सॅम्युअल जॉन्सन : शब्दांच्या मागे पसरलेला मानवी संसार दाखवणारा शब्दकोशकार!
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
रवींद्र कुलकर्णी
  • सॅम्युअल जॉन्सन आणि त्याचा शब्दकोश
  • Wed , 24 October 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची सॅम्युअल जॉन्सन Samuel Johnson सॅम्युअल जॉन्सनचा शब्दकोश Samuel Johnson's Dictionary

अडलेला शब्द बघणे व अर्थ सापडला की शब्द विसरून जाणे एवढाच माफक डिक्शनरीचा उपयोग सर्वजण करत असतात. रोज नवे व अधिक व्यापक शब्दकोश बाजारात येत असताना २५० वर्षांपूर्वीच्या शब्दकोशाची व कोशकाराची काय मोठी मातब्बरी असे वाटण्याची शक्यता आहे. पण समर्थ कथा व कादंबऱ्यांमध्ये जसे तत्कालीन समाजाचे चित्र उमटलेले असते, तसे ते शब्दकोशातही उमटलेले दिसते. शब्दकोशापासून समाज वेगळा काढता येत नाही. ‘ज्या समाजाला फक्त बोली भाषा आहे, तो केवळ वर्तमान काळात जगतो,’ असे जॉन्सनने म्हटले ते अगदी खरे आहे. त्याचा शब्दकोश म्हणजे त्या काळच्या इंग्लिश समाजाचे चित्र आहे. हे चित्र त्या वेळच्या साहित्यातही आले आहे. आणखी ५० वर्षांनी जन्मलेल्या डिकन्सने या समाजाचे केलेले वर्णन आपणही वाचलेले असते वा त्याबद्दल ऐकलेले असते. तरीही त्या वेळचे लंडन हा सॅम्युअल जॉन्सन व त्याचा शब्दकोश यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्याचे वर्णन अनाठायी वाटू नये.

एकेकाळी लंडन हे फक्त ४४८ एकरात वसलेले गाव होते. गावाला कोट होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक दरवाजे होते. नंतर वस्ती कोटाबाहेर वाढू लागली. अठराव्या शतकात इंग्लिश समाज आपल्या खेड्यांचा त्याग करून या अमाप वाढत चाललेल्या लंडनच्या गल्लीबोळांत पसरत चालला. शतकाच्या मध्याला लंडनची लोकसंख्या ७००,००० झाली. त्या वेळच्या युरोपातील ते सर्वांत मोठे शहर होते. सार्वजनिक सुविधांची वनवा होती. रस्ते अरूंद व घाणीने बरबटलेले असत. मोठी लोकसंख्या व अस्वच्छता म्हणजे साथींना आमंत्रण असे. १६६५ च्या प्लेगच्या आठवणी अजून ताज्या होत्या. ‘Journals of Plague Years’ ही डॅनियल डेफोची प्लेगच्या दिवसांचे वर्णन करणारी कादंबरी बाजारात आली होती. आसमंतात पसरलेल्या धुक्यामुळे सकाळी १० वाजता मेणबत्त्या लावायची वेळ येत असे. ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नसे, पण खुद्द इंग्लंडमध्ये मात्र तो उगवत नसे, असे विल डयुरांटने लिहिले आहे. तुमच्या देशात सूर्य नाही असे नेपोलिअनने आपल्या ब्रिटिश डॉक्टरला म्हटले, तेव्हा तो म्हणाला, “महाराज तुम्ही चुकता आहात. जुलै व ऑगस्ट असे दोन महिने आमच्याकडे स्वच्छ व उबदार असे ऊन असते.” थेम्स नावालाच नदी राहिली होती. औद्योगिक क्रांती आणि वाढत्या लोकसंख्येने त्याचे गटार झाले होते. कोंबड्यांच्या झुंजी गर्दी खेचत. गुन्हेगारांचा सुळसुळाट होता. त्यांना फाशी देताना बघणे, हे करमणुकीचे महत्त्वाचे साधन होते. ते बघताना अनेकांची पाकिटे मारला जात. दारू पिणे ही एक सार्वत्रिक व्याधी होती. दारूवर बंदी घालून भागेना, तेव्हा त्यावरचा कर वाढवून हे व्यसन नियंत्रणात आणण्याचा व्यावहारिक प्रयत्न करण्यात आला. लग्नाचे मुलींचे संमती वय १२ व मुलांचे १४ होते. व्यभ्यिचार हा फरसा गंभीर गुन्हा नव्हता. साहजिकच घटस्फोटाचे प्रमाण कमी होते. आपले नशीब अजमावायला लिंचफिल्ड या खेड्यातून जॉन्सन अशा लंडनमध्ये आला, तेव्हा एकदा चोरट्यांनी त्याच्यावर हल्लादेखील केला. स्वत:ला व्यस्त ठेवण्याच्या खेड्यातल्या लोकांच्या या शहरातल्या तऱ्हा बघून त्याला उबग आला व त्याने म्हटले, “खेड्यात समाधानी असणाऱ्या लोकांची खेड्यात राहण्याचीच लायकी असते.”

१८ व्या शतकातले लंडनचे वर केलेले वर्णन खरे असले तरी ती नाण्याची केवळ एक बाजू होती. शहर उत्साही होते. दारू आणि जुगाराच्या अड्डयांबरोबरच कॉफी हाऊसेस सर्वत्र होती. अनेक  विषयात गती आणि रस असणारे तेथे नियमित येत. तेथे चालणाऱ्या चर्चा या चर्चमध्ये चालणाऱ्या चर्चांपेक्षा बऱ्याच उद्बोधक असत असे जॉन्सनचे निरीक्षण आहे. स्वत:ला स्वतंत्र समजणारी  विद्वान माणसे तेथे होती. स्वदेशाविषयी अभिमान व इतरांविषयी तुच्छता हा गुण त्यांच्यात सामायिक होता. आयझॅक न्युटनचे काम हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे असले तरी त्याबद्दल कुतूहल होते. “Sir Isaac Newton’s Philosophy Explained For Ladies” हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला होता. तो एलिझाबेथ कार्टर नावाच्या स्त्रीने भाषांतरीत केला होता. या स्त्रीचे जॉन्सनला कौतुक होते. “ती पुडिंग छान बनवते व एपिक्टेटसचे भाषांतरही छान करते,” असे तो म्हणे. फक्त सूक्ष्मदर्शकातून दिसू शकणाऱ्या जीवाणूंविषयी लोकांना माहिती होती व ते आरोग्यास धोकादायक आहेत याचीही जाणीव होती. ‘Microgrphica’ हा त्यांच्यावरचा ग्रंथ १६६५ सालीच प्रसिद्व झाला होता. लंडन ते ग्लास्गो हा एकेकाळचा बारा दिवसांचा प्रवास हा चार दिवसावर येऊ घातला होता. लंडनमधल्या अशा चांगल्या व वाईट गोष्टींच्या प्रचंड वैविध्याचे जॉन्सनला आकर्षण होते. “तुम्हाला लंडनचा अंदाज घ्यायचा असेल तर फक्त मोठे रस्ते व चौक बघून चालणार नाही, तर गल्ल्याबोळ पालथे घालावे लागतील, जेथे प्रजा रस्त्यावर राहात आहे व हरक्षणी वाढत आहे,” असे तो म्हणे. नंतर जेव्हा त्याने शब्दकोश बनवला, तेव्हा या सर्व माणसांच्या बोलण्यातल्या शब्दांचा समावेश त्यात करायला हवा होता, अशी चुटपूट त्याला लागून राहिली. “मी लंडन पाहिल्याने मानवी जीवनातल्या सगळ्या शक्यता पहिल्या आहेत,” हे त्याचे म्हणणे सार्थ होते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

‘बॉसवेल्स जॉन्सन’ हे बॉसवेलने लिहिलेले जॉन्सनचे चरित्र हे अतिशय नावाजलेले आहे, पण त्यांची पाहिली भेट ही जॉन्सनचा शब्दकोश प्रकाशित झाल्यानंतर सात वर्षांनी झालेली आहे. जॉन्सनचे लिंचफिल्ड या स्कॉटिश खेड्यातले जीवन हे गरिबीकडे झुकणारे होते. पुढे ओट या शब्दाबद्दल लिहिताना त्याने शब्दकोशात लिहिले, ‘हे खाणे मुख्यत: घोड्यांचे आहे पण स्कॉटलंडमध्ये मात्र माणसांचे आहे.” तो जन्मला तेव्हाच एका डोळ्याने आंधळा व एका कानाने जवळपास बहिरा होता. लहानपणच्या एका आजारात चेहऱ्यावर व्रण आले. हे मूल एकांतात रमणारे होते. वडिलांचे पुस्तकाचे दुकान होते. तेथे त्याला वाचनाची गोडी लागली. आजूबाजूच्या जगाचा पूर्ण विसर पडून तो पुस्तकाच्या विश्वात बुडून जात असे. एकांतात ‘हॅम्लेट’ वाचत असताना त्यात भुताचा प्रवेश आल्यावर त्याला भीती वाटू लागल्याने तो वर येऊन माणसांची वर्दळ असलेल्या जागेत बसल्याची एक आठवण आहे. त्याची वाचन व पुस्तके या विषयीची स्वत:ची अशी काही खास मते आहेत. तो म्हणतो, “मुलाला समजणार नाही म्हणून एखादा ग्रंथ त्याच्या हातातून काढून घेऊ नये. मुलांची कल्पनाशक्ती जेथे त्याला घेऊन जाईल, ते त्याला वाचू द्यावे. मी मुलास ग्रंथालयात मोकळा सेाडून त्याला जे हवे ते वाचायला देईन.” ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यांमधे सर्वांत लायक मनुष्य तो होता. साहित्य या विषयात त्याचा हात धरणारा त्यावेळी तेथे कोणीही नव्हता, याची जेव्हा उत्तर आयुष्यात त्याला आठवण करून देण्यात आली, त्यावेळी तो म्हणाला, “या वरून हेच दिसते की ज्याला खरे साहित्य म्हणावे असे (मानवी जीवनाच्या वैविध्याच्या तुलनेने) किती थोडे आहे.” तेथे वाचलेल्या बर्नाड मँदेवीलीच्या ‘Fable of bees, With an Enquiry Into the Origin of Moral Virtue’ या पुस्तकाचा त्याच्यावर ठसा उमटला. सद्गुण हे अखेर वेगळ्या अंगरख्यातले लपलेले दुर्गुणच असतात असे त्याच्यात प्रतिपादन केलेले होते. माणसांच्या अंतरंगात खोलवर डोकावून बघणे त्याने कधी सोडले नाही. ‘Patriotism is the last refuge of a scoundrel.’ हे जॉन्सनचे वाचन त्याच्या या स्वभावाला साक्षी आहे.

दरम्यान जॉन्सनने एलिझाबेथ पोर्टर या त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी वडील असलेल्या विधवेशी लग्न केले. तिने या तरुणाचे वर्णन ‘मला आजपर्यंत भेटलेल्यातला सर्वांत शहाणा पुरुष’ असे केले. त्याने मात्र ‘आमचे लग्न हा दोन्ही कडून प्रेमविवाह आहे’ असा दावा केला. दोघांचेही म्हणणे खरे होते. ऑक्सफर्डमधले शिक्षण त्याला गरिबीमुळे अर्थवट सोडावे लागले. तरी साहित्य विषयात काही करून दाखवावे व त्यावरच उदरनिर्वाह करण्याचा जॉन्सनचा निर्धार होता. विलकॉक्स नावाच्या एका पुस्तक विक्रेत्याने हा त्याचा निर्धार ऐकून त्याच्या शरीरयष्टीकडे पाहिले व त्याला म्हटले, “तू या पेक्षा हमालाचा बिल्ला मिळव!” जॉन्सन अर्थातच अशा शेऱ्यांमुळे खचून जाणारा नव्हता. त्याने ‘जंटलमन्स मॅगझीन’ या मासिकात नोकरी मिळवली. ते त्यावेळेस चांगल्या खपाचे व प्रतिष्ठित मासिक होते. साहित्याबरोबरच जॉन्सन अनेक विषयांवर त्यात लिहित असे. त्यात विज्ञान व तंत्रज्ञानासारखेही विषय असत. रिचर्ड आर्काराइटने यंत्रमागात काही सुधारणा केल्या होत्या. त्या मागचे तत्त्व एकट्या जॉन्सनला लगेच समजल्याची त्याने सांगितले आहे. याच मासिकात पार्लमेंटमधील चर्चांचे वृत्तांत लिहिण्याचे काम जॉन्सनला होते. (नंतर हे काम डिकन्सही करत असे) या चर्चा व भाषणे ही कंटाळवाणी असत. बऱ्याचदा वक्त्याचे नाव व विषय याशिवाय त्यात सांगण्यासारखे काही नसे. त्यामुळे त्यात मालमसाला घालण्याचे कामही जॉन्सनला करावे लागे. काही वर्षांनी सॅम्युअल फूट या अभिनेत्याने तत्कालिन पंतप्रधान विल्यम पिटच्या भाषणाची जॉन्सनसमोर बेफाट स्तुती सुरू केली. त्यात वाहवत जाऊन शेवटी त्याने त्या भाषणाची तुलना डेमॉस्थेनिसच्या वक्तृत्वाबरोबर करायला सुरुवात केली, तेव्हा मात्र जॉन्सनने ते भाषण आपण लिहिल्याचे सांगून त्याला गार केले. आपल्याच भाषणाचे सुधारित वृत्तांत वाचून राजकारण्यांना ‘आपण असे बोलायला पाहिजे होते’ असे वाटत असल्याची वदंताही त्यावेळी होती.

साहित्य जगतात स्थान मिळवायचे असल्यास काही भरीव असे करून दाखवण्याची गरज जॉन्सनला वाटली तशी त्याने डुडस्ले आणि आणखी काही पुस्तक विक्रेत्यांबरोबर करार करून शब्दकोशाचे काम अंगावर घेतले. त्या बदल्यात जॉनसनला १५७५ पौंड हप्त्यात मिळणार होते. ही रक्कम मोठी होती. आज त्याचे मूल्य १,५०,००० पौंड होते. तीन वर्षांत आपण हे काम पूर्ण करू असा त्याला विश्वास होता.

जॉन्सनची डिक्शनरी ही काही इंग्रजी भाषेतली पाहिली डिक्शनरी असणार नव्हती. सोळाव्या शतकापासून इंग्रजी भाषेत शब्दकोश प्रचलित होते. पण जॉन्सनचा काळ हा साम्राज्यवादाचा व औद्योगिक क्रांतीचा होता. अनेक शब्द नव्याने प्रचलित होत होते. त्या काळाची तुलना आजच्या संगणक क्रांतीमुळे जो बदल भाषेत होत आहे, त्याच्याशी करता यावी. यशस्वीरीत्या राज्य व व्यवसाय करण्यासाठी अनेक शब्दांच्या व्याख्या या स्पष्ट असणे गरजेचे होते. जुन्या शब्दांची नोंद असणे, त्याचबरोबर नवीन शब्दांचा अंर्तभाव त्यात करणे आवश्यक होते. जॉन्सनची मनोभूमिकाही फक्त अर्थ देऊन थांबावे अशी नव्हती. अर्थाबरोबर त्या शब्दाचा भावही पोहचवण्याचा तो प्रयत्न करणार होता आणि हीच पुढे त्या शब्दकोशाची खासीयत ठरली.

भाषा हे राष्ट्राचे अधिष्ठान असते असे जॉन्सन मानत असे. स्कॉटलंडच्या ज्या भागातून तो आला होता, तेथल्या लोकांचाही ‘आमचीच इंग्रजी शुद्ध’ असल्याचा दावा होता. रॉयल अकॅडमीने भाषा शुद्धी व वृद्धीसाठी २२ पंडितांची समिती १६६४ सालीच स्थापन केली होती, जी नेहमीप्रमाणे आपापसातल्या वादाने थोड्याच अवधित बंद पडली. तरी भाषेच्या प्रमाणीकरणाचे अनेक प्रयत्न वैयक्तिक पातळीवर चालूच होते. जॉन ड्रायडेनसारखा कवी इंग्रजी भाषेत फ्रेंच शब्दांची फार भेसळ होत चालली आहे, अशी तक्रारही करत होता. भाषा शुद्धीसाठी जॉन्सन अतिशय आग्रही असे. ‘Transpire’ हा शब्द डिक्शनरीत घेण्याला तो नाखूश होता. त्या शब्दाचे मूळ फ्रेंच आहे असे त्याचे म्हणणे होते. इंग्रजीत तो अर्थ व्यक्त करायला दोन शब्द वापरावे लागतील, असा बॉस्वेलने त्याचा प्रतिवाद केला, तेव्हा जॉन्सन ठामपणे म्हणाला, “महाशय, एखादा अर्थ व्यक्त करायला आमच्या भाषेत दोन शब्द आहेत व दुसऱ्या भाषेत एकच आहे म्हणून तो मी वापरावा याचा अर्थ भाषा बदलणे असा होतो.”

जॉन्सन परंपरावादी असला तरीही भाषा प्रवाही असते याची जाणीव त्याला होती. “शब्द मातीचे बनलेले असतात आणि ते शब्द ज्या वस्तूंसाठी वा कल्पनांसाठी बनतात त्या मात्र स्वर्गीय (अस्पर्श) असतात,” असे त्याने शब्दकोशाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. शब्दांच्या सौंदर्याची जॉन्सनला जाण होती. त्याने कालबाह्य झालेल्या काही शब्दांचीही बाजू घेतली आहे. तो लिहितो, “कालबाह्य शब्द जे कालबाह्य न झालेल्या लेखकांकडून वापरले गेले आहेत वा ज्या शब्दांना स्वत:ची ताकद व सौंदर्य आहे की ज्यामुळे त्यांचा पूर्नजन्म होणे आवश्यक आहे असे शब्द यात आहेत.” शब्द जन्म घेतात. शब्द वस्त्रे परिधान करतात. शब्द स्वत:च वाहवत जातात. शब्द वयानुसार वाकतातही आणि मरणही पावतात. एवढेच नव्हे तर नवीन शरीर धारण करून परत जन्मही घेतात. बदल हा अखेर भाषेला जिवंत ठेवत असतो. ‘वुमनाइज’ या शब्दाचा जॉन्सनने दिलेला अर्थ हा ‘मृदु करणे’ असा आहे. हा अर्थ मोठा काव्यात्म आहे. आज ‘वुमनाइजर’ म्हणजे स्त्रीलंपट! जॉन्सनने लावलेल्या अर्थाने आज हा शब्द इच्छा असूनही वापरणे शक्य नाही. जॉन्सनच्या काळातच हा शब्द फारसा वापरात नव्हता. आज वेगळ्या अर्थाने तो वापरात आहे. खुद्द मृदु म्हणजे ‘सॉफ्ट’ या शब्दाचे संगणकीय वस्त्रातले रूप आज अगदी वेगळे आहे.

