अजूनकाही
आज २४ ऑक्टोबर २०१८.
आज ‘अक्षरनामा’ हे ‘मराठीतलं पहिलंवहिलं डिजिटल डेली फीचर्स पोर्टल’ सुरू होऊन बरोबर दोन वर्षं पूर्ण झाली. २४ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘अक्षरनामा’ सुरू झाला. उद्यापासून ‘अक्षरनामा’चं तिसऱ्या वर्षांत पर्दापण होईल. गेल्या दोन वर्षांतला अनुभव अतिशय चांगला, सर्वार्थानं समृद्ध करणारा होता. तसंच आमच्या सामर्थ्यांची आणि मर्यादांची जाणीवही करून देणाराही होता. २०१६च्या २२-२३ ऑक्टोबर या दोन दिवशी ‘ड्राय रन’ सुरू करून २४ ऑक्टोबरपासून ‘अक्षरनामा’ अधिकृतपणे सुरू झाला, तेव्हा आम्ही खरं तर बरेचसे आश्वासक होतो आणि काहीसे साशंकही. पण आता दोन वर्षांचा काळ उलटल्यानंतरही साधारणपणे काहीशी तशीच परिस्थिती आहे, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात याला ऑनलाईन माध्यमात निर्माण झालेली आणि होत असलेली स्पर्धा किंवा मराठी ऑनलाईन पत्रकारितेचा अजूनही तुलनेनं रुंदावत नसलेला मार्ग कारणीभूत नसून आमच्या मर्यादाच जास्त प्रमाणात कारणीभूत आहेत, हे कबूल करायला हवं. येत्या वर्षांत त्या मर्यादांवर मात करत ‘अक्षरनामा’ अधिकाधिक वर्धिष्णू करण्याचा प्रयत्न करू. नवनवे विषय, नवे लेखक यांना अधिकाधिक प्रमाणात स्थान देऊ. आणि मुख्य म्हणजे हे सर्व नवनव्या वाचकांपर्यंत पोहचवण्याचाही प्रयत्न करू.
तूर्त एवढंच. फार वायदे करण्यात अर्थ नसतो. त्याचं भान न ठेवल्याने काय होतं, हे आपल्याला विद्यमान केंद्र सरकारच्या कारभारातून दिसतंच आहे. वि. स. खांडेकरांनी त्यांच्या एका कादंबरीत म्हटलं आहे की, ‘गोड शब्दांच्या भाकरी होत नाहीत.’ त्या चालीवर ‘गोड आश्वासनांनी विश्वासार्हता मिळत नाही’ असं म्हणता येईल.
‘अक्षरनामा’चा दुसरा वर्धापनदिन ऐन दिवाळीच्या तोंडावर आल्यानं यंदाचा दिवाळी विशेषांक’ हाच ‘वर्धापन दिन’ म्हणून प्रकाशित करत आहोत. २०१६ सालच्या ‘अक्षरनामा’च्या पहिल्या दिवाळी अंकाची थीम होती - ‘माणूस, त्याचा विचार आणि त्याचं काम’. गतवर्षी ‘माध्यमांचं अधोविश्व’ ही थीम होती. या वर्षीच्या दिवाळी अंकाची थीम ‘माणसं : कालची, आजची, उद्याची’ अशी आहे. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक व्यक्ती या ना त्या कारणानं चर्चेत आल्या\राहिल्या आणि काही तशा राहिल्या नाहीत. त्यातल्या काही निवडक दखलपात्र माणसांची ओळख करून देताना काही कालच्या माणसांची आणि काही उद्याही चर्चेत राहतील अशा माणसांचीही ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ‘संकीर्ण’ नावाचा एक वेगळा विभागही आहे. त्यात विविध विषयांवरील लेख आहेत.
‘अक्षरनामा’च्या दिवाळी अंकाचा हा पहिला हप्ता आहे. दुसरा हप्ताही लवकरच प्रकाशित होईल.
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ganesh Devkar
Mon , 29 October 2018
प्रिय मित्रा राम, अलिकडेच अक्षरनामाचं नित्यनेम वाचन सुरु केलं आहे. हल्ली सगळ््याच सगळ््याच माध्यमांचा विस्फोट झाला आहे. यात एकूण कंटेट, सारासार विचार, प्रगल्भता, सामाजिक भान, आत्मभान देणारं लिखाण, आत्मिक उन्नयन साधता येणारं लिखाण... आदी एरवीही न झेपणाºया संकल्पनाही इकडे तिकडे पार विस्कटून गेल्या आहेत. नेमक्या याच वळणावर मला अक्षरनामा दीपस्तंभासारखा वाटू लागला आहे. आपण सोबत काम केलं आहे. मला या पार्टलविषयी माहितीही मिळाली होती. पण अलिकडेच मी हे मनापासून नित्यनेमानं वाचू लागलो आहे. पोर्टलवरचा कंटेट खरेच खूप आश्वासक आहे. तुला आणि तुमच्या सगळ््या टीमला खूप खूप शुभेच्छा. तुमची वाटचाल छान सुुरु आहे. यात खंडू पडू देऊ नका. - गणेश देवकर
Gamma Pailvan
Sat , 27 October 2018
नमस्कार, श्री. राम जगताप. दोन वर्षं पुरी केल्यानिमित्त तुमचं आणि सर्व चमूचं हार्दिक अभिनंदन. जरा उशीरंच झाला शुभेच्छा देण्यास. पण म्हणतात ना की उशिरा दिलेल्या शुभेच्छांनी आयुष्य वाढतं. अक्षरनामास उदंड आयुष्य लाभो. या निमित्ते एक विनंती आहे. प्रतिसाद देतांना मजकुरात नवीन ओळ टाकायची सोय अंतर्भूत करावी म्हणून सुचवेन. परिच्छेद न पाडता आल्यामुळे वाचकांचे प्रतिसाद कधीकधी एकसुरी भासतात. आपला नम्र, -गामा पैलवान