‘अ स्टार इज बॉर्न’चा किंवा त्याच्या कथेचा तिरस्कार करणं तसं अवघड आहे!
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘अ स्टार इज बॉर्न’ची पोस्टर्स
  • Sat , 20 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie अ स्टार इज बॉर्न A Star Is Born ब्रॅडली कूपर Bradley Cooper लेडी गागा Lady Gaga

गेल्या आठ-नऊ दशकांच्या विस्तृत काळात दर पंचवीस-तीस वर्षांनी पुनर्निर्माण होऊन पुन्हा नव्यानं सांगितल्या जाणाऱ्या (किंवा खरं तर तसा प्रयत्न केल्या जाणाऱ्या) ‘अ स्टार इज बॉर्न’चा किंवा त्याच्या कथेचा तिरस्कार करणं तसं अवघड आहे. एकवेळ तो काही प्रमाणात अप्रभावी किंवा म्हणावा तितका परिणामकारक न ठरणारा वाटू शकतो, मात्र तो अगदीच न आवडणं तसं अशक्यच. त्यातही चित्रपट चांगल्या प्रकारे निर्माण केलेला असेल तर त्याच्या एकूणच सकारात्मक प्रभावाविषयी शंकाच उरत नाही.

गोष्ट साधी आणि अधिकृत ते अनधिकृत सर्वच प्रकारच्या पुनर्निर्माणातून अनेकदा सांगून झालेली आहे. मात्र अभिनेता-दिग्दर्शक ब्रॅडली कूपर प्रख्यात पॉप सिंगर लेडी गागासोबत पडद्यावर समोर आणत त्याच कथेला अधिक लोभस, आकर्षक स्वरूप बहाल करतो. जॅक्सन मेन (ब्रॅडली कूपर) हा भरपूर रोड शो, टूर्स करणारा; भरगच्च स्टेडियममध्ये परफॉर्म करणारा गीतकार-गायक ‘कंट्री बॉय’. कायम अंमली पदार्थ, दारूच्या व्यसनाच्या अधिन असलेला आणि त्यांच्या नशेतच शो करणारा जॅक्सन अशाच एका शोनंतर आपल्याकडील सगळी ड्रिंक्स संपल्यानंतर एका ‘ड्रॅग बार’मध्ये येऊन पोचतो. त्या रात्री नेमकी अॅली (लेडी गागा) ‘ला व्हिए एन रोज’ नामक फ्रेंच गाण्याचं अप्रतिम व्हर्जन सादर करते. त्यानं प्रभावी झालेला जॅक्सन ती रात्र तिच्याशी बोलत, तिची गाणी ऐकण्यात घालवतो. आणि त्या रात्रीच तो तिच्या प्रेमात आकंठ बुडतो!  

आपल्या सौंदर्याबद्दल मनात न्यूनगंड बाळगणाऱ्या अॅलीला जॅक्सन त्या गंडापासून मुक्त करतो. त्याच्या रूपात तिला अन् तिच्या रूपात त्याला समजून घेणारा साथीदार लाभतो. परिणामी लगेचच त्याच्याच एका शोमध्ये अॅलीनं गाणं गाण्याच्या त्याच्या आग्रहाचं फलित होऊन ती केवळ त्या एका कार्यक्रमातच गात नाही तर त्याच्यासोबत टूर्सवरही गाऊ लागते. पॉप कल्चरला एक नवीन चेहरा आणि आवाज लाभून एका नव्या ताऱ्याचा उदय होतो.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4619/Homo-Deus

......................................................................................................................................................

सगळं कसं छान सुरू असलेल्या या गोष्टीत रेझ (रफी गॅव्हरॉन) हा टॅलेंट मॅनेजर, अॅलीची वाढती लोकप्रियता आणि जॅक्सनचं अधिकाधिक व्यसनाधीन होत जाणं या सर्व बाबींच्या परिणामामुळे वेगळी वळणं लाभायला सुरुवात होते. एका ‘स्टार’चा उदय, तर दुसऱ्याच्या अस्ताची नांदी वाजू लागते.

शिवाय इथं ‘आशिकी २’सारखे अनधिकृत रिमेक्स जातात, त्या दिशेतील ‘नायकाच्या मनात नायिकेच्या यशामुळे निर्माण झालेली ईर्ष्या, मत्सर’ दृष्टिकोन वगैरे काही नाही. कारण कथानायक आताही आधीइतकाच यशस्वी आहे. फक्त फरक इतकाच आहे की, दरम्यानच्या काळात घडलेल्या भावनिक चढउतारांमुळे त्यात आणि त्याच्या प्रेमिकेत एकूणच भावनिक दुरावा निर्माण होतो आहे. ज्याचा संबंध तिचं उत्तरोत्तर वाढत जाणारं यश आणि लोकप्रियतेपेक्षा त्याचं दिवसेंदिवस वाढणारं व्यसन, कायम दुरावत गेलेली नाती यांच्याशी अधिक आहे. ज्यामुळे त्याला अधिक मानवी, भावनिक किनार प्राप्त होते.

‘अ स्टार इज बॉर्न’ची परिणामकारकता त्याच्या कथेपेक्षा त्याची मांडणी, त्यातील सादरीकरण, त्याचं छायाचित्रण यांमध्ये दडलेली आहे. कूपर अॅलीच्या प्रेमात आकंठ बुडालेला ते व्यसनाच्या अधिन झालेला ते भावनिक, मानसिक पातळीवर उद्ध्वस्त झालेला असा हरतऱ्हेचा जॅक्सन तितक्याच परिणामकारक स्वरूपात उभा करतो. लेडी गागा नितांतसुंदर आणि अपेक्षेपेक्षाही सुंदर कामगिरी करते. पूर्ण पॅशनेटली गाणं असो वा अभिनय असो, ती दोन्हीही तितक्याच प्रभावीपणे करते.

मॅथ्यू लिबॅटीकचे टेन्स्ड क्लोज अप्स थेट जॅक्सन आणि अॅलीच्या विश्वात घेऊन जातात. ज्यात अप्रतिम प्रॉडक्शन डिझाईनची साथ लाभून एक नितांतसुंदर विश्व निर्माण होऊन या वर्षीच्या काही सिनेमॅटिक क्षणांची निर्मिती होते. ‘अ स्टार इज बॉर्न’चा बराच विस्तृत साऊंडट्रॅक त्याला म्युजिकल वर्गात नेऊन बसवण्यात यशस्वी ठरतो. शिवाय गाणी लेडी गागासोबत स्वतः ब्रॅडली कूपरनेही सहलेखन केलेली आहेत. त्यामुळे कूपर सध्या पूर्ण सामर्थ्यानिशी सर्वच क्षेत्रांत धडाकेबाज कामगिरी करताना दिसतोय.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......