शब्दकोशाच्या कामाला हात घालण्यापूर्वी त्याने हा नवीन शब्दकोश कसा असेल याचा ३८ पानी आराखडा प्रसिद्व केला. त्यात तो म्हणतो, “शब्दकोशात आज भाषा म्हणजे शब्दांचा एक ढिगारा झालेला आहे, एकाचा दुसर्‍याशी संबंध नाही…” वस्तूंपासून नावांपर्यंत व नावांपासून संकल्पनांपर्यंत पोहचण्याचे जॉन्सनने ठरवले. ‘lower’ या शब्दाच्या त्याने दिलेल्या अर्थात ते दिसून येते. फुलाचे वर्णन व झाडाचा एक भाग एवढेच सांगून त्यावेळच्या बाकीच्या शब्दकोशांप्रमाणे तो थांबत नाही तर तेा ‘Flowering’ म्हणजे विकास पावणे हाही अर्थ तो देऊन जातो. शब्दाच्या जन्मापासून जॉन्सन त्याचा माग घेतो व कालानुरूप त्याच्या सतत विकास पावत जाणाऱ्या अर्थाकडे लक्ष वेधतो. ‘To put’ व ‘To Take’ या शब्दांच्या वेगवेगळ्या छटांच्या अर्थासाठी त्याने पाच हजारापेक्षा जास्त शब्द शब्दकोशात वापरल्याचे त्याच्या अभ्यासकाने लिहिले आहे. शब्दकोशासाठी शब्द निवडताना जॉन्सनने दोनशे वर्षांआधीपासूनचे साहित्य पालथे घातले व निवडलेला एकेक शब्द साहित्यिकांनी कसा वापरला आहे याचे त्याने उदाहरण दिले. हे सांगताना तो केवळ शब्दार्थाच्या विचारा पलीकडे जाऊन कोणत्या Senseने तो शब्द वापरला गेला आहे याचा वेध घेताना मिल्टन, पोप, ड्रायडेन, स्पेन्सर, बेकन आणि शेक्सपीअर अशा साहित्यसम्राटांच्या अवतरणांनी त्याचा कोश भरून गेला. त्याच्या डिक्शनरीच्या पहिल्या आवृत्तीत ४२७७३ शब्द होते व त्यांच्या स्पष्टीकरणासाठी त्याने ११०,००० अवतरणे दिली होती, जी जमवलेल्या अवतरणांपेक्षा संख्येने निम्मीच होती. हे सर्व काम एक हाती होते. जी काही मदत होती ती कारकुनी होती. साहजिकच शब्दकोश पूर्ण होण्याची तीन वर्षांची मुदत केव्हाच उलटून गेली. प्रकाशकाकडून आर्थिक हप्त्यातही त्यामुळे वेळ लागून तंगी निर्माण झाली. जोडीला अनेक शारीरिक व्याधी होत्याच, ज्यावर अनेकविध औषधे तो घेत राही. पाच पौंडाचे कर्ज चुकवल्याबद्दल त्याला अटकही झाली. ते कर्ज त्याने परत कर्ज काढून फेडले. “परमेश्वरा, माझ्या गरजांकडे, दु:खाकडे व पापांकडे जरा लक्ष दे!” अशी प्रार्थना करण्याची वेळ त्याच्यावर आली. हे हाती घेतलेले काम जॉन्सनने पूर्ण केले, तेव्हा हा प्रकल्प सुरू झाला त्याला आठ वर्षे झाली होती. पण अखेर विद्वान म्हणून त्याचे नाव झाले. शब्दकोशाच्या प्रकाशनानंतर सात वर्षांनी वार्षिक ३०० पौंडाचे पेन्शन त्याला ब्रिटिश राजघराण्याकडून सुरू झाले, तेव्हा कुठे आर्थिक आघाडीवर त्याला उसंत मिळाली.

१७५५ सालच्या फेब्रुवारी महिन्यात चार खंडात जॉन्सनचा शब्दकोश प्रकाशित झाला. उत्तम प्रतीचा कागद त्यासाठी वापरला होता. त्याची किंमत ४ पौंड व १० सेंट होती व आवृत्ती २००० ची होती. शिकलेल्या व उच्चभ्रू लोकांसाठी तो होता असे किमतीवरून वाटते. जॉन्सनने शब्दकोश घेणाऱ्यांकडे केवळ अडलेले अर्थ बघणारे गिऱ्हाइक म्हणून न पाहता भाषेचे अभ्यासक म्हणून प्रथम पासून पाहिले. डिक्शनरीचा त्याने केलेला अर्थ ‘पुस्तक जे शब्दांचे महत्त्व सांगते’ असा आहे. या शब्दकोशाचे स्वागत चांगले झाले. अ‍ॅडम स्मिथसारख्या अर्थपंडिताने त्याची इतर शब्दकोशांबरोबर तुलना करून त्याला नावाजले. पुस्तकाच्या खपाबद्दल जॉन्सन समाधानी होता. त्याच्या हयातीत त्याच्या पाच आवृत्त्या निघाल्या. त्यापुढेही तो न्यूझिलंड, ऑस्ट्रेलीया अशा ठिकाणी निर्यात होत राहिला.

हा शब्दकोश परिपूर्ण होता का? फक्त लिखित शब्दांचा अंतर्भाव त्याने शब्दकोशात केला. बोली भाषेतल्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वाऱ्याला पकडण्यासारखे आहे, असे त्याला वाटले. शब्दकोश बनवून इंग्रजी भाषेला शिस्त लावण्याचा त्याने आधी विचार केला होता. पण ते काम अवघड असल्याची कल्पना त्याला येत गेली. दर तासाला शब्दांची एकमेकांशी असलेली नाती बदलतात. त्यामुळे त्यांचे अर्थ बदलत राहतात याची जाणीव त्याला होती. एका शब्दाचा माग घ्यावा तर त्यातून निघालेल्या दुसऱ्या शब्दाच्या मागे अर्थासाठी लागावे लागते. या गोष्टीला अंत नाही. ‘माझे काम पूर्ण होणारे नाही पण ते संपवणे आवश्यक आहे,’ असे त्याने प्रस्तावनेत लिहिले. इंग्रजी भाषेत साधारणत: २,२५००० शब्द असताना या शब्दकोशातल्या ४२७७३ शब्दांची संख्याही अपुरी वाटते. पण आज प्रचलित असलेले अनेक शब्द व कल्पना त्यावेळी नव्हत्या. शेक्सपिअरचे सर्व साहित्य २९००० शब्दांत बसलेले आहे. १०,००० शब्दांत इंग्रजीत सफाइदार संवाद साधता येतो. हे लक्षात घेतल्यास ४२७७३ ही संख्या लहान नाही. जॉन्सन अनेकदा शब्दाच्या अर्थाबरोबर आपले मत त्या बरोबर देतो. ‘Excise’ याचा अर्थ त्याने ‘वस्तूंवरचा द्वेषमूलक कर’ असा दिला आहे. अ‍ॅम्ब्रोस बायर्सच्या ‘डेव्हिल्स डिक्शनरी’ची आठवण अशा ठिकाणी होते. शब्दकोशावर जॉन्सनची छाप होती, पण त्याचमुळे त्यात एक प्रकारचा जिवंतपणा होता.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

मानवी मनाच्या चुका करण्याच्या शक्तीवर त्याचा विश्वास होता. तो लिहितो, “भव्य कामात अज्ञानामुळे व सोप्या कामांमध्ये अतिआत्मविश्वासामुळे चुका होतात. मन भव्य गोष्टींना घाबरते व क्षुद्राचा तिटकारा करते आणि जे शक्य आहे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करते. कधी खूप काळजी घेतल्यामुळे मनाचा वेग मंदावत जातो, तर कधी ते प्रयत्नांचा डोंगर उपसण्यासाठी अनावर होते आणि सध्या सरळ रस्त्याचा त्याला कंटाळा येतो. कधीतरी तर ते अनेक हेतूंच्या चक्रव्यूहात हरवून जाते.” शब्दकोशातल्या त्रुटींची त्याला जाणीव होती. पण त्याने तो खंतावला नाही कारण मानवी प्रयत्नांना जे शक्य होते ते सारे त्याने केले होते याचा विश्वास आणि सार्थ अभिमान त्याला होता. शेवटी तो म्हणतो, “ माझ्यासाठी यश आणि अपयश हे अर्थहीन शब्द आहेत. कुठल्याही टीकेची मला भीती नाही आणि कुठल्याही स्तुतीची आशा नाही.” ‘Pastern’ याचा अर्थ त्याने ‘The knee of a horse’ असा दिला होता, जो चुकीचा होता. त्याबद्दल एका विदुषीने त्याला छेडले असता, “मॅडम, अज्ञान केवळ अज्ञान!” अशी अपमानास्पद कबुली त्याने दिली. ही चूक त्याने दुसऱ्या अवृत्तीत सुधारली, पण फार बदल शब्दकोशात करावा असे त्याला वाटले नाही.

Dull : Not exhilaterating (sic); not delightful; as, to make dictionaries is dull work, असे त्याने ‘डल’ या शब्दाबद्दल लिहिले, पण हे जॉन्सन बाबत खरे नव्हते. शब्द शोधणे व त्याच्या स्पष्टीकरणासाठी इंग्रजी साहित्यातील समर्पक अवतरणे शोधणे यासाठी अनेक रात्रींचे दिवस त्याने केले. शब्दकोशाबरोबरच साहित्याचा हा नजराणा लोकांसमेार आणता आला या कल्पनेने तो रोमांचित झाला. भाषेच्या ऐतिहासिक वारश्याचा त्याला अभिमान होता. “माझा शब्दकोश आणि अनेक वर्षांची माझी मेहनत राष्ट्राच्या सन्मानासाठी आहे. या देशाला आता या खंडातल्या कुठल्याही देशापुढे भाषेसाठी स्पर्धा केल्याशिवाय पदर पसरण्याची गरज नाही,” असे त्याने म्हटले ते शब्दश: खरे होते. स्वातंत्र्यासाठी अमेरिकन वसाहतींमध्ये या वेळी स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या होत्या. त्यांचा त्याला मनस्वी राग होता. पण अखेर हे राष्ट्राचे कुंपणही त्याला संकुचित वाटले. त्याने लिहिले “माझ्या या कष्टाने जर इतर भाषेतल्या वा देशातल्या ज्ञानसाधकांना आणि सत्याची आस असणाऱ्यांना जर मदत झाली तर माझे कष्ट सार्थकी लागले आहेत असे मला वाटेल.” अमेरिकन वसाहतींचा त्याला राग होता. त्यांनाच जॉन्सनची मदत २५० वर्षांनी झाली. हे एकच उदाहरण जॉन्सनच्या शब्दकोशाचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसे आहे. १९९९ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिटंन यांनी यादवीग्रस्त युगोस्लाव्हियावर विमान हल्ले करण्याचे आदेश दिले व त्यानुसार ४५०० विमानहल्ले करण्यात आले. या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात १७ अमेरिकन सेनेटर्सनी दाद मागितली व ‘डिक्लरेशन ऑफ वॉर’ (Declaration of war) चा म्हणजे युद्ध जाहीर करण्याच्या त्यांच्या हक्काची पायमल्ली झाल्याचा दावा केला. या खटल्यात ‘डिक्लिर’ म्हणजे ‘जाहीर करणे’ या शब्दावर बराच खल झाला. अमेरिकन घटना १७८७ साली अस्तित्वात आली होती. त्यावेळेला ‘डिक्लिर’ या शब्दाचा नेमका अर्थ घटनाकारांच्या मनात काय होता हे पाहण्यासाठी जॅान्सनच्या शब्दकोश उघडण्यात आला.

आयुष्यातले आजपर्यंतचे त्याचे अनेक दिवस आजारपणात, नैराश्याच्या गर्तेत व हाततोंडाची मिळवणी करण्यात खर्ची पडले होते. शब्दकोशाने त्याला ऊर्जा दिली. ज्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून गरिबीमुळे शिक्षण सोडावे लागले होते, त्यांनी त्याला सन्माननीय डॉक्टरेट दिली.

शब्दकोश प्रकाशित झाल्यानंतर शेक्सपिअरच्या साहित्याचे आठ खंड जॉन्सनने संपादित केले. इंग्लिश कवींची चरित्रे लिहिण्यासंबंधी पुस्तक विक्रेत्यांनी त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा २०० पौंड त्यासंबंधी मोबदला त्याने मागितला असता त्याला तो सहज मिळाला. त्याने केलेल्या टीकेला विलक्षण धार आली. “जॉन्सनबरोबर वाद घालण्यात अर्थ नाही. त्याच्या पिस्तुलाचा नेम जर चुकला तर तो तुम्हाला त्याच्या दस्त्याने हाणेल,” असे त्याच्याबद्दल म्हटले गेले. त्याची टीका इतकी आकर्षक असे की त्याच्या सत्यअसत्याच्या पलीकडे जाऊन ती लोकांना हवीशी वाटू लागली. माणसे ज्या गोष्टीत आनंद घेतात त्यावरून त्यांची लायकी त्याच्या लगेच लक्षात येते असे तो म्हणे.

एकदा एका डॉक्टर महाशयांनी जॉन्सन बरोबरच्या संवादात त्याला म्हटले, “तुमच्या लक्षात असेलच आपण आधी भेटलो होतो. त्यावेळेला मी इतका सुंदर कोट घातला होता की, त्याने तुमचे लक्ष वेधून घेतलेच असेल.” जॉन्सन उत्तरला, “महाशय, तुम्ही पॅक्टोलस नदीत जरी डुबकी मारून आला असता तरी माझे लक्ष तुमच्याकडे गेले नसते.”

मिंडास राजाला त्याला मिळालेल्या वरदानातून मुक्त होण्यासाठी डायोनेसिस देवतेने त्याला पॅक्टोलस नदीत नागव्याने अंघोळ करण्याचा सल्ला त्याला दिला होता, याचा संदर्भ जॉनसनच्या उत्तराला होता. असा शब्दकोशानंतरचा जॉन्सन बॉस्वेलने त्याच्या चरित्रातून अमर केला. इंग्लिश भाषेतले ते सर्वश्रेष्ठ चरित्र आहे असा अभिप्राय तत्त्वज्ञ विल डयुरांटने दिला आहे. शेक्सपिअर, जॉन्सन व ऑस्कर वाइल्ड हे इंग्रजीतले सर्वांत जास्त उदधृत केले जाणारे साहित्यिक आहेत. अंदाजे १४० वर्षांचे अंतर प्रत्येकांतमध्ये आहे आणि शैलीतही किती फरक आहे! शेक्सपिअर गंभीर असे काही भाष्य करतो. वाइल्ड अतिशय उत्त्फुल्ल व चमत्कृतीपूर्ण वळण वाक्यांना देतो आणि ‘I have found men to be more kind than I expected and less just.’ यासारखी जॉन्सनची वाक्ये मात्र वाचणाऱ्याच्या टपलीत मारून त्याला भानावर आणतात.

अनेक वर्षांनीदेखील जॉन्सनचे इंग्लिश समाजाला असलेले आकर्षण कमी झाले नाही. पहिल्या महायुद्धात खंदकात विशांतीच्या वेळी जेफ्री केन्स हा सैनिकी अधिकारी ‘बॅबिलोग्राफी ऑफ सॅम्युअल जॉनसन’ हा ग्रंथ हाती घेई व आपला तोफखाना सांभाळताना आर. डब्ल्यू. चापमन हा सैनिक बॉस्वेलचे ‘जॉन्सन्स जर्नी टू वेस्टर्न आयलंडस ऑफ स्कॉटलंड’ हे पुस्तक वेळ काढून वाचे. आजही जॉनसनविषयी व त्याच्या शब्दकोशाविषयी इंग्रजीत ताजे लिखाण होत असते. ‘सॅम्युअल जॉनसन प्राइझ’ हा ग्रेट ब्रिटनमधला २०,००० पौंडाचा आज अतिशय प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार आहे.

१८७४ साली निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी जॉन्सनची ओळख मराठी मनाला करून दिली, तेव्हाच मुळी त्याच्या मृत्युला ९० वर्षे झाली होती. त्यानंतर राजवाड्यांसारखा एखादा चमचमणारा तारा सोडला तर बाकी सारा अंधार आहे. एकमेकाला बक्षिसे व पुरस्कार देण्याच्या धावपळीत तर तो अंधार आणखी गडद भासतो.

‘शब्द अर्था आधी यावा हे तो ईश्वराचे देणे, पेंगुळत्या प्रयासाला अवघ्या संसाराचे लेणे’ असा शब्दांच्या मागे पसरलेला मानवी संसार दाखवणे हाच जॉन्सनच्या शब्दकोशाच्या रचनेमागचा हेतू असावा.

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 27 October 2018

म्हाता = म्हणता


Gamma Pailvan

Sat , 27 October 2018

रवींद्र कुलकर्णी, लेख चांगला आहे. तुम्ही म्हाता तसा बाकी सारा अंधार असला तरी मराठीत बरेच शब्दकोश आहेत. ही बाब विचारात घ्यायला हवीये. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख