पुरातन काळात भारतवर्षांत अष्टावक्र नामक थोर ऋषी होऊन गेला. सदाचार व सत्कर्म यांचा तो अनुयायी होता. वेद शास्त्रांत पारंगत होता. तो आईच्या गर्भात असताना त्याने आपल्या पित्याची वेदउच्चारणांतील शास्त्रीय चूक दाखवली म्हणून त्याचे अंग आठ ठिकाणी वाकडे होण्याचा शाप पित्याने दिला. अंग वाकडे होते, पण बुद्धी व वर्तन सरळसोट होते.
एकदा एकांतात धर्मविषयक विचार करताना त्याच्या मनात चारी आश्रमांविषयीचा विचार आला. आपण आता गृहस्थाश्रम स्वीकारावा असे त्याला वाटले. वदान्य मुनींची सुप्रभा नामक कन्या पत्नी म्हणून मिळाली तर बरे होईल असे वाटून त्याने मुनींजवळ सुप्रभेला मागणी घातली. ती कन्या नावाप्रमाणेच तेजस्वी व सौंदर्यातही अनुपमेय होती. सद्गुण, शील व वर्तन यांत ती सर्वच दृष्टीने योग्य होती. अष्टावक्र वदान्यांकडे गेला, त्या वेळी ती गोशाळेत गायींची सेवा करत होती. तिच्या ओझरत्या व प्रथम दर्शनानेच तो मोहित झाला.
पण वदान्यमुनी म्हणाले, ‘‘माझी कन्या तुला अवश्य देईन, पण तत्पूर्वी तुला मी सांगेन तसे करावे लागेल. प्रथम तू उत्तरेला जा. तिथे तुला हिमालय व कुबेर नगरी ओलांडल्यावर रुद्राचे पवित्र मंदिर लागेल. त्या परिसरांत सिद्ध-जपी तपी व चारण यांचे वास्तव्य असते. विविध रंगरूपी व मुखे असलेले रुद्रगण व पिशाच्चे तिथे सतत नृत्य गायनाने भगवान रुद्राची सेवा करत असतात. याच ठिकाणी हिमालय कन्या पार्वतीने कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले. विवाहही इथेच झाल्याने उमा-महेश यांना तो प्रदेश प्रिय आहे. ऋतू, दिवस व रात्र मनुष्यरूपाने शिवाची सेवा व मनरंजन करत असतात. हा नयनरम्य व खडतर प्रदेश पार केल्यावर तुला एक वृद्ध तपस्विनी भेटेल. तिची यथास्थित पूजा करून मर्जी संपादन करून आलास की तुमचा विवाह होईल.’’
अष्टवक्राने विचार करून होकार दिला. मुनींना वंदन करून त्याने सुप्रभेकडे दृष्टिक्षेप टाकून तिचा निरोप घेतला. मी लौकरच परतेन व विधीयुक्त विवाह करून तुला स्वगृही नेईन असेच जणू त्याला तिचा सांगायचे होते.
......................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
......................................................................................................................................................
दुसऱ्या दिवशी पहाटे त्याने उत्तरेकडे प्रस्थान ठेवले. हिमालयात बाहुदा नदीत स्नानसंध्या करून देवतांचे तर्पण करून त्याने थोडी विश्रांती घेतली. फळे-कंदमुळे खाऊन तिथल्या गुहेत निवारा शोधला व पहाटे उठून पुनश्च स्नानसंध्या केली. वेदमंत्राने अग्नी चेतवून त्याची पूजा केली. मनःचक्षुंपुढे उमामहेशाची मूर्ती साकारून त्यांचे दर्शन घेतले व पुनः प्रवासाला प्रारंभ केला. लौकरच तो देवांचा कोषाध्यक्ष कुबेर यांच्या मंदाकिनी नगरीत पोहोचला. सुवर्ण-रत्नांनी झळाळणारी दिव्य नगरी व नवरत्नांनी दीप्तीमान झालेले व विश्वकर्म्याने घडवलेले पुष्पक विमान पाहून अष्टावक्राला आनंद झाला. जवळच कुबेराचे राखीव उद्यान होते. तिथले पशुपक्षी व भ्रमर-कमळांनी अच्छादलेली सरोवरे पाहून त्याला स्वर्गातच आल्यासारखे वाटले. त्याने उद्यानाचा रक्षक मणिभद्र याच्याजवळ कुबेराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेवढ्यात स्वतः कुबेरच अंगरक्षकांसह पवित्र ऋषीचे दर्शन घेण्यास तिथे अवतीर्ण झाला. त्याचे स्वागत करून तो नम्रपणे म्हणाला, ‘‘मुनीवर, इच्छेनुसार इथे वास्तव्य करा. अप्सरा व किन्नरांचे नृत्यगायन ऐका आणि तृप्त मनाने पुढे जा.’’
कुबेराला त्याच्या या प्रवासाचा उद्देश कळला होता. नंतर कुबेर मणिभद्रादी सेवकांसह तिथे स्थानापन्न झाला व मुनीच्या सन्मानार्थ अप्सरा व यक्षांनी आपली कला सादर केली. अप्सरांमध्ये अलंबुषा, चित्रांगदा, विप्रचित्ती व सुमुखी या प्रमुख होत्या. नंतर भोजन झाले. रोज नृत्य गायन व भोजन यांचा आस्वाद घेता घेता एक वर्ष उलटले. तृप्त मनाने अष्टावक्राने कुबेराला आशीर्वाद दिला व तो पुढच्या प्रवासाला निघाला.
मजल-दरमजल करत तो रंग-रूप, उंची, पावित्र्य व सृष्टीसौंदर्य या सर्वच बाबतीत श्रेष्ठ असलेल्या कैलासावर आला. रुद्र व भवानी यांच्या दर्शनाची ओढ लागून त्याची पावले जलदगतीने पडू लागली. मंदार, हैम व कैलास या बर्फाच्छादीत नगरूपी बिल्वदलाला त्याने भक्तीभावाने वंदन केले. त्यांना प्रदक्षिणा घालून तो आकाशातून पृथ्वीवर उतरला. सपाटीवरून थोडा प्रवास करून तो वनराईने समृद्ध असलेल्या एका विस्तीर्ण आश्रमात पोहोचला. रत्नजडीत भूमीवर सोन्या-चांदीचा महाल दिसल्यावर जसा हर्ष होतो, तसा हर्ष त्याला झाला. कुबेराच्या वास्तूपेक्षाही जिचे तेज आसमंतांत उत्सर्जित झाले आहे अशी एक पर्णकुटी त्याला दिसली. सभोवार उत्तुंग ऐश्वर्यसंपन्न प्रासाद होते. सुवर्णरत्नांच्या राशी विखरलेले खूप पर्वत तिथे होते. ज्यामध्ये सदासतेज पारिजातकाची दिव्य गंधाची फुले पडून निर्मल जळ सुगंधी झाले आहे, अशी मंदाकिनी तथा गंगा नदी खळखळ ध्वनी करत इतमामाने वाहत होती.
त्या पर्णकुटीच्या आसपास कुणाचीच चाहूल न लागल्यामुळे त्याने उच्चस्वरांत पण नम्रपणे विचारले, ‘‘इथे कुणी आहे का? मी एक अतिथी आहे.” त्याचा आवाज ऐकून त्या पर्णकुटीच्या उघड्या दारांतून एकदम सात दिक् देवता (दिशा) अंगणांत आल्या. त्यांचे रूप सात्त्विक असून मन व नेत्र यांना आनंद देणारे होते. त्या सर्व कन्या लावण्य व तारुण्य यांनी मुसमुसलेल्या व साजशृंगार केलेल्या होत्या. प्रसाधनांत उच्छृंखलपणा नसलेल्या होत्या. त्यामुळे कुणाकडे पाहावे असा त्याला प्रश्न पडला. कारण न पाहाणे हासुद्धा त्यांचा अपमान केल्यासारखे झाले असते. तथापि त्याने मनावर ताबा ठेवून धैर्य संपादन केले. त्या सात दिक् देवतांनी त्याला कुटीत येण्याची विनंती केली. तो आत गेला.
त्याने एका दृष्टीक्षेपांत सारी पर्णकुटी न्याहाळली. कुटी अत्यंत प्रशस्त होती. गोवऱ्याने सारवलेली व वास्तूचे पावित्र्य द्विगुणीत करणारी. योग्य ठिकाणी प्रकाश व हवा येण्यासाठी झरोके ठेवले होते. गवताच्या चुंबळीवर गंगाजळाने भरलेले मृत्तिकाकलश ठेवले होते. दर्भासने, न्याघ्राजीन व मृगचर्मही अंथरून जवळच दुरड्यामधून गंधपुष्पे ठेवली होती. एका कोपऱ्यांत दर्भ व समीधा ठेवल्या होत्या. कमंडलू व रुद्राक्षमाळासुद्धा. ज्या ज्या वस्तू तपस्व्याच्या कुटीमध्ये अपेक्षित असतात, त्या त्या सर्व वस्तू तिथे होत्या. एका चौरंगावर धर्मविषयक पुस्तिकाही होत्या. त्याने जवळ जाऊन पाहिले अन् त्याला ते वाचून धक्काच बसला. मुखपृष्ठावर लिहिले होते- कामशास्त्र. कुटीमध्ये भपका नाही. अवडंबर नाही तरीही लक्ष्मी-सरस्वतीचे वास्तव्य मनाला जाणवत होते. तरीपण तो ग्रंथ पाहून तो अस्वस्थ झाला.
देवतांच्या सांगण्यावरून अष्टावक्र कुटीच्या आतल्या भागात गेला. तिथे एक तेजस्वी वृद्धा मृगाजीनावर पद्मासन घालून बसली होती. ती उत्तर दिशेची अधिष्ठात्री देवता होती. तिला प्रणाम करून तो अदबीने जवळच बसला. नंतर तो म्हणाला, ‘‘जी ज्ञानसंपन्न व संयमी आहे तिनेच इथे बसावे. इतर बाहेर जाऊ शकतात.’’ ते ऐकून साती देवता बाहेर गेल्या. जाण्यापूर्वी त्यांनी दीपदाने प्रज्वलित केली. कारण आता अंधार पडू लागला होता. अष्टावक्राने त्या वृद्धेबरोबर धर्मविषयक चर्चा व वेदशास्त्राचे पठण केले. थोडे दूध व फलाहार घेऊन दोघेजण आपापल्या शय्यांवर निद्राधीन झाले.
अष्टावक्राचा नुकताच डोळा लागला तेव्हा मध्यरात्र झाली होती. त्याला कुणीतरी आपल्या शेजारी झोपल्याचे जाणवले. तो धडपडत उठला. बघतो तो ती वृद्धा. समयांच्या मंद प्रकाशांत तिच्या मुद्रेवरचे भाव पाहून तो दचकलाच. हा चेहरा पूर्वीचा नव्हता, वेगळाच होता. ज्या वयात वानप्रस्थ स्वीकारायचा त्या वयात अनोळखी पुरुषाच्या शेजेवर निर्लज्जपणे जाणाऱ्या त्या तपस्विनीला पाहून तो चकित तर झालाच, पण पापाचरणाच्या कल्पनेने भयभीत झाला. या परक्या ठिकाणी कसे वागावे हे त्याला कळेना.
ती वृद्धाच त्याला म्हणाली, ‘‘हे अभ्यागता, थंडी वाजू लागल्यामुळे मी ऊबेसाठी तुझ्याजवळ आले.’’ त्यावर प्रतिसाद न देता तो गप्प राहिला, तेव्हा ती त्याला अलिंगन देण्यासाठी धडपडू लागली. पण तो लाकडाच्या ओंडक्यासारखा निर्जीव झाला. तिला त्याने दूर सारताच ती स्पष्टपणे म्हणाली, ‘‘वेदशास्त्राबरोबर कामशास्त्राचे धडे गिरवावे लागले तरी हरकत नाही. हे विप्रा, पुरुषाला पाहून ललना विचलित होतात. वृद्धेलाही भावना असतात. तू माझ्याशी रममाण हो. इथे दोघांशिवाय कुणीही नाही. माझे वर्तन निसर्गाला धरून आहे.’’
अष्टावक्र उद्विग्नपणे म्हणाला, ‘‘तू वृद्ध व माझ्यापेक्षा वयाने थोर आहेस. मातेचा दर्जा मी तुला देत आहे. परस्त्रीगमन मी कदापि करणार नाही. मी अविवाहित आहे. स्वर्गात प्रवेश मिळावा म्हणून मी विवाह करून पुत्र प्राप्त करू इच्छितो. या पापाच्या गर्तेत मला ढकलू नकोस. तुही तुझे चारित्र्य अबाधित ठेव.’’
हे ऐकूनही ती निःसंकोचपणे म्हणाली, ‘‘मी परस्त्री नाही. माझी मी स्वतंत्र आहे. स्त्रिया मुळातच चंचल व विषयोपभोगाला तत्पर असतात. थोडेसे आमिष व भय त्यांना स्वैराचाराला उद्युक्त करते. इंद्र, वरुण, वायू व अग्नी यांच्यापेक्षा त्या मदनावर प्रेम करतात. त्यामुळे जगात पतीपरायण व सती साध्वी स्त्रिया अपवादानेच सापडतात. कामासक्त स्त्रीला काळ, वेळ व स्थळ यांचे भान नसते. त्या दोन्ही कुळांचा नाश करतात. आणि कामासाठी विनवणाऱ्या स्त्रीला झिडकारले तर ती जगाचा नाश करते. पाप पुण्याचा विचार न करता माझे प्रियाराधन कर. चल. आता विलंब नको.’’
तिची मुक्ताफळे ऐकून अष्टावक्र दिग्मुढ झाला. स्त्रीची अशी ओळख त्याला नवीन होती. ती पुढे म्हणाली, ‘‘श्रेष्ठ, माझ्या स्पर्श सुखाची ओळख झाल्यावर विवाहोत्तर तुला जड जाणार नाही. या शास्त्रातील सर्व खुब्या मी तुला शिकवीन. इथे राहून तृप्तीचा अनुभव घे.’’ असे म्हणून स्वस्थ न बसता त्याला स्पर्श करून त्याच्या भावना उद्दिपित करू लागली. आश्रमात आल्या आल्या झालेला स्वात्त्विक आनंद मावळून क्रोध येऊन तिच्याविषयी घृणा निर्माण झाली. ही शापीत देवता तर नव्हे? किंवा माझे सत्व बघण्यासाठी वदान्यमुनींचा डाव तर नसेल? त्यांचा विचार येताच तो सावध झाला. अशा रीतीने दोन दिवस, दोन रात्री उलटल्या, पण त्याने मर्यादा ओलांडली नाही. तेव्हा ती वृद्धा व्याकुळतेने म्हणाली, “महाभागा, तुला काय देऊ म्हणजे तू प्रसन्न होशील?’’
अष्टावक्राने काय मागावे? तो म्हणाला, “मला स्नानासाठी पाणी दे. तुझ्या स्पर्शाने दूषित झालेले हे शरीर स्वच्छ करून मी वाणी व इंद्रिये यांचा निग्रह करीन.’’ तिने त्वरित उटणी, सुगंधी तेल आणून त्याच्या स्नानाची तयारी केली. स्वहस्ते तेलाने त्याचे अंग रगडून उटणे लावून त्याला स्नान घातले. कोरडी वस्त्रे दिली. त्या सात कन्या तिथे फिरकल्यासुद्धा नाहीत किंवा हिनेच त्यांना मना केले असावे. स्नानानंतर त्याचे शरीर व मन हलकेफुलके झाले. तिथे आल्यापासून त्याला प्रथमच गाढ निद्रा लागली. पहाटेच त्याला जाग आली. उटणी व तेलाचा सुवास अजूनही त्याच्या नासिकेपाशी रेंगाळत होता. हे स्वप्न की सत्य? पण मन प्रसन्न झाले व शरीराचा शीण गेला, तेव्हा हे सत्य असावे असे त्याने मानले.
सूर्यापासना व संध्या झाल्यावर तिने दिलेला सत्त्वयुक्त आहार त्याने घेतला. दिवस असाचा धर्मकार्यात व्यतित झाल्यावर दोघेही वेगळ्या शय्येवर पहुडली. मध्यरात्री पहिल्या रात्रीची पुनरावृत्ती झाली. तो क्रोधावर अंकुश ठेवून म्हणाला, “हे अभागिनी, मला विषयांत आसक्ती नाही. माझ्या होणाऱ्या पत्नीसाठी मी शरीर व मन पवित्र ठेवले आहे. का माझ्या मागे लागतेस?” त्याच्या वैतागाने बोलण्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. ती म्हणाली, “मी स्वतंत्र आहे. माझी इच्छा पूर्ण कर. कामदेवाला आपण प्रसन्न करू.” तरीही तो मेरूसारखा अचल राहिला. ती विनवीत राहिली व तो झिडकारत राहिला. शेवटी ती चिवटपणे म्हणाली, ‘‘माझ्याशी गांधर्वविवाह कर म्हणजे उपभोगाविषयी तुला तुझे मन खाणार नाही.”
आता मात्र अष्टावक्राला आपल्या क्रोधावर संयम राखणे जड जाऊ लागले. तो उच्च स्वरात म्हणाला, “मूर्ख लंपट स्त्रिये, स्वतःला स्वतंत्र कशी म्हणवतेस? स्त्रियांना स्वातंत्र्य नसते. बालपणी पिता, तरुणपणी पती व वृद्धपणी पुत्र तिचे पालन व रक्षण करतो. स्त्री विषयांध असल्याने विधात्यानेच ही व्यवस्था केली आहे. समजले. इथून चालती हो. स्त्री म्हणून तुझी गय केली. आता कामाग्नीत जळण्याऐवजी क्रोधाग्नीतच तुझी राख होईल.” इतके बोलले तरी ती वृद्धा त्याला जळूसारखी चिकटू लागली.
‘प्राण गेला तरी आपले ब्रह्मचर्य भंगू देणार नाही असा त्याने निश्चय केला. अविवाहित राहिलो तरी चालेल. पण या विषयी स्त्रीला चांगलाच धडा शिकवीन. कामसंदर्भात जे वर्तन करेन ते स्वतःच्या पत्नीबरोरबच. सुप्रभेच्या विश्वासाला मी कदापि सुरुंग लावणार नाही’ असे विचार मनात येऊन तो शांत झाला. ही स्त्री वृद्ध असली तरी तरुणपणी रूपसंपन्न असली पाहिजे. मग आत्तापर्यंत हिने आपले लाखमोलाचे कौमार्य का जपले? उलट तारुण्यात कामदेवाचा प्रभाव तीव्र असतो व तो नैसर्गिकही मानला आहे. ही शंका त्याने तिला विचारलता तेव्हा ती म्हणाली, ‘‘श्रेष्ठ, त्रिभुवनात पुरुष व स्त्री यांना परस्परांची अभिलाषा व ओढ असते. विस्तव व लोणी हीच उपमा त्यांना योग्य. मी मात्र आज तुझ्या वर्तनाने व विचाराने प्रसन्न झाले आहे. दुसऱ्या एकाद्या पुरुषाने हे फुकट मिळणारे वृद्धत्वसुद्धा उपभोगले असते. पण तू खरोखर धन्य आहेस. तू तुझ्या भावी पत्नीला सर्व सुखे देशील. पुत्रपौत्रांनी तुझे घरकुल गोकूळ होईल. वदान्यमुनींच्या विनंतीवरून तुझी परीक्षा घेतली. तू यशस्वी झाला आहे. तू जाऊ शकतोस. आपला भावी जामात शंभरनंबरी सोने आहे हे कळल्यावर वदान्य व त्यांची कन्या समाधान पावतील’’.
त्या वृद्ध तपस्विनीच्या स्पष्टीकरणाने त्याच्या मनावरचे मळभ व उदासीनता नाहीशी झाली. तिला त्याने प्रणाम केला. तिने अष्टवक्राला दृढालिंगन दिले. या अलिंगनात त्याला शुद्ध ममतेचा व स्नेहाचा साक्षात्कार झाला. वृद्ध मातेचा निरोप घेताना त्याच्या नेत्रांत अश्रू आले. ‘‘माते, पुढील आयुष्यात असाच यशस्वी होईन, असा आशीर्वाद मला दे.’’ वृद्धेने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. नंतर वृद्धेने त्या सातही दिक् दिशांना हांक मारली. सातीही जणी सौंदर्याचे व तेजाचे अनुपम लेणे लेऊन त्याच्या पुढे अवतीर्ण झाल्या. वृद्धेच्या जागीही लक्षणीय लावण्यरजनी दृष्टिगोचर झाली. पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर, अग्नेय-वायव्य व ईशान्य-नैऋत्य या अष्ट दिशा मानवी स्वरूपात उभ्या ठाकलेल्या पाहून अष्टावक्र त्यांच्यापुढे नतमस्तक झाला. कृतज्ञेने त्यांचा निरोप घेऊन तो घराच्या ओढीने चालू लागला.
वदान्यमुनीकडे आल्यावर त्याने प्रवासात जे जे घडले ते ते सर्व विनासंकोच सांगितले, मुनी प्रसन्न झाले व त्यानी सुप्रभेला हाक मारून बाहेर बोलावले. लीनतेची व सौंदर्याची पुतळी असलेल्या कन्येला पित्याने विचारले, “मुली हा पती म्हणून तुला पसंत आहे ना?” त्यावर उत्तर न देता लाजून आत पळाली. ही तिची मूक परंतु बोलकी संमती होती.
मुनींनीं अग्नीदेव ब्राह्मण यांच्या साक्षीने अष्टावक्र-सुप्रभाचा विवाह संपन्न केला. आज एक घर भरले तर दुसरे रिते झाले, पण हे रितेपण वदान्यांना जीवनभर समाधान देणारे होते. गरीब, निष्कांचन ऋषी दुसऱ्या ऋषीने दिलेले कन्यादान स्वीकारून आपल्या आश्रमाकडे चालू लागला.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment