अजूनकाही
चीनमधील दहा महिन्यांच्या फेलोशिपच्या काळात तिथली इथली खेडी, रस्ते, माणसे, खानपान, संस्कृती, जीवन, स्त्री-पुरुष संबंध, एकाच अपत्याची सक्ती, छोटी कुटुंबे, छोटी घरे, श्रीमंत-गरिबांमधील भेद, तंत्रज्ञानाचा प्रभाव, अमेरिकेचे आकर्षण, रात्रजीवन सारे काही जवळून अनुभवता आले. चिनी मातीतले हे अनुभव आधुनिक, बदललेल्या, बदलू पाहणाऱ्या चीनचे आहेत... नवं साप्ताहिक सदर...दर शुक्रवारी...
चीन...ज्याला जसा माहिती आहे, तसा तो त्याचा अर्थ काढतो. कुणासाठी माओची क्रांती, कुणासाठी समाजवादी लोकशाहीचे मॉडेल, कुणासाठी (स्वस्त नि सुमार) इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची भली मोठी बाजारपेठ, तर कुणासाठी पाकिस्तानचा मित्र, भारताचा शत्रू, अमेरिकेला खेटणारा महत्त्वाकांक्षी ड्रॅगन... मुदलात, आपण सारे अमेरिकाधार्जिणे आहोत. अमेरिका म्हणण्यापेक्षा पाश्चिमात्य प्रभावाखाली आहोत. १९९१च्या जागतिकीकरणानंतर तशी एक मोठी पिढीच अमेरिकेच्या विचारविश्वात रमली. त्याचे चांगले-वाईट परिणाम आपण अनुभवतो आहोतच; पण चीनकडे आपले दुर्लक्ष झाले. चीन म्हणजे, असा शेजारी ज्याच्याशी बोलण्यासाठी आपण दूरवरच्या तात्कालिक मित्राची मदत घेतो. हा मित्र या शेजाऱ्याविषयी जे सांगेल-जे बोलेल-जे लिहील त्यावर आपण निर्धोकपणे विसंबून राहतो. तोच प्रभाव घेऊन चीन-चिंतन सुरू राहते. मीदेखील याच प्रभावाखाली होतो. पत्रकारांसाठी चीन म्हणजे अजूनच सतीचे वाण. वास्तव व सत्यातील सूक्ष्म फरक लक्षात न घेता (जगातील कुठल्याही भाषेत) लिहिले, म्हणजे चीनमधून तुमची रवानगी (तेही अवघ्या काही तासांमध्ये) मायदेशात झालीच म्हणून समजा! त्यामुळे चीनच्या परराष्ट्र व्यवहार खात्यामार्फत 'चायना पब्लिक डिप्लोमसी असोसिएशनची' दहा महिन्यांची फेलोशिप मिळाल्यावर काहीसा ऊर दडपला होता. दिल्लीस्थित काही मित्रांशी चर्चा करून बीजिंगला येण्याचा निर्णय घेतला आणि फेब्रुवारीत बीजिंगकर झालो; दहा महिन्यांसाठी. मुक्काम पोस्ट - चायना फॉरेन अफेअर्स विद्यापीठ. उत्तम दर्जाचे निवासस्थान. शेजारी पाकिस्तानमधील, वरच्या मजल्यावर बांगलादेशमधील, खालच्या मजल्यावर अफगाणिस्तानमधील आणि नेपाळमधील असे दक्षिण आशियातील देशांचे पत्रकार माझे शेजारी-पाजारी झाले. त्यांच्याशी स्नेह जुळला. त्यांचा देश समजावून घेता आला. मला उमगलेला भारत माझ्या कुवतीप्रमाणे सांगता आला. चीनची ही गुंफा माझ्यासाठी खुली झाली होती.
सीपीडीएचे उपाध्यक्ष मिस्टर हु सोबत अफगाणिस्तानमधील पत्रकार बशीर शमीम. हा देशही अस्वस्थ आहे. भारत आणि चीनकडे आशेने पाहतोय. त्यामुळे भारत व चीनने हातात हात गुंफुन सर्वेपि कल्याणासाठी काम करण्याची गरज हु व्यक्त करतात.
भाषा शिकता-शिकता चीनचे समाजकारण, अर्थकारण, राजकारण, संस्कृती, शिक्षणव्यसस्था सारे जवळून अनुभवता आले. चीनच्या दहा राज्यांमधील तीसेक शहरांमध्ये प्रवास झाला. त्यात तिबेटही आलाच. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास जी २० परिषदेत – ‘हा आमचा देश आहे नि हा आमचा विमानतळ आहे’ हे सुनावण्याची धमक चीनच्या सुरक्षारक्षकांमध्ये आहे नि याच राष्ट्रध्यक्षांसाठी रेड कार्पेट न अंथरण्याची 'डिप्लोमसी’देखील चीनकडे आहे; पण याच चिनी सरकारने आम्हा पत्रकारांसाठी मात्र चीनची दारे खुली करून दिली, प्रश्न विचारू दिले, त्या विरोधात कधीही विचारणा केली नाही. अर्थात, प्रश्नांची सोयीस्कर उत्तरे दिली, तो भाग अलहिदा, पण प्रश्नांवर बंदी आणली नाही. प्रश्न विचारल्यानंतर कुणी लगेचच चीनविरोधीही ठरवले नाही. हल्ली प्रश्न विचारणाऱ्याला ‘राष्ट्रविरोधी’ असल्याचे लेबल लावण्याचे स्वातंत्र्यदेखील जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाने आपल्याला बहाल केले आहे.
असो. मुद्दा आहे तो चीनने खुल्या केलल्या या मनःद्वाराचा; पण हे चीनने आत्ताच का केले? ते तुम्ही–आम्ही का समजून घ्यावे? गरजेचे आहे. चीनला समजून-उमजून घेणे हे ‘ग्लोबल कंपल्शन’ आहे. कधी अस्तित्वात होता की नाही, असा गूढ, अगम्य ड्रॅगन हीच चीनची ओळख झाली. गंमत म्हणजे, हा प्राणी चीनमध्ये पवित्र मानला जातो. या ड्रॅगनचा विळखा जगभर पडला आहे. पाश्चिमात्य क्रांती-उत्क्रांती पूर्ण झाली आहे. आता वेळ आहे, आशिया खंडाच्या क्रांती-उत्क्रांतीची! त्यानंतर आफ्रिका. विकसनशील व अविकसित देशांच्या बाजारपेठेवर असलेले चीनचे गारूड; अवाढव्य लोकसंख्या नि चीनने स्वीकारलेली लोक-राजशिष्टाचाराची (पब्लिक डिप्लोमसी) अभिनव पद्धत; जगभरातील विचारवंत, अभ्यासक, राज्यकर्ते यांच्यात चीनविषयी असलेली कमालीची उत्सुकता यांमुळे चीन जगाच्या केंद्रस्थानी आहे.
अगदी आपल्या पंतप्रधानांदेखील डिमोनेटायझेशनवर अलीकडेच झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत चीनचा विषय काढण्याचा मोह झाला. 'शेजारच्या चीनमध्येही भारतातील डिमोनेटायझेशनवर चर्चा सुरू आहे नि त्यावर त्यांचे बारीक लक्ष आहे', अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील बैठकीत केली होती. कारण आशिया खंड जर जगाचे नेतृत्त्व करणार असेल, तर चीन व भारतच परस्परांचे स्पर्धक असतील नि मित्रदेखील. भारत व चीन परस्परांशिवाय पुढे जाऊच शकणार नाहीत. त्यामुळे हे दोन्ही देश परस्परांना समजण्याची धडपड करीत आहे.
आपण त्या बाबतीत उदासीन. चीनमध्ये आम्हा पत्रकारांसाठी स्थापन केलेल्या चायना साऊथ एशिया प्रेस सेंटरचा वीस वर्षीय समन्वयक भारतामुळे प्रभावित होऊन स्वतःचे नाव विजय ठेवतो (या विजयला मी ‘विजय दिनानाथ चौहान’ अशी हाक मारतो). एवढेच कशाला, जगातील सर्वांत मोठी राजकीय पार्टी अर्थातच कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे (सीपीसी) शिष्टमंडळ भारतात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून जाते नि अगदी मी-मी म्हणवणाऱ्या राष्ट्रीय प्रसारमाध्यमांना याची कानोकान खबर होत नाही. इतके आपण चीनविषयी उदासीन आहोत.
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून चायना पब्लिक डिप्लोमसी असोसिएशनची स्थापना झाली. त्याचे बिनीचे शिलेदार. डावीकडून - भारताविषयी असलेल्या ममत्त्वापोटी स्वतःचे नामकरण केलेला विजय, एड्रिना, चीनच्या भारतीय दूतावासात काही काळ काम केलेल्या व भारताची उत्तम जाण असलेल्या मिस गाँग, मिस्टर यू, जेन व आपले मत निर्धोकपणे मांडणारा केके.
सीपीसी हा जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला राजकीय पक्ष निर्विवादपणे आहे. कारण चीन कितीही अत्याधुनिक असला, तरी तिथे मिस्ड कॉल देऊन सदस्य बनवण्याचे कागदोपत्री सदस्यबढाव अभियान अजून सुरू झालेले नाही. तर चीनसाठी भारत असा महत्त्वाचा आहे. कारण भारतात असलेली भलीमोठी बाजारपेठ. चीनच्या एकूण एक्स्पोर्टमधील भारताचा वाटा केवळ २.३३ टक्के आहे. त्यामुळे 'चिनी मालावर बहिष्कार' या जागतिकीकरणातील दिवास्वप्नाचा कितीही प्रचार केला, तरीही चीनला काहीही फरक पडणार नाही. ही बाजारपेठ चीनला विस्तारायची आहे; पण भारत चीनसाठी केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही. आपली तंत्रज्ञान विशेषतः आयटीमध्ये असलेली प्रगती, आपल्याला गणितात असलेली गती, लोकसंख्या, अध्यात्म, बुद्धभूमी, योग यांविषयी चिनी माणसाला कमालीचे आकर्षण आहे. त्यामुळे चिनी माणूस व भारतामध्ये एक स्नेहसूत्र आहे. तुम्ही भारतीय असल्याचे सांगितल्यावर तिबेटमधील ल्हासाच्या पटोला पॅलेसमध्ये लामा तुम्हाला नमन करून हा स्नेहभाव व्यक्त करतो, तेव्हाच तुम्हाला हा स्नेहभाव अनुभवता येतो. मला हा स्नेहभाव अनुभवता आला. जवळजवळ सर्वच मोठ्या शहरांमध्ये भारतीय रेस्टॉरंट्स आहेत. भारतीय सिनेमा चीनी युवकांना तोंडपाठ आहे. (थ्री इडियट्समुळे) आमीर खान घराघरात माहिती झाला आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणामुळे तर भारताची लक्तरे तिएनमान चौकात टांगली गेली आहेत. त्यात आपल्या प्रसारमाध्यमांनी भरीव योगदान दिले आहे. चिनी माणसाला भारत हा असा चौकटीबद्ध माहिती आहे. भारतातील गरिबी, महिलांची असुरक्षितता, जातीयता, वर्ण-वर्गव्यवस्थेशी चिनी युवकाचा परिचय झाला. या युवकाला खरा भारत माहिती नाही. आम्ही त्यांना तो समजावून सांगावा म्हणून व भारतीयांना खरा चीन समजावून सांगण्यासाठी म्हणून चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा हा दहा महिन्यांचा फेलोशिप प्रोग्राम आहे.
ज्या-ज्या राज्यांमध्ये आमचा प्रवास झाला, तिथे आम्ही मुक्तपणे वावरलो; गल्लीबोळ भटकलो. दुभाषा कधी असायचा कधी नसायचा. प्रत्येक शहरात मोडके-तोडके इंग्रजी बोलणारे लोक भेटले. दिवस असो वा रात्र, एकदाही हॉर्नचा आवाज आला नाही की कुणी सिग्नल नसताना वाहन पुढे दामटले नाही; रस्ते चकाचक. अवघा चीन मेमध्ये फुलांनी डवरला होता. रस्तोरस्ती, जागोजागी गुलाबांचे ताटवे फुलले होते. त्या फुलांच्या फुलण्यालादेखील शिस्त होती. 'सार्वजनिक संपत्ती' हा लोकशाहीतील जबाबदारी झटकणारा शब्दप्रयोग इथे नाही. त्याचा अनुभव जेनशी बोलताना आला. जेन आमची समन्वयक. तिचे चिनी नाव खगोई; जेन हे इंग्रजी नाव (इथे प्रत्येकाला इंग्रजी नाव असते नि विदेशी नागरिकांना चिनी नाव असते. आमच्या चिनी भाषेच्या मास्तरीणबाईंने माझे नाव द् शान्ग ठेवले.). तर जेनविषयी. ती सीपीसीची सदस्य आहे; शिस्तबद्ध आहे. मी तिला एकदा म्हणालो - “रस्तोरस्ती फुललेली ही फुले लोक तोडत नाही. तुम्ही सरकारी संपत्तीची निगा चांगली राखता.” त्यावर जेनने जे उत्तर दिले, ते खरे तर विकासाचे निदर्शक मानले पाहिजे. ती म्हणाली – “ही सरकारी संपत्ती नाही. आम्हा सर्वांची आहे. सरकार कायदा व सुरक्षेसाठी आहे, पण आमच्या वस्तूंची काळजी आम्हीच घेतली पाहिजे. ही फुले इथेच कोमेजतील आणि खाली पडतील, पण त्यांना कुणी हातदेखील लावणार नाही. हा नियम नाही; संस्कृती आहे”. जेन ही चीनच्या तरुणाईची एक प्रतिनिधी आहे. 'सार्वजनिक संपत्ती तुझ्या काय अमूकतपमूकची आहे का?', असा प्रश्न विचारण्याची धीटाई बाल्यावस्थेतच प्राप्त करणारे आपण आहोत. तिथे जेन म्हणजे कुणी तत्त्ववेत्तीच म्हटली पाहिजे. इथला तरुण निर्धोकपणे स्वतःचे मत मांडतो. सार्वजिनक जीवनासाठी आवश्यक साऱ्या सोयीसुविधा पूर्ण करूनही सीपीडीएचे उपाध्यक्ष हु म्हणतात – “चीन अजूनही विकसनशील देश आहे”. परराष्ट्र व्यवहार खात्यातील वरिष्ठ महिला अधिकारी व चायना साऊथ एशिया प्रेस सेंटरच्या संचालक मिस गाँग म्हणतात – “आमच्या चीनमध्ये शेतकरी आत्महत्या करायचे, पण आम्ही त्या रोखल्या. फक्त हे सत्य कुणा पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी छापले नाही की आम्ही हे जगाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही.”
चीनच्या खेड्यांचे हे प्रातिनिधीक स्वरूप. युनान प्रांतातील डाली या प्रसन्नचित्त गावातील पहाट
असा हा आधुनिक चीन. भव्य, अवाढव्य, महत्त्वकांक्षी, शक्तिशाली, प्रबळ नि नव्या मित्रांच्या शोधात असलेला. सीमावाद, व्यापारी देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय राजकारण बदलत राहणार; पण आपण मात्र याच्या पल्याड जावून चीनला समजून घेतले पाहिजे. इंग्रजीचा आंतरराष्ट्रीय प्रभाव हे चीनच्या गूढपणाचे अजून एक कारण. अगदी नव्वदीच्या दशकात चीनमध्ये म्हणे सामान्य माणूस इंग्रजी बोलताना क्वचितच दिसे. आता मात्र तरुणांची एक मोठी पिढीच इंग्रजी बोलू लागली आहे. म्हणजे गरजेपुरते इंग्रजी बोलू शकणारे लोक प्रत्येक शहरात आहेत.
भाषेमुळे, बंदिस्त भिंतीमुळे चीन गूढ राहिला. सत्तरच्या दशकात आपली लोकशाही आणीबाणीमुळे समृद्ध झाली. आपण आशियाई खेळांच्या आयोजनात आपण मग्न होतो, तेव्हा चीनी लोक खाद्यान्नासाठी तडफडत होतो. उत्क्रांती तर सोडाच क्रांतीची चक्रेही उलटी फिरू लागली होती. साम्यवाद स्वीकारावा तर विकास नाही नि विकास स्वीकारावा तर साम्यवादाला तिलांजली, अशा अभूतपूर्व विवंचनेत चीनमधील राज्यकर्ते अडकले होते. हा ड्रॅगन निद्रिस्त झाला होता. नव्हे, जगाला तसे वाटले होते; पण वास्तविक चीन स्वतःच्याच कामात मश्गूल झाला होता. त्याने अहोरात्र कष्ट केले आणि त्या कष्टांमधून आजचा चीन उभा राहिला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी रेड कार्पेट न अंथरण्याची क्षमताही त्यामुळेच चीनमध्ये आली आहे.
भारतीय योगाची चिनी माणसावर मोहिनी आहे. म्हणजे ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून ते ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’पर्यंत.
भारताला स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागला नि चीनला एकसंघ होण्य़ासाठी. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी व चीनला एकसंघ करणारी पिढी या दोन्ही पिढ्या रोमॅंटीसिझममध्येच होत्या. हा रोमॅंटीसिझम भारत जसाच्या तसा पुढच्या पिढ्यांना देत राहिला. डेन्शाओ पिंग यांनी मात्र हा वारसा पुढच्या पिढीला दिला नाही. त्यांनी पुढच्या पिढीला महत्त्वाकांक्षा दिली. मला मिळालेली चीनमधील दहा महिन्यांची फेलोशिप ही ती महत्त्वाकांक्षा समजण्याचीच कहाणी आहे. इथली खेडी, रस्ते, माणसे, खानपान, संस्कृती, जीवन, स्त्री-पुरुष संबंध, एकाच अपत्याची सक्ती, छोटी कुटुंबे, छोटी घरे, श्रीमंत-गरिबांमधील भेद, तंत्रज्ञानाचा प्रभाव, अमेरिकेचे आकर्षण, रात्रजीवन सारे काही जवळून अनुभवता येते आहे. चिनी मातीतले हे अनुभव ‘आधुनिक चीन’चे आहेत; बदललेल्या, बदलू पाहणाऱ्या चीनचे आहेत.
लेखक, बीजिंगस्थित चायना पब्लिक डिप्लोमसी असोसिएशनमध्ये संशोधक पत्रकार आहेत.
stekchand@protonmail.com
@stekchand
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
abhijeet bhagwat
Thu , 15 December 2016
really good article सोनवणे सर
Bhagyashree Bhagwat
Fri , 09 December 2016
Must Read! An article with different approach.