाला की, गरिबी दूर करणारा देव. एवढा मोठा देव. त्याला एकेरी नावानं कशी हाक मारायची? बाळाचे बाळासाहेब, गणपतचे गणपतराव, हरीचे हरिपंत होतात; इतकंच काय पण बार्शीतच भगवंतराव सुलाखे होते. त्यांचं खरं नाव फक्त ‘भगवंत’ असणार. मग मी भगवंत या देवांचा उल्लेख ‘भगवंतराव’ असा केला, तर त्यात माझं काय चुकलं, ते काही तेव्हा मला कळलं नव्हतं. आता त्याचं मलाही हसू येतं आणि त्यातून मनात अनायासे पडलेले दान आठवते.
३. ठोब्बा पांडुरंग
थोडा मोठा झालो होतो. तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुराशी माझा संबंध आला. देवळातील विठोबा आणि त्याचे अनेक भक्तही भेटले.
तेथील विठोबानं तर माझ्या मनात कहरच केला. पंढरपुरात या विठ्ठलाचे उल्लेख इटू, विठू, विठाई, ठ्ठोब्बा, पांड्रुंग अशा एकेरी नावानंच होताना ऐकलं. तुकाराम महाराजांनी तर त्याला नाही नाही ते बोलून घेतल्याचं कानावर आलं होतं. ते पाहून आणि ऐकून मी अस्वस्थ व्हायचो. नामदेवाच्या पायरीला चुकून पाय लागला तर मनातल्या मनात आबा तोबा करायचो. बार्शीचा भगवंत काय आणि पंढरपूरचा विठोबा काय, त्यांना स्वतःचा किती कमी आब आहे असं वाटायचं. तो काळ किमान ‘उच्चार सुधारण्यासाठी’ रामरक्षा घटवून घेण्याचा होता. रामरक्षेतील प्रभू रामचंद्र आणि भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण हे देव कसे भारदस्त वाटायचे! त्यांचा तो सोनेरी मुकुट, झुळझुळीत रेशमी वस्त्रं, त्यांच्या एकाहून एक सुंदर बायका, त्यांचे सोन्या-मोत्यांचे दागिने, हातातील शस्त्रं हा सगळा जामानिमा मनावर खूप प्रभाव टाकत असे. त्यामुळेही हे देव फार भारी वाटायचे. त्यांच्या तुलनेत पायाशी अंबरीश राजा असणारा भगवंत हा देव ठीकठीकच वाटला होता. परंतु विठोबाचं मात्र काही खरं नाही, असंच वाटलं. त्याच्या नावानं संस्कृत भाषेत एकही स्तोत्र किंवा आरती नाही. त्याच्या नावानं रामायण-महाभारतासारखा किंवा गीतेसारखा पवित्र ग्रंथ नाही. त्याची बायकोदेखील शेजारी नव्हती. त्याच्या वर्णनात कधी डोक्याला मुंडासं, तर कधी सोन्याचा मुकुट; खांद्यावर कधी घोंगडी, तर कधी शेला; गळ्यात सोन्याचा दागिना नको, फक्त साधी तुळशीमाळ हवी. यापैकी खात्री कशाचीच जाणवत नव्हती. कदाचित म्हणूनच त्याला एकेरी नावानं हाक मारत असतील, असं वाटून गेल्याचं पुसटसं आठवतंय. मी लहान असताना विठोबानं मला असं मोठं कोडं घातलं होतं. मनातले ते कोडं खूप वर्षं दबलेलं राहिलं.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.booksnama.com/client/book_list_by_category
.............................................................................................................................................
४. सालंकृत विठ्ठल असा असावा
लहानपणी विठोबानं घातलेले कोडे चाळीस-पंचेचाळीस वर्षानंतर आता पुन्हा मान वर काढू लागलं, तेव्हा समोर फक्त वरील वर्णनाची मूर्ती होती. त्याला सजवायचं कसं?
दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणचे रीती-रिवाज पाहिले गेले. नानाविध परंपरा जवळून-लांबून पाहिल्या. संतवाणी कानावरून गेली. विविध अंगांनी धर्म आणि अध्यात्म याबाबतच्या चर्चा ऐकल्या आणि केल्या. सावरकरांचा ‘निरीश्वरवाद’, बर्ट्रांड रसेल, डॉ. कोवूर, कार्ल मार्क्स, विवेकानंद यांच्या वाङमयाशी परिचय झाला. त्यामुळे नव्यानं सामोऱ्या येणाऱ्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकेन, अशी अंधुक आशा वाटू लागली. परंतु प्रश्न तरी कुठे मूळ स्वरूपात राहिला होता?
एकीकडे विठ्ठलाशी निगडित कथा, अभंग, गाणी, आख्यायिका, संतचरित्रं आणि साक्षात परंपरा या साऱ्यांतून साकारणारा देव भुरळ घालत होता. त्या वेळी तो देव मनात नवनवे प्रश्न निर्माण करत होता. याची मूर्ती पाहून वाटायचं सामान्य माणसाप्रमाणे याला दोनच हात आहेत, इतर देवांप्रमाणे चार हात नाहीत. याचा एकही हात आशीर्वाद मुद्रेत नाही. त्याचे दोन्ही हात कंबरेवर. जणू हा देव भक्तांची वाट पाहात उभा आहे. त्याच्या हातात कसलंही शस्त्र नाही, ना धनुष्यबाण, ना गदा-चक्र. हा कधी कुठला राजा नव्हता. त्यानं कधी शापवाणी उच्चारून स्वतःचं तोंड भ्रष्ट केलेलं नाही. कुणाचा रागराग केला नाही, की तपश्चर्या आणि नैवेद्य अथवा पूजेची लाच घेऊन स्वर्गसुखाची दारं कुणासाठी उघडली नाहीत. किंवा कोणाची तपश्चर्या मोडण्यासाठी नाना प्रकारे खटाटोप केला नाही. सोवळ्या-ओवळ्याचे दंभाचार मिरवले नाहीत. या देवानं कधी जातिभेद अथवा लिंगभेद केला नाही, की एखाद्या मोठ्या तत्त्ववेत्त्याचा आव आणला नाही. अतिमानवी शक्तीचे चमत्कारिक प्रयोग करून विठ्ठलानं कधी स्वतःचं स्तोम वाढवलं नाही. ब्रह्मा-विष्णू-महेश, गणेश, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा या देव-देवतांपेक्षा किती वेगळा देव आहे हा! वरील प्रत्येक वर्णन मनात एकेक प्रश्न निर्माण करत होते. मूळ प्रश्नाला अशा या नवनव्या प्रश्नांचे धुमारे फुटून मनात एक प्रश्नवृक्षच तयार झाला होता. लहानपणी ‘बिच्चारा’ वाटणारा विठोबा इतर देवांपेक्षा हा विठू किती वेगळा आहे, असं वाटून जायचं.
विठ्ठलानं भक्तांना मदत केल्याच्या आख्यायिका एका मित्रानं दुसऱ्याला नकळत मदत केल्याच्या धर्तीवरील आहेत. त्यानं कधी कोणता व्यवसाय श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानला नाही. सज्जन कसायाला मांस विकू लागणारा विठोबा जनाबाईबरोबर दळण-कांडण करू लागायचा. फार झालं तर भक्तांशी त्यानं प्रेमाच्या चार गुजगोष्टी केल्या. त्याला ना कोणी नवस बोलले, ना कोणी ऋद्धी-सिद्धी पदरात पाडून घेतल्या. भक्तांमध्ये विठोबा एखाद्या सामान्य माणसाच्या मितभाषी किंवा अबोल अशा सुहृद मित्रासारखा वावरला. त्याच्या केवळ अस्तित्वानंच मैत्रीचा सुगंध दरवळला. मग अशा सुहृद मित्राला घाबरून किंवा वचकून असायचं संतांना कारणच नव्हतं. त्याला मान देण्यासाठी ‘पांडुरंगराव’ किंवा ‘प्रभू’ विठ्ठल असल्या चमत्कारिक उपाध्यांची मुळीच गरज नव्हती. लहानपणी मला पडलेला हा मूळ प्रश्न मी बऱ्यापैकी मोठा झाल्यावर असा मऊसूतपणे सुटला होता. तरीही प्रश्नवृक्ष काही माझा पिच्छा सोडत नव्हता.
बौद्धरुपी कानडा कर्नाटकू : कमरेवर दोन्ही हात ठेवून ‘अठ्ठावीस युगे’ भक्तांची वाट पहात असणाऱ्या विठ्ठलाची मूर्ती तर ठरली, परंतु त्या विठ्ठलाला कोणत्या गुणांनी सालंकृत करायचं, हा प्रश्न त्यावेळच्या संतमंडळींसाठी मोठा गहन असावा. याचं साधंसं कारण म्हणजे वारकरी मंडळींच्याही खूप पूर्वी भारतात गौतम बुद्ध होऊन गेले. बौद्ध धर्माचा प्रसार महाराष्ट्रातही झाल्याचे काही अजिंठा, वेरूळ, कार्ले, कण्हेरी, अशी काही लेणी हे निर्विवाद पुरावे आहेत.
ज्ञानोबांनी त्यांच्या एका प्रसिद्ध रचनेत विठ्ठलाला ‘कानडा वो विठ्ठलू, कर्नाटकू’ म्हटलं आहे. इतर कथानकांनुसार देखील विठ्ठल हे दैवत मराठी भाषेतील वाटत नाही. राम-कृष्णांच्या जन्मकथांप्रमाणे विठोबाच्या जन्माशी यज्ञ-याग, निपुत्रिक राजा-राणी, मातब्बर घराणी यांचा कुठेही संबंध लागत नाही. त्यांच्या आई-बापाचा पत्ता कहाण्या-आख्यायिकांतून लागत नाही. विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार असल्याचे उल्लेख असणाऱ्या कथा जरूर आहेत. परंतु त्या जनमानसात फारशा रुळलेल्या नाहीत. या नि:शस्त्र देवाशी दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी अवतार घेतल्याच्या कथा मुळीच निगडीत नाहीत. राम, कृष्ण, विष्णू, यांच्या कथांसारखे चमत्कारदेखील विठ्ठल कथांमधून दिसत नाहीत. पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपुरी अवतारला, हीच काय ती विठ्ठलाच्या वैष्णवीकरणाशी संबंधित कथा वारकरी संप्रदायात स्वीकारली गेली आणि तीच जास्त प्रचलितदेखील झाली. गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाप्रमाणे भलं मोठं तत्त्वज्ञान सांगणं तर सोडाच, परंतु हा देव फारसं बोलतदेखील नाही. त्यानं जणू मौन धारण केलं आहे.
विठ्ठलाचं मौन भगवान बुद्धांच्या प्रतिमेशी मिळतंजुळतं आहे. विठ्ठल हा बुद्धाचा अवतार असल्याची धारणा संतांनी अनेकदा स्पष्टपणे व्यक्त केली आहे. नामदेव या नवव्या अवताराबद्दल म्हणतात
‘गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रांवरू |
आपण योगेश्वरू बौद्धरुपी ||
व्रत भंगासाठी बौद्ध अवतार |
झाला दिगंबर अवनिये||’
संत एकनाथ बुद्धालाच विठ्ठल मानतात आणि म्हणतात,
‘लोक देखोनी उन्मत्त, दारांनी आसक्त!
न बोले बौद्धरूप, ठेविले जघनी हात||
नववा वेसे स्थिर रूप, तथा नाम बौद्धरूप| १
धर्म लोपला अधर्म जाहला, हे तू न पाहसी|
या लागी बौद्धरूपे, पंढरी नांदसी|| २
विष्णूच्या दशावतारात बुद्धाचा समावेश होण्याची प्रक्रिया गुप्तकाळातच पूर्ण झाली होती. परिणामी, विष्णूचा नववा अवतार म्हणून तेराव्या शतकापासून निर्माण झालेल्या मराठी वाङ्गमयानं बुद्धाला स्वीकारणं सहज शक्य आहे. त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकण या भागात बौद्ध धर्म बऱ्याच मोठ्या प्रमाणात असल्याची साक्ष अनेक मार्गांनी मिळू शकते. अजिंठा, वेरूळ, कान्हेरी, कार्ले येथील लेण्यांची साक्ष तर वादातीत आहे. सातवाहनपूर्व काळात महाराष्ट्रातील नागवंशीय मंडळींचं बुद्धप्रेम सर्वश्रुत आहे. नेवाशाला सातवाहन काळातील सापडलेला मातीचा चैत्य आणि नाशिकचा स्तूप देखील महाराष्ट्रातील बौद्ध प्रभावाचंच उदाहरण आहे. दशावतारांची चित्रं छापलेल्या पंचांगात विठ्ठलाच्या चित्राखाली ‘बुद्ध’ असं लिहिण्याची परंपरा खूप काळ चालत असल्याचं डॉ. ढेरे यांना आढळून आलं आहे. या सर्व पुराव्यांच्या जोडीला संत परंपरेतील करुणा पाहता ढेरे यांचं पुढील विधान मनाला स्पर्शून जातं, ‘महाराष्ट्रात हजार- दीड हजार वर्षे नांदलेल्या भगवान बुद्धाने आपल्या हृदयातील करूणेचा कमंडलू बाराव्या-तेराव्या शतकात जाता जाता येथे उपडा केला. अन मग त्याची धारा धुष्ट-पुष्ट होऊन वाहती राहण्यासाठी संतांनी आपल्या भावभक्तीचे अनेकानेक प्रवाह तिच्यात मिळविले. त्यामुळे ‘विठ्ठलात’ एक महासमन्वय दिसून येतो.’
महासमन्वय : सोलापूर, विजापूर आणि उस्मानाबाद या महाराष्ट्रच्या दक्षिण-पूर्व भागात ‘शैव-वैष्णव’ वाद कडाक्यानं चालत. त्याचीच परिणती वैष्णवांनी शिवरात्रीला मुद्दाम पुरण-पोळी करण्यात आणि शैव आणि स्मार्तमंडळींनी त्याचीच ‘री’ आषाढी एकादशीस ओढण्यात झालेली मीसुद्धा लहानपणी पाहिलं-ऐकलं आहे. परंतु मराठी संतांनी मात्र विठ्ठालास ‘हरी-हर’ एकता बहाल केली. त्यामुळे विठोबाच्या पंढरीस एकाच वेळी ‘भूवैकुंठ’ आणि ‘भूकैलास’ असा दर्जा प्राप्त झाला.
मराठी संतांनी विठ्ठलाला कृष्ण, शिव, आणि बुद्ध रूपांत ज्याप्रमाणे वारंवार पाहिले, तसं आणि तेवढ्या वारंवारीतेनं ‘जिन’ म्हणून पाहिल्याचं आढळत नाही. परंतु विठ्ठलाचं मौन आणि करुणमूर्तीरूप ज्याप्रमाणे बुद्धाकडे अंगुलीनिर्देश करतं, त्याचप्रमाणे संतांनी वर्णन केलेलं विठ्ठलाचं ‘दिगंबरत्व’ बाळकृष्णाकडे आणि जैन धर्माकडेही बोट दाखवतं. गोपालक श्रीकृष्णाचा चुलत भाऊ म्हणजे नेमिनाथ हा जैनांचा बाविसावा तीर्थकर आहे, असं जैन पुराणे मानतात. ‘पंढरीचा विठोबा हा देव जैनांचा आहे’, असा त्यांचा दावा अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत केला जात असावा. अशा या महासमन्वयातून जो लोकदेव विठ्ठल संतांमुळे उन्नत झाला. त्यामध्ये हरिहर आणि किमान बुद्ध यांचा समावेश झाल्यानं वैदिक-अवैदिक आणि जातीदृष्ट्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे भेद वारकरी संप्रदायात मिटवले गेले होते. महाराष्ट्रातील सर्व स्त्री देवतांना टाळून संतांनी विठ्ठलामध्येच मातृत्व पाहिलं आणि पंढरपूरला स्वतःचं माहेर मानलं.
विठ्ठल-उन्नयनाचे प्रयत्न : महाराष्ट्रात विठ्ठल आणि संतमंडळीं यांचा संबंध फार निकटच्या सुहृद मित्रासारखा, तर कधी आई-मुलाच्या प्रेमासारखा. म्हणून या परंपरेचा शोध घेताना नामदेवांच्या पायरीला हात लावून ती ओलांडायची आणि काय काय दिसतं ते पाहायचं, असं मी ठरवलं.
ठरवले खरं, परंतु लगेच अनेक प्रश्न मनात उभे राहू लागले. त्यांचा प्रश्नवृक्ष बनला. त्याची पानं सळसळू लागली. इतर देवाधिदेव संतांना परिचित असूनदेखील त्यांनी विठ्ठलासारखा देव का घडवला? तो घडवण्यासाठी आणि त्याचे अंतरंग समजवण्यासाठी संतांना साधन-सामग्री कुठून मिळाली? त्यांनी विठ्ठलाची केवळ पंढरपूरातच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्रात प्राणप्रतिष्ठा कशी केली? यासाठी त्यांनी कोणकोणत्या परंपरांतून स्वतःची निवड केली? ज्ञानेश्वर ते तुकाराम या साधारणतः चारशे वर्षांच्या काळात संतांच्या या सामूहिक कृतींमधून कोणती आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यं रुजली? ... अनंत प्रश्नांची मालिकाच जिवंत होऊन माझ्यापुढे उभी ठाकली.
या प्रश्नवृक्षाखाली निवांतपणे विचार करत बसलो असताना एकदा जाणून गेलं की, यांतील काही प्रश्न आपल्या आधीही अनेकांना पडले असणारच. त्यांच्या कामाचा शोध घेतला, तर किमान काही प्रश्नांची उकल सहजपणे होऊन जाऊ शकेल. या शोधातून एक बहुमूल्य असं पुस्तक हाती आलं. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेलं ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ हे ते पुस्तक! या पुस्तकानं विठ्ठलाची निर्मिती कोणी, कशी आणि का केली, या प्रश्नाची उकल सुलभपणे करून दिली.
विठ्ठल किंवा बिरप्पा हा तसं पाहिलं तर धनगर, मेंढपाळ, गवळी या जाती-जमातींचा लोकदेव. म्हणूनच कदाचित अनेक विठ्ठलमंदिरातून त्याला सामिष म्हणजे मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा असावी. कित्येक धनगर गीतांतील विठ्ठलप्रतिष्ठेच्या कथा या गोपजनांच्या स्थलांतराच्या आणि नव्या ठिकाणी बस्तान बसवण्याच्या कथा वाटतात.
या लोकदेवाची प्रतिष्ठा वाढवणारं किंवा त्याचं उन्नयन करणारे चार सामाजिक घटक डॉक्टर ढेरे यांच्या संशोधनातून स्पष्ट होतात. या चार घटकांची साधनं, मूल्यं आणि हेतू अर्थातच भिन्न होते. त्यांनी या लोकदेवाचं उन्नयन केलं, त्यामागी सामाजिक प्रक्रियादेखील फार वेगवेगळे होत्या.
पारंपरिक जाती आणि वर्णांच्या उतरंडीत ज्यांना कधीच महत्त्वाचं स्थान नव्हतं, अशी काही मंडळी दक्षिणेत राजेपदास पोहोचली होती. काहींना सत्तेमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं होतं. हा पहिला घटक होय. स्वप्रतिष्ठेसाठी रूढ उतरंडीतील उच्चवर्णीयांचे वंशज म्हणून घेणं, हा त्यांच्या दृष्टीनं सर्वांत सोपा मार्ग होता. त्यांनी स्वतःस राम-कृष्णाचे वंशज म्हणवून घेतलं. त्या दिशेनं त्यांनी स्वतःच्या परंपरांचा अर्थ लावला. त्यांभोवती अनेक कथानकं रुजवली. कृष्ण हा विष्णूचा अवतार. तो गोकुळात गोपजन म्हणूनच वावरलेला यादव. त्यामुळे दक्षिणेतील बऱ्याच राज्यांनी स्वतःला यादव किंवा यदुवंशी म्हणून घेतल्याचं आढळतं. त्यांनी स्वतःचा पारंपरिक लोकदेव विठ्ठल, बीरप्पा यापैकी विठ्ठलास काही अंशी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यासाठी यज्ञयाग केले, दानं दिली. तरीही बराच काळ विठ्ठल हा धनगर, मेंढपाळ, गवळी यांचा लोकदेवच राहिला. याचे कारण म्हणजे सत्तेच्या जवळ पोहोचलेल्या मोजक्या मंडळीचा अपवाद सोडून बाकीच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती विठ्ठलाचे लोकदेवत्व राखू पाहणाऱ्या होत्या. या दुसऱ्या घटकांच्या जाती-जमातींच्या परंपरांमध्ये विठ्ठलाचं मूळ असल्यानं विठ्ठलाच्या जन्म कथांमधील घराण्यांचा संबंध मातब्बर राजेरजवाड्यांपर्यंत पोहोचणं दुरापास्तच होतं. या जाती जमातींनी जुन्या परंपरा टिकवत जाती उतरंडीतील वरची पायरी चढता आली तर पहावी, या दृष्टीनं विठ्ठलाचं उन्नयन करायचा प्रयत्न केला.
या दोन घटकांशिवाय रूढ परंपरेत शास्त्री-पंडित-पुजारी असं स्थान मिळालेल्या तिसऱ्या घटकाचा विठ्ठलाचं उन्नयन करण्याचा प्रयत्न वेगळ्याच मार्गानं गेल्याचं दिसतं. या घटकास वेद-पुराणं यांचा भक्कम आधार होता. जोडीला संस्कृत भाषेवर पकड होती. त्यामुळे त्यांना समाजात मोठी प्रतिष्ठा होती. परंतु अशा प्रतिष्ठेच्या परंपरा नसणारा लोकदेव विठ्ठल जर प्रतिष्ठा पावू लागला, तर या घटकाचं सामाजिक स्थान धोक्यात येण्याचा संभाव होता. त्यामुळे या मंडळींनी विठ्ठलाचं वैष्णवीकरण करणं हा मार्ग पत्करला. त्यासाठी त्यांनी ‘क्षेत्र महात्म्य’, ‘पांडुरंग महात्म्य’, ‘विठ्ठल गीता’ अशी अनेक प्रकारची ग्रंथनिर्मिती संस्कृत भाषेत केली. पुंडरिकेश्वडरावर संस्कार करून त्याला भक्त पुंडलिक बनवलं. थोडक्यात म्हणजे विठ्ठलाला संस्कृत भाषेत आणि रूढींच्या कचाट्यात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यायोगे धर्मार्थ सांगण्याची एकाधिकारशाही आणि ईश्वर व माणूस यामधील दलाल ही त्यांची स्थानं भक्कम राहणार होती.
शेवटचा चौथा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्रातील संतमंडळी. अठरापगड जातीची ही संतमंडळी संवेदनाक्षम होती. अत्याचारांचे चटके या साऱ्यांना बसले होते. ज्ञानदेवासारख्या जन्मानं उच्चवर्णीय व्यक्तीही अत्याचारांतून सुटल्या नव्हत्या. त्यांच्यावरील सवर्णांचा बहिष्कार अखेरपर्यंत उठला नाही. त्यांना ब्राह्मण म्हणून मान्यता मिळणं तर सोडाच, पण हिंदू म्हणून घ्यायलादेखील परवानगी नसावी. ‘चोखा डोंगा परी, रस नोहे डोंगा’ असं कवन करणारे चोखा मेळा यांना त्यांचं बोचरं ‘डोंगेपण’ रूढींनी पत्करायला लावलं होतं. तुकोबादेखील म्हणतात, ‘बरा कुणबी केलों । नाही तरि दंभेंचि असतों मेलों ॥ १ ॥ (संदर्भ : अभंग क्र. ३२०, श्री तुकारामबोवांच्या अभंगांची गाथा) या संतमंडळींना सर्व अपराध पोटात घालणारी, कृपाळू, क्षमाशील माउली, या रूपातला देवा हवा होता. आई आणि पोरात तिसऱ्या दलालाची गरज काय? ती त्यांना नको होती. कर्मकांडांची आणि सोहळ्याची देखील मातब्बरी मंजूर नव्हती. जो जातींचा आणि वर्णांचा काच स्वतः भोगला, त्याचीच तळी उचलून धरणारा देव त्यांना चालणार नव्हताच. ‘तिर्थी धोंडा-पाणी’ पाहणारी आणि ‘सज्जनांचे मनी ईश्वर’ पाहणारी अशी ही संतमंडळी होती. त्यांना विष्णूच्या चोवीस अवतारांनी आणि सहस्त्रनामांनी उष्टावलेलं देवाचं रूप नकोच होतं. दिनकर स्वामींप्रमाणे या संत मंडळींनी न उष्टावलेल्या रूपातील लोकदेवाला आपलंसं केलं. त्यातून विठ्ठलाची प्रतीमा हवी तशी घडवली. त्यांनी ना मठा-पीठांची खटपट केली, ना देव आणि माणसातील दलालीला मोकळं दार ठेवलं. संस्कृत भाषेचा बडेजाव न जुमानता ‘संस्कृत देवानं निर्माण केली, तर मराठी काय चोरापासून जाहली’, असा रोकडा सवाल करून मराठीत ज्ञान आणण्यासाठी ‘अमृताते पैजा जिंकी’ या तोलामोलाची मराठी घडवली.
समाजातील वरील चार घटक आणि त्यांचे चार मार्गांनी जाणारे विठ्ठलउन्नयनाचे प्रयत्न, या सामाजिक प्रक्रिया होत्या. त्यांचं भान कायम जागं ठेवणं आपल्यासाठी अगत्याचं आहे. तथाकथित ‘यदुवंशी’ राजे, गोपजन आणि शास्त्री-पंडित-पुजारी मंडळी या तीन घटकांच्या तुलनेत संतांनी अवलंबलेली उन्नयनप्रक्रिया वैदिक धर्माविरुद्धची बंडखोरी होती, हे स्पष्ट आहे. त्यांना समाजाशी काही देणंघेणं नसतं, केवळ स्वतःसाठी ‘मोक्ष’ मिळवायचा असता, तर ही मंडळी समाजात वावरलीच नसती. ‘काय भुललासी वरलिया रंगा’, हे चोखामेळ्याचं सांगणं किंवा ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले| तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा||’ ही तुकारामाची कसोटी नवीन मूल्यं घडवण्यासाठीच होती. रूढी, दंभ, आणि अज्ञान यावर कोरडे ओढणारी संतमंडळीच त्या काळी महार जातीचं पोर उचलून घेऊन जाणं.
वरील चार घटकांनी विठ्ठलाचं उन्नयन विविध हेतूंसाठी विविध प्रकारे करण्याचा प्रयत्न केल्याचं आपण पाहिलं आहे. त्या प्रत्येक प्रयत्नास कमी अधिक प्रमाणात यश मिळालं आहे. हे नक्कीच खरं आहे, तरी परंतु या चार प्रयत्नांपैकी मराठी संतांची छाप विठ्ठलाच्या प्रतिमेवर सर्वांत जास्त आहे, याबद्दल दुमत संभवत नाही. संतांनी महासमन्वयातून घडवलेला विठोबा अवैदिक परंपरा आणि पुराण-परंपरा सांगणाऱ्या विविध देवदेवतांपेक्षा वेगळा असणं क्रमप्राप्त होतं. म्हणुनच त्यांनी विठ्ठलाला विष्णुसहस्त्रनामांतील ‘सहस्त्रा वेगळा’ म्हटलं आहे. तसेच तो विष्णूच्या दहा प्रमुख आणि १४ लहान-सहान अशा एकूण चोवीस अवतारांपेक्षा आगळा असल्यानं संतांनी त्याचं वर्णन ‘चोविसा-आगळा’ असं केलं आहे.
दिनकर स्वामींचा विठ्ठल : सारा महाराष्ट्र टाळ-मृदुंगाच्या गजरात मग्न असताना रामदास स्वामींनी मात्र विठ्ठलाऐवजी प्रभू रामचंद्र हे उपास्य दैवत मानलं होतं. सर्वांना माहीत असणाऱ्या या वास्तवाची अनेक कारणं असू शकतील. परंतु हे कोडं मात्र नक्कीच आहे. अशा या रामदास स्वामींच्या शिष्यांपैकी दिनकर स्वामींनी रूढ अशा पुंडलिक-विठ्ठल भेटीच्या कथानकावर स्वतःचे संस्कार केले आणि पुंडलिक भेटीची नवी कथा रचली (या आधी वर आपण विठ्ठल-पुंडलिक भेटीचा उल्लेख केला आहे) आहे.
आई-वडिलांची सेवा करण्यात पुंडलिक मग्न आणि दंग आहे. ते पाहून नेहमीप्रमाणे इंद्रानं विष्णुला पंढरपुरी पाठवलं आहे. देव दारी आला. परंतु पुंडलिकाला मात्र देवाला मुळीच भेटायचं नाही. पुंडलिकाच्या नकाराची कारणं खोदून खोदून विष्णू विचारतो, तेव्हा अनेक अवतारात देवानं केलेल्या कपटकारस्थानांचा आणि पापांचा पाढाच पुंडलिक वाचून दाखवतो. शिवाय वर सांगतो की, अशा देवाला भेटायची त्याला बिलकुल इच्छा नाही. पुंडलिकाला भेटण्यासाठी देव खूपच गयावया करू लागतो, तेव्हा पुंडलिक त्याला दोन अटी घालतो. देव पुंडलिकाच्या दोन्ही अटी मान्य करतो. पहिली अट म्हणजे देवानं आधीच्या सर्व अवतारांशी असलेला स्वतःचा संबंध तोडला पाहिजे. आधीच्या अवतारांतील कपट-कारस्थानांनी आणि पापांनी उष्टावलेला देव त्याला नको आहे. सर्व अवतारांच्या परंपरांशी जेव्हा विष्णू काडीमोड घ्यायला तयार होतो, तेव्हा पुंडलिक देवाला दुसरी अट सांगतो. दुसऱ्या अटीप्रमाणे दहा प्रमुख आणि १४ लहान-सहान अशा चोविसा (आवताराहून) आगळा देव विठ्ठल रूपात पंढरपूरी कायमचा रहावा ही इच्छा आहे. दोन्ही अटी मान्य झाल्यानंतर पुंडलिक ‘विठ्ठलाला’ भेटतो.
स्वतःच्या ‘कपट-कारस्थानांच्या इतिहासाबद्दल’ आणि ‘पराक्रमा’बद्दल न बोलण्याच्या अटीमुळे देवाला संपूर्णपणे नवं जीवन आणि रूप मिळालं नसतं तरच आश्चर्य! या ठिकाणी कबीराची आवर्जून आठवण होते. शेले आणि चादरी विणण्याच्या कामात मदत करायला म्हणून रात्रीच्या प्रहरी धनुर्धारी प्रभू रामचंद्र थकलेल्या कबिराला भेटायला आले आहेत. त्या वेळी रामाच्या विणकामात त्याच्या धनुष्य-बाणाची आणि भात्याची होणारी अडचण कबीराला जाणवते. कबीर प्रभू रामचंद्रांना त्या शस्त्रास्त्रांची अडगळ बाजूला ठेवायला सांगतो. मित्राला मदत करण्यासाठी आलेल्या रामानं धनुष्य-बाण आणि पाठीवर बाणांचा भाता घेऊन यायचं खरं तर काहीच कारण नव्हतं. या कथेतील रामाला नि:शस्त्र करूनच कबीर स्वीकारतो. हे ऐकून वाटतं की, ‘राम निरंजन न्यारा रे, बाकी सकल पसारा रे’ असं लिहिणारा कबीर जर महाराष्ट्रात जन्मला-वाढला असता तर तोदेखील नि:शस्त्र विठ्ठलाच्या गजरात गुंगला असता.
विठ्ठलच का निवडला? : कुठलाही आगा-पिछा नसणारा, पूर्वावतारांची नाळ तुटलेला, मौन बाळगणारा, परभाषिक आणि परप्रांतात मूळ असल्यानं इथं महाराष्ट्रात अपरिचित असणारा देव संतांना सापडला. एखाद्या शिल्पकाराला चांगलासा दगड दिसताच त्यात लपलेलं स्वतःच्या मनातील शिल्प दिसून आनंद व्हावा, तसा संतांना आनंद झाला.
नामदेव-ज्ञानेश्वर ते तुकाराम, मुक्ताबाई-जनाबाई ते तुकाराम शिष्य बहिणाबाई अशा विविध जाती-जमातींमधून आलेल्या संतांनी विठ्ठलाच्या या मूळ द्रव्यातून ज्या प्रकारच्या देवासाठी सारा महाराष्ट्र आसुसलेला होता, असा देव घडवला. स्त्री-पुरुष, ब्राह्मण-महार, खाटिक-वेश्या असा कोणताही भेदभाव न करता या देवानं संत मंडळींना अंगाखांद्यावर घेतलं, तो त्यांच्या ताटात जेवला, पोटाशी धरणारी त्यांची विठाई माऊली झाला. सोवळ्या-ओवळ्याच्या कैदेत नसल्यानं तो संतांना उराउरी भेटला. संतांनीही मोठ्या प्रेमानं त्याच्या पायाला मिठी घातली. देवाला जुनी मूल्यं टाकायला लावून नवी मूल्यं बहाल केली. ती त्यानं स्वीकारली. भागवत, वारकरी आणि नाथसंप्रदाय यांनीदेखील नवी मूल्यं स्वीकारली. दगडातून नवी मूर्ती साकारणं तुलनेनं सोपं असतं. परंतु आधीच असलेल्या एका मूर्तीमधून दुसरी वेगळी मूर्ती घडवणं हे दुरुस्तीचं अवघड काम असतं. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, राम, कृष्ण, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, अशा आधीच सगुण-साकार देवदेवतांवर संस्कार करून सामान्यातला सामान्य देव म्हणून त्यापैकी कोणालाही वावरायला लावणं अवघड होतं. मुख्य म्हणजे साऱ्या महाराष्ट्राला तर जातीपाती न मानणाऱ्या देवाची तहान लागली होती. महाराष्ट्राच्या घशाला पडलेली कोरड संतांना जाणवली. त्यांनी ओंजळी भरभरून चंद्रभागेचं पाणी पाजून महाराष्ट्राला तृप्त केलं.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_list_by_category
.............................................................................................................................................
५. प्राप्तकाल हा विशाल भूधर
विठ्ठल हा त्याच्या पंढरपूरच्या मंदिरातील मूर्तीत कधीच मावला नाही. संतांच्या मनातील विठ्ठल त्यांच्या रचनांमधून विविध रूपांनी साकारत राहिला. मग विठ्ठल हा मूर्तीत, एखाद्या संताच्या वाङगमयात मावत नसेल तर त्याच्या निर्मितीचं माध्यम कोणतं समजायचं?
संतमंडळींच्या अनेक कृती आणि त्यांचे अर्थ आधुनिक कवी-लेखकांच्या मदतीनं उलगडत मनात उलगडत आणि बदलतही राहिले आहेत. संत मंडळींनी ज्या नेटानं नवी मानवी मूल्यं रुजवायचा प्रयत्न केला, तो पाहून आणि जाणून मोठा अचंबा वाटतो. या प्रक्रियेचा भक्कम पाया घालण्याचं काम नामदेव-ज्ञानदेवांनी केलं आणि तुका कळस झाला, असं गृहीत धरलं तर महाराष्ट्रभर माणुसकीचं विशाल मंदिर बांधण्याचं हे काम चार ते पाच शतकं चालू होतं. त्या काळातील विविध संतांना मिळालेला ‘प्राप्त काळ’ हा या मंडळींचा एक प्रकारे कॅनव्हास किंवा विशाल असा भूधर होता. त्यावर चार ते पाच शतकांत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांनी काम करून अठरापगड जाती-धर्माच्या संतांनी सुंदर लेणी कोरली आहेत, असं जाणवल्यावाचून राहात नाही.
कथा, कादंबरी, काव्य, नाट्य, चित्र, शिल्प या कलाकृती म्हणून त्यांचा अनुभव आपण घेतलेला असतो. तसंच लेणी आणि स्थापत्य याही कलांशी आपला परिचय असतो. परंतु केशवसुतांच्या भाषेत ‘प्राप्त कालरूपी विशाल भूधरात खोदलेल्या या सुंदर लेण्यांना’ कसं समजावून घ्यायचं? यांचा अभ्यास कसा करायचा? या प्रकारच्या सामाजिक कलाकृतींच्या अनुभवाचा आनंद कसा मिळवायचा? शिल्पकारानं हातोडी छिन्नी वापरावी, तशी या संतमंडळींनी किंवा संत कलाकारांनी नेमकी कोणती साधनं वापरली? असे अनेक प्रश्न मनात जागे होतात. कलाकृती माणसाला सुसंस्कृत करतात. परंतु या नवीन माध्यमातील कलाकृतीनं सारा समाज थोडा अधिक सुसंस्कृत बनवला आहे. हे ऋण मान्य करण्यासाठी नामदेवांच्या पायरीशी नतमस्तक व्हावं लागतं. जोडीला संतकार्यानं सिद्ध झालेल्या या कलाकृतींच्या सौंदर्याचे निकष कोणते, असं अनेकदा वाटून गेलं.
कुठलीही कलाकृती कलाकारांच्या व्यक्तिगत जीवनाशी आणि सामूहिक म्हणजेच सामाजिक जीवनाशी संबंधित असते. हा संबंध कार्यकारण भावाइतका सरळसोट नसतो. परंतु या जीवनातूनच कलाकृतीचा आकार आणि आत्मा घडत असतो. तरीही कलाकृती म्हणजे जीवन नसते. कलाकृतीला स्वतःचा अवकाश असतो आणि कलामाध्यमाच्या आधारे रसिक मनाशी सुसंवाद साधून त्याच्या मनात आकार तयार करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ, शब्द या माध्यमाद्वारे कथा, कादंबरी, काव्य इत्यादी कला स्वतःसाठी अवकाश निर्माण करण्याची क्षमता बाळगून असतात. कलाकृतीची शब्दसंख्या अथवा पृष्ठसंख्या ही तर केवळ बाहेरच्या आकाराची मोजमापं झाली. ती ओलांडून जेव्हा वाचक कलाकृतीमधील आशयाच्या शेवटाशी येतो, तेव्हा त्याच्या मनात कलाकृतीनं स्वतःचा आकार निर्माण केलेला असतो. कलाकृती रसिकमनात जिवंत झालेली असते. असा अवकाश निर्माण करण्याची क्षमता केवळ कलाकृती मध्येच असते. ही क्षमता संतकार्यात आढळते, म्हणून चार-पाचशे वर्षांतील संतकार्य ही एक कलाकृती आहे. आजही सातशे वर्षांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारकारी मंडळी ठिकठिकाणाहून दिंड्या-पताका घेऊन जातात, ही गोष्ट एखाद्या पुस्तकाच्या पृष्ठसंख्येसारखी आहे. तरीही ग्यानबा-तुकारामाचा गजर हे एक निमित्त होऊन संतकार्याची चित्रफित आपल्या मनात उलगडत जाते, तो या कलाकृतीनं तुमच्या मनात निर्माण केलेला अवकाश असतो. या कलाकृती घडतानाचा ‘प्राप्तकाळ’ हे माध्यम काही रूढ माध्यम नाही. माध्यम आणि साधनं वेगळी असल्यानं या प्रकारच्या कलाकृतीच्या सौंदर्याचे निकष ठरवणं, वाटतं तेवढं सोपं काम नाही. सध्या तरी ते काम बाजूस सारण्यास, अजूनपर्यंत तरी मला पर्याय दिसला नाही.
६. संतपरंपरेच्या मर्यादा
संतपरंपरेनं महाराष्ट्रात जातिव्यवस्थेविरुद्ध आणि कर्मकांडांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारल्यानं नव्या माणुसकीचा ‘वेलू गगनावेरी गेला’. त्याबद्दल त्यांचं ऋण मान्य करूनच त्यांच्याही मर्यादा जोखायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर मर्यादा त्यांच्या होत्या, का त्या काळातील सामाजिक परिस्थितीच्या होत्या, याचंही भान सतत जागं ठेवलं पाहिजे. कारण आपणदेखील संतांच्या प्रमाणेच ‘परंपरा ओलांडणारी परंपरा’ आपली आहे, असंच सांगतो आहोत. तेही अगदी सहज. आध्यात्मिक क्षेत्रात समानतेचा आग्रह धरणाऱ्या या वारकरी संतांना प्रत्यक्ष जीवनात कडवटपणे वावरणारी मोकाट वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था यांच्याबद्दल काय म्हणायचं होतं? त्यांच्या विरोधात या संतांनी बंड उभारल्याचं स्पष्टपणे नजरेत येत नाही. नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या थोडं आधी चक्रधर स्वामींनी याच महाराष्ट्रात कार्य केलं. त्यांच्या महानुभावी शिष्यांनी ‘लीळाचरित्र’ नावाचा पहिला मराठी गद्यग्रंथ संपादित केला. चक्रधरांनी केवळ अध्यात्मातच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनात देखील जातिव्यवस्थेला आणि स्त्री-पुरुष असमानतेला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. या पंथाचा एक संकेत असा होता की, एकाच गावात तीनपेक्षा जास्त दिवस राहायचं नाही. दुसऱ्या गावातील प्रथम दिसलेल्या घरी जेवण घ्यायचं. कुठल्याही गावात शिरण्यापूर्वी प्रथम दिसणारी घरं ही ‘अस्पृशांची’ असत. जेवण तिथंच होई. अशाच एका गावातील वेशीबाहेरील एका घरात त्यांचा मुक्काम होता. गृहिणी स्वयंपाकात मग्न होती. घरातील मुलं गोंधळ घालत होती. तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी आजही सांगितली जाणारी चिऊ-काऊची आणि त्यांच्या शेणा-मेणाच्या घरट्यांची गोष्ट चक्रधरांनी मुलांना सांगितल्याचा उल्लेख ‘लीळाचरित्रा’त आहे. त्यांना जसे शिष्य होते, तशाच शिष्यादेखील होत्या. महदाइसा ही ज्येष्ठ शिष्या तर त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असल्याचा उल्लेख ‘लीळाचरित्रा’त आहे. एकदा त्यांच्या काही शिष्यांनी एका बुद्धविहाराचा विध्वंस केला आणि फुशारकी मारत ते आपले शौर्य सांगू लागले. तेव्हा चक्रधरांनी त्यांना प्रश्न केला होता, ‘वैरियाचा देवो झाला म्हणोन काय दगड घालोनी फोडावा?’ चक्रधरांनी आपल्या शिष्यांना तो बुद्धविहार पुन्हा होता तसा बांधून द्यायला सांगितलं. एकूण या पंथामुळे ‘प्रस्थापित समाजाच्या व्यवस्थेत कालवा झाला, भ्रष्टाचार माजला’. त्यांच्या तक्रारी देवगिरीच्या यादव राजांच्या दरबारी गेल्या. परिणामी राजाच्या अमात्याच्या सूचनेनुसार चक्रधरांचा वध करविला गेला. यानंतर महानुभव पंथाच्या मागे शुक्लकाष्ट लागल्याचे दिसते. त्यामुळे या पंथाचे अनेक ग्रंथ सांकेतिक अशा गुप्त लिप्यांतून लिहावे लागले. सनातनी कर्मठांनी महानुभावांना अत्यंत निर्घृणपणे हद्दपार करणं अपेक्षित आहे. परंतु वारकरी संतांनी या कृत्याचा निषेध केल्याचे किंवा मतभेद कायम ठेवून महानुभावांबद्दल सहानुभूती व्यक्त केल्याचं कोठे दिसत नाही. वारकरी संप्रदायातील काही संत अत्याचाराची शिकार झाले होते; परंतु त्याही अत्याचारांचा बाकीच्यांनी निषेध केल्याचं दिसत नाही. कदाचित महानुभाव पंथाचं बोलकं अपयश ध्यानात घेऊन या संतांनी स्वतःच्या समानतेच्या आग्रहाला मुरड घातली असेल. थोडक्यात ही मर्यादा वारकरी संतपरंपरेची का त्या काळाची, हे सांगणं मला तरी अवघड आहे.
संतपरंपरेची दुसरी मर्यादा मात्र स्पष्टपणे काळाची आहे. आज आपण रामायणातील राम या पात्राचा एकवचनीपणा आणि एकपत्नीत्व स्वीकारू शकतो. परंतु त्यानं केलेला शंबूकाचा वध आणि शुर्पणखेशी केलेलं वर्तन असभ्य असल्यानं आपण स्वीकारू शकत नाही. तसंच आजच्या संदर्भात समानतेचा अर्थ वारकरी परंपरेच्या काळापेक्षा खूप विस्तारला आहे. म्हणून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची आणि चक्रधर स्वामींची समानतादेखील फुले, आगरकर, आंबेडकर, गाडगेबाबा, कर्वे पिता-पुत्र आदी मंडळींप्रमाणे आज आपल्याला तर अपुरी वाटणं अत्यंत आवश्यक आहे. इथं लक्षात घेण्याची बाब म्हणजे प्रत्येक पिढीनं केलेल्या मागण्यांनी समाजाचीच मशागत होत असते. त्यामुळे पुढील पिढ्यांची क्षितिजं थोडी विस्तारतात, नजर आणखी थोडी विशाल होते, याचं भान प्रत्येक पिढीला असलं पाहिजे.
७. आपल्या खांद्यावरील पताका
महाराष्ट्राच्या इतिहासात संतांनी जुनी परंपरा ओलांडून एक नवी परंपरा रुजवली आहे. तिच्या उभारणीसाठी माणुसकीला बंदिस्त करणाऱ्या आधीच्या काळातील परंपरांतील काही भागांचा माणुसकी जपणाऱ्या अंगानं अर्थ लावून त्यांच्याशी महासमन्वय केला.
आपण आतापर्यंत वारकरी परंपरेचा सविस्तर आढावा घेतला. त्या परंपरेला तत्कालीन परिस्थितीत जोरदार विरोधही झाला होता. ज्ञानेश्वर विरुद्ध त्यांना वाळीत टाकणारी मंडळी, मुक्ताबाई विरुद्ध चांगदेव, चक्रधर स्वामी विरुद्ध त्यांचा वध करणारी राजसत्ता, चोखामेळा विरुद्ध त्याचा खून करणारी मंडळी, तुकाराम विरुद्ध मंबाजी, तुकारामाला ‘सदेह वैकुंठाला धाडणारी’ मंडळी, एकनाथ विरुद्ध त्यांच्यावर थुंकणारी रूढीप्रियता... अशी कितीतरी उदाहरणं नजरेसमोर पाहता-पाहता सजीव होऊन उठली. ही तर द्वंद्व दाखवणारी दोन टोकाची उदाहरणं झाली. काळाच्या ओघात अधेमध्ये गडप झालेलीदेखील अनेक उदाहरणं असणारच. ती रूढीप्रिय कर्मठ मंडळींनादेखील त्यांची स्वतःची वेगळी परंपरा होतीच हे दाखवतात. जाती-धर्माचं आणि चातुर्वर्ण्याचं पावित्र्य राखण्याची ही सनातनी परंपरा चार्वाकांच्या विचारांचा नायनाट करणाऱ्या काळापासूनची आहे. तिच्याजवळ मनुस्मृती, वेदप्रमाण ते गीता, अशी वैचारिक हत्यारं जशी होती, तशीच सोवळं-ओवळं, पूजा-अर्चा, यज्ञ-याग, आदी कर्मकांडांचीही हत्यारं होती. तेवढ्यानं न भागल्यास राजसत्तांच्या आश्रायातून येणारं अथवा हितसंबंधातून मिळणारं शारीरिक बळदेखील होतं. ही देखील आपल्याच समाजातील परंपरा होती.
परंतु या विरोधाला न जुमानता रूढीग्रस्त परंपरांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारताना आणि जास्त प्रगल्भ माणुसकीची मूल्यं रुजवताना संतपरंपरेनं पहिली गोष्ट केली. ती म्हणजे विठ्ठल रूपातील सुहृद मित्रासारखा देव उभारला. विठ्ठल मंदिरात बऱ्याच जातींना प्रवेश असला, तरीही सर्व जातींना मुक्त प्रवेश नव्हता. यावर उपाय म्हणून संतांनी मंदिरात विठ्ठल पाहण्यापेक्षा सर्वांना खुल्या असणाऱ्या वाळवंटातच विठ्ठलभक्तीचा ‘खेळ मांडीयेला’. तिथंच ‘पराई पीर’ जाणणारी ‘वैष्णव’ मंडळी वारकऱ्यांच्या रूपात नाचू लागली; त्या खेळात दंग होऊ लागली. वर्णअभिमान आणि जाती विसरून एकमेकांना लोटांगणं घालत भजन, कीर्तन आणि प्रवचनांचा धूमधडाका सर्वांना सामावून घेऊ लागली. पंढरीच्या वारीचं प्रयोजनच मुळी ‘संत मंडळीच्या गाठीभेटी’ हे बनलं. वय, जात आणि लिंग हे सर्व भेद विसरून एकमेकांना अभिवादन करण्याची प्रथा रूढ केली. भक्तिभाव असेल तर देव, नसेल तर तीर्थक्षेत्र म्हणजे देखील दगडधोंडे आणि पाणी ही कल्पना इथंच मूळ धरू लागली. प्रतिष्ठित आणि विद्वान यांच्यामध्ये संस्कृत भाषा संमत होती. तिला न जुमानता मराठीमध्ये उदंड रचना करून केवळ मराठीचा विकास साधला नाही, तर सामान्य मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढविला; मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढवली; आणि मुख्य म्हणजे या कृतीमधून संतांनी त्या काळच्या ज्ञानाची कवाडं सर्व जाती-धर्मांना खुली केली. जमेल तेव्हा जुन्या पवित्र मानलेल्या ग्रंथांवर माणुसकीचं आरोपण केलं. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आह्मांसीच ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥ १ ॥ (संदर्भ : अभंग क्र. २२६६, श्री तुकारामबोवांच्या अभंगांची गाथा). अशा आरोपणामुळे प्रतिष्ठितांचा विरोध असूनही सामन्यांच्या मनामनात संतपरंपरेचा संदेश झिरपला.
काळ पुन्हा पुढे सरकला. भारतीय भूभागात युरोपांतून काही देशांतील वखारी व्यापारासाठी इथं आल्या. त्यापैकी नामधारी राजघराणं असलेल्या ब्रिटिशांनी जम बसवला. छोटी छोटी राज्यं आणि संस्थानं आपल्या कह्यात घेऊन त्यांनी भारतीय भूभागात वसाहतीचं साम्राज्य स्थापन केलं. त्यांच्यासोबत लोकशाही मूल्यं मानणारी, सुरुवातीला धर्मप्रचार करण्यासाठी आलेली काही ब्रिटिश माणसेदेखील लोकशाही मूल्यं आणि ख्रिश्चन धर्म घेऊन आली.
या काळात फुले यांनी सत्यधर्म आणि आंबेडकरांनी बौद्ध धम्माची कास धरली. तर गोखले, टिळक, गांधी, नेहरू आणि अशा अनेक मंडळींच्या नेतृत्वाखाली सर्व जाती आणि धर्मियांना घेऊन स्वातंत्र्याची चळवळ केली. त्यातून लोकशाहीचीही मूल्यं जाणीवपूर्वक रुजवली.
आजची आपली पिढी तर फुले, आगरकर, आंबेडकर, गाडगेबाबा, कर्वे पिता-पुत्र आणि स्वातंत्र्य चळवळीतील समतावादी नेते आदी मंडळींच्या खांद्यावर उभी आहे. आपल्या खांद्यावर याच सुधारक अशा ‘परंपरा ओलांडणाऱ्या परंपरेची’ पताका असणार आहे. आपण ज्यांच्या खांद्यावर उभे आहोत, त्यांना थोडं वाकून सांगू शकतो, ‘तुम्ही आमची दृष्टी विशाल केली आहे. परंतु आता ‘चतकोरानं आमची भूक भागायची नाही’. आम्ही तुम्हाला ओलांडून पुढे झेपावणार आहोत. आमच्या हातून नवं घडवताना जर अनवधानानं तुमची स्पष्ट प्रतिमा त्यात नसली, तरी आम्ही तुमच्याच खांद्यावर उभे आहोत, तुम्हीच आमची नजर जास्त विशाल केली आहे.’ हे आपली महासमन्वय साधणारी लोकशाही परंपरा धीटपणे सांगू शकते.
आपण स्वीकारलेल्या वरील परंपरेनं आजच्या प्राप्तकाळात कशाकशाचा समन्वय साधायचा आहे, हे आपल्याला प्रथम स्पष्ट असलं पाहिजे. इतिहासक्रमात वंश, धर्म, जाती, विविध देव, लिंग, लिंगभाव, भाषा, वर्ग, वर्ण, प्रदेश, वस्तू देवाण-घेवाणीचं चलन, देश अशा अनेक ओळखी किंवा अस्मिता (Identity) माणसाला प्राप्त झाल्या. उदाहरणार्थ भाषेनुसार माणसांचे भिन्न गट घडत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ओळखीमुळे त्या त्या ओळखीच्या गटात संवाद, सहकार्य, साहचर्य यामध्ये वाढ झाली. त्यामधील माणसांत आपलेपणा वाढला. त्याच वेळी एका भाषिक ओळखीच्या गटाला दुसऱ्या भाषिक गटाबद्दल संशय, शत्रुत्व अशा भावना तयार होत. या ओळखी प्राप्त झाल्यामुळे दोन गोष्टी घडल्या. अशा ओळखीच्या गटबंधनामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेत क:पदार्थ असणारा एकांडा माणूस सामर्थ्यवान बनला होता. हे जसं माणसाच्या लक्षात येत गेलं, तसं त्या ओळखीभोवती अनेक प्रकारच्या गोष्टी, वर्णनं, मिथकं, रिवाज, प्रथा तयार झाल्या. परिणामी परस्परांशी सहकार्य करू शकणारे माणसाचे गट थोडे मोठे झाले. उदाहरणार्थ, कधी एक प्रदेशातील वेगळाले देव पुजणारे लोक एकत्र आले आणि नवी प्रादेशिक थोडी मोठी ओळख तयार झाली. अशा रीतीनं ओळखी एकमेकांत मिसळून मोठ्या ओळखी तयार झाल्या. कधी मोठ्या ओळखी फुटून छोट्या वेगळ्या ओळखी तयार झाल्या.
या दोन्ही प्रक्रिया घडण्यामागे त्यांच्या गरजा वाढणं-बदलणं, हवामानातील बदल, स्थलांतरं, हाती आलेल्या तंत्रज्ञानातील बदल... असे अनेक घटक कारणीभूत होते. आजच्या घडीला, देश, देशांचे सार्क किंवा युरोपियन युनियनसारखे गट, युनोसारखी जागतिक संघटना अशा माणसाच्या विशाल ओळखी तयार झाल्या आहेत. या सगळ्या ओळखीतील विविधा आणि एकाच व्यक्तीच्या विविध ओळखी जपूनदेखील त्यात विभागलेल्या माणसांमध्ये ज्ञानेश्वरांच्या भाषेत ‘विश्वात्मक’ समन्वय साधायचा आहे. त्यासाठी कोणते मार्ग वापरावेत याबाबत आपली परंपरा लवचीक आहेच. ती लवचीकता आपण टिकवली आणि वाढवली पाहिजे. मला दोन मार्ग सुचतात. पहिला मार्ग आहे देव आणि धर्म यांच्या अंगानं जाणारा मार्ग. देव आणि धर्म आपल्याला माणसं तोडायला नव्हे तर जोडून घ्यायला शिकवत असेल, तर तो मार्ग वापरून आपण विविध ओळखींमध्ये पसरलेली, क्वचित ‘ते आणि आपण’ यात उभी ठाकलेली माणसं जोडू शकतो. परंतु कधी लहान-सहान समांतर ओळखी सामावल्यानं निर्माण झालेल्या एकाच देशातील माणसांत भेदाभेद केल्यास/ झाल्यास आणि तो विकोपाला गेल्यास त्यातून देशातून छोट्या ओळखी स्वतंत्र होऊन नवे देश तयार होतील.
गेल्या शतकानं सामर्थ्यवान सोविएत रशियाची झालेली पंधरा शकलं आणि दोन जर्मन देश एकत्र आलेलं पाहिलं आहे. या सामाजिक प्रक्रिया लक्षात घेता रूढ मार्ग आपल्याला कदाचित माणसं तोडायलासुद्धा प्रवृत्त करू शकेल. साहजिकच आपण तो मार्ग सोडून लवचीकपणे दुसरा स्वीकारला पाहिजे. या मार्गानं विचार, भावना आणि कृती यांना आकार देताना अधिष्ठान ईश्वराच्या ऐवजी माणसाचं किंवा स्वतःचं ठेवता येईल. आपल्या स्वतःच्या समाधानासाठी माणसं जोडली पाहिजेत. यासाठी आपल्या स्वतःच्या पलीकडे पाहणं जमवावं लागेल. माणूस नेहमीच इतर प्राण्यांप्रमाणे स्वतःचा विचार प्रथम करतो. ते स्वाभाविक आहे. परंतु त्याच वेळी एकमेकांच्या सहकार्यानं काही काम करण्यात आनंद पाहण्याची पहिली पायरी आपण चढणं आवश्यक आहे. दुसऱ्या पायरीवर उन्नत होऊन आपण जास्त संवेदनशील झालो, तर आपले विचार आणि भावना देखील उन्नत होतील.
हेच तत्त्व मराठीतील एक सुविचार सांगतो : ‘भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती आणि (वेळप्रसंगी) स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही संस्कृती!’ हे तत्त्व अंगी बाणलं तर आजूबाजूच्या वंचित सामाजिक घटकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी निर्व्याज आणि निरपेक्ष मदतीचा आणि सहकार्याचा हात सहज पुढे करता येईल. यासाठी ईश्वर किंवा धर्म यांच्याऐवजी माणसाची केंद्रस्थानी प्राणप्रतिष्ठा केली, तर फुटीरतावादाच्या शक्यता कमी होतील. एवढं जमलं तरी ज्ञानेश्वरांची पसायदानरूपातील प्रार्थना जमिनीवर उतरेल. एकविसाव्या शतकात नुकताच अणुयुद्धाचा धोका अमेरिका-उत्तर कोरियाच्या निमित्तानं उभा राहिला होता. तो काही कारणानं टळला. जागतिक तापमान वाढीचं संकट टाळण्यासाठी इतर प्राणिजात आणि निसर्ग यांच्याशी माणसाचं भवितव्य जोडून घेणं आवश्यक झालं आहे. त्याही दृष्टीनं आपणास आपले विचार, भावना आणि कृती बदलून घ्यावी लागणार आहे. ते कर्मकांडांपुरतं नाही तर मनापासून जमलं की, तुकारामबोवाप्रमाणे ‘वृक्ष-वल्ली आम्हां सोयरी होतील’. परंपरा ओलांडत महासमन्वय साधणाऱ्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन ईश्वर-धर्माच्या जागी माणसाची प्राणप्रतिष्ठा करणारा मार्ग निवडलेल्यांनी एकमेकांना प्रश्न विचारत, उत्तरं शोधत आणि स्वतःच्या चुका दुरुस्त करत आता वाटचाल करायची आहे. पहिल्या मार्गावरून वाटचाल करायचं ठरवलं असणं शक्य आहे. त्यांनी बुद्धविहाराचा विध्वंस करण्याच्या कृतीची फुशारकी मारत आपलं शौर्य एकदा चक्रधरांच्या काही शिष्यांनी सांगितलं होतं. तो किस्सा ध्यानी कायम ठेवावा. त्यासंदर्भात ‘वैरियाचा देवो झाला म्हणोन काय दगड घालोनी फोडावा?’ हे विधान आणि त्यांचा बुद्धविहार पुन्हा होता तसा बांधून देण्यास सांगितलेला सल्ला मुळीच विसरू नये. भिन्न मार्गानं वाटचाल करत विविध ओळखींची माणसं जोडत राहण्यासाठी एकमेकांचे हात हातात घेणं कधी नव्हे तेवढं गरजेचे झालं.
वयाच्या सत्तरीनंतर मनाच्या तळाशी कसल्याशा धाग्यांमुळे सुप्त रूपात साठलेल्या अनेक आठवणींच्या गोष्टीरूप चित्रफिती मनात अचानक उलगडत राहतात. मन अस्वस्थ असताना स्वप्न-जागेपणाच्या सीमेवर आजकाल ज्ञानेश्वरांच्या आर्ततेनं पसायदानानं जास्त विशाल झालेल्या माणुसकीचा अर्थ कुणी धुसरसं आळवत असतं. पसायदान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेक मार्गांनी भगीरथ प्रयत्न लागतील याची आठवण भूतकाळात अंतर्धान पावलेला काळ जागी करत राहतो... आणि भविष्यकाळातील असंख्य शक्यतांचे विस्तारणारं क्षितीज खुणावत राहतं...
.............................................................................................................................................
लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.
prakashburte123@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vividh Vachak
Mon , 21 January 2019
सुंदर लेख. आभार. फक्त चक्रधर स्वामींचा वध आणि त्यांचे चरित्र, ह्याबद्दलचा उल्लेख जरा त्रोटक वाटला. विशेषतः ज्ञानेश्वरांच्या अगोदर जेमतेम पन्नासेक वर्षे हा त्यांचा काळ असतानाही चक्रधरांचा वध घडला अशी कोणती सामाजिक परिस्थिती होती, हे जरा कोडेच वाटते. असो.