समाज म्हणून आपण भयंकराच्या दारात उभे आहोत! (पूर्वार्ध)
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नितिन भरत वाघ
  • दिनकर मनवर आणि त्यांचा कवितासंग्रह
  • Fri , 19 October 2018
  • पडघम साहित्यिक दिनकर मनवर Dinkar Manvar पाणी कसं अस्तं दृश्य नसलेल्या दृश्यात

दिनकर मनवर यांच्या मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या कवितेच्या एका ओळीच्या संदर्भात महिला आयोगाने मनवर यांना स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटीस पाठवली आहे. ही केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नाहीतर बहुधा जागतिक साहित्येतिहासात एकमेव अशी घटना असेल. या घटनेकडे बघताना कवी, लेखक, कादंबरीकार, चित्रकार म्हणून अनेक प्रश्न व विचार उभे राहिले. वर्तमान परिस्थितीच्या संदर्भात आणि ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा. सगळ्या प्रश्नांचं आणि विचारांचं सूत्र शेवटी कोणत्याही कलाकृतीत आढळणारी ‘स्त्री’ या केंद्रावर स्थापित केलं. परिणामी दिनकर मनवर यांच्या कवितेत आढळून येणारा स्त्रीयांविषयी दृष्टिकोन नेमका कसा आणि काय आहे ते पडताळून पाहण्याचे ठरवले.

कोणत्याही कलावंताच्या कविता, कादंबरी, चित्रकला, दृश्यकला एकुणात कोणत्याही सर्जनशील व्यक्तीला आपल्या निर्मितीत, निर्मितीप्रक्रियेत स्त्रीला टाळता येत नाही इतकं ते अटळ आणि अढळ असतं. स्त्री अस्तित्त्व, स्त्रियांविषयक जाणीव टाळताच येत नाही. स्वतंत्र आणि स्वायत्त असं स्त्री प्रतिमांचं अलौकिक जग कलाजगतात अस्तित्वात असतं, जे व्यक्तिनुरूप, कलावंतानुरूप आपलं स्वरूप बदलत असतं. स्त्री प्रतिमांचं हे जग स्त्रीचं त्या त्या काळातलं त्या त्या समाजाचं आकलन आणि दृष्टिकोन अधोरेखित करत असतं. केवळ साहित्य किंवा कलाविश्वातच नाही तर सामाजिक संदर्भातदेखील हे जग त्या समाजाच्या व्यापकतेचं, निरोगीपणाचं, विकारांचं, धोरण-धारणांचं स्वरूप प्रदान करत असतं. समाज ‘सेक्युलर’ आहे किंवा नाही हे तपासून पहायचं असेल तर त्या समाजाच्या धर्म, जातजाणिवा नाही तर स्त्रियांविषयक असलेला दृष्टिकोन तपासून बघितला पाहिजे. जो समाज मानसिकदृष्ट्या जेवढा निरोगी तेव्हढा सेक्युलर असतो, ज्यात लिंग भेदभावविरहित ‘व्यक्ती’चं अस्तित्व मान्य केलेलं असतं. सेक्युलर शब्द आणि संकल्पना इथं मांडण्याचं कारण ही संकल्पना स्त्रीजाणिवांचे आणि समाजात स्त्रीच्या स्थानाचं स्पष्टीकरण नेमकेपणानं देत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच म्हणतात जर एखाद्या समाजाचं मूल्यमापन करायचं असेल आणि योग्यता ओळखायची असेल तर त्या समाजात स्त्रियांचं स्थान काय आहे ते तपासा. ही गोष्ट जितकी समाजाला लागू होते, तितकीच समाजाचा लघुत्तम घटकाला म्हणजे ‘कुटुंब’लाही लागू होते. यातूनच कुटुंबाचा एकल घटक असलेल्या व्यक्तीची स्त्रीविषयक जाणीव, आकलन आणि त्याच्या आयुष्यात असणारे स्थान स्पष्ट होत जाते. ज्यातून त्या व्यक्तीचा स्त्रीविषयक दृष्टिकोन विकसित होत जातो व घडत जातो. मी कलावंत, कवी लेखक असा वापर करतोय त्यात केवळ पुरुष नाही तर स्त्री, पुरुष आणि इतर या तीनही घटकांचा समावेश आहे. ‘स्त्री’ही पुरुषांइतकीच ताकदीनं स्त्रियांच्या निर्मितीत आढळून येते.

अगदी प्राचीन काळापासून गुहेतील भित्तीचित्रांपासून तर आजतागायत ‘स्त्री’ प्रत्येक कलाप्रकारांत आणि जवळपास प्रत्येक कलावंताच्या कलेत प्रकट होत आलीये, अवतरत आलेली आहे. यावरून कळतं ‘स्त्री’ नेहमीच आदिम प्रेरणास्त्रोत म्हणून प्रत्येक कलावंताला ऊर्जा पुरवत आलेली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्या काळात, ज्या समाजात स्त्रीविषयक धारणा निकोप, निर्मळ, भेदरहित आणि स्वच्छ असतात तो समाज निरोगी असतो. इतिहासाच्या ‘बर्ड आय व्ह्यू’नं जर भारतीय समाजाच्या वेगवेगळ्या कालखंडातील समाजजीवनाचा अभ्यास केला, तर भारतीय समाज एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे लंबकासारखा हेलकावे खाताना दिसून येतो. एक स्वस्थ सम्यक समतोल राखलेला आढळून येत नाही. का येत नाही या प्रश्नाची अनेक उत्तरं सापडतील, त्याची इथं चर्चा करण्याचं कारण नाही.

मुख्य मुद्दा आहे – समाजाची (मनो)रुग्णता. ‘मुलगी वाचवा’, ‘मुलगी शिकवा’, ‘मुलीचा गर्भपात करू नका’, ‘मुलींना जगू द्या’, ‘मुलींना शालेय पाठवा’, ही आणि अशा अर्थाची अनेक मोठमोठी सरकारी कॅम्पेन चालतात, तेव्हा भारतीय समाज त्याबाबत नेमका काय विचार करतो? अशा जाहिराती पाहून भारतीयांना ‘लाज’ वाटते का? अशा जाहिरातीपाहून आपली मानव (सेपियन) म्हणून उत्क्रांतीक्रमात खूप अधोगती झाली आहे का त्याहून अधिक काही झालं आहे? या जाहिराती म्हणजे आपला समाजजीवनाचा चेहरा आहेत तो किती हिडीस, विद्रूप आणि किळसवाणा आहे हे भारतीयांच्या लक्षात येतं का? समाज म्हणून आपलं किती भीषण, नैतिक अध:पतन झालेलं आहे याची जाणीव या समाजाचं बौद्धिक नेतृत्त्व करणाऱ्या वर्गाला तरी आहे का? हा असा कालखंड आहे का, ज्यात समाजाला ‘स्त्री’ नकोशी झाली आहे, जर असं असेल तर हे अनैतिक वास्तव हा समाज मान्य करेल का? अशा लाजीरवाण्या जाहिराती समाजाच्या ‘प्रबोधना’साठी राबवाव्या लागणं हा कुणाच्याच नैतिक अस्मितेचा प्रश्न का बनत नाही? हे सगळं कशामुळे होतंय? नेमका कोणता गंड भारतीय समाजाला वेढून आहे? अशा पार्श्वभूमीवर केवळ स्त्री देहातील एक अवयवाचा उल्लेख कवितेत प्रतिमा म्हणून केला तरी समाज ढवळून निघतो, तेव्हा एक गोष्ट प्रत्येकानं नीट समजून घेणे आवश्यक आहे की, एकजीव समाज म्हणून आपण भयंकराच्या दारात उभे आहोत.

या भयंकरच्या दारात येण्याआधी भारतीय समाज कसा होता. त्या समाजाच्या काही नैतिक जाणीवांच्या (विशेषतः स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीवर्णनाबाबत विचार) मान्यतांचा, धारणांचा विचार केला तर काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतील. म्हणजे भारतीय समाज सभ्यता (सिव्हिलायझेशन) म्हणून उत्क्रांत (Evolute) होतोय की निक्रांत (Devolute) ते कळायला मदत होईल. मी वर ‘सेक्युलर’ शब्दाचा वापर केला आहे, त्याची व्याख्या देण्याचा प्रयत्न करतो. ‘सेक्युलर’ या शब्दाच्या नेमक्या अर्थाचा कोणताही शब्द मराठीत नाही म्हणून ‘सेक्युलर’ हाच शब्द मराठी म्हणूनच वापरणार आहे. जो समाज कोणत्याही विकार आणि गंडाशिवाय जगतो, ज्याला (कोणाचेही) सहअस्तित्व (कोणासोबतही) सहजीवन मान्य असते, ज्या समाजाला पर्यायी किंवा समांतर किंवा इतर किंवा विरोधी विचारधारा, धारणा मान्य असतात. ज्या समाजात लिंगभाव हा लिंगभेद निर्माण करत नाही, जो समाज जगा आणि जगू द्या हे तत्त्वं निकोपपणे मान्य करतो, नैतिक अधिष्ठान असणारे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य जो समाज मान्य करतो, तो समाज सेक्युलर समजावा. (या अर्थानं भारतीय संविधान सेक्युलर आहे.) तर आजची समाजप्रणाली तशी आहे का, याचं उत्तर नाही असंच आहे. आता मी काही ग्रंथांची नावं देतो त्यावरून एखादा समाज किती निरोगी, अविकारी आणि सेक्युलर असतो ते समजून येईल.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी कीलक करा -

https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

वात्सायनाचं कामसूत्र, कन्दर्पचूडामणी, कोकापण्डिताचं रतिरहस्य (म्हणजेच कोकशास्त्र), पद्मश्रीचं नागर सर्वस्वम्, कल्याणमल्लाचं अनंगरंग, कवी शेखराचं पंचसायक, हरीहराची शृंगारदीपिका, नागर्जुनाचं रतिशास्त्र, अनङ्ग-तिलक, अनङ्गदीपिका, अनङ्ग-शेखर, कामसमूह, भगवत कवीचं अष्टनायिका दर्पण, ईश्वर, कामित, कलावादतंत्र, कलाविधीतंत्र, कोकापण्डिताचं कलाशास्त्र, कामप्रकाश, गुणाकराचा कामप्रदीप, कामप्रबोध नावाचे दोन ग्रंथ, नित्यनाथकृत कामरत्न, वामनाचे कामशास्त्र, कामदेवाचे कामसार, कौतुकमंजरी, पद्यमुक्तावल, मदनसंजीवनी, मनोदय, योगरत्नावली, जयदेवाची रतिमंजिरी, विद्याधरकवीकृत रतिरहस्य, हरिहरकृत रतिरहस्य, रतिरहस्य टीका, कांचीनाथकृत रतिरहस्यदीपिका, रामचंद्र सूरिकृत रतिरहस्य व्याख्या, रतिसर्वस्व रतिसार, विश्वेश्वरकृत रसचंद्रिका, रसविवेक, वाजीकरण तंत्र, क्षेमेंद्रकृत वात्सायन सूत्रसार, वेश्याङ्गना कल्प, वेश्याङ्गना वृत्ती, शाङ्गधरकृत शृंगारपद्धती, शृंगार-भेदप्रदीप, शृंगार मंजरी, चित्रधरकृत शृंगारसारिणी, विष्णवङि्गरसकृत समर काम-दीपिका, सुरतोत्वर कामशास्त्र, देवेश्वरकृत स्त्रीविलास, रेवणाराध्यकृत स्मर-रहस्य-व्याख्या, केशवकृत काम-प्रभृत, वरदार्यकृत कामानन्द, हरिहरकृत रतिचन्द्रिका, आनंदकृत कोकसार भाषा इत्यादी.

याव्यतिरिक्त ऋग्वेद, उपनिषदं, स्मृती, पुराणांत स्त्री-पुरुष सबंध आणि स्त्रियांची वर्णनं आहेत. भारतीय समाजाची इतकी समृद्ध आणि निरोगी परंपरा असताना, इतकी विपुल, महाकाय ग्रंथसंपत्ती याच समाजात निर्माण झालेली असताना केवळ कवितेच्या एका शब्दावर आक्षेप घेऊन कवीला आरोपित करणं अनाकलनीय तर आहेच, पण खऱ्या भारतीय परंपरेला न साजेसं आहे, हे वर दिलेल्या ग्रंथनामावरून कळून येईल. वर उल्लेख केलेल्या ग्रंथात तंत्र शास्त्रातील ग्रंथांचा किंवा इतर शिल्पचित्रांचा संदर्भ दिलेला नाही. स्त्री ‘अवयवा’चा केवळ उल्लेख कवीला स्पष्टीकरण देण्यास भाग पाडू शकतो?

हाच धागा धरून पुढे गेलो तर भारतात लैंगिक शिक्षण असावं की नसावं या मुद्द्याचाही विचार करता येईल. वर जेवढी ग्रंथसंपदा दिली आहे, त्याआधारे असं सिद्ध करता येतं, की भारतीय समाज जीवनात लैंगिक शिक्षणाला किती महत्त्व होतं. काहीशे वर्षांपूर्वी अत्यंत आधुनिक आणि मोकळा असणारा समाज असा मागास व बंदिस्त का व्हावा? याचा विचार करण्याऐवजी अधिक ‘अस्मिताखोर’ होण्यात काय हशील आहे. कोणत्याही शिक्षणानं माणूस अधिक सुजाण होतो, त्याला अधिक समज येऊन तो व्यापकतेनं जगण्याकडे बघायला शिकतो. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची सर्वोत्तम व्याख्या केली आहे. ते म्हणतात, ‘जे अज्ञानाचा अंधार दूर करतं ते शिक्षण.’ जर ही व्याख्या योग्य असेल तर मग ‘लैंगिक शिक्षण’ देण्यास विरोध का किंवा लैंगिक शिक्षण शाळा, महाविद्यालयांत का शिकवलं जात नाही. त्याची आजच्या काळात विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सगळ्यांनाच गरज आहे. बरं जेव्हा भारतातील मेडिकल किंवा विज्ञानशाखांत शरीरशास्त्र शिकवलं जातं, तेव्हा कोणते वेगळे नियम असतात? जर शरीरशास्त्रासारखे विषय विज्ञानात शिकवले जातात, तर ते मानव्य किंवा कला शाखेत का शिकवू नये? चित्रकलासारखा विषय शिकताना फाईन आर्टमध्ये ‘न्यूड’ शिकवलं जातं. चित्रकला किंवा विज्ञानाचे विद्यार्थी शरीरशास्त्र शिकून चळतात का अधिक स्वच्छपणे मानवी शरीराकडे पर्यायानं मानवी स्त्री-पुरुष व्यवहाराकडे बघू शकतात? प्राचीन भारतानं जर लैंगिक शिक्षण इतकं महत्त्वाचं मानलं होतं तर आज का त्याला अभ्यासक्रमात लावायलाही घाबरतात? महर्षी वात्सायनाचा ‘कामसूत्र’सारखा अत्यंत विज्ञाननिष्ठ समाजविज्ञानाचा अभ्यास कसा असावा याचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ का कोणत्याही विद्यापीठात अभ्यासक्रमात नाही? एवढं निकोपपण समाजात आलं तर ‘मुली वाचवा’ अशा लाज आणणाऱ्या जाहिराती कराव्या लागणार नाहीत. कोणत्या गोष्टीला इतका स्वत:ला संस्कारशील म्हणवून घेणारा भारतीय समाज घाबरतो? असं काय शिकवलं जाणार आहे, लैंगिक शिक्षणात जे भारतीय विद्यार्थी शिकतंच नाही किंवा शिकल्यावाचून राहतो? लैंगिक शिक्षणात काय काय शिकवणार जास्तीत जास्त : स्त्री-पुरुष देहांची ओळख, त्यापैकी एकाची ओळख तर प्रत्येकाला असतेच. लिंग कशावरून ठरते हे कळण्यासाठी XX आणि XY गुणसूत्रं (जे आताही शिकवतात), जननेंद्रियं, बाळं जन्माला कसं येतं, स्त्री-पुरुष शारीरिक संबंध कसे असतात, शुक्राणू व बीजांडे कशी तयार होतात, स्त्रियांमध्ये मासिकधर्म नेमका काय असतो. याच गोष्टी शिकवणार ना की लैंगिक शिक्षण म्हणजे थेट कामासनच आणि पोर्नोग्राफीच डोक्यात असते. स्त्रियांचा मासिकधर्माचा काळ किती त्रासदायक असतो हे मुलांना नीट शारीरिकशास्त्रदृष्ट्या समजावलं तर ते आपल्या आईविषयी अधिक काळजी घेणार नाहीत का? स्त्रीकडे बघण्याची त्यांची दृष्टी निर्मळ होणार नाही का? माणसाला असणारी कुतूहल ही भावना न आवरता येणारी असते ती पूर्ण करण्यासाठी काय वाटेल ते करायला माणसं तयार असतात. लहान मुलांमधील, वाढत्या वयाच्या मुलांमधील कुतूहलं अधिक तीव्र असतात. आज एका हाताच्या बोटाच्या पेरावर ‘सगळं’ उपलब्ध असताना आणि इच्छा नसतानाही मायाजालातील अनेक गोष्टी अवचित समोर येत असताना, ज्या टाळू शकत नाही, लैंगिक शिक्षण अत्यावश्यक बनतं. ते होत नाही म्हणून एखादा साधा ‘स्तन’सारखा शब्दही अश्लील वाटतो. सगळ्या गोष्टींकडे बघण्याची नजरही ‘घाण’ बनते आणि सर्वत्र घाणच दिसते. ही घाण नजर दूर होण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. तसं झालं तर ‘मी टू’ (MeToo) सारखे अनुभव स्त्रिया मांडणार नाहीत. मला ठामपणे वाटतं आपल्या समाज जीवनात धोरण आखताना आणि राबताना मूळातच चुकीची राबवली जातात. मुलींना / स्त्रियांना सबल करताना मुलांना / पुरुषांना हतबल करण्याच्याही योजना राबवल्या पाहिजेत म्हणजे समतोल साधला जाईल, नुसत्या स्त्रिया सबल होऊन चालणार नाहीत तर पुरुष दुर्बल (छळ करणारे) झाले पाहिजेत. ‘स्वच्छ ठेवा’ हे शिकवण्यापेक्षा ‘घाण करू नका’ हे सांगणं जास्त सयुक्तिक आहे. पण तसं होत नाही. त्याच्या उलट सांगितलं जातं परिणामी ‘स्वच्छ भारत’सारखं अभियान राबवलं जातं.  

अनेक धारणांत असणारी अपरिपक्वता समाजाच्या एकूणच आकलनाला गढूळ करत असते. कोणताही गढूळपणा शेवटी माणसाला पर्यायानं समाजाला हानीकारकच ठरतो. म्हणून समाजाच्या सर्व मूलभूत धारणांसंबंधी स्पष्टता येईल असे प्रयत्न केले पाहिजेत. ज्या काळात आपण सगळे जगतो आहोत त्यात श्वासाइतकीच महत्त्वाची गोष्ट स्पष्टता आहे, कारण जगण्याच्या प्रत्येक स्तरावर विविध प्रकारचा संघटीत असा गोंधळ माजवण्याचं सामर्थ्य केवळ 1KBच्या इमेज फाईलमध्ये आहे. आज प्रत्येक व्यक्तीचा सदसदविवेक आणि मानवी जगण्यातली नैतिकता पणाला लागलेली आहे. अधिक चिकित्सक आणि सहनशील होण्याची गरज असण्याच्या या काळात नेमकं उलटं होतंय, माणसं अधिक अंध आणि संहत होत चाललेला आहे. हे बदलण्यासाठी, थांबवण्यासाठी सतत प्रयत्नरत असलं पाहिजे. ज्यायोगे व्यक्ती आणि समाजाचा परिप्रेक्ष्य व्यापक होऊन माणसाचे जगणे सुसह्य आणि थोडेतरी आनंददायी होईल. अशी आशा बाळगून प्रयत्न करायला काय हरकत आहे?  

आता पुढे जाण्याआधी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेतील आक्षेपग्रस्त ओळीचा विचार करू. ‘किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं’ या ओळीवर आक्षेप आहे.

ही ओळ नव्यानं फक्त एक शब्द बदलून लिहिली तर आशयात काय बदल होतो ते पाहू,  

‘किंवा आदिवासी पोरीच्या ओठांसारखं जांभळं’

यात जो आदिवासी शब्द आहे त्याला न हलवता न बदलताही संपूर्ण कवितेचा आशय लक्षात घेतला तर फक्त एक शब्द बदलूनही कवितेचा अर्थ किंवा परिणाम बदलत नाही. म्हणजे ‘आदिवासी पोर’ या शब्दातली आक्षेपाहार्यता नष्ट होते असं गृहित धरायला हरकत नाही. म्हणजेच कवीनं यात कोणाचाही अवमान जाणीवपूर्वक नाही तर अजाणताही केलेला नाही हे स्पष्ट होतं. आता एक शब्द उरतो, ‘स्तन’. या शब्दात आक्षेप घ्यावा असं काय आहे? स्तन तर पुरुषांनाही असतात, फक्त ते आकारानं लहान असतात आणि दुधाची निर्मिती करत नाही इतकंच. संदर्भाचा मागोवा घेतला तर फक्त श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोनच पुरुषांना स्तन नव्हते असा उल्लेख आहे, म्हणून त्यांना ‘पूर्णपुरुष’ म्हणतात. प्राण्यांमध्ये घोडा या प्राण्याला स्तन नसतात. हे संपूर्ण विवेचन केवळ एक ओळ तोडून नाही तर पूर्ण कवितेच्या आशयानुरूप आहे, हे लक्षात घ्यायला हवं. तरी सुद्धा पुढे या कवितेच्या प्रतिमांच्या संदर्भाचा विचार पुढे केलेला आहेच.

अशा काही महत्त्वाच्या आणि मूलभूत मुद्द्यांच्या स्पष्टीकरणानंतर दिनकर मनवर यांच्या कवितेतील स्त्रीविषयक दृष्टिकोन नेमका काय आणि कसा आहे त्याकडे वळता येईल. कोणत्याही व्यक्तीची किंवा जगातील प्रत्येक जन्म घेणाऱ्याची ओळख सर्वप्रथम एका स्त्रीशी होते, ती मातेच्या रूपात. जन्म घेणारा जेव्हा स्वतंत्र श्वास घेतो, स्वजाणीवेतून पहिला स्पर्श करतो तो एका स्त्रीला करतो. या पहिल्या स्पर्शापासून स्त्री-पुरुष व इतर यांची स्त्रीविषयक धारणा व दृष्टिकोन आकारायला सुरुवात होते, ती अनुभवानुरूप विकसित होते, घडत जाते. कोणत्याही कलावंतात ही धारणा व दृष्टिकोन अधिक संवेद्य व तीव्र असते. स्त्री ही कोणत्यातरी अगम्य निमित्तानं, कारणानं निसर्गाशी अधिक जवळ असते, ती पुरुषाहून अधिक मूलभूत असते, अधिक आदिम असते यामुळे स्त्री ही गूढ आणि अज्ञात असते. या गूढाचा आणि अज्ञाताचा शोध कलावंताना असतो, त्याचं मूर्त स्वरूप म्हणून स्त्रीच्या अस्तित्त्व शोधाचा प्रयास कलावंत करत असतात. यामुळे प्रत्येक कवीच्या आयुष्यात आणि निर्मितीत ‘स्त्री’चं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असतं. कवीच्या स्त्रीरूप कल्पनेत कवीची मनोभूमिका अत्यंत महत्त्वाची असते, शेवटी ती भूमिकाच कवितेला अंतिम दृश्य, मूर्त आणि अनुभवायोग्य स्वरूप प्राप्त करून देत असते. अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा मराठी भाषेत चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकाराम ते थेट आजच्या लिहित्या कवींच्या कल्पनारूप स्त्री अवतरत राहिली आहे. एवढंच काय अगदी पुरुषांनी स्वत:ला स्त्रीरूपात कल्पून कविता केल्या आहेत. यात मला अत्यंत आवडणारे उदाहरण ज्ञानेश्वरांची एक ओळ ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’. आधुनिक काळात अगदी वेगवेगळ्या स्वरूपात आदिशक्ती, सृजनस्वरूप, प्रकृती, माया-आदिमाया, शक्तिरूप, ऊर्जा अशी अनेक स्त्रीरूपं कल्पिली गेली आहेत. कोणतंही रूप असलं तरी स्त्री कलाकृतीत कवीच्या अंगभूत स्वभावानुरूपच प्रकटते. त्यामुळे तोच कवीचा स्त्रीविषयक दृष्टिकोन ठरतो. दिनकर मनवर यांच्या कवितेत अवतरणारी स्त्री सबल, कणखर, मुक्तिदायिनी, करुणामयी आणि मातृस्वरूपातच असते. या स्त्रीरूपाचा विचार करता येईल. दिनकर मनवर यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत, ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ (२०१४) आणि ‘अजूनही बरंच काही बाकी’ (२०१६). तर या दोन्ही संग्रहांचा विचार स्वतंत्रपणे करता येईल.

.............................................................................................................................................

लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.

nitinbharatwagh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......