प्रियोळकरांनंतरचे सारे मुद्रणसंशोधन या त्यांच्या पुस्तकाला जोडलेल्या तळटिपा आहेत!
ग्रंथनामा - झलक
दीपक घारे
  • ‘हिंदुस्थानातील मुद्रण : प्रारंभ आणि विकास’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 20 October 2018
  • ग्रंथनामा झलक प्रिंटिंग प्रेस इन इंडिया Printing Press in India हिंदुस्थानातील मुद्रण : प्रारंभ आणि विकास Hindustanatil Mudran : Prarambh ani Vikas अ. का. प्रियोळकर A. K. Priyolkar

प्रसिद्ध संशोधक अ. का. प्रियोळकर यांच्या ‘प्रिटिंग प्रेस इन इंडिया’ या इंग्रजीतील बहुचर्चित पुस्तकाचा नुकताच मराठी संशोधन मंडळातर्फे मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. ‘हिंदुस्थानातील मुद्रण : प्रारंभ आणि विकास’ या नावाने हा मराठी अनुवाद सुधा भट यांनी केला आहे. या अनुवादाला समीक्षक प्रा. दीपक घारे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

‘प्लेटोनंतरचे सारे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान या प्लेटोला जोडलेल्या तळटिपा आहेत’ अशा अर्थाचे उद्गार तत्त्वज्ञ आल्फ्रेड व्हाइटहेड यांनी काढले होते. भारतीय मुद्रणाच्या इतिहासासंदर्भात या विधानातली अतिशयोक्ती मान्य करूनही अ. का. प्रियोळकरांबाबत असेच म्हणता येईल. त्यांच्या ‘प्रिंटिंग प्रेस इन इंडिया’ या ग्रंथात जो मुद्रणकलेचा इतिहास आलेला आहे, तो आजही प्रमाणभूत मानला जातो. नंतरच्या काळात झालेले मुद्रणकलाविषयक लेखन या ग्रंथाच्या आधारेच झालेले आहे. या विषयावर प्रकाशित झालेले महत्त्वाचे आणखी दोन ग्रंथ म्हणजे ‘टायपोग्राफी ऑफ देवनागरी’ (३ खंड, १९६५) - बापूराव नाईक आणि ‘हिस्टरी ऑफ प्रिंटिंग अँड पब्लिशिंग इन इंडिया’ (३ खंड, १९८५) - बी. एस. केशवन. पहिला ग्रंथ महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाने (डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेजेस्, बॉम्बे) तर दुसरा नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाने प्रकाशित केलेला आहे.

भारतातील मुद्रणकलेचा इतिहास म्हणजे भारतातील पुनरुत्थानाचा आणि सामाजिक प्रबोधनाचा इतिहास आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील राजकीय विचारधारा, सामाजिक सुधारणा, विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन इथे रुजला तो मुद्रणाच्या माध्यमातून झालेल्या विचारांच्या प्रसारामुळे. खरे तर ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मुद्रणकला भारतात आली, पण मुद्रणाने भारतात वैचारिक परिवर्तन घडून आले आणि कोणत्याही धार्मिक अथवा राजकीय सत्तेच्या प्रभावाखाली न येता भारतीयांना स्वतंत्र विचार करायला शिकवले. मुद्रणाचा भाषा आणि साहित्यावरील प्रभाव तर सर्वश्रुत आहे. पण भारतीय दृश्यकलेचा विचारही राजा रविवर्मा यांच्या मुद्रित चित्रांनी, मोहक चित्रांच्या दिनदर्शिकांनी आणि सचित्र पोथ्या-पुस्तकांनी समृद्ध झालेला आहे. मुद्रणाने सर्वसामान्यांची अभिरुची घडवली. एके काळी जी हस्तलिखित पुस्तके, लघुचित्रे राजेरजवाड्यांची आणि धनिकांची मिरासदारी होती, ती मुद्रणामुळे सामान्यांपर्यंत पोचू शकली. अभिरुचीचे नवीन मानदंड तिने निर्माण केले.

वास्को द गामाने भारतात पाऊल ठेवल्यानंतर ५९ वर्षांनी गोव्यामध्ये भारतातील पहिले पुस्तक मुद्रित झाले. गटेनबर्गने बायबल जर्मनीत छापले. त्यानंतर एका शतकाच्या अंतराने भारतीय भाषांसाठी त्या त्या लिपीतील मुद्राक्षरे तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले. ६ सप्टेंबर १५५६ रोजी जेझुइट मिशनऱ्यांनी भारतात मुद्रणयंत्र आणले आणि १५५७ ला गोव्यामध्ये पहिले पुस्तक छापले गेले. सेंट फ्रान्सिस झेवियरचे ‘दौत्रिना ख्रिस्तां’ असे त्या पुस्तकाचे नाव होते आणि ते रोमन लिपीत होते. खरे तर हे मुद्रणयंत्र अ‍ॅबिसिनियाला जाणार होते. पण हे मुद्रणयंत्र घेऊन जाणारा जेझुइट मिशनरी पात्रियार्क गोव्यात थांबला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. गोव्यात मुद्रणकला आली ती अशी अनपेक्षितपणे.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

सुरुवातीच्या काळात मुद्रणाची केंद्रे भारताच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर स्थापन झाली. गोवा, कोचिन, कन्याकुमारीजवळचे पुन्नइक्कल इत्यादी ठिकाणी पश्चिम किनाऱ्यावरील तर मद्रास, फोर्ट विल्यम, कोलकाता व सिरामपूर ही पूर्व किनाऱ्यावरची मुद्रणाची प्रमुख केंद्रे होती. नंतरच्या काळात मुंबई हे मुद्रणाचे प्रमुख केंद्र बनले.

प्रियोळकरांनी मुद्रणकलेचा जो इतिहास सांगितला आहे, तो १५५६ पासून सुरू होतो आणि १९०० पर्यंत, म्हणजे जावजी दादाजींच्या निर्णसागर प्रेसपर्यंत येऊन थांबतो. नंतरच्या काळात वृत्तपत्रांचा प्रभाव वाढला आणि मुद्रणकला राष्ट्रीय जीवनाचा अविभाज्य भाग बनली. मुद्रण-तंत्रज्ञानात महत्त्वाचे बदल झाले. त्याचा परिणाम मराठी भाषा व देवनागरी लिपी दोन्हींवर झाला. प्रियोळकरांनी आपल्या लेखनाला काळाची मर्यादा घातलेली असल्यामुळे १९०० नंतरच्या तंत्रज्ञानाचा व घडामोडींचा आढावा त्यांनी घेतलेला नाही.

प्रियोळकरांनी या ग्रंथातील आपले लेखन ‘वेगवेगळ्या भारतीय भाषांतील प्रारंभीच्या अवस्थेतील मुद्रणकार्याचे एक विहंगम अवलोकन’ असल्याचे प्रास्ताविकात सांगितले आहे. भारतीय भाषांतील तपशीलवार व सर्वसमावेशक असा मुद्रणकार्याचा इतिहास, सखोल व्यासंग असलेल्या व्यक्तींनीच लिहायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे. बी. एस. केशवन यांच्या त्रिखंडात्मक मुद्रणइतिहासाने प्रियोळकरांची अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण झाली असे म्हणता येईल.

प्रियोळकरांच्या ‘विहंगमावलोकना’त मुद्रणकलेशी संबंधित अशी काही विकासाची सूत्रे दडलेली आहेत. एक तर या मुद्रणाच्या इतिहासात अनेक गुंतागुंती आहेत. मुद्रणकेंद्रांचे भौगोलिक स्थान, मुद्रणपद्धती, भारती भाषांच्या लिप्या आणि त्यांची मुद्राक्षरे, राजकीय-सामाजिक परिस्थिती, असे अनेक संदर्भ या लेखनाला आहेत. या सूत्रांच्या आधाराने मागोवा घेतला तर हे इतिहासलेखन कळायला अधिक सुगम होईल.

