करण थापर : राजकारण्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारून अडचणीत आणणारे पत्रकार
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
संकल्प गुर्जर
  • करण थापर आणि त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 24 October 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची करण थापर Karan Thapar डेव्हिल्स अॅडव्होकेट Devil's Advocate

आज आपल्या देशात विविध भाषांतील मिळून साडेआठशेहून अधिक टीव्ही चॅनेल्स आहेत. त्यापैकी सुमारे चारशे चॅनेल्स ही बातम्या आणि प्रचलित घडामोडी याला वाहिलेली असून उर्वरित चॅनेल्स मनोरंजनात्मक कंटेंट देतात. या चारशेपैकी महत्त्वाच्या इंग्रजी न्यूज चॅनेल्सची संख्या दहाहून अधिक भरत नाही. आपले मूळ कर्तव्य विसरून सतत आक्रस्ताळेपणा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘न्यूज’ चॅनेल्सना या यादीतून वगळले तर ही संख्या आणखीच कमी होते. अशी ही इंग्रजी न्यूज चॅनेल्स मुंबई-पुण्यासारख्या शहरांत आणि त्यातही मुख्यतः मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय घरांत पाहिली जातात. साधारणतः ज्या घरात इंग्रजी वर्तमानपत्रे वाचली जातात, त्याच घरांत इंग्रजी न्यूज चॅनेल्सही पाहिली जातात असे मानायला हरकत नसावी. असा वर्ग आपल्या देशाची एकूण लोकसंख्या पाहता तुलनेने बराच कमी आहे. परंतु राष्ट्रीय स्तरावरील बातम्या आणि महत्त्वाचे धोरणविषयक निर्णय याविषयी विचार केल्यास इंग्रजी चॅनेल्सचा प्रभाव आणि परिणामकारकता खूपच जास्त आहे असे लक्षात येते. इंग्रजी चॅनेल्सनी एखादा वादग्रस्त मुद्दा उचलून धरला तर त्याकडे व्यवस्थेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता खूपच जास्त असते. याचे मुख्य कारण असे की, देशातील राज्यकर्ता वर्ग, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती,  राजकीय नेते, विचारवंत-संपादक-अभ्यासक इ.चे इंग्रजी चॅनेल्सकडे नियमितपणे लक्ष असते. 

अशा या इंग्रजी न्यूज चॅनेल्सच्या जगातील प्रणय रॉय, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, निधी राझदान अशी नावे आपल्या परिचयाची असतात. (तसेच इंग्रजी न्यूज चॅनेल्सच्या विश्वातील आणखी काही नावे पूर्णतः चुकीच्या कारणांसाठी आपल्याला माहीत असतातच!) इंग्रजी टीव्ही पत्रकारांच्या याच रांगेत बसणारे मात्र तरीही थोडेसे वेगळे असे नाव शोधायला गेल्यास करण थापर यांचे नाव समोर येते. त्यांची प्रमुख ओळख शैलीदार इंग्रजीत आक्रमक रीतीने मुलाखत घेणारे, राजकारण्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारून अडचणीत आणणारे पत्रकार अशी करून दिली जाते. इंग्रजी न्यूज चॅनेल्स नेहमी पाहणाऱ्यांमध्ये थापर यांचा स्वतःचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. इंग्रजीतील इतर भारतीय टीव्ही पत्रकार व न्यूज अँकर्सपेक्षा थापर दोन ठळक कारणांमुळे वेगळे ठरतात. एक, थापर भारतात येण्याआधी दहा वर्षे इंग्लंडमध्ये पत्रकारिता करून आले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांप्रती/सत्तेविषयी असलेला दृष्टिकोन, मुलाखत घेण्याची शैली, कार्यक्रमांचा उत्तम दर्जा आणि इंग्रजीचा वापर या चारही स्तरांवर थापर इतर भारतीय पत्रकारांपेक्षा चांगल्या अर्थाने उठून दिसतात. आणि गेली पंचवीस वर्षे त्यांनी आपली ही चारही वैशिष्ट्ये टिकवली आहेत. दोन, भारतात उदारीकरण पर्वाची सुरुवात होणे ते मोदी राजवट पुन्हा निवडणुकीस सामोरे जाणे अशा प्रदीर्घ प्रवासाचे थापर टीव्हीच्या माध्यमातून साक्षीदार राहिलेले असून या साऱ्या काळात त्यांची ओळख ‘हाय इम्पॅक्ट’ असणाऱ्या मुलाखती घेणे आणि बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांसाठी भारतातून दर्जेदार कंटेंट (तिथेही पुन्हा मुलाखतीच!) देणे यासाठी होते. आपल्या कारकिर्दीत थापर यांनी देशातील महत्त्वाचे सर्व राजकीय नेते, शेजारी राष्ट्रांतील महत्त्वाचे नेते, सिनेमाचे सुपरस्टार्स, क्रिकेटपटू, लेखक-कलावंत अशा विविध स्वरूपाच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या असून त्यातील अनेक मुलाखती आजही आवर्जून पाहाव्यात अशा आहेत. तसेच सध्याच्या काळात भारतातील न्यूज चॅनेल्सची एकूण अवस्था पाहता, थापर त्यांच्या कार्यक्रमात आरडाओरडा करून, मुलाखतीसाठी स्वतःच बोलावलेल्या पाहुण्याचा अपमान करत नाहीत, हेही त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे असेच म्हणावे लागेल!

२.

चांगल्या घरात जन्म झालेल्या, दर्जेदार ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या, फर्डे इंग्रजी बोलणाऱ्या आणि उच्चभ्रू जगात वावरणाऱ्या लोकांचा सतत अपमान करणे, त्यांना जाणीवपूर्वक तुच्छ लेखणे ही सध्याच्या भारतात फॅशनच झाली आहे. अशा वातावरणात जर तुमचे नाव करण थापर असेल तर तुम्हाला किती शिव्याशाप भोगावे लागत असतील याची कल्पनाच करता येणार नाही. थापर यांचे वडील, जनरल पी. एन. थापर, भारताचे लष्करप्रमुख होते. तसेच ते पुढे अफगाणिस्तानला भारताचे राजदूत म्हणून गेले. या काळात करण थापर यांनी आधी अफगाणिस्तानमधील उच्चभ्रू अशा अमेरिकन स्कूलमध्ये आणि नंतर भारतात शिक्षणासाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या देहरादून येथील ‘डून स्कूल’मध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर ते इंग्लंडला गेले. जगप्रसिद्ध अशा केंब्रिज विद्यापीठात थापर यांनी आपली पदवी पूर्ण केली. तिथे असतानाच ‘केंब्रिज युनियन’ या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वादविवादविषयक गटाचे ते अध्यक्ष झाले होते. ब्रिटिश विद्यापीठीय वर्तुळात आणि जगभरातील इंग्रजाळलेल्या अभिजनवर्गात या अध्यक्षपदाला खास स्थान असते. 

थापर यांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात ते त्या देशाच्या आणि लंडन शहराच्या प्रेमातच पडले. लंडन शहरातील अभिजात-सुसंस्कृत वातावरण, नागरिकांचा खाजगीपणा जपण्याची वृत्ती, ब्रिटिशांचा नर्मविनोदी स्वभाव आणि दर्जेदार सिनेमे-नाटके-माध्यमसृष्टी-वैचारिकविश्व याचे थापर यांना अजूनही आकर्षण वाटते. लंडन शहर हे आपल्या जगाचे छोटे प्रतिबिंबच आहे. तसेच इतर अनेक मोठ्या शहरांत गेल्यावर जी परकेपणाची भावना येते, ती लंडनमध्ये कधीही येत नाही असे थापर यांचे प्रामाणिक मत आहे. त्यामुळेच अजूनही दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थापर लंडनमध्ये जातात. तिथे ते अगदी मनापासून रमतात. आपल्या नव्या वर्षाची सुरुवात लंडनसारख्या सुसंस्कृत शहरात करण्याची ही परंपरा थापर यांनी अनेक वर्षे नेमाने पाळलेली आहे.   

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

पदवी पूर्ण करून त्यांनी डॉक्टरेटसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मात्र आपली डॉक्टरेट पूर्ण होण्याआधीच थापर पत्रकारितेत आले. सुरुवातीला ते ‘स्पेक्टेटर’सारख्या नियतकालिकांसाठी फ्री-लान्स स्वरूपाचे लेखन करत असत. नंतर मात्र ते पूर्णवेळ पत्रकारिता करायला हवी या निर्णयावर आले. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवातही लंडनमधील ‘द टाईम्स’ या प्रतिष्ठित वर्तमानपत्रापासून झाली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी, १९८० साली, ते ‘टाईम्स’चे नायजेरिया या महत्त्वाच्या आफ्रिकी देशात प्रतिनिधी होते. तिथे साधारणतः अडीच-तीन वर्षे काम करून थापर इंग्लंडमधील टीव्ही पत्रकारितेत आले. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सुमारे पस्तीस वर्षे थापर टीव्ही माध्यमासाठी काम करत आहेत.

थापर यांची जशी शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम होती, तशीच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी-मित्रपरिवार हेही कोणालाही हेवा वाटावा असेच आहे. ते थेट जवाहरलाल नेहरूंच्या जवळच्या नात्यातील आहेत. थापर यांच्या मामाने नेहरूंच्या भाचीशी (नयनतारा सेहगल) लग्न केले होते. त्यामुळे करण थापर यांचे  लहानपणापासून गांधी-नेहरू कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध राहिले. त्यांची संजय गांधी व राजीव गांधी यांच्याशी मैत्री होती. संजय गांधींनी करण थापरना विमान कसे चालवावे, हे शिकवण्याचा प्रयत्न केला होता. तर पुढे १९८९ साली करण थापर इंग्लंडमधून भारतात परत येण्यात राजीव गांधींचा महत्त्वाचा वाटा होता. प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापरही करण यांच्या नात्यातील आहेत.

थापर यांचा मित्रपरिवारही असाच सत्तेच्या परिघात वावरणारा आणि त्या त्या देशाच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावणारा होता. थापर इंग्लंडमध्ये असताना त्यांची पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याशी फारच घनिष्ठ मैत्री झाली होती. ही मैत्री इतकी घनिष्ठ होती की, बेनझीर यांच्या कराचीतील लग्नाला थापर एक भारतीय पत्रकार असूनही त्यांना खास आमंत्रण होते. तसेच म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांच्याशीही थापर यांची मैत्री होती. सू की यांच्यावर निर्बंध लादले गेल्यानंतर मात्र घरातील फोनचे कनेक्शन तोडले जाण्यापूर्वी १९८९ मध्ये त्यांनी जी शेवटची मुलाखत दिली, ती करण थापर यांनी (फोनवरून) घेतली होती व ती लंडनच्या ‘द टाईम्स’मध्ये छापून आली होती. हे सारे पाहता, अशा या privileged कौटुंबिक पार्श्वभूमीचे, प्रभावशाली मित्रपरिवाराचे, आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरण्याचे जे काही फायदे असतात ते थापर यांना पूर्णतः मिळाले आहेत.   

३.

साधारणतः १९८३ ते १९८९ अशी सहा वर्षे इंग्लंडमध्ये काम करून थापर पत्नीच्या मृत्युनंतर, वयाच्या तेहतिसाव्या वर्षी, भारतात परत आले. परत आल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या ‘हिंदुस्तान टाईम्स’ समूहासोबत १९९१ ते १९९७ अशी सलग सात वर्षे काम केले. या काळात आधी ‘आयविटनेस’ आणि नंतर ‘द चॅट शो’ नावाचे कार्यक्रम करण थापर यांनी केले. आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या, चटकदार मुलाखती आणि इतर रोचक कंटेंट असे या कार्यक्रमाचे स्वरूप असायचे. या कार्यक्रमातील अनेक मुलाखतींची त्या काळातील वर्तमानपत्रे दखल घेत असत, अनेकदा त्या मुलाखतींवरून हेडलाईन द्याव्या अशा बातम्या होत असत. त्यामुळे थापर यांच्या कार्यक्रमाला देशभरात बरीच प्रसिद्धी मिळाली. याच काळात प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोरही त्यांच्याबरोबर निवेदनाचे काम करायच्या. भारतात न्यूज चॅनेल्स सुरू होण्याआधीचा तो काळ होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ‘आयविटनेस’चे व्हिडिओ खाजगी रीतीने वितरीत व्हायचे आणि त्याची मासिक वर्गणी भरून लोकं तो कार्यक्रम पहायचे. नंतर दूरदर्शनने खाजगी निर्मात्यांकडून कंटेंट घेण्यास सुरुवात केल्यानंतर तो कार्यक्रम दूरदर्शनवरही दिसायला लागला. पी.व्ही. नरसिंहराव यांनी १९९१ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी थापर यांनी त्यांची मुलाखत ‘आयविटनेस’ या कार्यक्रमासाठी घेतली होती.

१९९७ ते २००१ या चार वर्षांत थापर यांनी अधिकारी ब्रदर्सबरोबर एक वर्षे आणि युटीव्हीसोबत तीन वर्षे काम केले. याच काळात थापर यांनी बीबीसीसाठी ‘हार्डटॉक इंडिया’ आणि ‘फेस टू फेस’ नावाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. पुढे २००१ मध्ये थापर यांनी ‘इन्फोटेनमेंट टेलिव्हिजन’ या नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली आणि गेली सतरा वर्षे ते त्या कंपनीच्या माध्यमातूनच कंटेंटनिर्मिती करत आहेत. या काळात ते २००५ ते २०१४ अशी नऊ वर्षे ‘सीएनएन-आयबीएन’शी संलग्न होते. मोदी सत्तेत यायच्या एक महिना आधी, एप्रिल २०१४ ला,  त्यांनी ‘सीएनएन-आयबीएन’पासून फारकत घेतली आणि ‘इंडिया टुडे’ समूहाबरोबर काम सुरू केले. तीन वर्षांनी २०१७ ला त्यांचा ‘इंडिया टुडे’ समूहाबरोबर असलेला करारही संपुष्टात आला आणि तेव्हापासून ते ‘द वायर’ व ‘द क्विन्ट’ यांच्यासारख्या वेब माध्यमासाठी मुलाखती घेतात.

थापर गेली वीस वर्षे ‘हिंदुस्तान टाईम्स’ मध्ये दर रविवारी ‘संडे सेंटीमेंट्स’ नावाचा कॉलम लिहितात. त्यातील लेखांची दोन पुस्तकेही आली आहेत. त्या कॉलममध्ये थापर राजकारण आणि त्याबाहेरील व्यापक जग, स्वतःचे अनुभव, काही इंटरेस्टिंग किस्से याविषयी अतिशय रोचक आणि वाचनीय लेख लिहितात. थापर ज्या भाषेत बोलतात तसेच लिहितात. अस्सल ब्रिटिश शैलीच्या इंग्रजी लेखनाची आठवण करून देणारे थापर यांचे लेख वाचताना ते आपल्याशी थेट बोलतच आहेत असे वाटत राहते. तसेच मुलाखतींसाठी नियमितपणे होणारा प्रवास, समृद्ध अनुभवविश्व व लेखनाची हातोटी असल्याने थापर यांना सलग वीस वर्षे असा कॉलम लिहिण्यासाठी मजकुराची कमतरता भासलेली नाही. थापर यांचे नुकतेच ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ नावाचे, स्वतःच्या आयुष्यातील निवडक आठवणी, महत्त्वाचे प्रसंग सांगणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे. थापर अधूनमधून ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्येही लेख लिहीत असतात. विशेषतः थेट राजकीय भाष्य करू पाहणारे, राज्यकर्त्यांनी आणि ओपिनियन मेकर समूहाने दखल घ्यावी असे वाटणारे विषय आणि लेख ते ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या लेखांमधून हाताळतात.           

४.

राजकीय नेते हे जनतेला बांधील असून त्यांना प्रश्न विचारणे, त्यांच्या भूमिकांची जाहीररीत्या उलटतपासणी करणे, त्यांचे वर्तन आणि विचार यातील विसंगतीवर बोट ठेवून त्यावर त्यांना बोलायला लावणे असे करण्यात काही चूक आहे असे ब्रिटिश (खरे तर संपूर्ण पाश्चात्य जगातील) पत्रकारितेत कोणालाही वाटत नाही. उलट तिथले राजकीय नेतेही आपल्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले जातील हे गृहीत धरूनही नियमितपणे मुलाखतींना सामोरे जातात. प्रस्थापित मीडियावर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा पत्रकारांच्या प्रश्नोत्तरांना सामोरे जातात. करण थापर हीच मूल्ये घेऊन भारतात आले होते. मात्र त्यांची मुलाखतीची शैली आणि टोकदार-नेमके प्रश्न विचारून समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणणे, हे तसे भारतात नव्यानेच उदयाला येऊ पाहणाऱ्या टीव्ही पत्रकारितेसाठी नवे होते. त्यामुळे थापर यांच्या अनेक मुलाखती गाजल्या. थापर जाणीवपूर्वक आपल्या समोरील व्यक्तीवर कठीण प्रश्नांची सरबत्ती करून त्याला अडचणीत आणतात असेही आरोप केले गेले. मात्र असे असूनही थापर यांना मुलाखतीसाठी काही अपवाद वगळता राजकीय नेत्यांनी नकार दिला अशी उदाहरणे फारच कमी आहेत. उलट लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांशी त्यांची चांगली मैत्री झाली.

थापर यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावर वावरणाऱ्या व्यक्तीला वैचारिक भूमिकेबाबत फार कडवेपणा ठेऊन चालत नाही. मुलाखतीच्या निमित्ताने सर्वच पक्षांच्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना जवळून पाहणे आणि विचारधारेच्या मर्यादा लक्षात घेणे हे त्यांना करावेच लागते. सेक्युलॅरिझम, समावेशकता, उदारमतवाद या मूल्यांविषयी त्यांना आपुलकी वाटते. मात्र असे असूनही  या मूल्यव्यवस्थेचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणाविषयी थापर यांनी नियमितपणे टीका केली आहेच. तसेच अडवाणींसारख्या नेत्यांशी मैत्री असूनही हिंदुत्ववादी विचारधारेवर त्यांनी अनेकदा टीका केलेली आहे. त्यामुळे थापर यांना कोणत्याही एका घट्ट वैचारिक चौकटीत बसवता येणार नाही. मात्र तरीही अनेकदा त्यांची ओळख काँग्रेसधार्जिणे पत्रकार अशी करून दिली जाते. गंमत म्हणजे, संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सत्तेत असतानाच्या दहाही वर्षांत डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांनीही करण थापर यांना मुलाखत दिलेली नाही.       

थापर यांच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो मुलाखती घेतलेल्या असल्या तरी त्यातील पाच मुलाखती फारच महत्त्वाच्या मानता येतील. पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव करून जनरल परवेझ मुशर्रफ यांनी ऑक्टोबर १९९९ मध्ये सत्ता हस्तगत केली. त्यानंतर अवघ्या चारच महिन्यांत थापर यांना मुशर्रफ यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. कारगिल युद्ध, इंडियन एयरलाईन्सच्या विमानाचे अपहरण यामुळे १९९९-२००० या काळात भारत-पाकिस्तान संबंध फारच तणावाचे झाले होते. अशा काळात एका भारतीय पत्रकाराला मुशर्रफ यांच्यासारख्या लष्करशहाची मुलाखत घेण्याची संधी मिळणे फारच दुर्मिळ होते. थापर यांनी त्या मुलाखतीत मुशर्रफ यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. त्यांच्याच घरात बसून त्यांना ‘हुकूमशहा’ म्हटले. भारतात मुशर्रफ यांची विश्वासार्हता किती कमी आहे, हे त्यांना सांगितले. थोडक्यात, कोणतेही बंधन न ठेवता, थापर यांनी मुशर्रफ अस्वस्थ व्हावेत असे अनेक प्रश्न विचारले. मात्र मीडियाला कसे हाताळावे याबाबत फारच चाणाक्ष असलेल्या मुशर्रफ यांनी आपला तोल ढळू न देता, चेहऱ्यावर हास्य कायम ठेवत थापर यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती.

ही मुलाखत दूरदर्शनवर दाखवावी यासाठी थापर यांनी प्रयत्न केले होते. ही मुलाखत महत्त्वाची होती आणि भारतीय दर्शकांना ती पाहण्यातही रस होता. मात्र मुशर्रफ यांच्यासारख्या पाकिस्तानी हुकूमशहाला भारतीय माध्यमांकडून प्रसिद्धी मिळू नये यासाठी प्रयत्न केले गेले होते. पण पंतप्रधान वाजपेयींचे सचिव ब्रजेश मिश्रा यांच्या हस्तक्षेपामुळे ती मुलाखत दूरदर्शनवरून भारतात दाखवली गेली. याच काळात पाकिस्तानी राजदूत अश्रफ काझी यांच्याशी थापर यांची मैत्री झाली होती. त्यामुळे पाकिस्तानी राजदूत काझी आणि भारताचे गृहमंत्री अडवाणी यांच्यात कोणालाही सुगावा लागू न देता चर्चा घडवून आणण्यात व भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत व्हावेत, दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा चर्चेला तयार व्हावे यासाठी २०००-०१ या काळात जे प्रयत्न केले, त्यात थापर यांचा छोटासाच पण महत्त्वाचा वाटा होता. त्या चर्चेचा परिणाम म्हणून २००१ साली आग्रा येथे दोन्ही बाजूंमध्ये शिखर परिषद झाली होती. (अर्थात त्या परिषदेतून फारसे काही निष्पन्न झाले नाही.)

थापर यांनी क्रिकेटपटू कपिल देव यांची २००० सालीच घेतलेली मुलाखतही बरीच गाजली होती. ती मुलाखत पाहण्यासाठी युट्युबवर उपलब्ध आहे. याच वर्षात क्रिकेटच्या विश्वात  मॅच  फिक्सिंग केले जाते आणि खेळाडू सामन्याचे निकाल फिरवले जावेत यासाठी बुकींकडून पैसे घेतात असे उघडकीस आले होते. कपिल देव यांच्यासहित जगभरातील अनेक क्रिकेटपटूंवर मॅच फिक्स केल्याचे आरोप झाले होते. कपिल तेव्हा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी होते. करण थापर यांनी त्यांची बीबीसीसाठी जी मुलाखत घेतली, त्यात कपिल टीव्हीवर रडले होते. मॅच फिक्सिंगचे बिनबुडाचे आरोप कपिल यांच्या जिव्हारी लागले होते हे तर स्पष्टच होते. कपिल देव यांच्यासारखा भारतीय क्रिकेटचा मोठा आयकॉन, जगात सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर, १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कप्तान टीव्हीवर रडणे ही मोठी घटना होती. त्यामुळे ती मुलाखत खूप पाहिली गेली, जगभरात तिच्यावर बरीच उलटसुलट चर्चाही झाली. त्या मुलाखतीमुळे थापर घरोघरी पोहोचले.

थापर यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याबरोबरची २००४ सालातील मुलाखतही अशीच वादग्रस्त ठरली होती. अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर थापर यांना जयललिता यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली होती. मात्र त्या मुलाखतीवर जयललिता अजिबात समाधानी नव्हत्या. त्यामुळे ती मुलाखत पुन्हा घ्यावी यासाठी जयललिता यांनी थापर यांच्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला होता. मात्र थापर त्या दबावाला बळी पडले नाहीत.

याउलट गोष्ट राम जेठमलानी यांच्याबाबत झाली. जेठमलानींनी तेव्हा जेसिका लाल हत्याकांडातील आरोपी मनू शर्माचे बचावपत्र घेतले होते. त्यामुळे जेठमलानी आणि थापर यांची २००६ मध्ये जी मुलाखत झाली, त्यात ते दोघे एकमेकांबरोबर खूप तावातावाने भांडत आहेत असे दिसते. ती मुलाखत दोन वेळा शूट केली होती, मात्र दोन्ही वेळेस ती मुलाखत अशीच झाली. त्यामुळे मग ती आहे तशीच दाखवली गेली. पुढे त्या मुलाखतीबद्दल थापर यांना पारितोषिकही मिळाले होते. त्यानंतर २०१० साली करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून राम जेठमलानी मध्येच उठून गेले होते. आधी भाजपात असलेले जेठमलानी भाजपमधून बाहेर पडले होते व २०१० मध्ये त्यांनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या निमित्ताने घेतलेली ती मुलाखत होती. त्या मुलाखतीनंतर जेठमलानी आणि थापर यांची मैत्री संपुष्टात आली. मुलाखतीमुळे महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर असलेली वैयक्तिक मैत्री संपुष्टात येण्याची थापर यांची ही दुसरी वेळ होती. त्यापूर्वी अडवाणी भाजपच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर २००६ साली त्यांची जी मुलाखत थापर यांनी घेतली. त्यामुळे थापर यांची अडवाणींबरोबर असलेली मैत्री कायमची संपली. त्या मुलाखतीत थापर यांनी राजनाथ सिंग यांच्याविषयी प्रश्न विचारले होते आणि अडवाणींना आपल्या उत्तराधिकाऱ्याविषयीचे प्रश्न आवडले नव्हते. त्यामुळे ही मुलाखत पुन्हा व्हावी असे अडवाणींना वाटत होते. मात्र थापर यांनी तसे करण्यास नकार दिला होता.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

५.

थापर यांनी घेतलेल्या अशा अनेक मुलाखती गाजलेल्या असल्या तरीही त्यांनी नरेंद्र मोदींची आपल्या ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ या ‘सीएनएन-आयबीएन’वरील कार्यक्रमासाठी जी मुलाखत २००७ साली घेतली होती, ती सर्वाधिक संस्मरणीय ठरली आहे. नव्वदच्या दशकात मोदी दिल्लीत भाजपचे प्रवक्ते असल्यापासून थापर आणि मोदी यांची ओळख होती. पुढे २००२ साली थापर यांनी गुजरात दंगलीनंतर मोदींच्या वर्तनावर खूप टीका करणारा आणि त्यांनी पदत्याग करायला हवा असे ठोसपणे सांगणारा लेख आपल्या ‘हिंदुस्तान टाइम्स’मधील कॉलममध्ये लिहिला होता. त्यानंतर, पाच वर्षांनी, जेव्हा २००७ साली मोदी गुजरातच्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार होते, त्याच्या थोडेच दिवस आधी थापर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत थापर यांना मिळवून देण्यात अरुण जेटलींनी मदत केली होती.

त्या मुलाखतीत थापर यांनी मोदींना गुजरात दंगलीवर प्रश्न विचारले होते. पहिल्या पाच मिनिटांत गुजरात दंगलींवर चर्चा करून मग इतर विषयांना पुढे हात घालावा असा थापर यांचा बेत होता. मात्र तसे झालेच नाही. थापर यांचा पहिल्या दोन-तीन मिनिटांतील प्रश्नांचा रोख पाहून मोदींनी मुलाखत पूर्ण केली नाही. तीन मिनिटांतच ते मुलाखत सोडून उठून गेले. कोणत्याही मुलाखतीबाबत असे होणे हे फारच अनपेक्षित असते. त्यामुळे थापर यांनी मोदींना सांगितले की, पुन्हा मुलाखत शूट करू मात्र मोदींची त्याला तयारी नव्हती. त्यामुळे मग ती मुलाखत जशी आहे तशीच दाखवली गेली आणि त्याच्या सर्वत्र बातम्याही झाल्या. मोदी मुलाखतीतून असे मध्येच उठून गेले याची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. अजूनही उत्सुकतेपोटी ती मुलाखत लोक युट्युबवर पाहतात. त्या मुलाखतीनंतर मोदी यांनी थापर यांना तासभर बसवून ठेवले होते. त्यांचा चांगला पाहुणचार केला होता. तसेच दिल्लीत भेटूया असे मोदी थापर यांना म्हणाले होते. मात्र आज अकरा वर्षांनंतरही ती भेट काही झालेली नाही!

पुढे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वर्ष-दीड वर्षातच करण थापर यांच्या कार्यक्रमासाठी भाजपच्या प्रवक्त्यांनी आणि मंत्र्यांनी जाऊ नये अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या गेल्या. असे का झाले असावे हे शोधण्यासाठी करण थापर यांनी थेट भाजपअध्यक्ष आणि पंतप्रधानांचे सचिव यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. पुढे प्रशांत किशोर यांनी बिहारमधील जनता दल (युनायटेड) या पक्षाचे एक नेते पवन वर्मा यांना त्या मुलाखतीविषयी सांगितलेला प्रसंग वर्मांनी थापर यांना सांगितला. वर्मांनी सांगितले की, जेव्हा मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करत होते तेव्हा त्यांचे निवडणूक सल्लागार आणि व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी अवघड प्रश्नांना कसे सामोरे जावे याची तयारी करण्यासाठी त्या मुलाखतीचा वापर केला होता. किशोर यांनी मोदींना ती मुलाखत तब्बल तीस वेळा दाखवली होती. तसेच किशोर यांच्या बोलण्यात असेही आले की, पंतप्रधानांना त्या मुलाखतीविषयी असलेला राग अजूनही गेलेला नाही. थापर यांच्या नव्या पुस्तकात या साऱ्याविषयी त्यांनी बरेच विस्ताराने लिहिले आहे. ते मुळातूनच वाचायला हवे.

६.              

राजकीय नेते जनतेला बांधील असतात आणि त्यांना अस्वस्थ करणारे, अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणे हे आपले कर्तव्य मानणाऱ्या पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रोज रात्री टीव्हीवर बातम्या पाहताना तर हे विशेष प्रकर्षाने जाणवते. अशा वेळी थापर यांच्यासारख्या पत्रकारांचे महत्त्व लक्षात येते. त्यांनी मुलाखतीच्या तंत्राचा उत्तम रीतीने वापर करून आपल्याच राजकीय नेत्यांना, जीवनाच्या इतर क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींना आपल्यासमोर आणले. त्यांची चांगल्या अर्थाने उलटतपासणी केली व आपल्याला उत्सुकता वाटेल अशा विषयांवर प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. एका अर्थाने मुलाखतकार हा टीव्हीचे प्रेक्षक आणि मुलाखत देणाऱ्या व्यक्ती यांच्यातील दुवा असतो. राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेताना तो त्याचे नियत काम जितके चांगले करेल, तितके प्रेक्षकांचे प्रबोधन होत असते आणि लोकशाहीला बळकटी येत असते. 

आज करण थापर यांचे वय ६३ वर्षे आहे. गेली पंचवीस वर्षे त्यांनी आपले काम चोखपणे बजावून भारतीय राजकीय नेत्यांना ते जसे आहेत त्या स्वरूपात आपल्यासमोर आणले होते. त्या प्रक्रियेत त्यांनी टीव्हीसाठी मुलाखती कशा घ्याव्यात आणि राजकीय नेते सामर्थ्यवान असले तरीही अंतिमतः ते जनतेला जबाबदार आहेत, हे माहीत असलेलेच (मात्र तरीही काही वेळा विस्मरणात जाणारे) सत्य आपल्यासमोर आणले होते. त्यामुळेच आता करण थापर यांची पिढी टीव्हीच्या विश्वातून बाजूला होत असताना तरुण पिढीतील पत्रकारांना थापर यांच्यासारख्यांचा वारसा पुढे चालवावा वाटेल की सत्तेसमोर शरणागती पत्करणाऱ्या पत्रकारांचे अनुकरण करावेसे वाटेल? या देशातील लोकशाहीसाठी कोणता पर्याय अधिक हिताचा आहे?  

.............................................................................................................................................

लेखक संकल्प गुर्जर दिल्लीस्थित साउथ एशियन विद्यापीठामध्ये पीएच.डी. करत आहेत.

sankalp.gurjar@gmail.com    

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 25 October 2018

मधु त्रेहान बघा कशी फाडून खातेय करण थापरला : https://www.youtube.com/watch?v=S0pgz2biUmE पहिल्या १०० सेकंदांत मुलाखतीची दिशा स्पष्ट होते. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख