सध्या विद्वत्तेला तुच्छ लेखण्याचे वारे वाहत आहेत. अशा वातावरणात हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचायला हवे!
ग्रंथनामा - आगामी
संकल्प गुर्जर
  •  ‘असेही विद्वान’ हे पुस्तक २ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होत आहे.
  • Fri , 19 October 2018
  • ग्रंथनामा झलक प्रभाकर पाध्ये असेही विद्वान साधना प्रकाशन

ज्येष्ठ संपादक, लेखक प्रभाकर पाध्ये यांचं ‘असेही विद्वान’ हे जगभरातल्या काही निवडक विद्वानांची ओळख करून देणारं पुस्तक २ नोव्हेंबर रोजी साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्तानं या पुस्तकाचं हे प्रास्ताविक.

.............................................................................................................................................

मराठीतील महत्त्वाच्या वृत्तपत्रांचे संपादक, साहित्याचे समीक्षक आणि सौंदर्यशास्त्राचे भाष्यकार अशी ओळख असलेले प्रभाकर पाध्ये (१९०९ ते १९८४) यांनी बरोबर पन्नास वर्षांपूर्वी (मार्च १९६७ ते एप्रिल १९६८ या काळात) साप्ताहिक ‘साधना’मध्ये ‘असेही विद्वान’ हे सदर वर्षभर चालवले होते. या सदरातील लेखन तसे काळाच्या पडद्याआडच गेले होते. मात्र आमचा तरुण मित्र समीर शेख हा ‘साधना’तील हमीद दलवाई यांचे लेखन शोधत असताना त्याला हे सदर सापडले. त्या सदराचे एकूण स्वरूप आणि त्यातील मजकूर पाहून, आजच्या वाचकांना ते वाचायला आवडेल, असे वाटल्याने ‘साधना’च्या संपादकांनी त्याचे पुस्तक तयार करायचे ठरवले आणि त्यांच्या संपादनाचे काम माझ्याकडे आले.

आजच्या वाचकांना हे पुस्तक वाचायला सोयीचे जावे म्हणून पाध्येंनी निवडलेल्या व्यक्तींची ओळख करून देणाऱ्या छोट्या टीपा शेवटी जोडायच्या असे आम्ही ठरवले. तसेच आजच्या पिढीपर्यंत लेखनाची कालसुसंगतता जपून प्रभाकर पाध्येंचे लेखन पोचवायचे असेल, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि लेखन- विशेषतः या सदरातील- यांच्याशी संबंधित थोडेसे सविस्तर प्रास्ताविक लिहिणे आवश्यक होते. त्यानुसार हे प्रास्ताविक टिपण पुस्तकाच्या सुरुवातीसच घेतलेले आहे. पाध्येंच्या लेखनाला कोणत्याही प्रस्तावनेची काहीही गरज नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र हे प्रास्ताविक वाचल्याने नेमक्या कोणत्या चौकटीत हे पुस्तक वाचावे, कसे वाचावे आणि आज पन्नास वर्षांनी हे लेखन का वाचावे, अशा प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.

एक

पाध्येंनी ‘असेही विद्वान’ या साप्ताहिक सदरात एकूण १०१ छोटे लेख लिहिले होते. दोन व्यक्तींविषयी दोनदा लेख लिहिलेले असल्याने एकूण मिळून पाध्येंच्या सहवासात आलेल्या ९९ व्यक्तींवर हे लेख लिहिले गेले होते. साधारणतः त्या-त्या व्यक्तीशी संबंधित एखादी महत्त्वाची आठवण/घटना/प्रसंग असे या लेखनाचे स्वरूप होते. काही अपवाद वगळता प्रत्येक अंकात दोन (काही वेळा तीन) व्यक्तींविषयी लेख लिहिले जात होते. अंकातील कमीत कमी एक पान ते जास्तीत जास्त दोन पाने या सदराला दिले जात असत. सदरात पाध्येंनी शंभर शब्द ते पाचशे शब्द या मर्यादेत लेखन केले असून, एकाच अंकात बऱ्याचदा एक परदेशी आणि एक भारतीय विद्वान अशी सांगडसुद्धा घालायचा प्रयत्न केलेला दिसून रेतो.

लेखमालेत ज्यांच्यावर लेख लिहिले आहेत त्या व्यक्ती- त्यातही विशेषतः इतके विद्वान- पाध्येंना कशा आणि का भेटल्या, असा प्रश्न हे लेखन वाचणाऱ्या कोणालाही पडू शकतो. जागतिकीकरण आपल्या आयुष्यात येण्यापूर्वीच्या- विशेषतः १९५० आणि १९६० च्या दशकातील, प्रवास आणि संपर्क सोपे नसलेल्या काळातील हे लेखन आहे याचा विचार केल्यास, पाध्येंच्या आंतरराष्ट्रीय वावराबाबत एकाच वेळेस आश्चर्य व कौतुक अशा दोन्ही भावना दाटून येतात. मात्र खोलवर विचार केल्यास पाध्येंना हे कसे जमले, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या जीवनप्रवासात सापडते.

पाध्ये वयाच्या बावीस-तेविसाव्या वर्षी म्हणजे १९३१-३२ च्या सुमारास पत्रकारितेच्या क्षेत्रात आले. ह.वि.मोटे यांच्या ‘प्रतिभा’ मासिकात पाध्येंनी ‘पश्चिमेकडले वारे’ हे सदर ‘प्रोबॅक’ या टोपणनावाने लिहायला सुरुवात केली. आपल्या पहिल्यावहिल्या सदरात पाश्चात्य जगातील तेव्हाचे बदलते राजकारण, फॅसिस्ट प्रवृत्तींचा उदय, साहित्य-संस्कृतीविषयक लक्षणीय घडामोडी यांचा परिचय करून दिला होता. त्यानंतरची पुढील वीस वर्षे पाध्ये मराठी पत्रकारितेत सक्रिय होते. ‘चित्रा’ (१९३६ ते १९३८), धनुर्धारी (१९३८ ते १९४६) आणि नवशक्ती (१९४६ ते १९५३) या मराठीतील तीन महत्त्वाच्या नियतकालिकांचे ते संपादक होते. आग्रही राजकीय मते असलेला एक विद्वान संपादक अशी पाध्येंची तेव्हाची ओळख होती. त्या काळात मुंबईत राहणारे पाध्ये त्या शहरातील वैचारिक- सांस्कृतिक विश्वात आत्मविश्वासाने वावरत होते.

स्वतः वि.वा. शिरवाडकर यांनीच नोंदवल्याप्रमाणे, पाध्ये ‘धनुर्धारी’चे संपादक असताना त्यांनी हे साप्ताहिक मुंबईतील एक महत्त्वाचे बौद्धिक केंद्र बनवले होते. त्यांच्या काळात अनंत काणेकर, पां.वा.गाडगीळ, पु. रा. लेले, हरिभाऊ मोटे, पु.भा. भावे, बा.सी. मर्ढेकर, डॉ.चिटणीस तसेच काही वेळा आचार्य अत्रे अशांचा ‘धनुर्धारी’च्या ऑफिसात नियमित वावर होता. संपादक पाध्ये स्वतः वैचारिक विषयांवर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणावर रस घेऊन लिहीत असत. १९४० च्या सुमारास फाळणीविषयीची चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात चालू झालेली असताना त्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पाकिस्तानविषयक पुस्तकावर परीक्षणलेख लिहिले होते. त्यातूनच पुढे १९४१ मध्ये ‘पाकिस्तान की पन्नास टक्के’ हे पाध्येंचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

महाराष्ट्रात असतानाच्या काळात मुख्यतः राजकीय आणि वैचारिक स्वरूपाच्या लेखनाबद्दल पाध्ये ओळखले जात. त्यांनी वयाच्या ऐन पंचविशीत (१९३५ मध्ये) श्री.रा.टिकेकर यांच्याबरोबर ‘आज-कालचा महाराष्ट्र- वैचारिक प्रगती’ या पुस्तकाचे सहलेखन केले होते. (त्यातील एकोणिसावे शतकविषयक बरेचसे लेखन पाध्येंनी केले होते.) याशिवाय पाध्येंचे ‘विचारधारा’ नावाचे पुस्तक एकोणिसाव्या शतकाचे आकलन आणि मराठीतील वैचारिक लेखन या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच त्यांनी ‘तीन तपस्वी’ नावाचे एक पुस्तक लिहिले होते; ज्यात गोपाळ गणेश आगरकर, वामन मल्हार जोशी आणि साने गुरुजी या तिघांना एकाच सूत्रात बांधून त्यांच्यावर लिहिलेले आहे. याव्यतिरिक्त पाध्येंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे, राजकीय लेखन व प्रवासवर्णनेसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी कीलक करा -

https://tinyurl.com/y86lc3fq
.............................................................................................................................................

पाध्येंनी मराठीत कथा आणि समीक्षासुद्धा लिहिलेली असून त्यांच्या सौंदर्यशास्त्रविषयक लेखनासाठी ते आता प्रामुख्याने साहित्रक्षेत्रात ओळखले जातात. त्यांच्या ‘सौंदर्यानुभव’ या पुस्तकाला तर (१९८२ मध्ये) साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेला आहे. तब्बल पन्नास वर्षांची प्रदीर्घ लेखन-कारकीर्द असलेल्या पाध्येंनी ललित लेखदेखील वेळोवेळी लिहिले होते. त्यांची एकूण वैचारिक आणि साहित्यिक जडण-घडण, त्यांचे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी ‘अगस्तीचे अंगण’ (मौज प्रकाशन) हे त्यांच्या जन्मशताब्दीच्या (२००९) निमित्ताने प्रकाशित केलेले पुस्तक खूपच उपयुक्त ठरू शकेल. प्रा.विलास खोले आणि रेखा इनामदार-साने यांनी या अप्रतिम पुस्तकाचे संपादन केले असून, खोलेंनी त्या पुस्तकाला विवेचक प्रस्तावनाही लिहिलेली आहे. अतिशय उत्तम निर्मिती असलेल्या त्या पुस्तकात पाध्येंचे निवडक लेखन समाविष्ट केलेले असून, त्यांच्या लेखनाच्या दोन सूचीसुद्धा दिलेल्या आहेत.

मराठीत आपल्या संपादकीय कर्तबगारीने आणि विचारगर्भ लेखनाने ठसा उमटवणारे पाध्ये १९५३ ते १९६६ या तेरा-चौदा वर्षांच्या काळात मराठी पत्रकारिता, विचारविश्व व साहित्यातून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले होते. याच कालखंडात ते दिल्लीत राहायला गेले होते आणि ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेत वरिष्ठ स्तरावर कार्यरत होते. आयुष्याच्या याच टप्प्यात, १९६३ मध्ये, ते अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठीसुद्धा तीन महिने गेले होते.

लेखमालेत पाध्येंना भेटलेल्या व्यक्ती या प्रामुख्याने त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’च्या कामानिमित्ताने झालेला भरपूर प्रवास-परिषदा आणि ‘प्रिन्स्टन’ येथील संशोधन या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आल्या होत्या. आपला प्रवास आणि आपले अनुभव यावर आधारित प्रवासवर्णनात्मक असे भरपूर लेखन (उदा. ‘तोकोनामा’ हे त्यांचे जपानविषयक पुस्तक) त्यांनी केले होते. मात्र या साऱ्या व्यग्र आणि तरीही आयुष्य समृद्ध करणाऱ्या काळात आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तींवर आधारित असे लेखन त्यांनी या सदरात केले. (जाता-जाता एक विशेष बाब नोंदवावीशी वाटते. त्यांचे ‘पश्चिमेकडले वारे’ हे पहिले सदर ते ‘असेही विद्वान’ यामध्ये ३५ वर्षांचे अंतर असूनसुद्धा भारताबाहेरील व्यक्ती-घडामोडी यात रस घेणे हा धागा सुटलेला नाही!)

हे सदर लिहिले तेव्हा ५९-६० वर्षांचे पाध्ये नुकतेच दिल्लीतील वास्तव्य, विस्तारलेली क्षितिजे आणि आपला नियमित आंतरराष्ट्रीय वावर सोडून महाराष्ट्रात परत आले होते. (१९६६ ते १९८४ अशी शेवटची १८ वर्षे पाध्ये पुण्यातच स्थायिक झाले होते.) याचा अर्थ असा की, दिल्ली आणि भारताबाहेरील जगात आलेले वैविध्यपूर्ण अनुभव, भेटलेल्या व्यक्ती यांच्या आठवणी त्यांच्या मनात अजूनही ताज्या होत्या आणि त्यांच्याविषयी लिहिण्याची ऊर्मी शिल्लक होती. याआधीच्या लेखनात येऊन गेलेले नाही असे लिहायचे असल्याने आणि जे लिहायचे आहे तेसुद्धा मुख्यतः व्यक्तिगत आठवणीवजा स्वरूपाचे, त्यामुळे सदरलेखनाचा विशेष ताण तेव्हा पाध्येंवर पडला नसावा. हे सारे इथे खास सांगायचे कारण असे की, त्यांच्या १७ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा प्रशांतचा १९६५ मध्ये अपघाती मृत्यू झाल्याने त्यांनी दिल्ली सोडली होती. हा जबरदस्त आघात होता. त्या धक्क्यातून सावरायला त्यांना वेळ लागला. त्या धक्क्यानंतर पाध्येंनी लिहिलेले हे पहिलेच सदर होते.

दोन

या साऱ्या पार्श्वभूमीवर पाध्येंच्या सदराकडे पाहिल्यास काय दिसते? पाध्येंनी भारताबाहेरील ज्या विद्वानांवर लेख लिहिले आहेत, त्यातील फारच कमी नावे आपल्या परिचयाची आहेत. लुई फिशर, आर्थर कोस्लर, इसाया बर्लिन आणि काही भारतीय व्यक्ती (उदा. धनंजयराव गाडगीळ) वगळता सदरातील बहुतांशी नावेसुद्धा (उदा. हर्बर्ट पासीन, लिन युतांग) आपण कधीही ऐकलेली नाहीत. त्यांच्याविषयी आपल्याला इतर काहीही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. याचे साधे कारण असे की, आपण भारताबाहेरील मुख्यतः इंग्लंड-अमेरिका-रशिया-काही प्रमाणात युरोप येथील राजकारण आणि साहित्यविश्व यांच्याशी तेथील पुस्तके-सिनेमे-नाटके- नियतकालिके यामुळे थोडेफार परिचित असतो.

मात्र पाध्येंनी या सदरात मुख्यत: आग्नेय आणि पूर्व आशियातील इंडोनेशिया, जपान, म्यानमार, फिलिपाइन्स, थायलंड आणि सिंगापूर इत्यादी देशांतील व्यक्तींवर लिहिले. युरोपातील स्वीडन, युगोस्लाव्हिया आणि हंगेरी अशा देशांतील काही व्यक्ती इथे आहेत. ब्रिटन व अमेरिकेतील काही लेखक, मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित समीक्षक अशीही काही मंडळी आहेत. त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात भेटलेल्या काही व्यक्ती आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्रांतील प्रत्येकी एका व्यक्तीविषयी लेख आहेत. मात्र दक्षिण अमेरिका, आफ्रिका, पश्चिम आशिया, सोव्हिएत रशिया, पूर्व युरोप आणि चीन या प्रदेशांतील एकही विद्वान नाही.

असे का झाले असावे? पाध्ये हे ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेत १९५३ ते १९६५ या काळात कार्यरत होते. १९५५ ते १९६५ ही दहा वर्षे ते या संस्थेचे आशिया खंडाचे सरचिटणीस होते. कामाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध परिषदा-बैठका यांच्यासाठी पाध्येंचा प्रवास मुख्यतः आग्नेय व पूर्व आशिया आणि मध्य व दक्षिण युरोप इथे झाला. याचे मूळ ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेच्या उद्दिष्टांत आणि कामकाजात होते. शीत युद्ध ऐन भरात असताना १९५० मध्ये पाश्चिमात्य देशांतील विचारवंतांनी स्थापन केलेली ही संस्था कम्युनिझमला विरोध करणे, सांस्कृतिक स्वातंत्र्य टिकवणे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य या मूल्याला सर्वाधिक महत्त्व देणे अशा उदारमतवादी वैचारिक पायावर उभी होती. संस्थेची स्थापना करणे आणि तिचे कामकाज चालवणे यात युरोप-अमेरिका आणि आशियात मुख्यतः बुद्धिजीवी क्षेत्यातील व्यक्तीच आघाडीवर होत्या. या संस्थेशी संलग्न अशा ‘इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेत पाध्ये अगदी सुरुवातीपासूनच कार्यरत होते. (मीनू मसानी, जयप्रकाश नारायण यांचाही या संस्थेशी संबंध आला होता.) या संस्थेच्या लोकांकडून भारतात ‘क्वेस्ट’, इंग्लंड-अमेरिकेत ‘एन्काऊंटर’ अशी नियतकालिके चालवली जात असत. त्यामुळे वैचारिक नियतकालिके चालवणे, परिषदा भरवणे, जगभरातील समविचारी लोकांना- मुख्यत: बुद्धिजीवी क्षेत्यातील- एकत्र आणणे असेच या संस्थेच्या कामकाजाचे स्वरूप होते.

संस्थेचा कम्युनिझमला विरोध असल्याने कोणत्याही कम्युनिस्ट देशात ही संस्था कार्यरत नव्हती. त्यामुळे (सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोप आपसूकच बाद झाले.) युगोस्लाव्हियात संस्थेचे थोडेफार काम होते, मात्र मार्शल टिटो यांच्या नेतृत्वाखालील युगोस्लाव्हिया हा तेव्हा अलिप्ततावादी गटातील देश होता. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या आशिया खंडातील देशांमध्ये ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ला आपले काम वाढवण्यास अनुकूलता होती. या देशांमध्ये अजून कम्युनिस्ट सरकारे सत्तेत आली नव्हती आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रभाव शिल्लक होता. त्यामुळे कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव रोखणे आणि व्यक्तिस्वातंत्र्य-सांस्कृतिक स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रसार करणे अशा कामाला ‘स्पेस’ होती. त्यामुळेच भारत, इंडोनेशिया, म्यानमार, थायलंड इत्यादी देशांत संस्थेचे काम चालू होते. त्या कामाच्या निमित्ताने पाध्ये दिल्लीला आले, या साऱ्या प्रदेशात भरपूर फिरले आणि नव्यानेच स्वतःच्या पायांवर उभ्या राहू पाहणाऱ्या या देशांतील अभिजन वर्गाच्या- मुख्यतः वरिष्ठ स्तरावरील सरकारी अधिकारी, राजकीय नेते, विद्वान यांच्या संपर्कात आले.

तरुणपणी मार्क्सवादाने प्रभावित झालेले पाध्ये पुढे मार्क्सवादाचे अतिशय कडवे विरोधक बनले होते. त्यामुळे शीत युद्धाच्या त्या काळात दिल्लीत राहून ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’चे काम करणे आणि त्या माध्यमातून आशियातील नवस्वतंत्र देशांमध्ये कम्युनिझमचा वाढता प्रभाव रोखणे हा त्यांच्या वैयक्तिक आवडीचा व एकूण जीवननिष्ठेचाच भाग होता. ही संस्था १९५० ते १९६५ या पंधरा वर्षांच्या काळात जगातील एकूण ३५ देशांमध्ये कार्यरत होती आणि संस्थेच्या कामाचा प्रभाव शिखरावर होता. या ऐन बहराच्या काळात पाध्ये त्या संस्थेचे आशिया खंडाचे सरचिटणीस होते, यावरून त्यांचे स्थान आणि महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकते.

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’कडून कम्युनिझमविरोधी कामासाठी जगभर अनेक संस्थांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत दिली जात असे आणि अमेरिकेचा राजकीय व सांस्कृतिक अजेंडा पुढे नेण्याचे काम केले जात असे. ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ला पण सीआयएच्या माध्यमातून देणग्या मिळतात, असे १९६६ च्या सुमारास उघड झाले. पुढे १९६७ मध्ये ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ला अमेरिकेतीलच ‘फोर्ड फाउंडेशन’कडून अर्थसाह्य मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर संस्थेने आपले नावसुद्धा बदलले आणि आपल्या अजेंड्यातील कम्युनिझमविरोधाची तीव्रता थोडी कमी केली.

मात्र १९५० आणि १९६० च्या दशकात या संस्थेच्या हेतूबाबत आणि कामाबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या गेल्या. ही संस्था प्रचारी स्वरूपाचे काम करते, असेही म्हटले गेले. परंतु असे काहीही असले तरीसुद्धा ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’चे काम करणाऱ्या जगभरातील व्यक्ती, ‘क्वेस्ट’ व ‘एन्काऊंटर’सारख्या नियतकालिकांचा दर्जा आणि विविध परिषदांत सहभागी झालेले विचारवंत-बुद्धिजीवी यांच्याकडे नजर टाकली, तर असे दिसते की या साऱ्या उपक्रमांत अतिशय गुणवत्तावान व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, एवढे नक्की. अशा व्यक्तींच्या खास आठवणी पाध्ये यांनी या पुस्तकात आपल्यासमोर ठेवल्या आहेत.

गुणवत्तावान व्यक्तींबरोबरच्या सहवासाचा हाच धागा पुढे चालवून असे म्हणता येते की, अमेरिकेतील ज्रा ‘प्रिन्स्टन’ विद्यापीठात संशोधनासाठी पाध्ये गेले होते, ते विशेष गुणवत्तेसाठीच ओळखले जाते. तसेच त्यांनी निवडलेला ‘सौंदर्यशास्त्र’ हा विषयसुद्धा साहित्यातील अभ्यासक-समीक्षक सामान्रपणे निवडत नाहीत. (मराठीत या विषयावर चांगली पुस्तके किती आहेत याची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येऊ शकते!) त्यामुळे प्रिन्स्टनमध्येही आणि आपल्या संशोधनविषयाच्या निमित्ताने मानसशास्त्र-तत्त्वज्ञान-सौंदर्यशास्त्र या विषयांतील पाध्येंच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती गुणवत्तावान आणि प्रतिभासंपन्न अशाच होत्या.

तीन

पाध्येंनी ज्या-ज्या व्यक्तींविषयी या सदरात लिहिले, त्या व्यक्ती कोण आहेत? यातल्या बऱ्याचशा व्यक्ती त्यांच्या-त्यांच्या देशातील सत्तेच्या सर्वोच्च स्तरावर वावरणाऱ्या आहेत. (इथे हे आवर्जून नोंदवायला हवे की, भारत, इंडोनेशिया, म्यानमार अशा नवस्वतंत्र देशांत ज्ञानी आणि गुणवान व्यक्ती त्या काळात सत्तावर्तुळात वावरत असत.) यात त्या-त्या देशांचे उपपंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, राजघराण्यातल्या व्यक्ती आहेत. देशाच्या सत्ताकारणात-राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्ती आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत. परदेशी दूतावासातील वकील आणि महत्त्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरू आहेत. विविध क्षेत्यांतील अभ्यासक-संशोधक तसेच कवी-साहित्यिक आहेत. वैचारिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या इसाया बर्लिन आणि जॉर्ज केनान यांच्यासारख्या व्यक्तींच्या आठवणीसुद्धा इथे आहेत. अतिशय वैविध्रपूर्ण अशा व्यक्ती आणि त्यांचे तितकेच रोचक असे अनुभव पाध्येंनी या सदरात नोंदवलेले आहेत.

या पुस्तकात त्या सदरातील सर्वच लेख घेणे योग्य नव्हते; कारण पाध्येंनी तेव्हा सी.के. नायडू आणि विजय मर्चंट यांच्यासारखे क्रिकेटपटू, स.का.पाटील, मोरारजी देसाई यांच्यासारखे राजकीय नेते, पु.ल. देशपांडे आणि कुसुमाग्रज या मराठी साहित्यातील व्यक्ती यांच्याविषयी पण लेख लिहिले होते. मराठी वाचकांना परिचित असलेल्या या व्यक्ती आणि त्यांच्याबरोबरचे पाध्येंनी नोंदवलेले अनुभव यात फारसे नावीन्य वाटण्याची शक्यता आज कमी आहे. त्यामुळे मग असे लेखन बाजूला काढून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरलेल्या, ज्ञानाच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींशी संबंधित लेखनच पुस्तकात घ्यायचे, असे आम्ही ठरवले.

या सदरातील लेखन हे जसे त्या-त्या व्यक्तींच्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आठवणी/घटना/प्रसंग सांगते, तसेच ते आपल्याला पाध्येंच्या स्वभावाचीसुद्धा जाणीव करून देते. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर उदंड आत्मविश्वास घेऊनच कायम वावरले. त्यामुळेच सौंदर्यशास्त्र- मानसशास्त्रविषयक आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांना भेटल्यावर पाध्ये त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने चर्चा करू शकले. त्यांच्या कामाविषयी प्रश्न विचारू शकले, स्वतःच्या विचारांविषयी माहिती देऊ शकले. आपल्या विषयाचे अद्ययावत ज्ञान आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेबाबत पूर्ण आत्मविेशास असल्याशिवाय असे होत नाही. या दृष्टीने पाध्येंचे प्रो. गॉर्डन ऑलपोर्ट, मायकेल पोलान्री, डॉन मकाय यांच्याबरोबरचे संवाद पाहण्यासारखे आहेत.

पाध्येंची आपल्या कामावर आणि ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’च्या उद्दिष्टांवर पूर्ण वैचारिक निष्ठा होती. त्यामुळे जेव्हा भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’च्या कामावर टीका केली; किंवा ब्रह्मदेशाचे उपपंतप्रधान उ बा स्वे यांनी त्या संस्थेची तुलना कम्युनिस्टांच्या ‘वर्ल्ड पीस’ या संस्थेबरोबर केली, तेव्हा पाध्येंनी अतिशय ठामपणे, या व्यक्तींच्या पदाचे किंवा व्यक्तिमत्त्वाचे कोणतेही दडपण येऊ न देता, स्पष्ट शब्दांत आपल्या संस्थेविषयीचे या लोकांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च सत्तापदावरील व्यक्तींशी असे वागायला वेगळेच आत्मिक धैर्य लागते. त्या दृष्टीनेही या पुस्तकातील अनेक प्रसंग वाचण्यासारखे आहेत.

जुनी मैत्री जपणे आणि विविध देशांतील परिचित माणसांना आवर्जून भेटणे हे पाध्येंच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे अंग या लेखांतून ठळकपणे समोर येते. पाध्ये युगोस्लाव्हियाला गेले, तेव्हा ते त्या देशाच्या सरकारचे अधिकृत पाहुणे होते. मात्र मार्शल टिटोचे चरित्र लिहिलेल्या नंतरच्या काळात (पक्षामध्ये मतभेदांना जागा असायला हवी अशी भूमिका घेऊन) पक्षातील प्रस्थापित नेतृत्वाला विरोध करणाऱ्या ‘ब्लादिमीर दिदियेर’शी त्यांची जुनी ओळख होती. या ‘दिदियेर’ना कम्युनिस्ट पक्षाने विजनवासात पाठवले असूनही सरकारी पाहुणे असलेले पाध्ये स्वतःहूनच त्यांना भेटायला गेले, त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. पाध्येंच्या स्वभावातील निर्भीड वृत्ती पण यातून दिसून येते. परदेशी पत्रकारांशी असलेली मैत्री जपणे आणि आपल्या कामासाठी त्यांचा चांगल्या अर्थाने उपयोग करून घेणे हेसुद्धा पाध्येंच्या स्वभावात होते. वर उल्लेख केलेल्या ‘दिदियेर’ना भेटण्यासाठी किंवा ‘लिन युतांग’ यांची भेट घेण्यासाठी पाध्येंना त्या-त्या देशांत काम करणाऱ्या परदेशी पत्रकारांचा कसा उपयोग झाला, हे त्यांनी स्वतःच नोंदवलेले आहे.

अशा या लेखमालेचे हे पुस्तक आजच्या वाचकांनी कसे वाचावे? पुस्तकातील लेखनाचे स्वरूप असे आहे की, वाचकांनी कोणतेही पान उघडावे आणि त्या-त्या व्यक्तीविषयीची आठवण वाचावी. पुस्तक सलग वाचले तरी काही हरकत नाही आणि असे मधूनच कोणतेही पान उघडून वाचले तरीही वाचनाच्या आनंदात काहीच फरक पडत नाही. विद्वान व्यक्तींच्या विक्षिप्तपणाचे किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचे हे प्रसंग वाचल्याने त्या-त्या विद्वानांविषयी असलेले गूढ कमी होईल; या विद्वान व्यक्तीसुद्धा मानवी भाव-भावना, इच्छा-आकांक्षा असलेल्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवेल आणि असे असूनही त्यांना ज्ञानाच्या क्षेत्यात भरीव योगदान देता आले याची जाणीव होऊन आपल्या मनातील या विद्वानांविषयीचा आदर निश्चितपणे वाढेल!

आता शेवटचा मुद्दा. हे सारे विवेचन पाहून आपण हे लेखन आज पन्नास वर्षांनी का वाचावे, असा प्रश्न पडू शकतो. त्याची चार कारणे आहेत.

१. मराठीतील एक संपादक-साहित्यिक-समीक्षक थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या दीर्घ काळ इतक्या आत्मविश्वासाने वावरला. मात्र आज हेच पाध्ये नव्या पिढीच्या पूर्णतः विस्मृतीत गेले आहेत. त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या काळाच्या आणि ज्ञानी व्यक्तींबरोबरच्या या आठवणी आहेत. त्या वाचून आपल्याला प्रभाकर पाध्ये नावाच्या माणसाच्या कामाच्या झपाट्याचा, बौद्धिक क्षमतांचा आणि वैचारिक क्षितिजांचा परिचय होऊ शकतो. हे लेखन वाचून वाचकांना पाध्येंचेच इतर लेखन वाचावेसे वाटू शकते.

2. पाध्येंनी हा सारा मजकूर इंग्रजीत किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहून ठेवलेला नाही. त्यांनी हे सारे लेखन मराठीत आणि मराठी वाचकांसाठी जाणीवपूर्वक केले. मराठी भाषेत वैश्विक भान असलेले, वेगळ्या प्रकारचे, दर्जेदार लेखन कोणत्या काळात केले गेले आहे, याची जाणीव होण्यासाठीसुद्धा हे लेखन वाचायला हवे.

3. विद्वान व्यक्तींच्या अशा रोचक आठवणी वाचल्याने यापैकी काही व्यक्तींचे आयुष्य आणि विचार अधिक खोलात समजून घेण्याची इच्छा काही वाचकांना होऊ शकते. त्यातूनच थोड्याफार प्रमाणात तरुण मंडळी वैचारिक क्षेत्राकडे वळण्याची शक्यता निर्माण होते..

४. शेवटचे आणि सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या विद्वत्तेला तुच्छ लेखण्याचे, विचारवंतांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचे वारे सर्वत्र वाहत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि सरकार या स्तरावरून असे केले जात आहे. त्यामुळे अशा विरोधी आणि प्रतिकूल वातावरणात विद्वत्तेचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करणे, विद्वज्जनांना समाजासमोर आणणे आणि प्रचलित वातावरण बदलण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करणे या प्रक्रियेचाच एक भाग म्हणूनसुद्धा हे पुस्तक बाहेर आणायला हवे, अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचायला हवे आणि वाचकांनी वाचायला हवे!

.............................................................................................................................................

पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा (हे पुस्तक २ नोव्हेंबरनंतरच उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.)

.............................................................................................................................................

लेखक संकल्प गुर्जर दिल्लीस्थित साउथ एशियन विद्यापीठामध्ये पीएच.डी. करत आहेत.

sankalp.gurjar@gmail.com                                           

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 19 October 2018

संकल्प गुर्जर, आयला जबरदस्त. असा माणूस आज हवा होता. पण काही हरकत नाही. प्रयत्न चालू ठेवायचे. पाध्ये जगभर सीआयेच्या पैशांनी गेले का आजून कोणाच्या हे तितकंसं महत्त्वाचं नाही. त्यांनी जो वारसा मागे सोडलाय तो वाढवता कसा येईल हे पाहिलं पाहिजे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......