दीडशे भिंती चित्रांच्या : चित्रकार म्हणून परिपक्व होता होता माणूस म्हणूनही रुजता आलं!
दिवाळी २०१८ - संकीर्ण
आभा भागवत
  • आभा भागवत यांनी लहानथोरांसह रंगवलेल्या चित्रांच्या भिंती
  • Wed , 24 October 2018
  • दिवाळी २०१८ संकीर्ण आभा भागवत Aabha ‌Bhagwat भिंतीचित्र Wall Painting

गेली पाच वर्षं मी सर्वसामान्य नागरिक आणि मुलांना सहभाग घेता येईल अशी चित्रं मोठाल्या भिंतींवर काढते आहे. कुठे रस्त्यांवरच्या लांबच लांब भिंती, तर कुठे शाळेतल्या मुलांना प्रेरणा देणाऱ्या भिंती, कुठे निसर्गाशी एकरूप होणाऱ्या भिंती, तर कोणाच्या घरात सजवलेल्या भिंती. यात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या क्षमतांना वाट करत करत चित्र साकारायला मजा येते. सर्वांना समान संधी मिळावी, सर्वांना चित्रातील आनंद मिळावा हा मूलभूत विचार या संकल्पनेच्या मुळाशी आहे. वरवरचं सुशोभीकरण मला मान्य नाही.

आंतरिक सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तर एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या, एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. त्यांची परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्यांना कप्प्यांमध्ये बंद करून बघता कामा नये. जिथं आंतरिक सौंदर्य अस्तित्वात असतं, तिथं ते बाहेरही प्रतिबिंबित होतं. आणि जिथं बाह्य सौंदर्य दिसतं, तिथं ते आंतरिक सौंदर्याला साद घालत राहतं. भिंत ही या दोन गोष्टींना दुभाजणारा आडपडदा नसून दोन्हींमधील प्रवास सांधणारं साधन आहे.

आकड्यांशी माझं कधी जुळलंच नाही. चित्रकार इतका आकार आणि रंगांत गढलेला असतो की, आकडे, गणितं, समीकरणं समोर आली तर चित्रकाराच्या मेंदूला रस्ता बदलण्याचा वेगळा ताण येतो. सर्जनात्मकता, प्रयोगशीलता, नियम तोडण्याची इच्छा यांतच कलाकार जास्त रमतात. आशय आणि अनुभवानं भरगच्च आणि समृद्ध अशी दीडशे भित्तीचित्रं आता पूर्ण होत आलीत. आधुनिक जगात सांख्यिकी मीमांसेला ( स्टॅटिस्टिकल अनालिसिस ) वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय. ‘नंबर्स स्पीक फॉर देमसेल्व्ह्ज’ असं म्हणतात, ते खरंही आहे. विशिष्ट टप्पा गाठणं, अमुक इतका अनुभव मिळणं हे आकड्यात मांडलं की, समजायला सोपं जातं. एवढंच त्या दीडशे चित्रांच्या आकड्याचं महत्त्व. ही सुरुवात आहे, आशयघन भित्तीचित्रं काढण्याची. एक भक्कम पाया आता तयार झाला आहे आणि त्यावर आता शक्य तेवढी सुबक आणि उपयुक्त इमारत बांधायची आहे.

चित्रांमध्ये नेहमीच मी चित्रकार म्हणून स्वतःला काय जमतं, कौशल्याचं मोजमाप काय, कुठल्या तत्त्वांना महत्त्व देऊन चित्रकाम करायचंय याचा विचार करत असते. चित्र शिकवण्याची प्रचलित पद्धत, ज्यात केवळ तंत्र जमण्यावर आणि कसब सिद्ध करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं, त्याच्या पलिकडे जाऊन चित्र काढण्यातल्या आनंदाला मुकणाऱ्या सामान्य माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी काम करावं असं कायमच वाटायचं. चित्रांसारख्या सुंदर कलेची भीती किंवा नावड निर्माण होते, ती आपल्या चौकटीतील शिक्षण पद्धतीमुळे. ही चौकट समजून घेऊन, ती तोडण्यासाठी विविध मार्गांनी प्रयोग करत राहणं, त्याची निष्पत्ती पाहून त्यावर अजून काम करत राहणं, हा मार्ग अवलंबायचा ठरवला.

स्वतःला सिद्ध करण्यासाठी बंद वातानुकूलित कलादालनांमध्ये चित्र प्रदर्शन भरवून, केवळ अभिजनांपुरती चित्रकला मर्यादित राहिलेली पाहून नेहमीच अस्वस्थ वाटत आलं आहे. कला सामान्य माणसांपर्यंत पोहोचतच नाही असं एक निरीक्षण होतंच. ‘पब्लिक आर्ट’ अशा गोंडस नावाखाली झाकलेली रस्त्यांवरची चित्रं सखोल विचार न करता केलेली वाटत. अशा पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना समजेल, तरीही प्रशिक्षित चित्रकार म्हणून माझंही कसब पणाला लागेल, माझ्यातली ऊर्जा सर्वतोपरी वापरली जाईल, शिकलेल्या विविध गोष्टींचा वैचारिक कस लागेल, अशा कशाच्या तरी शोधात असल्यामुळे भित्तीचित्रं मला भेटली.

कॉलेजात शिकत असताना महागड्या कॅनव्हासच्या पलीकडे जाऊन दारं, भिंती, प्लायवूडचा तुकडा रंगवून पाहिला होताच, पण विशी-पंचविशीत नव्हतं समजत की, चित्रकार होण्याचा अर्थ तरी काय? काय जबाबदारी असते चित्रकाराची? काय क्षमता असतात सामाजिक वर्तुळात वावरताना कलाकाराच्या, ज्या समाजहितासाठी वापरता येऊ शकतात. अजूनही काही उत्तरं अस्पष्ट आहेतच, पण शोध चालू आहे. काय नक्की करायचं नाही याचे निर्णय घेता येत आहेत. त्यामुळे करण्याजोगं खूप काही समोर दिसतंय. हा प्रवास आहे, त्यातून काय साध्य होईल हे ठरवता येत नाही. यातून मी कुठे पोचीन हे माहीत नाही. प्रक्रियेची चव चाखत, तिचे नियम समजून घेत, कुठलंही एकमेव उद्दिष्ट न ठरवता तयार होणारा रस्ता जिथं घेऊन जातोय, तिथं खाचखळगे पार करत दिशा शोधत चालायचं. बस्स!

प्रचलित चित्रकारितेमध्ये चित्रकाराला प्रत्यक्ष काम करताना बघायच्या संधी मिळत नाहीत. एकांतात, शांततेत चित्र काढणं कलाकार पसंत करतात. प्रात्यक्षिकं (डेमॉन्स्ट्रेशन्स) असतात, ती निसर्गचित्र किंवा व्यक्तिचित्रणाची. पण भित्तिचित्रांमध्ये जे काही चालू असतं ते अथपासून इतिपर्यंत सहभागी लहानथोर आणि प्रेक्षकांच्या समोर घडतं. यातली जी व्हल्नरेबिलिटी आहे, म्हणजेच चुका आणि उत्तम कौशल्यपूर्ण काम यातील अंतर सतत चालत राहावं लागण्याची जी गरज आहे, त्यातून आपण वेगळेच घडतो असं लक्षात येऊ लागलं. आपल्या स्टुडिओत एकटंच काम करताना असा अनुभव मिळत नाही. त्यामुळे ही चित्रकला असूनही सादरीकरणातील आव्हानंही यात अनुभवायला मिळतात.

सर्वांसमोर चित्र काढण्याचे वेगळे ताण असतात, ते हळूहळू समजू लागले. सर्वांना सामावून घ्यायचं, तर मला जसं हवं तसंच चित्रकाम होऊ शकत नाही. सहभागी कलाकाराची प्रत्येकाची चित्राची समज, पायरी वेगळी. या सर्व पायऱ्यांवर चढ-उतर करता करता नवनवीन गोष्टी सतत गवसत राहतात, हे त्यातलं सौंदर्य. कोणीही चित्र काढण्याचा आत्मविश्वास गमावणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. काही जणांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन द्यावं लागतं. या चित्रात एखादी गोष्ट येत नसल्याची लपवाछपवी, खोटेपणा, चुका झाकणं याला वाव नसतो, कारण प्रत्येक क्षणी एवढ्या सर्व प्रेक्षकांसमोर चित्र काढायचं असतं. ते वेळेत पूर्णही करायचं असतं. नंतर बघणाऱ्यांसाठी ते चांगलंही व्हावं लागतं. केवळ प्रक्रिया आनंददायी, पण अंतिम चित्र बकवास होऊन चालत नाही. या संपूर्ण प्रक्रियेत जी धन ऊर्जा निर्माण होते, त्यातून खूप मोठ्या प्रमाणात आनंदाची आणि समाधानाची निर्मिती होते. चित्राच्या निर्मितीतून ही भावनांची निर्मिती सर्वांनाच कित्येक पटीनं समृद्ध करते.

चित्र काढणं आणि रंगवणं चालू असताना आजूबाजूला असणारे सर्वजण आपापलं म्हणणं शब्दांत व्यक्त करत असतात. काही वेळा त्या केवळ विचार न करता उत्स्फूर्तपणे बाहेर येणाऱ्या प्रतिक्रिया असतात. चांगल्याही असतात आणि वाईटही. त्यातल्या वाईटाकडे बघण्याची एक दृष्टी मिळत जाते आणि त्या निमित्तानं सामान्य माणूस चित्रांचा विचार कसा करतो याचा अभ्यास होऊ लागतो. चांगल्या गोष्टींनी फार फुशारून न जाण्याची कलाही अवगत होते. संपूर्ण चित्राची जबाबदारी घेणारी प्रमुख व्यक्ती म्हणून स्वतःतील कोवळेपणा जपणं, नव्या माणसांना आपल्या चित्रात सामावून घेण्याचं कसब निर्माण करणं, सर्वांच्या चित्र रंगवण्यात आपण लुडबूड न करता, त्यांना स्वतःचं उत्तर शोधून ते चित्रात वापरण्याची संधी मिळावी, यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात.

स्वतःचे नियम ठरवून सगळ्या प्रक्रियेला त्यात अडकवून टाकलं तर चित्रही बंदिस्तच होईल, याची जाणीव असल्यामुळे नवीन गोष्टी मोकळेपणानं स्वीकारणं, त्याकरता स्वतःला लवचीक बनवणं, अत्यंत उत्स्फूर्त आणि ऐन वेळी समोर येणाऱ्या काही अनुभवांना हाताळणं, यापूर्वी न घेतलेला एखादा अनुभव प्रत्येक चित्रात स्वीकारणं, अशा काही वेगळ्या गोष्टी अवगत करता आल्या. या सर्वांमुळे चित्रकार म्हणून परिपक्व होता होता माणूस म्हणूनही रुजता आलं.

या सर्व खटाटोपात अस्सल चित्र बाहेर येतं. सगळी कवचं चित्र काढताना उधळून टाकावी लागतात. तुमची कला अक्षरशः नग्न असल्यासारखी सामोरी येते. आतून आत्मविश्वास वाढतो. ध्यानस्थ व्हावं तसं आजूबाजूचं सर्व विसरून चित्रकाम करण्याची सवय होते. बाहेरून दिसणारा प्रवास कसा दिसतो याची पर्वा न करता आपण आंतरिक प्रवासात रममाण होतो. यातून एक निर्मळ असं स्वतःचंच अस्तित्व जाणवू लागतं. अशा विशुद्ध अनुभवाची ओढ लागते. आणि प्रत्यक्ष चित्रही रेखाटू शकत नाही, अशा जाणिवा जागृत होतात. वरवर दिसणाऱ्या अभिव्यक्तीपेक्षा आंतरिक प्रवास हा अतिशय सखोल असतो आणि कला नेमका हाच आंतरिक प्रवास श्रीमंत करतात.

कोणतीही कला सोपी आणि आवाक्यातली भासवणं हे अतिशय कौशल्यपूर्ण काम असतं. पण ते सोपं वाटल्यामुळे बहुतांशांना ते सामान्यसुद्धा वाटतं. त्यातली मेहनत सर्वांच्या लक्षात येत नाही. अशा मोठाल्या चित्रांमध्ये मेहनत ही फक्त कौशल्याची नसते तर शारीरिकही तेवढीच असते. तब्येत ठणठणीत ठेवणं आणि झोकून देऊन काम करणं या गोष्टी पाठोपाठ येतातच. खरं सौंदर्य हे कलाकृती निर्माण करणाऱ्याच्या उत्कटतेच्या तळाशी खोल दडलेलं असतं. प्लेटोनं सांगितलेली प्रेक्षकाची नजर (बिहोल्डर्स आय) ही त्यानंतर येते. त्यामुळे प्रत्येक सहभाग घेणाऱ्याच्या वाट्याला निर्मितीचा सुंदर अनुभव येतो ना, याकडे लक्ष द्यावं लागतं.

एकट्या चित्रकारानं चित्र काढणं आणि इतर सर्वांनी त्याचे रसिक होणं याचं महत्त्व निर्विवाद वेगळं आहे. सर्वांना सामावून घेऊन मोठं चित्र केल्यानं जी श्रेणीपरंपरा संपून जाऊन सर्वांना समान महत्त्व मिळण्याचं एक सूचक जाळं तयार होतं, त्याचं आजच्या प्रचंड लोकसंख्येच्या काळात फार मोठं कर्तव्य आहे. ते समजून घेत, आस्वादत भरपूर नवनिर्मिती करत राहण्याचं स्वप्न मी दीडशे चित्र पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना आता बघू लागले आहे.

.............................................................................................................................................

लेखिका आभा भागवत चित्रकार आहेत.

abha.bhagwat@gmail.com

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख