अजूनकाही
१. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उमेदवारांची चणचण भासू लागल्यामुळे हा पक्ष यापुढच्या महत्त्वाच्या निवडणुकांसाठी परीक्षेविनाच उमेदवार निवडणार आहे. उमेदवार सुशिक्षित आणि किमान माहितगार असावा, यासाठी या पक्षाने मुलाखतीआधी इच्छुकांच्या लेखी परीक्षा घेतल्या होत्या. आता इच्छुकांची गर्दी आटली आहे.
खूप कडक पेपर काढायचे का? त्यामुळेच प्रवीण दरेकर, राम कदम यांच्यासारख्या व्यासंगी विद्धानांची, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वांची निवड होऊ शकली आधीच्या निवडणुकांमध्ये. पक्षाची अशी 'शाळा' झाल्यामुळेच सध्या 'शाळा सोडल्याच्या दाखल्या'पुरतीच गर्दी होते म्हणे 'राजगडां'वर!!
……………………………….
२. छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावांमध्ये आता आदरदर्शक 'महाराज' या शब्दाचीही भर. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण होणार.
हळूहळू गोब्राह्मणप्रतिपालक वगैरे महाराजांचं 'हिंदवीकरण'ही येणार वाटतं या नावांमध्ये. सर्वसामान्य माणसांसाठी ‘व्हीटी’चं ‘सीएसटी’ झालं होतं, ते आता ‘सीएसएमटी’ होणार, यातली विसंगती लक्षात न येणारे राज्यकर्ते आहेत, तोवर ओशिवऱ्याचं ‘राममंदिर’ आणि 'महाराज' जोडून आदर वगैरे टोकनबाजी चालूच राहणार. जीबीपीपीसीएसएमटीची प्रतीक्षा करूयात.
……………………………….
३. देशांतर्गत बाजारपेठेवर भारतीय कंपन्यांचं वर्चस्व असायला हवं. अॅमेझॉन आणि उबर यांना बाजारपेठ काबीज करू देता कामा नये. जे चीनने १५ वर्षांपूर्वी केलं, तेच आता आपल्या सरकारने अशी आमची इच्छा आहे. आम्हाला तुमच्या भांडवलाची गरज आहे. मात्र तुमच्या कंपन्यांची आवश्यकता नाही, असा संदेश सरकारने जगाला द्यावा. : फ्लिपकार्ट आणि ओला यांच्या संस्थापकांची इच्छा.
वा वा, या सुरेख कल्पना! आधी परदेशातले ऑनलाइन मार्केटिंगचे आणि फ्लीट कारचे फंडे उचलून ते नकलून मोठ्या झालेल्या तथाकथित 'देशी' कंपन्यांना परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेपासून सरकारने संरक्षित करायचं म्हणजे उदारीकरणाची चाकं उलटी फिरवायची? उदारीकरणाचे फक्त फायदे उपटायचे, तोटे सोसायची तयारी नाही? तुमचं भांडवल हवं, कंपनी नको, असं तुम्ही ठरवायला हरकत नाही, जगावर ते ऐकण्याचं बंधन नाही, हे लक्षात घ्यायला हवं.
……………………………….
४. हजार आणि पाचशेच्या नोटबंदीला आज महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या चलन तुटवडय़ाचा फटका थेट महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पूजेलाही बसला आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा बाद आणि त्यापेक्षा कमी मूल्यांच्या नोटांचा तुटवडा, यामुळे तुळजाभवानीची पूजा उधारीवर सुरू आहे.
'आई गोंधळाला येSSSS' असं आवतण या देवीला दिलं जातं, ते नेमकं कशासाठी, हे आता कळतंय. ही पंतप्रधानांची केवढी मोठी थोरवी आहे की त्यांनी माणसांमध्ये तर सोडा, देवांमध्येही देशप्रेमाची भावना निर्माण केली, त्यांच्याकडूनही राष्ट्रकार्य करून घेतलं. नमो नमो!!!
……………………………….
५. राज्य सरकारचे सगळे विभागही लवकरच कॅशलेस होणार. कोणत्याही विभागाचं कंत्राट देताना त्याचे सर्व व्यवहार ऑनलाइन होतील. कंत्राटदारांनी पुढचे व्यवहारही ऑनलाइन करूनच मजुरांची बिलं चुकती करावी असं सांगितलं जाईल. : हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
अध्यक्षमहोदय, कोणतंही कंत्राट जारी करताना कंत्राटदार आणि सरकारी अधिकारी, स्थानिक पुढारी, पक्ष या सर्वांमध्ये जे अत्यंत महत्त्वाचे व्यवहार होतात, तेही कॅशलेस होणार का, याचा खुलासा आपण केलेला नाही. या व्यवहारांसाठी वन विंडो सिस्टमही आणल्यास कंत्राटदार एकरकमी टक्केवारी भरेल आणि लाभार्थी ते आपापल्या (देशी-विदेशी-बेनामी-जनधन) खात्यांमध्ये ते वळवून घेतील, अशी काहीतरी व्यवस्था करावी, ही विनंती.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment