‘नमस्ते इंग्लंड’ : तार्किकतेला धाब्यावर बसवणारी पंजाबी सांगीतिक कॉमेडी
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘नमस्ते इंग्लंड’चं पोस्टर
  • Sat , 20 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie नमस्ते इंग्लंड Namaste England अर्जुन कपूर Arjun Kapoor परिणीती चोप्रा Parineeti Chopra

चार वर्षांपूर्वी ‘यंगिस्तान’ प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला सर्व समीक्षकांनी झोपून काढलं होतं. प्रेक्षकांनीही अल्प प्रतिसाद देऊन सिनेमाला घरचा रस्ता दाखवला होता. त्यात उघड खूप दोष होते, पण तार्किकतेला धाब्यावर बसवलं गेलं नव्हतं. कथेच्या चौकटीत ती योग्य होती. दिग्दर्शकाला काय सांगायचं होतं, ते त्याला पक्कं माहीत होतं. त्याचं ‘एका अचानक पंतप्रधान झालेल्या गुलछबू युवकाचा राजकारणातला प्रवास’ असं थोडक्यात म्हणता येईल. सिनेमा न चालण्याचं कारण त्याला कुठल्याच वास्तवाचा आधार नव्हता हे असावं. त्यामुळे तो तरुणाईनं राजकारणात यायला हवं, या संकल्पनेला तितक्या प्रभावीपणे मांडू शकला नव्हता.

‘यंगिस्तान’ला निदान तार्किकता तरी होती, ‘नमस्ते इंग्लंड’ तितकाही विचार करत नाही.

अमृतसरमध्ये राहणारे जसमीत (परिणीती चोप्रा) व परम (अर्जुन कपूर) हे प्रेमात पडून रीतसर लग्न केलेलं जोडपं. पण लग्नाच्या वेळी जसमीतच्या वडिलांनी अट घातलेली असते की, तिनं लग्न केलं तरी परमच्या वडिलांनी तिला नोकरी करू द्यायची नाही. धाकात ठेवून त्यांनी तिला लग्नाआधीसुद्धा निव्वळ शिकवलेलं असतं. तिला मात्र स्वतंत्र व्हायचं असतं. तिला ज्वेलरी डिझाईनमध्ये करिअर करायचं असतं. त्यासाठी तिचं स्वप्न असतं लंडनला जायचं. तिथं सेटल व्हायचं. पण लग्नात परमनं त्याच्या श्रीमंत मित्राला दारू पिऊन धिंगाणा घातला म्हणून मारलेलं असतं. त्याचा बदला म्हणून तो त्याला धमकावतो की, त्याला हनिमूनसाठी जाण्यासाठी व्हिसाच मिळवू देत नाही. तो त्याचे शब्द खरे करतो. जसमीतला गुरनाम ट्रॅव्हल्सच्या मालकाचा (सतीश कौशिक) नंबर मिळतो. परम त्याच्याकडे जातो.

या सिनेमाची सुरुवात खूप सुंदर आहे. सुरुवातीलाच परम जसमीतला दसर्‍याला रावण दहनाच्या पार्श्वभूमीवर मनसोक्त नाचताना बघतो. बघता क्षणीच तो प्रेमात पडतो. पुढे दिवाळी, बैसाखी, पावसाळ्याच्या काळात तो तिला बघतच असतो. सिनेमाची सुरुवात इतक्या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर मस्त नाचगाण्यानं होणार असेल तर प्रेक्षक पुढे यापेक्षा चांगलं काहीतरी बघायला मिळेल म्हणून सावरून बसतो. पण त्याचा अपेक्षाभंग करायचा जणू विडा उचलणारे दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह एकामागून एक तार्किकतेला धाब्यावर बसवणारे प्रसंग रचत जातात.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

जेव्हा आपल्याला कळतं जसमीतचे वडील हे जुन्या विचारांचे आहेत, तेव्हा तार्किकतेतल्या चुका दिसायला लागतात. एकवेळ ते समजून घेतलं तरी त्याचं सादरीकरण अविश्वसनीय आहे. हे खरंय की, अजूनही बर्‍याच घरांमध्ये मुलींना शिक्षण देण्याइतपतच मानसिकता असते पालकांची. खासकरून छोट्या गावात व शहरात. त्यामुळे जसमीतच्या वडिलांना समजून घेता येतं, पण ती लग्न करून परमच्या घरी आल्यावर मात्र तिनं नोकरी केली तरी हरकत नसावी. हेही खरंय की बरेच आई-वडील मुलीच्या सासरकडच्या व्यवहारात नाक खुपसतात, पण सासरकडच्या मंडळींनी हा आमचा मामला आहे म्हणून त्यांना दूर ठेवायला हवं. इथं ते होत नाही. बरं ती लग्नाआधी चोरून नोकरी करत होती, तर लग्नानंतरही करू शकली असती, पण विपुल अमृतलाल शाहना ते मान्य नाही.

मग जसमीतला लंडनला जाण्याचे वेध लागतात. उर्वरित आयुष्य लंडनमध्ये काढावं असं वाटतं. त्यासाठी ती परमला गळ घालते. तो तयार होतो. तिला अचानक असे वेध का लागतात याचं विश्वसनीय स्पष्टीकरण दिलं जात नाही. लग्नाआधी आपल्या पायावर उभं राहणं हे स्वप्न आहे म्हणणारी जसमीत ते पूर्ण होत नाही हे पाहून अजून मोठी उडी मारण्याचे मनसुबे रचते.

पटकथेत ही अशी अतार्किकता शेवटपर्यंत येत राहते. दिग्दर्शक म्हणून विपुल अमृतलाल शाह यांनी पटकथा ऐकल्या/वाचल्यानंतर (जर त्यांनी तसं काही केलं असेल तर...) पटकथाकारांना यात इतकी अतार्किकता का आहे याबद्दल पृच्छा केली नसावी. तीच गोष्ट परिणीती चोप्रा व अर्जुन कपूरची. त्यांनी ही पटकथा का स्वीकारली हे समजत नाही. अतार्किक पटकथेचे संवाद तरी बरे असावेत. तिथंही पाटी कोरीच. एक तरी संवाद समजूतदारपणाचा असावा. काही ठिकाणी विनोदी संवाद आहेत, पण ते दुय्यम पात्रांच्या तोंडी. नायक-नायिकेला दिलेले संवाद हे संवाद कसे असू नयेत याचा उत्तम नमुना आहेत. हे संवाद नव्वदच्या दशकातल्या सिनेमात असते तर खपून गेले असते, पण आता हे उपरं वाटतं.

इतक्या सगळ्या गोष्टी दोन तासांत खेचणार्‍या या सिनेमात सर्वांत चांगली गोष्ट काय असेल तर तो परमनं अवैध मार्गानं केलेला भारत-इंग्लंड प्रवास. हा खरोखरच अंगावर येतो. सब-प्लॉट म्हणून चटकन वेधून घेतो. परमचा प्रवास पहिल्यांदा बांग्लादेश, तिथून एका मालवाहू नौकेत एका कंटेनरमधून ब्रुसेल्स आणि तिथून पॅरिस व एका मालवाहू ट्रकमधून लंडन. हा प्रवास एखाद्या लघुपटासारखा आहे. यात एका ज्येष्ठ सरदारजीची कथा आहे. पंजाब सोडून इंग्लंडला नोकरी निमित्त निघालेले हे गृहस्थ वाटेत वारतात. ते कसे हे मात्र भयंकरच. काही मिनिटांचा हा प्रवास संपूर्ण सिनेमाच्या विनोदी-सांगीतिक टोनमध्ये लक्षात राहतो. दुर्दैवानं सिनेमा चुकूनही गंभीर होऊ नये याचा खेद वाटतो.

अशा सिनेमात इतर गोष्टी वाखाणण्यासारख्या असतात. सिनेमॅटोग्राफर यानीस मेनलोपोलस यांची फोटोग्राफी मात्र अमृतसर व पंजाबचा ग्रामीण परिसर इतक्या अप्रतिमपणे टिपते की, कित्येक फ्रेम्स सिनेमा संपल्यावरही लक्षात राहतात. उल्लेख करायचाच तर एका गाण्यात परम-जसमीत एका टाकीच्या टपावर सूर्योदयाच्या पार्श्वभूमीवर किस करतात ते नेत्रसुखद आहे, त्यातल्या निसर्गाच्या रंगसंगतीसाठी. पंजाबी पार्श्वभूमीला पंजाबी तडक्याची गाणी ही अपरिहार्य गोष्ट. जावेद अख्तरनी पात्रांच्या मनोभावना शब्दांत अचूक मांडलेल्या. उडत्या ठेक्यांची गाणी ताल धरायला लावणारी आहेत.

अभिनयात परिणीती चोप्रा सोडली तर कुणी स्वतःला खूप गांभीर्यानं घेतंय असं दिसत नाही. एक तर या पटकथेत अभिनयाला फारसा वाव नाही. त्यातही डियाना डेजनोविच छोट्या भूमिकेत लक्षात राहते. सतीश कौशिक मोजक्या प्रसंगात कॉमिक रिलीफ म्हणून बरे. नायकच अभिनय करत नसेल तर सिनेमाचा डोलारा कोसळण्याची शक्यता असते. अर्जुन कपूरचा अभिनय सिनेमागणिक रसातळाला जातोय. सहा वर्षांपूर्वी एकत्र आलेले हे दोघं अभिनयात मात्र एकमेकांपासून दूर जातायत असं दिसतं. अर्जुननं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.

दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाहचा शेवटचा सिनेमा आठ वर्षांपूर्वी आला होता. या आठ वर्षांत हिंदी सिनेमानं विविध विषयांना जवळ केलं आहे. अगदी मध्यमवयीन स्त्रीनं अनपेक्षित गर्भारपणाला जिद्दीनं सामोरं जाण्यासारखे विषयसुद्धा येतायत, तेव्हा या अनुभवी दिग्दर्शकानं त्यातून काहीतरी शिकणं गरजेचं आहे.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख