महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर गृहराज्यमंत्री आहेत. भाजपचे तरुण तडफदार नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. दीपक केसरकर वारंवार प्रसारमाध्यमांमध्ये सनातन संस्थेवरील बंदीबाबत उलटसुलट विधानं करत आहेत. २० ऑगस्ट २०१८ रोजी केसरकर यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव केंद्राकडे पुन्हा पाठवला जाणार असल्याची घोषणा टीव्हीवर केली आणि दुसऱ्या दिवशी स्पष्टीकरण दिलं की, असा नवा प्रस्ताव पाठवला जाणार नाही. २०११ पासून महाराष्ट्र सरकारचा सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सेना-भाजपच्या सरकारनं त्यानंतर दोन वेळा केंद्राला याबाबत आठवण करून दिली आहे.
८ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘इंडिया टुडे’ या न्यूज चॅनेलनं सनातन संस्थेच्या साधकांवरचं स्टिंग ऑपरेशन प्रसारित केलं. सनातन संस्थेच्या साधकांकडे स्फोटकांचा साठा होता आणि दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता, अशी ऑन-कॅमेरा कबुलीच स्टिंग ऑपरेशनमध्ये सनातन संस्थेच्या दोन साधकांनी दिली आहे. हे दोन्ही साधक पुराव्याअभावी २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाले आहेत. कारण दहशतवाद विरोधी पथकानं अत्यंत कमकुवत चार्जशीट या आरोपींविरोधात दाखल केलं. ज्यामुळे सनातन संस्थेच्या या साधकांना एकप्रकारे मदत झाली, असं हे साधक स्टिंग ऑपरेशनमध्ये कबूल करत आहेत. ८ ऑक्टोबरला दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा न्यूज चॅनेलवर विधान केलं की, सनातन संस्थेची निक्षून चौकशी केली जाईल वगैरे.
याच दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांचा मुंबईमध्ये सत्कार केला. “कथित हिंदू आतंकवादाचा बुरखा फाडणारे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा जाहीर सत्कार. सत्कार हिंदू धर्मरक्षकाचा,” या मथळ्याखाली “हिंदुत्वनिष्ठांचे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करणारे, धर्मरक्षणार्थ विनामूल्य सहाय्य करणारे व दूरचित्रवाहिन्यांवर हिंदुत्वाची बाजू प्रभावीपणे मांडणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या धर्मकार्यांविषयी कृतज्ञता म्हणून आयोजित या सत्कार सोहळ्यास अगत्य येणे करावे, ही विनंती.” अशी पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.booksnama.com/client/book_list_by_category
.............................................................................................................................................
फ्लॅशबॅक –
सनातनवर बंदीची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी तीन वर्षांपूर्वी हिंदू जनजागृती समितीच्या विनय पानवलकर यांच्याकडून सत्कार स्वीकारला होता. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांनी राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यावर आयोजित केलेल्या प्रदर्शनाला केसरकर यांनी राज्यमंत्री म्हणून भेट दिली होती.
पानवलकर कोण आहेत? तर सनातनच्या ‘धर्मशक्ती सेने’चे ते एकेकाळी प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात वाळपईला एअर रायफल वापरून, त्रिशूळ मानेत घुसवून स्वसंरक्षण कसं करायचं याचं २० साधकांना दोन वर्षं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. एकीकडे हेच मंत्री आणि याचंच सरकार बंदीचे प्रस्ताव पाठवणार आणि दुसरीकडे मंत्री महोदय आणि खासदार सनातन संस्थेकडून सत्कार देणार – घेणार!
हे मैत्र किती मुरलेलं आहे पहा. ‘सनातन वृत्तविशेष’ (‘सनातन प्रभात’ या संस्थेच्या मुखपत्रात) मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या माध्यमातूनच हे मैत्र समजून घेऊ.
............................................................................................................................................
भाजप महापौर संगीता खोत
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या भाजपच्या महापौर संगीता खोत यांनी सनातन संस्थेच्या आश्रमास २६ सप्टेंबर २०१८ रोजी सदिच्छा भेट दिली. सनातन संस्था अध्यात्मप्रसाराचे महत्त्वाचे कार्य करत आहे. विरोधक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, तुमचे कार्य नेटाने चालू ठेवा, असं त्या म्हणाल्या. (प्रसिद्ध - सप्टेंबर २७, २०१८.)
............................................................................................................................................
जयकुमार रावल, भाजप, पर्यटनमंत्री
नंदूरबार येथे हिंदू जनजागृती समिती आयोजित प्रदर्शनाला भाजपचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट दिली. हिंदू जनजागृती समिती करत असलेले कार्य हिंदू समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपण करत असलेले कार्य स्तुत्य असून माझ्या या कार्याला शुभेच्छा आहेत, असे गौरवोद्गार रावल यांनी काढले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते. (प्रसिद्ध - सप्टेंबर २६, २०१८)
............................................................................................................................................
विनय तेंडुलकर, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष
सनातन संस्थेचे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद – विनय तेंडुलकर, गोवा प्रदेशाध्यक्ष, भाजप.
मीही ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. तुम्ही दिलेल्या धर्मशिक्षणामुळे चांगले समाजप्रबोधन होत आहे, असे कार्य अविरतपणे करत रहा, असेही तेंडुलकर म्हणाले. सनातनचे साधक धनंजय हर्षे यांनी सनातनवरील बंदीच्या मागणीच्या संदर्भात तेंडुलकर यांना अवगत केले असता त्यांनी वरीलप्रमाणे अभिप्राय दिला. (प्रसिद्ध - सप्टेंबर १९, २०१८)
............................................................................................................................................
राजेश क्षीरसागर, शिवसेना, आमदार
कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या मोहिमेचे कौतुक केले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ११, २०१८)
............................................................................................................................................
सुरेश हाळवणकर, भाजप, आमदार
सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही – सुरेश हाळवणकर, भाजप आमदार.
बंदीच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले. सनातन बंदीचा विषय मला पूर्ण ठाऊक आहे. सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही. सनातन बंदीच्या विरोधात मी आवाज उठवीन, असे आश्वासन इचलकरंजी - कोल्हापूर येथील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी ८ सप्टेंबरला दिले. (प्रसिद्धी - सप्टेंबर ११, २०१८.)
............................................................................................................................................
संजय केळकर, भाजप, आमदार
निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून राजकीय स्वार्थासाठी सनातनला विरोध होत आहे – भाजप आमदार, संजय केळकर.
सनातनचे कार्य चांगले आहे. निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून राजकीय स्वार्थासाठी काही लोक विरोध करत आहेत, असे ठाण्याचे आमदार यांनी सांगितले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ८, २०१८)
............................................................................................................................................
मदन येरावार, राज्यमंत्री, भाजप
सनातन संस्थेच्या बंदीच्या मागणीच्या विरोधात यवतमाळ येथे पालकमंत्री मदन येरावार यांना संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीकडून निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेवर बंदी येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ७, २०१८.)
............................................................................................................................................
सदा सरवणकर, आमदार, शिवसेना
यापूर्वी काँग्रेसप्रणीत शासनाच्या काळातही जेव्हा जेव्हा सनातनवर बंदीचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, तसेच यावेळीही आम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत, असे शिवसेनेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ६, २०१८)
............................................................................................................................................
अजय चौधरी, शिवसेना, आमदार
सनातन संस्थेवर बंदीची जी मागणी करण्यात येत आहे, त्याविषयी मी जाणतो. सनातनच्या कार्यकर्त्यांना मी जवळून पाहिले आहे. ते असे करूच शकत नाहीत. सध्याच्या प्रकरणात पकडण्यात आलेले कार्यकर्ते सनातनचे नाहीत हे वारंवार तुम्ही सांगूनही ते तुमच्याच संघटनेचे आहेत, असे सनातनच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे, असे मत शिवसेनेचे अजय चौधरी यांनी व्यक्त केले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ५, २०१८)
............................................................................................................................................
अशोक पाटील, शिवसेना, आमदार
राष्ट्रधर्मजागृतीचे कार्य करणारी सनातन ही एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना आहे. सनातनचे कार्य मी जवळून पाहिले आहे. सनातन पुष्कळ चांगले कार्य करत आहे. काही राजकीय पक्ष, कथित विचारवंत आणि हिंदूधर्म विरोधी लोक जी सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत, त्यामागे राजकीय स्टंट आहे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे भांडूप पश्चिम मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पाटील यांनी मांडले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ५, २०१८)
............................................................................................................................................
प्रशांत ठाकूर, भाजप, आमदार
सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीकडून पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोच्या अध्यक्षपदी निवड झाल्याविषयी अभिनंदन करण्यात आले. सनातन संस्थेचे अभय वर्तक आणि हिंदू जनजागृतीत समितीचे बळवंत पाठक यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे अभिनंदन केले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ४, २०१८)
............................................................................................................................................
सुधीर गाडगीळ, भाजप, आमदार
सध्या तरी सनातनवर बंदीचा कोणताही विषय समोर नाही, आला तर निश्चित मुख्यमंत्र्यांशी बोलीन – सांगली, भाजप आमदार सुधीर गाडगीळ.
केरळ, कर्नाटक राज्यांत भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, त्यावर कुणी बोलत नाही, असंही ते म्हणाले. विविध राजकीय पक्ष आणि पुरो (अधो)गामी यांच्याकडून होत असलेल्या सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या संदर्भात हिंदू जनजागृतीत समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. (प्रसिद्ध - सप्टेंबर ४, २०१८)
............................................................................................................................................
गजानन कीर्तीकर, शिवसेना, खासदार
मी सनातनच्या संभाव्य बंदीच्या विरोधात सरकारला लेखी कळवीन, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ३, २०१८)
............................................................................................................................................
शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि भाजपचे आमदार बाळासाहेब सानप
सनातन संस्थेवर बंदीच्या करण्यात येत असलेल्या मागणीच्या विरोधात नाशिक येथील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. सनातन संस्थेवर होणारा हा अन्याय थांबवण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांना निवेदन देण्यात आले. या वेळी, आम्हाला सर्व माहिती आहे, काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली. (प्रसिद्ध - सप्टेंबर ३, २०१८)
............................................................................................................................................
अनिल शिरोळे, भाजप, खासदार
सनातन संस्था समाजसेवेचं आणि राष्ट्र सुरक्षेचं व्यापक कार्य करत आहे. भ्रष्टाचार, जनतेची लूट, अन्याय याविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देत आहे. सनातन संस्थेवरील बंदीची मागणी पूर्वग्रहदूषितपणे केली जात आहे. या मागणीविरोधात, बंदीला विरोध करण्यासाठी मी मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करीन तसंच त्यांना निवेदन देईन, असं आश्वासन भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी दिलं. (प्रसिद्ध - ऑगस्ट ३०, २०१८)
............................................................................................................................................
प्रशांत सातव, भाजप बारामती नेते
बारामती येथे भाजपच्या प्रशांत सातव यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या धर्मरथ प्रदर्शनाचे पूजन करण्यात आले. सनातन संस्थेला कधीही साहाय्य करण्यास सिद्ध आहे – प्रशांत सातव, भाजप. ऑक्टोबर ४, २०१८.
............................................................................................................................................
माजी मंत्री दीपक ढवळीकर, गोवा
महाराष्ट्रवादी गोमंतक दलाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सनातन संस्थेला क्लीन चीट दिली आहे. (प्रसिद्ध - ऑक्टोबर १, २०१८)
............................................................................................................................................
राधाकृष्णन, शिवसेना नेते, तामिळनाडू
तामिळनाडू राज्यातील हिंदूंचे सनातन संस्थेला संपूर्ण समर्थन – राधाकृष्णन्, अध्यक्ष शिवसेना (प्रसिद्ध - ऑगस्ट २९, २०१८)
............................................................................................................................................
राजस्थान राज्य वित्त आयोग अध्यक्षा डॉ. ज्योती किरण
राजस्थान राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षा डॉ. ज्योती किरण यांची सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदू जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थानचे समन्वयक आनंद जखोटिया यांच्याकडून भेट. ज्ञानम संमेलनात त्या सहभागी झाल्या होत्या. (प्रसिद्ध - सप्टेंबर २९, २०१८.)
............................................................................................................................................
लोकेंद्रसिंह कालवी, करणी सेना
सनातन संस्था ही चांगली संस्था असून चांगल्या उद्देशाने कार्यरत आहे. ज्या उद्देशासाठी ही संस्था कार्यरत आहे, ती मूलभूत भावना समजून घ्यायला हवी. सनातन संस्थेवरील बंदीची मागणी म्हणजे संकटकालीन स्थिती आहे. सनातन संस्थेवरील बंदीच्या षडयंत्राच्या विरोधात करणी सेना उत्तर देण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रतिपादन करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्रसिंह कालवी यांनी ६ सप्टेंबरला घाटकोपरला केले. (प्रसिद्ध - सप्टेंबर ८, २०१८)
............................................................................................................................................
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आत्तापर्यंत सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा देणारीच विधानं केलेली आहेत. सर्व हिंदुत्ववाद्यांना दहशतवादी ठरवू नका, असं विधान त्यांनी केलं आहे. अटकेत असलेल्या नक्षलसमर्थकांना ‘कथित नक्षलवादी’ म्हटलं जातं, पण हिंदुत्ववाद्यांना ‘कट्टर हिंदुत्ववादी’ म्हटलं जातं, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विचारवंतांच्या हत्याप्रकरणात झालेल्या कारवाईनंतर ठाकरे यांनी हे विधान केलं होतं. शिवसेना सत्तेतील एक महत्त्वाचा घटक पक्ष असल्यानं या पक्षाच्या भूमिकेकडे आणि त्याच्या प्रतिनिधींनी केलेल्या विधानांकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे.
सनातन संस्थेवर बंदीची मागणी जोर धरू लागल्यामुळे गेले काही दिवस सनातन संस्था राजकीय पक्षांच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना भेटून याविरोधात निवेदनं देत आहे. एकीकडे बंदीचा धोषा लावलेल्या सरकारचे प्रतिनिधी प्रत्यक्षात सनातन संस्थेच्या प्रतिनिधींना वेळ देऊन पाठिंबा देत आहेत. आजपर्यंत शिवसेना – भाजपच्या वरील एकाही प्रतिनिधींनं सनातन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचा इन्कार केलेला नाही. आम्ही या सर्व लोकप्रतिनिधींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सदा सरवणकर यांनी पक्षाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे, असं स्पष्टीकरण दिलं, तर सनातन संस्थेनं छापलेल्या या बातमीची कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितलं. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी ‘सामना’मध्ये आलेली भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं सांगितलं. तर, भाजपचे नेते माधव भंडारी यांनी ‘Law will take its course, government is abided by law’ अशी प्रतिक्रिया दिली. इतर कोणत्याही नेत्याशी संपर्क होऊ शकला नाही.
............................................................................................................................................
लेखिका अलका धुपकर या सकाळ मीडिया ग्रुपच्या ‘SYMPLE TIMES’च्या संपादक आहेत.
alaka.dhupkar@gmail.com
.............................................................................................................................................
लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक असून त्याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 23 October 2018
माननीय संपादक श्री. राम जगताप यांना एक विनंती आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी हिंदू दहशतवाद म्हणून एक बागुलबुवा उभा केला गेला. त्याच्या आडून कर्नल प्रसाद पुरोहित व साध्वी प्रज्ञा यांना विनाचौकशी तुरुंगात डांबलं गेलं. त्यांचा तसेच इतर निरपराध्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. देशद्रोह्यांची ही ऊरबडवेगिरी चालू असतांना भेकडकसाब व त्याची टोळी भारतावर भीषण आक्रमण करण्यात गुंतली होती. त्याचा सुगावा आपल्या गुप्तचर खात्याs लागला व त्यांनी गृहखात्यास (केंद्र वा महाराष्ट्र किंवा दोन्ही) अहवालही दिला. मात्र हिंदू दहशतवादाच्या काल्पनिक भीतीने पछाडलेल्या पोलिसांनी चक्क त्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी २६/११ रोजी सतत ३ दिवस निरपराध भारतीयांना पोलिसांच्या हलगर्जीपणाची रक्तरंजित किंमत मोजावी लागली. सांगायचा मुद्दा असा की चोर सोडून संन्याशाला सुळी चढवलं की खऱ्या गुन्हेगारांचं फावतं. आज अशीच परिस्थिती परत उद्भवली आहे. न्यायालयाने सनातन संस्थेवर आरोप ठेवायला नकार दिलेला आहे. संस्थेचे ६ साधक ३१ डिसेंबर २०१३ रोजी निरपराध म्हणून घोषित झाले आहेत. हे सत्य दडपून अलका धुपकर व निखील वागळे यांच्यासारख्या व्यक्ती कसला गदारोळ उडवू इच्छित आहेत? सनातन संस्थेवर बंदी घातलेली पाहायला हे दोघे इतके का व्याकूळ झाले आहेत? चोर सोडून संन्याशाला सुळावर चढवण्यात या दोघांना कोणता आनंद मिळतो? हे दोघे देशद्रोही तर नाहीत ना? तरी या दोघांना अक्षरनामाचं व्यासपीठ वापरू द्यायचं का याविषयी आपण विचार करावा ही विनंती. आपला नम्र, -गामा पैलवान