धर्मप्रसार, राजसत्ता आणि मुद्रणकला

गोव्यात मुद्रणकार्याचा प्रारंभ झाला ते धर्मप्रसाराला मदत व्हावी म्हणून. बायबलसारख्या ख्रिस्ती धर्मग्रंथांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर व मुद्रण झाले तर धर्मप्रसाराला मदत होईल असे मिशनरी लोकांना वाटत होते. पण नंतरच्या काळात पाद्री लोकांना स्थानिक भाषा शिकणे अडचणीचे वाटू लागले आणि १६८४ मध्ये तर देशी भाषांमध्ये व्यवहार करण्यास बंदी करण्यात आली. त्यामुळे छापखान्यांवरही बंदी आली. ती १८२६ पर्यंत टिकली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोव्यात देवनागरी मुद्रणाची सुरुवात झाली. १८५४ मध्ये देवनागरी लिपीतील पुस्तके प्रथमच मुद्रित झाली. पण तोपर्यंत भारतात भारतीय भाषांमध्ये आणि भारतीय लिप्यांमध्ये पुस्तके मुद्रित होऊ लागली होती. पोर्तुगीज राजसत्तेला आणि धर्मप्रसारकांना हृदपरिवर्तनापेक्षा बळाचा वापर करून धर्मांतर करण्यात अधिक रस होता. त्यामुळे फादर स्टिफन्सचे ‘ख्रिस्तपुराण’ सोडल्यास साहित्य आणि संस्कृतीत गोव्यातील मुद्रणकलेने फारशी भर घातली नाही. स्थानिक भाषा व लिपी या प्रादेशिक लोकसमूहांना स्वतंत्र ओळख व अस्मिता देतात. कोकणीसारख्या प्रादेशिक भाषेसाठी रोमन लिपीचा वापर गोव्यातच करण्यात आला. १६१६ मध्ये फादर स्टीफन्सचे ‘ख्रिस्तपुराण’ गोव्यात मुद्रित झाले. ते रोमन लिपीत होते.

प्रियोळकरांनी या ग्रंथात सतराव्या शतकात गोव्यात मुद्रित झालेल पुस्तकांचे उतारे दिले आहेत. कोकणी भाषेसाठी रोमन लिपीचा वापर यामागे प्रादेशिक ओळख पुसून टाकण्याचा सुप्त हेतू होता.

शिवाजी महाराजांनी एका छापखान्याची स्थापना केली होती; परंतु १६७४ मध्ये भीमजी पारेख याला तो विकला; अशी कथा वारंवार सांगितली जाते. त्याचा उगम के. एम. मुन्शी यांच्या एका भाषणात आहे आणि या कथेला आधार म्हणून प्रियोळकरांच्या या ग्रंथाचाच आधार दिला जातो. वस्तुतः प्रियोळकरांनी शिवाजीच्या छापखान्याचा उल्लेख त्यांना शिवकालीन कागदपत्रांत कोठेही आढळला नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे. भीमजी पारेख याने ईस्ट इंडिया कंपनीशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार करून हा छापखाना सुरू केला असा निष्कर्ष प्रियोळकर यांनी काढलेला आहे. याबाबत काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न नंतरच्या काळात झालेला दिसत नाही. शिवाजी महाराजांच्या छापखान्याची कथा मात्र रूढ झालेली आहे. इतिहासाकडे पाहण्याची आपली मानसिकता त्यातून स्पष्ट होते.

नाना फडणविसांच्या प्रेरणेने भगवद्गीतेचे तांब्याचे ठसे तयार करण्यात आले आणि पुढे मिरज संस्थानच्या गंगाधर गोविंद पटवर्धनांनी या ठशांचे मुद्रण करून घेतले, ही आणखी एक महत्त्वाची घटना. या ठशाचा मुद्रित नमुना प्रियोळकरांच्या ग्रंथात दिलेला आहे. बापूराव नाइकांच्या ‘टायपोग्राफी ऑफ देवनागरी’च्या पहिल्या खंडात मूळ ठशांचे छायाचित्रही दिलेले आहे. शनिवारवाड्यात रेसिडेंट सर चार्ल्स मॅलेट याने कलाशाळा सुरू केली होती. नाना फडणविसांनी भगवद्गीता मुद्रित करण्याची कल्पना या कलाशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. प्रियोळकरांनी आपल्या इंग्रजी ग्रंथात या विद्यार्थ्याचा उल्लेख 'moulds of Marathi letters prepared by a coppersmith student who was trained at this school' असा केलेला आहे. (हा उतारा द. बा. पारसनीस यांच्या ‘नवयग’मधील ‘मराठी मुद्रणकलेचा संशोधक कोण?’ या लेखातून घेतलेला आहे.) हा विद्यार्थी म्हणजे मॅलेटच्या हाताखाली तयार झालेले गंगाराम चिंतामण नवगिरे (तांबट) असण्याची शक्यता आहे. तांबट हे नाव त्यांच्या पिढीजात तांब्याची भांडी घडवणाऱ्या व्यवसायामुळे मिळालेले असावे. नवगिरे हे ब्रिटिश चित्रकारांकडून यथार्थवादी कला आत्मसात करणारे पहिले मराठी चित्रकार होते.

प्रियोळकरांनी सहाव्या प्रकरणात ब्रिटिश सरकार व मुद्रणस्वातंत्र्य यांबद्दल लिहिले आहे. ब्रिटिशांनी नियंत्रित वृत्तपत्र स्वातंत्र्य देण्याचे धोरण स्वीकारले. मुद्रणाचा व वृत्तपत्रांचा प्रसार झाला तर शिक्षणाचा प्रसार होईल आणि ब्रिटिश राजवटीची लोकप्रियता वाढेल असे एकीकडे त्यांना वाटत होते, तर दुसरीकडे मुद्रणाच्या प्रसारामुळे आपल्या सत्तेविरुद्ध जनमत तयार होईल, जनता आपल्या हक्कांबद्दल जागरूक होईल, अशी भीतीही राज्यकर्त्यांच्या मनात होती. मिशनरी लोकांनी मुद्रणकला भारतात आणली, पण ब्रिटिश सत्तेचा मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला विरोध होता. कारण मिशनऱ्यांच्या प्रसारामुळे स्थानिक जनतेत असंतोष निर्माण होण्याची भीती ब्रिटिशांना वाटत होती. त्यामुळे मिशनरी मुद्रणालयांवर त्यांनी बंदी आणली नाही, पण प्रकाशित होणारे धर्मप्रसाराचे साहित्य नियंत्रणाखाली आणले. वृत्तपत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘प्रेस अ‍ॅक्ट’ आला. सरकारी धोरणांवर टीका झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ लागली. गव्हर्नर जनरल सर चार्ल्स मेटकॉफ याच कार्यकाळात, म्हणजे १५ सप्टेंबर १८३५ रोजी, भारतातील वृत्तपत्रांवरचे निर्बंध उठवण्यात आले. माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन याची या संदर्भातील भूमिका उदार आणि दूरदर्शीपणाची होती. एल्फिन्स्टनने मांडलेल्या भूमिकेतील पुढील वाक्ये महत्त्वाची आहेत -

‘भविष्यात स्थानिक जनतेचे शासन हे आपण सर्वार्थांनी गृहीत धरले आहे. आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून येथील जनतेला सतत अज्ञानाच्या अंधकारात मानहानिकारक अवस्थेत ठेवणे आणि त्यासाठी त्यांच्यापर्यंत मुद्रणकलेचा प्रवाह पोहोचू न देणे हे अजिबात न्याय ठरणार नाही. त्यांच्यामध्ये सुधारणा घडवण्यास त्यांना मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे.’ एल्फिन्स्टनच्या या उदार धोरणामुळेच मुद्रणाचा आणि ज्ञानाचा प्रसार झाला.

प्रियोळकरांनी भारतातील मुद्रणकलेच्या विकासाचा जो आलेख मांडला आहे, त्यावरून असे दिसते की, त्यात चढउतार अनेक आहेत. मिशनरी संस्था आणि ब्रिटिश सरकार यांच्या मुद्रणविषयक धोरणांमध्ये कधी समन्वय तर बरेचदा विरोध जाणवतो. मुद्रणकला ही मिशनऱ्यांनी धर्मप्रसारासाठी आणि ब्रिटिशांनी राजकीय सत्ता बळकट करण्यासाठी वापरली. पण मुद्रणाचा संबंध ज्ञानप्रसाराशी आणि पर्यायाने आत्मजागृतीशी असल्याने स्वतंत्र विचारांना आणि स्वातंत्र्य चळवळीला त्यामुळे बळ मिळाले. मुद्रण माध्यमावर प्रयत्न करूनही ब्रिटिशांना नियंत्रण ठेवता आले नाही. आजच्या डिजिटल युगातल्या माध्यमक्रांतीच्या काळात हुकूमशाही देशांनाही असे नियंत्रण ठेवता आलेले नाही. मुद्रण माध्यमाची हीच खरी ताकद होती. त्यामुळे भारतविद्ये(इंडॉलॉजी)सारख्या ज्ञानशाखांची निर्मिती झाली. यात विल्यम जोन्सप्रमाणे जिएजेन्बाल्गसारख्या मुद्रकांचाही समावेश होता.

१५५६ पासूनचा जर इतिहास बघितला तर असे लक्षात येते की, गोव्यात १५५६ ला मुद्रणाची सुरुवात झाली असली तरी १६७४ ला गोव्यातील मुद्रण थांबले. त्याच वेळेस, १६७४ ला भीमजी पारेख याने मुंबईत छापखाना सुरू केला. दरम्यानच्या काळात दक्षिण भारतात क्लिलॉन आणि कोचिन येथे तमिळ लिपीत पुस्तके छापण्यात आली. १७१२ ते १७६६ पर्यंत त्रांकोबार आणि मद्रास येथे मुद्रणाची कामे होत होती. १७९५ पासून मुद्रणाचे केंद्र बंगालकडे सरकले. सिरामपूर प्रेसमुळे भारतीय भाषांतील मुद्रणाला वेग आला. चार्ल्स विल्किन्स आणि विल्यम कॅरे यांचा त्यात महत्त्वाचा सहभाग होता. १८०२ पासून मुद्रणाचे केंद्र मुंबई झाले आणि संपूर्ण एकोणिसाव्या शतकावर मुंबईतील मुद्रणालयांनी आपला ठसा उमटवला. त्यात अमेरिकन मिशन, ब्रिटिश प्रशासन आणि निर्णसागर प्रेससारख्या भारतीय व्यावसायिक मुद्रणालयांचा समावेश होता.

अक्षरमुद्रणाबरोबरच शिळामुद्रणपद्धतीची सुरुवात भारतात झाली ती १८२४ मध्ये. सरकारी कामकाजासाठी ती प्रथम वापरली गेली. पण नंतर ग्रंथमुद्रणासाठीही या पद्धतीचा वापर होऊ लागला. या साऱ्या प्रवासात युरोपनेही आपला हातभार लावलेला आहे.

बार्थोलोमिअस जिएजेन्बाल्ग

गोव्यातील तमिळ भाषेतील मुद्रण १६१२ मध्ये थांबल्यानंतर १७१२ मध्ये त्रांकोबार, मद्रास येथे तमिळ भाषेतील मुद्रण पुन्हा सुरू झाले. त्याचे श्रेय जिएजेन्बाल्ग या प्रॉटेस्टंट मिशनरी असलेल्या डॅनिश मुद्रकाकडे जाते. जिएजेन्बाल्ग मुद्राक्षरे तयार करणारा नुसता मुद्रकच नव्हता, तर तो पौर्वात्य संस्कृतीचा अभ्यासकही होता. १६२० मध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने तंजावरच्या राजाकडून पंचवीस चौरस मैलांचा किनाऱ्यालगतचा प्रदेश ताब्यात घेतला. तरंगमबाडी हे त्याचे मूळ नाव. डॅनिश लोकांनी त्याचे त्रांकोबार केले. या त्रांकोबारमध्ये मिशनरी म्हणून जिएजेन्बाल्ग आला, तेव्हा तो तेवीस वर्षांचा तरुण होता. तो उपजतच भाषातज्ज्ञ असावा. थोड्याच दिवसांत त्याने पोर्तुगीज आणि तमिळ आत्मसात केली. ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी तमिळमध्ये पुस्तके छापली पाहिजेत हे त्याला उमगले होते. जिएजेन्बाल्गने त्यासाठी टाईप फौंड्री, कागदाचा कारखाना, प्रिंटिंग प्रेस चालू केला आणि प्रभावी यंत्रणेद्वारे मद्रास, तंजावर व सिरामपूरपर्यंत ख्रिस्ती धर्माचा व मुद्रणाचा प्रसार केला.

जिएजेन्बाल्गने १६१ तमिळ पुस्तकांची यादी आणि त्यांचा थोडक्यात परिचय असलेला संग्रह ('Bibliothece Malabarke') १७०८ मध्ये तार केला. भारतविद्येशी संबंधित Nidiwunpa (Malabari Moral Philosophy), Kondei Wenden (Malabari Morals), Ulaga Nidi (Malabari Civil Justice) ही तमिळ तत्त्वज्ञान व न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेली जिएजेन्बाल्गची पुस्तके, तसेच हिंदुइझम व इस्लामसंबंधीचे लेखन १५०-२५० वर्षांनी युरोपात व मद्रासमध्ये प्रकाशित झाले. पुढे सिरामपूर येथे विल्यम कॅरे याने मुद्रणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. त्याचा पाया जिएजेन्बाल्गने त्रांकोबरला रचला होता. १७१९ मध्ये वयाच्या छत्तिसाव्या वर्षी जिएजेन्बाल्गचे निधन झाले.

सर चार्ल्स विल्किन्स

चार्ल्स विल्किन्स हा नुसता मुद्रण क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हता, तर भाषांचा आणि पौर्वात्य परंपरेचा अभ्यासक होता. विल्किन्सला पौर्वात्य संस्कृतीचे आकर्षण निर्माण झाले, त्यामागचे काही दुवे लक्षात घ्यायला हवेत. ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत तो दाखल झाला आणि १७७० मध्ये बंगालमध्ये आला. १७७८ च्या अखेरीस विल्किन्सची कंपनीचा मुद्रक म्हणून नेमणूक झाली. १७८६ मध्ये तो लंडनला परत गेला. याच वर्षी, म्हणजे २ फेब्रुवारी १७८६ रोजी कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीत विल्यम जोन्झ याने भाषेबद्दलचा एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला. इंडो युरोपियन भाषाकुळाची संकल्पना त्यातूनच निर्माण झाली आणि त्याचा प्रभाव भाषा अभ्यासावर बराच काळ राहिला. जोन्झचा विल्किन्सशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी विल्किन्स याच भाषासिद्धांताच्या आणि पौर्वात्य दृष्टिकोनाच्या पर्यावरणात वाढला होता. ज्या बंगाली भाषेच्या व्याकरणावरील पुस्तकासाठी विल्किन्सची बंगाली मुद्राक्षरे वापरली गेली त्याचा लेखक नाथानिएल ब्रासो हाल्हेड हा विल्यम जोन्झच्या विचारांनी प्रभावित झालेला होता. हाल्हेडच्या प्रेरणेने विल्किन्सला संस्कृत भाषेबद्दलची गोडी निर्माण झाली. बनारसला गेला असताना काही संस्कृत पंडितांशी त्याची भेट झाली. विल्किन्सने भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आणि संस्कृत भाषेचे व्याकरणही त्याने १७७९ व १८०८ मध्ये प्रकाशित केले. प्रियोळकरांच्या मते पहिल्या पुस्तकात संस्कृत शब्दांसाठी त्याने रोमन लिपीच वापरली असावी, तर दुसऱ्या पुस्तकात त्याने स्वतः केलेली देवनागरी मुद्राक्षरे वापरली होती. १८१५ मध्ये संस्कृत भाषेचे मूळ शोधणाऱ्या पुस्तकाचा त्याने महत्त्वाकांक्षी संकल्प केला होता. संस्कृत ही आद्यभाषा आहे किंवा किमानपक्षी ग्रीक, लॅटिन भाषाभगिनींशी तिचे साम्य आहे, या तत्कालीन भाषाव्यूहाशी विल्किन्सचे हे संस्कृतप्रेम सुसंगत होते.

विल्किन्स याने बंगालीबरोबरच अरेबिन, पर्शियन व देवनागरी मुद्राक्षरांच्या निर्मितीत भाग घेतला होता असे मानले जाते. प्रियोळकरांनी असे म्हटले आहे की, त्याने शिकवून तयार केलेल्या कारागिरांनी आत्मसात केलेल्या तंत्रातून, झालेल्या इतर हिंदुस्थानी भाषा आणि लिप्या यांमधील मुद्राक्षरनिर्मितीचे श्रेयही, अप्रत्यक्षपणे त्यालाच द्यावे लागेल. विल्किन्सने तयार केलेला भारतीय मुद्राक्षर कारागीर म्हणजे पंचानन कर्मकार.

मुद्रणपद्धती व मुद्रणावरील प्रभाव

प्रियोळकरांनी मुद्रणकलेचा इतिहास लिहिताना मुख्यतः अक्षरमुद्रणपद्धतीवर (लेटरप्रेस) भर दिलेला आहे. शिळामुद्रण पद्धतीचा निर्देश ग्रंथमुद्रणाच्या संदर्भात त्यांनी केलेला आहे. ग्रंथमुद्रणाबरोबरच चित्रांचे मुद्रण विविध पद्धतींनी या काळात होत होते. मुद्राचित्रांची ग्रंथमुद्रणाला समांतर अशी परंपरा भारतात होती. मुद्राक्षरांबरोबरच या चित्रपरंपरेची दखल घेतल्याशिवाय भारतीय मुद्रणाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. छायाचित्रणाचा शोध लागल्यानंतर चित्रे व छायाचित्रे छापण्याचे एक नवे तंत्रज्ञान विकसित झाले. छायाचित्रणाचे मुद्रणावर दूरगामी परिणाम झाले. ते मुख्यतः विसाव्या शतकातले असले तरी त्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकात झालेली होती.

१८३९ मध्ये विल्यम ओ शॉनेसी या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने डॅगुरोटाईप या कॅमेऱ्याची व छायाचित्रणकलेची कोलकात्याच्या एशियाटिक सोसाटीमध्ये माहिती दिली. १८४० मध्ये मुंबईकरांना छायाचित्रणाचा परिचय झालेला होता आणि १८४४ पर्यंत गिरगावात छायाचित्र काढून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. १८५४ मध्ये भारतीय फोटोग्राफिक सोसायटीची स्थापना झाली. १८६८ ते १८७५ या काळात भारतातील जातिजमातींची माहिती देणारा ग्रंथ आठ खंडांमध्ये प्रकाशित झाला. ब्रिटिश सरकारने जातिजमातींची जी पाहणी केली आणि भारतीयांची जी छायाचित्रे काढली त्या छायाचित्रांचा समावेश या ग्रंथात होता. 'The People of India : A Series of Photographic Illustrations with Descriptive Letterpress, of the Races and Tribes of Hindustan' असे नाव असलेल्या या पुस्तकाचे संपादन जॉन फोर्ब्स वॉटसन व जॉन विल्सन के यांनी केलेले होते. भारतात येणाऱ्या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांना या छायाचित्रांचा व माहितीचा अभ्यास करावा लागत असे.

अक्षरमुद्रणपद्धतीत जुळवलेल्या मजकुरासोबत चित्र छापायचे असेल तर त्यासाठी लाकडी ठशांचा उपयोग केला जाई. लाकडावर चित्र कोरून त्या ठशाचा वापर केला जात असे. १८१६ साली बंगालमध्ये ‘आनंद मंगल’ नावाचे पहिले सचित्र पुस्तक प्रसिद्ध झाले. रामचंद्र रॉय यांची त्यात चित्रे होती. १८१५ मध्ये मुंबईत गुजराथी भाषेतील ‘दाबेस्तान’ नावाचे पहिले सचित्र पुस्तक प्रकाशित झाले. मर्दुनजी मर्झबान यांनी पर्शियन भाषेतील पुस्तकाचा गुजराथीत केलेला हा अनुवाद होता आणि त्यात आठवड्यातील सात वारांना मानवी रूप दिलेली चित्रे होती. लाकडी ठशाने ही चित्रे छापलेली आणि नंतर हाताने रंगवलेली असावीत. मराठीत सचित्र पुस्तके नेमकी कधी सुरू झाली हा संशोधनाचा विषय आहे. पण अमेरिकन मिशन प्रेस, मुंबईच्या ‘चमत्कारिक गोष्टी’ (१८३८) सारख्या पुस्तकांमधून चित्रे दिसतात.

छायाचित्रणाचा शोध लागल्यानंतर स्क्रीनचा वापर करून छायाचित्रे अथवा चित्रे जस्त (Zink) अथवा तांब्याच्या पत्र्यावर (Copper) ब्लॉक्स करून छापली जाऊ लागली. शिळामुद्रणपद्धतीत दगडावर चित्रे काढून छापण्याची पद्धत मागे पडली आणि जस्ताच्या पत्र्यावर (Zink Plate) चित्रप्रतिमा घेऊन प्रतिरूपमुद्रण (Offset) पद्धतीने चित्रे व मजकूर छापला जाऊ लागला. अशा पद्धतीने मुद्रित झालेल्या चित्रांचा विकास पाहिला तर त्यावर मुद्राचित्रांच्या मुद्रणपद्धतींचा, त्यांच्या वैशिष्ट्यांचा प्रभाव दिसतो. मुद्रणकलेच्या इतिहासात मजकुराबरोबरच्या चित्रांच्या दृश्यअंगाचा विचार व्हायला हवा. प्रियोळकरांनी तो केलेला नाही.

मुद्राचित्रांसाठी शिळामुद्रणाचा वापर होत असतानाच्या पुस्तकातील मजकूर छापण्यासाठीही शिळामुद्रणाचा वापर होत होता. मुंबईत सरकारी कामासाठी आणि पाठ्यपुस्तके छापण्यासाठी शिळामुद्रण यंत्रे मागवण्यात आली आणि सरकारतर्फे १८२४ मध्ये मुद्रणालय सुरू करण्यात आले. त्याबद्दलची तपशीलवार माहिती प्रियोळकरांनी दिलेली आहे. या मुद्रणालयात मुद्रित झालेल्या पुस्तकांची यादीही दिलेली आहे. ‘बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसाटी’ असे मूळचे नाव नंतर १८२७ मध्ये ‘बॉम्बे एज्युकेशन सोसाटी’ असे बदलण्यात आले. पाठ्यपुस्तके छापण्यात आली ती या सोसायटीसाठी.

अमेरिकन मिशन प्रेसमध्ये शिळामुद्रण पद्धतीने मुद्रण होऊ लागले. १८३० मध्ये गणपत कृष्णाजी यांनी शिळामुद्रण प्रेस चालू केला. मराठीतील पहिले पंचांग त्यांनी १८३१ मध्ये छापले. शिळामुद्रणपद्धती अवलंबणारे आणखी एक मुद्रक म्हणजे फर्दुनजी दोराबजी.

‘गणितमार्ग’ हे १८२६ मध्ये मुद्रित झालेले शिळामुद्रणपद्धतीचे मुंबईतले पहिले पुस्तक होते. सोसाटीने छापलेल्या पर्शियन पुस्तकाचा उल्लेखही प्रियोळकरांनी केलेला आहे. मुद्राक्षरे जुळवून मुद्रण करण्याच्या पद्धतीत जोडाक्षरांची, कानामात्र्यांची योग्य जुळणी करण्यात खूपच अडचणी होत. शिळामुद्रणपद्धतीत थेट दगडावर मजकूर लिहिता येत असल्याने, चांगला सुलेखनकार असेल तर असे लिहिणे अधिक सुलभ होते. त्यामुळे अनेक पुस्तके त्या काळात शिळामुद्रणपद्धतीने छापली गेली. मुद्रणाचा दर्जा व खर्चात बचत अशा दोन्ही दृष्टींनी ही मुद्रणपद्धती अधिक सोयीची होती.

एकोणिसाव्या शतकानंतरची मुद्रणकलेची वाटचाल

अ. का. प्रियोळकरांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरर्पंतचा भारतीय मुद्रणाचा इतिहास सांगितला आहे. विसाव्या शतकात अधिक वेगाने तंत्रज्ञान बदलले. मुद्राक्षर जुळणीत मोनो, लाइनो पद्धतींमुळे मोठे बदल झाले. मराठीसह भारतीय भाषांना नव तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. पण संगणकाचे युग आल्यानंतर भारतीय लिप्यांमधील मुद्राक्षररचनेला नवी संजीवनी मिळाली आणि मुद्रणक्षेत्रात क्रांती घडून आली. भाषाशुद्धीची झालेली चळवळ काही अंशी मुद्रणाने प्रभावित झालेली होती. या सगळ्याचा परामर्श घेणारा इतिहास स्वतंत्रपणेच लिहिला गेला पाहिजे. पण मुद्रणकलेचा दुसऱ्या कालखंडातला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी आधीचा इतिहास अभ्यासाला हवा. त्यासाठी अ. का. प्रियोळकरांच्या ‘प्रिंटिंग प्रेस इन इंडिया’सारखे दुसरे विश्वासार्ह साधन कोणते असणार? त्यामुळेच त्याचे महत्त्व आजही कमी झालेले नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......